योगेश शेजवलकर – yogeshshejwalkar@gmail.com

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नात्यातल्या माणसांचे विचार पटले नाहीत तरी त्यांना शक्यतो न दुखावणं, बेबनाव असतानाही शुभकार्याना भेटल्यावर वरवर हसून बोलणं, या गोष्टींचा अनुभव आपल्यापैकी प्रत्येकानं घेतलेला असतो. पण असं तोंडदेखलं नातं आणि नात्याची नसलेली पण जिव्हाळ्याची माणसं, या दोघांत निवड करण्याची वेळ आली तर आपण कु णाला निवडू? काहीही झालं तरी नाती डावलता येणार नाहीत, असं अनेकांचं मत असेल. पण कधीतरी अशा मानपानांच्या ओझ्यामधूनही बाहेर पडण्याचा प्रयत्न करायला हवा ना?

काकाच्या घरातलं कार्य महिन्यावर आलं होतं. पण ‘हातात अजून महिना आहे,’ असं वाटणं किती फसवं असतं आणि वेळ आपल्या कल्पनेपेक्षा कितीतरी लवकर संपतो, हे माहिती असल्यामुळे घरातल्या सगळ्यांचीच धावपळ सुरू झाली होती. सतत कसली ना कसली खरेदी, घरातल्या बारीकसारीक गोष्टींची दुरुस्ती, पाहुणेमंडळी आल्यावर त्यांच्या उतरण्याची आवश्यक ती तयारी, अशा असंख्य गोष्टी बरोबरीनं सुरू होत्या.

‘ऐन वेळी धावपळ नको’ असं म्हणत घरातल्या सगळ्या मंडळींनी कंबर कसली होती. त्या मंडळीत ‘तो’ही होता. ती सगळी कामं म्हणजे दोन-तीन वर्षांनी होणाऱ्या स्वत:च्या लग्नाची रंगीत तालीम आहे, हे त्याला माहिती होतं. तेव्हा त्या न संपणाऱ्या कामांचं किती दडपण येतं हेही त्याला जाणवत होतं.

एका रविवारी दुपारी असंच कोणतंतरी काम पूर्ण करून आणि खरेदी केलेल्या गोष्टी घेऊन तो काकाच्या घरी आला. तेव्हा काकू घरी एकटीच होती. तिचं स्वयंपाकघरात धान्याचे डबे तपासणं आणि कमी-जास्त असणाऱ्या गोष्टींची यादी करणं सुरू होतं. त्यानं काकूला सांगून ठरलेल्या जागी पिशव्या ठेवल्या. मग हिशेब एका कागदावर लिहून काकूला हाक मारत तो म्हणाला, ‘‘काकू, हिशेबाचा कागद, खरेदीच्या पावत्या आणि राहिलेले पैसे कुठे ठेवू?’’ त्यावर वयंपाकघरातूनच काकू म्हणाली, ‘‘त्या टीपॉयवर माझी वही असेल. त्याच्यातच ठेव.’’ मग टीपॉयवरची वही उघडून त्यात तो हिशेबाच्या गोष्टी ठेवायला गेला. पण पैसे, पावत्या ठेवताना वहीच्या त्या उघडलेल्या पानांवर असलेल्या गिचमिडीनं त्याचं लक्ष वेधून घेतलं. दोन्ही पानांवर अनेक नावं लिहिलेली होती. त्यातल्या काही नावांसमोर बरोबरचं चिन्ह होतं, काही नावांसमोर फुल्या मारलेल्या होत्या, काही नावं अर्धवट खोडलेली होती, काहींना गोल काढले होते, तर काही नावांसमोर प्रश्नचिन्हं होती. हे सगळं काय आहे ते त्याला क्षणभर समजेना. तो ती नावं वाचत राहिला. त्यातली अनेक नावं त्याच्या परिचयाची होती. अचानक त्याच्या लक्षात आलं, की कार्याला कु णाला बोलवायचं, ही यादी बनवण्यासाठी केलेल्या  त्या सगळ्या नोंदी होत्या.

तो ते बघत असताना काकू त्याच्या शेजारी कधी येऊन उभी राहिली हे त्याच्या लक्षातही आलं नाही. मग काकूच त्याला म्हणाली, ‘‘वय वाढलं तरी तुझी उचकापाचक करायची सवय काही गेली नाही अजून?’’ तेव्हा ओशाळून त्यानं वही बंद केली. पण तरीही उत्सुकता त्याला स्वस्थ बसू देईना. शेवटी तो काकूला म्हणाला, ‘‘तू मांडलेल्या माणसांच्या गणितात काटछाट करून बाकी किती उरली ते आधी सांग.’’

त्यावर काहीशी वैतागून काकू म्हणाली, ‘‘आपलं ते नेहमीचं गणित परवडलं. त्यात दोनच शक्यता असतात. एकतर तुमचं उत्तर चुकतं किंवा बरोबर येतं. पण कु णाला बोलवायचं?,

कुणाला नाही बोलवायचं?, या गणिताला काही ठोस उत्तर नाही.’’

काकूच्या त्या बोलण्यामुळे त्याच्या मनात अनेक जुन्या आठवणी जाग्या झाल्या. पण चेहऱ्यावर तसं काहीही न दाखवता तो सहजपणे म्हणाला, ‘‘अगं, पण तुमचा मुलाकडचे किती आणि मुलीकडचे किती, हा आकडा ठरला असेलच ना? मग काय प्रॉब्लेम आहे? आधी घरातली मंडळी बोलवायची, मग राहिलेल्यात बाहेरची मंडळी बोलवायची. त्यात एवढं अवघड काय आहे?’’

क्षणभर विचार करून काकू म्हणाली, ‘‘पण ही बाहेरची मंडळी घरातल्या मंडळींइतकीच जवळची असतील तर? फक्त कार्यक्रमातच भेटणाऱ्या नातेवाईकांना प्राधान्य द्यायचं, की रोज भेटणाऱ्या आपल्या अवतीभोवतीच्या लोकांचा विचार आधी करायचा? वर्षांनुर्वष ज्या नातेवाईकांशी संवादही नाही, त्यांना शास्त्र म्हणून आमंत्रण द्यायचं, की आपलं कोणतंही नातं नसताना जी आता हक्काची माणसं आहेत, त्या लोकांसाठी आधी जागा राखून ठेवायच्या? सतत मानापमानाचाच विचार करणाऱ्या मंडळींना नात्याच्या दडपणाखाली झुकतं माप द्यायचं, की आपल्या आनंदात जे खरोखर सहभागी होतात, त्यांना त्यांच्या संख्येचा विचार न करता पहिलं नक्की करायचं?’’

काकूच्या त्या प्रश्नांवर उत्तर देण्याची त्यानं कोणतीही घाई केली नाही. आपल्याच विचारात असलेल्या काकूला त्यानं थोडा वेळ दिला आणि मग तो म्हणाला, ‘‘मला एक सांग, या गोष्टी खरंच इतक्या अवघड असतात? की आपण त्या अवघड करतो?’’

‘‘म्हणजे?’’ त्याला नेमकं काय म्हणायचं आहे हे न समजून काकू म्हणाली.

‘‘म्हणजे तुझ्या घरचं कार्य आहे. तेव्हा तुला ज्यांना बोलावावंसं वाटतं, ज्यांनी कार्यात सहभागी व्हावं असं वाटतं, त्यांना बोलाव आणि मोकळी हो. जितका जास्त विचार करशील, तितका गुंता वाढतच जाईल. मला हे माहिती आहे, की काही लोक असे असतील की ज्यांना बोलवावंच लागेल. पण ते झाले की उरलेले सगळे तू ठरव.’’

त्यावर काकू म्हणाली, ‘‘तू म्हणतो आहेस ते ऐकायला एकदम सुटसुटीत आहे. पण प्रत्यक्षात सगळं इतकं सरळ सोपं नसतं. आपल्याला वाटलं म्हणून एकाला बोलावलं आणि दुसऱ्याला बोलावलं नाही असं करता येत नाही.’’

‘‘ठीक आहे, मग तसं करता येणार नाही हे माहिती असेल, तर मग वेगवेगळ्या खुणा वहीत करून वेळ कशाला वाया घालवतेस? तुझ्याकडे लोकांची यादी आहे. तेवढय़ा सगळ्यांना बोलव आणि प्रश्न संपव.’’ असं म्हणत तो कोचावर जरा ऐसपैस बसला.

तेव्हा काकू सुस्कारा सोडत म्हणाली, ‘‘कार्यालय माझं स्वत:चं असतं ना, तर मी तेच केलं असतं. इथं संख्येची मर्यादा असल्यामुळे मला ज्यांना खरोखरच बोलवायचं आहे त्यातल्या काही मंडळींना बोलावता येणार नाही हे स्पष्ट आहे. काही अशी नावं आहेत, ज्यांना बोलवावं तर लागेल, पण तरीही ते येतील की नाही याची खात्री नाही किंवा आले, तरी तोंडदेखलं बोलून निघून जातील. कदाचित दोघांसाठीही तो फक्त एक उरकण्याचा सोपस्कार असेल.’’

‘‘हे माहिती असतानाही ओढूनताणून आमंत्रण देण्याचा इतका अट्टहास का?’’ काकूचा नेमका गोंधळ कुठे होतो आहे, हे त्याला समजून घ्यायचं होतं. ‘‘काही माणसं अशी असतात, ज्यांची मतं, स्वभाव तुम्हाला अजिबात पटत नाहीत. काही वेळा तुमचे वादही झालेले असतात. पण अशा गोष्टी या खासगीतच राहायला पाहिजेत. बोलावलं नाही तर मग त्याची चारचौघांत चर्चा होते, गैरसमज आणखी वाढतात. तेव्हा उगाच लोकांना बोलायला विषय कशाला द्यायचा?’’ काकूनं तिची भूमिका मांडली.

तो स्पष्टपणे म्हणाला, ‘‘पण आपल्या घरातलं एखादं कार्य, जे पुन्हा होणार नाही, ते जर आपल्याला हव्या असणाऱ्या लोकांबरोबर साजरं करावं असं वाटलं तर त्यात चुकीचं काय आहे?’’ तेव्हा काकू म्हणाली, ‘‘सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे करता येत नाहीत. विशेषत: जिथे अशा कार्यक्रमात अनेक गोष्टींचं संतुलन साधून तुम्हाला निर्णय घ्यावे लागतात.’’

‘‘काकू, संतुलन जरूर साधावं. पण ते ‘हा काय म्हणेल?’, ‘तो काय म्हणेल?’, ‘त्यांना कसं वाटेल?’ या गोष्टीचं ओझं न बाळगता. तुला असं नाही वाटत, की इतरांच्या अपेक्षांचं सगळं ओझं सांभाळणं ही आपली जबाबदारी नाही. त्यानं होतं काय, की आपण आपल्याच कार्यक्रमात मोकळ्या मनानं सहभागी होण्यापेक्षा फक्त ओझं सांभाळत राहतो. आता स्पष्टच बोलतो. ताईच्या लग्नात मी आईची उडालेली तारांबळ बघितली होती. तिचे लग्नातले फोटो बघितलेस तर त्यात तिच्या चेहऱ्यावरचं टेन्शन स्पष्टपणे दिसतं. तेव्हाचे तुझेही फोटो बघ, तेही काही वेगळं सांगत नाहीत. तुम्हाला लक्षातही येणार नाही इतकं हे ओझं वाढतं आणि मग नकळतपणे कार्यक्रमाचा आनंद घेण्याऐवजी तो कधी एकदाचा संपतोय असं तुम्हाला होतं. हे किती मोठं अपयश आहे?’’

त्यावर काकू काहीशा निराशेनं म्हणाली, ‘‘त्याला खरोखर काही पर्याय नाही. येणाऱ्या लोकांच्या मानपानात एक वेळ कमी-जास्त झालं तर चालतं. पण किमान त्यांचा अपमान होऊ नये, याची काळजी सतत असते. शिवाय पूर्वीही काही ना काही गोष्टी घडलेल्या असतात. दर वेळी आपण वागलो तेच बरोबर नव्हतं, हे आपल्यालाही माहिती असतं.’’

पण आता तो मागे हटणार नव्हता. तो आपला मुद्दा आणखी हिरिरीनं मांडत म्हणाला, ‘‘अनावश्यक गोष्टींचं ओझं वाहणार नाही असं जर ठरवलंत तर सगळं शक्य आहे. पण त्यासाठी तुम्हाला भूतकाळातून बाहेर यावं लागेल आणि भविष्याची काळजी करणं थांबवावं लागेल. ‘पूर्वी काय झालं होतं?’ आणि ‘भविष्यात काय असेल?’ याचा विचार करून हाती काहीही लागत नाही. फक्त मनावरचं दडपण वाढतं, भूतकाळ आणि भविष्याचा विचार करून वर्तमानाकडे दुर्लक्ष करणं हे आपलं दुसरं अपयश आहे. तेव्हा आज जे काही होतं आहे, होणार आहे, त्यातून आपल्याला आनंद मिळायला हवा, हाच दृष्टिकोन असायला हवा.’’

त्यावर काकू फक्त ‘‘हं’’ इतकंच म्हणाली. तेव्हा तो पुढे म्हणाला, ‘‘शिवाय तू गोष्टींची काळजी करून ज्या गोष्टी तुझ्या नियंत्रणात नाहीत, त्या तशाही घडणारच आहेत. तेव्हा फक्त गोष्टींचं दडपण घेण्यापेक्षा विषय सोपे कसे होतील, त्याचा विचार कर. म्हणजे आपण सगळे मिळून तो करू या. पण संतुलन सांभाळण्याच्या नावाखाली खरोखर किती ओझं वाहायचं, याचा निर्णय घ्यावाच लागेल. कदाचित तो निर्णय पूर्ण चुकेल किंवा बरोबरही येईल, याचीही तयारी ठेवावी लागेल. अर्थात त्याचा एक फायदा नक्की होईल- एकदा निर्णय घेतलास, की निदान कार्यक्रमात कोणत्याही दडपणाशिवाय तुला सहभागी होता येईल.’’

त्यावर काकू कौतुकानं म्हणाली, ‘‘तू आज हे बोललास ते खूप चांगलं झालं.’’ त्यावर तो हसून म्हणाला, ‘‘काकू, माझ्या लग्नाच्या वेळी ओझं कमीत कमी असावं, असं मला वाटत असेल तर त्यासाठी आजपासूनच प्रयत्न करावा लागेल!’’

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Apyashala bhidtana chaturang yogesh shejwalkar dd70