सुकेशा सातवळेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जगातील उच्च रक्तदाबाच्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण भारतात आहेत. सर्वेक्षणानुसार, शहरी भागात ३३ टक्के तर ग्रामीण भागात २५ टक्के लोक उच्च रक्तदाबग्रस्त आहेत. अधिक गंभीर बाब म्हणजे १८ ते २५ वर्षे वयोगटातील, १२.५ टक्के म्हणजेच, तीन ते चार कोटी तरुण उच्च रक्तदाबाने त्रस्त आहेत. हे वाढतं प्रमाण थोपवण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी दरवर्षी १७ मे रोजी जगभरात ‘वर्ल्ड हायपरटेन्शन डे’ अर्थात ‘विश्व उच्च रक्तदाब दिन’ पाळला जातो. त्यानिमित्ताने आहार कसा असावा याविषयी..

घाईघाईत दोन घास पोटात ढकलत, तणतणत रश्मी मत्रिणीला म्हणाली, ‘‘अगं रेणू, काही खरं नाही, वैताग आलाय नुसता. आज कामवाल्याबाईनी दांडी मारली. घरचं सगळं कसंबसं आवरून, मुलांना पाळणाघरात सोडलं. स्टेशनवर आले तर

८.३८ ची लोकल लेट. ऑफिसमध्ये लेट मार्क लागलाच, वर बॉसची बोलणी आणि जास्तीच्या कामाच्या फाइल्सचा ढिगारा! लंच टाइम संपत आला तरी काम उरकेना, तशीच उठल्येय डबा खायला.’’ रेणूनं समजावलं, ‘‘अगं, शांत हो; चिडचिड करून बी.पी. वाढवून घेशील, तुलाच त्रास होईल.’’ खरंच, रोजची धावपळ, लहान-मोठी अगणित आव्हानं, अपेक्षांचं ओझं, खायची-प्यायची आबाळ, व्यायामाला सोडचिठ्ठी, या सगळ्याचा परिणाम तब्येतीवर होतो. बाकी विकारांबरोबरच उच्च रक्तदाबाचा त्रासही चोरपावलाने, कधी आयुष्यात प्रवेश करतो कळतच नाही.

भारतात उच्च रक्तदाबाचं प्रमाण वेगाने वाढत आहे. जगातील उच्च रक्तदाबाच्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण भारतात आहेत. भारतातील एका सर्वेक्षणानुसार, शहरी भागात ३३ टक्के तर ग्रामीण भागात २५ टक्के लोक उच्च रक्तदाबग्रस्त आहेत. साधारणपणे दर ४ व्यक्तींपैकी एकाला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. आणि खेदजनक बाब म्हणजे, त्यांतील ५० टक्के लोकांना याची कल्पनाच नसल्यामुळे ते उपचार घेत नाहीयेत. अलीकडे लोकांच्या आयुष्याच्या लवकरच्या टप्प्यावरच हा त्रास सुरू झालाय.

१८ ते २५ वर्षे वयोगटातील, १२.५ टक्के म्हणजेच, तीन ते चार कोटी तरुण उच्च रक्तदाबाने त्रस्त आहेत. हे वाढतं प्रमाण थोपवण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी ‘वर्ल्ड हायपरटेन्शन लीग’तर्फे, दरवर्षी १७ मे रोजी जगभरात ‘वर्ल्ड हायपरटेन्शन डे’ अर्थात ‘विश्व उच्च रक्तदाब दिन’ पाळला जातो.

११०-८० ते १४०-९० ही रक्तदाबाची सामान्य पातळी आहे. यापेक्षा जास्त रक्तदाब वाढला तर उच्च रक्तदाबाचं निदान होतं. डॉक्टरांच्या तपासणीचा ताण आणि काळजीमुळे काही वेळा, तात्पुरता रक्तदाब जास्त दिसू शकतो. म्हणून किमान तीन-चार रीडिंग जास्ती आली तरच उच्चरक्त दाब नक्की धरतात. वय वाढत जाईल तशी रक्तदाबाची सामान्य पातळीही वाढते. भावनिक स्थिती, हालचालींचं स्वरूप, दिवसातला वेळ यानुसार रक्तदाब बदलतो. उन्हाळ्यापेक्षा, हिवाळ्यामध्ये रक्तदाब वाढलेला दिसतो.

उच्च रक्तदाबाला ‘छुपा मारेकरी’ म्हटलं जातं कारण; उच्च रक्तदाब असणाऱ्या बहुतेकांना, बरीच वर्ष काहीच त्रास किंवा लक्षणं जाणवत नाहीत आणि अचानक पक्षाघात किंवा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. म्हणूनच वरचेवर रक्तदाब तपासणे खूप महत्त्वाचे आहे. काही रुग्णांना मात्र खूप घाम येणे, अस्वस्थपणा, निद्रानाश असे त्रास जाणवतात. पण अतिउच्च रक्तदाबाची गंभीर समस्या असेल तर तीव्र डोकेदुखी, दृष्टिदोष, श्वास घ्यायला त्रास होणे, नाकातून रक्त येणे असा अनुभव येऊ शकतो.

उच्च रक्तदाबाचा त्रास जर दहा-पंधरा वर्षे दुर्लक्षित, उपचारांविना अंगावर काढला गेला तर मेंदू, डोळे, किडनी आणि हृदयाच्या रक्तवाहिन्यांचं अतोनात नुकसान होऊ शकतं. उच्च रक्तदाब हे पक्षाघाताचं प्रमुख कारण आहे. हृदय बंद पडून होणाऱ्या मृत्यूचा धोका दुपटीने वाढतो. रोहिणी काठिण्य विकाराचा आणि किडनी निकामी होण्याचा धोका वाढतो. डोळ्यांवरती खूप घातक परिणाम होऊन अंधत्व येण्याचा धोका असतो. उच्च रक्तदाबाचं निदान आणि उपचार लवकर आणि वेळेवर केले गेले तर गुंतागुंतीचे विकार होण्याची शक्यता बऱ्याच अंशाने कमी होते.

जोखमीचे घटक – हृदयविकार, सिगारेटचं व्यसन, कोलेस्टेरॉलची वाढलेली पातळी, अतिस्थूलपणा यांमुळे उच्च रक्तदाबाची जोखीम वाढते. आनुवंशिकता, अतिरेकी ताणतणाव, व्यायामाचा अभाव, अयोग्य आहार, अपुरी झोप, इन्शुलीन रेझिस्टन्स / मधुमेह, गरोदरपण, किडनीचा जुना आणि बळावलेला आजार, कुटुंबनियोजनाच्या गोळ्या, यामुळे उच्च रक्तदाबाची शक्यता वाढते. शास्त्रीय संशोधनाने सिद्ध झालंय की, मद्यपानामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास वाढतो.

प्रतिबंध आणि उपचार – उच्च रक्तदाबाचा विकार टाळण्यासाठी किंवा त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी सुयोग्य आहाराची भूमिका महत्त्वाची आहे. त्याबरोबरच जीवनशैलीत सुयोग्य बदल आवश्यक आहेत.

आहारात मिठाचा मर्यादित वापर करावा. मीठ म्हणजेच सोडियम क्लोराइड जास्त असलेले पदार्थ टाळायला हवेत. मीठ जास्त प्रमाणात खाल्लं गेलं तर, रक्तात जास्त प्रमाणात शोषलं जातं. मिठाबरोबरच, रक्तात द्रव पदार्थाची पातळी वाढते. हृदयाचं रुधिराभिसरणाचं काम वाढतं, किडनीवरचा ताण वाढतो; परिणामी रक्तदाब वाढतो. नेहमीच्या मिठाऐवजी, शेंदेलोण किंवा पादेलोण, स्वयंपाकासाठी वापरू शकता. त्यातील सोडियमचं अभिशोषण कमी प्रमाणात होतं. कृत्रिम मीठ, उदाहरणार्थ ‘लोना’ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वापरता येईल. त्यात सोडियम कमी आणि पोटॅशियम जास्त प्रमाणात असतं.

सोडियम जास्त असल्यामुळे हे पदार्थ शक्यतो खाऊ नयेत – लोणची, पापड, खारवलेले पदार्थ, आवळा सुपारी.  या विकतच्या पदार्थात सोडियम खूप जास्त असल्यामुळे ते टाळायला हवेत – पॅकबंद पदार्थ, कॅनिंग केलेले पदार्थ, बेकरीतले पदार्थ, तयार मसाले, जंक फूड, शीत पेयं, तयार सॉसेस- विशेषत: सोया सॉस, केचप, सलाड ड्रेसिंग, वेफर्स, चिप्स, खारे दाणे, मसाला फुटाणे, चीज, तयार बटर.

आहारात पोटॅशियमचं प्रमाण वाढवावं. शरीरातील जास्तीचं सोडियम आणि पाणी उत्सर्जति करायला पोटॅशियम मदत करतं. पालक, गाजर, टोमॅटो, शहाळं, केळी, जर्दाळू, संत्री यांमधून भरपूर प्रमाणात पोटॅशियम मिळतं.

मात्र नसर्गिकरीत्या काही पदार्थात सोडियमचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे ज्यांना अनियंत्रित उच्च रक्तदाब आणि त्याबरोबर गंभीर गुंतागुंतीचे विकार असतील त्यांनी या पदार्थाचं आहारातील प्रमाण अतिशय मर्यादित ठेवायला हवं. सुका मेवा, अंडय़ातला पिवळा बलक, मासे, मटण, दूध. काही भाज्या – पालक, मुळा, बीट, गाजर, नवलकोल.

रक्तवाहिन्यांच्या आकुंचन-प्रसरणासाठी कॅल्शियम आवश्यक असतं. आहारात कॅल्शियम वाढवल्याने उच्च रक्तदाब असणाऱ्या काहींना रक्तदाब आटोक्यात ठेवायला मदत होते.

आहारातील फॅट्समध्ये, पॉली अनसॅच्युरेटेड फॅट्सचं प्रमाण जास्त असेल तर रक्तदाब कमी व्हायची शक्यता वाढते. सोयाबीन/ सूर्यफूल तेल वापरावं.

आहारातील कोलेस्टेरॉल आणि सॅच्युरेटेड फॅट्सचं प्रमाण मर्यादित ठेवावं. तळलेले, तेलकट, तुपकट पदार्थाचं प्रमाण कमीत कमी असावं. लाल मांस टाळावं.

आहारात कॅफिनचं प्रमाण कमीत कमी असावं. कॅफिन उत्तेजक आहे. अति प्रमाणात घेतलं तर रक्तदाब वाढतो. म्हणूनच कॉफी, कोला ड्रिंक्स मर्यादित घ्यावीत.

वजन आटोक्यात ठेवावं. आदर्श वजनापेक्षा दहा टक्के वजन जास्त असेल तर रक्तदाब ६.६ (एमएमएचजी) ने वाढतो, कारण शरीरात सर्वत्र रक्त पोचवण्याचं हृदयाचं काम वाढतं. स्थूल लोकांनी वजन कमी केलं की रक्तदाब कमी होतो. कारण एकूणच आहाराचं प्रमाण कमी झाल्यामुळे आहारातील मिठाचं प्रमाणही कमी होतं.

नियमित व्यायाम – रोज किमान २०-३० मिनिटे नियमितपणे व्यायाम केल्याने हृदयाचं कामकाज सुधारतं. हृदय सहज, विनासायास काम करू शकतं. रक्तदाब आटोक्यात राहतो. रोजच्या हालचालींचं प्रमाण वाढवावं. अति प्रमाणातील किंवा तीव्र स्वरूपातील व्यायाम मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नयेत.

ताणतणावांचं नियोजन करून तणाव आटोक्यात ठेवायचा प्रयत्न करायला हवा. मानसिक ताणामुळे हृदयाची गती जलद होते. ताण असेपर्यंत रक्तदाब वाढता राहतो. चिंता, राग, संघर्ष, पलायन (टाळणे) या स्वभावामुळे सिम्पथेटिक नव्‍‌र्हस सिस्टम कार्यान्वित होते आणि त्यामुळे आहारातून घेतलेले मीठ रक्तात जास्त प्रमाणात शोषले जाते. रक्तदाब वाढतो. म्हणूनच मन:शांती महत्त्वाची. निदान जेवताना वातावरण शांत, आनंदी, तणावरहित ठेवावं.

सिगारेट, तंबाखू आणि मद्य यांचे सेवन करू नये. व्यसनामुळे रक्तदाब वाढून शरीरावर घातक परिणाम होतात.

आहार आणि जीवनशैलीतील बदलांमुळे उच्च रक्तदाब टाळणं किंवा नियंत्रित ठेवणं शक्य होतं. तब्येतीवर होणारे दुष्परिणाम, गुंतागुंतीचे विकार आटोक्यात ठेवता येतात. औषधोपचाराचं प्रमाण नियंत्रित ठेवणं शक्य होतं.

dietitian1sukesha@yahoo.co.in

chaturang@expressindia.com