प्रतिभा वाघ – plwagh55@gmail.com

जुन्या कापडांचे तुकडे जोडून, रेखीव टाके  घालून बनवलेली गोधडी नवीन पिढीतल्या कित्येकांना कदाचित कधी वापरायलाही मिळाली नसेल. पण अनेक कलात्मक आणि तरुण चित्रकर्ती देशा-परदेशांत राहून अस्सल भारतीय गोधडीची शिवणकला जोपासत आहेत. वैशाली ओक या चित्रकर्तीनं ‘कोलाज’च्या रूपात ही कला जपली आहे, तर ऋ चा कुलकर्णी आणि अर्चना जगताप या गोधडीच्या माध्यमातून इतर स्त्रिया सक्षम कशा होतील, याचाही विचार करीत आहेत. पणजी- आजी- आई- मुलगी असा प्रवास करणारी गोधडी शिवण्याची कला विभक्त कु टुंबपद्धतीच्या सध्याच्या काळातही टिकावी आणि गोधडीत सामावलेल्या मायेच्या उबेची सर्वाना ओळख व्हावी, यासाठी त्यांचे प्रयत्न मोलाचे आहेत.

Samruddhi Highway Thane Nashik tunnels Warli painting
समृद्धी महामार्गावरील बोगद्यांना आकर्षक चित्रांचा साज, ठाणे – नाशिकला जोडणाऱ्या बोगद्यावर स्थानिक वारली चित्रकलेचा आविष्कार
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
young man swallowed nail during carpentry
सुतारकाम करताना तरुण अचानक लोखंडी खिळा गिळतो तेव्हा…
nashik Police inspected various places to prevent use of nylon manja
पतंगबाजीत सारेच दंग, पोलिसांचे नायलाॅन मांजावर लक्ष
Mumbai Police launched drive against illegal nylon manja registering 19 cases
नागपूर : जीवावर बेतले, नाकावर निभावले; नॉयलान मांजाने महिला पोलीस कर्मचाऱ्याचे…
Snake Fighting With A Mongoose Who Will Win In The Jungle Battle Watch This Viral Video on social media
साप आणि मुंगूसामध्ये रंगलं घनघोर युद्ध, मृत्यूच्या खेळात शेवटी कोणी मारली बाजी? VIDEO पाहून थक्क व्हाल एवढं नक्की
mumbai police busts gang printing and selling fake Indian currency notes
बनावट नोटा छापणारी टोळी गजाआड
plastic banned
खबरदार प्लास्टिकचा वापर कराल तर… कर्जत नगरपंचायतची धाडसी कारवाई…

‘गोधडी म्हणजे

नसतो फक्त चिंध्यांचा बोचका

गोधडी म्हणजे गोधडी असते

मायेलाही मिळणारी ऊब असते’

कवी डॉ. कैलास दौंड यांची ही कविता आठवी इयत्तेच्या पाठय़पुस्तकात आहे. या ओळींनंतर पुढे या कवितेत वेगवेगळ्या सणासुदीला घेतलेले कपडे जुने झाल्यावर त्यांची लावलेली ठिगळं, त्याबरोबरच्या मधुर आठवणी आहेत आणि एक सुंदर ओळ आहे, ‘आईनं ते सगळं स्मृतीच्या सुईनं शिवलेलं असतं त्यात’. ही कविता वाचली आणि विभक्त कुटुंबपद्धतीत वाढणारी मुलं आजीच्या गोधडीची ऊब आणि रात्री झोपताना ती सांगत अलेल्या गोष्टी, याला मुकत आहेत, याची खंत वाटू लागली.

महाराष्ट्रातील गोधडीची परंपरा खूप जुनी आहे. भारतातील इतर राज्यांत आणि परदेशांतही गोधडी बनवली जाते. पण वेगवेगळ्या पद्धती, वेगवेगळ्या प्रकारचं कापड आणि भिन्न भिन्न नावं, असं तिचं स्वरूप आहे. कोल्हापूरच्या आजूबाजूला ‘वाकळ’ या नावानं ओळखली जाते, तर कोकणात ‘गोधडी’. रजई, गोधडी ही मराठी नावं. हिंदी भाषक ‘रजाई’ म्हणतात. जयपूरची रजाई प्रसिद्ध. यात दोन कापडांच्या थरात कापूस, अलीकडे फोमही भरला जातो. इंग्रजीमध्ये त्याला ‘क्विल्ट’ म्हणतात. महाराष्ट्रातील गोधडी किंवा वाकळ ही आतमध्ये जुन्या कापडांचे तुकडे समपातळीत, थरावर थर रचून बनवतात. जाडीनुसार थरांची संख्या कमी-जास्त असते. ती हातानं शिवली जाते. अलीकडे गोधडी मशीनवर शिवली जाते.

गोधडीमुळे ऊब तर मिळतेच, पण ‘टाकाऊपासून टिकाऊ’ अशी उपयुक्त कलाकृती निर्माण होते. वाकळ आणि गोधडीमध्ये मुख्य फरक असा की, वाकळीचे टाके हे खूप     जवळ-जवळ घातले जातात. त्यामुळे ती स्पर्शाला थोडी कडक आणि पांघरल्यावर अंगावर अलगद राहाते. याउलट गोधडीचे टाके अंतरावर असल्यामुळे गोधडी मऊ राहाते आणि पांघरल्यावर अंगाला चिकटून राहाते. विशेष म्हणजे हे दोन्ही प्रकार उन्हाळा, हिवाळा, पावसाळा या तिन्ही ऋ तूंमध्ये वापरता येतात. वाकळ शिवणं याला ‘वाकळ भरणं’ असं म्हणतात. ज्या आकाराची वाकळ त्या आकारामध्ये कापड जमिनीवर अंथरतात. त्या कापडाला, तसंच वरती येणाऱ्या कापडाला ‘पाल’ असं म्हणतात. हे पाल शेणानं सारवलेल्या जमिनीवर सरकू नये म्हणून त्याला चार कोपरे आणि कडेच्या मध्यभागी खिळे ठोकून घेतात. कधी कधी विटा किंवा दगडांचा वापरही करतात. त्यानंतर चारही बाजूला सुई आणि दोऱ्याच्या सहाय्यानं चार स्त्रिया एकाच वेळी आतमध्ये जुन्या कपडय़ांचे- म्हणजे लुगडी, झंपर, धोतर, कोपरी, सदरा यांचे तुकडे दाटीवाटीनं पण व्यवस्थित मांडून, त्यावर मोठमोठे टाके घालून वाकळ पूर्ण होईपर्यंत त्याच जागी राहावेत अशी काळजी घेतात. या पद्धतीनं वाकळ जेवढी जाड हवी असेल तसे थर वाढवले जातात. त्यानंतर एक पांढरं सुती कापड घेऊन ते शेवटच्या थरावर बसवलं जातं, अर्थात सुई दोऱ्यानंच. पण या वेळी मात्र कमी कमी अंतरावर धावदोरा घालतात.

यानंतर मुख्य सौंदर्यीकरणाचं काम सुरू होतं. त्यासाठी साडय़ांच्या किनारी, धोतरांच्या किनारी, खणाचे, इतर रंगीबेरंगी कापडांचे तुकडे लावले जातात. चारही बाजूंना त्रिकोणी आकारानं अखंडित पट्टी लावतात. त्याला ‘कापणी’ म्हणतात आणि कोपऱ्याला चार ठिकाणी लावलेल्या एकावर ठेवलेल्या लहान लहान होत जाणाऱ्या कापडी तुकडय़ांच्या फुलासारख्या दिसणाऱ्या आकाराला फुलं असंच म्हणतात. विशेष कौतुक वाटतं ते या स्त्रियांच्या सौंदर्यदृष्टीचं. एखाद्या प्रथितयश चित्रकाराप्रमाणे त्यांची रंगसंगती असते आणि ती अगदी सहजतेनं साधलेली असते.

हे सारं काम सुरुवातीपासून बाहेरून आतल्या दिशेनं केलं जातं आणि पारंपरिकरीत्या शेवटचा मधला कापडी तुकडा लावताना वाकळीचं पोट भरून अन्नपूर्णादेवीची पूजा केली जाते- म्हणजे त्या तुकडय़ात थोडीशी डाळ, तांदूळ, गूळ भरून तो तुकडा शिवून टाकतात. ही वाकळ अंगावर घेणाऱ्या माणसांवर अन्नपूर्णादेवीची कृपा राहावी, असाही उद्देश यामागे असे. हा दिवस घरात पुरणपोळ्या करून साजरा केला जातो. वाकळ शिवणाऱ्या चारही स्त्रियांना चहापाणी दिले जाते. या स्त्रियांना पूर्वी- म्हणजे साधारण चाळीस वर्षांपूर्वी दिवसाला दीड रुपया अशी मजुरी दिली जाई. या वाकळी धुणं म्हणजे फार कष्टप्रद काम असतं. नदीवर नेऊन दोन बायका दोन्ही बाजूंनी ती पकडून खडकावर आपटून, धोपटून स्वच्छ धुऊन नदीच्या काठावर वाळत घालतात.

प्रदेशाप्रमाणे गोधडीची रूपं आपली वैशिष्टय़ं घेऊन येतात. कर्नाटकातील कशिदा तर प्रसिद्ध आहे. सर्वसाधारणपणे गोधडय़ा मुक्तपणे बनवल्या जातात. त्यात कोणतंही पूर्वनियोजित डिझाईन नसे. परंतु कोकणी गोधडय़ांमध्ये मात्र हे दिसतं, याचं कारण व्यापारासाठी युरोपियन लोक कोकणात येत. त्यामुळे त्यांच्या पद्धतीचे शिवणातील आकार, पूर्वनियोजितता याची ओळख झाल्यामुळे कोकणातील मुस्लीम स्त्रियांनी या प्रकारच्या गोधडय़ा बनवल्या आहेत. त्या गोधडय़ांवर युरोपियन डिझाईनचा प्रभाव दिसतो.

काही वेळा नंदीबैलाच्या पाठीवर असलेली आकर्षक झूलही गोधडीच्या पद्धतीनं शिवली जाते. लोणावळा-खंडाळापासून वाईपर्यंत सह्य़ाद्रीच्या परिसरात वास्तव्य करणारा जोशी समाज. या समाजातील बायकांनी बनवलेल्या गोधडय़ा या कलेवर होणाऱ्या भौगोलिक परिणामाचं उदाहरण म्हणता येईल. सुंदर निसर्ग, मुबलक पाणी आणि त्यामुळेच त्यांनी बनवलेल्या गोधडय़ाही सुंदर आणि कल्पक. या स्त्रिया साक्षर असल्यामुळे ज्याच्याकरिता गोधडी बनवली असेल त्याचं नाव गोधडीवर दोऱ्यानं भरतकाम करून लिहितात. चंद्र, सूर्य, तारे यांचे आकार आणि जन्मपत्रिकेत दिसणारी मांडणीही त्यांच्या गोधडीत नक्षीकामाची जागा घेते.

पुण्याच्या वैशाली ओक यांनी गोधडीपासून प्रेरणा घेऊन कलानिर्मिती केली आहे आणि जागतिक स्तरावर नाव मिळवलं आहे. वैशाली यांचं शिक्षण अभिनव कला महाविद्यालय (पुणे) इथं झालं. एका वेगळ्या शैलीसाठी जागतिक स्तरावर त्यांनी नाव मिळवलं आहे. कागदाचं कोलाज करताना आपण कापडाचं कोलाज करावं असा विचार मनात असतानाच त्यांनी एका वस्तीसमोर दोरीवर वाळत घातलेल्या गोधडय़ा पाहिल्या. त्या जुन्या, जीर्ण असूनही त्यातलं सौंदर्य आपल्या कलाकृतीत यावं याचा ध्यास त्यांनी घेतला आणि खूप प्रयोगांअंती त्यांना समाधान मिळालं. दोन कापडांचे तुकडे एकमेकांवर शिवून कालांतरानं ते फाटले की त्यांचे रंग एकमेकांत मिसळल्यासारखे भासतात. उत्पत्ती, स्थिती, लय हा निसर्गाचा नियम आहे, हेही जीर्ण गोधडी सांगते, हे वैशाली यांना जाणवलं. त्यामुळे त्यांच्या अनेक कलाकृतींचं शीर्षक ‘टाइम’ असं आहे. त्यांच्या कलाकृतींमधून एक वैयक्तिक दृष्टिकोन जगासमोर आणून तो पारंपरिक गोधडीच्या प्रेरणेतून मांडण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. सांस्कृतिक मंत्रालयाची दोन वर्षांची फेलोशिप (२०००) आणि २००२ मध्ये मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार हे त्यांच्या अनेक पुरस्कारांपैकी एक. गुजरातमध्ये घडलेले  हिंदू-मुस्लीम दंगे आणि त्यांचे दु:खद परिणाम यावरील आपली प्रतिक्रिया त्यांनी गोधडीच्या तंत्रामधून त्यांच्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कलाकृतीत मांडली होती.

गेली अनेक र्वष आंतरदेशीय आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांत त्या सहभागी होत आहेत. ‘चायना फायबर आर्ट बिनाले’ (२०१६, २०१८) या प्रदर्शनातील सहभागाबरोबर माद्रिदमधील (स्पेन) ‘वर्ल्ड टेक्स्टाईल आर्ट’ या जागतिक प्रदर्शनात भारताचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं. २०१८ च्या ‘कोची बिनाले’मध्ये त्यांची चित्रं प्रदर्शित झाली होती. २०१९ मध्ये रायगड जिल्ह्य़ातील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक येथे भरलेल्या ‘अ‍ॅक्टिव्हिस्टा’ प्रदर्शनात त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट झाली. कापड, चिंध्या या माध्यमातल्या त्या कलाकृती थोडय़ा वेगळ्या पद्धतीनं सादर केल्या होत्या. विशेष म्हणजे या प्रदर्शनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या दृष्टिहीन कलारसिकांनी कलाकृतीला स्पर्श करून आणि वैशाली यांच्याशी केलेल्या संवादातून आपल्याला संपूर्ण कलानंद मिळाल्याचं सांगितलं, तो क्षण विलक्षण होता.

आई चित्रकला शिक्षिका, आजी शिवणकला शिक्षिका यांच्याकडून  कलेचा वारसा मिळालेली ही चित्रकर्ती आपले चित्रकार पती राजू सुतार यांच्या भक्कम पाठिंब्यासह आपल्या क्षेत्रात प्रगती करत आहेत. सध्या त्या बंगळूरुयेथील कलादालनाने आयोजित केलेल्या ऑनलाइन कला शिबिराकरिता चित्रनिर्मिती करण्यात व्यग्र आहेत. गोधडीपासून प्रेरणा घेऊन वेगळ्या प्रकारे कलानिर्मिती पुण्याचीच ऋ चा कुलकर्णी ही तरुण चित्रकर्तीदेखील करीत आहे. भारतीय विद्या शास्त्राचा (इंडॉलॉजी) अभ्यास केलेल्या ऋ चा यांनी पेंटिंगमधील ‘बी.एफ.ए.’, तर कलेच्या इतिहासातील ‘एम.एफ.ए.’ ही उच्च पदवी घेतली आहे. भारती विद्यापीठाचा एक पुरस्कार आणि चितारी अकादमीच्या राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराच्या त्या मानकरी आहेत. सध्या त्या परदेशात अ‍ॅमस्टरडॅम येथे स्थायिक असून निरनिराळ्या कलाकार सहनिवासांसाठी आमंत्रित चित्रकार या नात्यानं आपले गोधडीसंबंधित कलानिर्मितीचे नवनवीन प्रयोग यशस्वीपणे करत असतात. त्या म्हणतात,‘‘पारंपरिक गोधडी, ही हस्तकला माझ्यासाठी प्रेरणास्रोत आहे. गोधडीचा रंग आणि तिचं वैशिष्टय़पूर्ण स्वरूप याबरोबरच तिचं पर्यावरणपूरक संदेश देणारं टाकाऊ कपडय़ांचा वापर करण्याचं तत्त्व खूप गरजेचं वाटतं.’’   ऋ चा या दृश्य कलेतील नवा प्रकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘सामाजिक सराव’ अर्थात ‘सोशल प्रॅक्टिस’ या माध्यमात काम करतात. यात चित्रकार किंवा कलाकार समाजाबरोबर किंवा एखाद्या विशिष्ट जमातीबरोबर काम करताना समकालीन घटना, त्यांचे काही प्रश्न असे विषय आपल्या कलाकृतीतून हाताळतो. गोधडी ही बायकांनी एकत्रित येऊन करावयाची कलानिर्मिती आहे. पुण्यात असताना ऋ चा कुलकर्णी आणि अर्चना जगताप या दोघींनी कोंढवा (पुणे) गावातील गोधडी कलाकारांना एकत्रित करून ‘क्विल्ट कल्चर’ हा उपक्रम सुरू केला होता. पण पुढे

ऋ चा परदेशी गेल्यामुळे तो बंद करावा लागला. पण तिथेही त्या स्वस्थ बसल्या नाहीत. त्यांनी २०१९ मध्ये नेदरलँडस्मधील ‘स्टिम्युलेरिंग फंडस्’ या संस्थेच्या आर्थिक पाठबळामुळे आणि प्रोत्साहनानं ‘बियाँड क्विल्टिंग’ हा एक यशस्वी उपक्रम पुण्यात राबवला. यात पुण्यातील पूर्वीच्या गोधडी कलाकार स्त्रिया, डच डिझायनर आणि भारतीय चित्रकार या सगळ्यांची पंधरा दिवसांची एकत्रित कार्यशाळा घेण्याची संकल्पना आणि आयोजन ऋ चा यांचं होतं. यामागील हेतू स्पष्ट करताना त्या म्हणाल्या, ‘‘जागतिक पर्यावरणासाठी जागरूकता निर्माण करणारी डिझाईन चळवळ फार मोठय़ा प्रमाणावर सुरू आहे. नवीन वस्तूंऐवजी वापरलेल्या वस्तूंचा उपयोग कलाकृती निर्माण करण्यासाठी करायचा, हे या चळवळीचं तत्त्व आहे. हे तत्त्व आपल्या गोधडीशी मिळतंजुळतं असल्यामुळे गोधडी आणि या चळवळीचा मिलाफ व्हावा, या हेतूनं ही ‘बियाँड क्विल्टिंग’ कार्यशाळा झाली.’’ या कार्यशाळेत डच डिझायनर मेय् एंग्लखियर, सिमोन पोस्ट, रिचर्ड निसन, हेरॉल्ड स्कोल यांच्याबरोबर ऋ चा आणि करिश्मा शहानी खान या भारतीय चित्रकर्ती होत्या. त्यांची दोन प्रदर्शनं, एक पुण्यात आणि एक अ‍ॅमस्टरडॅम येथे झालं.

परदेशात गेल्यावर त्यांनी अनेक प्रदर्शनांत भाग घेतला. आशिया संस्कृती केंद्र ग्वागजू (दक्षिण कोरिया) इथं त्यांना कलाकार सहनिवासासाठी आमंत्रण होतं. त्या वेळी कोरियातील ‘बोजागी’ या पारंपरिक कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. ‘जोगकबो’ नावाचं तंत्र ते वापरतात, ज्यात सिल्कच्या कापडाचे लहान लहान तुकडे जोडून सुंदर कापड तयार करतात. या सहनिवासात जुन्या उरलेल्या कापडांचा वापर करून कलाकृती निर्माण करणाऱ्या जगातील विविध संस्कृतींमधील पारंपरिक हस्तकलांचा अभ्यास करता आला, हे त्यांना महत्त्वाचं वाटतं.

कोंढवा येथील गोधडी कलाकारांना काम मिळावं, आपली परंपरा टिकून राहावी, आपल्या गावाचं नाव मोठं व्हावं यासाठी आणि स्त्रियांना आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशानं २१ ऑक्टोबर २०२० ला अर्चना जगताप यांनी ‘क्विल्ट कलेक्टिव्ह’ हा प्रकल्प हाती घेतला आहे. पत्रकारितेची पदविका घेतलेल्या अर्चना यांनी अर्थशास्त्राची पदवी आणि राज्यशास्त्राची उच्च पदवीही घेतली आहे. फक्त कापड हेच माध्यम न वापरता चामडं आदी वापरून गोधडी तंत्रानं बनवलेली नव्या स्वरूपातील पर्स, मोबाइल कव्हर्स, लॅपटॉप कव्हर्स, उशा, लोड, चादरी, सोफा कव्हर्स, दोन्ही बाजूने वापरता येणारी जाकिटं, अशा अनेकविध वस्तू भारतीय रंगसंगतीत तसेच परदेशी ग्राहकांसाठी सौम्य रंगछटांत त्या बनवीत आहेत. विशेष म्हणजे गोधडीच्या तंत्राचा नावीन्यपूर्ण वापर करून अर्चना यांनी लग्नपत्रिका, पर्यावरणविषयक कार्यक्रमांच्या निमंत्रणपत्रिकाही बनवल्या आहेत. गोधडी शिवणाऱ्या अनेक संस्था गावागावांत बचत गटांच्या रूपातही आढळतात.

गोधडीची ऊब गरीब, श्रीमंत सगळ्यांच्या घरी छोटय़ा बाळांना मिळत असते. नव्या बाळाचं आगमन हा एक आनंदोत्सव असतो, पण असं कौतुक करणारं स्वत:चं घर नसलेल्या अनाथ बालकांसाठी मुंबईच्या विलेपार्ले येथील शिक्षिका म्हणून निवृत्त झालेल्या ऐंशीच्या घरातील शुभदा कुंटे दुपटी शिवतात. पंढरपूर येथील ‘वा. बा. नवरंगे बालकाश्रमा’त ही दुपटी त्या देतात. गेली जवळजवळ ३५ हून अधिक र्वष या बाळांसाठी फावल्या वेळात त्या दुपटी शिवून पाठवत आहेत, घरबसल्या तयार केलेली छोटी गोधडी घर नसलेल्या बाळांना देऊन मायेची ऊब देत आहेत.

विशेष आभार- सौरभ शेठ- महाड

Story img Loader