नवरा-बायकोतले बहुतांशी संवाद जेव्हा फोनवर केले जातात, ते चौकश्यांचे जास्त असतात. त्यात रोमँटिकपणा क्वचितच असतो. अगदी ‘आय लव यू’ नाही म्हणता आले तरी ‘मला तुझी आठवण झाली म्हणून फोन केला’ अशी वाक्येसुद्धा रोमँटिकच असतात. ती उच्चारण्यासाठी काही सेकंदांचा वेळ लागतो आणि तेवढा वेळ आपण रोज निश्चितच काढू शकतो.  हे आपण आपले केलेले पॉझिटिव्ह ब्रेन वॉश असते. यामुळे दाम्पत्यस्वास्थ्य सुदृढ होत असते. नुकत्याच झालेल्या ‘व्हॅलेंटाइन डे’ निमित्ताने खास टिप्स..
नी लेश एक चाळिशीतला डॉक्टर. दोन मुले व गृहकृत्यदक्ष बायको असलेला. नेहमीपेक्षा आज जरा तो थोडा उशिराच उठला होता. तणतण करतच आवरून घेतले आणि तिरीमिरीतच ब्रेकफास्ट अर्धवट करून ऑपरेशनला गेला. किचकट ऑपरेशन पार पाडून त्या केसची पोस्ट ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट करता करता दुपारचे १२ वाजत आले. मग ओपीडी. स्टाफवर जरा चिडचिडतच होता तो. पेशंटशी थोडा वैतागूनच बोलत होता. मधेच बायकोचा एक प्रेमळ फोनही तुटकपणे बोलत ‘संपवला’. डोके गरगरत असताना ४ वाजता घरी आला आणि व्यवस्थित जेवला खरा, पण जेवण आणि पाणी देण्यावरून बायकोशी कुरबुर के.ली, मग बायकोही चिडली. ‘तू तू मं मं’ झाली आणि साडेपाचला पुन्हा ओपीडीला गेला. ओपीडी संपता संपता त्याला वाटलं आपण उगाचच चिडचिड केली बायकोवर. मग तिला फोन लावला, पण आता बायकोचा मूड नव्हता. वैतागून नंतर क्लिनिकल मीटिंगला गेला. एखाद दोन िड्रक्सही झाले. संपेपर्यंत बारा-साडेबारा झाले. घरी येऊन पाहिले बायको कधीच झोपली होती. मोठय़ा मुलाचा टीव्ही चालू होता. त्याच्यावर डाफरून झोपून गेला बिचारा..
असेच दिवस जात होते. ‘काहीही’ घडत नव्हते. घरातला ताण मात्र वाढत होता. नीलेशला ते जाणवत होते, पण ‘कारण’ कळत नव्हते. बायकोलाही समजत नव्हते सध्या असं का चाललंय आणि अशातच ‘मेडिकल असोसिएशन’चे पत्रक आले की एक आगळावेगळा कार्यक्रम डॉक्टरांसाठी आयोजित करण्यात आला आहे, ‘चाळिशीनंतरचे कामजीवन’. नीलेशने बायकोला ते पत्रक दाखवले. दोघांच्या डोक्यात प्रकाश पडला. ‘अरेच्चा, हे तर कारण नाही ना आपल्यातील ताणाचे?’ दोघेही एकमेकांकडे बघून हसले आणि आपल्या ताणाचे मूळ व भांडणांची उत्तरे शोधायला कार्यक्रमाला गेले..!
एका डॉक्टरच्या वैवाहिक जीवनाची ही सत्यस्थिती. अशा असंख्य केसेस गेल्या बत्तीस वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये बघूनच मला व माझ्या बायकोला, जेसिकाला, मी ‘चाळिशीनंतरचे कामजीवन’ असा एक स्टेज शो करावा ही कल्पना सुचली. माझ्याकडील केसेस हाताळताना आलेले अनुभव, ‘कामजीवन’ याविषयीचा स्त्रियांचा दृष्टिकोन जेसिकाकडून (आणि अर्थातच तिच्या मत्रिणींकडूनही) समजून घेऊन मी टप्प्याटप्प्याने हा कार्यक्रम विकसित करीत गेलो. पुण्यातील पहिल्याच कार्यक्रमाला (५ ऑक्टोबर २००३) टिळक स्मारक मंदिरातील आटोक्यात न येणारा (काही िवगेतही येऊन बसलेला) उत्सुक, उत्साही व उदंड जनसमुदाय जमला होता. त्यासमोर ऑडियो-व्हिज्युअल साधनांनी हा विषय सादर केला गेला आणि दुसऱ्या दिवशीच्या पुण्यातील सर्व वर्तमानपत्रांनी तो उचलून धरला.
‘अ‍ॅॅडल्ट सेक्शुआलिटी’वरील पुण्यातील प्रतिसादाने माझा उत्साहही द्विगुणित झाला.  विषय तसा मुळातच उत्सुकतेचा पण संकोचाचासुद्धा. खरं म्हणजे संकोच वाटायचे तसे काही कारण नाही. जी गोष्ट शंभरपकी नव्याण्णव जणांच्या आयुष्यात येते, जी अटळ आहे, आनंददायी आहे, प्राणिमात्रात मूलभूत आहे आणि जिचे परिणाम आयुष्यात दूरगामी होत असतात, तिच्याविषयीचे ज्ञान घेण्यास शरम वाटण्यासारखे काहीही नाही. परंतु ज्या वातावरणात आपण लहानाचे मोठे होतो त्या वातावरणाचा हा परिणाम असतो. बाहेरून आपण कितीही आधुनिक विचारांचे दाखवत असलो तरी कामजीवनाविषयी आपण कमालीचे कर्मठ असतो आणि सामाजिक, कौटुंबिक व शैक्षणिक परिस्थितींमधून आपण आपली अशी मते, विचार व कल्पना ठाम करून सेक्सकडे बघत असतो. हे ज्ञान पुष्कळदा गरज्ञानच असते.
खरे म्हणजे बहुतांशी गृहस्थाश्रमी व्यक्ती या आपल्या दैनंदिन कामकाजात इतक्या गुंतून जात असतात की त्यांच्या गृहस्थाश्रमाची सुरुवात ज्या गोष्टीने होत असते, ती कामजीवनासारखी नित्य व आवश्यक गोष्टच काळाच्या ओघात हरवून टाकतात आणि मग ‘कामात गुंतूनी गुंतता, झाला कामभाव हा वेगळा’ ही स्थिती होते. शृंगारच विसरला जातो. कामजीवनाची ‘चाळिशी’, निस्तेजता येते आणि वयाच्या कुठल्याही टप्प्यावर ती येते. अगदी तिशी, पस्तिशीतसुद्धा. पती, पत्नी दोघेही याला जबाबदार असतात. याला सर्वात महत्त्वाचे कारण असते िलग-योनी संबंध म्हणजेच सेक्स ही सेक्सविषयीची ठाम कल्पना. मग सर्व गोष्टी त्यासंबंधीच व त्यासाठीच केल्या जातात.
मानवी जीवनात सेक्स फक्त प्रजननासाठी नसून रंजनासाठीसुद्धा असल्याने मुलांच्या जन्मांनंतरही दाम्पत्यामधे ते चालू असते, थांबत नाही. म्हणून संबंधित व्यक्तींमधील आकर्षण व उत्तेजन टिकणे आवश्यक असल्याने व बहुतेक विवाहितांचे कामजीवन एकसुरी होत असल्याने त्यामध्ये शृंगारकलेला महत्त्व आले आहे. सेक्स हा मानवात एक शृंगारिक, रोमँटिक प्रवास असून ‘िलग-योनी संबंध’ हा त्याचा शेवट (एंड पॉइंट) असतो. पण जेव्हा त्यालाच मुख्य उद्देश मानले जाते म्हणजे केंद्रिबदू (सेंटर पॉइंट) केले जाते, तेव्हा सेक्सच्या समस्या जाणवायला लागतात आणि बहुतांशी दाम्पत्यांमध्ये हा रोमँटिक प्रवास होत नाही किंवा अपुरा होत असतो.
आपल्या समाजात बहुतांशी लग्ने अ‍ॅरेंज्ड मॅरेज किंवा कुटुंब-संमत लग्ने असतात. अशा दाम्पत्यांना त्यांच्या नात्यात रोमँटिकपणा कसा आणायचा असतो, टिकवायचा असतो हे समजणे गरजेचे असते. प्रेमविवाह असणाऱ्यांना याचा विवाहपूर्व अनुभव असू शकतो म्हणून नंतरही काळाच्या ओघात विसरलेल्या शृंगाराला पुन्हा चालना देणे त्यांना सोपे जाऊ शकते. परंतु अ‍ॅरेंज्ड मॅरेज किंवा कुटुंब-संमत लग्ने असणाऱ्यांना त्यांच्यात तसे घडणे किंवा करणे अशक्य वाटते. म्हणून मी रोमँटिकपणाची सोपी व्याख्या केली आहे जी कुठल्याही प्रकारातील विवाहितांना समजल्यावर तसे वागणे त्यांना कठीण वाटणार नाही. रोमँटिकपणा म्हणजे ‘तुम्हाला तुमच्या जोडीदारात लग्नपसंतीच्या वेळी, लग्नाच्या सुरुवातीच्या काळात असणारा इंटरेस्ट सद्यस्थितीतही आठवून तो शब्दांनी व कृतींनी सातत्याने क्षणोक्षणी दाखवण्याची प्रवृत्ती स्वत:मध्ये जाणीवपूर्वक आणण्याची कला’. यालाच मी ‘घनिष्ठतेची कला’ अर्थात ‘आर्ट ऑफ इंटिमसी’ म्हणतो. प्रेमविवाह असो वा अ‍ॅरेंज्ड मॅरेज दोन्हीही प्रकारातील विवाहितांना ही कला सहज शक्य होऊ शकते.
मुद्दा अजून सोपा करण्यासाठी हा रोमँटिकपणाही मी दोन प्रकारांत विभागला आहे. रोमान्स आणि बेडरोमान्स. यातील पहिला प्रकार फारच महत्त्वाचा. त्याचाच विचार आपण आता करणार आहोत. कारण तोच नेमका दाम्पत्यामधे गळला जात असतो. बेडरूम रोमान्स म्हणजे एकांतातील, प्रायव्हसीतील शृंगारकला व बेडरूमबाहेरील रोमान्स म्हणजे सामाजिक निवांतपणातील शृंगार. हे सर्व प्रकार ‘सेक्स व रिलेशनशिप’  काऊन्सेिलगमधे नीट समजून घेतले तर ही ‘आर्ट ऑफ इंटिमसी’ दाम्पत्याला सहजसाध्य होऊ शकते. इतर कुठल्याही कलेप्रमाणे हिचाही अभ्यास करावा लागतो. यातील तंत्रे आत्मसात करणे म्हणजे कृत्रिमपणे वागणे नाही, तर तो या कलेचा रियाज असतो हे ध्यानात ठेवले पाहिजे.
खरे म्हणजे दाम्पत्याने दिवसाची सुरुवात एकांतपणातील शृंगाराने करणे अवघड नसते. मी अगदी सोपे, सहज जमणारे व नगण्य वेळ घेणारे शृंगारतंत्र त्यांना सांगतो, ते म्हणजे ‘गुड मॉìनग किस टेक्निक’, शुभप्रभात चुंबन तंत्र. त्यामुळे पती-पत्नींमधील ‘अनुराग’ अर्थात प्रीती वाढायला मदत होते असेही सांगितले आहे. त्यामुळे ‘तू माझा/माझी’ (सेन्स ऑफ ओननेस, माझेपणाची जाणीव) व ‘मी तुझा/तुझी’ (सेन्स ऑफ बिलाँगिंगनेस, स्वाधीनतेची जाणीव) या दोन गोष्टींचा संदेश काही सेकंदांतच दिला जात असतो, या दोन जाणिवा दाम्पत्यजीवनाच्या बांधीलकीसाठी (सेन्स ऑफ कमिटमेंट) आवश्यकच असतात. दाम्पत्यजीवनात सुरक्षिततेची जाण (सेन्स ऑफ सिक्युरिटी) यामुळे येत असते आणि पती-पत्नींच्या दाम्पत्यस्वास्थ्याची पायाभरणीही होत असते. हाच ‘आर्ट ऑफ इंटिमसी’चा पाया आहे. इथूनच शृंगाराची ठिणगी पडते आणि नंतर तिचे रूपांतर ‘कामज्वाले’त व्हायला मदत होते.
शृंगार म्हणजे शारीरिक खेळच ही कल्पना काढून टाकणे गरजेचे आहे. जोडीदाराशी भावनिक जवळीक व त्याची वैचारिक ओळख करण्यासाठी देण्यात येणारा वेळ व कृती हे शृंगारात अभिप्रेत असते. ‘प्रत्येक स्त्रीमध्ये फुलणारे एक फूल असते तर प्रत्येक पुरुषामध्ये खेळणारे एक मूल असते’ हे जरी सत्य असले तरी स्त्रीला केवळ मऊ, मुलायम खेळणे (सॉफ्ट टॉय’) मानणे किंवा झोपेच्या गोळीसारखे (स्लीिपग पिल) वापरणे म्हणजे शृंगारिकता नाही. बेड रोमान्स तर महत्त्वाचा असतोच, पण त्यासाठी स्त्रीशरीराचाच नाही तर स्त्रीमनाचाही विचार जरुरीचा असतो. म्हणजेच पती-पत्नींनी एकमेकातील मानसिक आणि भावनिक रुची निर्माण केली पाहिजे किंवा पुनरुज्जीवित केली पाहिजे.  
जोडीदारात असणारा इंटरेस्ट पुन्हा निर्माण करण्यासाठी जोडीदाराकडे पहिल्यांदा लक्ष द्यायला शिकले पाहिजे. मी जोडीदारासाठी ‘लक्ष देणे, गुणग्राहकता आणि कौतुक तंत्र’ (अटेंशन, अ‍ॅप्रिसिएशन अ‍ॅण्ड प्रेजिंग टेक्निक) अमलात आणायला सांगतो. अगदी पत्नीने केलेल्या चहा, ब्रेकफास्टच्या कौतुकापासून पतीच्या पेहरावाचे कौतुक हे खरे म्हणजे अवघडही नसते आणि खोटेही नसते. पण ‘केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे’ हे जाणून कष्टपूर्वक हे तंत्र आत्मसात करता येते.
कामावर जाताना जोडीदाराला एक ‘जादूकी झप्पी’ व हलके चुंबन देणे अंगवळणी पाडणे जमले तर जोडीदाराला ‘आपण एकमेकांचे आहोत’ हा दाम्पत्यस्वास्थ्याचा बहुमूल्य संदेश काही क्षणातच दिला जातो. त्यासाठी काही सेकंद लागत असतात आणि तेवढा एकांत (प्रायव्हसी) दाम्पत्य कुठल्याही बहाण्याने मिळवू शकते. फक्त तिथे दाम्पत्याने उद्युक्त होणे, मोटिवेट होणे आवश्यक असते. म्हणून मी नेहमीच सांगतो की जोडीदाराला ‘मुठीत’ नव्हे तर ‘मिठीत’ ठेवायला शिका. कामसूत्रामध्ये तर चुंबनाचे २४ प्रकार उल्लेखलेले आहेत. चुंबनाचा उपयोग त्या क्षणी स्वल्पविराम म्हणून, उद्गारवाचक चिन्ह म्हणून, प्रश्नचिन्ह म्हणून किंवा पूर्णविराम म्हणून, असे विविध संदेश देण्यासाठी होत असतो.
बेडरूमबाहेरचा शृंगार तर शृंगारकलेचा कळस असतो. याचाच उपयोग बेड रोमान्ससाठी होत असतो हे पती-पत्नींनी लक्षात ठेवणे गरजेचे असते. म्हणून तो जाणीवपूर्वक विकसित केला पाहिजे. याचा उद्देश आपला जोडीदार केवळ एक व्यक्ती नसून एक व्यक्तिमत्त्व आहे हे लक्षात घेऊन ते जाणून घेणे हा असतो. संवाद हे त्याचे प्राणतत्त्व असते. निवांत ठिकाणी असा संवाद जर झाला तर आपल्या जोडीदाराच्या आवडी-नावडी, कला (टॅलेंट) याचे ज्ञान होते.
 म्हणून कधी कधी ‘कँडल लाइट डिनर’साठी म्हणजे निवांत ठिकाणी केलेले सुसंवादी खाद्य-पेयपानासाठी वेळ काढला पाहिजे. यासाठी अगदी फाईव्ह-स्टार वातावरण किंवा मेणबत्ती पाहिजेच असे नाही. (पाहिजे तर स्वत:च्या खिशातून घेऊन जा.) ‘नाइट आउट’ अर्थात एखादी जवळच्या निसर्गरम्य ठिकाणी दाम्पत्याने घालवलेली शृंगारिक रात्र ही दैनंदिन आयुष्यातील ताण घालवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असते. यासाठी कुठेही लांबवर ‘ट्रिप’ केली पाहिजे असे नाही. मधूनमधून अशा जवळपासच्या ठिकाणच्या ‘नाइट आउट’ दाम्पत्य जीवनासाठी चतन्यमय ठरते, शृंगारिकतेचे पुनरुज्जीवन करते.
आपल्या दैनंदिन करिअरच्या व्यापातही शृंगार जपता येतो हे भान दोघांनीही ठेवले पाहिजे. यासाठी मी ‘दूरस्पर्शी संवाद’तंत्र (डिस्टंट टच कम्युनिकेशन टेक्निक) वापरायला सांगतो. दिवसभरात जोडीदाराशी फोनवर संवाद साधणे व रोमँटिक एसेमेसची देवाण-घेवाण करणे हे सहजशक्य असते. कामात व्यग्र असल्याने इच्छा असूनही हे जमत नाही म्हणणाऱ्यांनी एक लक्षात ठेवले पाहिजे की, न करण्यासाठी शंभर कारणे सांगता येतात, पण करण्यासाठी एकच कारण आवश्यक असते ते म्हणजे त्यासाठी प्रवृत्त होणे, मोटिवेट होणे. संवादासाठी काही मिनिटांचा वेळ पुरेसा असतो.
बहुतांशी संवाद जेव्हा फोनवर केले जातात, ते चौकश्यांचे असतात (इन्क्वायरी फोन). रोमँटिकपणा क्वचितच असतो. अगदी ‘आय लव यू’ नाही म्हणता आले (मुख्यत अ‍ॅरेंज्ड मॅरेजवाल्यांना) तरी ‘मला तुझी आठवण झाली म्हणून फोन केला’ अशी वाक्येसुद्धा रोमँटिकच असतात. ती उच्चारण्यासाठी काही सेकंदांचा वेळ लागतो आणि तेवढा वेळ व एकांत कामाच्या व्यापातून आपण रोज निश्चितच काढू शकतो. जोडीदाराला ‘आय लव यू’ म्हणणे हे केवळ त्याच्या मनाच्या प्रसन्नतेसाठी नसून आपण आपल्याही मनाला त्या प्रत्येक वेळी त्याची जाणीव (सेल्फ टॉक) करून देत असतो. हे आपण आपले केलेले पॉझिटिव्ह ब्रेन वॉश असते. यामुळे दाम्पत्यस्वास्थ्य सुदृढ होत असते.  
मधूनमधून छोटय़ा छोटय़ा रोमँटिक गिफ्ट, बक्षीस देणे याने दाम्पत्यजीवनाचे स्वास्थ्य सुधारत असते. जोडीदाराला कारणाशिवाय कधी तरी गुलाब देणे हे खरे तर अत्यल्प खर्चाचे असूनही डेटिंग काळातच करायचे असते असे मानून मधुचंद्र काळानंतरही ते चालू ठेवायचे असते याचे भान कित्येकांना नसते. काही वेळा नवरा कारणाशिवाय गुलाब देतोय म्हणजे ‘काही तरी’ कारण मुरतंय असंही बायकोला वाटू शकते. एकाने सांगितले की, त्याच्या बायकोला फुलांची अ‍ॅलर्जी आहे. अशांनी ‘लाल गुलाबा’चे ‘ग्रीटिंग कार्ड’ द्यायला हरकत नाही. एक लाल गुलाब तुमच्या हृदयाचे हजार शब्द बोलून दाखवतो हे ध्यानात ठेवा. याची सवय करा. त्याच्या लालपणात शृंगाराची ठिणगी दडलेली असते. तिने दाम्पत्यजीवनातील ‘कामज्वाला’ पेटू द्या आणि दिवसभरात तुमच्या कामाच्या रगाडय़ातही अशा ठिणग्या वारंवार पडू द्यात.
रोमँटिकपणाला वय नसते. दुर्लक्षित रोमँटिकपणामुळे विस्कळीत दाम्पत्यजीवन, दाम्पत्यांमधील ताणतणाव, करिअरवर होणारा दुष्परिणाम व जोडीदाराचे दुसरीकडे भरकटणे या गोष्टींना निश्चितच आळा बसेल. दाम्पत्यांमध्ये त्याला समाजमान्यता असल्याने रोमँटिकपणाला चुकीची गोष्ट किंवा गुन्हाही मानू नये. उलट वाढत्या वयात दाम्पत्यातील एकोपा वाढवायला, टिकवायला या जवळीकतेची जास्तच गरज असते. ज्यांना मनातून अशी इच्छा असते पण वास्तवात असे जमणे कठीण वाटते अशा काहींना वाढत्या वयातील इतर कोणाचा ‘रोमँटिकपणा’ हा ‘आंबटशौकीनपणा’ वाटू शकतो, कारण ‘कोल्हय़ाला द्राक्षे आंबटच’. साठी-सत्तरीनंतरही दाम्पत्यांमध्ये ही इंटिमसीची ज्वाला जीवन सुखकरच करेल. अजूनही वय गेलं नाही, अजूनही वेळ गेली नाही. शुभस्य शीघ्रम्.     

डॉ. शशांक सामक हे पुण्यातील त्वचारोगतज्ज्ञ व सुप्रसिद्ध क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट असून त्यांनी स्वतची ‘डॉ. सामक सेक्शुअल फिटनेस थेरपी’ प्रसिद्ध केली आहे. ती एकमेव भारतीय सेक्स थेरेपी असून अमेरिकन व इतर विविध आंतरराष्ट्रीय वैद्यकीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाली आहे. १९८१ सालापासून लैंगिकशास्त्र क्षेत्रात कार्यरत असून ‘क्रिस’ या संस्थेचे अध्यक्ष व ‘डॉ. सामक अ‍ॅकॅडमी ऑफ सायंटिफिक सेक्शुआलिटी’ या संस्थेचे अध्यक्षीय संचालक आहेत. ‘वैद्यकीय कामशास्त्र’ व ‘नवविवाहितांचे कामजीवन’, या पुस्तकांचे ते लेखक आहेत.

chaturang loksatta
जिंकावे नि जगावेही : शब्द शब्द जपून ठेव…
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Anshula Kapoor talks about parents Boney Kapoor Mona Kapoor divorce
“माझे आई-वडील वेगळे झाल्यावर…”, पालकांच्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच बोलली जान्हवी कपूरची सावत्र बहीण
bird was happy to see the little girl
चिमुकलीला पाहून पक्षी झाला खूश; एकमेकांची करू लागले नक्कल अन् … पाहा खेळकर पक्ष्याचा VIRAL VIDEO
Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”
Grandfather shifted the camera towards his wife
“नातं इथपर्यंत पोहचलं… ” आजी येताच आजोबांनी मोबाईल वळवला अन्…; VIRAL VIDEO पाहून नेटकरी झाले भावुक