‘‘चित्रकला हा एक अत्यंत गंभीर विषय आहे. ती एक साधना आहे. ती छंद, विरंगुळा, करमणूक अशासारखी थिल्लर बाब नाही. अभ्यास आणि ध्यास यामधील अंतर मिटविण्यासारखी धाडसाची बाब आहे. होणे आणि असणे यामधील आंतरिक  ‘पीळ’ सोडवण्याचा प्रयास आहे. चित्रकार होण्यासाठी चित्र काढणे आणि चित्र काढता काढता चित्रकार असण्याची जाणीव होणे, यापकी एका मार्गाची निवड करण्यासारखे आहे. मी ‘असण्या’ कडे झुकलेला चित्रकार आहे.’’
चित्रकला शिक्षणाची सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधील पाच वष्रे संपवून, किंवा ओलांडून किंवा पचवून १९६८ साली बाहेर पडलो आणि स्वत:च्या मनाला बजावले की आता इथून पुढे अभ्यासक्रम नाही, मदतीच्या कुबडय़ा नाहीत, फक्त ‘एकला चालो रे’ च्या मस्तीत चालायचे आहे. पावले जिकडे नेतील तिकडे जायचे, दृष्टी जिथे थांबेल तिथे थांबायचे. (अशा प्रवासात मार्गदर्शक मिळावा लागतो तो पळशीकरसरांच्या रूपाने मला मिळाला हे माझे भाग्य.) या आधी स्कूल ऑफ आर्टमध्ये सोलापूरकर, कदम, परब, असे रथी-महारथी शिकवायला होते. ते पाठीवर आश्वासक हात ठेवत. शाबासकी देत किंवा मनावर संस्कार करताना आवश्यक तेव्हा चिमटाही काढत. आता ते सर्व शिक्षक माझ्या मनासोबत असले तरी प्रत्यक्षात मात्र मी एकटाच!
बाहेरचे जग मायावी, मतलबी होते. तिथल्या वातावरणात आमच्या आधी येऊन रुळलेले कलावंत आणि त्यांच्या कलाकृती हा माझ्या स्वतंत्र शिक्षणाचा अटळ भाग होता. स्वतला शिकवायचे म्हणजे दरवेळी स्वतचीच परीक्षा घेण्यासारखे होते. सभोवतालच्या चित्रकारांपेक्षा त्यांच्या चित्रांकडून बरंच काही शिकलो. काव्य, संगीत, सिनेमादी कलांच्या आस्वादानेही माझ्या विचारांना स्पष्टता आली. अनुभवाअंती कळले की शिक्षण कधी संपणार नाही, संपणार आहे मी!   
विविधांगी अनुभवानंतर खऱ्या अर्थाने स्वतला समजण्यासाठी आणि समजलेल्या गोष्टी रिचवायला वेळ लागला, परंतु त्या दरम्यान एका गोष्टीची सखोल जाण आली आणि ती म्हणजे शोधक दृष्टीने स्वतच्याच मनाच्याही मनाचा ठाव घेणे. त्यासाठी नियमित रेखाटणे, दैनंदिनी ठेवणे, निबंध लिहिणे, वाचन करणे यांच्याद्वारे वेळोवेळी स्वतच्या मनोवृत्तीचा आलेख काढत आणि जोखत आलो. जे स्पष्टपणे उमजले, विश्वसनीय वाटले ते चित्रातून पक्के केले.
अशा तऱ्हेने आधी कल्पना करणे आणि मग चित्र रंगवणे ही प्रक्रिया मी खूप मागे सोडून आलो होतो. त्यानंतर चित्र रंगवणे हाच अनुभव आणि तेच आणि तेवढेच ‘चित्र’ या माझ्या स्वतंत्र संज्ञेपर्यंत मी येऊन स्थिरावलो आहे. कुठे चाललो आहे, कुठे जायचे आहे हे आधी ठरवून मी चालत नाही. माझे चालणे (रंगविणे) अधिकाधिक मोकळे, स्वच्छंद सहज व्हावे एवढी एकच इच्छा बाळगून चालत राहिलो, निरुद्देशीय उद्देश ठेवून. ज्याचा आदी-मध्य-अंत केवळ चित्रच आहे.  
चित्र हे पोहोचण्याचे ठिकाण नाही. तो सततचा प्रवास आहे म्हणूनच केवळ वर्तमान आहे. चित्र (स्र्ं्रल्ल३्रल्लॠ) रंगवणे म्हणजे वर्तमानात असणे आणि त्यासाठी जिवंत राहणे म्हणजे जगणे असे मी समजत आलो आहे.   
खरं म्हणजे आरती प्रभू ऊर्फ खानोलकर यांनी एकजात सर्व सर्जनशील कलावंतांची निर्मितीप्रक्रियेपूर्वीची भावस्थिती फार पूर्वीच लिहून ठेवली आहे आणि तीही तितक्याच सर्जनशील सहजतेने. त्या कवितेतील चार ओळी मी इथे देत आहे.
  ओंजळीत पाण्याच्या यावा चुकून मीन
  चमकूनहि तसाच गाण्यात अर्थ जावा
  तारांवरही पडावा केव्हां चुकून हात
  विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा.
 त्यांनी सर्जनशील प्रक्रियेचे रहस्य असे मर्मग्राही काव्यात गोठवून ठेवले आहे, आणि हे लक्षात घेता माझा हा निबंध म्हणजे त्या चार ओळींचे विस्तृत रसग्रहण ठरू शकेल.
बाह्य़ जगातील जीवनरहाटीशी माझ्यातल्या समाजघटकाचा जिवंत राहण्यासाठी अटळ संबंध येत असला तरी माझ्यातल्या चित्रकाराच्या जगण्याचा काडीचाही संबंध येत नाही. अर्थात बाहेरच्या जगातले चित्रविषय शैक्षणिक काळात अभ्यासले आणि त्यातील मर्म तेवढे घेऊन बाकीचे विसरूनही गेलो. दरम्यान गेल्या ४५ वर्षांत सभोवतालचे मानवनिर्मित वातावरण बदलले, बदलणाऱ्या माणसाने निसर्गाचे जे अतोनात शोषण आणि हनन केले तेही बघितले, समाज बदलला आणि मीही बदललो. परंतु या बदलादरम्यान नकलेला प्रवृत्त करणारे किंवा पुनरावृत्तीशी कायम संलग्न असलेले बाह्य़ जग मी नेहमीच नाकारत आलो. त्याचे प्रमुख कारण म्हणजे, मला नेहमी वाटत आले आहे की चराचरातील प्रत्येक गोष्ट असामान्य आहे. प्रत्येक व्यक्ती असामान्य आहे म्हणूनच मीही जगावेगळा आहे, मी माझ्यासारखाच आहे. ही असामान्यता आपणा प्रत्येकाजवळ असल्यामुळे आपण सारेच एकाअर्थी सर्वसामान्य आहोत. परंतु ज्याला स्वतजवळची असामान्यता उमजली तो खऱ्या अर्थाने असामान्य ठरतो, जगावेगळा ठरतो. मला स्वतला आपल्यात असे काय आहे, जे इतरांत नाही हे शोधण्याचा मूलतच ध्यास लागला. त्या ध्यासाने मी इतका प्रभावित झालो की त्यात कायमचा गुंतून पडलो. त्यातून सुटण्याची माझी मुळीच इच्छा नव्हती, आणि नाही. माझा गाढ विश्वास आहे की मला मी सापडलो तर सारे जग सापडल्याचा आनंद होईल. जीवनाचा असंज्ञेय अर्थ अनुभवता येईल.
आज बदलत्या जगात केवळ सुमार दर्जाचे स्थापत्यशास्त्री आणि बांधकाम-मंत्री म्हणजे बिल्डर्स यांचेच प्राबल्य दिसते. त्यात चित्रकार, शिल्पकार, कवी, नर्तक, गायक आदी कलावंतांच्या योगदानाचे सुतराम प्रतििबब दिसत नसल्यामुळे दृश्य जग निरस तथा केवळ संस्कारशून्य उपयोगी वस्तूंचा मॉल झालेले आहे. गावे, जिल्हे, शहरे आपापले स्वतंत्र चेहरे कधीच हरवून बसली आहेत आणि एकूण देश एकसाची झालेला दिसतोच. पर्वत-टेकडय़ा, झाडे-झुडपे, इ. निसर्गाचे अवयव यापुढे अवशेष म्हणून तरी शिल्लक राहतील की नाही अशी शंका वाटावी इतकी निर्जीव होत, नष्ट होत चाललेली दिसताहेत. अशा या निष्प्राण जगाकडून माझ्यातल्या चित्रकाराला कसलीच प्रेरणा मिळत नाही. जिवंतपणाचे ओझे वाहणारा समाजही निष्प्राण, निर्बुद्ध होत चालला आहे. समाजातल्या दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या अघोरी घटना चित्राऐवजी चिंतेचा विषय झाल्या आहेत.
  आणि समजा, समाज तसा झाला नसता तरी तो माझ्या चित्राचा विषय कधीच झाला नसता. कारण चित्र म्हणजे सामाजिक घटनेला विषय समजून गिरवणे नव्हे, त्याचे विरूपण करणे किंवा त्याचे प्रतीकात्मक रूप रंगवणे नव्हे, असे मी समजतो. चित्र हे कुणाचीही बटीक नव्हे. ते स्वायत्त आहे. ते मानवी मनाचे अभिव्यक्त रूप आहे, अशी माझी वैयक्तिक धारणा आहे, अगदी सुरवातीपासूनच.
  चित्रकला जेवढी तंत्राशी निगडित आहे त्याहून अधिक ती विज्ञानाशी निगडित आहे. तो एक ज्ञानमार्ग आहे अशी माझी श्रद्धा आहे. वैज्ञानिक बाह्य़ सृष्टीचे रहस्य शोधण्यात गर्क आहेत. चित्रकार आंतर विश्वाचे अदृश्य रूप चित्रित करण्याच्या प्रयत्नात दंग आहेत, असे मी समजतो. कलावंत नव्या जाणिवांची, संवेदनाची जगाला ओळख करून देत असतो. मानवी जीवनाला नवा आयाम देत असतो, जगण्याला अभिनव चतन्याने जागे करीत असतो.
  पाच वर्षांच्या चित्रकला अभ्यासात फक्त चित्रघटकांची आणि चित्रतंत्रांची ओळख करून दिली जाते. ती झाल्यानंतरच चित्रकाराची खरी लढाई सुरू होते ती स्वत सोबत, स्वतच्या ओळखीसोबत, कल्पना आणि कौशल्यासोबत. चिंतन आणि प्रयोगाच्या आधाराने असा निकराचा लढा जेव्हा निर्णायकी ठरला तेव्हा मला तीव्रतेने जाणवले की चित्रकला हा एक अत्यंत गंभीर विषय आहे. ती एक साधना आहे. ती छंद, विरंगुळा, करमणूक अशासारखी थिल्लर बाब नाही. अभ्यास आणि ध्यास यामधील अंतर मिटविण्यासारखी धाडसाची बाब आहे. होणे आणि असणे या मधील आंतरिक ‘पीळ’ सोडवण्याचा प्रयास आहे. चित्रकार होण्यासाठी चित्र काढणे आणि चित्र काढता काढता चित्रकार असण्याची जाणीव होणे यापकी एका मार्गाची निवड करण्यासारखे आहे. मी ‘असण्या’ कडे झुकलेला चित्रकार आहे.
 चित्रकलेच्या अभ्यासाच्या दिवसातील अनिष्ट सवयी, पारंपरिक समज-गरसमज, चित्र-चितारण्याच्या रूढी, पद्धती आणि एकूणच चित्रकलेच्या स्वरूपाचे अज्ञान या साऱ्याचा दुष्परिणाम माझ्यावरही झाला. म्हणजे काय तर मी सवयीने आणि सोईने चित्र काढायला लागलो. सुदैवाने सवयीचे व्यसनात रूपांतर होण्यापूर्वीच मी त्या दुष्परिणामातून बाहेर पडलो. (श्रेय पळशीकर सरांचे) त्यासाठी मी दुसरा अभ्यास सुरू केला. तो मला निराश करू शकला असता. कारण सवय ही एक दुर्धर रोगासारखी आहे. अत्यंत चिवट आणि चिकट बाब. सवय आणि मी यापकी एकच शिल्लक राहू शकेल अशा या प्रयत्नात मी शिल्लक राहिलो, ते मात्र माझ्या गुरुवर्याच्या सशक्त मार्गदर्शनाने. या नव्या अभ्यासात सुरुवातीला तर अगदी बालिश बुद्धीने अक्षरश लहान मूल होऊन कागदावर गिरबटले, सुचेल ते केले, अगदी काहीही आणि कसेही, ताळतंत्र सोडून असंबंद्ध (ुं२४१)ि रेखांकन, रंगलेपन आदी. अगदी अकल्पित असे काहीही. चित्राबद्दलची कसलीही जाणीव मनात न आणता कागदावर लेपणे, मळणे, चोळणे, खरवडणे, थापणे, पुसणे इत्यादी क्रियांची रेलचेल करीत राहिलो. हा त्या अभ्यासातला मीच माझ्यासाठी शोधलेला एक स्वाध्याय होता.
 आधीपासूनच माहीत असलेले किंवा ओळखीचे असलेले काढणे म्हणजे माझ्या मते नक्कल करण्यासारखे होते. त्यामुळे ते कायमचे हद्दपार करणे मी योग्य समजलो. ‘सुचेल ते करणे’सुद्धा धोकादायक वाटू लागले. कारण त्यातही आधीपासूनचे अवगत असलेलेच सुचत गेले म्हणून ुं२४्िर३८मध्ये मात्र मला नवचतन्य दिसू लागले. कारण त्यात ओळखी-अनोळखी ठरविण्याचा प्रश्नच नसे. केवळ चित्र घटकांचा उत्स्फूर्त आविष्कार असे. त्यांचे मीलन, त्यांचे संमेलन, त्यांचे सफल किंवा विफल आंदोलन, त्यांचे अचानक बेवारशी होणे, त्यांचे निर्हेतुक हेतूकडे सरकणे अशासारखे बरेच काही निबरेधक, निर्थक. डोळे मिटून अंधारातल्या लक्ष्यावर वार करण्यासारखेच. परंतु वार होताच आवाज झाला आणि तेच लक्ष्य ठरवले असे मात्र मुळीच नव्हते, तर काळोखाचे अंग, दुभंगत पुढे जात असताना तोच काळोख पुन्हा दुप्पट वेगाने जुळून येतोय असा अज्ञेय अनुभव देणारा होता. हे तुटताच जुळणे अदभुत होते. मग वाऱ्यावर, पाण्यावर आणि सरतेशेवटी मनावर-ज्याचे अस्तित्व वाऱ्यासारखे अनुभवत गेलो, परंतु त्याचा ठावठिकाणा माहीत नाही- त्यावर वारावर वार करीत गेलो. पुराणातल्या आरुणीच्या मुलाप्रमाणे (श्वेतकेतुप्रमाणे) चिंतनाच्या पातळीवर आधी फळ (स्वतला) कापले, मग त्यात आढळलेले बीज (स्व) कापले. अगदी ते कापण्यापलीकडे जाईपर्यंत आणि सूक्ष्मात पोहचलो. सूक्ष्म- एक निरंतर-रिक्त पोकळी, परंतु निर्जीव, निश्चल नव्हे तर चतन्यदायी आणि निर्मितीक्षम अशी. सुईच्या अग्राहूनही सूक्ष्म, जी दिसणार नाही, परंतु टोचल्यानंतर जाणवावी इतकी तीक्ष्ण म्हणूनच ती फक्त जाणिवेसारखी वाटली, नव्हे जाणीवच वाटली. ती अनुभवत गेलो. जाणिवेचे अमर्यादित्व त्या सूक्ष्मतेमुळे लक्षात आले आणि माझ्या चित्राची नाळ सापडल्यासारखे वाटले. आनंद झाला, परंतु संशयही आला, की मी खरोखरच योग्य दिशेला निघालोय का? आनंद होणे त्याचे लक्षण समजायचे का? संशयाच्या अनेक बाजू उलगडून पाहण्याच्या प्रयत्नात जीवनाशी पूर्णत असंबंध अशा सुप्त जाणिवांचा शोध लागला. त्या कुठल्या नातेसंबंधातून किंवा भूतकाळात हरवून गेलेल्या किंवा विसरून गेलेल्या कुठल्याही आठवणीतून किंवा स्वप्नावस्थांतून किंवा तत्सम कसल्याही पूर्ण किंवा अपूर्ण इच्छांतून आलेल्या नव्हत्या. त्या पूर्वी कधीही न अनुभवलेल्या होत्या. त्यामुळे त्यांना नाव देण्याचा प्रश्नच आला नव्हता आणि द्यायचे म्हटले तरी पूर्वसुरीतूनच ते आले असते आणि त्या संज्ञांनी त्या जाणिवेच्या स्वभावाचा चेहरामोहराच पुसला गेला असता.
त्या जाणिवा अवर्णनीय, अनामिक होत्या. त्या केवळ दृश्य होत्या आणि त्यांना तसेच ठेवणे सयुक्तिक वाटले. त्यांना केवळ चित्रातून अनुभवण्याचा मार्ग शिल्लक होता आणि मी तोच अनुसरला. असाहाय्य, चंचल, संदिग्ध, निर्बुद्ध अवस्थेत काहीही करण्याच्या मस्तीत मी कॅनव्हास रंगवण्याचा प्रयत्न करीत राहिलो. पेंटिंग करण्याच्या इराद्याने नव्हे तर केवळ अशा अगम्य मनस्थितीचे अवलोकन करण्याच्या प्रयासात काहीतरी केले. काहीही केले. बरेच काही वाटत होते आणि वाटतही नव्हते. एकच ठळकपणे मनात ठसत होते की रंगवत राहायला हवे. काय, कसे, किती, काहीच ठरत नव्हते. जसजसा कॅनव्हास रंगाने भरून जात होता, तसतसा मी अधिकाधिक शुद्धीवर येत होतो. सततच्या रंगकामाठीमुळे मी पूर्ववत सुज्ञपणाच्या परिघात आलो. पेंटिंगच्या पूर्वानुभवातल्या सर्व संज्ञा, नियम, व्याख्या मनाच्या पृष्ठभागावर उभारून आल्या. त्यांच्या कसोटीवर कॅनव्हासवर जे काही अवतरले होते ते नवे होते, ते माझे वाटत नव्हते, इतर कुणाचेही वाटत नव्हते. ते फक्त स्वतचेच होते, केवलत्व दर्शविणारे. मी भारावून गेलो. ते स्वतचे करून घेण्यासाठी तिथून पुढे त्या दृश्य परिणामांना मी वाहून घेतले.
 मनाच्या र्निबध, निष्काम, निर्हेतुक, निरपेक्ष, अवस्था जिकडे नेईल तिकडे जाण्यात एक ध्यास, एक प्रकारची आत्मिक तटस्थता आहे असे वाटले. माहीत नसलेल्या मुक्कामी पोचण्याचे कुतूहल होते. परिपक्वता निरागसतेकडे जात असल्याचा भास स्पष्ट होत होता. लक्षात आले की अशी मनोवस्था जाणीवपूर्वक टिकवता येत नाही आणि जाणीवपूर्वक ती नष्टही करता येत नाही. ती सहजपणे लाभावी लागते आणि एकदा का ती लाभली तर ती सोडून जात नाही. मला कळले की सहज राहणे सर्वात आधी जमायला हवे. हेतुशून्य, निष्पाप मनस्थिती म्हणजेच मनाची संवेदनशील अवस्था आणि त्यासाठी जगण्याची प्रत्येक कृती सहज होण्याची आवश्यकता आहे. इतके निष्कपट, निरतिशय, निरामय, निव्र्याज, निर्धोक की भयसुद्धा निर्भय व्हावे तसे.असे होण्याचा कला-व्यासंग हा एकच मार्ग असल्याची खात्री पटली आणि त्यासाठी कायम कलेच्या सहवासात राहण्याची साधना हेच साधन आणि साध्य असल्याचे लक्षात आले. मग सहजता आणि निर्भयी चित्रकारी एक दुसऱ्याला पूरक असल्याचेही तीव्रतेने लक्षात आले. चित्रविषय मागे पडले आणि ‘निमित्त’ पुढे आले. रंग लावण्याचे निमित्त व्हावे आणि तो लावताच त्यातून चित्र जन्मावे असा अनुभव मनाला बेचन करू लागला. हे बेचैन होणे समाधान देणारे होते आणि समाधान अधिक असमाधानी करणारे होते. तेव्हापासून सहज होण्यासाठी चित्र रंगवतो की चित्र रंगवण्यासाठी सहज होतो हे कळेनासे झाले. मनात आले की ‘जेव्हा कळेनासे होण्याची मनाची भारावलेली अवस्था’ होते तेव्हाच आणि तेव्हाच चुकून तारांवर हात पडतो आणि विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडतो. पण हात आहे म्हणून तो चुकून पडेलच असे नाही आणि चुकून पडलाच तर गंधार सापडेलच याची खात्री नाही. त्यासाठी समुच्यय सृजन प्रक्रियेचे घटक जुळून यावे लागतात, सुरात यावे लागतात. त्यासाठी सतत सतर्क राहणे अत्यावश्यक आहे हे कळावे लागते. हे मला कळूनही मी चुकतच गेलो. चुकलो अधिक आणि कळले फार थोडे. आशा आहे चुकलेल्या वाटेलाच ज्ञानाचा फाटा फुटेल.
आपण आपल्या दृष्टीचा अनुभव घेतो, परिणामही अनुभवतो. परंतु त्या दृष्टीशी निगडित असलेले आपलेच डोळे आपण पाहू शकत नाही. दृष्टीसंबंधीच्या ‘सृजनकळा’ या अनुभवण्याच्या बाबी आहेत. त्यांच्यापासून वेगळे होऊन, प्रेक्षक होऊन त्यांचे स्वरूप पाहता येणार नाही. त्या मानवी मनातल्या अचिंतनीय अवकाशातल्या ऊर्जालहरी असाव्यात. जितक्या काटेकोरपणे त्यांचे वर्णन करायला जावे, तितक्या त्या दूर वर्णनापलीकडे जातात. ‘पाण्यातील मासा श्वास घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हाची कळे’ या उक्तीसारख्या पर्यायविहीन. या सर्व जंजाळात अमूर्ताचा विचार म्हणजे पाण्यावर उठणाऱ्या लाटांसारखा आहे. तो पाण्यातच (अमूर्तातच) सुरू होतो आणि पाण्यातच विरून जातो. उठणाऱ्या लाटेला गोठवण्याचे कौशल्य कलावंताकडे असणे गरजेचे असते. ते ज्याच्याकडे आहे, शिवाय चित्रकारितेदरम्यानच्या उत्स्फूर्त अवस्थेत त्वरित निर्णय घेण्याचे धाडस जो दाखवू शकतो, तोच नवे चित्र रूप पाहू शकतो व दर्शवू शकतो.
  हा एकूण अनुभव ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’सारखाच मला वाटतो. तो फक्त रंग रूपाने दर्शविता येतो. शब्दात सांगता येत नाही. शब्दांची जीवनातली जागा फार महत्त्वाची असली तरी ते ज्या ज्ञानेंद्रियांशी जोडलेले आहेत, त्या कानांना डोळ्यांची जागा घेता येत नाही. सृजन-व्यवस्थेच्या सूक्ष्म परिष्करणाचे अवलोकन मनानेही करता येणे कठीण वाटावे इतके ते अदृश्य आणि सहज असते. ते फक्त जाणवू शकते. आपण जाणीव होऊन जाणिवेत प्रवेश करण्यासारखी अतक्र्य अशीच ही प्रक्रिया असावी. जाणवणाऱ्या आशयाला अनुभवत नवीन आकार द्यायचा असेल तर आधीपासून आपल्या दृश्य कोशात असलेले सर्व आकार पूर्णपणे नष्ट करायला हवेत. आणि नवे आकार आपल्या स्मृतिग्रंथात कायम होण्यापूर्वीच ते विसरायलाही हवेत. जैविक प्रक्रियेइतकीच चित्र-निर्मितीची प्रक्रिया जटिल आणि अत्यंत गुंतागुंतीची आहे. वेळोवेळी करत आलेल्या अशा वैचारिक झटापटीतून स्पष्ट होत नसली तरी सूतभर का होईना, तिच्याजवळ जाणे शक्य झाले, हेच या निबंधाचे फलित.     
prabhakarkolte@hotmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा