डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी

यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे ९२ वे संमेलन! एवढय़ा वर्षांत संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान फक्त पाच लेखिकांना मिळाला. कुसुमावती देशपांडे, दुर्गा भागवत, शांता शेळके, विजया राजाध्यक्ष आणि यंदा डॉ. अरुणा ढेरे! या पाचही जणी सर्जनशील लेखिका तर आहेतच, पण समीक्षा – संपादन – अनुवाद याही क्षेत्रांत त्यांनी लक्षणीय काम केलं आहे. आज या साहित्य संमेलनाचा दुसरा दिवस. त्यानिमित्ताने या पंचकन्यांचा थोडक्यात परिचय.

article about upsc exam preparation guidance
यूपीएससीची तयारी : CSAT ची तयारी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Beed Sarpanch Murder Case Prime Accused Valmik Karad Cast
अग्रलेख : कूच बिहार!
what is the genome india project why it matters
विश्लेषण : जिनोमइंडिया प्रकल्प भारतासाठी किती महत्त्वाचा?
upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
यूपीएससीची तयारी : ‘जीएस’ची तयारी
MHADA to invite applications for comprehensive list Application process from January 15 to 31 mumbai news
म्हाडा बृहतसूचीसाठी मागविणार अर्ज; १५ ते ३१ जानेवारीदरम्यान अर्ज प्रक्रिया; सोडतीद्वारे मूळ भाडेकरूंना घरांचे वितरण
TCS , quarterly results , Infosys, Wipro,
ससा कासवाची गोष्ट : ‘टीसीएस’ला फळले… इन्फोसिस, विप्रोच्या तिमाही निकालांचे काय ?
spread of bogus research papers The proposed regulations mention the UGC Care List pune news
बोगस संशोधनपत्रिकांचे पुन्हा पेव? प्रस्तावित नियमावलीत ‘यूजीसी केअर लिस्ट’चा अनुल्लेख

यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे ९२ वे संमेलन! एवढय़ा वर्षांत संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान फक्त पाच लेखिकांना मिळाला. कुसुमावती देशपांडे, दुर्गा भागवत, शांता शेळके, विजया राजाध्यक्ष आणि यंदा अरुणा ढेरे!  त्यांच्याविषयी..

कुसुमावती देशपांडे : १९६१ मध्ये ग्वाल्हेर इथं झालेल्या ४३ व्या संमेलनाच्या अध्यक्ष होत्या कुसुमावती देशपांडे! साहित्य संमेलनाची परंपरा सुरू झाल्यावर, तब्बल ४२ वर्षांनी प्रथमच एका स्त्रीला हा मान मिळाला. कुसुमावती देशपांडे  यांच्या वाङ्मयीन कारकीर्दीचा प्रारंभ कथालेखनापासून झाला. नवकथापूर्व काळातली वैशिष्टय़पूर्ण कथा लिहिणारी लेखिका म्हणून त्यांचा आवर्जून उल्लेख केला जातो. ‘दीपदान’, ‘दीपकळी’, ‘मोळी’ हे त्यांचे कथासंग्रह. त्या काळी (१९३५ च्या आसपास) रूढ झालेला लघुकथेचा साचेबद्धपणा मोडून काढणारी, व्यक्तिमनातील आंदोलने टिपणारी, चिंतनशील, संयत आणि रेखीव कथा त्यांनी लिहिली. त्यांची कथा लहानशा अनुभवाला काव्यात्म चिंतनशीलतेचे परिमाण देत व्यापक मानवतेला आवाहन करणारी आहे.

‘चंद्रास्त’, ‘माध्यान्ह’, ‘मध्यरात्र’ या ललित लेखसंग्रहातूनही त्यांच्या तरल कविवृत्तीचा आणि प्रौढ चिंतनशीलतेचा प्रत्यय येतो. ‘आमच्या आयुष्यातील आठवणी’ या रमाबाई रानडे यांच्या आत्मचरित्राचा त्यांनी इंग्रजीत अनुवाद केला असून मर्मज्ञ समीक्षालेखनही केले आहे. ‘पासंग’ आणि ‘मराठी कादंबरी : पहिले शतक’ या ग्रंथांमधून त्यांच्या विवेचक समीक्षा दृष्टीची, व्यासंगाची आणि मानवतावादी दृष्टिकोनाची प्रचीती येते.

दुर्गाबाई भागवत : दुसऱ्या स्त्री अध्यक्ष दुर्गाबाई भागवत. १९७५ च्या कराडच्या साहित्य संमेलनात त्यांचा ‘दुर्गावतार’ साऱ्यांनी पाहिला. दुर्गाबाई खऱ्या स्वातंत्र्यवादिनी! पिंडानंच निर्भय. त्यांची निर्भयशीलता ही त्यांच्या प्रखर स्वातंत्र्यप्रेमाचीच दुसरी बाजू आहे.

सर्जनशील साहित्यकार आणि ज्ञानमार्गी संशोधक अशी त्यांची ठसठशीत ओळख मराठी साहित्यविश्वाला आहे. इंग्रजी, संस्कृत, पाली, बंगाली, गुजराती या भाषा त्यांना अवगत होत्या. इंग्रजी आणि मराठीतून त्यांनी विपुल लेखन केलं. त्यात ‘केतकरी कादंबरी’सारखे समीक्षाग्रंथ, ‘शासन, साहित्यिक आणि सामाजिक बांधिलकी’सारखं वैचारिक लेखन, ‘लोकसाहित्याची रूपरेषा’, ‘कदंब’, ‘अस्वल’, असं अगदी वेगळं लेखन आहे. चरित्रे, अनुवाद, कथासंग्रह आहेत. लोककथांची संकलनं, संपादनं आहेत. ‘बाणाची कादंबरी’, ‘जातककथा’सारखे अनुवाद प्रकल्प आहेत. अनेक शोधनिबंध आणि बालसाहित्यही आहे; पण मराठी साहित्याला त्यांचं अमूल्य देणं आहे ते ललितगद्याचं! संपन्न सौंदर्यदृष्टी, निर्भय चिकित्सा, चौरस व्यासंग आणि संवेदनात्मक जीवनोत्सुकता या त्यांच्या वृत्तिविशेषांमुळे ललितगद्यासारखा आत्मनिष्ठ लेखनप्रकार त्यांनी एका उंचीवर नेऊन ठेवला. अत्यंत रसरशीत, नानाविध संदर्भानी फुलून आलेली आणि चिंतनशील असूनही भावोत्कटतेचा आविष्कार घडवणारी ‘ऋतुचक्र’, ‘भावमुद्रा’, ‘व्यासपर्व’, ‘रूपरंग’, ‘पस’, ‘डूब’, ‘प्रासंगिका’, ‘लहानी’, ‘दुपानी’, ‘गोधडी’, ‘खमंग’ ही त्यांची ललितगद्याची पुस्तके म्हणजे रसिक, पंडिता, मनस्विनी, तेजस्विनी या विशेषणांना सार्थ ठरवणाऱ्या या ज्ञानमार्गी व्यक्तिमत्त्वाचे चतन्यशील आविष्कार आहेत!

शांताबाई शेळके : गदिमांनंतरची समर्थ गीतकार म्हणून जनमानसात स्थान मिळवलेल्या शांताबाई शेळके १९९६ मध्ये आळंदी इथं भरलेल्या ६९ व्या साहित्य संमेलनाच्या तिसऱ्या स्त्री अध्यक्ष.

१९४७ मध्ये ‘वर्षां’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. त्यानंतर मग ‘रूपसी’, ‘गोंदण’, ‘जन्मजान्हवी’ इत्यादी संग्रह येत गेले आणि त्यातून शांताबाईंची त्यांच्या गीतांपेक्षा वेगळी आणि प्रगल्भ, अंतर्मुख वृत्तीची भावकविता अखेपर्यंत रसिकांसमोर येत गेली. ‘मुक्ता’, ‘गुलमोहर’ वगरे सहा कथासंग्रह, ‘विझती ज्योत’, ‘धर्म’, ‘ओढ’  अशा पाच कादंबऱ्या, ‘धूळपाटी’ हे आत्मचरित्रात्मक लेखन, ‘पावसाआधीचा पाऊस’सारखे ललितगद्याचे संग्रह, ‘टिकली’, ‘झोपेचा गाव’ अशी बालसाहित्याची पुस्तकं आणि ‘चौघीजणी’सारखे अनुवाद अशी जवळजवळ शंभर पुस्तकं त्यांच्या नावावर आहेत. रसिकता, बहुश्रुतता, कमालीचं पाठांतर आणि स्वागतशीलता या गुणांमुळे शांताबाई व्यक्ती म्हणूनही अनेकांशी मत्रभाव आणि स्नेह जपून होत्या. चित्रपटातील प्रसंगाच्या गरजेनुसार, मागणीनुसार, चालीबरहुकूम गीतं रचण्याचं वादातीत कौशल्य त्यांनी कमावलं आणि त्याचा पुरेपूर आनंदही घेतला. गीतलेखन हे ‘सुंदर आव्हान’ म्हणून त्यांनी पाहिलं. कारण गीत हे त्यांच्या लेखी कवितेचंच रूप होतं.

माझ्या असण्याची मला शब्द देती ग्वाही

शब्दांहून वेगळी मी नाही, नाही, नाही

असं त्यांनी म्हटलंय ते त्यांच्याबाबत निखालस खरं होतं.

विजया राजाध्यक्ष : गेली ५०-५५ र्वष कथालेखक आणि समीक्षक म्हणून सातत्यानं साहित्य क्षेत्रात वावरणाऱ्या विजया राजाध्यक्ष यांनी २००० मध्ये इंदूर येथे झालेल्या ७४ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले. ‘अधांतर’, ‘विदेही’, ‘कमान’, ‘अन्वयार्थ’ इत्यादी वीस कथासंग्रह, ‘कदम्ब’, ‘स्वच्छंद’, ‘अनुबंध’ इत्यादी ललितगद्यात्मक लेखन आणि ‘कवितारती’, ‘संवाद’, ‘मर्ढेकरांची कविता : स्वरूप आणि संदर्भ’, ‘बहुपेडी विंदा खंड १ व २’ वगरे समीक्षाग्रंथ ही विजयाबाईंची लेखनसंपदा. याशिवाय संपादित ग्रंथही आहेतच.

स्त्रीचं शरीर आणि मन, स्त्रीची सर्जनशीलता यांचा वेध त्यांनी कथांमधून सातत्यानं घेतला. स्त्रीशरीर विशिष्ट अनुभवांना कलात्मक कथारूप देणारी पहिली लेखिका म्हणून त्यांचं मराठी साहित्याला मोलाचं योगदान आहे. निर्मिती – मग ती स्त्रीची असो वा कलावंताची – तिचा शोध हा विजयाबाईंचा निदिध्यास आहे. विशिष्ट कालखंडातील प्रश्नांपेक्षा त्यांच्या चिंतनशीलतेला महत्त्वाचे वाटले ते जन्म-मृत्यू यांविषयीचे, जीवनाच्या प्रयोजनाविषयीचे प्रश्न! संवादाची गरज त्यांना मूल्यजाणीव म्हणून महत्त्वाची वाटते.

साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ‘मर्ढेकरांची कविता : स्वरूप आणि संदर्भ’ हा ग्रंथ काय किंवा ‘बहुपेडी विंदा’ हा द्विखंडात्मक प्रकल्प काय, ‘कथाशताब्दी’ किंवा ‘संवाद’ ही पुस्तके काय त्यांमधून विजयाबाईंच्या आस्वादक आणि विश्लेषक दृष्टीचा संगम दिसून येतो.

अरुणा ढेरे : साहित्य संमेलनाच्या महिला अध्यक्षांच्या परंपरेत सर्वार्थानं घेता येणारं नाव म्हणजे ९२ व्या संमेलनाच्या अध्यक्ष अरुणा ढेरे! सर्जनशील लेखिका, कवयित्री, संशोधक, संपादक म्हणून, उत्तम वक्त्या म्हणून मराठी मनात त्या जिव्हाळ्याचे आणि आदराचे स्थान मिळवून आहेत.

‘प्रारंभ’, ‘यक्षरात्र’, ‘मंत्राक्षर’, ‘जावे जन्माकडे’ इ. कवितासंग्रह, ‘उंच वाढलेल्या गवताखाली’, ‘पावसानंतरचं ऊन’ यांसारखे कथासंग्रह, ‘महाद्वार’, ‘मत्रेयी’, ‘उर्वशी’ या कादंबरिका, ‘विस्मृतिचित्रे’, ‘डॉ. विश्राम रामजी घोले’, ‘प्रकाशाचे गाणे’ इत्यादी संशोधनपर पुस्तके, ‘रुपोत्सव’, ‘मनातलं आभाळ’, ‘लावण्ययात्रा’ इ. ललितगद्य संग्रह, ‘कृष्णकिनारा’, ‘काळोख आणि पाणी’ यांसारखे महाभारत-रामायणांतील कथांचे पुनर्वाचन आणि पुनर्रचना अशी त्यांची विविधांगी निर्मिती आहे.

‘शाश्वती’ या स्त्री अभ्यास केंद्राच्या माध्यमातून त्यांनी ‘दुर्गा भागवत : व्यक्ती, विचार आणि कार्य’, ‘स्त्रीलिखित मराठी कादंबरी’, ‘स्त्रीलिखित मराठी कथा’ आणि ‘स्त्रीलिखित मराठी कविता’ या संपादित ग्रंथप्रकल्पांचे काम यशस्वीपणे पुरे केले. जवळपास ५० पुस्तकांच्या निर्मितीबरोबरच ‘राजतरंगिणी’ या बृहद् ग्रंथाचा सहकार्याने अनुवादही त्यांनी केला आहे.अभिजात आणि लोक – अशा दोन्ही परंपरांचा सखोल अभ्यास व समन्वयशील दृष्टिकोन यामुळे त्यांच्या लेखनातून अनाग्रही चिकित्सेचा प्रत्यय येतो.

अशा या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान लाभलेल्या पंचकन्या! या पाचही जणींनी निवडलेल्या क्षेत्रात मन:पूर्वक कार्यरत राहून मराठी साहित्यात लक्षणीय भर घातली आहे.

vandanabk63@gmail.com

chaturang@expressindia.com

Story img Loader