प्रा. मिलिंद जोशी

लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक, संग्राहक, संपादक आणि संशोधक  डॉ. सरोजिनी बाबर यांच्या जन्मशताब्दी वर्षांला नुकताच, ७ जानेवारीपासून प्रारंभ झाला. ‘समाजशिक्षणमाला’ यासाठी संपादित केलेली ५५० पुस्तके, स्वत:ची ८७ पुस्तके, ७ कादंबऱ्या, ११ कथासंग्रह, २६ ललित लेखसंग्रह, ४ बालवाङ्मय व नाटिकांची पुस्तके, २ काव्यसंग्रह, अशी मोठी ग्रंथसंपदा लेखक-संपादक म्हणून सरोजिनी आक्कांच्या नावावर आहे.

BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Local fishermen save life of couple stuck in rough sea in ratnagiri
दाम्पत्याला भाट्ये समुद्रात खेळणे पडले महागात; स्थानिक मच्छीमारांनी वाचविले प्राण
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
restoration work of Tuljabhavani temple is underway under supervision of Archaeological Department
तुळजाभवानी मंदिराला मिळणार पुरातन झळाळी, जीर्णोध्दाराचे काम पुरातत्व खात्याच्या निगराणीखाली वेगात सुरू
Moshi International Exhibition Center, garbage dump,
पुणे : मोशीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र कचऱ्याच्या विळख्यात
loksatta readers response loksatta news
लोकमानस : सत्यकथनासाठी निवृत्तीचा मुहूर्त
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray : महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागाबाबत आदित्य ठाकरेंची मोठी मागणी; म्हणाले, “सर्व विवादित भाग…”

मराठी अस्मितेची ओळख करून देणारी ‘रानजाई’ ही ‘दूरदर्शन’वरील मालिका आक्का आणि शांता शेळके यांच्या सहभागामुळे लोकप्रिय झाली. सरोजिनी आक्कांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने त्यांच्या लोकसाहित्याची ओळख..

लोकसाहित्यातून लोकमानस, लोकपरंपरा, लोकश्रद्धा आणि लोकजीवन यांचे दर्शन घडते. लोकसंस्कृतीच्या अभ्यासासाठी ते गरजेचे असते. लोकसंस्कृतीच्या विविधांगांचे दर्शन घडविण्याचे आणि लोकपरंपरांचा परिचय करून देण्याचे मोलाचे काम डॉ. सरोजिनी बाबर यांनी आयुष्यभर केले. त्यांनी मराठी ग्रामसंस्कृतीचा पस धांडोळून लोकसांस्कृतिक धन गोळा केले. ते अनेक संपादित पुस्तकांमधून समाजाला वाटून टाकले. या अनमोल धनाचा उपयोग अनेक संशोधकांनी केला. त्यांचा सामाजिक-सांस्कृतिक अन्वयार्थ लावणाऱ्या मर्मग्राही अभ्यासकांची एक पिढी पुढे आली, त्यामुळे महाराष्ट्र संस्कृतीच्या अभ्यासाला नव्या दिशा मिळाल्या.

डॉ. सरोजिनी बाबर अर्थात आक्कांचा जन्म सांगली जिल्हय़ातील वाळवे तालुक्यातील बागणी या गावी झाला. त्यांचे वडील कृष्णराव भाऊराव बाबर हे अतिशय तळमळीचे प्राथमिक शिक्षक होते. लहानपणी पोलिओच्या तडाख्यात सापडल्यामुळे आक्कांचा डावा पाय अधू झाला होता. असे असतानाही आक्कांनी निरनिराळ्या खेळात भाग घेतला. फेर धरला. झिम्मा खेळला. फुगडीही घातली. महाविद्यालयात असताना त्या बॅडिमटनही खेळल्या. वडिलांची नोकरी बदलीची असल्यामुळे सातारा, काले, चितळी, म्हसवड, पेठ, इस्लामपूर, अहमदनगर अशा अनेक नगरांत त्यांचे वास्तव्य घडले. मायेचा वर्षांव करणारी माणसे, आजूबाजूचा बहरलेला निसर्ग, जीव लावणाऱ्या जनावरांनी गच्च भरलेले गोठे, दूधदुभत्यांची रेलचेल, शेणाने सारवलेल्या गुळगुळीत जमिनी, सडा-रांगोळीने सजलेले अंगण आणि तिथं येणारे लोककलावंत अशा वातावरणात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे भरणपोषण झाले. १९४० मध्ये शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयात आक्कांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले. तिथे प्रा.श्री. म. माटे, के. ना. वाटवे आणि सोनोपंत दांडेकर या जाणत्या शिक्षकांनी आक्कांना मार्गदर्शन केले आणि त्यांच्या गुणांना उत्तेजन दिले. आक्का बी.ए.ला पहिल्या आल्या. साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांच्या हस्ते त्यांना ‘यशोदा चिंतामणी’ पारितोषिकही मिळाले.

आक्कांनी शिवाजी मराठा सोसायटीच्या जिजामाता हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून नोकरी केली. ती सोडून एम. ए. पूर्ण केले. डॉ. के. ना. वाटवे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मराठी साहित्यातील लेखिकांचे योगदान’ या विषयावर संशोधन करून पीएच.डी. संपादन केली. आक्कांचे वडील मराठीसह हिंदी, इंग्रजी, गुजराती आणि बंगाली या भाषांचे जाणकार होते. त्यांच्या वैयक्तिक संग्रहात हजारो मौलिक ग्रंथ होते. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार, रियासतकार सरदेसाई, डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे, वा. भा. पाठक,

प्र. के. अत्रे, कवी गिरीश, कवी यशवंत, वि. द. घाटे, आनंदीबाई शिर्के, अनंत काणेकर, के. नारायण काळे, सेतू माधवराव पगडी, द. रा. बेंद्रे, सरदार आबासाहेब मुजुमदार, ग. ल. ठोकळ अशा दिग्गज माणसांचे घरी येणे-जाणे होते. या निमित्ताने घडणाऱ्या वाङ्मयीन चर्चातून आक्कांचा वैचारिक पिंड पोसला गेला.

लोकसंस्कृतीविषयीच्या आत्मीयतेचा वारसा आक्कांना ‘माती, नाती आणि संस्कृती’ यांना प्राधान्य देणाऱ्या ग्रामजीवनातून मिळाला. स्वातंत्र्यपूर्व काळातल्या खेडय़ातल्या माणसांचे आयुष्य ऋतुचक्राच्या लयीत कसे फिरत होते, हे आक्कांनी जवळून पाहिले. सण आणि उत्सवांमधला लोकांचा उत्साह पाहिला. गावजत्रांची मौज अनुभवताना समाजमनाची स्पंदने टिपली. गावगाडय़ातल्या खेळांची मस्ती पाहिली. कुलदेवतेपासून ग्रामदेवतेपर्यंत अनेक देवतांची मनोभावे पूजा बांधणारी भोळी माणसे त्यांच्या सभोवती होती. त्या माणसांच्या श्रद्धा-समजुती, प्रथा-परंपरा आक्कांनी समजून घेतल्या. सासुरवास सहन करून कुटुंबातल्या सर्वाचा प्रेमाने सांभाळ करणाऱ्या कणखर आणि सोशिक बायका त्यांच्या आसपास वावरत होत्या. त्यांची सुखदु:खं उखाण्यातून, गाण्यातून, जात्यावरच्या ओव्यातून व्यक्त होत होती.

उगवला नारायण पसरलं पिवळं ऊन

बाई हसलं हिरवं रान

उगवला नारायण त्या आधी उगव माझ्या दारी

माझ्या त्या बाळासंगं दुधातुपाची कर न्यारी

पोथी पुस्तक वाचताना बाई कानीचा डूल हाले

माझा तो बाळराज सये कागदासंग बोले

असं म्हणत घरातल्या बाळराजाचं कौतुक होत होतं.

बाप्पाजी माझा वड बया मालन पिंपरण

दोघांच्या सावलीत झोप घेते मी संपूरण

सासरएवढा वस नको करुस सासूबाई

दारीच्या चाफ्यापायी दूर देशाची आली जाई.

असं म्हणत वेदनाही सांगितली जात होती.

हे सारं त्या आयाबायांकडून ऐकताना आक्कांच्या प्रतिभेची सतार हळुवार मुखरित झाली. यातूनच आक्कांच्या पुढच्या जीवनकार्याची पायाभरणी झाली. आक्कांनी लोकजीवनात जाऊन लोकधन वेचण्याचा ध्यासच घेतला. हजारो मलांचा प्रवास करून, खेडोपाडी जाऊन, जनसामान्यांमध्ये मिसळून आक्कांनी ओव्या, खेळगाणी, फेरांची गाणी, कहाण्या, उखाणे यांसारखे समाजभर विखुरलेले अज्ञात लोकवाङ्मय मिळविले. ते संग्रहित केले.

अनेकांनी आक्कांसाठी प्रेमाने गोळा केलेला लोकसाहित्याचा रानमेवा आक्कांनी आनंदाने स्वीकारला आणि संपादित स्वरूपात तो समाजालाच अर्पण केला. ‘एक होता राजा’ किंवा ‘जनलोकांचा सामवेद’ यांसारख्या पुस्तकातून विविध प्रकारच्या लोकसाहित्याचा, ‘सांगीवांगी’सारख्या पुस्तकातून लोककथांचा, ‘दसरा-दिवाळी’सारख्या पुस्तकातून सण उत्सवांचा, ‘राजविलासी केवडा’ मधून स्त्री-पुरुष नात्यांचा तर ‘तीर्थाचे सागर’मधून वडीलधाऱ्या नातेसंबंधांचा लोकसंस्कृतीतला ठेवा आक्कांनी मराठी साहित्य शारदेच्या दरबारात जमा करून लोकसाहित्य – लोकसंस्कृतीचे दालन समृद्ध केले.

आक्कांच्या वडिलांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर त्यांच्या विद्यार्थ्यांनी इस्लामपूर येथे त्यांचा ‘महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार’ यांच्या हस्ते सत्कार केला आणि त्यांना एक थली अर्पण केली त्यामध्ये स्वत:ची भर घालून त्यांच्या वडिलांनी प्रकाशन सुरू केले. समाजाला वाचनाभिमुख करण्यासाठी ‘समाज शिक्षण माला’ सुरू केली. त्याचे संपादकत्व स्वीकारून आक्कांनी लहान-मोठी शेकडो पुस्तके लिहिली आणि मान्यवर लेखकांकडून लिहूनही घेतली. समाजाचे नतिक सांस्कृतिक शिक्षण हाच या मालेचा हेतू होता. या कामात वडिलांचे मार्गदर्शन आक्कांना लाभले. आक्कांच्या धाकटय़ा भगिनी कुमुदिनी पवार आणि शरदिनी मोहिते यांचे उत्तम सहकार्य आक्कांना लाभले.

इतिहास, भूगोल, आरोग्य, विज्ञान, शिक्षण, समाजकारण, अर्थकारण, साहित्य, शेती, कायदा, अध्यात्म, क्रीडा, कला, नाटय़ असे वेगवेगळे विषय या समाजशिक्षण मालेने हाताळले आणि समाजमानस जाणते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यातून ५५० पुस्तकांची निर्मिती झाली. ग. ल. ठोकळ, सुमती क्षेत्रमाडे, कुमुदिनी रांगणेकर, नरुभाऊ लिमये, गंगूताई पटवर्धन, गोपीनाथ तळवलकर, डॉ. रा. ना. दांडेकर, रमेश मंत्री, शंकर पाटील, गोविंदस्वामी आफळे, बा. भ. बोरकर, दुर्गा भागवत, शंकरराव खरात, ना. सी. फडके, मालतीबाई दांडेकर, शांता शेळके,

गो. नी. दांडेकर, जयंत नारळीकर यांच्यासारख्या अनेक मान्यवरांनी समाजशिक्षण मालेसाठी लेखन केले.

लोकसाहित्य व लोकसंस्कृतीचा अभ्यास, समाजशिक्षण मालेचे काम आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना १९५२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील आणि भाऊसाहेब हिरे यांच्या आग्रहामुळे आक्का बत्तीस शिराळा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार म्हणून विधानसभेच्या निवडणुकीला उभ्या राहिल्या आणि अटीतटीच्या लढतीत विजयी झाल्या. १९५२ ते ५७ त्या महाराष्ट्र विधान सभेच्या सदस्य होत्या. १९६३ ते ६६ त्या विधान परिषदेच्या सदस्य होत्या. १९६८ ते ७४ त्या राज्यसभा सदस्य होत्या. नागपूरच्या अधिवेशनाला गेल्यानंतर पवनारला जाऊन आक्कांनी विनोबा भावेंची भेट घेतली, तेव्हा विनोबांनी दिलेला ‘राजकारणातून बाजूला होऊन लेखन आणि संशोधनाच्या कार्याला वाहून घ्या.’ हा सल्ला आक्कांनी मानला आणि पुढचे आयुष्य वाङ्मय सेवेसाठी वाहून घेतले. महाराष्ट्र शासनाच्या लोकसाहित्य समितीची धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळली. बहुजन समाजाने शतकानुशतके सांभाळलेले लोकसंचित उजेडात आणण्याचे महत्त्वाचे कार्य आक्कांनी या काळात हाती घेतले आणि पूर्णत्वास नेले.

महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या आणि विश्वकोश मंडळाच्याही त्या सदस्य होत्या. राजकारण आणि समाजकारणाच्या या धावपळीत आक्काचे स्वत:च्या लेखनाकडे थोडेही दुर्लक्ष झाले नाही. समाजशिक्षण मालेसाठी संपादित केलेली ५५० पुस्तके, मालेसाठी स्वत: लिहिलेली ८७ पुस्तके, ७ कादंबऱ्या, ११ कथासंग्रह, २६ ललित लेखसंग्रह, ४ बालवाङ्मय व नाटिकांची पुस्तके, २ काव्यसंग्रह, लोकसाहित्य समितीसाठी संपादित केलेली ३० पुस्तके अशी मोठी ग्रंथसंपदा लेखक-संपादक म्हणून आक्कांच्या नावावर आहे. यावरून आक्कांच्या अफाट सर्जनक्षमतेची साक्ष पटते. ‘माझ्या खुणा माझ्या मला’ हे आक्कांचे आत्मचरित्र काळाचा मोठा पट उलगडणारे आहे. महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था असा लौकिक असणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्षपदही आक्कांनी भूषविले. मराठी अस्मितेची ओळख करून देणारी ‘रानजाई’ ही ‘दूरदर्शन’वरील मालिका आक्का आणि शांता शेळके यांच्या सहभागामुळे लोकप्रिय झाली. आक्कांच्या वाटय़ाला अनेक पुरस्कार आणि मानसन्मान आले. आपल्या प्रातिभसुगंधाने आयुष्यभर मराठी मुलुखात गंधाळलेली ही ‘रानजाई’ २० एप्रिल २००८ रोजी देवांच्या बागेत शांतपणे विसावली.

लोकसाहित्याच्या संकलन आणि जतनासाठी आयुष्य वेचलेल्या आणि महाराष्ट्र शासनाच्या लोकसाहित्य समितीचे अध्यक्षपद भूषविताना मोलाचे काम केलेल्या आक्कांची जन्मशताब्दी सुरू होत असताना महाराष्ट्र शासनाची लोकसाहित्य समितीच अस्तित्वात नसणे यासारखे दुर्दैव ते कोणते? शासनाची आणि समाजाची लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीविषयीची अनास्था नाहीशी झाली आणि त्यांच्या जतन आणि संवर्धनासाठी प्रामाणिक प्रयत्न झाले तर ते आक्कांचे कृतज्ञ भावनेने केलेले खरे स्मरण ठरेल.

पवित्रच करत आहात तर..

‘ती’ येऊन गेली

मंदिरात म्हणून

ज्या हातांनी करताहात

मंदिर स्वच्छ, पवित्र..

त्या हातांच्या त्वचेच्या काही थर खाली

वाहत आहे रक्त

– काही शुद्ध, काही अशुद्ध.

थोडे तिचे, थोडे त्याचे.

आधी तुमच्या शरीरातले

तिचे रक्तकण तेवढे बाजूला काढा

अपवित्र, लाजिरवाणे..

वाहू देत फक्त नि फक्त

जन्मदात्याचेच रक्त.

अन तिच्या मायेच्या स्पर्शातून

उमललेली

तुमच्या मनातली स्वप्न.

उखडून टाका पुरती.

मंदिराच्या स्तंभावरची

उकरून काढा धूळ.

कुणास ठाऊक!

त्यांनी बांधले असतील स्तंभ त्याच हातांनी

ज्या हातांनी खाल्लं होतं अन्न

‘तिनं’ शिजवलेलं.

‘तिनं’ बांधलेलं.

करायचं आहेच

तर सगळं कसं

लख्ख पवित्र करून टाका.

तिनं जिथे जिथे ठेवलं पाऊल

मूर्तीपर्यंत पोहोचण्यासाठी

त्या मातीच्या कणाकणाला

स्वच्छ करा.

तिनं जिथे जिथे घेतला श्वास

त्या हवेतल्या प्रत्येक

पोकळीला धूप दाखवा..

झालं?

केलंत सारं पवित्र?

आता

एकच राहील-

काढून टाका तुमच्या शरीरातला

तिच्या दुधातून गेलेला

एकन् एक अणू.

त्या अणूंची ताकद

नाही पेलायची आता-

तुमच्या पोकळ पवित्र शरीराला.

– मुक्ता गुंडी

Joshi.milind23@gmail.com

chaturang@expressindia.com

Story img Loader