मृणालिनी ओक

जगाच्या तुलनेत आपल्या देशात सर्वाधिक लोकसंख्या असूनही एकाकी माणसांचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्या एकाकीपणातून येणारं नैराश्य आणि त्यातून टोकाचा मार्ग स्वीकारणं टाळायचं असेल तर ठोस पावलं उचलावीच लागतील. स्वत: एकटे असाल तर योग्य मार्ग शोधा आणि जर तुमच्या आजूबाजूला कुणी एकटं असेल तर त्यांना सोबत करा. येत्या नवीन वर्षात तुम्हीही बनू शकता कुणाचे तरी आधारस्तंभ!

concluding article summarizes the writing process about Children and Family
सांदीत सापडलेले…!: समारोप
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
lifestyle has changed due to modernity and chauvinism
मनातलं कागदावर: बहुपर्यायाचा प्रश्न
Anita Ghai death. Feminist Thought. Feminism,
विकलांगतेचा स्त्रीवादी विचार
My friend friendship that spans life
माझी मैत्रीण: आयुष्य व्यापणारी मैत्री
jinkave ani jagavehi
जिंकावे नि जागावेही : सजग जीवनाचं बीजारोपण
Loksatta chaturang Fear Reaction Courage Experience
‘भय’भूती: भीती ही प्रतिक्रिया…धाडस हा निर्णय…
Former Prime Minister of India Manmohan Singh
अग्रलेख: मार्दवी मार्तंड!

सीने में जलन, आँखों में तूफां सा क्यूं है

इस शहर में हर शख्स परेशान सा क्यूं है।

सत्तरच्या दशकात, स्थलांतरित मजूर आणि निकटवर्तीयांपासून दूर असलेलं त्यांचं विस्कळीत जीवन, या विषयावर एक चित्रपट प्रदर्शित झाला होता, ‘गमन’. त्यातली शहरयार यांनी लिहिलेली ही गझल आजही आपल्या समाजातील कित्येकांना लागू होते. त्यातले ‘परेशान’ होणं वेगवेगळ्या संदर्भातील असलं तरी सध्या आपल्या समाजात एकाकीपणानं आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अनेक प्रश्नांनी ‘परेशान’ होणं वाढलेलं आहे अर्थात या माणसाच्या एकाकीपणाला सामोरं जाण्यासाठी पर्यायही उपलब्ध आहेत, मात्र त्याचा उपयोग करायला हवा. याचसाठी येत्या नवीन वर्षाकडे वाटचाल करत असताना ‘छोडो कल की बातें, कल की बात पुरानी’ असं म्हणणंच अधिक योग्य राहील असं वाटतं. मागील पानावरून पुढे जाताना काही गोष्टी समजून, तटस्थपणे त्यांचा स्वीकार करून, ‘क्लोझर’ मिळवण्याचा प्रयत्न करायला हवा.

हेही वाचा >>> समजून घ्यायला हवं

आज जगभरात भारत सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. इतका प्रचंड जनसमुदाय असूनही आपल्या देशाला एकाकीपणाच्या सावटाने घेरले आहे, ते कसे काय? या विरोधाभासाची सुरुवात कधी आणि कशी सुरू झाली, हे तपासून बघणं गरजेचं आहे. त्यापूर्वी एकटेपणाची लक्षणं जाणून घेणं गरजेचं आहे, तरच आपण आपल्या भोवतालच्या व्यक्ती आणि आपल्या प्रियजनांच्या तत्सम मन:स्थितीबद्दल जागरूक राहून कदाचित त्यांना मदत करू शकू. एकटेपण अनुभवणाऱ्या व्यक्तींना बहुतेक वेळा नैराश्य आणि असहाय असल्याच्या भावनेला एकट्यानं सामोरं जावं लागतं. आणि कधी कधी हे नैराश्य त्या व्यक्तीस आयुष्य संपवण्यासारखा टोकाचा निर्णय घेण्यास कारणीभूत ठरतं. एकाकीपणा हा एक वैश्विक मुद्दा आहे हे ओळखून ‘जागतिक आरोग्य संघटनेे’नं एका जागतिक आयोगाची (ग्लोबल कमिशन) स्थापना केली, ज्याचे ध्येय सार्वजनिक आरोग्याचे मुख्य घटक माणसांतील ‘एकटेपणा’ आणि ‘एकाकीपणा’ यांना प्राधान्य देणं असं आहे. अमेरिकेतील सर्जन-जनरल डॉ. विवेक मूर्ती आणि झिम्बाब्वेचे युवा आयुक्त चिडो पेम्बा हे सामाजिक संबंध (सोशल कनेक्शन) या आयोगाचे सहअध्यक्ष आहेत. यू. के. मधील ‘कॉन्झर्वेटिव’ सरकारने ‘ministry of loneliness’, म्हणजेच ‘एकाकीपण मंत्रिमंडळा’च्या स्थापनेची घोषणा केली होती. या घोषणेची अनेक स्तरांवरून टिंगल करण्यात आली होती, परंतु काही सामाजिक हितचिंतकांनी यामधील गांभीर्य ओळखून एकटेपण हे एक मोठं संकट असून त्याचं निदान करणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. डॉ. विवेक मूर्ती यांनी माणसाच्या एकटेपणाच्या स्थितीची तुलना एका दिवसाला १५ सिगारेट ओढल्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांशी केली आहे. त्यांच्या अहवालानुसार एकटेपणातील टोकाच्या मानसिक स्थितीमुळे माणसाच्या अकाली निधनाची शक्यता ३० टक्क्यांनी वाढली आहे. ते असंही म्हणतात की, तहान आणि भुकेसारख्या नैसार्गिक गरजांच्या अभावामुुळे शरीराची जी अवस्था होते, एकटेपणाची स्थितीसुद्धा माणसाच्या शरीरात तत्सम उणिवा निर्माण करण्यास कारणीभूत ठरू शकते. म्हणजे एकटेपणामुळे निर्माण होणारी पोकळी ही केवळ एक भावनिक गरज़ नसून, शरीरावर परिणाम करणारीही झाली आहे, आणि हे अनेकदा सांगितलं गेलं आहे.

डॉ. विवेक मूर्ती यांनी या एकटेपणावर मात करण्याचा सल्ला दिला आहे. त्याचा मार्ग नातेसंबंधांतून जातो. कोणताही माणूस कधीही, एकटेपण वा सामाजिक विलगीकरण अनुभवू शकतो, त्याला वयाची, देशाची, जातीची आणि धर्माची बंधनं नसतात. म्हणूनच या प्रश्नाला सार्वजनिक आरोग्याच्या प्राधान्यक्रमात पहिलं स्थान दिलं पाहिजे.

माणसाच्या आयुष्यात एकटेपणा अनुभवण्याचे विविध प्रसंग येतात. ते असे -जीवनातील बदल –

नवीन शहरात स्थलांतर, कॉलेजची सुरुवात, किंवा निवृत्ती – पहिली ते बारावी एकाच शहरातून केल्यानंतर, नवीन जागी शिकायला गेलेल्या रत्नाला तिच्या जिवलग मैत्रिणींपासून झालेली ताटातूट फारच त्रासदायक ठरली, इतकी की आता तिला नवीन मैत्रिणी नाहीतच. आणि या सगळ्याचा तिच्या अभ्यासावर परिणाम होऊ लागला आणि ती आपल्या कोशात राहू लागली.

जोशीकाका ४२ वर्षांच्या नोकरीनंतर निवृत्त झाले, त्यांची नोकरी एका आडनिड्या गावात असल्यामुळे कुटुंब पुण्यातच राहिलं होतं. निवृत्तीनंतर घरी राहायला परत आल्यावर हळूहळू त्यांच्या लक्षात आलं की, त्यांची घरी अडचण होतेय. घरात अनेक माणसे असून त्यांच्याशी बोलायला कुणाला वेळ नाही. त्यांना निराश वाटू लागलं, आपली गरज कुणालाच वाटत नाही, ही अस्वस्थ करणारी जाणीव त्यांना अधिकाधिक निराशेकडे नेत गेली.

समाजमाध्यमांमुळे वाढलेला एकटेपणा

राहुल हा २२ वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थी, समाजमाध्यमांवर तासन् तास घालवत असे. तो सगळ्या माध्यमांवर सक्रिय होता. इतरांच्या आकर्षक पोस्ट्स आणि ग्लॅमरस जीवनशैली पाहून त्याला त्या गोष्टींशी स्वत:ची तुलना करण्याची सवय लागली. त्याच्या पोस्ट्सना मिळणारा प्रतिसाद कमी कमी होत गेला तसा त्याचा आत्मविश्वास घटत गेला. तो मित्रपरिवार आणि कुटुंबीयांपासून दूर राहू लागला. एकलकोंडे आयुष्य जगताना स्वत:च्या कोशात राहण्याची त्याला सवय झाली, आणि हळूहळू नैराश्य आणि नकारात्मकतेच्या भोवऱ्यात अडकत गेला.

वयोवृद्धांचा एकटेपणा

७२ वर्षांच्या मालतीबाई, पतीच्या निधनानंतर एकाकी पडल्या. मुलं परदेशात असल्याने बोलणार कुणाशी हा प्रश्न त्यांना पडला. टीव्ही पाहणं आणि एकटेपणानं दिवस घालवणं हाच त्यांच्या दिनक्रमाचा भाग बनला होता. एकदा वर्तमानपत्रं टाकणारा मुलगा म्हणाला, ‘‘आजी तुम्ही माझे बिलाचे पैसे ऑनलाइन पाठवा.’’ त्या म्हणाल्या, ‘‘अरे, तुझ्या येण्याने मला दोन शब्द बोलायला मिळतात आणि ते मला थांबवायचं नाहीये.’’ परंतु या एकटेपणाला कंटाळून शेवटी एके दिवशी मालतीबाईंनी आपलं आयुष्य संपवलं.

संकटकाळ

रमेश, ५० वर्षीय व्यावसायिक, धंद्यामध्ये प्रचंड मोठा फटका बसल्यानंतर तो चिंतातुर राहू लागला. सणासुदीला किंवा लग्नकार्यामध्ये नातेवाईकांना आणि एरवीही मित्रांना टाळू लागला. सामाजिक कार्यक्रमांपासून दूर राहू लागला. शिवाय घरच्यांना आपलं धंद्यातील अपयश सांगायला त्याला जमलं नाही, कुणाची मदत घेणं कमीपणाचं वाटू लागलं, मुख्य म्हणजे लोक काय म्हणतील हा विचार मनात घर करून बसला आणि मग तो नैराश्याच्या पोकळीत अडकत गेला आणि स्वनिर्मित एकलकोंडे आयुष्य जगू लागला.

कामाचा ताण

सीमा, ३५ वर्षीय आयटी व्यावसायिक, करोनानंतरसुद्धा ‘वर्क फ्रॉम होम’ करत होती. सतत ऑनलाइन मीटिंग्ज आणि कामाचा ताण यामुळे ती मानसिकदृष्ट्या थकली होती. सहकाऱ्यांशी बोलणं व्हायचं तेही अप्रत्यक्ष, फोनवरून किंवा ऑनलाइन. प्रत्यक्ष माणूस भेटणं बंद झालं होतं. तिच्या ‘सोशल’ आयुष्यावरही परिणाम होऊ लागला. त्यातच जीवनशैली बदलल्याने वजन वाढलं आणि आपण आता बेढब दिसतो, असा न्यूनगंड तिच्यात निर्माण झाला आणि ती अधिकच नकारार्थी विचारांच्या कोशात जाऊ लागली. त्यातच मी एकटी पडलेय, असं तिला वाटू लागलं आणि या न्यूनगंडाचं रूपांतर नैराश्यामध्ये झालं.

नकारार्थी विचारांपासून जगण्याकडे

सुनीलच्या घरची परिस्थिती बेताची होती आणि त्याला एका लोकप्रिय नसलेल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा लागला. तेथे त्याला वेगवेगळ्या प्रवेश परीक्षेची तयारी करताना योग्य मार्गदर्शनाचा अभाव जाणवत होता आणि कुटुंबीयांकडून अपेक्षित आधार न मिळाल्यामुळे त्याला त्याच्या भवितव्याची चिंता सतावू लागली. आपण अपयशी आहोत ही भावना त्याला सतावू लागली आणि मनात आत्महत्यांचे विचार वारंवार येऊ लागले. सुदैवाने त्याला ‘अनकही’ या हेल्पलाइनची माहिती मिळाली आणि त्याने त्यावर संपर्क साधला. स्वयंसेवकानं त्याचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं. त्याला त्याच्या मनातलं सारं काही मोकळेपणानं बोलायची संधी दिली. असा अनुभव त्याला पहिल्यांदाच येत असल्यानं त्याला त्याच्या भावना नि:संकोचपणानं व्यक्त करता आल्या. हेल्पलाइनवरील स्वयंसेवकानं त्याला बोलतं करून हळूहळू त्याच्या भावनांचा गुंता सोडवायला मदत केली. कुठलाही सल्ला न देता, त्याला त्याच्याच भावना तपासून पाहायला प्रोत्साहित केलं. मनातील भावनांचा गुंता सोडविण्याच्या प्रक्रियेमुळे त्याला त्याच्या समोर यशाचे मार्ग आणि पर्याय दिसू लागले. त्याला एक सकारात्मक दृष्टिकोन मिळाला.

आपण काय करू शकतो?

तुम्हीही अशा लोकांना मदत करू शकता. तुमच्या घरी किंवा शेजारी किंवा नातेवाईक, मित्रमैत्रिणी किंवा सहकारी यांच्यापैकी कुणीही असं निराश आढळलं, आणि त्यांच्याही आयुष्यात वरील पैकी प्रसंग घडलेले असतील किंवा तेही जर एकाकीपणाने आयुष्य घालवत असतील, सुटकेचा मार्ग दिसत नसेल तर त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करा. मोकळेपणाने बोला. त्यांना बोलतं करा. ‘हेल्पलाइन’ची मदत घ्यायला सांगा

यासाठी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, सर्वात आधी ‘आत्महत्या’ या शब्दाबरोबर जोडलेला स्टिग्मा किंवा कलंक याला सामोरं जायला हवं. त्यासाठी आत्महत्या या विषयावर मोकळेपणानं बोलता येईल अशा पद्धतीने जवळच्या व्यक्तींशी संवाद साधा. आत्महत्येविषयी चर्चा करणं टाळलं जातं, कारण ती घटना अतिशय धक्कादायक आणि अस्वस्थ करणारी असते. या घटनांमध्ये भीतीची भावना असल्यामुळे या घटनांबाबत बोलण्यास लोकं टाळाटाळ करतात. पण टाळून प्रश्न सुटणार नाहीत.

आत्महत्या प्रतिबंध करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं धोक्याच्या लक्षणांबद्दल जागरूक राहाणं, नैराश्याची कारणं ओळखणं आणि योग्य वेळी ती दूर करण्यासाठी उपाययोजना करणं. अनेकदा असं दिसून येतं की, त्या व्यक्तीला केवळ एका अशा व्यक्तीची गरज असते जिला तिची काळजी आहे आणि जी तिच्याशी प्रेम आणि हक्काने वागते आहे. अशा व्यक्तीबरोबर तिला आपल्या भावभवनांची देवाणघेवाण करता येईल.

चला तर, येणाऱ्या नवीन वर्षात आपण संकल्प करू या. स्वत:ची मदत करू या आणि एकाकी व्यक्ती आपल्या जवळपास आढळल्यास त्यांना योग्य प्रकारे भावनिक आधार देऊन, संयम बाळगून त्यांचे आधारस्थान होण्याचा प्रयत्न करू या.

(लेखातील व्यक्तींची नावे बदलली आहेत) (लेखिका ‘अनकही’ हेल्पलाइनच्या स्वयंसेविका आहेत.)

Story img Loader