सोनाली नवांगुळ
‘एखाद्याचे अश्लील मेसेज तुमच्या मोबाइलवर यायला लागले, सतत त्याचे फोन यायला लागले, तर अशा वेळी काय करायचे? शरीरभर सरसरत जाणारा भयाचा तप्त प्रवाह ज्वालामुखी बनून तुमचं डोकं फुटायची वाट बघायची? खरं तर एका अशिष्ट मेसेजनं आपल्या तथाकथित निर्भयतेच्या अशा ठिकऱ्या उडताना बघणं दुर्दैवी असतं. ही हतबलता सगळ्याच चांगुलपणा नि सभ्यतेवरचा विश्वास नखलणारी. अगदी पोलिसांनी प्रत्यक्ष येऊन मदत केली तरी आपल्या बाबतीत काही विपरीत घडणार तर नाही ना, या सतत वाटणाऱ्या भीतीचं करायचं काय?’

मैत्रिणीच्या एका कार्यक्रमासाठी कोल्हापूरवरून पुण्याला जायचं होतं. नेहमीच्या एजन्सीकडून कार मीच बुक केली होती. का? तर माझी व्हीलचेअर बसू शकेल अशी डिकी असण्याची खात्री. प्रवासाची ठरलेली वेळ तासभर पुढे गेली. आलेला चालक नवा होता, त्यानं ‘सॉरी’ही म्हटलं नाही. जे चालक येणार होते त्यांना फोन केला तर म्हणाले, ‘‘मला आयत्या वेळी वेगळ्या गाडीवर यावं लागलं, पण मालकांनी दुसऱ्याची सोय केलीय.’’ मी गडबडले. म्हटलं, ‘‘नवा माणूस कशाला दादा? मी जाते ती ठिकाणं तुम्हाला ठाऊक असतात, तुम्ही आवश्यक ती मदत पटपट करता.’’

हेही वाचा : स्त्रियांचं नागरिक असणं!

माझा मूडच गेला म्हटल्यावर ते म्हणाले, ‘‘मी स्वत: त्याला समजावलंय, लागेल ती मदत सांगून करून घ्या. नवा मुलगा आहे, सांभाळून घ्या.’’ दुसरा इलाजच नव्हता. नवीन चालकाबरोबर निघाले. पुण्याला वेळेत पोहोचायचं नि दुसऱ्या दिवशी परतायचं हे नियोजन तर पार पाडायला हवं असा विचार करता करता रिंग रोडने हायवेला लागतच होतो, इतक्यात त्या नवीन चालकानं रस्ता दुभाजक संपल्यावरच्या चुकीच्या खडबडीत जागेवरून गाडी वेगात हायवेवर आणली. काहीतरी घासल्याचा कर्कश आवाज आला. मनात म्हटलं, ‘नुकताच प्रवास सुरू झालाय नि कोल्हापूरबाहेर पडायच्याआधीच गाडी घासली?’ चालक मुलगा स्वत:हून काही सांगेचना. मीच विचारलं, ‘‘इंधनाच्या टाकीला काही झालं असेल तर तपासा, पुण्यापर्यंत जायचं आहे. वेळेत गाडी बदलून घेऊ.’’ तर म्हणाला, ‘‘काही नाही, फक्त सांडगं निखळलंय, नंतर बसवून घेईन.’’

त्याचं बोलणं, त्यातली बेफिकिरी यानं भीती दाटून आली एकदम. छातीत जोरात धडधडायला लागलं, तरी वातावरण हलकं करण्याच्या दृष्टीने त्याचं नाव, वय, आवड विचारली. जेमतेम अठ्ठाविशीचा मुलगा होता. शेतीत राबणं आवडत नाही, म्हणून दोन महिन्यांपूर्वी कामाला लागला होता. ड्रायव्हिंगशिवाय दुसरं काहीच जमत नाही म्हणाला. मी शांत राहायचं ठरवलं. गाडीचा वेग अनपेक्षितपणे वाढवणं-कमी करणं चालू राहिलं. तोंडात ‘पुडी’ असण्याचा दर्प येत होता. पुण्यात कार्यक्रमाची वेळ कशीबशी गाठली. दिवसभर तिथेच असणार होतो. रात्री जेवण, मुक्काम मैत्रिणीकडे होता. गाडीत अंग आखडून चालकाला झोपायला लावणं नको वाटतं, म्हणून नेहमीप्रमाणे मैत्रिणीच्या घरातल्या हॉलमध्ये त्याचं अंथरुण घालून दिलं होतं. फोनवर बोलायला म्हणून हा मुलगा बाहेर जायचा, मग पुन्हा ‘पुडी’ खायला. प्रत्येक वेळी दार उघडण्याचं काम अकारण वाढलं.

सकाळी न्याहारी करून एका मित्राला त्याच्या घरी भेटून मग कोल्हापूर गाठायचं ठरवलं, पण त्याच्याकडे गप्पांत रमले, त्यात तीन तास सहज गेले. बाहेर पडताना चालकाला म्हटलं, ‘‘आपण पुण्याबाहेर पडलो की आधी जेवूया, मग थेट कोल्हापूर.’’ तर तणतणून ‘जेवायचीच वेळ आणलीत की!’ असं काहीसं म्हणत शिवी हासडली असावी. वादावादीत ताण वाढला तर धोका नको, असं पहिल्यांदाच मनाशी चरचरलं. मूग गिळले. गाडीत बसल्यावर जाणवलं, ‘एखाद्या बाईच्या नियोजनाप्रमाणे चालायचं, ती म्हणेल ते करायचं’ हे त्याला मुळीच आवडत नाहीये. त्याच्या हालचाली व गाडीच्या वेगावरून ते कळत होतं. जेवल्यावर पुन्हा गाडी सुटली. कधी एकदम वेग, अनेकदा कचकन ब्रेक, धोकादायक ओव्हरटेक्स् असं सत्र चालू झालं. रागावर नियंत्रण ठेवताना मला खूप श्रम होत होते, पण काहीतरी विचित्र घडेल या अनाकलनीय भीतीनं गप्प राहिले. एका ठिकाणी नवी ‘पुडी’ घेण्यासाठी की चहासाठी कोण जाणे, पण तो उतरला. रस्ता सुरक्षितपणे पार करण्यासाठी गप्प राहाण्याचं धोरण हिताचं आहे हे कळत होतं, पण कोल्हापूरपर्यंत सुखरूप पोहोचण्याचा भरवसा वाटत नव्हता. म्हणून गाडीवर नेहमी येणाऱ्या भरवशाच्या चालकांना फोन केला, ‘‘तुम्ही हे कोणाबरोबर पाठवलंत दादा? समजा गाडीला अपघात झाला, आमचं काही बरंवाईट झालं तर सांगून ठेवते आहे की, तुम्ही चालक चांगला दिला नव्हतात. कोल्हापूरबाहेर पडताना आम्हाला चुणूक मिळाली होती, आता तर खात्रीच वाटतेय की, कोल्हापुरात आम्ही धड पोचत नाही.’’ सुदैवानं त्या चालकाने मालकांना फोन रेकॉर्डिंग पाठवलं व झालेल्या मनस्तापाबद्दल त्यांनी मेसेजद्वारे माफी कळवली. त्या दिलगिरीनं मनाला घटकाभर बरं वाटलं तरी त्यानं सुरक्षित पोहोचण्याची हमी मिळत नव्हती. त्याही परिस्थितीत मी त्यांना ऑडिओ पाठवला की, त्याला वागायबोलायची पद्धत शिकवू या, त्याची खरडपट्टी काढून काय मिळणार? तो चार लोकांशी चांगला वागेल, चांगलं काम करेल असं बघू या. अखेर संध्याकाळी जेव्हा सुखरूप घरी पोहोचले तेव्हा कुठे हायसं वाटलं.

हेही वाचा : सांधा बदलताना: तो प्रवास सुंदर होता

त्यानंतरचे दिवस धावपळीत गेले. नुकत्याच मला जाहीर झालेल्या नव्या पुरस्काराच्या बातमीमुळे गडबडीत होते. कामं, भेटीगाठी यामुळे अक्षरश: मेटाकुटीला आले होते. त्या काळात त्याच मुलाचा ‘हाय’ नि आणखी काही मेसेज दिसले, पण मी त्याचा विचार केला नाही.त्या पंधरवड्यात काही मेसेज होते, ‘डीपी मस्त’, ‘कडक’, ‘खरंफोटोकडक’. एखाददोन मेसेज डिलीट केले होते. अशा गोष्टींकडे लक्ष देण्याची आपली मानसिकताच नसते. दुर्लक्ष हाच उपाय. मी तेच केलं. प्रवासानंतर नेमकं मोजलं तर तीन आठवड्यांनी, त्या दुपारी मी फोन सायलेंट करून झोपले होते. पाऊण तासानं पाहिलं तर, दहापेक्षा जास्त मिस्ड कॉल त्या तरुण चालकाचे होते! गोंधळून मी व्हॉट्सअप मेसेज बघितले, तर त्यावर लैंगिक कृतीचा ग्राम्य उल्लेख करून ‘देणार काय’ असं विचारलं होतं. ह्रदयाचा ठोका चुकला!

कोणीही अशा भाषेत आपल्याला ‘असं’ विचारू शकतं याचा प्रचंड धक्का बसला होता. मी थरथरत एजन्सी मालकांना फोन केला तर तेव्हा ते म्हणाले, ‘‘त्यानं आणखी दोनतीन ग्राहकांसोबत गैरवर्तन केलं, आम्हालाही उलट बोलला म्हणून त्याची पाठ मऊ करून नोकरीवरून काढून टाकलं आहे.’’ माझ्या लक्षात आलं की, या सगळ्याचं उट्टं त्यानं माझ्यावर काढलं आहे. काही न सुचून मी चटकन लेखक राजन गवसना फोन केला. ते म्हणाले, ‘‘एकच सांगतो, असे विषय अनअटेंडेड ठेवू नका!’’

‘म्हणजे काय करू?’ विचारल्यावर एखाद्या पत्रकाराला गाठून पोलिसांना कळवा, म्हणाले. पत्रकार विश्वास पाटील यांनी ‘जुना राजवाडा पोलीस चौकी’त हे सगळं कळवून माझ्या अपंगत्वाची त्यांनी कल्पना दिली की, ही तक्रार ‘व्हीलचेअरबाऊण्ड’ स्त्रीची आहे, पोलीस ठाणे अपंगांसाठी गैरसोयीचे आहे. निरोप जाताक्षणी मला ठाणे इन्चार्ज दत्तात्रय नाळे यांचा फोन आला. त्यांनी धीर दिला. एका स्त्री पोलिसासह आणखी चार पोलीस अर्ध्या तासात घरी हजर झाले. प्रसंगावधान कसं अवतरलं ठाऊक नाही, पण मी आक्षेपार्ह मेसेज पाठवणाऱ्या त्या चालकाचा फोटो, मेसेज, मिस्ड कॉल्स वगैरेंचे स्क्रीनशॉट्स काढून ठेवले होते. ते नंबरसह ताबडतोब पोलिसांना दिले. मदत मिळाल्याने धीर आला असला तरी पहिल्यांदाच आलेल्या त्या अश्लील मेसेजने हादरल्यामुळे तोंडाला विचित्र कोरड पडत होती. संपूर्ण अंग कापत होतं, पण थरथर नियंत्रित करण्याचा प्रयत्न करण्यातून थंडी वाजल्यासारखं वाटत होतं, दरदरून घामही येत होता. घटनाक्रम बारीकसारीक तपशिलासह ऐकताना पोलिसांना ते कळलं. त्यांनीच मला उठून पाणी दिलं. म्हणाले, ‘‘अब्यूसीव्ह भाषा वापरली, असं म्हटलंत तरी चालेल, तो शब्द उच्चारणं गरजेचं नाही.’’

हेही वाचा : स्त्री ‘वि’श्व: ‘हाऊस हसबंड’ असणं!

मी म्हटलं, ‘‘मी लेखक आहे. शब्द उच्चारायला घाबरत नाही. पण परक्या माणसानं ते माझ्या बाबतीत वापरावेत असा हक्क मी त्याला दिलेला नाही. त्यामुळं शब्द उच्चारण्याचा ताण माझ्यावर नाही. मी जसंच्या तसंच सांगेन.’’ धाडस गोळा करण्यासाठी मी स्वत:ला दिलेल्या पाठिंब्याची ती कृती होती. त्यांनी नोंदी केल्या. बहुतांशी बायका-मुली तक्रार पक्की करत नाहीत हा त्यांचा अनुभव. म्हणून नक्की ‘एफआयआर’ करायची ना हे पुन:पुन्हा विचारलं. मी ठामपणे ‘हो’ म्हटलं. त्यांनी महत्त्वाचे फोन नंबर्स दिले. कधीही धोका जाणवला तर तातडीनं नंबर फिरवा, दहा मिनिटांच्या आत मदत हजर असेल असं म्हणाले. गस्त चालू राहील, हवालदार साध्या वेशात गेटच्या आसपास असेल, असंही सांगितलं. या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी सगळं केलं तरी पाठीतून एक कळ उमटत राहिली. पोलीस घरातून निघाले तेव्हा मी विचारलं, ‘‘मला व माझ्या सोबतिणीला घराच्या बाहेर या ना त्या कामासाठी पडावंच लागतं, अचानक हल्ला झाला तर? रागानं तो काही अपाय करायला आला तर? चाकू ठेवू का? तो कसा वापरायचा?’’ पोलीस म्हणाले, ‘‘त्यानं तुम्हालाच उलटा अपाय झाला तर? त्यापेक्षा पेपर (काळीमिरी) स्प्रे मागवा.’’ चौकशी केल्यावर कळलं, दुकानात तो मिळत नाही. ऑनलाइन मागवून यायला चार ते सहा दिवस लागणार होते. पोटात खड्डा पडला. प्रत्येक दिवस भीतीचा होता. अस्वस्थतेचा होता. त्यामुळे काही दिवसांनी जेव्हा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याची बातमी वाचली तेव्हा नक्की काय वाटलं, सांगता येणार नाही.

काही दिवस बाहेर पडू नका, असं पोलीस म्हणाले तरी कधीतरी घराबाहेर पडावं लागणारच होतं. व्हीलचेअरवरून बाहेर पडताना जीव नुसता कापत होता. ‘पॉवर चेअर’च्या जॉयस्टिकवरचा हात भरून येत होता. धोका आहे का, याचा कानोसा घेताना व भेदकपणे परिसर बघताना ताण येत होताच, पण भीतीच्या त्या आवेगानं रडायला येत होतं.

स्वावलंबी नि निर्भय होण्यासाठी जंग जंग पछाडल्यावर आता एका अशिष्ट मेसेजनं आपल्या तथाकथित निर्भयतेच्या ठिकऱ्या उडताना बघणं दुर्दैवी होतं. ही हतबलता सगळ्याच चांगुलपणा नि सभ्यतेवरचा विश्वास नखलणारी होती. हाक मारताच दहा मिनिटांत पोलीस हजर होतील खरं, पण त्या दहा मिनिटांत होत्याचं नव्हतं होऊ शकतं! हिरोशिमा नागासाकीचा कोळसा व्हायला तितकीच मिनिटं पुरली होती, मग आपण काय चीज?

पण भयाचा तप्त ज्वालामुखी इतका पसरला की, कालांतराने तितकाच कठीण खडक घडला! अभेद्या नव्हे, पण चटकन भेदता येणार नाही असा! sonali.navangul@gmail.com