नवव्या-दहाव्या शतकापासून साऱ्या भारतभर विविध भक्तिसंप्रदायाचा उदय झाला. वेगवेगळ्या धर्ममतांच्या गलबल्यातून सामान्य माणसाला सहज साध्या भक्तिमार्गाकडे वळवण्याचं आणि कर्मकांडापलीकडचं सुलभ, उदार आणि समत्वदर्शी तत्त्वज्ञान समाजात रुजवण्याचं काम ज्यांनी केलं असे अनेक संत स्त्री-पुरुष या काळात निर्माण झाले. त्या भारतभर विखुरलेल्या अनेक अमराठी संतांच्या जीवन-विचारांचे दर्शन घडवणारे हे सदर दर पंधरा दिवसांनी.  
सहाशे वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये होऊन गेलेली योगिनी लल्ला, लाल देद किंवा लल्लेश्वरी ही खरी प्रतिभावंत कवयित्री आहे. तिची वाणी भाषेच्या सौंदर्यानं बहरलेली आहेच, पण तिच्या शब्दांवर तिच्या अंत:स्थ अनुभवांचा जो झळाळ आहे तो स्तिमित करणारा आहे.
सहाशे वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये होऊन गेलेली एक योगिनी होती लल्ला. लाल देद किंवा लल्लेश्वरी हे तिचं नाव. लल्ला म्हणूनच ती संतपरंपरेला परिचित आहे. तेराशे वीस सालाच्या आसपास ती बहुधा जन्मली आणि तेराशे सत्तरच्या आसपास मरण पावली.
श्रीनगरजवळचं पाम्पूर हे तिचं गाव. तिच्या घरी लिहिण्या-वाचण्याची परंपरा होती. शैव तत्त्वज्ञानाचा अभ्यास तिनं केला होता. पण लग्न होऊन ती सासरी आली आणि बहुतेक सगळ्या मध्ययुगीन सासुरवाशिणींप्रमाणे तिलाही आपली ज्ञानसाधना दूर ठेवावी लागली. खाष्ट सासूचा जाच सोसत सहनशीलतेनं दिवस घालवावे लागले. पण लल्लाची जीवनकहाणी इतर सासुरवाशिणींप्रमाणे चुलीपाशी संपली नाही. एक दिवस तिनं निकरानं घराबाहेर कायमचं पाऊल टाकलं आणि तिचं आयुष्यच पार बदलून गेलं. तिच्या सासरी होणाऱ्या छळाची आणि तिच्या गृहकृत्याची एक अद्भुत कहाणी काश्मीरमध्ये प्रचलित आहे. पण ती बाजूला ठेवली तरी तिच्या उत्तर आयुष्याची वाटचाल त्या कहाणीहूनही अद्भुत आहे.
 ‘अद्भुत’ म्हणजे चमत्कारांनी भरलेली नव्हे. अद्भुत म्हणजे त्या काळच्या बायकांची पतिव्रतेच्या प्रतिमेतली कैद आणि सासरच्या घरात बंद झालेली त्यांची उपेक्षित, दुर्दैवी आयुष्ये लक्षात घेता, असामान्य! घराबाहेर पडणाऱ्या बाईचं आयुष्य म्हणजे कुणीही दगड मारावे असं. तिला कुठला ठाव नसे. पण लल्ला हिमतीनं घराबाहेर पडली. कुठल्याही मठ- मंदिराच्या आश्रयाला नाही गेली ती. ती साऱ्या काश्मीर प्रांतात हिंडत राहिली. एक एकटी, भटकी विरागिनी.
लल्ला भटकत राहिली आणि वचनं गात लोकांना जागवत राहिली. ‘वारव’ म्हणतात तिच्या रचनांना, त्या म्हणजे लहान लहान कविता. काश्मिरी भाषेचं आदिसौंदर्य आणि सामथ्र्य यांचं दर्शन घडवणाऱ्या. लल्ला काश्मीरची, काश्मिरी भाषेची जणू आदिदेवता होती. तिथल्या बौद्ध, हिंदू आणि सूफी या तीनही परंपरांचा उत्कट मिलाफ ज्या रसीसंप्रदायात झाला आहे, त्या संप्रदायाला बळ देणारी एकात्मतेचा पाठपुरावा करणारी ती निर्भय योगिनी होती.
लल्लेचं एकाकी, भटकं जीवन जसं असामान्य तसंच तिचं दार्शनिक काव्य आणि त्या काव्यातून प्रकट होणारं तत्त्वज्ञानही असामान्य. ती प्रेमाची दूत होती. साऱ्या मानवजातीविषयीचं उदंड प्रेम तिनं व्यक्त केलं आहे. पण या प्रेमाची वाट सोपी नाही. प्रेमाच्या चरकात हृदय पिळून काढावं म्हणजे कुठे दुष्ट वासना त्यातून दूर होतात. ते हृदय उकळावं, जाळावं म्हणजे कुठे प्रेमाची भूक मिटते. मग आपण जिवंत राहणार आहोत की मरणार आहोत याचाही विचार मनात येत नाही. तिनं असं प्रेम करायला शिकवलं आहे. प्रेम जगावर, कारण जग म्हणजेही ईश्वर आहे आणि प्रेम स्वत:वरही, कारण स्वत:च ईश्वर आहे..
लल्ला आधी स्वत:कडेच पाहण्याचा आग्रह धरते. ज्ञानदेवांप्रमाणेच तिला स्वत:चं रूप दिसत नाही. तिथे तिला ईश्वरच दिसतो आहे. पण ही अवस्था तर शेवटची आहे. त्याआधी माणसाला खूप मोठा संघर्ष करावा लागतो. खूप प्रयत्न करावे लागतात. प्रयत्न, मनाला आत वळवण्याचे. चौदिशा धावणाऱ्या बुद्धीला खेचून धरण्याचे. इच्छांना काबूत आणण्याचे.
बाहेरचं जग सतत बाहेरच्या सुखांकडे बोलावतं आहे. मनाचा वारू तर क्षणार्धात हजारो मैल झेपावत जातो. अवकाशात संचार करतो. त्याला ठाणबंद करायला हवं. आपल्यामध्ये जे जे अशुद्ध आहे, हिणकस आहे, घातक आहे ते ते दूर करून, अंतर्बाह्य़ सूर्यप्रकाशात झळझळणाऱ्या आरशासारखं व्हायला हवं.
 हे कसं शक्य आहे? आहे. त्यासाठी आधी अहंकार दूर सारायला हवा. नम्रता तुम्हाला विस्तारत नेते. तुमची हाव, तुमचा राग आणि तुमची भूक आधी नष्ट करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला घायाळ करणारे हेच तीन तुमचे शत्रू आहेत. ते शांत कसे होतील? तुमच्या सद्विचारांचं त्यांना उत्तर द्या. त्यांना शांतवण्यासाठीचे तुमचे विचारच तुम्हाला मदत करतील, त्या शत्रूंचं स्वरूप आणि शक्ती ओळखा, त्यांचं कार्य आणि परिणाम ओळखा. त्यांचं मायावी रूप जाणून घ्या आणि सावध असा.
लल्लेनं तृष्णेचं स्वरूप अचूक जाणलं आहे. माणसाची तृष्णा अपार आहे. त्याला राजसिंहासन मिळालं आणि तो मोठय़ा साम्राज्याचा स्वामी झाला तरी त्या सत्तेनं आणि प्रतिष्ठेनं त्याचं समाधान होत नाही. मरेपर्यंत माणसं लालसेच्या जाळ्यात अडकलेलीच राहतात. मन कधी तृप्त आणि शांत होत नाही. खरं म्हणजे माणूस जिवंत राहून त्याची इच्छा किंवा लालसा मरून जाणं, हे घडायला हवं. मग त्याला शाश्वत आनंदाचा लाभ होईल. हे ज्ञान म्हणजे जीवनाच्या सत्य स्वरूपाचं ज्ञान. असं ज्ञान घडायला हवं. मरूनही जिवंत राहण्याचं ज्ञान!
एकदा असं ज्ञान मिळालं की मग माणसासाठी त्याचा देह महत्त्वाचा राहत नाही. देहाचं कौतुक पुरवण्यासाठी तो कर्माचा डोलारा उभा करत नाही. मग तो केवळ थंडी दूर ठेवण्यापुरती वस्त्रं घालतो, भूक निवारण करण्याइतपतच भोजन करतो. आपल्या पंचेंद्रियांच्या जाणिवा तृप्त व्हाव्या यासाठी शरीर नसतं. शहाण्या माणसाला हे नेमकं कळतं.
सौंदर्य ही देहाशी संबंधित संकल्पना नाही, हे लल्लाला समजलं होतं. चेहरा सुंदर पण हृदय पाषाणाचं. तोंडानं जीभ तुटेपर्यंत नामस्मरण आणि बोटं दुखेपर्यंत देवाचं नाव लिहिणं. मन मात्र जगाविषयीच्या नाना प्रकारच्या तिरस्कारांनी भरलेलं. अशा सौंदर्याला काय अर्थ? लल्लेची तर देहाची जाणीवच नाहीशी झालेली. मग कोणत्या देहाला सजवायचं! कशासाठी त्याला चांगलं चुंगलं खाऊ घालायचं? वेडेपणा आहे हा!
त्यापेक्षा मन नितळ ठेवावं. आळस मुळापासून दूर करावा आणि अज्ञानही दूर ठेवावं. मग कळून येतं की आपलं शरीर हाही त्या परमात्म्याचाच एक अंश आहे आणि हे जेव्हा कळतं तेव्हा त्या साक्षात्कारानं- त्या जाणिवेनं तुमचं आतलं खरं सौंदर्य फुलून येतं.
आपापल्या कर्माचं ओझं आपल्यापैकी प्रत्येकालाच वाहावं लागतं. कर्म चांगलं असो किंवा वाईट, त्याचे परिणाम आपल्याला भोगावेच लागतात. मग निष्काम कर्म करावं आणि ते स्वत:लाच स्वत:चं म्हणून अर्पण करावं. आपल्याच आत्म्याला तो नैवेद्य दाखवावा. मग कुठेही जा, त्या कर्माचा तुम्हाला लाभच होईल. कारण स्वत:साठी तुम्ही वाईट कर्म कसं कराल?
अर्थात लल्लाला हेही माहीत आहे की काही माणसं आतून उजळलेली आहेत. इतर लोक झोपलेले असतात तेव्हा ही जागी असतात आणि काही माणसं जागी दिसतात पण ती झोपलेलीच असतात. काही लोक स्नान करूनही अमंगळ राहतात आणि काही अगदी मोजकी माणसं अशी असतात की ती मुळातच फार निर्मळ असतात. या लौकिक जगात ती फार अलिप्तपणे जगतात.
अशा माणसांना माहीत असतं की बोंडात कापूस पिकून तयार होतो तेव्हा तो अगदी शुद्ध आणि निर्मळ असतो. एखाद्या फुलासारखा तो उमलून येतो. मग माणसं ती बोंडे तोडतात आणि काठीनं मारून ती फोडतात. मग धनुकलीवर कापूस पिंजून मग तो रंगवतात आणि नंतर तो कापूस माणसं कारखान्यावर पाठवतात. त्या कापसाच्या धाग्यानं वस्त्र विणलं जातं. ते वस्त्र मग धोबी धुतो आणि शिंपी त्याचं कापड कापतो. इतक्या वेगवेगळ्या प्रक्रियांमधून ते शुद्ध पण असंस्कारित कापड जातं आणि मग त्याचा उत्तम शिवलेला कपडा तयार होतो. लल्ला म्हणते की, या सगळ्या अडथळ्यांना पार केल्यावर मगच तिला आतून उजळता आलं.
ती स्वानुभवाचे बोल बोलते आणि बजावते की आत्मशुद्धी ही काही एकदाच होऊन जाणारी घटना नव्हे. ती एक दीर्घ आणि खोल अशी प्रक्रिया आहे.
 लल्लेनं देवाजवळ जाण्याचा तिचा अनुभवही अनेक रचनांमधून सांगितला आहे. दर्भ आणि फुलं, पाणी आणि धूप-दीप यांनीच देवाची पूजा करायला हवी असं नाही, हे तिला उमगलं नि स्वानुभवातून इतरांना कळवळून सांगितलं की, तीर्थयात्रा करून आणि नामजप करून देव मिळत नाही. कितीही प्रयत्न करा, तुमचं मन त्या प्रयत्नांपासून दूर असेल तर देवाची एक लहानशी झलकही तुम्हाला नाही मिळणार. पण इतर काहीही न करता शांतपणे एकाग्रपणे स्वत:कडे वळलात, स्वत:ला नितळ, पारदर्शक करीत गेलात तर तो तुमच्याच हृदयात तुम्हाला सापडेल. भिकाऱ्यासारखे देवासाठी दारोदार हिंडू नका. स्वत:त उतरण्याचा, स्वत:च्या मर्यादांच्या पार जाण्याचा प्रयत्न केला तर तो तुमच्या हृदयातूनच तुम्हाला आशीर्वाद देईल.
 लल्ला खरी प्रतिभावंत कवयित्री आहे. तिची वाणी भाषेच्या सौंदर्यानं बहरलेली आहेच, पण तिच्या शब्दांवर तिच्या अंत:स्थ अनुभवांचा जो झळाळ आहे तो स्तिमित करणारा आहे.    
डॉ. अरूणा ढेरे -aruna.dhere@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा