लोकसंस्कृतीची समृद्ध परंपरा असणाऱ्या महाराष्ट्राची लोककला सादर करणाऱ्या कलावंतांचा वातावरणात चैतन्य निर्माण करणारा जागर… त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्याच आपल्या वेगळ्या वाटेने पुढे जात परंपरा मोडून काढणाऱ्या असामान्य स्त्रिया अर्थात दुर्गांच्या कार्यकर्तृत्वाचा होणारा सत्कार आणि त्यावर कळस म्हणजे लोकसंस्कृतीचा,लोकपरंपरेचा अभ्यास करत असतानाच त्यातील स्त्रीचा आत्मस्वर शोधणाऱ्या डॉ. तारा भवाळकर यांचा ‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव पुरस्कार’ देऊन केलेला सन्मान… हे सगळं सुरू होतं एकाच कार्यक्रमात… एकाच व्यासपीठावर… टाळ्यांच्या गजरात, मान्यवरांच्या आणि प्रेक्षकांच्या भरगच्च उपस्थितीत. निमित्त होतं, ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार २०२४’.

यंदाचे या पुरस्काराचे हे अकरावे वर्ष. आत्तापर्यंत १०८ दुर्गांना या पुरस्काराने गौरवलं गेलं आहे. दरवर्षीप्रमाणे हा सोहळाही नावाजला गेला तो कधी कल्पक, कधी कष्टाळू, कधी विचारी, कधी संशोधक वृत्तीने काम करत आपापल्या क्षेत्रात स्वत:ची मोहर उमटवणाऱ्या दुर्गांच्या कर्तृत्वामुळे.

Tara Bhawalkar, Tara Bhawalkar latest news,
‘‘शिक्षणाच्या जोडीने शहाणपणही यावं’’
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Solutions to achieve educational goals by inculcating interest in learning
सांदीत सापडलेले…!: उपाय
mazhi maitrin
माझी मैत्रीण: फासला दोनों से मिटाया ना गया…
loksatta chaturang article
जिंकावे नि जगावेही : जगण्याचे सशक्त मार्ग
Loksatta chaturanga Parent Nature Confused Psychologist
सांधा बदलताना : संसार शांतीचा झरा…
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
article nobel prize winner south korean author han kang
विश्व साहित्याला गवसलेला नवा सूर

कार्यक्रमाच्या सुरुवातीला रसिक प्रेक्षकांचं आणि दुर्गांचं स्वागत करताना ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर या पुरस्काराविषयी म्हणाले की, ‘सर्व कार्येषु सर्वदा’ आणि ‘दुर्गा पुरस्कार’ या दोन उपक्रमांना समाजाचा एक जाडसर भरजरी पदर आहे. समाजातल्या विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या स्त्री-पुुरुषांना एकत्र आणण्याचं काम, अशा लोकांचं जाळं विणण्याचं काम यानिमित्ताने होत आहे. राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचं स्वागत करताना गिरीश कुबेर म्हणाले, ‘‘प्रागतिक, पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी एका आयएएस अधिकारी असणाऱ्या महिलेची निवड होण्यासाठी १९६० पासून आज इतकी वर्षं जावी लागली. यामागे असणारी पुरुषी मानसिकता मोडून काढण्यासाठी त्यांनाही प्रचंड संघर्ष करावा लागला. म्हणूनच त्यांचे या दुर्गांच्या सत्कारासाठी उपस्थित असणे खूप महत्त्वाचे आहे.’’ ‘चतुरंग पुरवणी’ची संपादक आणि ‘दुर्गा पुरस्कार’ निवडीमध्ये सुरुवातीपासूनच सहभागी असणाऱ्या मलाही, या निमित्ताने या दुर्गांच्या निवडीमागची भूमिका स्पष्ट करता आली.

यंदा ‘लोकसत्ता’ने या दुर्गांची निवड करताना त्यांनी किती काम केलं यापेक्षा काय काम केलं हा निकष महत्त्वाचा ठरवला होता. त्यातूनच नववी शिकलेल्या परंतु आता त्यांच्या अनसरवाडा येथल्या ‘आरोग्य मित्र’ म्हणून काम करणाऱ्या लातूर जिल्ह्यातल्या कविता वाघे गोबाडे असतील किंवा स्वत: दोन्ही पायांनी अधू असूनही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी हिंगोली येथे वसतिगृह स्थापन करणाऱ्या मीरा कदम किंवा संपूर्ण कोकणात अंध मुलांसाठी निवासी शाळा नाही म्हणून निवृत्तीनंतर स्वत:च्या घरातच ही शाळा सुरू करणाऱ्या आशा कामत आदींची निवड करण्यात आली. त्यांच्या बरोबरीने नाशिक मधील येवला येथे पैठणीच्या निर्मितीपासून विपणनापर्यंतचा अभ्यासक्रम तयार करणाऱ्या आणि स्त्री विणकार घडवणाऱ्या अस्मिता गायकवाड, चीनमध्ये डॉलर्समध्ये मिळणारा पगार सोडून आपल्या हिंगणगावातील लोकांना हातमोजांच्या माध्यमातून रोजगार मिळावा यासाठी परतलेल्या स्नेहल लोंढे, वंचित मुलांना, ऊसतोड कामगारांच्या मुलांना शाळेची वाट दाखवणाऱ्या कोल्हापूरच्या अनुराधा भोसले, नाट्यानुभवाच्या माध्यमातून लहान मुलांमध्ये आत्मविश्वास आणि नाट्य कलाप्रकाराची गोडी निर्माण करणाऱ्या पुण्याच्या शुभांगी दामले, अहमदगनगर येथील भोन्द्रे आणि गाडिलगाव (ता. पारनेर) या अगदी लहानशा गावात शिकून अभियंत्या झालेल्या आणि आता लष्करात मेजर या पदावर कार्यरत सीता शेळके, किंवा भंडारा जिल्हातल्या कृषी विषयातल्या पहिल्या पदव्योत्तर आणि पीएच. डी प्राप्त करून शेतकऱ्यांसाठी भातशेतीसाठी संशोधन करणाऱ्या डॉ. उषा डोंगरवार. या सर्व दुर्गांचा मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. या सोहळ्याचा कळस म्हणजे सर्व दुर्गांच्या आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी,सुप्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक शाह, ‘स्त्री मुक्ती संघटने’च्या अध्यक्षा ज्योति म्हापसेकर, सुप्रसिद्ध लेखिका मोनिका गजेंद्रगडकर यांच्या साक्षीने सन्मान केला तो गेली ५० वर्ष लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीचा अभ्यास आणि संशोधन करणाऱ्या, ४४ पुस्तके लिहिणाऱ्या डॉ. तारा भवाळकर यांचा.

त्यानंतर डॉ. तारा भवाळकर यांनी आपल्या ओघवत्या शैलीतून रसिकांशी संवाद साधला. तो कधी अभंग, कविता म्हणत, तर कधी मान्यवरांचे दाखले देत तर कधी चक्क कानपिचक्या देत. यावेळी त्यांनी केलेलं भाषण या कार्यक्रमाला उपस्थित नसणाऱ्या आमच्या सर्व वाचकांसाठी आम्ही याच अंकात प्रकाशित करत आहोतच.

राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सौनिक यावेळी म्हणाल्या, ‘‘आजही स्त्रीकडे अबला म्हणून पाहाण्याचा दृष्टिकोन फार बदललेला नाही. यात बदल घडवायचा असेल तर मुलींना शिक्षण आणि रोजगाराची संधी देणं गरजेचं आहे. त्यानंतरही तिला तिच्या स्वप्नांच्या वाटेने शेवटपर्यंत जाण्याची संधी मिळायला हवी. अर्थात आता काळ बदलत चालला आहे. पूर्वी एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीला त्रास देेते असं बोललं जायचं मात्र आता एक चांगला शब्द रुजतो आहे, ‘बहीण-कोड.’ आजकाल एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला मदत करायचा प्रयत्न करते. तिच्या स्वप्नपूर्तीसाठी हातभार लावू इच्छिते. आजची तरुण पिढी रुढीवादी नाही, त्यांची स्वप्ने, इच्छा आणि त्यांचा आत्मविश्वास पाहिल्यावर मला आशादायी वाटतं आणि याचीही खात्री वाटते की येणारा समाज या स्त्रियांना नक्कीच सन्मान देईल.’’

या सर्व सन्मान सोहळ्यांच्या दरम्यान ‘जागर मराठमोळ्या लोकसंस्कृतीचा’ या कार्यक्रमांतर्गत लोककलेचा नादस्वर अभंग होता. आपल्याच प्राचीन कला प्रकाराचे हे वैविध्य, त्यातले शब्द, संगीत या सगळ्यांनीच वातावरण भारून टाकलं होतं. कधी खणखणीत शाहिरी-पोवाड्याचा आवाज, तर कधी वाघ्या-मुरळीचं तालबद्ध नृत्य, कधी जागरणातून केलेली देवाची उपासना, तर कधी सामान्यांना आत्मबोध करणाऱ्या एकनाथांच्या भारुडाचे गारूड प्रेक्षकांना विचार करायला लावणारं. कधी हसवणारं. तर कधी ताल धरायला लावत ठेका धरायला लावणारं. मुंबई विद्यापीठातील ‘लोककला अकादमी’ येथे कार्यरत अष्टपैलू युवा लोककलावंत शिवपाईक योगेश चिकटगावकर यांनी सुरुवातीपासूनच कार्यक्रमात उत्स्फूर्तता आणत संपूर्ण कार्यक्रम एका लयीत बांधला होता. पुरुषांची मक्तेदारी मोडून काढत, डफावर थाप मारत राज्यभरातील अनेक पुरस्कारप्राप्त केलेल्या शाहीर चंद्रिका कल्पना माळी यांनी सादर केलेला पोवाडा. नाट्यशास्त्र आणि लोककला विषयात एमए केलेल्या आणि ‘तरुण तेजांकित’ पुरस्कार विजेत्या क्रुष्णाई उळेकर यांनी ओघवत्या आणि रसाळ भाषेत सादर केलेलं भारूड आणि अंतिमत: ढोलकी, दिमडी, संबळ आणि तुणतुण्यांवर पक्का हात बसलेल्या आरती सायगांवकर, अर्चना देशमुख, मोहिनी भुसे यांनी सादर केलेला लोकवाद्यांचा गजर रसिकांना ताल धरायला लावणारा होता.

या कार्यक्रमाची संहिता लिहिली होती, ‘लोकसत्ता’चे वरिष्ठ उपसंपादक शफी पठाण यांनी. लोककलेच्या कार्यक्रमाची संहिता आणि निवेदन केलं होतं सुसंवादक कुणाल रेगे यांनी तर दुर्गा पुरस्काराचं निवेदन केलं होतं, ‘३८ कृष्ण व्हिला’ या नाटकाच्या लेखिका-अभिनेत्री डॉ. श्वेता पेंडसे यांनी.

लोककलांच्या सादरीकरणामुळे भारावलेल्या वातारणात, दुर्गांच्या कार्यकर्तृत्वाचं कौतुक करत आणि मनाला खोल विचारांमध्ये बुडवणाऱ्या डॉ. तारा भवाळकर यांच्या विचारवक्तृत्वाला वंदन करत रसिकांनी कार्यक्रमाचा निरोप घेतला तो पुढील वर्षी होणाऱ्या ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कारा’विषयीच्या उंचावलेल्या अपेक्षेनेच.

arati.kadam@expressindia.com

Story img Loader