नुकतीच पार पडलेली ‘पोलॅरिस डॉन मोहीम’ ही किरणोत्सर्गी पट्ट्यातून आखलेली, पृथ्वीपासून १४०० किलोमीटर इतक्या उंचीवरची पहिली खासगी अवकाश मोहीम असून यातील सेरा गिलिस व अॅना मेनन या हा प्रवास करणाऱ्या पहिल्या अवकाशयात्री स्त्रिया ठरल्या आहेत. या मोहिमेदरम्यान जवळपास ४० शास्त्रीय प्रयोग अवकाशात केले असून केवळ खासगीच नव्हे तर एकूणच अवकाश मोहिमांसाठी ते महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

ती एक अभियंता आहे. अवकाशयात्री आहे. आई आहे. आणि दुर्दम्य आशावादी स्त्री आहे. तिच्या पहिल्या अवकाश यात्रेआधी तिने आपल्या मुलांसाठी एक पत्र लिहायचं ठरवलं…

Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
On December 13 and 14 there will also meteor shower in space and feast for astronomy lovers
आकाशात १३, १४ डिसेंबरला उल्कावर्षाव; पृथ्वी लहान-मोठ्या कणांजवळून…
International Space Station
भारताचं स्वत:च्या मालकीचं स्पेस स्टेशन! केंद्रीय मंत्र्यांची मोठी घोषणा, नाव ठरलं ‘भारतीय….’
drone spray services for farmers drone spraying pesticides for agriculture
कृषी ड्रोन : अर्थार्जनाचा नवीन मार्ग
Kandalvan, drone filming, flamingos, Mumbai,
मुंबई : फ्लेमिंगोच्या ड्रोन चित्रिकरणाच्या प्रकरणाची कांदळवन कक्षाची चौकशी सुरू
Time Moves Faster on the Moon Than on Earth
चंद्र पृथ्वीपेक्षा अधिक वेगवान?; नवीन संशोधनाने उलगडले वेळेचे रहस्य!
Shani Nakshatra transformation 2024
२०२५ सुरू होण्याआधीच शनी देणार बक्कळ पैसा; नक्षत्र परिवर्तनाने मिळणार पैसा आणि प्रतिष्ठा

तिच्या आपल्या मुलांविषयीच्या भावना, प्रेम, कुटुंब म्हणून त्यांच्यातील स्नेहपूर्ण बंध याविषयी त्यांना विश्वास देत असतानाच अवकाशयात्री म्हणून निवड होण्यासाठी व या यात्रेआधी प्रशिक्षणादरम्यान तिने घेतलेले परिश्रम, मोहीम फत्ते करण्यासाठी अवकाशात येणारी, पेललेली आव्हानं आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे जगाला अशक्य वाटणारी स्वप्नं प्रत्यक्षात उतरवताना दाखविलेली विजिगीषू वृत्ती, तिचा निर्धार हे सारं सारं त्या पत्रात मोकळेपणाने लिहिलं. आपली आई या यशस्वी प्रवासानंतर पृथ्वीवर परतण्यासाठी कोणत्या दिव्यातून जाऊन आलीय याची कल्पना मुलांना यावी यासाठीचा तिने केलेला हा प्रामाणिक प्रयत्न होता.

हेही वाचा : ‘माया’ मेमसाब

हे सगळं तिने एका गोष्टीच्या रूपात मांडलं. अवकाश प्रवासावरून सुखरूप परतलेली एक ड्रॅगन आई आपल्या बछड्यांना आपल्या प्रवासाची कहाणी हसतखेळत सांगतेय अशा स्वरूपात. ती अवकाशात असताना हे पत्र तिच्या मुलांना आधार देईल आणि प्रेरणासुद्धा यावर तिचा विश्वास होता. तिच्यातील आईला आणि बाईला जाणवलं की, ही गोष्ट तिच्या मुलांच्या जोडीने जगभरातील लहानग्यांना आणि पालकांना प्रेरणा देऊ शकेल. आणि या जाणिवेसह ही यशस्वी अवकाश प्रवासाची गोष्ट पुस्तक रूपात तिने तिच्या अवकाश प्रवासाआधीच जगभरातील लहानग्यांसाठी प्रसिद्ध केली. हे कुणी आईच करू जाणे!

या गोष्टीतील ते पुस्तक आहे, ‘किसेस फ्रॉम स्पेस’ आणि ती म्हणजे ‘पोलॅरिस डॉन मोहीम’ ( Polaris Dawn Mission) या विक्रमी अवकाश मोहिमेमधली ‘मिशन स्पेशालिस्ट’ आणि ‘मेडिकल ऑफिसर’ अॅना मेनन. या पुस्तकाच्या निमित्ताने एका आईची ममता, तिचा आपल्या मुलांप्रति असलेला जिव्हाळा, तसेच विज्ञान व अवकाशविज्ञान या क्षेत्रातील कामगिरीमुळे जगभरातील लहानग्यांना, स्त्रियांना दिलेली प्रेरणा आणि यापलीकडे जाऊन एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून अॅनाचा स्वत:वर, आपल्या टीमवर आणि मोहिमेच्या यशावर असणारा विश्वास अशा अनेक गोष्टी अधोरेखित होतात.

रविवार, दिनांक १५ सप्टेंबर २०२४ रोजी जवळपास पाच दिवसांच्या पृथ्वी प्रदक्षिणेनंतर ‘स्पेस एक्स’च्या Polaris Dawn या मोहिमेतील चार अवकाशयात्री फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर ‘स्पेस एक्स’च्या ड्रॅगन स्पेसक्राफ्टमधून यशस्वीपणे परतले. १० सप्टेंबर २०२४ रोजी फ्लोरिडा येथील ‘नासा’च्या (National Aeronautics and Space Administration) ‘केनेडी स्पेस सेंटर’ येथून ‘स्पेस एक्स’च्या ‘फाल्कन ९’ या रॉकेटमधून EDT (Eastern Daylight Time) वेळेनुसार पहाटे ५:२३ वाजता त्यांनी यशस्वी उड्डाण केले होते. या मोहिमेदरम्यान अनेक जागतिक विक्रम नोंदवले गेले. अनेक अर्थांनी ही मोहीम माणसाच्या अवकाश प्रवासाच्या मर्यादांना विस्तारणारी ठरली. या मोहिमेसाठी निवड झालेले मिशन कमांडर जेरेड आयझॅकमन हे उत्कृष्ट वैमानिक व अनुभवी अवकाशयात्री असण्याच्या जोडीने एक यशस्वी अब्जाधीश उद्याोजकसुद्धा आहेत. यापूर्वी ‘स्पेस एक्स’च्या ‘इन्स्पिरेशन ४’ या ऑल सिव्हिलियन अवकाश मोहिमेमध्ये त्यांनी मिशन कमांडरची भूमिका यशस्वीपणे निभावली आहे. मिशन पायलट स्कॉट पोटिट हे अमेरिकी हवाई दलातील निवृत्त अधिकारी तसेच यशस्वी उद्याोजक आहेत. त्यांनीसुद्धा ‘इन्स्पिरेशन ४’ मध्ये ‘मिशन डायरेक्टर’ची भूमिका यशस्वीपणे पार पाडली होती. या दोन अनुभवी अवकाशयात्रींच्या जोडीने ‘मिशन स्पेशालिस्ट’ सेरा गिलिस आणि ‘मिशन स्पेशालिस्ट’ व ‘मेडिकल ऑफिसर’ अॅना मेनन या दोघींनी या मोहिमेदरम्यान त्यांचा पहिला अवकाश प्रवास केला. यापैकी सेरा गिलिस यांनी यापूर्वी ‘स्पेस एक्स’च्या मोहिमांसाठी अवकाशयात्रींना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. अॅना मेनन यांना ‘ग्राउंड कन्ट्रोल रूम’मधील तसेच अवकाशयात्री आणि ग्राउंड स्टेशन यांच्यामधील संपर्क प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक कार्यपद्धती विकसित करण्याचा दांडगा अनुभव आहे.

हेही वाचा : सांदीत सापडलेले : काळजी

आता Polaris Dawn ही मोहीम मानवी महत्त्वाकांक्षेचा आणि मर्यादांचा वेध घेणारी का ठरते हेही जाणून घ्यायला हवं. मानवाला चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचवणाऱ्या अमेरिकेच्या अपोलो मोहिमांविषयी माहीत नसेल असा माणूसच विरळा. या मोहिमांदरम्यान ‘अपोलो ८’ ते ‘अपोलो १७’ या मोहिमांच्या प्रक्षेपणादरम्यानच्या कालखंडात चंद्राच्या कक्षेमध्ये झेपावण्यासाठी पृथ्वीच्या एलईओ (लोअर अर्थ ऑर्बिट)च्या पलीकडे मानवाने प्रवास केला. यापूर्वी पृथ्वीच्या ‘एलईओ’पलीकडे इतक्या दूरवर मानवाने केलेला प्रवास हा केवळ याच कालखंडातील असल्यामुळे माणसाने ‘अपोलो १७’ वेळी म्हणजे आजपासून जवळपास ५२ वर्षांपूर्वी इतक्या उंचीवर बाह्य अवकाशात प्रवास केला होता. तसेच अपोलो मोहीम ही ‘नासा’ या सरकारी संस्थेची मोहीम होती. तसेच अपोलो मोहिमेमध्ये अवकाश प्रवास करून आलेले सारे अवकाशयात्री हे गौरवर्णीय अमेरिकी पुरुष होते.

अपोलो मोहिमेनंतर तब्बल ५२ वर्षांनंतर Polaris Dawn या मोहिमेदरम्यान हे चार अवकाशयात्री पृथ्वीपासून १४०० किलोमीटर इतक्या उंचीवर जाऊन आले. अशा पद्धतीची इतक्या दूरच्या अंतराची ही पहिली खासगी अवकाश मोहीम ठरली आहे. आणि अधोरेखित करण्याजोगी बाब म्हणजे यासोबतच इतक्या उंचीवर प्रवास करणाऱ्या स्त्रिया म्हणून पायंडा सर्वप्रथम रचून सेरा आणि अॅना यांनी एक नवा प्रेरणादायी विक्रम रचला आहे.

या मोहिमेदरम्यान जवळपास ४० शास्त्रीय प्रयोग अवकाशात केले गेले. ‘स्पेस एक्स’ने तयार केलेल्या स्पेससूटची चाचणी करण्यासाठी मानवी इतिहासातही खासगी मोहिमेद्वारे पहिल्यांदाच ‘स्पेसवॉक’ आयोजित करण्यात आला. हा ‘स्पेसवॉक’ पारंपरिक पद्धतीचा नसून अवकाशयान बाहेर ‘स्पेससूट’ची लवचीकता आणि टिकावूपण तपासण्यासाठी आयोजित केलेला होता. त्यासाठी आयझॅकमन आणि सेरा या दोघांनी अवकाशयानाबाहेर जाऊन नियोजित चाचण्या केल्या. ते दोघेही ‘स्पेसवॉक’ करणारे पहिले सरकारेतर (खासगी) अवकाशयात्री ठरले. भविष्यातील चंद्र, मंगळ तसेच आंतरग्रहीय मोहिमांसाठी उपयुक्त ठरू शकणाऱ्या ‘स्टारलिंक लेझरबेस्ड कम्युनिकेशन सिस्टम’ची चाचणी या मोहिमेदरम्यान करण्यात आली. मानवी शरीरावर आणि आरोग्यावर या मोहिमांचा होणारा परिणाम अभ्यासणे हासुद्धा या मोहिमेचा एक महत्त्वाचा उद्देश आहे.

पृथ्वीच्या ‘एलईओ’ पलीकडे ‘व्हॅन अॅलन रेडिएशन बेल्ट’ हा एक मोठा किरणोत्सर्गी पट्टा आहे. चंद्र, मंगळ किंवा इतर कोणत्याही आंतरग्रहीय मोहिमेसाठी अवकाशयात्रींना या पट्ट्यातून प्रवास करावा लागतो. या पट्ट्याचा, तेथील किरणोत्सर्गाचा मानवी शरीरावर, आरोग्यावर होणारा परिणाम अभ्यासणे, हे या मोहिमेचे आणखी एक महत्त्वपूर्ण उद्दिष्ट होते. या किरणोत्सर्गी पट्ट्यातून प्रवास आखलेली ही पहिली खासगी मोहीम ठरली असून सेरा व अॅना या हा प्रवास करणाऱ्या इतिहासातील पहिल्या स्त्रिया ठरल्या आहेत. या साऱ्या प्रयोगांमधून मिळालेली माहिती ही केवळ खासगीच नव्हे तर एकूणच अवकाश मोहिमांसाठी महत्त्वपूर्ण असून साऱ्या अवकाश संस्था व वैज्ञानिक यांना त्याचा उपयोग होणार आहे. अॅना मेनन आणि सेरा गिलीस या दोघी जणी, त्यांचा प्रवास हा जगभरातील मुलींसाठी, स्त्रियांसाठी आणि स्वप्नं पाहणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. या क्षेत्रात काम करण्यासाठी त्यांना मिळालेली प्रेरणा आणि त्या प्रसंगामध्ये बरेच साधर्म्य आहे. अमेरिकेच्या चॅलेंजर मोहिमांमध्ये ‘चॅलेंजर स्पेस शटल’चे पायलट असणाऱ्या मायकेल स्मिथ यांची कन्या अॅलिसन स्मिथ या अॅना मेनन यांच्या शिक्षिका. वयाच्या अकराव्या वर्षी त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना ‘नासा’च्या ‘जॉन्सन स्पेस सेंटर’ येथे क्षेत्रभेटीसाठी नेलं. तिथे अवकाशयात्रींच्या आयुष्यातील एक दिवस अनुभवण्याची संधी अॅना यांना मिळाली आणि तत्क्षणी आपण याच क्षेत्रात काम करायचं असं त्यांनी ठरवलं. हायस्कूलमध्ये असताना सेरा यांना जो टॅनर या अवकाशयात्रीला भेटण्याची संधी मिळाली. संगीताची आराधना करणाऱ्या परिवारात जन्मलेल्या, वयाच्या दुसऱ्या वर्षांपासून व्हायोलिन वाजवायला शिकणाऱ्या सेराचा तोवर विज्ञान क्षेत्राकडे मुळीच कल नव्हता.

हेही वाचा : ‘भय’ भूती : भयाचा तप्त ज्वालामुखी

जो टॅनर यांची भेट त्यांच्यासाठी आयुष्य बदलणारी ठरली. आणि यांच्या मार्गदर्शनाखाली सेरा अवकाश विज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत झाल्या. पण लहानपणापासून केलेली संगीताची आराधना त्यांनी एका वेगळ्या पद्धतीने उपयोगात आणली. Polaris Dawn या मोहिमेदरम्यान त्यांनी अवकाशातून सोलो व्हायोलिन वादन केलं. यासाठी ‘स्टार वॉर’मधील रे थीम संगीत त्यांनी व्हायोलिनवर सादर केलं. रे हे ‘स्टार वॉर’मधील सेराचे आवडते पात्र आहे. जो टर्नर एक उत्कृष्ट अभियंता आणि प्रॉब्लेम सॉल्व्हर असून ती माझा आदर्श आहे.’’ असं सेरा म्हणतात. स्वत:च्या जोडीने जगभरातील मुलींना तिच्यासारखं होण्याची प्रेरणा देण्यासाठी त्यांनी संगीताची निवड केल्याचं त्या सांगतात. यासोबतच अवकाशात व्हायोलिन वाजवणाऱ्या त्या पहिल्या व्यक्ती ठरल्या आहेत. त्यांनी सादर केलेलं संगीत रेकॉर्ड करून ‘स्पेस एक्स’च्या ‘स्टारलिंक कम्युनिकेशन’ची चाचणी करण्यासाठी तो व्हिडीओ ग्राउंड स्टेशनला ‘लेजर बेस्ड कम्युनिकेशन’ वापरून पाठवण्यात आला.

अॅना मेनन आणि सेरा गिलीस यांचा प्रवास पाहिला की समान संधी उपलब्ध करून दिल्यावर स्त्रिया काय करू शकतात याची जाणीव होते. मानवाच्या स्वप्नांना, आकांक्षांना आणि यशाला कोणत्याही मर्यादा नाहीत हे समजते. आश्वासक समाज, पाठीशी उभा राहणारा परिवार आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची तुमची तयारी असेल तर जगात काहीच अशक्य नाही हे लक्षात येते. आपल्यातील कुतूहलाचा पाठपुरावा केला की तुम्ही कल्पनाही केली नसेल असे आविष्कार करू शकता यावरील विश्वास दृढ होतो. विज्ञान आणि अवकाश साऱ्यांचे व साऱ्यांसाठी आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित होते. मला खात्री आहे की त्यांच्या या प्रयत्नांतून आणि यशामुळे अधिकाधिक स्त्रियांसाठी या क्षेत्रांमध्ये संधींची दारं उघडतील. आणखी संधी उपलब्ध होतील.

यापुढे अॅना व सेरासारख्या प्रत्येक सक्षम स्त्री व व्यक्तीला त्यांचे ईप्सित साध्य करता यावं हीच आशा आणि सदिच्छा!

postcardsfromruchira@gmail.com

Story img Loader