स्त्रीला दुय्यम लेखून तिच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर उतरून विधानं करणारे पुरुष जगाच्या पाठीवर सगळीकडे आढळतात. राजकारणही त्याला अपवाद नाही. अगदी विकसित देशातलेही, अत्याधुनिक, श्रीमंती आयुष्य जगणारे उच्चभ्रू, उच्चशिक्षित, नामवंत मानले जाणारे राजकारणीही जेव्हा आपल्याच विरोधी पक्षातील किंवा स्वपक्षातील किंवा एकूणच स्त्रियांविषयी पूर्वग्रहदूषित विधानं करतात वा त्यांच्याविषयी शेलकी विशेषणं वापरतात तेव्हा स्त्रीविषयक दुय्यमत्व त्यांच्या मनात किती खोलवर रुजलंय याची कल्पना येते. ही विधानं प्रसिद्ध करणं योग्य वाटत नसूनही त्याचा परामर्ष घ्यायला हवा, यासाठीच हा लेख.

नुकत्याच अमेरिकेतील निवडणुका पार पडल्या. यात डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाला, ही बातमीही आता जुनी झाली. भारतातही निवडणुका होऊन आता निकालाचा माहोल आहेच. प्रत्येक देश-प्रदेश वेगळा, त्यामुळे तिथली राजकीय-सामाजिक संस्कृतीही वेगळी. तरीही सगळीकडेच एक गोष्ट मात्र समान आढळते. ती म्हणजे निवडणूक प्रचारांमध्ये स्त्रियांसंदर्भात केलेल्या शेलक्या भाषेतल्या टिप्पण्या.

Kangana Ranaut criticism that Priyanka Gandhi has no respect for democracy
प्रियंका गांधीना लोकशाहीचा आदर नाही,कंगना रानौतची टीका..
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Sharad Pawar Campaign, Wai-Khandala-Mahabaleshwar,
‘लाडक्या बहिणी’पेक्षा महिलांना संरक्षण हवे – शरद पवार
maharashtra assembly polls 2024 state economy in decline during bjp rule says chidambaram
भाजपच्या सत्ताकाळात महाराष्ट्राची पीछेहाट; माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची टीका
Maharashtra government schemes for women,
लाडक्या बहिणींनो, कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
woman voters chatura article
तू मात्र या फुकट योजनांच्या अमिषाला बळी पडू नकोस…
government that gives Rs 1500 as ladaki bahin is not doing favour to women
‘लाडक्या बहिणींनो’ कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
dcm devendra fadnavis in loksatta loksamvad
लोकसभेतील अपयशानंतर ‘भारत जोडो’सारख्या शक्तींवर मात; विधानसभेत प्रभाव नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

स्त्रियांनी राजकारणात उतरण्याला थोड्याबहुत प्रमाणात सगळीकडेच समाजमान्यता असली तरीही स्त्रीने सत्तापदावर येणं मात्र तितकंसं स्वागतार्ह नाही. मुळात एखाद्या स्त्रीने हिरिरीने पुरुषसत्ताक राजकारणात उतरणंच नवलाईचं मानलं जातं. हळूहळू मग ती नवलाई आणि कौतुक सरून स्त्रीद्वेष्ट्या, ‘सेक्सिस्ट’ अशा विधानांना, वादविवादांना, चर्चांना जवळपास प्रत्येकच स्त्री राजकारणी व्यक्तीला सामोरं जावं लागतं. आजच्या लेखात याच विषयाचा ढोबळमानाने हा आढावा.

हेही वाचा >>> पुरुषाचं घर, घरचा पुरुष

सध्याच्या अमेरिकेतील निवडणुकीचंच उदाहरण घ्यायचं झालं, तर डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी कमला हॅरिस यांच्यावर आणि समस्त स्त्रियांना उद्देशून अनेक आक्षेपार्ह विधानं केली. या विधानांवर भरपूर टीकाही झाली. उदाहरणार्थ, ट्रम्प यांना पाठिंबा देणारे अमेरिकी व्यावसायिक ग्रांट कार्डोन यांनी म्हटलं, ‘कमला हॅरिस आणि त्यांचे ‘पिंप हँडलर्स’ या देशाचं अतोनात नुकसान करतील.’ ‘काँझर्वेटिव्ह युथ ऑर्गनायझेशन’ या संस्थेने ट्रम्प यांच्या प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याचे संस्थापक चार्ली किर्क यांनी म्हटलं की, ‘ट्रम्प यांच्याविरोधात मतदान करणारे पुरुष हे पुरुष नाहीत.’ आणि हॅरिस यांना मत देणाऱ्या स्त्रिया या ‘त्यांच्या पुरुषांना कमी लेखणाऱ्या आहेत.’ ट्रम्प समर्थक वकील विल चेंबर्लीन यांनी ‘एक्स’वर लिहिलं, ‘कमला हॅरिस या स्वत: आई नाहीत, त्यामुळे त्यांना पालक आणि बालकांचे प्रश्न कळू शकणार नाहीत. त्यांच्या सावत्र मुलांची त्या आई असणं फारसं ग्राह्य धरण्यात अर्थ नाही.’

खरं तर अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांना मूलबाळ नव्हतं. त्याव्यतिरिक्त जेम्स मॅडिसन, अँर्ड्यू जॅक्सन, जेम्स पोलॉक आणि जेम्स ब्यूखानन या राष्ट्राध्यक्षांनादेखील मुलं नव्हती. राष्ट्राध्यक्ष वॉरन हार्डिंग यांना तर लग्नाशिवायच्या एका संबंधातून मुलगी झाली, जिची जबाबदारी त्यांनी सार्वजनिकरीत्या नाकारली होती. त्यामुळे हॅरिस यांच्या आयुष्याचा खरं तर इतका गवगवा होण्याची गरज नव्हती; परंतु ‘स्त्री म्हणजे अनंत काळची माता’ हा विचार फक्त भारतापुरता मर्यादित नाही. अत्यंत पुढारलेल्या देशांमध्येही याच धारणा मूळ धरून असतात. राजकीय पटलात जेव्हा एखादी स्त्री स्पर्धा करायला लागते, तेव्हा त्या अशा ओंगळवाण्या पद्धतीने पुन्हा पुन्हा वर येत राहातात.

याआधीही जे. डी. व्हॅन्स या रिपब्लिकन नेत्याने डेमोक्रॅटिक पक्षातील स्त्रियांना ‘चाइल्डलेस कॅट लेडीज’ असं संबोधलं, शिवाय डेमोक्रेटिक पक्षाचं भविष्यच आता मूलबाळ नसणाऱ्या लोकांच्या हातात असल्याचं म्हटलं होतं. इतकंच नाही तर ‘ज्या लोकांच्या स्वत :च्याच आयुष्याबाबतच्या निवडी एवढ्या खराब आहेत, ते काय लोकांच्या आयुष्याचं भलं करणार’, असा प्रश्नही विचारला. हे गृहस्थ अर्थातच गर्भपाताच्या आणि घटस्फोटाच्या विरोधात आहेत. त्यांनी असंही एक अजब विधान केलं होतं की, बालकांनाही त्यांच्या पालकांच्या देखरेखीखाली मतदानाचा अधिकार मिळावा. जेणेकरून, मुलं असलेल्या व्यक्तींना लोकशाहीमध्ये अधिक महत्त्वाचं स्थान मिळेल. या विधानांना सध्या तरी कोणी गांभीर्याने घेतलेलं नसलं तरी त्यामागची प्रेरणा ही अतिशय परंपरावादी आणि भेदभावमूलक आहे हे वेगळं सांगायला नको.

आताच्या निवडणुकीत ट्रम्प यांचं आणखी एक विधान गाजलं. ‘स्त्रियांना आवडो वा न आवडो. मी त्यांचं रक्षण करणार म्हणजे करणारच. मी स्त्रियांचा ‘प्रोटेक्टर’ (रक्षणकर्ता) आहे.’ आणखी एका सभेत त्यांनी हॅरिस यांच्यावर आरोप केला की, त्यांनी तरुण वयात ‘मॅक्डोनल्ड’मध्ये काम केलं होतं हा त्यांचा दावा खोटा आहे. त्यावर कोणी तरी प्रेक्षकांमधून ओरडलं, की ‘शी वर्क्ड ऑन द कॉर्नर’ (याचा अर्थ त्या तिथं वेश्या व्यवसाय करत असतील, असा आहे.) यावर ट्रम्प हसले आणि म्हणाले की, ‘हे सगळं प्रेक्षक म्हणत आहेत. मी नाही.’ हे सगळं बोलताना ट्रम्प यांनी अतिशयच ‘खेळीमेळीचा’ असा सूर लावला होता. म्हणजे अर्थातच त्यांच्या समर्थकांना ‘ते फक्त विनोद करत आहेत. ते ‘जोक’ म्हणूनच घ्या आणि सोडून द्या!’ असं म्हणायला वाव मिळत राहिला. अनेक स्त्रियांनी समाजमाध्यमांवरील या सगळ्या विधानांवर टीका केली, पण सत्ताधारी पुरुषांनी मात्र हे ‘विनोद’ करणं सोडलं नाही.

एक लक्षात घ्यायला हवं की, याच अमेरिकेत ट्रम्प यांच्याविरुद्ध लैंगिक छळवणुकीच्या अनेक तक्रारी दाखल झालेल्या होत्या. पण हे सगळं असूनसुद्धा त्यांचाच विजय झालेला आहे. ट्रम्प यांच्या राज्यात आता गर्भपातनिगडित कायदेही आणखी कडक होण्याची भीती व्यक्त केली जाते. त्यांचा स्त्रियांकडे बघण्याचा एकूणच दृष्टिकोन पाहिल्यास ही भीती रास्त वाटते.

हे सगळं फक्त पुरुषांनी केलेल्या ‘सेक्सिस्ट’ विधानांपुरतं मर्यादित राहत नाही. स्त्री राजकारण्यांकडे पाहण्याच्या या दूषित आणि एकांगी दृष्टिकोनाचा त्यांच्या कारकीर्दीवर परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ, २०२२ मध्ये फिनलंडच्या पंतप्रधान सना मरिन यांचा एका क्लबमधील नाचतानाचा व्हिडीओ ‘व्हायरल’ करण्यात आला. त्यानंतर त्या अमली पदार्थांचं सेवन करतात अशा वावड्या उठल्या. त्यांचं वागणं हे पंतप्रधानाच्या पदाला शोभेल असं नाही, अशीही चर्चा घडली. या अफवा इतक्या मोठ्या प्रमाणात पसरल्या की त्यांना शेवटी ‘ड्रग टेस्ट’ करावी लागली. त्यामध्ये त्या निर्दोष आढळल्या. याचदरम्यान त्यांचा घटस्फोटही झाला. सना या खरं तर फिनलँडमधल्याच नव्हे, तर जगातल्या सगळ्यात तरुण पंतप्रधान म्हणून ओळखल्या जातात. त्या सत्तेवर आल्या तेव्हा ३४ वर्षांच्या होत्या, आणि विशेषत: तरुणांचा आणि स्त्रियांचा त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा होता. परंतु २०२३ मधल्या निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षाचा पराभव झाला. यासाठीची बाकी आर्थिक आणि राजकीय कारणं काहीही असोत, पण त्यांच्यावरच्या या कथित आरोपांचा त्यांच्या सामाजिक प्रतिमेवर निश्चित परिणाम झाला.

न्यूझीलंडच्या माजी पंतप्रधान जसिंडा आर्डन यासुद्धा बहुचर्चित अशा तरुण स्त्री राजकारणी म्हणून ओळखल्या जातात. त्यांनीही त्यांच्या कारकीर्दीत सातत्याने अतिशय पूर्वग्रहदूषित अशा विधानांचा सामना केला, आणि त्या त्याला बऱ्यापैकी पुरूनही उरल्या. परंतु समाजमाध्यमांवर जेव्हा जेव्हा त्यांच्याविषयी चर्चा होत असे, तेव्हा तेव्हा त्यांच्या कारकीर्दीपेक्षा त्यांचं रूप, त्यांचं कुटुंब, मुलं यावरच चर्चा रंगत असे. त्यांना ‘ट्रोल’ केलं जाई, तेव्हा त्यांच्या कुटुंबालाही लक्ष्य केलं जात असे. त्यांना ट्विटरवर ‘सिंडी’ नाव पडलं होतं, हे टोपणनावही त्यांना अजिबातच मान्य नव्हतं. अशी अत्यंत गचाळ टोपणनावं पुरुषांना दिली जात नाहीत, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं होतं. त्या या सगळ्याला कंटाळल्या होत्या आणि त्यांनी ते तसं वेळोवेळी बोलूनही दाखवलं. त्यांनीही २०२३मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामागे अनेक राजकीय कारणं आहेतच. परंतु त्यांचा स्त्री राजकारणी म्हणून झालेला छळवाद हा महत्त्वाचा मुद्दा आहे.

जसिंडा आर्डन आणि सना मरिन यांनी एकदा एकत्र पत्रकार परिषद घेतली होती. त्यात एका पत्रकाराने विचारलं, ‘‘तुम्ही दोघी सारख्याच वयाच्या आहात आणि तुम्हाला एकसारखेच प्रश्न आहेत म्हणून तुम्ही भेटत आहात का?’’ त्यावर जसिंडा उत्तरल्या की, ‘‘आम्ही पंतप्रधान या नात्याने भेट घेत आहोत. तुम्ही (अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष) बराक ओबामा आणि जॉन की (न्यूझीलंडचे माजी पंतप्रधान) यांना असेच प्रश्न विचारले असते का?’’

स्त्रियांवरचे ताशेरे हे कधी कधी अत्यंत हीन पातळीवरदेखील जातात. कॅनडाच्या जस्टिन ट्रुडो यांच्या पक्षातील एक जण तिथल्या एका राजकारणी स्त्रीला म्हणाला, ‘तुम्ही थेट प्रश्न विचारले की मी उत्तेजित होतो.’ स्कॉटलंडच्या राजकारणी निकोला स्टर्जन यांना तिथल्याच एका राजकारण्याने म्हटलं की, ‘या स्त्रीने तिच्या तोंडासोबत तिचे पायही झाकून घ्यायला हवेत. म्हणजे ती आणखी प्रजनन करणार नाही.’ साऊथ आफ्रिकेतही संसदेत स्त्री राजकारण्यांना ‘वेश्या’ म्हटल्याचे प्रकार घडले आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यावरही ‘सेक्सिस्ट’ असल्याचा आरोप वारंवार होतो. त्यांच्या कारकीर्दीत गर्भपातविषयक कायदे कडक तर झालेच आहेत, शिवाय स्त्रियांना अधिकाधिक मुलं जन्माला घालायचं आवाहनही सतत केलं जातं. तिथले घरगुती हिंसाचाराविरोधातील कायदेही बऱ्यापैकी शिथिल करण्यात आलेले आहेत. हल्लीच त्यांनी स्त्रियांना ‘स्त्रीवादापेक्षा राष्ट्रवादाची कास धरा’, असा सल्ला दिला आहे. भारतातही काही स्त्री राजकारणीच स्त्रीवादावर प्रश्न उपस्थित करत असल्याचं आपण नुकतंच पाहिलं. अफगाणिस्तान, बांगलादेश, पाकिस्तान आणि भारतात स्त्री राजकारण्यांना कसं वागवलं जातं, यावर कदाचित वेगळा लेख होईल.

इथं आपण स्वत:लाही काही प्रश्न विचारायला हवेत. जेव्हा एखाद्या राजकारणी पुरुषाला घर-संसार अथवा मुलं नसतील तर त्याच्याकडे आपण कसे पाहतो? त्याला त्यासाठी कधी लक्ष्य केलं जातं का? शिव्या किंवा शेलकी विशेषणं वापरली जातात का? परंतु तेच एखादी स्त्री अशाच पद्धतीचं आयुष्य जगत असेल तर तिच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन काय असतो? स्त्रिया संसार किंवा मुलंबाळं यांच्याशिवाय यशस्वी आयुष्य घडवू शकतात यावर आपला विश्वास आहे का? एकूणच, लग्न केलं अथवा मुलं असली की आपण आपोआपच अधिक चांगली आणि नैतिक व्यक्ती होतो का? स्त्री राजकारण्यांना आपण आधी राजकारणी म्हणून बघतो की स्त्री म्हणून?… या सगळ्या प्रश्नांची उत्तरं वैयक्तिक परिघात जी काही असतील, तीच सामाजिक-राजकीय परिघात लागू होणार आहेत. स्त्री राजकारण्यांकडे बघण्याचा सार्वत्रिक दृष्टिकोनही त्यातूनच साकारणार आहे. gayatrilele0501@gmail.com