निरंजन मेढेकर

स्त्रियांना मासिक पाळीशी संबंधित कोणताही त्रास असेल, तर त्याचा मोठा परिणाम त्यांच्या एकूण कामजीवनावर होत असतो. त्यामुळे स्त्रियांची मासिक पाळी हा आता तरी ‘विटाळा’चा विषय न ठेवता त्याबाबत अधिक माहिती घेणं आणि गरज भासेल तिथे उपचारही घेणं आवश्यक आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

स्त्रियांसाठी दर महिन्याला न चुकता येणारा शरीरधर्म म्हणजे मासिक पाळी. पौगंडावस्थेतल्या पहिल्या ‘मेनार्की’ किंवा ऋतुमती होण्यापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत ३५-४० वर्ष पाळीचं ‘दुखणं’ बायका वागवत असतात. दुखणं यासाठी, कारण आजच्या एकविसाव्या शतकातही पाळीकडे उघडउघड किंवा पुढारलेपणाचा बुरखा पांघरत ‘विटाळ’ म्हणून बघण्याची बहुसंख्य लोकांची मानसिकता शाबूत आहे. त्यामुळे स्त्रीच्या कामेच्छेत, तसंच त्या जोडप्याच्या कामजीवनात कसे अडथळे निर्माण होतात, यावर चर्चा होणं दुरापास्त ठरतं. पण हा विषय ‘कामा’च्या अंगानं नाही, तर स्त्रियांच्या थेट आयुष्याशी, आरोग्याशी निगडित असल्यानं महत्त्वाचा ठरतो.

‘हेवी पिरियड्स’ची (पाळीदरम्यान अति रक्तस्त्राव) समस्या घेऊन आपल्याकडे आलेल्या एका जोडप्याविषयी सांगताना स्त्रीरोगतज्ज्ञ आणि सेक्स थेरपिस्ट डॉ. नीलिमा देशपांडे सांगतात, ‘‘दोन पाळींमध्ये कमी अंतर असणं, पाळी अनेक दिवस टिकणं, तसंच तीव्र रक्तस्राव, अशी या स्त्रीची समस्या होती. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांत त्यांच्यात एकदाही शरीरसंबंध आला नव्हता. या जोडप्यानं उपचार घेतल्यानं त्या स्त्रीची पाळी नियमित झाली, तसंच त्यांचं कामजीवनही सुधारलं. पण डॉक्टरांपर्यंत न पोहोचणाऱ्या हजारो स्त्रिया असतील, ज्यांना वैद्यकीय मदतीची गरज आहे. पाळी हे बाईला मिळालेलं दुखणं आहे आणि हा त्रास प्रत्येक बाईनं निमूट सहन करायचा असतो, यांसारखे समज खोडून काढण्याची नितांत आवश्यकता आहे.’’

हेही वाचा >>> मोडला नाही कणा..

पाळीचं चक्र हे सरासरी २८ दिवसांचं असून प्रत्येक स्त्रीगणिक यात पाच-सहा दिवसांची तफावत असू शकते. पण हे चक्र अनियमित होऊन पाळी लवकर यायला लागते आणि त्याला तीव्र रक्तस्रावाची जोड मिळते, तेव्हा त्या स्त्रीची गाठ अ‍ॅनिमिया वा रक्ताक्षयाशी पडते. डॉ. नीलिमा सांगतात, ‘‘पाळीदरम्यान तीव्र रक्तस्रावाची तक्रार घेऊन येणाऱ्या स्त्रियांमध्ये बऱ्याचदा त्या पतीला शरीरसुख देऊ शकत नाहीत याची बोच असते. या स्त्रियांमध्ये हमखास दिसणारी लक्षणं म्हणजे तीव्र स्वरूपाचा थकवा, अपुरी झोप, केसगळती आणि विसरभोळेपणा. आपल्या देशात २० टक्क्यांपेक्षा कमी स्त्रियांना स्वत:चं हिमोग्लोबिन माहिती असेल. रक्तक्षयामुळे जेव्हा जगण्यातलाच रस आटत चाललेला असतो अशा बाईला शरीरसंबंधांमध्ये किती रस असेल? त्यामुळेच मग पतीच्या दबावामुळे ती नाईलाजानं शय्यासोबत करते किंवा शक्य असेल तर शरीरसंबंधच टाळते.’’

पाळी आणि कामेच्छेतील चढउतार, यातील परस्परसंबंध उलगडताना स्त्रीरोगतज्ज्ञ आणि सेक्स काऊन्सिलर डॉ. मदन कांबळे सांगतात, ‘‘संकोच आणि हार्मोन्सची कमी झालेली पातळी, यांमुळे स्त्रीला पाळीदरम्यान कामेच्छा कमी असते. पाळीनंतर इस्ट्रोजेन हे हार्मोन वाढत जातं तशी कामेच्छेतही वाढ होते. पुढच्या पंधरवडय़ात ओव्ह्युलेशनपर्यंत कामेच्छा वाढत जाते. तर पाळीनंतर साधारण तीन आठवडय़ानंतर पुढील पाळीचे वेध सुरू होतात आणि कामेच्छा कमीकमी होत जाते.’’

पाळीमुळे होणाऱ्या पोटदुखी-कंबरदुखी, मूड स्विंग्ज यामुळे कामेच्छा कमी असते असा समज असला, तरी प्रत्यक्ष पाळीदरम्यान शरीरसंबंध ठेवावेत का, यावर मतमतांतरं आहेत. डॉ. वा. वा. भागवतलिखित ‘कामविज्ञान’ या पुस्तकात ‘पाळी सुरू असताना संभोग’ याविषयी ऊहापोह करताना नमूद करण्यात आलंय, की ‘पाळी सुरू असताना संभोग करू नये आणि पाळी चालू असताना स्त्रीला शिवूसुद्धा नये, असं पूर्वी मानत असत. आयुर्वेदातही ऋतुकाळात संभोग वज्र्य मानला आहे. मात्र पाळी चालू असताना संभोग केल्यास स्त्रीला किंवा पुरुषाला कोणताही त्रास होत नाही. ज्या स्त्रियांना पाळीच्या वेळेस पोटात दुखते, त्यांनी संभोगसुख घेतल्यास किंवा हस्तमैथुनानं कामसुख घेतल्यास, पाळीदरम्यानची पोटदुखी कमी होते, असं आढळले आहे.’

हेही वाचा >>> ‘जगी व्याधी नाही असा कोण आहे?’

पाळीदरम्यान संबंध ठेवायचे की नाही, याचा निर्णय त्या स्त्रीवर सोपवायला हवा, हे विशद करताना डॉ. विठ्ठल प्रभू लिखित ‘संपूर्ण कामविज्ञान’ या पुस्तकात विशद करण्यात आलंय, की मासिक पाळीदरम्यान संभोग केल्यामुळे कोणताही आजार उद्भवत नाही. तरीही स्त्रीला पाळीदरम्यान संभोग आवडत नसेल तर अजिबात करू नये. पोटदुखी, स्राव, अस्वस्थता या कारणांमुळे स्त्रीला अशा काळात शरीरसंबंध पसंत नसतो. पाळीदरम्यान संबंध ठेवायचे झाल्यास जंतूसंसर्ग होऊ नये, याची खबरदारी घ्यायलाच हवी, हा मुद्दा अधोरेखित करताना स्त्रीरोगतज्ज्ञ आणि सेक्स थेरपिस्ट

डॉ. मंदार देशपांडे सांगतात, ‘‘पाळीदरम्यान संबंध ठेवले तर चालू शकतात, पण जोडीदारापैकी एकाला कुठलाही लैंगिक आजार असल्यास त्याचा दुसऱ्याला संसर्ग होण्याची शक्यता या काळात अधिक असते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या काळात समागम करताना पुरुषांनी कंडोम वा निरोध वापरायलाच हवा.’’

 पाळीच्या वेळी होणारी पोटदुखी, कंबरदुखी समागमामुळे खरंच कमी होऊ शकते का, हे उलगडताना यॉर्क हेलेने लिखित ‘Period sex: Exploring the depths of desire during your cycle’ या पुस्तकात नमूद करण्यात आलंय, की एन्डॉर्फिन हे न्यूरोकेमिकल नैसर्गिक वेदनाशमनाचं काम करतं. शरीरसंबंधांदरम्यान एन्डॉर्फिन स्रवत असल्यानं पाळीदरम्यान भेडसावणाऱ्या अंगदुखीवर आराम मिळू शकतो. समागमातील शारीरिक हालचाली आणि भावनावेगामुळे स्नायू मोकळे होण्यास मदत होते. यात ओटीपोट आणि योनीमार्गाचाही समावेश असतो. त्यामुळे पाळीदरम्यान पेटके ( क्रॅम्प्स्) येण्याची समस्या असेल तर त्याची तीव्रता कमी होऊ शकते. संबंधांदरम्यान जननेंद्रियांना रक्तपुरवठा अधिक होत असल्यानंही पाळीचा त्रास कमी होण्यास मदत होते.  पाळीमुळे केवळ शारीरिक नाही, तर संप्रेरकांच्या पातळीतील बदलांमुळे मानसिक स्थित्यंतरांनाही स्त्रियांना सामोरं जावं लागतं. या मूड स्विंग्जवरही पाळीतील समागम हा उपाय ठरू शकतो. याचं कारण संबंधांदरम्यान ऑक्सिटोसिन हे ‘लव्ह हार्मोन’देखील स्रवत असतं. थोडक्यात, पाळीदरम्यान येणारा मानसिक थकवा, ताण हा यामुळे दूर होण्यास मदत होते, असा दावा या पुस्तकात करण्यात आलाय.

हेही वाचा >>> ग्रासरूट फेमिनिझम : ‘अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात..’

चाळिशीच्या आसपास अनेक स्त्रियांना पाळीच्या समस्या भेडसावायला लागतात, असं निरीक्षण नोंदवत स्त्रीरोगतज्ज्ञ आणि वंध्यत्त्वतज्ज्ञ डॉ. शिल्पा चिटणीस जोशी सांगतात, ‘‘पाळीच्या समस्यांसाठी आलेल्या चाळिशीच्या स्त्रियांना नवऱ्याबरोबर शेवटचा संबंध केव्हा आला होता, असं विचारल्यावर ‘तसं तर आता आमच्यात काही राहिलं नाहीये,’ असं त्या अगदी सहज सांगतात. निरामय कामजीवन हे वैवाहिक नात्यात महत्त्वाची भूमिका बजावतं हे स्त्रियांनी समजून घ्यायला हवं.’’

पाळीच्या समस्यांमागील कारणांचा उलगडा करताना डॉ. शिल्पा सांगतात, ‘‘पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डिसीज (पीसीओडी) तसंच वाढलेलं वजन, ही कारणं बऱ्याचदा पाळीच्या समस्यांना कारणीभूत असतात. रुग्णांमध्ये लठ्ठपणाचं प्रमाण मोठय़ा प्रमाणात असल्याचं आढळून येतं. पाळीच्या समस्यांमध्ये तीव्र रक्तस्राव, वेदना, याबरोबरच भावनिक आंदोलनांसारखी मानसिक लक्षणंही असतात. याचा थेट परिणाम कामजीवनावर होतो. बऱ्याचदा पाळीच्या समस्या या लग्नाआधीपासून असतात. पण काही झालं तरी शक्यतो डॉक्टरांकडे जायचं नाही, होईल तोवर दुखणं अंगावर काढायचं, अशी अनेक स्त्रियांची मानसिकता असते.

हार्मोन्सशी संबंधित गोळय़ा घेऊ नयेत, असा समज असल्यामुळे उपचार घेण्याचं टाळलं जातं. वास्तविक पाळीच्या समस्यांवर वेळीच उपचार घेणं उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असतं.’’

चाळिशीच्या आसपास पाळी अनियमित झाली तर ही रजोनिवृत्तीची लक्षणं असतील, अशा परस्पर निष्कर्षांवर न येण्याचा सल्लाही डॉ. शिल्पा देतात. ‘‘चाळिशीच्या सुरुवातीला पाळी गेली तर या स्थितीला ‘प्रीमॅच्युअल मेनोपॉज’ म्हणतात. रजोनिवृत्तीचं सरासरी वय हे ४८-४९ आहे. चाळिशीच्या सुरुवातीलाच पाळी गेली, तर त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. तसंच हाडं ठिसूळ होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे कोणत्याही वयात पाळीच्या समस्यांचं योग्य निदान आणि उपचार आवश्यक ठरतात.’’

हेही वाचा >>> मला घडवणारा शिक्षक : ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाचे गर्गे सर

पाळीनंतर साधारण दोन आठवडय़ांनी ओव्ह्युलेशनची प्रक्रिया होते. त्यामुळे पाळीदरम्यान संबंध ठेवल्यास गर्भधारणा राहत नाही, असा समज असला तरी काही ठरावीक परिस्थितीमध्ये गर्भधारणा राहू शकते, असं महत्त्वाचं निरीक्षण डॉ. सारा मिली लिखित ‘Sex during period’ या पुस्तकात नोंदवण्यात आलंय.  पाळीच्या समस्यांवरील उपचारांविषयी डॉ. मंदार सांगतात, ‘‘पाळीच्या समस्येचं योग्य निदान करणं गरजेचं असतं. काही वेळा सोनोग्राफी करून गर्भाशयात काही समस्या नाहीये ना, हे तपासावं लागतं. साध्या औषधोपचारांनी, गर्भनिरोधक गोळय़ांनी पाळीचं चक्र नियमित करता येतं. बऱ्याचदा ग्रामीण भागात ‘पाळीदरम्यान त्रास होतोय’ या एका कारणामुळे अगदी पंचविशी-तिशीतच गर्भाशय काढून टाकण्याच्या घटनाही झाल्या आहेत. हे अत्यंत चुकीचं आहे.

लग्न झाल्यावर सुरुवातीला गर्भधारणा राहण्याची किंवा राहात नसल्याची चिंता असल्यानं स्त्रियांना कामजीवनाचा आनंद घेता येत नाही. तर पस्तिशीनंतर कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण झाल्यावर सहजीवनावर लक्ष द्यायची त्यांची इच्छा असते. अशा वेळी पाळीच्या समस्या उद्भवल्यास मनस्ताप होतो. तो टाळण्यासाठी वेळीच उपचार घ्यायला हवेत.’’

पाळीमध्ये समस्या असतील तर आरोग्याची घडी विस्कटल्याची शरीरानं दिलेली ती सूचना आहे, हे स्त्रियांनी समजून घ्यायला हवं. तसंच पाळीमधलं कामजीवन हा आजही काळापुढचा विषय भासत असला, तरी याची सुरुवात पाळीला सकारात्मकपणे स्वीकारण्यातून होऊ शकते.

niranjan@soundsgreat.in

Story img Loader