नातं कुठलंही असो, सासू-सून, पती पत्नी, जोडीदार, बॉससाहाय्यक, पालकमुलं किंवा मित्र/मैत्रिणी, जेव्हा नात्यात काहीतरी टोकाचं बिनसतं, तेव्हा गृहीत धरल्याचं, कुणी समजून घेत नसल्याचं दुखावलेपण आणि हे आपण बदलू शकत नाही याची असाहाय्यता सर्वांची सारखीच असते. एका बड्या कंपनीत उच्च पदावर असणाऱ्या शिवानीला आपल्या ‘बॉसी’ स्वभावामुळे सहकाऱ्यांवर होणाऱ्या मानसिक परिणामांची पुरेपूर जाणीव होत गेली आणि…

‘‘माझ्या पंधरा वर्षांच्या मुलीशी कसं वागावं ते कळतच नाहीये मला. तिला हल्ली माझं अजिबात पटेनासं झालंय. साध्या साध्या गोष्टींवरून अंगावर येते, भांडते. त्यात भर म्हणजे सासूबाई म्हणतात, ‘तू मुलीला लाडावून ठेवलंयस. स्वयंपाकघरात फिरकत नाही, घरभर पसारा करून ठेवते, बोललं की उलटून उत्तरं देते. तिलाही तिच्या वडिलांसारखाच गरीब स्वभावाचा नवरा बघ बाई. तरच निभेल तिचं.’ मुलीच्या निमित्ताने सासू मलाही टोमणे मारते. खरं तर घराला महत्त्व देऊन मी मुलीच्या जन्माच्या वेळी नोकरी सोडून पूर्णवेळ गृहिणी झाले, तरीही…’’

sandha badaltana manprasthashram
सांधा बदलताना : मन:प्रस्थाश्रम
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
people with personality disorder
स्वभाव, विभाव : खुदी से इश्क किया रे…
woman in prison
स्त्री ‘वि’श्व : गजाआडच्या स्त्रियांचं जग
Solutions to achieve educational goals by inculcating interest in learning
सांदीत सापडलेले…!: उपाय
mazhi maitrin
माझी मैत्रीण: फासला दोनों से मिटाया ना गया…
Diwali, lamp Diwali, Diwali 2024, Diwali latest news,
दीपज्योतिर्नमोऽस्तुते।
Tara Bhawalkar, Tara Bhawalkar latest news,
‘‘शिक्षणाच्या जोडीने शहाणपणही यावं’’

कार्यशाळेतल्या दहा-बारा जणांच्या गटातली नंदिनी वरच्या पट्टीत मोठमोठ्याने आपली कहाणी सांगत होती. तिच्या किरकिऱ्या आवाजामुळे आर अँड डी प्रोजेक्ट मॅनेजर असलेल्या शिवानीचं त्या ऐकण्यातून लक्षच उडालं. तिच्यासारख्या ‘टेक्निकल’ व्यक्तीला मनाच्या क्रियाप्रक्रियेबद्दलच्या या कार्यशाळेत सहभागी होण्याची गरजच वाटत नव्हती. मनाविरुद्ध इथे येऊन इतरांच्या कटकटी ऐकायची जबरदस्ती का?

हेही वाचा >>> सांधा बदलताना : मन:प्रस्थाश्रम

शिवानीचं काम हेच पॅशन होतं. स्वत: परफेक्शनिस्ट आणि इतरांकडूनही तशीच अपेक्षा करणारी. पण त्यामुळे अनेकदा सहकाऱ्यांशी तिचे वाद व्हायचे. गेल्या आठवड्यात एका ज्येष्ठ सहकाऱ्याबरोबर जरा जास्तच मतभेद झाले होते. प्रशिक्षणार्थीच्याही तक्रारी वरिष्ठ व्यवस्थापक रावेतकरांपर्यंत गेल्या होत्या. रावेतकरसर तिचे मेंटॉर होते. या कंपनीत आल्या आल्या पहिल्याच प्रकल्पामध्ये ती त्यांची कनिष्ठ सहकारी होती, ते तिला ‘डायनामिक रॉ टॅलेंट’ म्हणायचे. तिचे गुण ओळखून ते जबाबदाऱ्या देत गेले, त्यामुळेच लहान वयात ती व्यवस्थापक पदापर्यंत पोहोचली होती. काही दिवसांपूर्वी तिला बोलवून त्यांनी सांगितलं होतं, ‘‘शिवानी, तू कंपनीसाठी एक ‘अॅसेट’आहेस. तुझी कामातली बांधिलकी, प्रामाणिकपणा, हुशारी मला माहीत आहे, पण तुझ्यावर लोक इतके नाखूश असतील तर तुला त्याकडे जाणीवपूर्वक पाहायला हवं. मनातल्या क्रियाप्रकियांबद्दल स्पष्टता देणाऱ्या एका कार्यशाळेसाठी मी तुला कंपनीतर्फे पाठवतो. तुझ्यात आणि इतरांच्यात नेमकं काय घडतंय हे त्यानंतर तुझं तुलाच उलगडेल.’’ त्यांनी सांगितल्याप्रमाणे नाइलाजाने ती आज या कार्यशाळेमध्ये सहभागी झाली होती.

विविध वयांच्या, विविध क्षेत्रातल्या, पूर्णपणे अनोळखी अशा दहा-बारा स्त्री-पुरुषांचा तो गट होता. एकेकाने आपल्या मनात अडकून बसलेला विचार, छळणारा एखादा अनुभव जाहीरपणे शेअर करायचा आणि ते ऐकल्यानंतर त्या प्रसंगाबद्दल, सांगणाऱ्याबद्दल बाकीच्यांनी विनासंकोच आपली मतं व्यक्त करायची होती. बाहेरच्या जगात औपचारिकपणे वागावं लागतं, पण इथे मोकळेपणाने वागण्याचा आग्रह होता. फटकळ, बिनधास्त कॉमेंट्स आल्यावर कोण, कशी प्रतिक्रिया देतो तेही सगळे बघत होते. एखादया मवाळपणे वागणाऱ्याला, ‘तू इतकं का ऐकून घेतोस? असंही विचारत होते किंवा अति बोलणाऱ्याला ‘थांब की, किती फूटेज खाणारेस?’ असंही विचारत होते. संवादाला विषयांचं बंधन नव्हतं. चांगले-वाईट अनुभव, एखाद्या सिनेमातला, कादंबरीतला प्रसंग… आठवणी शेअर होत त्यातून चर्चा पुढे जात होती. राघवच्या, त्यांच्या फॅसिलिटेटर-गाईडने विचारलेल्या एखाद्या नेमक्या प्रश्नामुळेही लोकांना साक्षात्कार झाल्यासारखा वेगळा दृष्टिकोन मिळायचा. स्वत:च्या मनात डोकवायला दिशा मिळायची.

एकच अनुभव सर्वांनी एकाच वेळी ऐकलेला असूनही प्रत्येकाची प्रतिक्रिया कितीही वेगवेगळी असू शकते, हे लक्षात आल्यामुळे शिवानीदेखील मधूनमधून मतं मांडत होती, शेअर करत होती. पण तरीही एकीकडे तिच्या मनात, आपल्यात काहीतरी दोष आहे म्हणून ‘सुधारायला’ किंवा शिक्षा म्हणूनच इथे पाठवलंय, अशी फुणफुणही चालू होती. त्या पार्श्वभूमीवर गटातल्या नंदिताने स्वत:च्या सासू, मुलीबद्दलची कटकट सुरू केल्यावर बोअर होऊन शिवानीनं ऐकणंच बंद केलं आणि नेमकं तेव्हाच, ‘यावर तुला काय वाटतं शिवानी?’ असं राघवने विचारलं. अर्थातच तिनं काहीतरी थातुरमातुर उत्तर दिलं.

‘‘तुझं लक्ष नाहीये शिवानी, आधीच्या लोकांसाठी तू अधूनमधून तुझी मतं व्यक्त करत होतीस, पण नंदिताचं बोलणं मात्र तू अर्धवट ऐकतेयस. कुणीतरी तुमच्यासमोर आपलं मन उघडं करतंय आणि तुम्ही नीट ऐकून घेण्याएवढीही किंमत त्याला देऊ शकत नाही? एवढा अॅटिट्यूड?’’ राघवच्या नजरेतून काहीच सुटलं नव्हतं. ‘‘मला बोअर होतात घरगुती तक्रारी.’’ शिवानी शरमली, राघवचा रागही आला.

‘‘याचा अर्थ, तुझ्या मनात गृहिणींबद्दल आदर नाहीये. तू स्वत:ला त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ समजतेस.’’

‘‘तसं नाही, मला असले विषयच आवडत नाहीत.’’ तिने वाद टाळायचा प्रयत्न केला.

‘‘घरगुती तक्रारी म्हणजे तुला वेळ वाया घालवल्यासारखं वाटतं? ’’ आपल्या मनातलं न बोललेलं वाक्य याला नेमकं कसं कळलं? याचं नवल मिटेपर्यंत राघव म्हणाला, ‘‘ माणसं समजून घ्यायची असतील तर आवडनिवड कसली? सर्वांचं ‘ऐकता’ यायला हवं. शब्दांच्या पलीकडच्या अव्यक्त भावना देखील ऐकू येतात. नंदिताची वरच्या पट्टीतली बडबड मनाने तिच्या जागी जाऊन ऐकलीत का तुम्ही? तिनं घरासाठी करिअरशी तडजोड केलीय. एवढी वर्षं प्रत्येकाच्या आनंदासाठी धडपडतेय. त्याची जाणीवही न ठेवता तिला त्यांच्याचकडून ऐकवलं जातं. त्यामुळे तिला सारं ‘निरर्थक वाटतं’. त्यावर काहीच करता येत नाही म्हणून ‘असाहाय्य’ वाटतं. या भावना ऐकू आल्या का तुम्हाला?’ आपण न बोललेले शब्द आणि भावना राघवने इतक्या नेमक्या सांगितल्यावर नंदिताचे तर डोळेच भरून आले. भावना आणि विचारांना वेगळं करून पाहण्याची ही दृष्टी सर्वांसाठी नवीन होती. शिवानीलाही उत्सुकता वाटली.

नंदिता म्हणाली, ‘‘पंधरा वर्षं झाली. मी घरासाठी कितीही केलं तरी, सासू सदैव नाराज. नवऱ्याला ते कळलं तरी तो आईला काही न बोलता मलाच बोलतो, म्हणून आमच्यात सदैव भांडणं.’’ आता शिवानीला तिचं ‘दुखावलेपण’ आणि ‘सदैव’ असंच घडणार याची ‘निराशा’ या भावना स्पष्ट ‘ऐकू’ आल्या. तिच्या मनात आलं, आपण कंपनीच्या कामासाठीच जीव टाकत असताना आपल्याला ‘सुधारण्यासाठी’ इथे पाठवलं गेलं, तेव्हा आपल्यालाही अस्संच निरर्थक वाटलं, दुखावले गेलो की आपण. सहकाऱ्यांकडून अपेक्षाभंग झाल्यावर आपलाही आवाज नंदितासारखा होत असणार. संदर्भ वेगळे, पण मनातल्या दुखऱ्या भावनांमध्ये किती साम्य!

आता रोहन शेअरिंगसाठी उभा राहिला होता. ‘‘माझ्या जुन्या वळणाच्या वडिलांचा परजातीय गर्लफ्रेंडशी लग्नाला विरोध आहे आणि त्यांच्या होकाराशिवाय तिच्या घरचे लग्न करू देत नाहीयेत.’’ रोहन डोळ्यात पाणी येऊ देत नसला तरी त्याच्या मनातली असाहाय्यता, घुसमट आता तिला ऐकू आली. तिच्याही ब्रेकअपचं कारण हेच होतं. ती रोहनच्या भावनेशी जोडली गेली. तर ‘रोहनचं शेअरिंग ऐकून मला माझ्या मुलाची आठवण आली. आम्ही गेल्या वर्षभरात एकमेकांशी बोललेलो नाही,’ असं पन्नाशीच्या अरविंदने भरल्या आवाजात सांगितलं. त्याच्यानंतर बोलणारी सुप्रिया, ‘‘मला लहान बाळ असूनही माझी बॉस जराही सवलत देत नाही,’’ असं ‘अगतिकपणे’ सांगत होती, तेव्हा तर ती आपल्याबद्दलच तक्रार करतेय असं शिवानीला वाटलं. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असली तरी भावना एकमेकांशी उलटसुलट कुठे ना कुठे जुळत होत्या, आपलेपणाचा एक बंध-‘बॉन्डिंग’ बनत होतं. गुंतत असूनही उलगडत होतं…

तरीही शिवानीच्या मनातली जुन्या प्रश्नांची भुणभुण चालू होतीच. ‘वैयक्तिक अडचणी प्रत्येकालाच आणि कायमच असतात. त्यांचं किती भांडवल करायचं? कामाशी बांधिलकी सर्वांत महत्त्वाची नको का? आपले सहकारी एवढे शिकलेले असूनही किती क्षुल्लक चुका करतात? काम नीट केलं नाही तरी बोलायचं नसेल, तर मी मॅनेजर कशासाठी आहे? कधी कधी त्यासाठी कठोरपणे बोलणं अशी शिक्षा मिळण्याइतकं चुकीचं कसं?’

तेवढ्यात तिलाच उत्तर दिल्यासारखा राघव कुणाच्या तरी प्रश्नावर म्हणाला, ‘‘चूक-बरोबर, चांगलं-वाईट अशा कप्प्यात गोष्टी टाकल्यामुळे किंवा इतरांनी आपली बाजू घेण्या न घेण्यामुळे वस्तुस्थितीत काहीच फरक पडत नाही. आपल्या मते ‘बरोबर’ वागलो असलो, तरी त्यामुळे ‘परिणाम काय झाला?’ हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. ‘नेहमी खरे बोलावे’ हे खरंच, पण एखाद्या अत्यवस्थ रुग्णाला, ‘आता तू थोड्याच वेळाचा सोबती आहेस’ हे सत्य सांगणं योग्य असेल का? तसंच आहे. ‘योग्य वागणं’ हे तेव्हाच्या परिस्थितीवर आणि परिणामावर ठरतं, कुणाच्या मतावर नाही.’’

शिवानीला आता स्पष्ट होत होतं. नातं कुठलंही असो, सासू-सून, पती-पत्नी, जोडीदार, बॉस-साहाय्यक, पालक-मुलं किंवा मित्र/मैत्रिणी असतील, काहीतरी बिनसतं, तेव्हा अन्याय झाल्याचं, गृहीत धरल्याचं, जवळची व्यक्ती समजून घेत नसल्याचं दुखावलेपण आणि हे आपण बदलू शकत नाही याची असाहाय्यता सर्वांची सारखीच असते. आता तिला बायकी-पुरुषी, सासू-सून, ऑफिसचं-घरगुती, लहान-मोठे, गरीब-श्रीमंत असा काही फरकच वाटेना. घरगुती तक्रारी न करणाऱ्या आपण स्वत:ला त्यांच्यापेक्षा ‘वेगळं’ म्हणजे ‘भारी’ समजतो हे देखील आता तिने मनातल्या मनात मान्य केलं. मात्र दोन्ही बाजूंची देवाणघेवाण दिसल्यावर तिला नवेच प्रश्न पडायला लागले होते.

हुशारी, बांधिलकी, जबाबदारी किंवा अनुभव अशा कुठल्याही बाबतीत इतरांपेक्षा आपण स्वत:ला श्रेष्ठ समजतो का? काही बाबतीत इतरांपेक्षा थोडे पुढे असल्याच्या जिवावर आपल्याला जे कमी वाटतात ‘त्यांच्या’कडे दुर्लक्ष / अनादर / अपमान करणं हा आपला हक्क वाटतो की काय आपल्याला? आणि म्हणून लोक आपल्यावर नाराज असतात का? आपला मुद्दा बरोबर असल्यावर इतरांशी कसंही वागण्याचा अधिकार कसा गृहीत धरतो आपण? त्यातून सहकारी दुखावतात, संबंध बिघडतात पण त्यात आपल्याला आपली जबाबदारी मान्यच नसते, कारण आपली बांधिलकी त्यांच्यापेक्षा जास्त आहे असं वाटतं का आपल्याला? पण प्रत्येकाची बांधिलकी, बुद्धी वगैरे वगैरे आपल्या अपेक्षेप्रमाणे असलीच पाहिजे हे कुठून येतं? आपल्या अपेक्षा आणि ठाम गृहीतकांच्या नादात भावनांची काय देवाणघेवाण होते त्याकडे आपण दुर्लक्ष करतो, की आपल्या अपेक्षाभंग आणि रागापुढे त्यांच्या भावनांचं महत्त्व नसतं? शिवानीच्या प्रश्नांनी वेग पकडला होता. समोर चाललेल्या शेअरिंग आणि चर्चेची मदत होत होती. रावेतकर सर म्हणाले तशी, मनाच्या क्रिया-प्रक्रिया आणि वागणं याबद्दलची जाणीव जागी होत होती. फक्त ऑफिसमधले सहकारीच नव्हे, तर घरातले लोक, मित्र-मैत्रिणींशी संबंध बिघडले, तेव्हा नेमकं काय घडत असणार हेही तिला उलगडत चाललं होतं. भावनांची पातळी कमी जास्त असू शकते, पण सर्वांच्या भावना सारख्याच असतात, हे तिला स्वच्छ कळलं होतं. टेक्निकल अभ्यासासोबतच भावनांची जाणही शिकता यायला हवी होती, असंही पहिल्यांदाच वाटलं तिला.

चहाच्या ब्रेकसाठी बाहेर आल्यावर शिवानीनं रावेतकर सरांना ‘थँक यू सर’च्या मेसेजसोबत एक स्माईली टाकला आणि समोरून येणाऱ्या राघवकडे पाहून ती स्वच्छ मोकळं हसली. आता तिच्या मनात कुणाबद्दलच नाराजी, आकस, तक्रार शिल्लक नव्हती.

neelima.kirane1@gmail.com

Story img Loader