रुचिरा सावंत postcardsfromruchira@gmail.com

शाश्वत शेती करता यावी तसेच मातीचा कस वाढवावा यासाठी  संदीपा कानिटकर यांनी अनेक प्रयोग केलेच, पण प्रयोगशाळेत विकसित केलेल्या आपल्या उत्पादनाला अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या उद्योजिकाही झाल्या. त्यांनी शेतीसंदर्भात मांडलेला दृष्टिकोन आणि त्यांचं संशोधन जाणून घेण्याजोगंच. त्यांच्याविषयी..

article about upsc exam preparation guidance
यूपीएससीची तयारी : CSAT ची तयारी
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Beed Sarpanch Murder Case Prime Accused Valmik Karad Cast
अग्रलेख : कूच बिहार!
Mahakumbh First Amrit Snan on makar Sankranti
महाकुंभातील पहिल्या अमृतस्नानाचं महत्त्व काय? मकर संक्रांतीच्या दिवशीच याचे आयोजन का केले जाते?
grand alliance government accelerate the shaktipeeth highway work after election victory
निवडणुकीत प्रचंड बहुमत… आता महायुती सरकारकडून शक्तिपीठ महामार्गाला गती?
what is the genome india project why it matters
विश्लेषण : जिनोमइंडिया प्रकल्प भारतासाठी किती महत्त्वाचा?
how to use data science properly how to learn data science
कृत्रिम प्रज्ञेच्या प्रांगणात : डेटा सायन्स
portfolio, investment , Alphaportfolio Concept ,
चला अल्फापोर्टफोलिओ तयार करूया

बालपणी कुटुंबातल्या सदस्यांबरोबर केलेल्या निसर्गाच्या सान्निध्यातल्या सहली, तिथल्या झाडाझुडपांबरोबर घालवलेला वेळ, यादरम्यान पडलेले प्रश्न, त्यांची उत्तरं शोधण्यासाठीची धडपड आणि मार्गदर्शन करायला सोबतीला असलेले घरातलेच कुणीतरी हक्काचे सदस्य.. अशा वातावरणामुळे निसर्गाविषयी प्रेम आणि विश्वासंबंधी अनेक प्रश्न निर्माण होऊन विज्ञानाचा ध्यास घेण्यासाठी मिळालेलं प्रोत्साहन आणि पुढे रिचर्ड फाइनमनसारख्या अनेक वैज्ञानिकांच्या ऐकलेल्या कथा यामुळे अनेकांच्या मनात विज्ञान आणि निसर्गाची लहानपणीच रुजलेली आवड, त्या दिवशी संदीपा कानिटकर यांच्या विज्ञानप्रेमाचा प्रवास जाणून घेताना  ऐकलेला हा विज्ञानप्रेम रुजवणारा भूतकाळ मला पुन्हा पुन्हा आठवत राहिला.

सत्तरीच्या दशकात संदीपा आणि त्यांच्यासारख्याच लहान भावंडांचा चमू पुण्यातल्या हनुमान टेकडीवर अशीच पर्यावरणस्नेही सहल करण्यासाठी उत्साहात असायचा. तिथल्या विविध झाडाझुडपांची ओळख करून घेण्यासाठी कायम उत्सुक असायचा. त्यांच्या या गटाचं नेतृत्व करायचे त्यांचे मामा- डॉ. चंद्रकांत देशपांडे. त्यांचा वनस्पतीशास्त्राचा गाढा अभ्यास होता. प्रभात रोडच्या फिल्म इन्स्टिटय़ूटपासून ही सहल सुरू व्हायची. आपल्याबरोबरच्या या मुलांना ते वेगवेगळी झाडं, त्यांचे गुणधर्म, त्यांची नावं ही माहिती पुरवत असताना निरीक्षण करण्यासाठी प्रोत्साहन द्यायचे. या सहलींच्या माध्यमातून त्यांनी या मुलांना निसर्गाकडे बघण्याची एक आगळीवेगळी दृष्टी दिली. त्यांना निसर्गाचा नाद गवसावा यासाठी ते प्रयत्नरत होते. संदीपा यांचे सैन्यात असलेले वडील सुरेश इनामदारसुद्धा मोकळय़ा वेळेत बागकामात रमायचे. बागकामाची ही आवड संदीपा यांनीही स्वीकारली. आपल्या छोटय़ाशा बागेत आणि हनुमान टेकडीवरच्या त्या सहलीत त्या रमू लागल्या. हे अनुभव पुन्हा पुन्हा यावेत यासाठी त्या वाट पाहू लागल्या. शहरातल्या वास्तव्यामध्ये त्यांना गावाकडच्या आयुष्याविषयी गोडी वाटू लागली. कुणाची स्वत:ची शेती आहे असं समजलं, की त्याविषयी अधिक जाणून घ्यायला त्या कान टवकारू लागल्या. जगाच्या पाठीवर कुठल्याही भागातली शेती करणारी माणसं त्यांना केवळ आवडतच नव्हती, तर आता ती त्यांना आपल्या ‘ट्राइब’ची वाटू लागली होती. यात त्यांच्या मामांचा आणि वडिलांचा महत्त्वाचा  वाटा होता.

करिअर हा शब्द समजू लागला होता, तेव्हापासून आपण बालरोगतज्ज्ञ व्हायचं असं त्यांनी ठरवलं होतं. पण नेमका एक गुणानं

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातला प्रवेश हुकला आणि एकूणच सजीवांविषयी प्रचंड कुतूहल असल्यामुळे सूक्ष्मजीवशास्त्राचा अभ्यास करण्याच्या निर्णयावर त्यांनी शिक्कामोर्तब केलं. सूक्ष्मजीवशास्त्र म्हणजे केवळ एक ठरावीक अभ्यास नाही, तर ते अभ्यासासाठी काहीतरी वेगळं करू शकण्यासाठीचं एक प्रचंड मोठं दालन आहे. सूक्ष्मजीव कुठे नाहीत? ते सगळीकडेच असतात. मातीत असतात, पाण्यात असतात, तसेच हवेत आणि वातावरणातसुद्धा असतात.

संदीपा यांच्या बाबतीत आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे त्यांना जीवनाविषयी असणाऱ्या कुतूहलाला तंत्रज्ञानावरच्या विश्वासाची जोड होती. केवळ प्रयोगशाळेत सजीवांसंदर्भातलं रहस्य उलगडण्यासाठी आयुष्य अर्पण करण्याला जशी त्यांची पहिली पसंती नव्हती, तसंच तंत्रज्ञानाचा अनावश्यक आणि ठोस कारण नसताना केलेला वापरही त्यांना मान्य नव्हता. त्यांना या दोहोंचा संगम करायचा होता. तंत्रज्ञानाचा वापर सामान्य माणसांसाठी, समाजासाठी योग्य पद्धतीनं करता यावा, यासाठी त्यांना प्रयत्न करायचा होता. तंत्रज्ञान वापरून प्रयोगशाळेतलं विज्ञान समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी वापरायचं होतं. यासाठी उद्योजक होण्यावाचून पर्याय नाही हेही त्यांनी जाणलं. एक कल्पना अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण उद्योजक व्हायला हवं असं त्यांनी ठरवलं. त्यांचा हा विचार इतका स्पष्ट होता, की ‘इंडस्ट्रियल मायक्रोबायॉलॉजी’चा पदव्युत्तर अभ्यास करतानाही त्या स्वत:च्या मोठय़ा मोठय़ा ‘फर्मेन्टर्स’ची स्वप्नं पाहायच्या. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी आपल्या फार्मास्युटिकल युनिटची स्वप्नं पाहणाऱ्या त्या तरुणीचं, त्या वयातल्या विचारांमधील स्पष्टतेचं कौतुक करावं तितकं कमीच.

यानंतर परदेशात जाऊन या विषयात ‘एम.एस.’ करण्याचा विचार त्यांनी केला. त्यासाठीची परीक्षाही त्या उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण झाल्या. पण याच दरम्यान सूक्ष्मजीवशास्त्र आणि शाश्वत शेती या विषयामध्ये अफाट कार्य असलेले प्रोफेसर उपेंद्र कानिटकर त्यांना भेटले. या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाची भेट झाली आणि संदीपा यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. त्यांची भेट झाली त्या वेळी ८२ वर्षांच्या असलेल्या या जिंदादिल व्यक्तीनं संदीपा यांच्यासाठी एका नव्या जगाची दारं उघडली. त्यांच्या बंगलासदृश घरात त्या वेळी शेतीसाठी उपयुक्त असणाऱ्या दोन हजारांहून अधिक सूक्ष्मजीवांचे ‘स्ट्रेन्स’ त्यांनी जमवले होते. ते त्यांच्या २० वर्षांच्या संशोधनकार्याचं फलित होतं. त्यांच्या कार्याचा आवाका पाहून संदीपा स्तिमित झाल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संदीपा यांनी रुळलेली, प्रसिद्धीच्या झोतातली, आजच्या भाषेत सांगायचं तर ‘कूल’ वाट न निवडता फारशी चर्चेत नसणारी, लोकांना अगदीच प्राथमिक स्तराची वाटणारी कृषी विज्ञानाची वाट निवडली. हा निर्णय झाला आणि तेव्हापासून त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. या प्रवासात प्रोफेसर कानिटकर यांनी त्यांना जशी या क्षेत्र निवडीची प्रेरणा दिली, तसंच त्यांचे पुत्र

रवी कानिटकर यांनी संदीपा यांना त्यांचा परीघ विस्तारण्यासाठी पाठिंबा दिला.

कोल्हापुर जिल्ह्य़ात आजरा या ठिकाणी आपल्या या मार्गदर्शकांच्या मदतीनं वयाच्या तेविसाव्या वर्षी संदीपांनी त्यांचं पहिलं प्रयोगशाळारूपी ‘प्रॉडक्शन युनिट’ सुरू केलं. मृदेचा कस आणि तिचं शाश्वतपण वाढवणाऱ्या ‘अझोटोबॅक्टर’ या सूक्ष्मजीवांसंदर्भातलं ते संशोधन होतं. शेतकऱ्यांकडून या मिश्रणाला फारशी मागणी येत नव्हती. बाजारात उपलब्ध असणारी, बाटल्यांमध्ये येणारी रासायनिक कीटकनाशकं वापरण्याची शेतकऱ्यांना सवय झाली होती. त्या कीटकनाशकांना जे एक स्वरूप असायचं, ते स्वरूप संदीपा यांच्या सेंद्रिय मिश्रणास तोवर मिळालं नव्हतं. मग जमिनीचा बिघडलेला पोत, रासायनिक पदार्थाच्या अतिवापरामुळे मृदेची ढासळलेली गुणवत्ता, पाण्याचा अतिवापर, अशा अनेक कारणांमुळे मृदेतली कमी होत जाणारी पोषणद्रव्यं आणि त्यांचा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध संधींवर होणारा परिणाम, यावर उपाय शोधण्याचा निर्णय संदीपा आणि त्यांच्या टीमनं घेतला. हाताशी किमान एक ते दोन एकर जमीन असणाऱ्या असंख्य शेतकऱ्यांपर्यंत या समस्येवरील उपाय पोहोचवणं हे एक मोठं आव्हान त्यांच्यासमोर होतं. संदीपा आणि त्यांच्या टीमनं देशातल्या पहिल्या सूक्ष्मजीवाधारित, द्रव स्वरूपातल्या सेंद्रिय खतासाठीचं पेटंट मिळवलं.

‘मृदेच्या दीर्घायुष्यासाठी सेंद्रिय खतं आणि कीटकनाशकं’ या मोहिमेअंतर्गत त्यांनी विशिष्ट भूभागावरील काही ठरावीक पिकांबाबत काम करण्याचा निर्णय घेतला. सेंद्रिय बुरशी- नाशकांचा वापर करण्यासाठी द्राक्षं आणि डािळबं या महाराष्ट्रात जवळपास सर्व भागांत होणाऱ्या पिकांची निवड त्यांनी केली. द्राक्षांची निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी प्राधान्य दिलं. त्यानंतर कापूस, सोयाबीन, मका, गहू, तांदूळ, अशा पिकांवर लक्ष केंद्रित केलं. या वेळी एखादी ठरावीक प्रकारची कीड, आजार याला प्रतिबंध करण्यासाठी किंवा जमिनीमधलं एखादं ठरावीक प्रकारचं पोषणमूल्य वाढवण्यासाठी संशोधन करून उत्पादन निर्मितीवर त्यांनी लक्ष केंद्रित केलं.

असाच एक वेगळा उपक्रम त्यांनी यानंतर हाती घेतला. जवळपास ६ वर्ष राबवलेल्या या उपक्रमाअंतर्गत कृषी क्षेत्रासाठी उपयुक्त सूक्ष्मजीवांचे १० ते १५ हजार नमुने गोळा करून त्यांचा अभ्यास करण्यात आला. यातूनच देशातला सर्वात मोठा, कृषी क्षेत्रासाठी उपयुक्त सूक्ष्मजीवांचा साठा (बँक) त्यांच्या ‘कॅन बायोसिस’कडे तयार झाला. सध्या ते मृदा आरोग्य व्यवस्थापन, मृदा पोषणद्रव्यं व्यवस्थापन आणि मृदेसंदर्भातील कचरा आणि रोग व्यवस्थापन अशा तीन क्षेत्रांत प्रामुख्यानं काम करतात. उपलब्ध बीजांवर योग्य प्रक्रिया करण्यासाठी काही पद्धती त्यांनी विकसित केल्या आहेत. त्यांपैकी ‘ड्राय सीड ड्रेसिंग एजन्ट’ या पद्धतीनं काम करणारी ‘कॅन बायोसिस’ ही देशातली पहिली कंपनी. यामध्ये प्रत्येक बीजाला पूरक सूक्ष्मजीवांचा वापर करून बीजावर एक आवरण दिलं जातं. हे सूक्ष्मजीव बीजाचं आयुर्मान, दर्जा उंचावतात. हवामानबदल तसंच आगंतुक आलेल्या समस्यांना तोंड देण्यासाठी आणि पिकाचं आयुर्मान वाढवण्यासाठी ‘बायो स्टिम्युलंट्स’ आणि अशा अनेक पद्धतींवर त्यांनी काम सुरू केलं. पहिल्या सूक्ष्मजीवाधारित बायो स्टिम्युलंट्सच्या निर्मितीचं श्रेयही त्यांच्याच टीमला जातं.

पंजाब, हरियाणासारख्या भागात, जिथे मोठय़ा प्रमाणावर शेती आहे, तिथे दोन पिकांच्या मध्ये फार कमी काळ शेतकऱ्यांच्या हाती असतो. अशा वेळी शेतात पेंढय़ा जाळल्या जातात. यामुळे मोठय़ा प्रमाणावर वायू प्रदूषण होतं. पिकांचा हा उरलेला भाग जाळून टाकण्यापेक्षा त्याला तिथल्या मातीतच कमीत कमी काळात सामावून घेता येईल आणि प्रदूषणही होणार नाही, अशा प्रकारचं संशोधन ‘कॅन बायोसिस’मध्ये झालं. सूक्ष्मजीवांचं अशा प्रकारचं मिश्रण तयार करण्यात त्यांना यश आलं आहे, जे मिश्रण पिकांच्या पेंढय़ांबरोबर एकजीव करून त्याच मातीत कमीतकमी काळात एकरूप होईल. यामुळे मृदेची सकसतासुद्धा वाढेल आणि त्याबरोबर मृदा तसंच वायू प्रदूषण होणार नाही. त्यातही भाताच्या पेंढय़ा मातीत एकजीव होण्यासाठी अधिकच वेळ घेतात आणि ‘कॅन बायोसिस’नं तयार केलेलं हे मिश्रण याची योग्य ती काळजी घेतं. २०१५ पासून सुरू केलेल्या या प्रयोगादरम्यान असं लक्षात आलं, की हे मिश्रण वापरल्यानंतर अडीच टन भाताच्या पेंढय़ा १५ दिवसांत मातीत एकरूप झाल्या आणि त्यामुळे त्याच जमिनीत घेतलेलं त्यानंतरचं गव्हाचं पीक ८ ते १८ टक्क्यांनी वाढलं. शेतकऱ्यांचा खर्च जवळजवळ १२ टक्क्यांनी कमी झाला. ‘कॅन बायोसिस’नं आपल्या या संशोधनाचं पंजाब सरकारबरोबर २००० एकरवर प्रात्यक्षिक करण्यासाठी करार केला असून आता या उत्पादनाचं मोठय़ा प्रमाणात वितरण करण्यासाठी विविध योजना आखल्या जात आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांसाठी ‘कार्बन क्रेडिट प्रोग्रॅम’सारख्या विविध प्रकल्पांची आखणी करण्याचा संदीपा यांचा मानस आहे. त्यांच्या अफाट कार्याची आणि संशोधनाची भलीमोठी यादी आहे. पंजाब आणि हरियाणातल्या त्यांच्या या कार्यासाठी टेक्नोलॉजी डेव्हलपमेंट बोर्डाचं १५ लाखांचं ‘एमएसएमई पारितोषिक’ देऊन ९ मे २०२१ रोजी त्यांना गौरवण्यात आलं. ९ मे ही तारीख त्यांच्यासाठी खास आहे. या दिवशी असणाऱ्या तंत्रज्ञान दिनाच्या निमित्तानं त्यांना आजवर  १९९९, २००० आणि २०२१ या तीन वर्षी तीन पारितोषिकं मिळाली आहेत.

आपली तब्येत थोडी बरी नसली, तर आपण आधी घरगुती उपाय करतो. त्यामुळे फरक पडला नाही, तर डॉक्टरांकडे जाऊन औषध घेतो आणि अगदीच गरज असेल तर अँटिबायोटिक्स (प्रतिजैविकं) घेतो. पिकांच्या आणि वनस्पतींच्या बाबतीतही हे असंच असायला हवं, असं संदीपा यांना वाटतं. पिकावर एखादा रोग दिसला किंवा पिकांना आणखी तंदुरुस्त करायचं असेल, तर आधी सेंद्रिय खतं आणि कीटकनाशकं यांचा वापर व्हायला हवा. अगदीच गरज पडली, तर पुढची पायरी म्हणून काही सौम्य रासायनिक द्रव्यं वापरता येतील आणि त्यानंतरही गरज असेल तरच कठोर रासायनिक द्रव्यांचा वापर व्हायला हवा. यामुळे प्रदूषणविरहित आणि शाश्वत शेती करता येईल असं त्यांचं सांगणं आहे. याविषयी शेतकऱ्यांना माहिती मिळावी, याचं महत्त्व समजावं म्हणून जागृती घडवून आणणारी शिबिरं त्या घेतात. या समाजोपयोगी गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जनजागृती शिबिरं घेण्याला पर्याय नाही, हेही त्या नमूद करतात.

जगभरातल्या १५ हून अधिक देशांत काम करणाऱ्या, भारतातल्या विविध भागांत १६ क्लस्टर्समध्ये वसलेल्या ‘कॅन बायोसिस’च्या १५० जणांच्या टीमला आणि आपल्याला पाठिंबा देणाऱ्या परिवाराला त्या या प्रवासातले सहप्रवासी मानतात. हा प्रवास नुकताच सुरू झाला असून अजूनही खूप काही करायचं आहे, असं त्या सतत सांगत राहातात.

संशोधन, विज्ञान प्रयोगशाळेतून बाहेर आणून समाजातल्या सर्व घटकांपर्यंत पोहोचवता येतं, समाजाला आणि निसर्गाला भरभरून देत उद्योग करता येतो. त्याबरोबरच यशस्वी संशोधिका एक यशस्वी उद्योजिकासुद्धा होऊ शकते, हे सगळं त्या आपल्यासमोर सहज अधोरेखित करतात. संशोधिका या शब्दाचा आणखी एक नवा आयाम आपल्यासमोर अलगद उलगडतात.

Story img Loader