‘लाँगफॉर’ या चीनमधील बलाढय़ रियल इस्टेट कंपनीची सहसंस्थापक-प्रमुख असणाऱ्या, सुप्रसिद्ध ‘फोब्र्ज’ या अमेरिकी मासिकाने जाहीर केलेल्या सर्वाधिक श्रीमंत महिलांच्या यादीत चीनमधील सर्वात श्रीमंत महिला म्हणून गौरवल्या गेलेल्या वू याजनविषयी..
त सं बघितलं तर ती व्यवसायाने एक अभियंता, पण मनानं हळवी आणि संवेदनशीलही. शिवाय ती आहे शब्दसृष्टीची सम्राज्ञी. आणि म्हणूनच कदाचित एक यशस्वी पत्रकारही. तिला कपडेही छान शिवता येत असत. कुठल्याही पार्टीमध्ये तिचा पोषाख सर्वाच्या कौतुकाचा विषय असे, कारण तो तिने स्वत:च डिझाइन केलेला, सौंदर्यदृष्टीने परिपूर्ण असा असे. जे काही करायचे ते मनापासून, संपूर्णपणे स्वत:ला झोकून देऊन. ‘वू याजन’ ही चिनी स्त्री आजही ओळखली जाते ती तिच्या या परिपूर्णतेच्या आविष्कारांसाठीच!
‘लाँगफॉर’ (चिनी उच्चार ‘लाँगहुडीचॅन’) या चीनमधील बलाढय़ रियल इस्टेट कंपनीची ती सहसंस्थापक आणि प्रमुख आहे. वू याजनच्या आयुष्यात २०१२ साली अतिशय महत्त्वपूर्ण आणि सन्माननीय घटनेची नोंद झाली. सुप्रसिद्ध ‘फोब्र्ज’ या अमेरिकी मासिकाने जाहीर केलेल्या सर्वाधिक श्रीमंत महिलांच्या यादीत चीनमधील सर्वात श्रीमंत महिला म्हणून ‘वू याजन’चे नाव घोषित झाले. नाव जाहीर झाल्यावरच अनेकांना तिच्या बद्दल समजले. अगदी चीनमध्ये देखील ती फारशी कोणाला परिचित नव्हती. ‘सेलेब्रिटी’ वा ‘बिझनेस वूमन’सारखे किताब तिच्यापासून फटकूनच होते. रिअल इस्टेट क्षेत्रात इतके मोठे साम्राज्य जिने उभे केले त्या स्त्रीचे जेमतेम पाच-सहा फोटो आणि फक्त आठ-दहा न्यूज लिंक्स मीडियाकडे उपलब्ध होत्या.
किंबहुना अशा प्रसिद्धीलोलुप प्रवृत्तीपासून ती कोसो दूर राहते. आपल्या दिसण्यापेक्षा, व्यक्तिमत्त्वापेक्षा आपल्या कामातील गुणवत्तेने आपल्याला ओळखले जावे हे तिचे ब्रीद आहे.
२०१२ साली वू ही चीनमधली सर्वाधिक श्रीमंत महिला होती, परंतु त्याच दरम्यान तिचा पती काई कुई याच्यापासून ती विभक्त झाली आणि कंपनीतील ३० टक्के वाटा तिच्या पतीकडे गेल्याने वू चे स्थान दुसऱ्या क्रमांकावर घसरले.
वू जरी जगातल्या प्रभावशाली महिलांपैकी एक असली तरी इथपर्यंत पोहोचण्याचा तिचा संघर्ष वादातीत आहे. अतिसामान्य घरात जन्म आणि कष्टात हरवलेले बालपण असे तिचे प्राक्तन. प्रखर बुद्धीच्या आणि कष्टाळू प्रवृत्तीच्या वूचे तारुण्य मात्र सदैव चांगल्या जीवनमानासाठी झगडण्यातच गेले.
१९६४ साली चीनमधील चोंगचिंग शहरात वूचा जन्म झाला. वडील सप्लाय आणि मार्केटिंग विभागात काम करीत आणि आई शिवणकाम करून संसाराला हातभार लावत असे. आईला रात्री उशिरापर्यंत कामानिमित्त बाहेर राहावे लागे म्हणून वू लहान वयातच स्वयंपाक आणि घरच्या इतर जबाबदाऱ्यांनी जखडली गेली. अतिश्रमांनी थकून गेलेल्या या मुलीच्या मग शाळेला नियमित दांडय़ा होत असत, परंतु जात्याच तल्लख असलेली वू अभ्यासात नेहमीच अव्वल असायची! शाळेत आज्ञाधारक, सुस्वभावी आणि अतिशय हळव्या असलेल्या वूची इतर मित्र-मैत्रिणींशी मात्र विशेष गट्टी नसे. कारण तिचा मितभाषी स्वभाव आड येई.
माध्यमिक शाळेत लिबरल आर्ट्स या विषयात सर्वाधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या वू ला अभिजात साहित्य, निबंध लेखन आदिमध्ये विशेष रस होता. परंतु ‘लॉजिकल थिंकिंग’मध्ये वूने सपाटून मार खाल्ला. त्यानंतर मात्र साहित्य हा आपला प्रांत नसावा अशी तिची समजूत झाली. मग तिने पुढे विज्ञान शाखेत प्रवेश घेतला आणि १९८४ साली नॉर्थ वेस्ट पॉलीटेक्निक युनिव्हर्सिटीतून ‘नेव्हिगेशन इंजिनीयरिंग’ची पदवी तिने प्राप्त केली. वूने १९८४ ch04ते १९८८ दरम्यान ‘कियान्वे मीटर फॅक्टरी’मध्ये काम केले. परंतु मुळातच साहित्याची आवड असलेली वू इथे फार रमली नाही. १९८८ साली ‘चायना शीरोंग न्यूज एजन्सी’साठी तिने पत्रकार आणि संपादक म्हणून काम सुरू केले. ती ज्या वृत्तपत्रासाठी लिहीत असे ते रियल इस्टेट क्षेत्राशी संबंधित होते आणि ‘चिंग चोंग म्युनिसिपल कॉर्पोरेशन’च्या नियंत्रणाखाली होते. इथे काम करत असताना वूचा शहरांतील बडय़ाबडय़ा बिल्डर्स व इतर प्रभावशाली व्यक्तींशी संपर्क वाढला. वूचे वाचन अफाट होते आणि तिची भाषिक कौशल्ये समोरच्यावर सहज छाप पाडत. एरवी मितभाषी असलेल्या वूचा जनसंपर्क तिच्या मिठ्ठास वाणीमुळे अफाट वाढला.
या दरम्यान वूचे एक पुस्तकही प्रसिद्ध झाले. काही काळ कमिशन एजंट म्हणूनही तिने काम केले. रियल इस्टेट क्षेत्रातली खडान् खडा माहिती असलेल्या वूला यात भरपूर कमाई झाली . १९९३ साली ती जिथे काम करीत होती ते वृत्तपत्र बंद पडले आणि आता आपण स्वत:चा व्यवसाय करायचा या कल्पनेने वूला झपाटले. कन्स्ट्रक्शन मटेरियल सप्लाय करणारी ‘चोंग चिंग इकोनॉमिक डेव्हलपमेण्ट कंपनी’ तिने स्थापन केली. तिची व्यवसायाप्रती असलेली बांधिलकी आणि  गुणवत्तेशी कुठलीही तडजोड न करण्याची वृत्ती यामुळे तिचा व्यवसाय बाळसे धरू लागला. तिच्यातले हे गुण हेरून चीनमधल्याच एका बलाढय़ रियल इस्टेट कंपनीने तिला पार्टनरशिपची ऑफर दिली. कंस्ट्रक्शन डिव्हिजन अ‍ॅण्ड कंपनी या दिग्गज कंपनीबरोबर जॉइण्ट व्हेंचर कंपनी ‘चोंग चिंग ब्रांच प्रॉपर्टीज’चा शुभारंभ झाला .
वूसाठी हे पाऊल अतिशय निर्णायक आणि सुयोग्य ठरले असे म्हणावे लागेल. कारण याद्वारे तिने रियल इस्टेट क्षेत्रात अधिकृतपणे शिरकाव केला होता. लवकरच या कंपनीचे नामकरण ‘लेक रियल इस्टेट डेव्हलपमेंट कंपनी’ असे करण्यात आले. काही कारणांनी ‘कंस्ट्रक्शन डिव्हिजन’ यातून बाहेर पडले आणि २००३ साली वू या कंपनीची मालकीण बनली.
ही सर्व जबाबदारी वूवर आली खरी, पण तिला फायनान्स विभागाबद्दल फारच त्रोटक अनुभव होता. त्याचा परिणाम लगेचच दिसून आला आणि कंपनीने त्या आर्थिक सहामाहीत विक्रमी निचांकी कामगिरी केली. लगेचच वूने पुढील धोका ओळखला आणि एक सुप्रसिद्ध लेखापाल फर्मला कंपनीच्या ‘फायनान्शियल ऑडिट’साठी नेमले. तसेच स्ट्रॅटेजिक प्लानिंगसाठी विख्यात असलेल्या वँग झी गँग या नामवंत सल्लागाराला आपल्या कंपनीत आणले.
दरम्यान काई कुई या व्यावसायिक मित्राशी वू विवाहबद्ध झाली होती आणि पुढे या दोघांनी मिळून (१९९५) ‘चोंग चिंग जोंग झाक रियल इस्टेट कंपनी’ची स्थापन केली. याच कंपनीचे नामांतरण पुढे ‘लाँगफोर रियल इस्टेट कंपनी’ असे झाले. चोंगचिंग पुरता आता आपला व्यवसाय मर्यादित न ठेवता या कंपनीने चीनमधील शांघाय, बीजिंग, चांगझाऊ आणि डालियनसारख्या मोठाल्या शहरांत आपले हात-पाय पसरले. २००९ साली हाँगकाँग स्टॉक एक्स्चेंजमध्ये ही कंपनी ‘पब्लिक लिमिटेड’ झाली आणि सिंगापूर गव्हर्नमेंट, पिंग अ‍ॅन इंश्युरन्ससारख्यांनी या कंपनीत गुंतवणुकीला प्राधान्य दिले.
‘शेवटी तुमचे मोठे होणे हे तुमच्यापेक्षाही तुमच्या हाताखाली काम करणाऱ्यांवरही तितकेच अवलंबून असते. एकटय़ाने तलवार चालवत राहिले तर जखमी होण्याची शक्यता अधिक. पण सर्वानी मिळून चालवली तर युद्ध जिंकणेही अवघड नसते,’ असे वू म्हणते.
तिच्या संपत्तीच्या आकडय़ांवरून जरी जगभरात तिला नावाजले जात असले तरी वूचे म्हणणे निराळेच आहे. ‘‘ही  कागदोपत्री संपत्ती आहे. मला मायक्रोसॉफ्ट सारखे बिझनेस एम्पायर उभारायला हवे, ज्यातून मी माझ्या शेअर होल्डर्सचे, माझ्या देशाचे आणि एकूणच मानवजातीचे काही भले करू शकेन’’
कुठल्याही प्रकारचा  दिखाऊपणा, भपका हे सगळे वूसाठी  नाहीच! आपले एवढे मोठे साम्राज्य असतानादेखील केवळ गरजेपुरते मोठे कार्यालय आणि तिच्या गरजेपुरतेच घर हेही वूच्या विलक्षण व्यक्तिमत्त्वाचा परिचय देतात. अमाप ऐश्वर्याची धनीण असूनही इतके साधे राहणीमान असणारी, गरजूंसाठी संपत्तीचा विनियोग करता यावा यासाठी अधिकाधिक क्षमतेने काम करणारी, प्रसिद्धीपासून स्वत:ला सतत लांब ठेवूनही तिला जाणणाऱ्या प्रत्येकाच्या गळ्यातला ताईत बनून राहिलेली वू याजन.
वू आपल्या दिलदार वृत्तीसाठीदेखील तिच्या कर्मचाऱ्यांमध्ये परिचित आहे. कंपनीला जसजसा नफा होत गेला तसा आपल्या ५५० कर्मचाऱ्यांना त्यांचा वाटा कर्तव्यबुद्धीने देणारी वू एक आदर्श ‘बॉस’ आहे. आपल्या  कंपनीत सर्वानी एकमेकांशी बरोबरीच्या नात्याने वागावे, कोणी कोणाचा बॉस वगैरे नाही असे वूचे सांगणे असते.
दरवर्षी तिच्या ‘लाँगफॉर’ कंपनीचा वार्षिकोत्सव दणक्यात साजरा होतो. विशेष गुणवत्तेसाठी आदर्श कर्मचारी म्हणून एकाची निवड केली जाते आणि वूच्या हस्ते त्याला बक्षीस प्रदान केले जाते. एकदा वू या कार्यक्रमस्थळी अगदी वेळेवर पोहोचली आणि विजेत्यासाठी ‘भेट’ आणायचे विसरली. पण परंपरेनुसार बक्षीस तर द्यायलाच हवे. मग काय..बाईसाहेबांनी आपल्या गळ्यातला नेकलेस उतरवून त्या मुलीला दिला.
हिरे मोती से कब तुलती है खुशीया
शोहरत तू दिल की कमा,
 दिल बडा तो तू बडा।
या ओळी वू याजनसाठी किती सार्थ आहेत नाही?  (सदर समाप्त)

Story img Loader