भूतकाळात घडलेल्या काही अप्रिय घटनांचं किती काळ भांडवल करायचं? त्यामुळे होणारं घरातलं गढूळ वातावरण किती काळ तसंच ठेवायचं आणि स्वत:बरोबर सगळ्यांनाच वेठीला धरायचं? क्षमाशिक्षा, चूकबरोबर, चांगलंवाईट असल्या शब्दांत अडकण्यापेक्षा आपल्या वागण्याचे घरातल्यांवर काय परिणाम होतात, याचा विचार घरातल्या मुख्य व्यक्तींनी करायला हवा. त्यासाठी भूतकाळाशी जोडलेले प्रश्न मागे सोडून द्यायला हवेत आणि उंच भरारी घ्यायला हवी…

कॉलेजच्या प्रोजेक्टसाठीचं सामान आणायला अक्षरा घाईघाईनं घराबाहेर पडली. तिच्या खोलीतला पंखा चालूच राहिलेला पाहून, जान्हवी तिच्या खोलीत शिरली, तर तिचा लॅपटॉपही चालूच होता. ‘किती बेजबाबदार मुलगी, थेट तिच्या बाबासारखी. ईश्वरीच्या अगदी विरुद्ध स्वभावाची.’ तिच्या मनात येऊन गेलंच. ईश्वरी, तिची मोठी मुलगी, ‘मास्टर्स’- साठी गोव्याला जाऊन आता महिना होऊन गेला होता, तरी जान्हवीला सारखी तिची आठवण येत होती. तिची नजर लॅपटॉपच्या स्क्रीनवर गेली तर ईश्वरीचाच ई-मेल ओपन होता. वाचावा की नाही, असा विचार मनात येण्याआधीच जान्हवीने तो ई-मेल वाचायला सुरुवात केली.

upsc exam preparation tips in marathi
यूपीएससीची  तयारी : पदांचा पसंतीक्रम
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Viral Video Of Desi Jugaad
कामगाराला बाहेर काढण्यासाठी लावलं भन्नाट डोकं; Video तील जुगाड पाहून तुम्हीही म्हणाल, ‘चुकूनही देशाबाहेर… ‘
Life in an IIT | Accessible buildings, transformative experience: Here’s journey of Pune boy to IIT Bombay
‘हारा वही, जो लड़ा नही’ पुण्याच्या दिव्यांग तरुणाचा आयआयटी बॉम्बेपर्यंतचा प्रवास ऐकून थक्क व्हाल
Disabiled people protest , pune , police headquarters,
पुणे : दिव्यांग बांधवांचे विविध मागण्यांसाठी पोलीस मुख्यालयाबाहेर आंदोलन, अजित पवारांच्या हस्ते ध्वजारोहण
bmc commissioner bhushan gagrani express view about bmc fd
मुदतठेवींबाबत चिंता नाही! नियोजन न केल्यास मात्र आर्थिक चणचण, मुंबई पालिका आयुक्तांचा इशारा
If Supriya Sule teaches some lessons to office bearers half of Maharashtra will be safe says Rupali Chakankar
सुप्रिया सुळे यांनी पदाधिकाऱ्यांना काही धडे दिले तर निम्मा महाराष्ट्र सुरक्षित होईल : रुपाली चाकणकर
Success story of Dr kamini singh left government job for moringa business now earning near 2 crore
सरकारी नोकरी सोडली अन् धरली ‘ही’ वाट, आता करतात कोटींची कमाई; नेमकं काय करते ‘ही’ व्यक्ती

‘‘अक्षरा, इथं मला रोज नव्यानं समजतंय, जग खूप मोठं आणि सुंदर आहे. चांगले हुशार मित्र-मैत्रिणी मिळालेत. आपल्याच वयाची मुलं किती वेगवेगळ्या पद्धतीने विचार करू शकतात, हे पाहूनच हरखायला होतं. त्यांच्याशी स्पर्धा करायची म्हणजे बुद्धीला जबरदस्त चॅलेंज! भरपूर अभ्यास, भरपूर काम. खूप ‘भारी’ वाटतंय. करिअरसाठी हे विद्यापीठ हीच ‘माझी जागा’ आहे, असा विश्वास वाटतोय. तुलाही अजून खूप मोठा पल्ला गाठायचाय. डिझायनिंगमधली ‘तुझी जागा’ तुलाही सापडायला हवी. तू खूप सर्जनशील असूनही आईशी भांडण करून जिंकणं यातच गेली अनेक वर्षं रमते आहेस, याचं मात्र वाईट वाटतं. तुमची निरर्थक भांडणं थांबवायचाही हल्ली मला कंटाळा येत होता. शेवटी हताश होऊन दुर्लक्ष करायला शिकले. अभ्यासाकडे पूर्ण लक्ष दिलं. त्यामुळेच इथं प्रवेश मिळालाय. आज मात्र तुला मनापासून सांगावंसं वाटतंय की, आपल्याच आईशी वैर धरून भांडत राहण्यात आता वेळ वाया घालवू नको. एका टप्प्यानंतर तो बालिशपणाच होतो मग. त्याच्या पलीकडे जायला नको का? आपल्याला उंचीवर पोहोचायचं असेल, तर काय करायला हवं ते मला आता माहितीय. आपण तिथल्या तिथं गोल गोल फिरत बसलो तर काही तरी करत असल्यासारखं वाटलं तरी प्रत्यक्षात वेळ आणि शक्ती वायाच जाते. फार चढावं लागलं तर दमायला होतं. म्हणून वर पोहोचण्यासाठी, ‘उडायला’ शिकलं पाहिजे. त्यासाठी हलकं व्हायला पाहिजे. म्हणजे मनावरचा अनावश्यक भार खाली सोडून द्यायला हवा. जेवढं नवीन शिकू, नवीन करू तेवढा उत्साह येतो, भरारी घ्यायला बळ मिळतं. हे सगळं आईलाही सांगावंसं वाटतं, पण तिला ते कळणार नाही, कळलं तरी पटणार नाही.

हेही वाचा >>> स्त्री ‘वि’श्व : स्त्रीद्वेष्ट्यांना पुरून उरणाऱ्या नेत्या

तुझी कामगिरी आणि फायनल प्रोजेक्ट हा तुझ्या पुढच्या शिक्षणाचा/ जॉबचा पासपोर्ट आहे हे लक्षात घे. घरी आईशी भांडणं आणि कॉलेजमध्ये सरांशी खुन्नस तुला तिथल्या तिथं फिरवत ठेवतात. इतर मुलं पुढे जातात, त्यांना गाठण्यासाठी घाईघाईनं चढून दमतेस. मनावरचं अनावश्यक ताणाचं ओझं फेकून हलकी हो, तरच उडायला शिकशील- तुझी, ईश्वरीदीदी.’’

ई-मेल वाचून जान्हवीला धक्काच बसला. बेसावध असताना कुणी तरी खाडकन थोबाडीत मारावी तसं तिला झालं. आपण जिला लहान समजत होतो, ती आपली लेक इतकी प्रगल्भ झालीय आणि आपल्याबद्दल असा विचार करते हे तिला अनपेक्षित होतं. तिच्या डोळ्यासमोरून मागची अनेक वर्षं सरकत गेली. ईश्वरी आणि अक्षरा लहान होत्या, तेव्हा दोघींना वाढवताना जान्हवीला वेळ पुरत नसायचा. त्यात अनिमेषची चाहूल लागली आणि त्याच दरम्यान नवऱ्याचं, जगदीशचं वागणं बदललं. तो घरात जवळजवळ नसायचाच. त्यातही जेव्हा असेल तेव्हा सतत जान्हवीच्या चुका काढणं, बारीकसारीक गोष्टींवर टीका करणं, तुला टाइम मॅनेजमेंट जमत नाही, मुलींकडे बघता येत नाही कशाहीवरून नाराजच असायचा. आरडाओरडा, भांडणं व्हायची. त्याच्या स्वभावातल्या अशा बदलाचं कारण एके दिवशी जान्हवीला अचानक कळलं. त्याच्या सेक्रेटरीशी सुरू असलेल्या अफेअरचा पुरावा सापडला. मग तर भांडणांचा कहर, मारामाऱ्या, सासर-माहेर दोन्ही घरांच्या बैठका बरंच घडलं.

जगदीशला घर मोडायचं नव्हतं, त्यात जान्हवी गरोदर. तिची घर सोडून जाण्याची धमकी आणि घरच्यांच्या दबावामुळे तो एक पाऊल मागे आला. नंतर ती सेक्रेटरीही दुसऱ्याशी लग्न करून निघून गेली. जगदीश-जान्हवीचा संसार वाचला, पण नात्यावर चरा राहिला तो कायमचा. शिवाय या सगळ्या गोंधळात आणि नंतरही अनिमेषच्या जन्मामुळे अक्षराकडे जान्हवीचं बऱ्यापैकी दुर्लक्ष झालं. अक्षरा पितृमुखी होती. शिवाय फार भांडणं पाहिल्यामुळेही असेल, अक्षराही आईशी डिट्टो बाबाच्या स्टाइलने भांडायची. ‘अगदी बाबासारखी आहे.’ हे गृहीतक जान्हवीनंही कायमचं मनात धरलं. अक्षराचं एकटं पडणं जाणवून जगदीश तिचे लाड करायचा, तीही त्याला जास्त चिकटायची. त्यामुळे त्यांच्या दोघांच्या टीमवर जान्हवीची नाराजी बरसत राहायची. त्यात अक्षरा उलटून बोलली तर युद्धच पेटायचं. अक्षराचा स्वभावही तेज. कुणाचं ऐकून न घेणारा. त्यामुळे मनमानी करणं, आईला विरोध करून जिंकणं हेच तिच्या आयुष्याचं इतिकर्तव्य बनलं. शाळेत अभ्यास- गृहपाठ, कॉलेजात सबमिशन मागे पडल्या की ‘आई भांडते म्हणून माझं लक्ष लागत नाही, मूड जातो.’ हे समर्थन रोजचं झालं. अक्षरा कलाकार, बुद्धिमान आणि मनस्वी होती. जान्हवीला तिच्या कलेचा अभिमान, कौतुकही होतं. पण ते तेवढ्यापुरतंच टिकायचं. कुठून तरी पुन्हा खुन्नस सुरू व्हायची.

‘ही मुलगी अशी वागते, मग मी चिडू नको तर काय करू?’ असं जान्हवीचं समर्थन असायचं. याउलट ईश्वरी पहिल्यापासूनच शांत आणि समजूतदार, अनिमेष तर खूपच लहान. ते दोघं आईला भिऊन तिचं ऐकायचे, मग अक्षरानेही ‘तुला तेच दोघं आवडतात, त्यांचेच लाड करतेस.’ हे धरून ठेवलं.

ईश्वरीच्या ई-मेलमुळे आज प्रथमच जान्हवीने आपल्या भूतकाळाकडे मुलांच्या, विशेषत: अक्षराच्या नजरेतून पाहिलं. ‘तुझ्या चुकीमुळे घरातलं वातावरण बिघडलं’, असा तिचा जगदीशवर कायमचा आरोप होता. अति झाल्यावर, ‘किती वर्षं तेच धरून बसणारेस? संपलंय ना आता ते?’ असं म्हणून जगदीश खवळायचा. त्यांच्या अखंड भांडणांना कंटाळून दोन्ही कडच्या नातलगांनी घरी येणं कमी केलं. घरातल्या कायमच्या स्फोटक वातावरणातली आपली जबाबदारी जान्हवीने आज पहिल्यांदा स्वत:पाशी मान्य केली. लहानपणापासून मुलांनी किती झेललं, हे जाणवून तिला अपराधी वाटलं. हातातून खूप सारं निसटून गेल्यासारखं वाटून एकदम निराशाच दाटून आली.

कुणाशी तरी बोलावंसं वाटलं. अशा वेळी तिला समजून घेणारी ‘फ्रेंड, फिलॉसॉफर, गाइड’ व्यक्ती एकच, तिची शीलाकाकू!

तिला मनातला कल्लोळ सांगून जान्हवी म्हणाली, ‘‘काकू, इतकी वर्षं सर्वांशी ‘कडक’पणे वागले. अक्षराला तर धारेवरच धरलं होतं हे जाणवून वाईट वाटतंय. पण तरीही तिची तशी काळजी वाटत नाहीये. दीदीसारखंच चांगल्या ठिकाणी ‘मास्टर्स’ करायचं म्हणूनही असेल, पण आता ती अपुरे प्रोजेक्ट्स पूर्ण करण्याच्या मागे लागलेली दिसतेय. ती हुशार आहे आणि एकदा ठरवलं की जिद्दीनं पूर्ण करतेच. तिला ‘तिची जागा’ नक्की सापडेल. खरं सांगायचं तर, मला माझ्याबद्दलच वाईट वाटतंय. मलाही उडता आलं असतं, पण तसा विचारही कधी केला नाही, तिथल्या तिथं फिरण्यात केवढं आयुष्य वाया घालवलं याचा त्रास होतोय. आज, अर्ध्या वयात कसं बदलू स्वत:ला?’’ जान्हवी अस्वस्थतेने म्हणाली.

‘‘आता तुझं तुलाच हे समजतंय, तर मी स्पष्टच बोलते जान्हवी. मनात स्वत:शीच नेमके काय संवाद सुरू असल्यामुळे तू अशी वागत होतीस ते एकदा त्रयस्थपणे स्वत:कडेच बघून विचार कर. म्हणजे कुठे बिघडलं आणि काय बदलायला हवं ते नेमकं लक्षात येईल. दोन मुली झाल्यावर आणि तू गरोदर असताना जगदीश असं वागला हे विसरायचं नाही असंच तू ठरवलं होतंस. आपल्या अपमानाचं तू भांडवल केलंस. ‘आता दाखवतेच, सगळ्यांना वठणीवरच आणते.’ हे ब्रीदवाक्य मनात असल्यासारखं नवऱ्याला धाकात ठेवणं आणि घराला ‘कडक’ शिस्त लावणं यालाच सर्वस्व मानलंस. कुणी थोडा जरी विरोध केला की, माझ्यावर अन्याय, अपमान होतोय असं वाटून तू बिथरायचीस. तुझ्यातली ‘मोंजुलिका’ जागी व्हायची. यापुढे ते थांबायला हवं.’’ घरातल्यांसोबत घडलेले एकेक प्रसंग दोघींनाही आठवत होते.

‘‘खरंय. माझ्यावर झालेल्या अन्यायाचं जरा जास्तच स्तोम माजवलं का गं मी? शिस्तीच्या नावाखाली घरच्यांवर अन्याय करत राहिले? खरं तर ‘जगदीश पुन्हा तसं वागेल’ ही भीती आणि संशय कायम स्वार होते माझ्यावर.’’

‘‘हं. पण त्यामुळे तुझ्या अंगात अनेक गुण आणि क्षमता असूनही नोकरी, कामधंदा केला नाहीस. छंदही जोपासले नाहीस. वरकरणी कडकपणा दाखवत मनात त्या भीतीशी झगडण्यातच गेली इतकी वर्षं. जगदीश आणि मुलांनाही त्याच ताणाखाली ठेवलंस. नेमकं काय मिळालं?’’

‘‘पण जगदीशला माफ कसं करू?’’

‘‘माफी/ क्षमा असे शब्द वापरल्यामुळे गोष्टींचं उगीचच उदात्तीकरण होतं जान्हवी. एका माणसाला खूप वर आणि एकाला खूप खाली बघितलं जातं. क्षमा-शिक्षा, चूक-बरोबर, चांगलं-वाईट असल्या शब्दांत अडकण्यापेक्षा आपल्या वागण्याचे घरावर, मुलांवर, तुम्हा दोघांवर काय प्रत्यक्ष परिणाम झालेत ती वस्तुस्थिती बघणं जास्त महत्त्वाचं नाही का? तो अवघड काळ फक्त काही महिन्यांचा होता. त्याची शिक्षा तू किती वर्षं सगळ्या घराला देतेयस? सूड घेतल्यासारखी? जगदीशनं तेव्हा चूक मान्य केली आणि सुधारलीदेखील. सगळं विसरून मुलांसाठी एकत्र राहायचा निर्णय तुमचा दोघांचा होता. मग मुलांना यापेक्षा जास्त आनंदाचं वातावरण देणं ही तुमची दोघांचीही जबाबदारी नव्हती का?’’

आता जान्हवीला झटकन उमगलं. तिचा उतरलेला चेहरा पाहून काकू म्हणाली, ‘‘झालं ते होऊन गेलं जान्हवी. आता असंही ते बदलता येणार नाही. अर्धं आयुष्य शिक्षा करण्यात गेलं, आता उरलेलं अर्धं पश्चात्तापात नकोय जायला. भूतकाळाला मागे सोडायचं असेल तर इतकी वर्षं मुलांवर अन्याय केला का? अशी कशी चुकले? स्वत:तच कशी राहिले?’’ असले भूतकाळाशी जोडलेले प्रश्नच बदलायचे. आपोआप विचारांची दिशा बदलते. ‘आज’ आपल्याला काय हवंय? कशामुळे आनंद वाटेल? मुलांना आणि जगदीशला भरभरून प्रेम कशी देऊ शकेन? जिथे आहे तिथून उंच भरारी घेण्यासाठी कुठून सुरुवात करावी लागेल? काय नवीन शिकावं लागेल? हे प्रश्न विचार स्वत:ला. फक्त आज आणि उद्याकडे पाहणारे. नवीन शिकण्याच्या विचाराने उमेद, बळ मिळेल, पुढचं पुढे.’’ काकू म्हणाली.

त्या कल्पनेनंही जान्हवीला हलकं झाल्यासारखं वाटलं. तिचा चेहरा उजळला.

neelima.kirane1@gmail.com

Story img Loader