डॉ. नंदू मुलमुले

गर्द निळय़ा रंगाचा कफ्तान. तो शिवणारे हात पुरुषाचे.. पण त्या हातांच्या धन्याचं वर्षांनुवर्ष एका बाबतीत कुचंबणा झालेलं मन मात्र ओळखलं एका स्त्रीनं. नुसतं ओळखलं नाही, तर आयुष्याच्या अवघड टप्प्यावर तिनंच त्याला स्त्रीत्वाचे विविध पदर उलगडून दाखवले. या तिच्या प्रयत्नात आईच्या मायेनं आपल्या माणसाला जोजावण्याचा ‘स्त्री-सेवाभाव’ त्याच्यात जागृत झालाच, पण आजवर जणू बंद पेटीत घुसमटून गेलेला त्याच्या मनाचा ‘तो’ कोपराही मोकळा श्वास घेऊ लागला.. आगळय़ावेगळय़ा विषयावर मोरोक्कोच्या एका स्त्री दिग्दर्शिकेचा  ‘द ब्लू कफ्तान’ हा चित्रपट पाहायलाच हवा.

स्त्रीत्व हे एक तत्त्व आहे, एक मनोभाव आहे. त्यासाठी स्त्री असणं जरुरीचं नाही. प्रत्येक स्त्रीमध्ये ते असतंच असंही नाही. उलट एकेकदा ते पुरुषांमध्येही असू शकतं. निरपेक्ष निष्ठा, मखमली मार्दव, करारी कणखरपणा, पराकोटीची सहनशीलता, क्षमाभाव, मातृभाव, वात्सल्य, या सगळय़ा त्या स्त्रीतत्वाच्या अभिव्यक्ती. या स्त्रीभावाचा अलवार आविष्कार म्हणजे मरियम तौझानी या मोरोक्कोच्या दिग्दर्शिकेचा चित्रपट- ‘द ब्लू कफ्तान’.

कफ्तान म्हणजे स्त्रिया परिधान करीत असलेला एक पायघोळ झगा. तो हातानं शिवण्याची, त्यावर नाजूक कशिदाकारी करणाऱ्या घराण्यांची मोरोक्कोमध्ये एक मोठी परंपरा आहे. दुर्दैवानं यंत्रयुगाच्या माऱ्याखाली ती नष्ट होत चालली आहे. अशाच एका दुर्मीळ घराण्याचा पाईक हालिम, त्याची पत्नी मीना आणि त्यांचा मदतनीस शिंपी युसेफ या तिघांची ही कहाणी. त्यातही, आपल्या आयुष्यात आलेल्या या दोन पुरुषांतील स्त्रीत्व भाव जागवणाऱ्या स्त्रीची- मीनाची ही कहाणी. 

हेही वाचा >>> मोडला नाही कणा..

मीनाचा नवरा हालिम हा अतिशय शांत, मितभाषी स्वभावाचा माणूस आहे. त्याचं आपल्यावर नितांत प्रेम आहे याची तिला जाणीव आहे. त्याच्या लांबसडक बोटांत नाजूक कलाकुसर केलेले कफ्तान विणण्याचं अद्भुत कसब आहे. मात्र त्याच्यात एक सुप्त, समलिंगी आकर्षणाचा भाग आहे, त्यासाठी तो ‘सार्वजनिक हमाम’ला भेटी देतो याचीही तिला कल्पना आहे. काही नवरे जुगार-पत्ते खेळतात, काही माफक मद्यपान करतात, तसे काही ‘हा श्रमपरिहार’ करीत असावेत, इतक्या सहजतेनं तिनं ते स्वीकारलं आहे.    

मीना स्तनाच्या कर्करोगाला सामोरी जाते आहे. मात्र तिच्यात जगण्याचा उत्सव करण्याची एक दुर्दम्य आकांक्षा आहे. ती काहीशी फटकळ, स्पष्टवक्ती स्त्री आहे. तिला आपल्या नवऱ्याच्या अद्भुत कसबाची कदर आहे, मात्र हातानं कशिदाकारी करण्याचे दिवस गेले, अशी तिची धारणा आहे. आता शिलाईमशीननं महिनाभराचं काम दोन दिवसांत होत असेल, तर ग्राहक आपल्यासाठी का थांबतील हा तिचा सवाल आहे. कहाणीची सुरुवात होते, तेव्हा मीनाचं आयुष्य ऐन मध्यावर आलेलं आहे. नवऱ्याचा व्यवसाय ओहोटीला लागलेला आहे. त्यातच एका धनाढय़ बाईनं निळय़ा रंगाच्या कफ्तानची मागणी नोंदवलेली आहे. त्यासाठी उत्तम कपडा निवडणं, निळय़ा-लाल-सोनेरी रेशमी दोऱ्यांची बंडलं विकत आणणं, झग्याला अनुरूप गुंडय़ा तयार करणं, अशी कामं सुरू होतात. मीना काऊंटर हाताळत असते. ग्राहकांना चतुराईनं सांभाळणं, पैशांचे व्यवहार हाताळणं हे तिचं कसब. आपला नवरा मान मोडेपर्यंत कष्ट करतो, मात्र त्याच्या कलेचं चीज व्हावं तेवढं होत नाही, याची तिला जाणीव आहे. या कथेतला दुसरा पुरुष युसेफ हा हालिमकडे कलाकारी शिकायला आलेला सच्चा चेला आहे. त्याला हालिमचं सुप्त आकर्षणही आहे याची मीनाला जाणीव झालेली आहे. नवऱ्याकडे आकर्षित होणाऱ्या पुरुषाबद्दल काय भूमिका घ्यावी हा तिच्यापुढे प्रश्न आहे. तो प्रश्न एक भारतीय प्रेक्षक म्हणून आपल्यापुढेही निर्माण होतो, कारण नातेसंबंधांचा हा पैलू आपण कधी आपल्याकडील चित्रपटांत फारसा पाहिलाच नाहीये. दिग्दर्शिका मरियम तौझानी हा पेच मांडते याचं कौतुक, आणि तोही (तुलनेने कर्मठ) मोरोक्कोच्या समाजात मांडते याचं अधिक कौतुक.   

आता तिघांमध्ये जणू एक खेळ सुरू होतो. मीना युसेफवर चिडलेली आहे. एकतर तिच्या प्रकृतीच्या तक्रारी आणि हालिम-युसेफमधील आकर्षणाचं नातं. त्यात आपल्या नवऱ्याचा पुढाकार नाही एवढं निश्चित, पण या युसेफचं काय? त्या तिरीमिरीत ती युसेफवर दुकानातला कपडा गहाळ झाल्याचा ठपका ठेवते, त्याच्या पगारातून पैसे कापते. युसेफही तिरीमिरीत निघून जातो. इकडे मीनाची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. ती एके दिवशी बेशुद्ध पडते. हालिम डॉक्टरला बोलावतो. डॉक्टर सांगतात, तिची झुंज संपत चाललीय. वेदना कमी करणं एवढंच आपल्या हातात आहे.

हेही वाचा >>> ‘जगी व्याधी नाही असा कोण आहे?’

हालिम एकटा पडतो. इथे दिग्दर्शिकेनं त्याच्यातला स्त्री-सेवाभाव जागृत झालेला दाखवला आहे. आगाऊ पैसे घेतलेलं, निळा महागडा कफ्तान शिवण्याचं काम टाक्याटाक्यानं पुढे चाललेलं, ग्राहकांची मागणी आणि बाजारातली स्पर्धा.. पण मीनाच्या तब्येतीपुढे तो सारं सोडून देतो. पत्नीच्या सेवेत त्याला अपार आनंद होतो. तिचे कपडे बदलणं, तिला तिची आवडती संत्री सोलून देणं, तिचे केस धुऊन देणं.. तिलाही ते सारं सुखावून टाकणारं, वेदना विसरायला लावणारं. ‘‘पंचवीस वर्षे गेली, तू माझे केस धुऊन द्यावेस असं मनात येत होतं रे!’’ ती म्हणते. ‘‘पण फार नको करू माझं, अजून काय करून घ्यावंसं वाटेल मला नेम नाही!’’ ती खटय़ाळ होते. इकडे पश्चात्ताप झालेला युसेफही परत येतो. हालिमचे डोळे पाणावतात. युसेफची आणि मीनाची नजरानजर होते. युसेफच्या समर्पणवृत्तीनं तीही विरघळते. मरणाच्या दारात माणुसकीचं मोल कळायला लागतं. कष्टानं उठून बसत ती युसेफला जवळ घेते. ‘‘तुझे पैसे कापलेला तो कपडा मला आठ दिवसांनी फडताळात तळाशी सापडला, पण मी तुला त्याची कबुली दिली नाही रे.. मला क्षमा करशील का?’’ ती रडायला लागते. युसेफला अश्रू अनावर होतात.

आता मीनानं आपल्या वागणुकीनं या दोन पुरुषांतला स्त्रीभाव जणू जागृत केलाय. जिथे लिंगभेद नाहीत, असं मनामनातलं माणूसपणाचं स्वच्छ नातं फुलायला लागलं आहे. एके दिवशी गल्लीत संगीताची तबकडी मोठय़ानं वाजू लागते. मीना खिडकीशी येते. त्या अशक्त अवस्थेतही तिचे पाय थिरकायला लागतात. ती हालिमला नाचात ओढते, युसेफला तालात खेचते. तिघंही बेभान होऊन नाचतात, आनंदानं न्हाऊन निघतात.

पण या चित्रपटाचा मुख्य विषय पार्श्वभूमीला आहेच – निळा कफ्तान कधी पूर्ण होणार? ग्राहक स्त्री मागे लागलीय. हालिम वेगानं विणू लागतो. टाका टाका कशिदा भरला जातो. कफ्तान आकार घेऊ लागतो. आकाशगर्द निळा, सोनेरी धाग्याची नक्षीदार किनार असलेला, गळय़ापासून पायापर्यंत दोनशे अंजिरी गुंडय़ा लगडलेला, स्त्रीदेहावर सजायला उत्सुक असा तो कफ्तान पाहून मरणासन्न मीनाही हरखून जाते. ‘‘पुन्हा तुझ्याशी लग्न लावावं आणि हा कफ्तान परिधान करावा असं वाटतंय!’’ ती स्वप्नात पुटपुटल्यासारखी हालिमला सांगते. हालिम आतून हलतो.

त्या रात्री तो तिच्या पायाशी बसतो. तिचे क्षीण हात हातात घेतो. ‘‘मीना, मला लहानपणापासून ‘ते’ आकर्षण होतं. खूप प्रयत्न करूनही ते दाबू शकलो नाही. तुझा मी अपराधी आहे,’’ तो गदगदतो. मीना क्षमाभावानं त्याला जवळ घेते. ‘‘तू इतका निर्मळ आहेस हालिम.. शुद्ध, पवित्र आहेस रे! तुझ्याइतका चांगला माणूस मला नवरा लाभला हे माझं भाग्य!’’

दुसऱ्या दिवशी ती युसेफला बोलावते. ‘‘कफ्तान पूर्ण होतोय. आज सुट्टी. तुम्ही दोघंही हमामला जा.’’ युसेफ तिच्याकडे पाहात राहतो.

हेही वाचा >>> ग्रासरूट फेमिनिझम : ‘अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात..’

दुसरा दिवस उजाडतो तो मृत्यूच्या गडद छायेत. अजान कानी पडते, मात्र मीना ती ऐकण्याच्या पलीकडे निघून गेली आहे. हालिम तिचा देह नजरेत, मनात भरून घेतो, आणि आपल्या हातानं कष्टानं घडवलेला तो आकाशगर्द निळा झुळझुळता कफ्तान तिला चढवतो. मीनाचा शांत चेहरा सुंदर दिसायला लागतो. दोघं देह शवपेटिकेत ठेवतात, खांद्यावर घेतात आणि बाहेर पडतात. सारे पाहत राहतात. समोर हालिम, मागे युसेफ, मध्ये आपला अखेरचा प्रवास करणारा, योग्य देह मिळालेला निळा कफ्तान! चित्रपट संपतो..

मरियम तौझानी या दिग्दर्शिकेनं अत्यंत धीटपणे हा विषय मोरोक्कोसारख्या, स्त्रियांवर अनेक निर्बंध असलेल्या देशात मांडणं, इथूनच हा चित्रपट वेगळा असल्याची जाणीव प्रेक्षकांना व्हायला लागते. मात्र केवळ दिग्दर्शिका स्त्री असल्यानं चित्रपट ‘फेमिनिस्ट’ होत नाही, तर देहानं पुरुष असलेल्या दोन पात्रांतील स्त्रीभाव मीना कसा जागृत करते, हा चित्रपटाचा गाभा माझ्या मते त्याला ‘स्त्रीत्व’ प्रदान करतो. हालिम केवळ धाग्यांचा कफ्तान विणतो, मीना नातेसंबंधांचा निळारेशमी कफ्तान विणते, मृत्यूच्या छायेत विणत जाते, त्याच्या सावलीतच तो कफ्तान परिधान करून अंतिम यात्रा करते.

मरियमनं यापूर्वीही काही विषय हिमतीने मांडले आहेत. तिचा पहिला माहितीपट मोरोक्कोतील वेश्यांचं जीवन टिपणारा. त्यावर मोरोक्कोत बंदी घातली गेली, मात्र जगानं त्याची दखल घेतली. दुसरा २०१९ मधील ‘अडॅम’ एका कुमारी मातेची कहाणी मांडतो. तोसुद्धा ‘कान्स फेस्टिव्हल’ला गाजला.

या चित्रपटाची नायिका लुबना अझाबाल ही अतिशय बोलक्या चेहऱ्याची अभिनेत्री. नवऱ्याच्या विशिष्ट संबंधांना सामोरं जाणारी, आजाराच्या असह्य वेदना सहन करणारी आणि कणाकणानं मरताना आपल्या वाटय़ाला उरलेल्या क्षणाक्षणाचा उत्सव करणारी स्त्री तिनं आपल्या अभिनयानं जिवंत केली आहे. स्तनाचा कर्करोग झाल्यानं तिचा एक स्तन काढून टाकण्यात आला आहे. अशा शस्त्रक्रियेनं आपल्या स्त्रीत्वात न्यून निर्माण झाल्याची अनेक पीडितांची भावना नैसर्गिक; याची एका अतिशय उत्कट प्रसंगात ती हालिमला जाणीव करून देते. स्त्रीचं ‘स्त्रीत्व’ कशात आहे? देहात की मनातल्या देह-प्रतिमेत? कार्ल युंग हा एक स्वीडिश मनोविकारतज्ज्ञ. त्यानं फ्रॉईडच्या संकल्पनांना वैयक्तिक मनाच्या वर्तुळातून वैश्विक अनुभवांच्या (‘कलेक्टिव्ह अन्कॉन्शस’) पातळीवर नेलं. कार्ल युंगच्या एका सिद्धांतानुसार प्रत्येक पुरुषाच्या मनात एक स्त्री-प्रतिमेचा कोपरा आहे. त्याला तो ‘अ‍ॅनिमा’ असं म्हणतो. तसंच स्त्रीच्या मनातही पुरुष-प्रतिमेचा भाग आहे, ज्याला तो ‘अ‍ॅनिमस’ म्हणतो. युंगच्या तत्त्वानुसार आपल्या मनातील या स्त्री-प्रतिमांची ओळख पटवून घेणं, तिचा स्वीकार करणं आणि तिला स्वत:च्या व्यक्तिमत्त्वात सामावून घेणं ही परिपक्वतेची अखेरची पायरी आहे. मीनानं आपल्या मनातील हा स्त्री-प्रतिमेचा भाव मरता मरता आपल्या नवऱ्याच्या मनात जागा केला आहे. आपल्या शस्त्रक्रिया झालेल्या, काढून टाकलेल्या स्तनावरनं ती त्याचा हात फिरवते, तत्क्षणी आपल्याला जाणीव होते, की स्त्रीत्व केवळ देहानं सिद्ध होत नाही हे ती त्याला सांगते आहे. ती त्याच्या मनातील ‘अ‍ॅनिमा’ जागृत करते आहे. या प्रसंगानं थरारून जायला होतं.

हेही वाचा >>> मला घडवणारा शिक्षक : ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाचे गर्गे सर

या चित्रपटाचं वैशिष्टय़ हे, की तो ‘स्त्रीवादा’ची व्याख्या नव्यानं करायला लावणारा, नव्या जगाचं नवं वास्तव मांडणारा अनुभव देतो. स्त्री-मुक्तीची चळवळ स्त्रीच्या हक्कप्राप्तीपासून सुरू झाली असेल, आता तिची व्याप्ती स्त्री-भाव जागृतीपर्यंत पोहोचायला हवी, याची जाणीव तो करून देतो. स्त्रीत्वाचा मक्ता आणि जबाबदारी फक्त स्त्रीपुरती सीमित नाही याचीही जाणीव करून देतो. मुख्य म्हणजे प्रेम हे लिंग-निगडित नाही, त्याचा देहाशी संबंध नाही, तो जर शुद्ध भाव असेल, तर सम आहे की भिन्न यानं फरक पडत नाही, याची जाणीव एका स्त्रीच्या माध्यमातून करून देतो.

हा चित्रपट संवादाचा नाही, तो त्रोटक संवादामधील अथांग स्त्रीत्वाचा आहे आणि त्याला तिघांनीही न्याय दिला आहे. मात्र मीनाच्या स्त्रीभावाने विणलेला हा निळा कफ्तान स्त्रीच्या ठायी असलेल्या नभासारख्या असीम प्रेमभावाची निळी डूब देतो, ती  अनुभवण्यासारखी..       

nmmulmule@gmail.com