पालकत्वाच्या प्रवासाचा अनुभव घेताना प्रभावी शैलीला, ‘अ’भावी शैलीची जोड मिळाली तर पालकत्वाचा प्रवास सुकर होण्याची शक्यता वाढते. ‘अ’भावी पालकत्व हा प्रभावी पालकत्वाचा पर्याय नसला, तरी प्रभावाकडून ‘अ’भावाकडे जाण्याकरिता काय करायला हवे ?
* बोहेमीयन रास्पोडी’ हा चित्रपट ‘क्वीन’ नावाच्या पाश्चात्त्य संगीतामधल्या बॅण्डवर आधारित आहे. त्यात फारुख बलसारा हा भारतीय कलाकार होता.
* घोस्ट नेट्स’ म्हणजे विविध कारणांनी समुद्रतळामध्ये साठून राहिलेली मासेमारीची जाळी. त्यामुळे सागरी प्राण्यांना तर धोका असतोच, पण प्रवाळसमूहांवरही त्याचा वाईट परिणाम होतो.
* फॉर्म्युला वन’मधील गाड्यांच्या इंजिनच्या रचनेत तसेच त्या गाड्यांच्या इंधनाच्या गुणधर्मामध्ये पर्यावरणपूरक बदल करण्यात येत आहेत.
अशा अनेक विषयांमधली माझी समज वाढवण्याचे काम शंभर टक्के माझ्या मुलाचे, कबीरचे आहे. जागतिक राजकारणापासून ते नव्या पिढीतील भारतीय सिनेदिग्दर्शकांपर्यंतच्या विविध माहितींचे स्राोत तो माझ्यापर्यंत पोहोचवतो. ‘वन्यजीवन’ आणि ‘फुटबॉल’ हे त्याच्याकडून आमच्या घरात शिरले. त्याला आता दोन दशके होतील. पालक म्हणून आपण ‘ऐकायचे जास्त’ हे मला तेव्हाच समजले. शिवाय माझेही कुतूहल जागृत व्हायचेच. ‘पाश्चात्त्य संगीत’ हा विषय त्याच्या वाढत्या वयात माझ्या मनात घुसला. सकाळी मनात येणारे एक ‘आपोआप गाणे’ आपण गुणगुणतो. बॉब डिलनचे गाणे मी गुणगुणत असताना त्याने टाकलेला मान्यतेचा कटाक्ष माझ्या स्मरणात कायमचा आहे.
आमच्या नात्याला, माझ्या या शिकण्याच्या सवयीचा फायदा असा झाला की, क्रिकेट, भारतीय संगीत हे माझे विषय त्याच्या अंगणात गेले. आम्हा दोघांची पुस्तक हाताळणीची सवय वेगळी आहे. म्हणजे मी महत्त्वाच्या वाक्यांना ‘अंडरलाइन’ करतो, पुस्तकाच्या समासांमध्ये लिहितो… मात्र त्याच्या जुन्या पुस्तकाची प्रतसुद्धा कोरीच दिसते. म्हणूनच निवडक पुस्तकाच्या दोन-दोन प्रती आमच्या घरी आहेत. संघर्ष टाळणे हे एक कौशल्य, पण संघर्ष कमीत कमी होऊन समजूत वाढण्यासाठी पालक म्हणून मी स्वत:ला लावलेल्या सवयींच्या गठ्ठ्याचे नाव आहे, ‘अ’भावी पालकत्व. हा पालकत्वाचा अभाव नक्कीच नाही.
मनआरोग्य क्षेत्रामध्ये काम करताना ‘पालकत्व’ या विषयावर चर्चा, भाषणे, टॉक-शो सादर करण्याचे प्रसंग वारंवार असतात. त्यात माझा एक मुद्दा असतो. आदर्श पालक अस्तित्वात नाही, परंतु आपण प्रभावी पालक बनू शकतो (Ideal Vs Effective). या मांडणीचे पुढचे पाऊल आहे प्रभावाकडून ‘अ’भावाकडे. या तीन शब्दांना समजून घेऊ.
‘प्रभावी पालकत्व’ म्हणजे आपले मूल हा आपला अंतर्गत घटक नव्हे, तर एक स्वतंत्र अस्तित्व आहे याची जाण ठेवणे. ‘आदर्श’ भूमिकेमध्ये माझ्या बिनचूक असण्याचा अट्टहास असतो. सल्ल्यांचा मारा असतो. हुकूमनामेही निघू शकतात. तिथे प्रेमाची पण ‘सत्ता’ असते. कष्टांचा आणि फळांचा (वर्तमान आणि भविष्यातील) हिशोब असतो. आपली आणि मुलांची इतरांबरोबरची तुलना असते. मुलांच्या प्रगतीवर पालकाचे माणूस असण्याचे मूल्य अवलंबून असते. ‘झाली असतील सर्व क्षेत्रांत यशस्वी, पण मुले कशी झाली पाहा,’ असा उपहास याच भूमिकेतून येतो. प्रभावी शैलीमध्ये आपण पालक म्हणून (स्वत:ला आणि मुलांना) सहमतीकडे नेतो. सल्ला असला तरी तो मत म्हणून दिला जातो. कोणताही निर्णय घेताना मुलाच्या भूमिकेला योग्य महत्त्व देतो. भर संवादावर असतो.
‘अ’भावी पालकत्वामध्ये अशी भूमिका असते की कान देऊन ऐकायचे, फक्त पाहायचे नाही तर ‘अवलोकन’ करायचे परंतु जरूर पडेपर्यंत कृती करायची नाही. आदर्श पालक मुलाला सायकलवर पुढे बसवून हॅण्डल धरायला, घंटी वाजवायला सांगतो. आणि स्वत: सायकल चालवतो. प्रभावी पालक मूल सायकल चालवताना आजूबाजूला असतो. ‘अ’भावी पालक मुलाला शिकवतो की, सायकलला आधारचाके कशी लावायची, कधी काढायची. नंतर तो मुलाच्या हातात त्याची गती आणि प्रगती देतो. दुरून निरीक्षण करतो. जिथे मूल स्वत:हून पारंगत होण्यात अडचण दिसते ती अडचणीची परिस्थिती तो टिकू देतो. ओढाताण खूप होते आहे आणि विकासाची उद्दिष्टे धोक्यात आली असं वाटलं तरच तो मदतीला उतरतो. मुलाच्या चेहऱ्यावरच्या भावभावना मात्र तो टिपत राहतो. त्यात वेदना, दु:ख दिसले की आस्थेचा प्रतिसाद देतो, बहुतेक वेळा स्वत:च्या डोळ्यांमधून, चेहऱ्याने आणि जरूर पडल्यास कृतीतून. इथे सल्ल्याचे प्रमाण फार तर पाच टक्के असते.
लिहिण्याच्या ओघामध्ये इथे ‘पुरुषवचन’ वापरले गेले आहे. मात्र ते आई आणि बाबा या दोघांनाही लागू आहे. आणि आपली मांडणी जीवशास्त्रीय पालकत्वापुरती मर्यादित नाही. शिक्षकांसारखे सामाजिक पालक, उद्याोग-व्यवसाय क्षेत्रात सहकाऱ्यांना तरबेज करण्याचा प्रयत्न करणारे वरिष्ठ हे सारे त्यात येतील. महत्त्वाचे म्हणजे ‘अ’भावी पालकत्व हा प्रभावी पालकत्वाचा पर्याय नाही. त्यांचे नाते वरणभाताचे आहे. प्रमाण मात्र व्यक्तीच्या वृत्तीप्रमाणे ठरवायचे आहे.
समजून घ्यायला सोपे म्हणून आपण मुलांच्या वृत्तीचे तीन प्रकार करू. खरे तर प्रत्येक मुलात या वृत्ती असतातच आणि त्यांचे प्रमाण वेगवेगळ्या टप्प्यांवर बदलू शकते.
पहिला गट आहे ‘स्वयंभू’ मुलांचा. हे लहानपणापासून स्वतंत्र वृत्तीचे असतात किंवा एका टप्प्यावर ही वृत्ती सुप्तावस्थेतून जागृत होते. यांना प्रभावी पालकत्वाची शैलीसुद्धा त्यांच्या वैयक्तिक जीवनातील ढवळाढवळ वाटते. इथे ‘अ’भावी पद्धत खूपच महत्त्वाची. आस्थापूर्वक निरीक्षण आणि नेमक्या शब्दात वास्तवातील मोके आणि धोके यांचे ज्ञान, एवढेच द्यायचे. त्यांच्या आवडी, निवडी, नाती, सवयी यांच्याकडे पाहताना लेबले टाळायची. एखादी सवय वाईट असे सरसकट म्हणण्यापेक्षा ‘या सवयीचा हा भाग त्रासदायक असू शकतो,’ असे म्हणायचे. ‘मदत हवी आहे,’ हे वाक्य आल्याशिवाय धावायचे नाही. पण निरीक्षण मात्र सियाचेनवरील सैनिका- सारखेच तीक्ष्ण. त्यांच्यामधल्या तेज बाण्याच्या उत्तम उदाहरणांचे कौतुक करायचे. पाठीवर कौतुकाची थाप द्यायची, पण ताबडतोब. ‘कमीत कमी प्रभाव’ हे सूत्र.
दुसरा गट आहे, पालकांवर भावनिक दृष्टीने जास्त अवलंबून असणाऱ्यांचा. इथेही ‘अ’भाव शैली महत्त्वाची, कारण या गटाला तुम्ही जितकी जास्त मदत कराल तेवढी थोडी असते. त्यातून भावनिक परावलंबन वाढण्याचा धोका आहेच. भावनिक पाठिंबा द्यायचा, पण आधाराला गृहीत धरण्याची सवय लावायची नाही. ‘मला समजून घ्या’ अशा अत्यंत दारुण नजरांनाही, ‘समजून घेतो आहोत, पण समोरचे युद्ध तुलाच लढायचं आहे’ ही भूमिका हवी.
तिसरा गट आहे, बंडखोर आणि अवखळ वृत्तीच्या मुलांचा. इथेही पालकांच्या प्रभावी शैलीचा फारसा उपयोग होत नाही. जसजसा वयाचा टप्पा वाढतो तसा प्रभाव कमी होत जातो. मुलाची ही बंडखोर वागणूक अनेकदा व्यसनाधीनता, गुन्हेगारी असे गंभीर प्रश्न पुढे आणते. अशावेळी पालक म्हणून आपल्या शक्तीच्या मर्यादा मान्य करत स्वत:ला अतिभावनिक होण्यापासून वाचवावे लागते. ‘अभागी पालक’ हा शिक्का समाज नंतर लावतो, पालक प्रथम लावतात स्वत:वर. अशा स्थितीमधून जाताना ‘जे घडले त्यामध्ये माझे पालकत्व हा एकमेव घटक नव्हता’ हे पालकांना समजून सांगावे लागते. पाऊसमान सारखेच असताना मातीचा कस, शेतकीचे तंत्र, बियाणांचा दर्जा अशा अनेक घटकांवर येणारे पीक अवलंबून असणार, असे समजावून सांगायला लागते.
थोडक्यात, प्रभावी शैलीला, ‘अ’भावी शैलीची जोड मिळाली तर पालकत्वाचा प्रवास सुकर होण्याची शक्यता वाढते. ‘डिझाइन थिंकिंग’ या नव्याने प्रगत होणाऱ्या शास्त्रात सांगितले आहे की, कोणतीही ‘रचना’ अथवा ‘निर्मिती’ करताना त्यामागचा मूलभूत हेतू पक्का हवा. प्रभावी पालकत्वामध्ये आहे मुलाच्या विकासात पालकाचा डोळस हातभार. ‘अ’भावी पालकत्वात आहे आपला सहभाग कमीतकमी आणि नेमका ठेवणे.
डिझाइन-विज्ञानात शब्द वापरला आहे, शुभ्र अवकाश म्हणजे व्हाइट स्पेस. तुमची रचना ठाशीवपणे, हेतूला पुढे आणत असेल, पण तोल राखण्यासाठी मध्ये मध्ये यायला हवा, अभावाचा अवकाश. एक चिंतनशील शांतता. प्रभावी शैलीतील घालमेल थांबवणारी. आता असे समजूया की प्रभावी-‘अ’भावीच्या योग्य संतुलनामधून आपण, पालक म्हणून अशा टप्प्यावर आलो की, आपले मूल पंचविशीच्या टप्प्यावर आले आहे. भावनिक अतिगुंतवणूक टाळण्यासाठी आपल्याला आता ‘अ’भावी पालकत्व स्वीकारण्याची गरज सर्वांत जास्त आहे.
मुलांची मुले मोठी झाली तरी भावनिक गुंता तसाच ठेवणारी मंडळी मी पाहतो तेव्हा हे खूपच जाणवते. ‘अ’भावी पालकत्वाचा एक महत्त्वाचा पैलू आहे, स्वत:चे विचार, भावना, वर्तन सतत तपासत राहणे. कशासाठी?…तर मुलांचे निरीक्षण आणि त्यातून शिकण्याची क्षमता विलक्षण असते म्हणून. स्वत: अधिक चांगला माणूस बनण्याचा दैनंदिन प्रयत्न म्हणजे ‘अ’भावी पालकत्व. अशा प्रसंगी, व्याख्याने देणे आपोआप कमी होते. इंग्रजीत ज्याला रोल मॉडेलिंग असे म्हणतात. तो ‘अ’भावी पालकत्वाचा पायाच आहे. दोन्ही झाडांच्या मूळांची भूमिगत गुंतवणूक होते तिथे. कुणीही कुणाला न सांगता जो बदल घडवायचा आहे तो स्वत:च व्हा या बापूवचनाचे हेच तर सार आहे.
सुखदा, माझी मुलगी, तिच्या मुलाला, अंगदला वाढवताना त्याच्या वयाच्या दुसऱ्या वर्षांपासून त्याला ‘उपलब्ध पर्याय’ कोणते आणि त्यातली ‘निवड’ करायची सवय लावू लागली. अंघोळीनंतर घालायचा टी-शर्ट असो की नाश्त्याचे पदार्थ. त्याने निवड करायची. त्या निवडीची ‘जबाबदारी’ घ्यायची. त्या मुलाच्या आयुष्यातली महत्त्वाची निवड असते ती. वयाच्या पाचव्या वर्षाकडे आगेकूच करणारा अंगद आता काही प्रसंगांमध्ये स्वत:च्या मातापित्यांना पर्याय सांगू लागला आहे. त्याची ती इवली बोटे तो नाचवतो आणि ते बोलतो तेव्हा मलाही कळते की हा ‘अ’भावी पालकत्वाचा पुढचा अंक. आपण आजोबा म्हणून त्यांच्या पालकत्वाच्या प्रवासाला फक्त अवलोकन करायचे. तो ‘आपला’ प्रवास नव्हे हे लक्षात ठेवायचे. परंतु मुलांच्या आणि नातवंडांच्या माध्यमातून होणारे स्वत:चे जीवनशिक्षण काही सोडायचे नाही.
उपनिषदांमध्ये म्हटले आहे की, सर्व नाती शेवटी ‘स्वत:’साठीच असतात. सत्ता आणि गुंतवणुकीसाठी नव्हे तर शहाणपणाचे कण टिपण्यासाठी. ‘अ’भावी पालकत्व म्हणजे कृतज्ञता. आमच्या बाबाने (अनिल अवचट) पालकत्वामध्ये मुलांकडून शिकण्याचा मुद्दा त्याच्या लेखनामध्ये वारंवार सांगितला आहे. त्यापुढचे पाऊल म्हणजे या मुला-नातवंडामध्ये असलेले, ‘गुरू’पण पाहणे. त्यांच्यापुढे नम्र होणे. मनोविकासाचा एक उत्कृष्ट मार्ग या पालकत्वामुळे माझ्या जगण्यामध्ये आला. त्यामध्ये जी भर माझ्याकडून घातली गेली ती मानवतेच्या जीवनयज्ञामधली समीधा होती. त्यात ‘माझे’ असे काहीच नव्हते.
आम्ही मनस्वास्थ्य उपचारक सांगतो की, पालकत्वाच्या प्रवासाचा आस्वाद घ्या. ‘अ’भावी पालकत्वाची जोड मिळाली तर आपण मुक्काम आणि प्रवास या दोन्हीवरचा ‘हक्क’ आणि ‘हेका’ अशा दोन्ही गोष्टी सोडू शकतो. आपल्या मुलांमध्ये आपण स्वत:ची प्रतिमा पाहातो आणि आपल्या अस्तित्वाचा ‘नवा सीझन’ पाहातो. पालकत्वाकडे जबाबदारी म्हणून पाहतो, तिचे ओझे घेतो आणि मुले मार्गी लागण्याच्या सर्वमान्य व्याख्येभोवती आपल्या साऱ्या स्वत्वाची चौकट उभारतो. मुले यशस्वी होणे हे आपले नोबेल पारितोषिक बनणे यामध्ये आत्मविकासाची वाट खंडित झाली, हे आपल्याला कळत नाही. कारण हा मार्गच मुळी बक्षिसाचा नाही. त्यांच्या माध्यमातून स्वत:चे स्वत:ला गवसणे महत्त्वाचे.
चुकांमधून हसत शिकणे, वेदना आणि अपयशालाही आपले मानणे आणि त्यांच्या यशामध्ये भागीदार होण्यापेक्षा जवळचे साक्षीदार होता येणे म्हणजे ‘अ’भावी पालकत्व. आणि मुलांच्या कर्तृत्वाला मिरवणे हे आहे मानभावी पालकत्व. ‘अ’भावी पालकत्वाचा आणखी एक फायदा आहे. पिढ्यापिढ्यांतून येणाऱ्या वंशशास्त्रीय वारशामधल्या कोणत्या भागाला, खुले वाहण्याची मुभा द्यायची हे सततच्या परीक्षणातून कळते. कोणत्या प्रवाहाला वळण द्यायचे हे जसे कळायला हवे तसा कोणता प्रवाह खळाळत पुढे जाणार हे उमजायला हवं ना… माझ्या वडिलांपासून माझ्या नातवापर्यंतच्या चार पिढ्यांचे माझे अवलोकन सांगते की, ‘कुतुहल’ नावाची गोष्ट आमच्या सर्व पिढ्यांमध्ये आहे. हा वारसा ओळखून त्याला प्रसंगी वळण लावणे (म्हणजे ‘प्रभाव’) जितके महत्त्वाचे तितकेच, फार काही न करता त्याला आपोआप वाहते ठेवणे (म्हणजे ‘अभाव’) तितकेच महत्त्वाचे नाही का ! ‘अ’भावी शैलीमध्ये कुतूहल शमवण्याच्या मुलूखगिरीचा आनंद महत्त्वाचा असतो. तिथे प्रावीण्याची अट नसते. कोणत्या विषयामध्ये पारंगत व्हायचे आणि त्याला स्पर्धात्मक बनवायचे यामध्ये मुलाच्या अनुभवाला महत्त्व दिले जाते.
प्रभावी पालकत्वामुळे समाधानाची सम गाठता येते, पण चीज संपल्यानंतरची शांती, सूरांच्या अभावातून येत असते. दोन्ही एकरूप झाल्याविना नादब्रह्माची निर्मिती कशी होणार! शिवाय मधूनमधून ‘आदर्श’ पालकत्वाचा कणसूर येणारच. त्यालाही ओळखायचं, बदलायचं आणि पुढच्या अनुभवाच्या मैफिलीसाठी विचारभावनांचे तानपुरे जुळवायला घ्यायचे.