– डॉ. शुभांगी पारकर pshubhangi@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्याला हवं तसं आयुष्य जगायला न मिळणं आणि ते मिळवण्याचं धाडसही गोळा न करू शकणं यामुळे एखादा माणूस स्वत:चं आयुष्य संपवू शकतो; पण आपल्याला त्याचं मन कसं कळलं नाही, आपण त्याला वाचवू शकलो असतो, असा अपराधी भाव मनात बाळगून स्वत:चं आयुष्यही मातीमोल करणाऱ्या त्याच्या जवळच्या माणसांनी वेळीच सावरायला हवं, अन्यथा ते आयुष्यही मृतवत ठरू शकतं; त्यांना आणि त्यांच्या आप्तस्वकीयांनाही.

प्रत्येकाच्या आयुष्याचा एक प्रवाह असतो. तो प्रवाह सहजासहजी थांबत नाही. प्रत्येकाच्या प्रवाहाची दिशा वेगळी असते, वेग भिन्न असतो, प्रवाहाला वेडीवाकडी वळणं असतात; पण तो वाहत राहतो. या प्रवाहातलं माणसाचं जगणं तसं पाहिलं तर विवादित आहे. हा विवाद माणसाची जीवनाला मुरड घालायची गरज आणि निसर्गाची स्वच्छंद वागणूक, ज्यामध्ये असीमित अनिश्चितता आहे, या दोघांमधला असतो. एकदा का हा विवाद आपण मान्य केला, की आपण आपल्या जीवनाच्या प्रवाहात पोहायला तयार होतो. पण एखादी व्यक्ती आयुष्याला सतत विरोध करत राहिली, तक्रारी करायला लागली, की आपल्या निसर्गदत्त जगण्याच्या प्रवाहात आपण अनेक अडथळे निर्माण करतो. या व्यक्ती वेगळ्या असतात म्हणून कधी कधी आयुष्याच्या प्रवाहात नैसर्गिकपणे पोहणं त्यांना जमत नाही हे खरं.

राजन हा एक अशाच प्रकारचा माणूस होता. शिल्पा- त्याची लहान बहीण, तो जसा तिला समजला होता तसा तिच्या शब्दांत रंगवत होती. ती माझ्याकडे तिच्या नवऱ्याबरोबर आली होती; किंबहुना तिच्या नवऱ्यानं तिची मन:स्थिती बरी नसते म्हणून तिला बळेबळे आणलं होतं. शिल्पाची ही मन:स्थिती तिच्या भावानं मागे ठेवलेल्या अनेक स्मृतींशी जोडलेली होती. राजन आणि शिल्पा हे बहीण-भाऊ शेतकरी कुटुंबात जन्मलेले. राजन शिल्पाचा मोठा भाऊ. तिचे वडील आणि काका आणि त्यांची सहा मुलं  धुळय़ाजवळच्या एका गावात राहणारे. हे सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंब गावात शेती करून उदरनिर्वाह करत होतं. शेती तर होतीच, पण आपल्या मुलाबाळांनी थोडंफार शिकावं, घरातल्या मुलांनी बदलत्या परिस्थितीनुसार शहरात जाऊन नोकरीधंदा करावा, जेणेकरून कुटुंबाच्या उत्पन्नात भर पडेल आणि काहीसे सुखाचे दिवस येतील, मुलीला चांगलं सासर मिळेल, अशी शिल्पाच्या वडीलधाऱ्यांची अपेक्षा. खाण्यापिण्यानं सुखी, पण अधिकची मौजमजा आणि चैन कुटुंबाला जमणारी नव्हती. घरातली सगळी मुलं समजून घेणारी, अंथरूण पाहून पाय पसरणारी होती. थोरले दोघे भाऊ पदवीधर होऊन मुंबईत जम बसवण्यासाठी पोहोचले होते. तर दुसरे दोघे भाऊ शेतीत लक्ष घालणार होते. राजननं काय करायचं हे त्याच्या ‘बी.कॉम.’नंतर ठरणार होतं. शिल्पानं कॉलेज पूर्ण करायचं आणि सुयोग्य स्थळ मिळालं तर तिचा बार उडवायचा असंही ठरलेलं होतं.

राजन चार-पाच वर्षांचा असतानापासून त्याचा एक वर्गमित्र होता. त्याच्या वडिलांच्या गणेशमूर्ती बनवायच्या कारखान्यावर तो जात असे. त्याला ती मूर्ती बनवायची कला खूप आवडत असे. इतर मुलं मिळालेल्या मोकळ्या वेळात हुंदडायची, पतंग उडवायची, खेळायला जायची, पोहायला जायची, टायरमध्ये झोके घ्यायची; पण राजन मात्र वेळ मिळेल तेव्हा त्या कारखान्यात जाऊन शाडूच्या मातीत हात घालून बसायचा, ती मळायचा. तेथील इतर कलाकारांकडून शिकत शिकत तो मित्रांबरोबर स्वत: मूर्ती करायला शिकू लागला होता. घरीसुद्धा सगळे त्याचं कौतुक करत. मूर्तिकाम त्याला खूप भावत असे. काही कलाकार लहानपणापासून निसर्गत: जोपासले जातात. ती कला घडवताना त्यांची मन:स्थिती त्यात पूर्णपणे गुंतलेली असते, केंद्रित झालेली असते. भान हरपून, स्वत:ला विसरून कलानिर्मितीचा ते आनंद घेतात. या कलेमुळेच आपण उत्क्रांत होत आहोत, आपली सक्षमता वाढते आहे असं त्यांना वाटतं. राजन त्याचं बालपण, किशोरावस्था आणि तारुण्य या सगळय़ा काळाच्या टप्प्यांतून प्रवास करताना शिल्पकलेशी असा एकरूप होत चालला होता, की यातून आपल्याला पैसा किंवा सौख्य मिळेल की नाही याचा विचार त्याच्या ध्यानीमनी नव्हता. कलेच्या त्या सर्जनशीलतेत एक उन्नत ऊर्जा सापडत जाते याचं अंतज्र्ञान त्याला होऊ लागलं होतं. मूर्ती घडवताना त्याला ना खाण्यापिण्याची जाणीव असे, ना वास्तवाची शुद्ध; पण राजन जसजसा वास्तवाच्या दुनियेत प्रवेश करू लागला, तसे त्याच्या विलक्षण छंदामुळे आतापर्यंत कौतुक करणारे कुटुंबीय आता मात्र त्याचा रागराग करू लागले. सुरुवातीला लहान आहे, कलाकाराचं मन आहे, म्हणून त्याच्या छंदाकडे वडीलधाऱ्यांनी दुर्लक्ष केलं, पण नंतर मात्र तो अभ्यासात मागे पडू लागला. घरातील इतर मुलांच्या तुलनेत तो मागे राहू लागला, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, तो अभ्यासापेक्षा आपला सारा वेळ मूर्तीच्या कारखान्यात घालवतो. ते शेतकरी कुटुंब आपल्या गाठीशी असलेल्या पै-पैक्याच्या बेरीज-वजाबाकीतून शक्य होईल तिथे मुलांचं कोडकौतुक पुरवत होतं. त्यांनी सगळय़ांना होईल म्हणून एक सायकलही मुलांना घेऊन दिली होती; पण त्यातही न रमता राजन मूर्तिकामातच मग्न असे. इतर गोष्टींत मनमिळाऊ आणि सहकार्य करणारा राजन आता घरातल्यांनासुद्धा मानत नव्हता. त्याच्या स्वभावाचा एक महत्त्वाचा पैलू सगळय़ांच्या लक्षात यायला लागला होता, तो म्हणजे आपल्या छंदावर अलोट प्रेम करणारा राजन प्रचंड रागीट स्वभावाचा झाला होता. मूर्तिकामाविषयी त्याला टोकलं, की निराशेच्या भरात तो खूप चिडायचा. दहावीत त्याला कमी गुण मिळाल्यानं त्याचे वडील खूप चिडले, त्यांची शाब्दिक बाचाबाचीही झाली. ‘‘आम्ही पोटाला चिमटे काढतो ते तुम्हा लेकरांसाठीच; पण तुझं काय चाललं आहे हुंडारण्याशिवाय आणि फालतू मूर्ती बनवण्याशिवाय..’’ त्यांच्या या अपमानास्पद शब्दांनी तो आईनं विनवणी करेपर्यंत चार दिवस जेवलाही नव्हता. बारावीत थोडे बऱ्यापैकी गुण मिळवल्यानं त्याला धुळय़ालाच कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. शिल्पाही दहावीनंतर तिथेच गेली. दोघंही भावंडं बरोबर जात-येत होती. दोन वर्ष त्याच्या घरी आणि कॉलेजमध्ये त्यानं बनवलेला, सुंदर रंगसंगतीनं नटलेला गणपती बसवला होता. लोकांनी तोंडभरून त्याची स्तुती केली होती. घरच्यांनाही त्यानं बनवलेला गणपती खूप आवडला होता, पण राजननं मूर्तिकाम करत आयुष्य घालवावं हे घरी कुणाला आवडलं नव्हतं. शहरात जाऊन नोकरी नसेल करायची, तर पुढे त्यानं घरच्या शेतीत लक्ष घालावं, असं त्याला सुचवलं गेलं; पण त्याला इतर गोष्टींमध्ये जराही रस नव्हता. शिल्पाला भावाच्या जिवाची घालमेल आणि चिडचिड समजत होती. नंतर नंतर त्याचं खाण्यापिण्यात लक्ष नसायचं, मनाला तरतरी नसायची. त्याच्या इतर कामांत त्याला रस नसायचा. कदाचित त्याचाच परिणाम त्याच्या अभ्यासावर झाला असावा. शिल्पा आणि राजन बहुधा एकत्रच असायचे. त्यामुळे तिला त्याच्या मनातील गोष्टी माहिती होत्या. आपणही गणपतीच्या मूर्तीचा व्यवसाय करावा म्हणजे आपला छंद आणि अर्थार्जन यांचा योग जुळून येईल अशी त्याची मनीषा होती. कॉलेजच्या शेवटच्या वर्षी मुंबईला असणाऱ्या त्याच्या भावानं, त्यानं मुंबईत येऊन अकाऊंट्सचं काम करावं, असं सुचवलं आणि तशा नोकरीचा बंदोबस्तही केला. राजननं त्याला ठामपणे विरोध केला. त्यावरून त्याचं आणि त्याच्या वडिलांचं कडाक्याचं भांडण झालं. वडिलांनी रागाच्या भरात त्याला सुनावलं. ते त्याला ‘भुईला भार’ म्हणाले. त्याला जन्माला नसता घातला तर त्या सर्वाचं जीवन सुखासमाधानात गेलं असतं, असे विखारी बोल त्यांनी त्याला सुनावले. बापलेक दोघंही इरेस पेटले होते आणि दोघांचाही तोल ढळला होता. घरातलं तप्त वातावरण शांत व्हायला बराच अवधी लागला. काही दिवसांनी नेहमीप्रमाणे घरात गणेशोत्सव साजरा झाला. या वर्षीही राजननं बनवलेली साजिरीगोजिरी गणेशाची मूर्ती घरी सगळय़ांनी प्रतिष्ठापित केली. सण आनंदात साजरा झाला; पण बापलेकांनी मात्र एकमेकांशी संवाद साधला नाही. अकरा दिवसांनी गणेश विसर्जन झाले आणि बाराव्या दिवशी सकाळी ७ वाजता गावातल्या ओळखीच्या माणसानं शेतातील आंब्याच्या झाडावर फासावर लटकलेला राजनचा मृतदेह पाहिल्याची माहिती दिली. सगळे शेताकडे धावले. गणेश विसर्जन करत राजननं आपलीही इहलोकीची यात्रा विसर्जित केली होती. त्यानंतर तब्बल १५ वर्षांनी शिल्पाचा नवरा तिला आमच्याकडे उपचारांसाठी घेऊन आला होता.

शिल्पाचं शिक्षण पूर्ण होऊन १२ वर्षांपूर्वी श्रीराम यांच्याशी तिचा विवाह होऊन ती मुंबईत राहत होती. Grief sucks… everyone ever या उक्तीनुसार शिल्पाचं कुटुंब राजनच्या तशा अनैसर्गिक जाण्यानं उद्ध्वस्त झालं होतं; पण शिल्पा त्या सगळय़ांपेक्षा अधिकच अस्वस्थ होती. श्रीराम यांनी सांगितलं, की गेल्या १२ वर्षांत त्यांनी त्यांच्या पत्नीला कधी मनापासून आनंदित झाल्याचं पाहिलंच नव्हतं. सगळं कसं यांत्रिकपणे होत होतं. लग्नप्रसंगात भावाच्या आठवणीनं ती गदगदली होती. आपण नववधू आहोत, आपलं लग्न झालं आहे, याचं तिला काही अप्रूप किंवा आनंद वाटला नव्हता. तिचं माहेर सोडताना कुणाचा तरी मृत्यू झाला असावा अशी ती ढसाढसा रडली होती. घरी आल्यावर तिला शांत करण्यात, तिचे अश्रू थोपवण्यात सासरची मंडळी इतकी मग्न झाली, की घरात आनंदी वातावरण असायला पाहिजे, लग्न सोहळा आहे, याचा जवळजवळ सगळय़ांना विसर पडला होता. श्रीराम उद्वेगानं आणि निराशेनं भडाभडा बोलत होता. श्रीराम तिच्या भावाचा मित्र. तो कुटुंबाला चांगला ओळखत होता. भावाच्या आत्महत्येमुळे शिल्पाचं लग्न जमत नव्हतं हे त्याला कळलं होतं. त्यात तिचा तरी काय दोष, असा विचार करून आणि शिवाय त्याला ती आवडली होतीच म्हणून हे लग्न झालं होतं. भावाच्या आत्महत्येची काळी छाया शिल्पाच्या आयुष्याला जणू व्यापून उरली होती. तिच्या घरात कुठलाच सण किंवा समारंभाचा आनंद शिल्पाला घेता येत नव्हता. आपला भाऊ असा कसा आपल्या बहीणभावाच्या नात्यातल्या विश्वासाला तडा देऊन निघून गेला, याची बोच तिच्या मनी होती. सुरक्षित जीवनाची एक संवेदना असते, ती माणसाला दु:खातूनही सुख किंवा आनंद शोधायला शिकवते. तीच संवेदना तिच्या भावाबरोबर तिच्या नात्यांतून लुप्त झाली होती. कवी ग्रेस यांच्या शब्दांत सांगायचं म्हटलं, तर ‘गळय़ात शब्द गोठले अशांतता दिसे घनी. दु:ख बांधूनि असे क्षितिज झाकिले कुणी’ अशी तिची असहाय्य अवस्था झाली होती. लग्नानंतर तिला दोन मुलं झाली. तसं पाहिलं तर त्यांचं ती सगळं करायची, पण त्यात ती सजीवता नव्हती. प्रेमाची निसर्गदत्त उधळण नव्हती. पतीच्या सहवासातही तिच्यात आर्तता नव्हती, ती धुंदी नव्हती, नाजूक भावुकता नव्हती. तिच्याशी बोलताना तिच्या मनात आपला भाऊ आपली सगळी स्वप्नं अपूर्ण ठेवून निघून गेला, तर आपण कसे मजेत जगतोय, आपण कशी जीवनातली सुखं भोगायची, ही अपराधीपणाची भावना होती; पण तिच्या या भावनेमुळे तिची मुलं आणि पती मात्र त्यांचा काहीच दोष नसताना त्यांच्या हक्काच्या आनंदापासून वंचित झाले होते. शिल्पाच्या भावाच्या मृत्यूबरोबर तिच्या सगळय़ा आनंददायी भावनाही मरून गेल्या होत्या. भावंडांच्या आत्महत्येचे मागे राहिलेले पडसाद विचित्र आणि विध्वंसक असतात, याचं ती जितंजागतं उदाहरण होती.

शिल्पाची मी सखोल मुलाखत घेतली. एकंदरीत पाहताना इतक्या वर्षांत तिच्या आयुष्याला जरी तिच्या नातेवाईकांनी पारंपरिकरीत्या  मार्गावर आणलं होतं, संसार थाटून दिला होता, मात्र तिच्या मानसिक जखमा भरायचा कोणी प्रयास केला नव्हता. कदाचित ते त्यांच्याही हाताबाहेरचं होतं. शिल्पाला दीर्घकालीन नैराश्य आलं होतं. ते जाण्यासाठी तिला औषधं चालू केली; पण मुख्यत: आपण का जगतोय वा आपल्याला आनंदात जगायचा हक्कच नाही, या अपराधीपणाच्या भावनेतून बाहेर पडण्यासाठी मानसोपचारही दिले. हळूहळू ती अपराधीपणाच्या आणि दु:खाच्या गडद भुयारातून बाहेर येऊ लागली.. भावाच्या आत्महत्येच्या तिच्या मनावर पसरलेल्या सावटाचं हळूहळू विसर्जन होत गेलं.

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about true story of overcoming depression zws
Show comments