धडधाकट माणसापासून अट्टल कैदी ते मतिमंद अशा अनेकांपर्यंत ‘योग’ पोहोचणारे, योग प्रचाराचा आणि प्रसाराचा वसा गेली ३५ हून अधिक वर्षे यशस्वीपुढे सांभाळत, हजारो प्रशिक्षणार्थ्यांच्या आयुष्यात चैतन्य फुलवणारे आणि वयाच्या ८३ व्या वर्षीही कार्यरत असणारे योगाचार्य श्रीकृष्ण व्यवहारे यांच्याविषयी..
पाच-सहा महिन्यांपूर्वीची गोष्ट! ठाण्यातील घंटाळी मित्र मंडळातर्फे ‘सहयोग’ मंदिर सभागृहात श्रीधर फडके यांच्या गीतरामायणाचा कार्यक्रम होता, नेहमीप्रमाणे नि:शुल्क! निवांतपणे कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा म्हणून अंमळ लौकरच गेले तरी सगळय़ा खुच्र्या भरलेल्या. मधल्या भारतीय बैठकीवर थोडीफार जागा होती. पण सलग ३ -४ तास मांडी घालून खाली कसं बसणार.. काय करावं.. या विचारात असताना मला अण्णा म्हणजेच योगाचार्य श्रीकृष्ण व्यवहारे, घंटाळी मित्र मंडळाचे सर्वेसर्वा पुढच्या दारातून आत येताना दिसले. खुच्र्याकडे जराही कटाक्ष न टाकता या ८३ वर्षीय सद्गृहस्थाने झटकन पहिल्या रांगेत खाली मांडी घालून सुखासनात बैठक जमवली. ते पाहून प्रतिक्षिप्त क्रिया झाल्यासारखी मी ही पटकन खाली बसले. अण्णांना (दुरूनही) ओळखणाऱ्या प्रत्येकालाच त्यांच्याबद्दल नितांत आदर का वाटतो याचं हे एक छोटंसं उदाहरण! श्रीकृष्ण या नावाचा अर्थच मुळी सगळय़ांना आकर्षित करून घेणारा असा आहे. अण्णांना हे सहज जमले आहे.
शिडशिडीत शरीरयष्टी, भेदक नजर, तरुणांना लाजवेल अशी चपळाई व चेहऱ्यावर कायम मंदस्मित ठेवून वावरणारे अण्णा हे हाडाचे कार्यकर्ते आहेत. २६ जानेवारी १९६५ रोजी म्हणजे जवळजवळ ५० वर्षांपूर्वी त्यांनी ठाण्यात ‘घंटाळी मित्र मंडळ’ या संस्थेची स्थापना केली. दरवर्षी नवरात्रौत्सवातील नियोजनबद्ध कार्यक्रमांद्वारे हजारो कार्यकर्ते घडवले. योगाचार्य कै. सहस्रबुद्धे गुरुजींच्या प्रेरणेने अंतर्बाह्य़ योगमय झालेल्या अण्णांनी घंटाळी मित्र मंडळाचा योग विभाग अथक प्रयत्नांनी नावारूपाला आणला आणि गल्लीत स्थापन केलेल्या या संस्थेचं नाव आंतरराष्ट्रीय योग व्यासपीठावर नेलं. नाशिकच्या वासुदेव व रुक्मिणी या गरीब ब्राह्मण दाम्पत्याच्या पोटी जन्म घेतलेला श्रीकृष्ण ते योगाचार्य श्रीकृष्ण व्यवहारे ते स्वामी सत्यकर्मानंद ते सुवर्णयोगी हा त्यांचा प्रगतीचा आलेख केवळ थक्क करणारा नव्हे तर प्रेरणा देणारा आहे.
जुलै १९६३ मध्ये अण्णा कुटुंबासह ठाण्यातील घंटाळी देवीसमोरील राधानिवास या बैठय़ा चाळीत राहायला आले. (५० वर्षे झाली तरी आजही जागा तीच. फक्त अण्णांच्या वास्तव्याने त्या वास्तूंचं योगमंदिर बनलंय.) दोन महिन्यांनीच नवरात्र आलं. दहा दिवस भाविक मोठय़ा संख्येने दर्शनाला येत होते. अण्णांच्या लक्षात आलं की मंदिर व आजूबाजूचा परिसर तितकासा स्वच्छ नाही. रस्ते चांगले नाहीत. रात्री काळोखाचं साम्राज्य असतं. काय करावं या विचारात ते नवरात्र संपलं. मात्र पुढच्या वर्षी दोन महिने आधीच आजूबाजूच्या ८/१० जणांना जमवून अण्णांनी साफसफाई करण्यापासून कार्यक्रमाचं आयोजन करण्यापर्यंत सर्व कामं हौसेने आणि स्वखुषीने केली. तिथलं वातावरणच बदललं. तेव्हापासून घंटाळी देवीचा उत्सव वेगळय़ा प्रकारे करण्याची परंपरा सुरू झाली.
दर्जेदार कार्यक्रम, वक्तशीरपणा, चोख हिशेब, प्रसाद वाटप.. अशा वैशिष्टय़ांमुळे देवीचा नवरात्रौत्सव चांगलाच गाजू लागला. अण्णांनी १० वर्षे मेहनत घेऊन संघटना बांधली. सेवाभावी कार्यकर्ते तयार केले. त्यांच्यावर विश्वास टाकला. त्यांना संधी दिली आणि हा उपक्रम त्यांच्यावर सोपवून ते अलगद बाजूला झाले. या स्वेच्छानिवृत्तीपाठचं कारण सांगताना ते म्हणतात, ‘कोणतीही संस्था कार्यापेक्षा केवळ एका व्यक्तीच्या नावाने ओळखली जाऊ लागली की त्या व्यक्तीच्या पश्चात त्या संस्थेला भवितव्य नाही.’ अण्णांच्या या ठाम निर्णयामुळेच मंडळापाशी केवळ दुसऱ्या पिढीतीलच नव्हे तर तिसऱ्या पिढीतील कार्यकर्त्यांचीदेखील फौज निर्माण झालीय.
‘घंटाळी मित्र मंडळा’च्या अखंड वाटचालीत १९७१चा जानेवारी महिना हा एक मैलाचा दगड ठरला. कारण याच महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात योगाचार्य सहस्रबुद्धे गुरुजी बहुधा घंटाळी मातेच्या प्रेरणेनेच अण्णांच्या घरी आले. आपल्या वाक्चातुर्याने त्यांनी अण्णांना ‘वश’ केलं व त्यांना योग दीक्षा दिली. नंतर गुरुजींनी घेतलेल्या योगशिबिरांमुळे अण्णांचं त्या वेळी रसातळाला गेलेलं शारीरिक व मानसिक आरोग्य पुन्हा पूर्ववत झालं. तेव्हाच अण्णांनी ठरवलं की, ‘यापुढे समाजस्वास्थ्यासाठी योगविद्येचा प्रसार हीच गुरुजींची गुरुदक्षिणा!’
योगवर्ग सुरू करायचे असं ठरलं, पण जागा नाही. कोणाकडे काही मागायचं नाही हे तत्त्व. शेवटी पत्नीच्या अश्रूंना न जुमानता अण्णांनी स्वत:च्या लहानशा घरातलं सर्व फर्निचर विकलं आणि चार सतरंज्या आणून सकाळी ६ ते ७ असा वर्ग सुरू केला. पुढे अनेक चांगल्या जागा मिळाल्या व कार्याचा वेलू गगनावरी गेला पण सुरुवात ही अशी झाली!
योग प्रात्यक्षिकांवर उत्तम पकड निर्माण झाल्यावर योगाची सैद्धांतिक बाजू भक्कम करण्यासाठी अण्णांनी भारतातील विविध मान्यताप्राप्त योग विद्यालयांतून योगशिक्षक वर्ग यशस्वीरीत्या पूर्ण केले. त्यानंतर पुढच्या पाच-सात वर्षांत एवढी प्रगती केली की, १९७८मध्ये स्वामी सत्यानंद सरस्वती यांनी अण्णांना योगाचार्य ही पदवी बहाल केली. १९८९ मध्ये अण्णांनी घाटकोपरला गुजराथी बांधवांच्या मदतीने योगशाखा काढली. त्यानंतर गोवा, नेपाळ येथेही योगकेंद्रे सुरू झाली. सलग तीन वर्षे शनिवार-रविवार मुंब्रा येथील डोंगरावर जाऊन अण्णांनी तिथल्या एकांतवासात साधना केली. ज्यामुळे त्यांचे आचार व विचार पूर्णपणे बदलून गेले. दिव्य कल्पना सुचू लागल्या. त्यानुसार नवे प्रकल्प आकार घेऊ लागले.
अण्णांच्या अनेक प्रयोगांपैकी ठाण्याच्या कारागृहातील बंदिजनांवरचा प्रयोग अभूतपूर्वच म्हणायला हवा. १३ खुनी, अट्टल गुन्हेगार योगपरीक्षेत उत्तीर्ण होतात, त्यांच्यात आमूलाग्र परिवर्तन घडतं व तेच योगशिक्षक बनून तुरुंगातील इतर कैद्यांना चांगल्या वागणुकीचे धडे देतात ही घटना जगाला स्तिमित करणारीच होती. १९७९ साली ठाणे कारागृहात राबवलेला वाल्याचा वाल्मिकी करणारा हा प्रकल्प पुढे इटली, लंडन, नेपाळ.. इ. देशांपर्यंत विस्तारला गेला. एवढंच नव्हे तर या प्रयोगातून प्रेरणा घेत मुंगेरच्या बिहार योग विद्यालयाने बिहारमधल्या आठ तुरुंगातील १६५ कैद्यांना प्रशिक्षित योगशिक्षक म्हणून तयार केलं. या प्रकल्पावरील शोधनिबंधास १९८८ साली बँकॉक येथे भरलेल्या जागतिक योग परिषदेत रौप्यपदक मिळालं आणि त्यावर राजमान्यतेची मोहर उठली.
मेधासंस्कार हा अण्णांनी इयत्ता ९ वी ते १२च्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेला खास उपक्रम. स्मृतिसंवर्धन, एकाग्रता, सकारात्मक विचार, उंचीवर्धन हे सर्व योगमाध्यमातून शास्त्रशुद्ध पण मनोरंजकरीत्या शिकवल्या जाणाऱ्या या उपक्रमाचा ६०,००० हून अधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेतलाय.
अण्णांचा आणखी एक विशेष प्रयोग म्हणजे अपंगांना त्याच्या घरीच शिक्षक पाठवून योगशिक्षण देणं. याशिवाय अग्निशामन दलातील जवानांसाठी, मतिमंदांकरिता, बॅडमिंटनपटूंसाठी, आदिवासी मुलांसाठी, तबलावादकांसाठी, संगणकजन्य नेत्ररोगांसाठी.. अशा योगवर्गाच्या विविध कल्पना त्यांनी आखल्या व प्रत्यक्षात आणल्या. त्याचबरोबर निरनिराळय़ा आजारांवर उपचार म्हणून अनेक योगशिबिरं घेतली. त्यातील खास स्त्रियांच्या समस्यांवर घेतलेल्या शिबिरांची संख्याच शंभरावर आहे. गर्भवती स्त्रियांसाठी दरमहा घेतल्या जाणाऱ्या ‘योगांकुर’ या विशेष योग वर्गाची तर सध्या एकशे पाचावी बॅच सुरू आहे. शिबिरार्थीची तर गणतीच नाही. ‘स्त्रियांच्या मासिक पाळीच्या तक्रारींसाठी योग’ या विषयावर डॉ. उल्का नातू यांनी अण्णांच्या पाठिंब्याने सादर केलेल्या शोधनिबंधास बंगळुरू व लोणावळा या दोन्ही ठिकाणी भरलेल्या जागतिक योग परिषदांमध्ये गौरवण्यात आलं.
योग प्रचाराकरता नवी नवी क्षेत्रं धुंडाळणं हा अण्णांचा आवडीचा छंद. एखाद्या विषयावर थेट व्याख्यान देण्यापेक्षा तोच विषय संवादातून आणि पूरक अशा गाण्यांमधून सादर करावा अशी कल्पना त्यांना सुचली. त्यातूनच गायिका लीलाताई शेलार व इतर योगसाधकांच्या मदतीने त्यांनी रोग मनाचा शोध मनाचा, नादब्रह्म, भक्तीगंगा, रंग चैतन्याचे, देणे भगवंताचे, माय मराठी ब्रह्मसाधना.. असे अनेक कार्यक्रम बसवले व ठिकठिकाणी सादर केले, ज्यांचं बाबा आमटे व पु.लं.नीदेखील कौतुक केलं.
आनंदयोग, अथध्यानम्, प्राणायामदर्शन, मेधा संस्कार.. इ. अण्णांनी लिहिलेली पुस्तकं वाचली की त्यांच्या ज्ञानगंगेचा विस्तार किती अफाट आहे ते लक्षात येतं. योगविचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी योगतरंग या मासिकाचा पहिला अंक १५ ऑगस्ट १९९३ ला अण्णांच्या संपादनाखाली प्रसिद्ध झाला. गेल्या १० वर्षांपासून ही योगपताका सुजाता भिडे यशस्वीपणे पुढे नेत आहेत. योग, प्रयोग व सहयोग हे घंटाळी मित्र मंडळाचं ब्रीदवाक्य आहे. त्यानुसार अण्णा सतत नव्या नव्या कल्पना आखतात व त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जिवाचं रान करतात.
१९७८ पासून २०१० पर्यंत अण्णांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत ठाणे, घाटकोपर, डोंबिवली व पुणे येथे तब्बल १७ योगसंमेलनं भरवली. त्यातली ११ निवासी. या संमेलनांची आखणी, बांधणी व अंमलबजावणी अवाक करणारी होती. त्यासाठी अण्णांनी कार्यकर्त्यांना दिलेला मंत्र असा, ‘भान ठेवून नियोजन करा आणि बेभान होऊन आयोजन करा.’
बरेचदा आसनं म्हणजेच योग अशी (गैर) समजूत असते. यावर अण्णा सांगतात, ‘योगसाधनेस आसनांनी सुरुवात करावी पण तिथेच थांबू नये. स्थुलाकडून सूक्ष्माकडे जावे. आसनांमुळे शरीर हलके व रोगरहित होते म्हणजे देहानंद मिळतो. प्राणायामामुळे मन नियंत्रित व स्थिर होते. म्हणजे मनाला आनंद मिळतो. ध्यानामुळे आंतरिक तृप्ती व शांती मिळून दिव्य आनंद मिळतो. म्हणजे देहानंदाकडून दिव्यानंदाकडे आनंद घेत जाणे हाच खरा योग (आनंदयोग) होय.
२००२च्या योग महोत्सवात स्वामी निरंजनानंद सरस्वती यांनी अण्णांना कर्मसंन्यासाची दीक्षा देऊन त्यांचे स्वामी सत्यकर्मानंद असं नामकरण केलं. यावरही कळस म्हणजे गेल्याच वर्षी म्हणजे २०१३ साली मुंगेर येथे भरलेल्या जागतिक योग संमेलनात बिहार स्कूल ऑफ योगाने अण्णांना ‘सुवर्णयोगी’ ही पदवी देऊन त्यांचा मोठा सन्मान केला.
अण्णांच्या सर्व प्रकल्पात त्यांना साथ मिळाली ती निरपेक्ष भावनेने काम करणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांची व सुविद्य अशा योग शिक्षकांची. या सर्वाना अण्णांनी घरच्यासारखं जपलं. उगीच नाही कुणी वर्षांनुवर्षे सकाळी ६च्या बॅचलादेखील आधी येऊन सतरंज्या घालण्यापासून पडेल ते काम निष्काम भावनेने करत!
अण्णांना दोन मुलगे. संजय व सतीश. दोघेही उद्योग व्यवसाय करणारे. अण्णांच्या पत्नी सुलभाताई या त्यांच्या सर्व उपक्रमांच्या पहिल्या श्रोत्या, वाचक आणि प्रामाणिक प्रतिक्रिया देणाऱ्या टीकाकार होत्या. अण्णांनी आपला ‘प्राणायामदर्शन’ हा ग्रंथ त्यांच्या स्मृतींना अर्पण केलाय.
अण्णांनी पश्चिम रेल्वेत इमानेइतबारे नोकरी करून ५७व्या वर्षी निवृत्ती घेतली. ही निवृत्ती त्यांच्या जीवनाची नवी आवृत्ती ठरली. आज अण्णा ८३ वर्षांचे आहेत. पण त्यांच्या कामाचा झपाटा ३८ वर्षांच्या तरुणाला लाजवेल असा आहे. आता एक आंतरराष्ट्रीय दर्जाची निवासी योगप्रबोधिनी सुरू करणं हा त्यांचा सध्याचा ध्यास आहे.
सहजयोग, सातत्ययोग व समाजयोग या योगत्रयीवर ठाम विश्वास असणाऱ्या अण्णांनी माणसांच्या अंतर्यामी बदल घडवणं हा चमत्कार करून दाखवलाय. या निर्मळ, पावन मनाच्या योग्याने असंख्य लोकांना दिलेली आरोग्याची गुरुकिल्ली पाहताना एक चिनी म्हण आठवते.. एखाद्या माणसाला तुम्ही एक मासा पकडून दिला, तर त्याच्या एकवेळच्या जेवणाची सोय होईल, पण त्याऐवजी त्याला मासा कसा पकडायचा ते शिकवलं तर ती त्याच्या आयुष्यभराच्या जेवणाची सोय होईल.
योगाचार्य श्रीकृष्ण व्यवहारे अण्णा
(०२२)२५३३२४२७
gmmresearch@gmail.com
Website : http://www.anandyoga.org
waglesampada@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा