‘जे शब्दांत आलंय, त्यापेक्षा जे ध्वनित होतंय ते खरं!’ हाच हान कांग यांच्या प्रत्येक कादंबरीचा गाभा आणि त्यांच्या शैलीचं वैशिष्ट्यही आहे. त्याचमुळे ‘मोजक्या रूपकांमधून उमटत राहणारं मनाचं लँडस्केप!’ असं त्यांच्या साहित्याचं वर्णन करता येईल. हान यांचं व्यक्तिमत्त्व खूप दु:ख मनात साठवून ठेवलेल्या एका छोट्याशा संथ नदीसारखं वाटतं आणि ते तसंच असावं अन्यथा नोबेल पुरस्कार मिळवणारी पहिली आशियाई स्त्री ठरूनही आणि दक्षिण कोरियात त्यांच्या पुरस्काराचा जल्लोष चालू असतानाही ‘आपल्याच जगात इतकी निरपराध माणसं युद्धात मरत असताना आपण काही साजरं कसं करायचं?’ असं त्या अगदी शांतपणे विचारतात. मानवतेबद्दलची अनुकंपा आणि आपलेपण काठोकाठ भरून असलेल्या हान कांग या लेखिकेविषयी…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
यंदाचं साहित्यासाठीचं नोबेल खरोखरीच उत्कंठा वाढवणारं वगैरे होतं. ऑस्ट्रेलियाच्या एका वृत्तसंस्थेने साहित्यिक जेराल्ड मुरनान यांची त्यासाठी निवड झाली असून फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे, असं छापून टाकलं होतं, तर अशीच दाट शक्यता ‘द गार्डिअन’ने यंदा चीनच्या कादंबरीकार सान शोया यांच्या बाबतीत वर्तवली होती. नोबेल समितीच्या सदस्यांना पुढल्या ५०वर्षांपर्यंत अंतिम फेरीतले स्पर्धक किंवा निवडीबद्दल काहीही भाष्य न करण्याकरता शपथबद्ध केलेलं असतं, तरीही आठवडाभर आधी गौप्यस्फोटाच्या आविर्भावात काही नावे आणि कहाण्या माध्यमांमध्ये अवतरू लागतात. गेल्या काही वर्षांत योगायोगाने अनपेक्षित लेखकाची निवड हीच परंपरा होत चालली आहे, तिला धरूनच हा सन्मान दक्षिण कोरियाच्या हान कांग (जन्म १९७०) यांना घोषित झाला.
नोबेलचं मानपत्र म्हणतं – The honour goes to Han Kang for her intense poetic prose that confronts historical traumas and exposes the fragility of human life. हा बहुमान मिळवणाऱ्या त्या आशियाच्या पहिल्याच लेखिका. आपल्या ‘द व्हेजिटेरिअन’ या कादंबरीसाठी बुकर प्राइझ मिळवणाऱ्याही त्या कोरियाच्या पहिल्याच लेखिका. त्यांच्या ५ पुस्तकांचे इंग्लिशमध्ये उत्कृष्ट अनुवाद झालेले असूनही भारतात फारशा चर्चित नसलेल्या. पण तसंही म्हणता येत नाही, कारण या कादंबरीचे अनुवाद तामीळ आणि मल्याळममध्ये प्रकाशित झाले आहेत आणि हिंदीमध्ये काही कविता!
प्रथम कथेच्या रूपात आलेल्या ‘द व्हेजिटेरिअन’चं मूळ देशी काही फारसं स्वागत झालं नव्हतं. कारण हेही असेल की या संस्कृतीत ‘शाकाहार’ हा एक अतर्क्य, आचरट प्रकार वाटत असावा, कादंबरीच्या नायिकेसारखाच. याँग ही एक संवेदनशील तरुणी, अतिसामान्य रूप-रंगाची. ‘मरणात तसं वाईट काय आहे?’सारख्या इतर कोणाला न पडणाऱ्या प्रश्नांचं थैमान डोक्यात घेऊन वावरणारी. कहाणी तिची आहे, पण क्रमाने सांगतात तिचा नवरा, मेव्हणा आणि मोठी बहीण. चेतना प्रवाहातून ती अधूनमधून प्रकट होते आणि सूत्र परत निवेदकाच्या हाती सोपवून निघून जाते, अदृश्य नाही होत, दिसत राहाते, पण इतरांच्या चष्म्यातून!
पहिला निवेदक तिचा नवरा, चारचौघांसारखा, चाकोरीबद्ध आयुष्य जगणारा. लग्न आणि प्रेमाचा संबंध त्याच्या लेखी नसतोच. ही निमूटपणे साथ देणारी, पण वेगळीच. मनस्वी. तिचं ‘जगणं’ मानसिक पातळीवर. माहेरच्या घरातही मिसफिटच! नैसर्गिक अवस्थेत राहायची ओढ लागलेल्या तिला घरात अनेकदा नग्नावस्थेतच वावरायला आवडतं. तिला स्वप्न पडतं की, ती एखाद्या पशूसारखी कोणा जनावराची शिकार करून रासवटासारखी खातेय आणि एक रोप होतेय. तशी स्वप्नं पडतच राहतात आणि ती शाकाहारी होण्याचं ठरवते. नवऱ्याला मांसाहार मुळीच सोडायचा नसतो, त्यातून मिळणारी प्रोटिन्स गमावल्याने शरीर कुपोषित राहणार हे सगळ्या समाजाचंच दृढ मत असतं. यामुळे तिच्या घरी-दारी प्रचंड खळबळ, माहेरची माणसं एकत्र येऊन तिच्या डोक्यात शिरलेलं भूत काढू बघतात, साम-दाम-दंड-भेदाने. वडिलांच्या आक्रमक सक्तीला ही काही न बोलता स्वत:च्या मनगटात सुरी खुपसून विरोध दर्शवते. तिला कसंतरी सरळ करायला नवरा तिच्यावर लैंगिक अत्याचार सुरू करतो. त्याला ती थंड मनाने सामोरी जाते, त्याने तिच्या स्वत्वावर ओरखडासुद्धा उमटत नाही. आपण वृक्ष झालो आहोत आणि आपल्याला फक्त ऊन आणि पाण्याची गरज आहे हे डोक्यात घेतलेल्या, याँगचा सायकोसिसमध्ये झालेला शेवट अतार्किकदृष्ट्या तर्कशुद्धच!
फक्त १८८ पानांच्या कॅनव्हासवर थेट, सरळसोट वाटणाऱ्या शैलीत ही कादंबरी उलगडत जाते. पण पानोपानी उमटणाऱ्या अर्थगर्भ विधानांतून धक्के मिळत जातात. कुटुंबाच्या वरवरच्या शांततेखाली खदखदणारं बरंच काही जाणवू लागतं. तो याँगच्या तनमनाने जीवहत्येविरुद्ध गाडलेला झेंडा असो, वा कलात्मक व्हिडीओज बनवणाऱ्या मेव्हण्याच्या कामप्रेरणांचा वेगवेगळ्या पातळ्यांवर होणारा उद्रेक असो किंवा जबाबदारीच्या ओझ्याखाली दबून गेलेल्या मोठ्या बहिणीच्या भावनांचा कोंडमारा असो. हे सगळं कमीतकमी शब्दांत, अमूर्त चित्राची झलक दाखवणाऱ्या ब्रशच्या एखाद्या उत्कट फटकाऱ्यासारखं, आणि परत पूर्वस्वरात निवेदन सुरू होतं…
हे मोजक्या रूपकांमधून उमटत राहणारं मनाचं लँडस्केप! जे शब्दांत आलंय, त्यापेक्षा जे ध्वनित होतंय ते खरं! तो याच नाही तर प्रत्येक कादंबरीचा गाभा, आणि हे हान कांगच्या शैलीचं वैशिष्ट्य. परकीय संस्कृती/ भाषेतल्या या कृतीचा डेब्रा स्मिथचा अनुवाद स्वैर असल्याच्या आरोपांनी विवाद उत्पन्न झाला पण त्याने हान कांग यांना जागतिक पातळीवर पोहोचवण्याचं महत्कार्य केलं खरं. पुढला स्वत:लाच पैलू पाडत जाणारा त्यांचा प्रवास पाहता, या पायरीचं महत्त्व लक्षात येतं. ‘मॅन बुकर’ मिळाल्यावर (२०१६) त्यांच्या पुस्तकांचे अनेक जागतिक भाषांमध्ये अनुवाद झाले, आणि पुस्तकांच्या प्रति स्वदेशी विकू लागल्या.
‘ग्रीक लेसन्स’ ही पुढली कादंबरी आणखीनच गुंतागुंतीची. अगदी सुरुवातीपासूनच जिभेवर न येऊ शकणाऱ्या भाषेशी झगडणं. त्यामुळे जाणवणारा तणाव. एक घटस्फोटित तरुणी नवीन भाषा (ग्रीक) शिकायचा प्रयत्न करतेय. ती थोडी-फार येऊ लागणं तर दूर, स्वत:च्याच भाषेचा गुंता होऊ लागलाय. शब्द मानसपटलावरून गायब होत आहेत. मानसोपचारतज्ज्ञांना वाटतं की, याला कारण तिच्या आयुष्यात एवढ्यात घडलेल्या दु:खद घटना आहेत, मनावर अनेक गोष्टींचा मिळून प्रचंड ताण आल्याने असं होतंय. पण ते पूर्ण सत्य नसतं. आजार मेंदूचा आहे, पण त्याची कारणं शरीरात सापडत नाहीत. निसर्गावर प्रेम करणारे आणि भाषेचे आवडीने खेळ खेळणारे मायलेक आता संवादाला पारखे होत आहेत. मुलाने थट्टेत ठेवलेलं तिचं नाव (Thickly falling snowl s sorrow) खरंच होतंय आणि बोली हरवलेल्या तिला, हताशपणे त्याची कस्टडी गमावून दुरावताना बघावं लागतंय. तिला ग्रीक भाषा शिकवणाऱ्या शिक्षकाची दृष्टी मंदावतेय, आणि हिची भाषा हरवतेय अशा स्थितीत या एकलकोंड्या दोघांमध्ये एक सुंदर नातं निर्माण होतं. पुस्तकाची सुरुवात होते, होर्खे लुइस बोर्खेसला आठवत, आणि शेवट होतो, समुद्राखालच्या प्रशांत जंगलातल्या भेटीच्या कवितेनं!
‘ह्यूमन अॅक्ट्स’ (२०१४) ही पुढली कादंबरी म्हणजे मार्शल लॉच्या जुलमी राजवटीवर ओढलेला बहुमुखी कोरडा. ग्वान्गजूमधल्या तरुण मंडळींनी १७ मे १९७९ला दक्षिण कोरियात आलेल्या दडपशाहीविरोधार्थ काढलेल्या मोर्चाचं दमन, कुप्रसिद्ध तियानमेन हत्याकांडाची आठवण देणारं. हे प्रकरण घडलं तेव्हा हान कांग नऊ वर्षांच्या असणार. दहा दिवस चाललेल्या या लढ्यात हजारो तरुण-तरुणी मारले गेले वा बेपत्ता झाले. कादंबरी उघडते तीच जिम्नॅशियम हॉलमध्ये पसरलेल्या प्रेतांच्या ढिगाऱ्यात गायब मित्राला शोधायला आलेल्या कोवळ्या पोराच्या निवेदनाने. प्रेतांची व्यवस्था बघताहेत फक्त दोन स्वयंसेविका, त्याच्याच आसपासच्या वयाच्या. तो त्यांच्या मदतीला लागतो. त्याच्या नजरेतून मिळणारी क्रौर्याच्या तांडवाची झलक केवळ भीषण! असंख्य प्रेतांसमोर उभा तो आईला म्हणतो, ‘‘मेलेल्यांची भीती कशाला वाटायला हवी?… भीती वाटते ती पोलिसांची.’’ दुसऱ्या दिवशी तोही शहीद होतो, निवेदनाची मशाल संताप आणि निराशेत खदखदत्या तरुणाईत फिरत राहाते. शब्दबंबाळ वर्णनाऐवजी थंड वस्तुनिष्ठतेचा लेखिकेने केलेला वापर कमालीचा प्रभावी आहे. नाटक-सिनेमात ‘डायरेक्टर्स स्क्रिप्ट’ असतं, तशी तपशीलवार कथनशैली! मनावरून पुसली जात नाही ती मुलाच्या मरणाने नि:शब्दपणे उद्ध्वस्त झालेली, भसाभसा जमिनीतून गवत उपटून तोंडात कोंबणारी, नुकत्याच टाकलेल्या गरम डांबरी रस्त्यावरून अनवाणी निघालेली, पोलीस ठाण्यावर जाऊन हुकूमशहाचा फोटो निर्भयपणे पायाखाली तुडवणारी विदीर्ण चेहऱ्याची आई आणि तिची काचांनी रक्ताळलेली पावलं…
‘द व्हाइट बुक’ (२०१६) हे कादंबरीच्या फॉर्मशी मुक्तछंदात प्रयोग करणारं, हानच्या आयुष्यातल्या एका कहाणीबद्दल बोलणारं. गंभीर, शोकाची छटा असलेल्या पांढऱ्या रंगाच्या काही वस्तू म्हणजे चंद्र, कफन, कोरा कागद, पांढरा पक्षी, नाजूक लेसचा पडदा, नवजात बाळाला घातलेला गाऊन, बर्फ वगैरे निवडून मनातल्या नोंदी केल्या आहेत. यात पात्र दोनच, मी आणि ती : म्हणजे वॉर्सात आलेली निवेदिका आणि जन्मल्यावर दोनच तासांत मरून गेलेली तिची मोठी बहीण. सर्व काही माहीत असून तिच्या आईने थंड पडत चाललेल्या बाळीला दूध पाजण्याचा केलेला प्रयत्न. तिने चोखून प्यायलंसुद्धा थोडंसं. आईला पोटावर तिचं थंड पडणारं शरीर जाणवतं. ती शिरशिरी आईच्या हाडांमध्ये उतरत जाणारी, हान कांगसाठी न जगलेली वेदना, आठवणीत जगत राहाणं… वॉर्सा शहरभरात तिच्याशी दुसऱ्या महायुद्धाच्या खुणा बोलत्या होताहेत, आणि दुसरीकडे त्यातून परत उभं राहिलेलं शहरही. काहींना हे पुस्तक म्हणजे एक धर्मनिरपेक्ष प्रार्थना वाटते, मानवजातीच्या शांतीसाठी, युद्धापासून मुक्तीसाठी!
दक्षिण कोरियात सध्या नोबेल विजयाचा जल्लोष सुरू आहे, पण हान कांग मात्र ते अजिबात साजरं करण्याच्या मन:स्थितीत नाहीत. रशिया / युक्रेन आणि इस्राएल / पॅलेस्टाईनमध्ये चाललेला संहार त्यांना हृदयद्रावक वाटतो आहे. आपल्याच जगात इतकी निरपराध माणसं युद्धात मरत असताना आपण काही साजरं कसं करायचं? असं त्या अगदी शांतपणे विचारतात. ‘‘मी एकटीच रोज लढत असते, त्या नरकाशी ज्याच्या विळख्यातून मी वाचलेय. ही लढाई मी स्वत:मधल्या माणुसकीसाठी लढत असते. रोज या विचाराशी इतकी झुंजत असते की यातून सुटण्याचा एकमात्र मार्ग मृत्यू आहे.’’ हे त्यांच्या एका पात्राच्या तोंडून येणारं वाक्य, कदाचित स्वत:बद्दलचं, लेखन प्रेरणेबद्दलचं. नोबेल मिळाल्यानंतरचे त्यांचे काही व्हिडीओज् समाज माध्यमांमध्ये उपलब्ध आहेत. ते पाहून त्यांचं व्यक्तिमत्त्व खूप दु:ख मनात साठवून ठेवलेल्या एका छोट्याशा संथ नदीसारखं वाटतं.
स्वत:बद्दल स्थितप्रज्ञ, अंतर्मुख वृत्ती (त्या म्हणतात, ‘‘मी महानगर सौलच्या (seaoul) एका कोपऱ्यात शांतपणे पुस्तकांच्या संगतीत जगू शकते.’’) पण मनात बुद्धाशी नातं सांगणारी मानवतेबद्दलची अनुकंपा आणि आपलेपण काठोकाठ भरून असलेलं. भाषेचा कमीत कमी वापर करून लिहिणाऱ्या, स्वभावगत उत्कटतेने प्रायोगिक ठरलेल्या आणि अत्यंत प्रतिकूल वातावरणात कधीही पॉलिटिकली करेक्ट नसणाऱ्या हान कांगच्या पुढच्या वर्षी येणाऱ्या कादंबरीच्या लाखो प्रती प्रसिद्धीपूर्व नोंदणीत जगभरात विकल्या गेल्या आहेत आणि पुढचं लिखाणही जगभरात अतिशय कुतूहलाने वाचलं जाईल यात शंका नाही. arundhati.deosthale@gmail.com