रेणू दांडेकर

मध्य प्रदेशातल्या साकड गावातील ‘आधारशिला शिक्षण केंद्रा’विषयीच्या माहितीचा हा उत्तरार्ध.

pune metropolis have lack of basic facilities and infrastructure
बकालीकरणाकडे…
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Rahul Gandhi poha Nagpur
राहुल गांधी नागपुरात आले आणि…टमाटरने सजवलेल्या तर्री पोह्यांसाठी थेट….
Govt Issues New Rules To Stop Misleading Ads By Coaching classes
विश्लेषण : शिकवणी वर्गांच्या जाहिरातींना चाप?
nehru literature soon in one click available on digital form on mobile
नेहरूंचे साहित्य लवकरच एका क्लिकवर!
grse recruitment 2024 opportunities in indian education sector
शिक्षणची संधी : ‘जीआरएसई’ मध्ये संधी
Loksatta chaturanga Parent Nature Confused Psychologist
सांधा बदलताना : संसार शांतीचा झरा…
maharashtra vidhan sabha election 2024 ,
बेलापूरच्या प्रचारात राम, कृष्ण, गजाननाचा गजर !

मध्य प्रदेशमधील साकड गावातील ‘आधारशिला शिक्षण केंद्र’ या शाळेच्या जन्माची अनोखी कथा आपण मागच्या भागात (१९ ऑक्टोबर) वाचली. ही शाळा सुरू झाली त्यानंतर अनेक वर्षे इथल्या मुलांसाठी अगदी साधी-सोपी साधने वापरली जातात. मुलांच्या श्रमातून इथली रेताड जमीन हिरवीगार झाली. इथे सेंद्रिय खतांचा वापर करून शेती केली जाते, त्याविषयी जागृत केले जाते. मुलांच्या शेतीविषयक ज्ञानाचा उपयोग करून अभ्यासक्रम तयार केला गेलाय.

वास्तविक राष्ट्रीय अभ्यासक्रम रचना (नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क) मुलांचे स्थानिक प्रश्न, विषय, जीवनपद्धती, आरोग्य, पर्यावरण यांचे निरीक्षण करण्यावर भर देते. या भूमिकेतून पाहिल्यावरही लक्षात आले, की भारतातील शिक्षणप्रणालीचे एक उत्तम उदाहरण म्हणजे ‘आधारशिला शिक्षण केंद्र’ आहे. ‘आधारशिला’ स्वातंत्र्य आणि उत्स्फूर्ततेला महत्त्व देते. इथे शिकलेले जुने विद्यार्थी पुन्हा पुन्हा इथे येतात. आपण जे झाड वाढवले त्या झाडाच्या सावलीत विसावतात. मेसमध्ये येऊन रांगेत उभे राहून जेवण वाढून घेतात. कारण या जेवणातले किती तरी घटक त्यांनी तयार केलेले आहेत. त्यांनी केंद्र सोडल्यानंतरही ते आजही टिकून आहेत, याचा आनंद घेतात.

इथे मुले अनेक प्रयोग करून पाहतात हे प्रयोग जसे शेतीचे असतात, तसे भाषेचे असतात, इतिहासाचे असतात, गणिताचे असतात. अमित-जयश्री यांची कन्या रेवाली इथे स्वत: आपले आपण करून शिकताना म्हणायची, ‘मी आप्पी आप्पी करते.’ आपापले करून पाहणे अशा अर्थाचे शब्द पण पुढे ‘आप्पी आप्पी’ ही शिकण्याची पद्धतच इथे बनली. कमल डुडवे हा ‘आधारशिला’तला पहिल्या बॅचचा मुलगा आज ‘अलाहाबाद विद्यापीठा’त अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट करतोय. त्याला इथे शिकण्याचा अनुभव आजही विलक्षण वाटतो. ‘जेव्हा विद्यार्थी होतो तेव्हा मनसोक्त श्रम केले. इथे शिक्षक होतो तेव्हा काळजीपूर्वक अभ्याससुद्धा शिकवला.’ हे त्याचं म्हणणं. इथे शिकलेली मनाली जानूही इथेच शिकवतेय आणि नवनव्या शिक्षकांना प्रशिक्षणही देतेय. इथला ‘नाटक इंडिया कंपनी’ ग्रुप विविध आंदोलनात नाटके सादर करतो, त्याला शिक्षणविषयक परिसंवादासाठी बोलावले जाते. जवळजवळ ९० मिनिटे होणाऱ्या सादरीकरणात भ्रष्टाचारी राजकारणी, शिक्षणाचे खाजगीकरण करणारे शिक्षणसम्राट, विविध धार्मिक संघटना आणि बाजारू धोरणे असे विषय घेतले जातात. ‘आधारशिला’ची मुले त्यांचे स्वत:चे वर्तमानपत्र काढतात, विविध विषयानुरूप सर्वेक्षण करतात, सभांच्या अहवालावर लेखन करतात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, जो ही शाळा सुरू करण्याचा हेतू होता, अन्यायाविरुद्ध प्रश्न विचारणे, तो हेतू साध्य झाला.

अमितजी सांगतात, की आदिवासी गावात राहायला लागल्यानंतर त्यांच्यातला उद्धटपणा कमी झाला. ‘आधारशिला’ लोकांची आहे, ती एका धर्मनिरपेक्ष लढय़ाचा भाग आहे. ‘आधारशिला’ची शिक्षणविषयक विचारधारा, तिथे वापरली जाणारी साधने, प्रत्यक्ष अंमलबजावणी अत्यंत परिणामकारक आहे. आपल्या मुलांना प्रेम, स्वातंत्र्य आणि आनंद मिळवून द्यायचा असेल तर फार पैसे लागत नाहीत. यासाठी गरज असते ती फक्त कल्पनेच्या पंखांची. जयश्रीताईंना वाटते सर्जनशीलता आणि प्रखर इच्छा असली की सगळे काही होते.

खरे तर ‘आधारशिला’सारखी आंदोलनाचा आत्मा घेऊन उभी राहिलेली, स्वतंत्र विचारांची शाळा ही लोकप्रबोधनासाठी उघडली गेलेली असते. तेच होत नसेल तर तिचा हेतूच सफल होत नाही. आदिवासी भागात शाळा खूप उघडल्या गेल्या पण त्यामुळे जी जाणीव विकसित व्हायला हवी होती, ती झाली नाही. आदिवासी लोकांनी सवलती घेऊन जीवनमान बदलले. मुळात शिक्षणातून जी प्रतिकाराची भावना निर्माण व्हायला हवी ती झाली नाही. आज अमित-जयश्री यांनी पालकांना सतत आंदोलनाशी जोडले. मात्र हे सतत करावे लागते. समाजात वेगळ्या विचारांचे तरंग उठलेले आहेत (जग अनेक स्तरांवर वेगाने बदलते आहे, त्यात उलथापालथ घडते आहे) अशा वेळी शिक्षण केवळ नोकरीशी जोडून चालणार नाही. पालकांच्या शिक्षणाकडून असणाऱ्या अपेक्षा बदलतायत. जे आंदोलक आवाज उठवतात त्यांचा अवाज दडपण्याचा प्रयत्न विविध मार्गानी केला जातो. सगळ्यांना एकाच तराजूत घालून मापणारी शिक्षणयंत्रणा काय उपयोगाची? आदिवासी मुलांनी इतिहास कोणता नि कसा शिकला पाहिजे हे ‘आधारशिला’ ठरवते. सगळ्यांना समान अभ्यासक्रम असून चालणारच नाही. अन्यथा परिवर्तन कसे होणार? विकासाचा अर्थ आंदोलकाच्या भूमिकेतून काय असेल? या प्रश्नांची उत्तरे ‘आधारशिला’ देते.

आता ‘आधारशिला’ युवकांची शैक्षणिक शिबिरे घेते. ‘स्कूल फॉर सोशल चेंज’साठी त्यांनी अभ्यासक्रम तयार केलाय. इथे मुलांची मने घडवली जातात. ‘आधारशिला’ला स्वत:चा अभ्यासक्रम, स्वत:चे वेगळे उद्दिष्ट आहे. जी शाळा शिक्षणाबद्दलच वेगळा विचार करून रचना करते ती शाळा नेहमीच्या शाळेपेक्षा सर्वस्वी वेगळी असते. या शाळेने प्रत्येक क्षेत्रात प्रयोग केले, सामान्यत: वेगळे म्हणवणाऱ्या शाळा तंत्रावर विचार करतात, पद्धतीवर विचार करतात. मुलांपर्यंत पोचणाऱ्या आशयावर काम करत नाहीत. आशय तोच असतो फक्त सांगण्याची पद्धत वेगळी असते. आज आपण फिनलँडचे तिथल्या प्रगत शिक्षणपद्धतीसाठी कौतुक करतो पण ‘आधारशिला’त तर वीस वर्षांपूर्वी प्रकल्प पद्धत सुरू झाली.

शाळेसाठी जे जे करायला हवे ते अमित आणि जयश्री यांनी केले. आज शाळा तिथल्या लोकांच्या हाती सोपवून ते बाजूला झालेत. तिथे प्रशिक्षणे होतात, आंदोलने सुरू आहेत. अमित-जयश्री हे कार्यकर्ते आहेत त्यामुळे ज्यांना ‘आधारशिला’ पाहायची आहे त्यांनी येऊन पहावी, असे त्याचे खुले आमंत्रण आहे.

‘आधारशिला शिक्षण केंद्र –

गाव साकड, ता. निवाली. जि. बडवानी.

मध्य प्रदेश (४५१६६६)

http://www.adharshilalearningcentre.org

adharshilalearningcentre@gmail.com

संपर्क : ८८८९२८९१९६

renudandekar@gmail.com

chaturang@expressindia.com