|| प्रतिभा वाघ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

plwagh55@gmail.com

आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळविलेली भूरीबाई ही भिल्ल आदिवासी स्त्री, चित्रनिर्मितीसाठी कागदाचा सर्वप्रथम वापर करणारी पहिली समकालीन चित्रकर्ती ठरली आहे. पुढे कॅन्व्हासवर अ‍ॅक्रॅलिक रंगाने सुंदर कलानिर्मिती करणारी, आणि आज भोपाळमधील आदिवासी संग्रहालयात ‘चित्रकार’ म्हणून नोकरी करणाऱ्या भूरीबाईने आपली ‘पिथोरी’ आदिवासी चित्रशैली जपली तर आहेच, पण ती वाढवते आहे.

मध्यप्रदेशातील भोपाळमधील ‘भारतभवन’ हे ललितकला, साहित्य, नाटय़, चित्रपट, नृत्यसंगीत या सर्व कलांचे माहेरघर म्हणता येईल. कारण वर उल्लेख केलेल्या सर्व कलांमध्ये प्रयोग करणारे, नवीन संशोधनाची भर घालणारे कलावंत, लेखक यांना उत्तेजन देण्यासाठीच ‘भारतभवन’ची निर्मिती झाली. सर्व कलांचा संवाद, संगम इथे होतो, असे म्हणता येईल.

या ‘भारतभवन’चे उद्घाटन १९८२ मध्ये झाले. या इमारतीचे बांधकाम सुरू असताना आजूबाजूच्या गावांमधील अनेक आदिवासी इथे मोलमजुरी करण्यासाठी येत असत. याच आदिवासीमधील एक तरुण भिल्ल आदिवासी मुलगी दिवसभरात काम करताना शिणवटा घालविण्यासाठी जमिनीवर कोळशाने, चुनखडीने चित्र काढीत बसे. कधी कधी वाळूच्या ढिगाऱ्याला सपाट करून, त्यावर निरनिराळे आकार बोटाच्या साह्य़ाने गिरगटत असे. प्रसिद्ध चित्रकार आणि त्यावेळचे ‘भारतभवन’चे संचालक जगदीश स्वामिनाथन अर्थात दिवंगत जे. स्वामिनाथन यांनी तिचे चित्रकलेतील कसब आणि ध्यास, उत्स्फूर्तता, सर्जनशीलता पाहिली. आणि त्यांनी तिला विचारले, ‘‘तू मला चित्र काढून देशील का?’’  त्यावर ती म्हणाली, ‘‘मी गावाकडे भिंतीवर, स्वत: हाताने बनविलेल्या रंगांनी चित्र काढते. इथे माझ्याकडे रंग नाहीत.’’ त्यावर स्वामीजी म्हणाले, ‘‘तुला रंग आणि कागद मी देतो.’’ त्यावर चित्र काढ. तिला ब्रशने कसे रंगवावे ते कळेना. त्यावेळी रंगात थोडे पाणी घालून तो मिसळून घेऊन लावावा, हे स्वामीजींनी तिला सांगितले. त्याप्रमाणे तिने सुंदर चित्र तयार केलं. त्यावेळी, ‘‘तुला दिवसभराची किती मजुरी मिळते?’’ असे त्यांनी विचारले असता, ‘‘सहा रुपये.’’ असे उत्तर मिळाले. ‘‘मी तुला दहा रुपये देतो,’’ हे चित्र मला दे असे सांगितल्यावर ती म्हणाली, ‘‘नको, सहाच रुपये द्या. मी नुसती बसून तर आहे. माती, दगड उचलण्याचे, कष्टाचे काम करण्याचे सहा रुपयेच मिळतात. मला एवढेच पुरे.’’

ही आदिवासी तरुणी म्हणजे आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळविलेली भूरीबाई बारिया! चित्रनिर्मितीसाठी कागदाचा सर्वप्रथम वापर करणारी पहिली आदिवासी चित्रकर्ती! पुढे कॅन्व्हासवर अ‍ॅक्रॅलिक रंगाने सुंदर कलानिर्मिती करणारी चित्रकर्ती! भिंतीवर चित्र काढण्यासाठी ती पूर्वी पाने, फुले, माती, काजळी यांचा रंग बनविण्यासाठी वापर करीत असे. भूरीबाईचे मूळ गाव मध्यप्रदेशातील झाबुआ जिल्ह्य़ातील पिटोल. सध्या ती भोपाळमध्ये राहते आणि तेथील आदिवासी संग्रहालयात ‘चित्रकार’ म्हणून नोकरी करते. ती भिल्ल आदिवासी आहे आणि त्यांची कला ‘पिथोरा’ चित्रशैली म्हणून ओळखली जाते. मध्यप्रदेशातील भिल्ल आणि गुजरातमधील राठवा आदिवासी या दोन्ही जमातींच्या जीवनात ‘पिथोरा’चे महत्त्व आहे. ‘पिथोरा’ देव घोडय़ावर स्वार झालेल्या रूपात दाखवतात. ‘पिथोरा’ देवाच्या कृपेने सर्व संकटे दूर होतात, अशा श्रद्धेतून ही चित्रे काढली जातात. या चित्रांना कलात्मक दृष्टीने न पाहता ‘धार्मिक’ दृष्टीनेच पाहिले जाते. म्हैस वीत नसेल, शेतात धान्य पिकत नसेल, गावात रोगराई आली, ही आणि अशा प्रकारची संकटे दूर झाली की, ‘पिथोरा’ देवाचे आभार मानण्यासाठी संपूर्ण घरात चित्रं काढली जातात. घरातील एकूण तीन भिंतींवर ‘पिथोरा’ रंगवितात. घरात प्रवेश केल्यावर समोरच्या भिंतीकडे प्रथम लक्ष जाते. त्यानंतर आजूबाजूच्या दोन भिंतींचे दर्शन होते. चित्राकरिता भिंत तयार करताना शेणाचे दोन थर देऊन ती सारवली जाते. त्यानंतर पांढऱ्या चुनखडीची पावडर त्यावर लावली जाते. हे काम अविवाहित मुली करतात. याला लिंपन अथवा लिपाई म्हणतात. स्वयंपाकघराजवळील भिंत ही ‘बाबा पिथोरा’ ची पवित्र भिंत समजली जाते. उरलेल्या भिंतीवर इतर चित्रे घर, झाडे, भूतखेत यांच्या आकृत्या काढतात. हे चित्र काढण्याचा मान बुवा, बडवा, लिखारे (पिठोरा चित्रकार) या ठरावीक लोकांचा असतो.

गावातील मुखिया किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्तीचा मृत्यू झाला तर, घराजवळील झाडाखाली एक दगड ठेवतात. त्या दगडाला रंगवतात आणि देव मानतात. त्याला ‘गाथला’ असे म्हणतात. या गाथल्यावर घोडय़ाचे चित्र काढतात. आमचे शेत, घर, कुटुंब यांचे रक्षण करण्यासाठी ती मृत व्यक्ती आपल्या आजूबाजूला असावी म्हणून प्रार्थना करतात आणि प्रत्येक कार्य त्याच्या विश्वासावर करतात. गावात ‘पिथोरा’ चित्र जेथे काढले जाई त्या ठिकाणी पाच, सहा वर्षांची भूरी हजर असे. ती आवडीने, लक्षपूर्वक ते पाहत राही. त्याविषयी प्रश्न विचारून भंडावून सोडी. तिची आई झाब्बूबाई चित्र काढत नसे, पण भिल्ल लोकांच्या विशिष्ट प्रकारच्या झोपडय़ा बांधण्याची कला तिला अवगत होती. ही कला भूरीबाईने आत्मसात केली. भोपाळच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय मानव संशोधन संग्रहालयात अशा प्रकारच्या झोपडय़ा बांधण्यात, भूरीबाईचा मोठा वाटा आहे. आईने लहानपणी तिला चित्र काढण्यासाठी उत्तेजन दिले. घरातील भिंती रंगविण्याची मुभा दिली. त्यावेळी माती, गेरू, चुनखडी पाने, फुले, काजळी यापासून भूरी रंग तयार करी. दिवाळीत माती बैल रंगविण्यासाठी आणलेले कच्चे रंगही ती वापरत असे. कापसाच्या झाडाची वाळलेली काटकी घेऊन तिला चिंधी बांधून ती ‘बुरुस’ (तिचा शब्द) म्हणजे ‘ब्रश’ बनवे. आणि ठिपके रंगवी. भेंडी कापून तिचे तुकडे रंगात बुडवून नक्षीकाम करीत असे.  गावात ज्या घरी लग्न असे, तिथे चित्र रंगविण्यासाठी सणासुदीला आपले आणि गावातली इतर घर चित्रांनी रंगविण्यासाठी भूरी नेहमीच पुढे असे. वयाच्या पाचव्या वर्षी तिने पहिले चित्र काढल्याची आठवण ती सांगते. भूरीबाई या पूर्वी मला मध्यप्रदेशातील दोन कलाशिबिरात भेटली. त्याला सात वर्षे झाली. पण २०१९ च्या डिसेंबरमध्ये तिची आदिवासी संग्रहालयात मुद्दाम भेट घेतली. त्यावेळी तिच्याशी झालेल्या संवादातून तिच्या विषयीची आदर आणखीच दुणावला.

२००२ मध्ये ‘चित्रकर्ती’ म्हणून तिची नियुक्ती ‘जनजाती’ संग्रहालयात झाली. त्यापूर्वी विवाह झाल्यावर ती गाव सोडून भोपाळला आली. गावाला लाकडे तोडून, मोळी बांधून विकायचा व्यवसाय करीत होती. घरी परतायला रात्रीचे ११ वाजायचे आणि मजुरी किती तर फक्त दीड रुपया. त्यानंतर बांधकाम मजूर, त्याची मजुरी सहा रुपये रोज होती.

जे. स्वामिनाथन यांच्यामुळे तिला आपले कलागुण समजले. त्यांना ती खूप मानते. कारण कागद, कॅनव्हास यावर तिने चित्रे काढली. ती स्वामिनाथन यांच्या मार्गदर्शनाने आणि तिथूनच ‘समकालीन चित्रकर्ती’ म्हणून तिचा प्रवास सुरू झाला. कोणतेही चित्र काढण्यास सुरुवात करण्यापूर्वी ती जे. स्वामिनाथन यांचे स्मरण करते. ते सतत आपल्या पाठीशी आहेत असे ती मानते. चित्र काढण्यापूर्वी ती कच्चे रेखाटन न करता थेट कुंचला आणि रंग घेऊन सुरुवात करते. तिला आकार विषय सुचत जातात. लहानपण झाडांच्या सहवासात गेले. त्यांच्या पानांपासून रंग बनविले. झाडांमुळे माझी कला पुढे गेली. ती झाडांना खूप मानते. चित्रात सुंदर झाडे काढते. प्राणी काढते. सांबराच्या शिंगातून झाड उगवलेले दाखवते. तिच्यात रंगसंगती, आकार यात नेहमीच नावीन्य असते. चित्र पूर्ण झाले की त्याला शीर्षक देते. पारंपरिक ‘पिथोरा’बद्दल सांगताना म्हणाली, की ‘पूर्वी फक्त दोन रंगात ‘पिथोरा’ बनत असे. आता खूप रंगांनी बनते.’ भूरीबाई सध्या जी चित्रे रंगविते त्यात पारंपरिक घोडा नसतो. झाडे, पशू, पक्षी माणसे असतात. छोटय़ा छोटय़ा ठिपक्यांनी नागमोडी रेषांनी अलंकरण असते. पण तिची शैली ‘पिथोरा’ शैली’ म्हणून ओळखली जाते. जगाच्या पाठीवर सर्वत्र तिने भिल्ल आदिवासींची ‘पिथोरा शैली’, उच्च स्थानावर नेऊन ठेवली आहे. प्राण्यांच्या पारंपरिक आकारांना नवे रूप देण्याचे काम भूरीबाईंनी केले. तिच्या चित्रांना चांगली लोकप्रियता मिळाली.

तिला तिच्या चित्रांचे भरपूर पैसेही मिळू लागले. एकावेळी प्रदर्शनात १० ते १५ हजार रुपये मिळत. ते पाहून आजूबाजूचे, लोक, नातेवाईक यांनी तिच्या नवऱ्याचे ‘कान भरायला’ सुरुवात केली. तिला कोणत्या कामासाठी एवढे पैसे मिळतात? अशी शंका व्यक्त केल्यावर, तिला बाहेर जाण्यास, नोकरीच्या ठिकाणी थांबून काम करण्यास घरून नकार मिळू लागला. त्यावेळी जे. स्वामिनाथन यांनी तिच्या पतीला रात्रपाळीच्या रखवालदाराची नोकरी दिली. त्यामुळे त्याचा भूरीबाईविषयीचा गैरसमज दूर झाला. विशेष म्हणजे भूरीबाईने त्याला ही चित्रकला शिकविली आणि मदतीला घेतले. आपल्या मुलींना, सुनांना, मुलांना, दीराच्या कुटुंबातील सर्वाना शिकवले. जवळजवळ, पंधरा चित्रकार तिने तयार केले आहेत. आपल्या परिवाराने ‘पिथोरा शैली’ जिवंत ठेवण्याचे काम करावे, अशी तिची इच्छा आहे. आपल्या पश्चातही हे काम व्हावे, असे ती मुलांना सांगते. भूरीबाईला आपली कला दुसऱ्यांना शिकविण्यात, वाटण्यात, समजावण्यात खूप आनंद मिळतो. ती बंगळूरु, म्हैसूर, कोलकाता, मुंबई अशा शहरात जाऊन कार्यशाळा घेते. लहान मुलांपासून वृद्ध मंडळी तिचे विद्यार्थी असतात.

भिल्ल कलेचे ऑस्ट्रेलियाच्या कलेशी साम्य आहे. ऑस्ट्रेलियात आदिवासी चित्रकारांच्या मेळाव्याला भारतातर्फे भूरीबाईने प्रतिनिधित्व केले होते. तिच्या अनेक चित्रकृती, कलारसिकांनी विकत घेतल्या. अमेरिकेतही तिने अशा मेळाव्याकरिता चित्रप्रदर्शन केले. उत्तम प्रतिसाद मिळाला. आता दुसऱ्यांदा येण्याचे आमंत्रण मिळाले आहे. पहिल्या दौऱ्याविषयी ती सांगते. विमानात खूप भीती वाटली. पण अमेरिकेत खूप छान वाटलं. तिथली शांतता आवडली. त्या दौऱ्यानंतर तिच्या चित्रात विमान, उंच इमारती आणि मोबाईल आला.

१९८६ मध्ये मध्यप्रदेश सरकारचा ‘शिखर सन्मान’ पुरस्कार  मिळाला. त्यावेळी वर्तमानपत्रातील बातमी वाचून आजूबाजूचे लोक म्हणाले, ‘सरकार सन्मान देणार आहे.’ त्यावर भूरीबाई म्हणाली, ‘माझ्याकडे सर्व सामान आहे घरात. आता कोणतं सामान?’ ती हसून आनंदाने सांगत होती. १९९८ मध्ये ‘राष्ट्रीय देवी अहिल्या सन्मान’, तर २००९ मध्ये ‘राणी दुर्गावती सन्मान’ मिळाला. ‘सद्बीज ऑक्शन’ ज्यात मौल्यवान वस्तू, चित्रे, शिल्प आदीचा लिलाव होतो. तेथे अकबर पद्मसी, गायतोंडे अशा जगप्रसिद्ध भारतीय चित्रकारांच्या चित्रांची वर्णी लागली आहे. त्या ‘सद्बीज’च्या लिलावासाठी भूरीबाईच्या चित्रांची निवड झाली.

हे सारे सन्मान, पुरस्कार, मिळाल्यानंतरही भूरीबाई पूर्वी होती तशीच आहे. साधी, बोलघेवडी. पण आता तिच्यात खूप आत्मविश्वास जाणवतो. व्यावसायिक अंगही आत्मसात केलं आहे तिने. या संग्रहालयातील तिच्या चित्रासमोर ती बसून कॅन्व्हासवर पेंटिंग करीत असते. फोन नंबर मागितल्यावर सुंदर चित्र असलेलं व्हिजिटिंग कार्ड दिलं तिने. ती ज्या चित्रासमोर बसते ते चित्र म्हणजे १० फूट  ७० फूट लांबीच्या भिंतींवर अ‍ॅक्रॅलिक रंगांनी रंगविलेला भूरीबाईचा ‘आत्माचित्रपट’ म्हणावा लागेल. तिच्या लहानपणापासून आत्ता आत्तापर्यंतच्या घटना तिने चित्रित केल्या आहेत. येणाऱ्या लोकांना ती ते चित्र दाखवून माहिती देते. आणि वेळ मिळेल तशी चित्रेही काढत असते.

आदिवासींचे एक वैशिष्टय़ आहे. कुटुंबातील किंवा जमातीतील एखादी व्यक्ती जर कलेत निपुण असेल तर त्याचा फायदा सर्व जमातीला मिळतो आणि संपूर्ण जमातीचे सहकार्य मिळते. भूरीबाईच्या बाबतीतही असेच आहे. पूर्वी गरिबीत दिवस काढले, पण आता आपल्या मुलांसाठी आपण काहीतरी चांगले केले याचं समाधान तिला आहे..