संपदा सोवनी
कर्नाटक संगीताची बैठक, हिंदुस्थानी संगीताची उत्तम जाण, सुरेल गळा आणि आत्मविश्वासपूर्ण, पण मृदू बोलणं, हे बॉम्बे जयश्री यांचं व्यक्तिमत्त्व. त्यांच्या कलेद्वारे त्या रसिकांना कायमच आनंद देतात, पण कोणत्याही स्वरूपातल्या चांगल्या संगीताचा आस्वाद घेणं, स्वरांशी मैत्री करणं आणि आपल्या क्षेत्रातील शिक्षणाची, ‘स्व’ला शोधण्याची प्रक्रिया सतत सुरू ठेवणं किती महत्त्वाचं आहे, हे त्यांच्याकडून शिकायला मिळतं.
‘चेन्नईच्या बॉम्बे जयश्री’ ही ओळख जराशी मजेशीरच! एखादा कलाकार ज्या गावातून आला त्या गावाचं नाव कलाकाराच्या नावाआधी जोडण्याची परंपरा दक्षिण भारतात रूढ आहे. त्यामुळे गेली अनेक वर्ष जयश्री या चेन्नईत राहात असूनही आणि मधल्या काळात ‘बॉम्बे’चं ‘मुंबई’ झाल्यानंतरही ही ओळख पुसली गेली नाही. पण नावाच्या आधी जोडलेल्या या शब्दाला जयश्रींच्या बाबतीत वेगळं महत्त्व आहे. सगळ्यांना कायम आपल्यात सामावून घेणाऱ्या मुंबईत वाढताना संगीताबद्दलचा खुला दृष्टिकोन बॉम्बे जयश्री यांच्यात रुजला. शास्त्रीय कर्नाटक संगीतातील यशस्वी गायिका, लोकप्रिय चित्रपटगीतं गाणारी गायिका, ‘ऑस्कर’ नामांकनापर्यंत पोहोचलेली गायिका, अशा त्यांच्या आजवरच्या प्रवासात त्यांच्या या दृष्टिकोनाचा प्रत्यय येतो.
बॉम्बे जयश्री रामनाथ यांचे आई-वडील दोघेही कर्नाटक संगीताचे जाणकार आणि गायक. जयश्रींचा जन्म खरं तर कोलकात्याचा, परंतु काही वर्षांनी त्यांचं कु टुंब मुंबईत स्थायिक झालं. जयश्री यांचे वडील एन. एन. सुब्रह्मण्यम् यांच्या निधनानंतर त्या आणि त्यांच्या भावांना मोठं करण्याची जबाबदारी आई सीथालक्ष्मी सुब्रह्मण्यम् यांच्यावर आली. सीथालक्ष्मी स्वत: शास्त्रीय गायिका असल्यामुळे परिसरातील स्त्रिया आणि मुलांसाठी घरातच संगीत वर्ग घ्यायच्या. त्यामुळे अगदी लहानपणापासून कर्नाटक संगीताचे सूर जयश्री यांच्या कानांवर पडत होते. असं असलं तरी त्यांच्या घराला चित्रपटसंगीताचं वावडं कधीच नव्हतं. ‘आपल्या’ भाषेतलंच संगीत ऐकायला हवं, असंही काही नव्हतं. ट्रांझिस्टरवर ‘विविध भारती’ लावून तासन्तास जयश्री आपल्या भावंडांबरोबर ऐकत राहात. मुंबईत राहात असल्यामुळे के वळ ६० आणि ७० च्या दशकातल्या हिंदी गाण्यांशीच त्यांचा ऋणानुबंध जुळला असं नव्हे, तर विविध भाषा आणि संस्कृतींमधलं संगीत एकत्रितपणे अनुभवण्यातली गंमत इथल्या वास्तव्यामुळे घेता आली. तमिळ, मल्याळम्, हिंदी अगदी मराठी गाणीसुद्धा त्यांनी खूप ऐकली.
जयश्री यांनी शास्त्रीय गायिका व्हावं अशी त्यांच्या आईची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी नित्यनेमानं रियाज करावा यासाठी आई आग्रही असे. लहान असताना जयश्रींना मित्रमैत्रिणींबरोबर खेळणं सोडून रियाजाला बसण्याचा कं टाळा यायचा, पण आईनं त्यासाठीचे आपले प्रयत्न सुरू ठेवले. विविध समारंभांमध्ये आई जयश्रींना गायला लावत असे आणि अनेकदा त्यांना ते आवडत नसे. पण त्या महाविद्यालयात (आर. ए. पोदार कॉलेज) दाखल झाल्या आणि संगीतातील त्यांची समज, त्यांचं गाणं यांसाठी होणारं कौतुक त्यांना आवडायला लागलं. त्यांनी काही महाविद्यालयीन स्पर्धा जिंकल्या. सुरेल गळ्याची मिळालेली देणगी त्यांना वेगळा आत्मविश्वास देऊ लागली. त्यांनी सुरुवातीला काही जाहिरातींच्या जिंगल्ससाठी आवाज दिला. आवाजाचा वापर कसा करायला हवा, याची त्यांची समज वाढत गेली.
जयश्री यांचं सुरुवातीचं कर्नाटक संगीताचं शिक्षण प्रसिद्ध गुरू टी. आर. बालमणी यांच्याकडे झालं. तर त्यांनी हिंदुस्थानी संगीताचे धडे के . महावीर जयपूरवाले आणि किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. अजय पोहनकर यांच्याकडे घेतले. ज्येष्ठ व्हायोलिनवादक आणि संगीत गुरू लालगुडी जयरामन् यांच्याकडून शिकण्यासाठी त्या चेन्नईत आल्या आणि कर्नाटक संगीताचा महासागर किती खोल आहे, हे त्यांना पुन्हा जाणवलं. लालगुडी जयरामन् यांच्याविषयी ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना त्या सांगतात, ‘‘स्वरांशी मैत्री करणं, संगीताच्या जगात सामावून जाणं, त्यात डुंबणं, हे त्यांच्याकडून शिकायला मिळालं.’’ जयश्री यांचा संगीताकडे पाहाण्याचा दृष्टिकोन हळूहळू बदलला होता. ‘स्व’च्या शोधाचं हे माध्यम आहे हे त्यांना उमगलं होतं. हा शांत भाव त्यांच्या सादरीकरणात नेहमी झळकतो.
शास्त्रीय संगीतातील प्रथितयश गायकांनी चित्रपटांमध्ये गाणं हे आपल्याला नवीन नसलं तरी बहुतेक वेळा या गीतांना भक्कम शास्त्रीय बैठक असते. लोकप्रिय चित्रपट संगीत गाणारे शास्त्रीय गायक मात्र त्या तुलनेत कमी आहेत. प्रादेशिक भाषांमधील- विशेषत: मल्याळम आणि तमिळ चित्रपट पाहाणाऱ्या रसिकांना बॉम्बे जयश्रींनी गायलेली चित्रपटगीतं निश्चित माहीत असतील. त्यांच्या गीतांनाही शास्त्रीय संगीताची पार्श्वभूमी आहेच. उदा. मणीरत्नम् दिग्दर्शित ‘इरुवर’ (१९९७) चित्रपटातील लोकप्रिय गीत ‘नरुमुगये’. ए. आर. रहमान यांनी संगीतबद्ध के लेलं हे गीत म्हणजे उन्नीकृष्णन् आणि बॉम्बे जयश्री या शास्त्रीय संगीतातील दोन जाणकारांनी घडवलेला स्वरांचा अतिशय मधुर आविष्कार. पण शास्त्रीय संगीत अजिबात न ऐकणाऱ्या वर्गात बॉम्बे जयश्रींना प्रचंड लोकप्रियता दिली ती ‘मिन्नाले’ (२००१) या तमिळ चित्रपटातील हॅरिस जयराज यांनी संगीतबद्ध के लेल्या ‘वसीगरा’ या गीतानं. गौतम वासुदेव मेनन यांचा हा चित्रपट त्याच वर्षी ‘रेहना हैं तेरे दिल में’ या नावानं हिंदीत बनवला गेला आणि ‘वसीगरा’चं ‘जरा जरा बहकता हैं’ झालं. त्या वेळी तरुणांना या गाण्यानं अक्षरश: वेड लावलं होतं आणि अजूनही ते आवडीनं ऐकलं जातं. आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय ठरलेल्या ‘लाइफ ऑफ पाय’ (२०१२) या चित्रपटासाठी त्यांनी गायलेल्या गीताला ‘अकॅ डमी अॅवॉर्डस्’मध्ये (ऑस्कर) नामांकन मिळालं होतं.
संगीताचं सौंदर्य जाणवणं हेच महत्त्वाचं, असं त्यांचं म्हणणं असतं. त्या म्हणतात, ‘‘‘लर्निग’ आणि ‘अनलर्निग’ अर्थात शिकणं आणि आधी आत्मसात के लेल्या काही गोष्टी पुसून नव्यानं श्रीगणेशा करणं, हे मी सतत करत राहाते. ही कायम चालणारी प्रक्रिया असते. विद्यार्थाना ज्ञान देणं म्हणजे संगीत शिकण्यातून मला मिळणारा आनंद त्यांना वाटणं.’’
रूढ अर्थानं कितीही यश मिळवलं तरी शिकण्याची प्रक्रिया थांबत नाही हे मनात पक्कं असलं की त्या जाणिवेतून व्यक्तिमत्त्वात जी नम्रता आणि मृदुता येते, ती जयश्रींच्या व्यक्तिमत्त्वात दिसते. आपण ठरवलेलं ध्येय कोणतंही असो, ते गाठण्यासाठी आरंभलेला प्रवास अधिकाधिक समृद्ध आणि आनंददायी करण्यासाठी आवश्यक असलेला शांतपणा त्यांच्याकडून निश्चित घेता येईल.
sampada.sovani@expressindia.com