अतुल परचुरे

‘‘आताच मोठया आजारातून बाहेर पडत असताना अमेरिका दौऱ्यावर निघताना मी आनंद इंगळेला म्हटलं होतं, ‘नाटकातून मी या क्षेत्रात आलोय. आता नाटकासाठी पुन्हा रंगमंचावर उभा राहिलो तरच मी बरा होईन.’ आणि खरोखर प्रत्येक प्रयोगागणिक माझी तब्येत सुधारत गेली. ज्या क्षणी अमेरिकेतून परत भारताच्या भूमीवर विमानाची चाकं टेकली, त्या क्षणी मला आत्मविश्वासाचं प्रचंड बळ मिळालं होतं. या दौऱ्यामुळे मला माझ्यावरचं प्रेक्षकांचं प्रेम कळलं आणि खूप जवळचे मित्रही मिळाले.’’ सांगताहेत अभिनेते अतुल परचुरे.

People who laughed at my work and made fun of me are today giving compliments and saluting Bela Gram Panchayat
‘टीका करणारे आता कौतुकाचा वर्षाव करीत आहेत’…राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त बेला गाव अन् महिला सरपंचाची अनोखी यशोगाथा
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Tharala Tar Mag Monika Dabade New Car
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी! नवऱ्यासह शेअर केले फोटो, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
Marathi actress alka kubal praise to shivali parab for work on mangla movie
“बऱ्याच नायिका मी किती सुंदर…”, अलका कुबल यांनी ‘मंगला’ सिनेमासाठी केलं शिवाली परबचं कौतुक; म्हणाल्या…
reactions of students participated in loksatta lokankika competition zws
म्हणूनच लोकसत्ता लोकांकिका इतर स्पर्धांपेक्षा खूप आगळीवेगळी ठरते; स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया
Maharashtrachi Hasyajatra fame prasad khandekar Namrata sambherao shivali parab onkar raut new drama thet tumchya gharatun coming soon
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांचं नवं नाटक लवकरच रंगभूमीवर; नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकरसह दिसतील ‘हे’ कलाकार
Marathi Actor Jaywant Wadkar Daughter business
जयवंत वाडकर यांच्या लेकीला पाहिलंत का? झाली नामांकित कंपनीची ब्रँड अँबॅसेडर, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
actress Surabhi Hande entry in Aai Tulja Bhawani serial of colors marathi
१० वर्षांनंतर म्हाळसा आली परत! अभिनेत्री सुरभी हांडेची ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत एन्ट्री

आनंददायी पर्यटन अनुभवण्याची आजची संकल्पना माझ्या लहानपणी मुळी नव्हतीच. त्यात माझं आजोळ सोलापूरचं! मे महिन्याच्या सुट्टीत तिथे जाणं नको वाटे एवढा कडक उन्हाळा. हो, पण उन्हाळी सुट्टीतली आठवण अजून ताजी आहे. महाबळेश्वरला ‘एमटीडीसी’चा एक हॉलिडे कॅम्प होता. तिथे आमच्या मोठया, एकत्र कुटुंबाचा २१ दिवस मुक्काम असे. मुंबईच्या तुलनेत तिथली सुखद कोरडी थंड हवा, त्या हवेत मोकळा श्वास घेणं, वेगवेगळे पॉइंट्स बघणं, वेण्णा लेकचा नौकाविहार, ताज्या स्ट्रॉबेरीज आणि आइस्क्रीमचा आस्वाद घेणं, या सगळयात न्यारी गंमत असे. त्यात तिथे मांसाहाराचीही मुभा मिळायची. म्हणजे एक प्रकारे ‘चेरी ऑन द केक’च म्हणा ना!

बालपणीची आणखी एक रम्य आठवण- आमचे नातलग उद्योगपती नानासाहेब बेडेकर यांचा कर्जतला मोठा बंगला होता. ते दर शनिवार-रविवारी मला त्यांच्या घरी घेऊन जात. गोठयातल्या गाई-म्हशींमध्ये रमणं, विहिरीत मनसोक्त डुंबणं, भल्यामोठया अंगणात मुलांना जमवून क्रिकेट खेळणं, कर्जतचा सुप्रसिद्ध वडा चापणं, असं गावरान आयुष्य मन:पूर्वक जगायला मिळालं तिथे मला. पुढे सातवीत असतानाच मी ‘बजरबट्टू’ या बालनाटयात काम करू लागलो. त्या नाटकाच्या दौऱ्यांच्या निमित्तानं तेव्हापासून जे फिरणं सुरू झालं ते आजतागायत! पण त्यापूर्वीचाही एक किस्सा स्मरणात राहिलाय. शाळेत असताना सगळेजण ट्रेकला जातात म्हणून मीही एकदा ट्रेकला गेलो. कर्जतवरून गड चढायचा होता; पण आमचा वाटाडया एवढा नवखा होता, की तो रस्ता चुकला. अशी अवस्था आली, की एका पॉइंटला पुढे रस्ताच नाही आणि डावीकडे खोल दरी! प्रत्येक क्षणाला पाय घसरतोय एवढी उतरण. तासाभरानं कसेबसे जीव मुठीत घेऊन आम्ही खाली उतरलो. ‘हायकिंग’चा हा पहिलाच अनुभव एवढा खतरनाक होता की, परत कधी मी त्या भानगडीत पडलो नाही!

नाटकांच्या दौऱ्यांमुळे फिरण्याची जी सुरुवात झाली, ती खऱ्या अर्थानं ‘टिळक आणि आगरकर’ या नाटकाच्या दिल्ली दौऱ्यामुळे. एक दौरा आठवतोय. या नाटकाचे इंदूर, ग्वाल्हेर आणि दिल्ली असे तीन ठिकाणी प्रयोग होते. दिल्लीचा प्रयोग झाल्यावर आमच्या नाटकाची बस आग्रा इथं ताजमहाल पाहायला निघाली. रात्री १२ वाजता पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात न्हाऊन गेलेला तो संगमरवरी ताजमहाल पाहिला! अहाहा! ते चित्र आजही माझ्या डोळय़ांसमोरून हलत नाही. अक्षरश: दैवी दृश्य होतं ते! त्यानंतर पुढेही मी बऱ्याच वेळा ताजमहाल पाहिला, दिवसाउजेडी, तेव्हा माझा भ्रमनिरास झाला. इतकं सुंदर शिल्प, पण त्यावर नावं कोरणं, शेरे लिहिणं.. खरं तर ते सुंदर शिल्प विद्रूप करू नये, जपावं, असं आपल्यातल्या प्रत्येकाला वाटलं पाहिजे.

त्याच्या बरोबर उलट एक अनुभव आला, लोक आपलं वैभव कसं जपतात त्याचा. मॉरिशसला गेलो होतो. एवढासा देश तो! चित्रपटाचं चित्रीकरण आटपून आम्ही समुद्रातली कोरल्स बघायला गेलो. इतकी सुरेख कोरल्स! मला मोह झाला आणि मी त्यातलं एक उचललं. बोटीचा कप्तान लगेच विनयानं, पण अत्यंत करारीपणे म्हणाला, ‘‘कोरल उचलून नेऊ नका. टाका परत समुद्रात.. प्रत्येकानं अशी कोरल्स नेली तर इथे काय राहील? आमच्या देशाची ही स्पेशालिटी आहे. ही कोरल्स बघायला पर्यटक येतात तेव्हाच इथल्या लोकांना रोजीरोटी मिळते. तुम्हाला हवं तर गिफ्टशॉपमधून घ्या एखादं कोरल विकत.’’ थोडक्यात, इथलं वैभव जपायचं, ही भावना. ही जपणुकीची वृत्ती आपल्यात कधी येणार, असा प्रश्न पडला, अजूनही पडतो.

त्यापूर्वी १९९८ च्या फेब्रुवारीमध्ये पहिला परदेश प्रवास झाला तो मॉस्कोला. एका जाहिरातीचं तिथल्या जगप्रसिद्ध क्रेमलीन स्क्वेअरमध्ये चित्रीकरण होतं. उणे पाच ते उणे वीस डिग्री अशी थंडीची रेंज. तुफान बर्फवृष्टी सुरू होती. असा बर्फ पुढेही कधी आयुष्यात बघितला नाही. हॉटेलच्या २६ व्या मजल्यावरची खिडकी किलकिली करून बाहेर बघितलं, तर अख्ख्या मॉस्को शहरावर पांढऱ्याशुभ्र बर्फाची चादर पांघरली होती. बाजूची नदी गोठली होती, त्यावर लोक मजेत स्केटिंग करत होते. अशा कडाक्याच्या थंडीत चित्रीकरण करण्याचा अनुभव भन्नाट होता. तिथलं मुक्कामाचं हॉटेल तर एवढं महाकाय होतं, की लिफ्टमधून रूमकडे जाताना मी किती तरी वेळा लॉबीत चुकायचो.

पुढे परदेशातली हॉटेल्स, सात-सातपदरी रस्ते, मेट्रो, महाकाय इमारती आणि भव्य निसर्गदृश्यं या सगळयाला खूप सरावलो. चित्रीकरण आणि नाटकांचे प्रयोग, यासाठी रशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दुबई, बँकॉक, हाँगकाँग या देशांखेरीज अमेरिका आणि इंग्लंडमध्ये अनेक वेळा प्रवास केला. खूप वेगवेगळे अनुभव घेतले. ‘आवारापन’ या चित्रपटाचं चित्रीकरण बँकॉकच्या अत्यंत रहदारीच्या ‘सियान स्क्वेअर’मध्ये होतं; पण कोणीही आम्हाला कसलाही त्रास दिला नाही. ‘जुडवा २’चं लंडनमधलं चित्रीकरण आम्ही इतकं हसतखेळत करत होतो, की कामाचा ताण मुळी जाणवलाच नाही. दिवसभर चित्रीकरण आणि रात्री सगळय़ांबरोबर मनमुराद खाणंपिणं, भटकंती असे.

१९९८ मध्ये सुधीर भट यांनी चार नाटकांचा अमेरिका दौरा आयोजित केला होता. अमेरिकेचा तो माझा पहिला दौरा. अमेरिकेच्या विमानतळाबाहेर पहिलं पाऊल टाकलं, तिथली हवा फुप्फुसांत गेली आणि त्या क्षणी जाणवलं, की आपण जणू स्वर्गात आलोय! आठ शहरांमध्ये दर शनिवार-रविवार दोन दोन नाटकं करत आम्ही अख्खी अमेरिका फिरलो. हा सगळा प्रवास ग्रे हाऊंड बसनं केला. अमेरिकेतली अनेक शहरं, तिथली छोटी छोटी गावं, गल्ल्या-बोळ बघत आम्ही वीस जण हसतखेळत, मजा करत फिरलो. नायगारा, डिस्नेलँड, युनिव्हर्सल स्टुडिओ, अशी प्रेक्षणीय स्थळं सोडा; पण अमेरिकेतला निसर्ग, जनजीवन खूप जवळून पाहिलं.

प्रवासादरम्यान अनेक माणसं भेटली. न्यूझीलंडमध्ये एक पश्चिम आशियातली स्त्री आम्ही थांबलो होतो तिथल्या एका स्थानिक माणसाला पत्ता विचारत होती. त्यानं क्षणाचाही विलंब न लावता तिला गाडीत घेतलं आणि इच्छित स्थळी नेऊन सोडलं. तो परत आल्यावर त्याला विचारलं, ‘‘तू एका अनोळखी, परदेशी स्त्रीसाठी एवढं केलंस?’’ त्यावर त्याचं उत्तर होतं, ‘‘माझ्या देशात आलेल्या परदेशी प्रवाशांची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे. ते मायदेशी परत जातील, ते माझ्या देशाबद्दलचं अत्यंत चांगलं मत घेऊन! त्यासाठी मला जे जे शक्य आहे ते मी करणार.’’ जपानमधल्या नागरिकांचं देशप्रेमही असंच अद्भुत आहे. देशप्रेमापायी अख्ख्या पिढीनं कुटुंबनियोजन करून लोकसंख्या नियंत्रणात आणली. तिथलं विकसित तंत्रज्ञान बघून तर मी अवाक् झालो. २००९ मध्ये एकावर एक सात पदरी मेट्रोचं जाळं! आपल्याकडे जेव्हा इंटरनेटचा पत्ता नव्हता, तेव्हा तिथे ‘फाइव्ह जी’ होतं. शिस्त, स्वच्छता, अन्नाची नासाडी न करणं, या सगळयाविषयी त्यांचं अत्यंत काटेकोर असणं भारावून टाकणारं आहे. मी टोकियोला गेलो होतो तेव्हा तिथे नुकताच मोठा भूकंप होऊन गेला होता. मेट्रो तातडीनं बंद करण्यात आल्या होत्या. तेव्हा टॅक्सी ड्रायव्हर्सनी सगळया प्रवाशांना एक पैसाही भाडं न घेता आपापल्या घरी सोडलं. खरंच,असे अनुभव भारावून टाकतात मला!

अमेरिकेत फिरतानाही पावलोपावली असा अनुभव येतो. मी आजवर चित्रीकरणासाठी आणि नाटकांसाठी दहा वेळा तरी अमेरिकेला गेलोय; पण नुकताच जो अमेरिकेचा दौरा केला, तो आजवरच्या दौऱ्यांपेक्षा खूप वेगळा होता. तिथे नाटकाचे प्रयोग करण्याचं नावीन्य नव्हतं अथवा अमेरिकावारीचंही नव्हतं; पण नुकताच एका मोठया आजारपणातून बाहेर पडत असताना माझा हा दौरा ठरला. ‘तिथे आपल्याला काही झालं तर?’ या भयाची सुरी मानेवर असताना या दौऱ्यावर जाण्याचा मी निर्णय घेतला, तो केवळ विजय केंकरे आणि आनंद इंगळे या माझ्या मित्रांच्या भरवशावर! आणि या दौऱ्यानं मला त्यांच्याखेरीज आणखी अकरा मित्र मिळवून दिले. अहो, सहकलाकारांनी मला किती जपावं! साधी एक बॅगसुद्धा मला कोणी उचलू दिली नाही. मायबाप प्रेक्षक तर कलावंतांचे प्राणवायू! तिथल्या प्रेक्षकांना माझ्या आजारपणाबद्दल ठाऊक होतं. प्रत्येक प्रयोगाला माझ्या ‘एन्ट्री’ला टाळी यायची. नाटक संपल्यावर प्रेक्षक आत येऊन मला सदिच्छा देत, कौतुक करत. मला म्हणत, ‘‘तुम्हाला पुन्हा स्टेजवर काम करताना बघून खूप बरं वाटलं!’’ प्रेक्षकांनी कलावंतांवर किती भरभरून प्रेम करावं!

अमेरिका दौऱ्यावर निघताना मी आनंदला म्हटलं होतं, ‘‘नाटकातून मी या क्षेत्रात आलोय. आता नाटकासाठी पुन्हा रंगमंचावर उभा राहिलो तरच मी बरा होईन. हे नाटकच मला बरं करणार, ताकद देणार.’’ आणि खरोखर प्रत्येक प्रयोगागणिक माझी तब्येत सुधारत गेली. ज्या क्षणी अमेरिकेतून परत भारताच्या भूमीवर विमानाची चाकं टेकली, त्या क्षणी मला आत्मविश्वासाचं प्रचंड बळ मिळालं होतं. त्या आत्मविश्वासानं उभारी दिली, आधार दिला आणि अफाट आनंद दिला. एका कलावंताचं हे अनोखं आनंद पर्यटन ठरलं!

atulparchure@gmail.com

शब्दांकन- माधुरी ताम्हणे

Story img Loader