मेघना जोशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

joshimeghana.23@gmail.com

नापास हा साधा सरळ बिनाजोडाक्षरांचा शब्द व्यक्तीचं मानसिक खच्चीकरण करतो म्हणून तो वापरायचा नाही. पण याच वेळी असा विचार करायलाच हवा ना की जेव्हा आपण एखादं झाड लावतो तेव्हा त्याला फक्त भरपूर खतपाणी देत नाही तर त्याच्या अनावश्यक फांद्या तोडत त्याला योग्य दिशेने वाढीसाठी मदत करतोच. मुलांची वाढ होत असताना आपली मुलं नकार पचवायला शिकलीच नाहीत, तर यशाची गोडी कशी चाखणार? पास- नापास या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे समजून द्यायला समाज म्हणून आपण कमी पडतोय का?

परवाच आमच्या शाळेमध्ये दहावीच्या मुलांचा ‘सेण्ड ऑफ’ झाला आणि त्या वेळी अभ्यासात चांगली प्रगती असलेल्या दोन मुलांचा संवाद कानावर पडला, एकमेकांना टाळी देत ते दोघेही म्हणत होते, ‘‘अरे मला प्रश्न पडतो या दहावीबद्दल. कोणी नापास होणार नाही तर अभ्यास तरी कशाला करायचा?’’ खरंतर ती दोघंही कधीही नापास होण्याची सूतराम शक्यता नव्हती. पण, त्यांनी यावर भाष्य करावं आणि तेही अशा प्रकारे हे मला खूपच खटकलं.

‘नापास नाही हो आता कुणीही’, हे अगदी जोरजोरात ऐकवलं जातं, कारण नापास झालं तर माझं लेकरू आत्महत्या करील ही महत्त्वाची भीती त्यामागे असते. ‘ओपन हाऊस’ला अनेकदा पालक आम्हा शिक्षकांना भेटायला येतात. ‘तुमच्या मुलाला हे हे येत नाही किंवा ते असं वागतं,’ असं म्हटलं तर पालकही आम्हाला असाच प्रश्न विचारतात, ‘तुम्ही असं म्हणताय हो, हेच कशाला मलाही पटतंय, पण त्याला मी काही बोललो आणि त्याने जीवाचं बरंवाईट करून घेतलं तर?’ एकीकडे आपण म्हणायचं की नकार स्वीकारायला शिकवा, बेतलेली परिस्थिती स्वीकारायला शिकवा आणि आपणच भावी पिढीच्या आयुष्यातला ‘न’ काढूनच टाकायचा. आजकाल पालक मिळवते असतात, मुलांसाठी त्यांना वेळ देता येत नाही म्हणून त्यांच्या मनात एकप्रकारची अपराधीपणाची भावना असते म्हणून ते मुलांना काहीही ‘नाही’ म्हणत नाहीत आणि त्याचाच परिणाम वगैरे म्हणून मुलांना नकार ऐकायची, स्वीकारायची आणि पचवायची ताकद अज्जिबात उरलेली नाहीय. त्यामुळे आजच्या पिढीत अनेक वर्तनसमस्या दिसतात. पण मुलाचं बालवयातलं साधारणत: अर्ध आयुष्य ज्या ठिकाणी म्हणजे शाळेत जातं तिथेही त्याला ‘नकार’ दिला जाणं बंदच पडलेलं आहे. निदानात्मक आणि उपचारात्मक अध्यापन पद्धती, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन वगैरे गोष्टीबाबत आम्हा शिक्षकांचंही असंच झालंय. हे मी एक शिक्षिका असूनही धाडसाने म्हणत्येय. कारण आमच्या देशी सवयीनुसार याचे फक्त कागदी घोडे झालेले आहेत. त्याचा खरा वापर होतच नाही. संकल्पना स्पष्टीकरण, दृढीकरण वगैरे वगैरेचा वापर करणारे शिक्षकमित्र नाहीयेतच कोणी आपल्याकडे, असं मला म्हणायचं नाही पण जे आहेत ते संख्येने अत्यंत कमी आहेत हे आपण थोडंसं धारिष्टय़ दाखवत मान्य करायला हवंच. त्यामुळे काय होतंय, हे तुला येत नाही असं कोणालाच म्हटलं जात नाही किंवा गेलं तरी ते एवढं मुळमुळीत असतं की ते त्या बापुडय़ा पाल्यापर्यंत ते नीट पोहोचतच नाही त्यामुळे त्याचा ‘मला सारं काही येतं’ हा भ्रम आणि अतिआत्मविश्वास आपण नकळत पोसत राहतो. जन्माला आल्यापासून शिक्षणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आपण त्यांना अशा प्रकारचा नकार देण्याच्या फंदात कोणीही पडत नाही.

हे विधान अनेकांना खटकणार, पटणार नाही हे माहीत असूनही मी इथे मांडत्येय कारण जरी लहानपणी आपण ते त्यांना सांगितलं नाही तरी पुढे ते त्यांना समजतंच. तोपर्यंत ते वयाच्या अशा टप्प्यावर पोहोचलेले असतात की मागे फिरणं वा दुसरं काही करणं शक्य नसतं, असं नाही पण शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा ते कठीण असतं. याबाबत मला इंजिनीअिरगकडे वळलेल्या किंवा स्पर्धा परीक्षांच्या मागे लागलेल्या विद्यार्थ्यांचं उदाहरण द्यायला आवडेल. दहावीनंतर डिप्लोमा, डिग्री असं करताकरता इंजिनीअिरगची डिग्री मिळवलेले अनेक जण पुढे त्या क्षेत्रात आपलं पाऊल रोवू शकत नाहीत. कारण ते इंजिनीअिरगचं क्षेत्र त्यांच्या आवडीचं नसतं आणि आवडीच्या क्षेत्रातील कोणतंही कौशल्य योग्य त्या वयात प्राप्त झालेलं नसतं. हे फक्त  इंजिनीअिरगबाबतच आहे असं नाही पण या क्षेत्रातल्या उदाहरणांची संख्या जास्त आहे म्हणून हे उदाहरण दिलं एवढंच.

यापुढचा भाग खूप महत्त्वाचा आहे. लहानपणी या मुलांना ‘तुला हे येत नाही, हे समजलं नाहीय’ असं सांगितलं जात नाही, कारण नापास हा शब्द हद्दपार झाल्याने शिक्षक जोखीम नको म्हणून ते सांगत नाहीत आणि पालकांना वर म्हटल्याप्रमाणे एकतर मुलांच्या जिवाची काळजी किंवा त्यांचं ते एखाददुसरं लाडकं अपत्य, त्याच्याबद्दल असं नकारात्मक काहीतरी ऐकून घ्यायची त्यांची तयारीच नसते. मग या मुलांना त्यांच्या गद्धेपंचविशीत याची जाणीव होते. मग त्यावर  एक नवीन उपाय आम्ही आजकाल पाहतोय तो म्हणजे आपण काहीतरी बारीकसारीक उद्योग करणं त्याबद्दल लंब्याचौडय़ा बाता मारणं आणि पेन्शनर असणाऱ्या आईवडिलांच्या जिवावर किंवा बायकोलाही कामाच्या घाण्याला जुंपत किंवा सरकार, परिस्थिती, मंदी अशी कारणं देत आयुष्य पुढे ढकलणे. हे सगळ्यांच्या बाबतीत होतंय असा अजिबात दावा नाही. पण मुळातच मेहनत घेण्याकडे कल नसणाऱ्या मुलांच्या बाबतीत हे प्रामुख्याने दिसून येते.

कुमारावस्थेत ‘नापास’ शेरा ऐकून अपयशी झाल्याचे दु:ख वाटून आत्महत्येपर्यंत पोहोचू शकणारी मुले या सरकारच्या या निर्णयामुळे आत्महत्येपर्यंत पोहोचणार नाहीत, हे एक वेळ मान्य केलं तरी उद्या पुढच्या आयुष्यात आपल्या उद्योग व्यवसायात ‘नापास’ होणारच नाहीत, कशावरून? मग अशा वेळी त्यांच्या मनातला ‘नापास’ हा शेरा त्यांना आत्महत्येपर्यंत नेणारच नाही कशावरून? आणि सध्याची एकूणच खासगी नोकऱ्यांची स्थिती पाहता यापुढच्या किती पिढय़ांना निवृत्तिवेतन मिळेल अशी शंका असताना या पिढय़ांच्या पुढच्या पिढय़ा काय करतील? आज वाचताना ‘काय हे सगळं भयंकरीकरण’ आहे असं वाटेल पण हे उद्याचं वास्तव आहे म्हणून ते आजच समजून घ्यायला हवं. म्हणजे मुख्य मुद्दा या मुलांना ‘नापास’ म्हणजे  फक्त त्या त्या विषयात कमी गुण मिळाले आहेत तू संपूर्णपणे अपयशी नाहीस, ही संकल्पना नीट समजून द्यावी लागेल. शिक्षक आणि पालकांनीच ती करायला हवी. स्पर्धेतील भीती कमी करण्यासाठी सरकारी पातळीवर काय करावं लागेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

‘नापास’ या शब्द फक्त परीक्षेतच नाही तर आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर सामोरा येत असतो. त्यासाठीची तयारी लहानपणापासून असणे आवश्यक आहे. म्हणूनच काही गोष्टी मुलं लहान असल्यापासूनच पालकांनी आणि शिक्षकांनी करायला हव्यात. पहिली गोष्ट – नावं ठेवणं बंद करायचं आणि विश्वास ठेवायचा. मूल्यमापन पद्धती कोणतीही असो त्या पद्धतीतून मिळालेले जे निकाल आहेत ते खरेखुरे मांडून, त्यांच्यावर विश्वास ठेवत त्यानुसार आपली दिशा ठरवणं महत्त्वाचं आहे. नापास म्हणा किंवा पुनर्परीक्षेसाठी पात्र म्हणा या विषयामधल्या माझ्या संकल्पना दृढ नाहीत किंवा मला त्या विषयामध्ये गम्य नाही हे जाणून त्यासाठीचा वेगळा पर्याय शोधणे याला महत्त्व दिलं गेलं पाहिजे. यासाठी मला माझंच उदाहरण द्यावंसं वाटतं, दहावी-बारावी दोन्ही स्तरांवर मला मराठी भाषेमध्ये सगळ्यात जास्त आणि चांगले गुण होते. ज्या मराठीचा योग्य उपयोग मी वयाच्या पस्तिशीनंतर करू लागले. म्हणजे माझ्याकडे असलेल्या कौशल्याचं मूल्यमापन आधी झालंच होतं, पण घोडं कुठे अडलं तर मूल्यमापनावर. अनेक जण विश्वास ठेवत नव्हते तशीच मीही. त्यामुळे त्या भाषेत पुढचं शिक्षण घ्यावं वगैरे ध्यानीमनीही आलं नाही. त्यामुळे मला तरी असं वाटतं की, अनेक पद्धती आणि अनेक प्रयोग करत राहण्यापेक्षा एकजुटीने आणि दृढ विश्वासाने अगदी पारंपरिक पद्धत राबवली तरी देशाचं भलं आहे.

दहावी-बारावीच्या गुणपत्रिकेवरून ‘नापास’ हा शब्द हद्दपार झाला तर त्यात काय आहे हो एवढं चर्चा करण्यासारखं आणि मनाला लावून घेण्यासारखं? असं याबाबत सहज विधान असू शकतं. पण या नापासाऐवजी एटीकेटी, पुनर्परीक्षेस पात्र किंवा कौशल्यविकासास पात्र अशी ‘न’कार नसलेली कोणती ना कोणती लेबलं असणारच आहेत. पूर्वी नापास झालेला मार्च ऑक्टोबरच्या वाऱ्या करत पास होतो, अशी त्याची चेष्टा केली जायची. आताही त्याची पुनर्परीक्षा चुकणार नाहीच आहे आणि पास होईपर्यंत तो आणि पालक यांच्या डोक्यावरचा भार उतरणार नाहीच आहे. म्हणजे फक्त शब्द बदललेत ताण तोच असेल.

कौशल्यविकासाची तर गंमतच आहे, शाळेत जे विषय असतात त्यात मुख्य विषय आणि श्रेणीविषय अशी दोन प्रकारची विभागणी असते. मुख्य विषयांच्या लेखी आणि तोंडी परीक्षा असतात. त्यामुळे शिक्षक, पालक आणि ते म्हणतात म्हणून विद्यार्थी त्यांच्या अभ्यासाबाबत सजग असतात. श्रेणीविषयांची तर ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’ असा सारा मामला. साधारणत: हे श्रेणीविषय जीवनकौशल्य विकसित करण्यात मोलाचा वाटा उचलू शकतात, पण बालक पालक आणि शिक्षक या त्रयींचं त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष होतं, कारण त्यांना श्रेणी असते आणि ही श्रेणी सगळ्यांनाच चांगली मिळणार आहे, असं स्पष्ट मत. त्यामुळे शारीरिक शिक्षणामध्ये सर्व वर्गाला ‘अ’ श्रेणी मिळते (तरी ऑलिम्पिकमध्ये आमचा क्रमांक शेवटून पहिला. बरं). गंमत म्हणजे या श्रेणी विषयात कोणीही पुनर्परीक्षेस पात्र किंवा कौशल्यविकासास पात्र नाही. लेखी परीक्षेत शहाण्णवच्या जागी पंचाण्णव गुण मिळाल्यावर लगेच टाहो फोडणारे आम्ही, पण शारीरिक शिक्षणात ‘अ’ श्रेणी मिळाली तरी अशी शंकाही घेत नाही की माझं पोरगं गेली अनेक वर्ष मदानावर गेलंच नाहीय आणि शारीरिक शिक्षण या विषयात ‘अ’ श्रेणी कशी बरं त्याला वा तिला?

आजची मुलं परीक्षार्थी झाली आहेत, सर्वाना गुणांची म्हणजे संख्यांची काळजी आहे, खऱ्या गुणात्मक विकासाकडे दुर्लक्ष होतंय वगैरे वगैरे विधान शिक्षणक्षेत्रात सर्रास वापरलं जातं, मग त्याला उपाय म्हणून अमुक तमुक राज्यातल्या किंवा अमुक तमुक देशातल्या पद्धती कॉपी पेस्ट करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातो आणि त्यात हकनाक बळी जातो तो एका पिढीचा किंवा अनेक पिढय़ांचा. कारण शिक्षणाचं खरं काम विद्यार्थी घडवणं आहे आणि विद्यार्थी कोण ज्याला ज्ञानाची खरी आस आहे तो. या कॉपी पेस्ट प्रकरणात जे काही घडतं ते आपल्या संस्कृतीला, परिस्थितीला आणि मानसिकतेला मिळतंजुळतं नसतंच. म्हणजे आपली मानसिकता पोटार्थी आणि पेस्ट करायला जातो ते दानार्थी. मग याच्यातून वाढतो तो दिखाऊपणा. जी आजची शिक्षणक्षेत्रातील कीड आहे.

नापास हा साधा सरळ बिनाजोडाक्षरांचा शब्द व्यक्तीचं मानसिक खच्चीकरण करतो म्हणून तो वापरायचा नाही. पण याच वेळी असा विचार करायलाच हवा ना की जेव्हा आपण एखादं झाड लावतो तेव्हा त्याला फक्त भरपूर खतपाणी देत नाही, तर त्याच्या अनावश्यक फांद्या तोडत त्याला योग्य दिशेने वाढीसाठी मदत करतोच. मग जे झाडांच्या सुदृढ आणि सुयोग्य वाढीसाठी तेच मुलांच्या का बरं नको? मुलांच्या पास-नापास होण्याचा अधिक खोल विचार व्हायला हवा, एवढं नक्की.