नीरजा
‘तळ ढवळताना’ एक जाणवलं, की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या अवकाशात आणि काळातही माणसं अनेकदा आपल्यासारखाच विचार करत असतात आणि तीच जमेची बाजू वाटत राहते. एक आशादायी चित्र समोर उभं राहतं. एक मोठा समूह आंधळेपणानं वरवरच हात मारत असण्याच्या काळात खोल तळाशी पोचून विचार करणारी माणसं आजूबाजूला आहेत, याचा विश्वास वाटायला लागतो. एक आशेचा किरण चमकायला लागतो.. वर्षभर हे सदर लिहिल्यानंतर हेच अनुभवास आलं..
‘तळ ढवळताना’ नेमकं काय-काय बाहेर आलं याचा हिशेब नाहीच मांडता येणार. खूप काही आजही साठून आहे आत, याची कल्पना आहे मला.. पण तरीही थोडय़ा वेळासाठी का होईना स्वत:च्या मनाचा आणि अनेक वाचकांच्याही मनाचा तळ ढवळून काढता आला.
एक जाणवलं, की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परिस्थितीत, वेगवेगळ्या अवकाशात आणि काळातही माणसं अनेकदा आपल्यासारखाच विचार करत असतात आणि तीच जमेची बाजू वाटत राहते. एक आशादायी चित्र समोर उभं राहतं. एक मोठा समूह आंधळेपणानं वरवरच हात मारत असण्याच्या काळात खोल तळाशी पोचून विचार करणारी माणसं आजूबाजूला आहेत, याचा विश्वास वाटायला लागतो. एक आशेचा किरण चमकायला लागतो.
हे वर्ष फार गुंतागुंतीच्या घटनांचं गेलं. खूप गोष्टी घडल्या. लांबलेला, झोडपणारा आणि होत्याचं नव्हतं करून टाकणारा पावसाळा असेल, की जगण्याच्या झळा तीव्र करणारा मंदीचा काळ असेल, लोक त्यातूनही तगून राहण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसलेच. वर्षांच्या सुरुवातीला झालेल्या साहित्य संमेलनातील वादांपासून ते शबरीमाला मंदिरात स्त्रियांनी प्रवेश करावा की करू नये, या वादापर्यंतचे अस्वस्थ करणारे वाद-प्रतिवाद, देशाचं आणि राज्याचं भविष्य ठरवणाऱ्या दोन महत्त्वाच्या निवडणुका आणि रामजन्मभूमीच्या वादावरील निकाल, वर्षभर ठिकठिकाणी होत राहिलेल्या बलात्काराच्या घटना आणि या वर्षांच्या शेवटी-शेवटी हैदराबादच्या डॉक्टर तरुणीला बलात्कार करून जाळून टाकल्याच्या भयंकर घटनेपर्यंत ज्या ज्या गोष्टी घडत गेल्या त्यातून आपल्या आजूबाजूच्या लोकांचं आणि या देशाचंही एक चरित्र समोर येत गेलं.
आज झुंडीनं हत्या करण्याच्या, सामूहिक बलात्कार करण्याच्या, हे विश्व जन्माला घालण्याची क्षमता असलेल्या स्त्रीच्या रक्तस्रावाला विटाळ संबोधत तिला मंदिरप्रवेश नाकारून अपमानित करण्याच्या घटना घडताहेत. त्या घटनांकडे आपल्या महान संस्कृतीचा यथार्थ अभिमान बाळगणाऱ्या या देशातील लोक कसे पाहाताहेत, हेसुद्धा ध्यानात येत गेलं. हे सारं केवळ गेल्या वर्षांतच घडत होतं असं नाही, तर निरंतरपणे घडतं आहे. विशेषत: स्त्री आणि पुरुष या दोघांचंही जात आणि लिंगवास्तव विशेष बदललं आहे, असं म्हणता येणार नाही. आजही आत्मसन्मानासाठी त्यांना लढावं लागतं आहे. स्त्रीच्या बाबतीत तर हा लढाच विचित्र होऊन बसला आहे. ताराबाई शिंदे, सावित्रीबाई फुले यांच्या काळापासून आजच्या काळापर्यंत लढताहेत बायका या आत्मसन्मानासाठी आणि तरीही जवळजवळ रोजच ठिकठिकाणी बलात्काराच्या घटना घडताहेत.
‘खैरलांजी ते कोपर्डी
व्हाया दिल्ली, मुंबई, काश्मीर, हैदराबाद,
बिहार, उन्नाव, उत्तर प्रदेश
किंवा गाव-शहरातला कोणताही सुनसान प्रदेश
फक्त नावं बदलताहेत जागांची..
बाई नावाचं एक आदिम प्रॉडक्ट दिसतं आहे
‘वापरा आणि फेकून द्या’ संस्कृतीत
ती होते आहे रोजची बातमी :
विस्कटल्या केसांची
भांबावल्या डोळ्यांची
योनीसंहार थांबवू पहाणाऱ्या हातांची.’
आणि वर हा योनीसंहार थांबवण्यासाठी बाईनं काय करायला पाहिजे, याचे उपाय सुचवले जाताहेत आपल्या प्राचीन संस्कृतीकडून. कधी तिच्या कपडय़ांवर, तर कधी तिच्या रात्री-अपरात्री बाहेर राहण्यावर आक्षेप घेतला जातोय. तिच्या हातात तलवारही दिली जातेय आणि बलात्कार करणाऱ्याचं लिंग तिनं कापावं अशी अपेक्षाही केली जातेय. पण हे सांगताना कोणी हा विचार करत नाही, की अशी किती लिंगं कापत जाणार आहोत आपण? बलात्काऱ्यांचं लिंग कापून, त्यांचं ‘एन्काऊन्टर’ करून किंवा फाशी देऊन प्रश्न मिटला असता तर या प्रकरणात ‘एन्काऊन्टर’ केल्यावर, तसेच निर्भया प्रकरणामध्ये आरोपींना फाशी जाहीर झाल्यावर बलात्कार थांबले असते. गेली पन्नास-साठ वर्षे आपण स्त्रीमुक्तीच्या, स्त्री सक्षमीकरणाच्या गोष्टी बोलतोय, मुलींना तसं शिक्षणही देतो आहोत; पण या सक्षम झालेल्या मुलींबरोबर कसं राहायचं याचं शिक्षण मात्र मुलांना देत नाही.
लैंगिकतेविषयी मोकळेपणानं बोलायला जो समाज तयार नाही त्या समाजात अशा घटना होत राहणारच. शरीरसंबंध ही चोरून करण्याची गोष्ट आहे, हे ज्या समाजात रुजलं आहे तो समाज या संबंधाकडे मोकळेपणानं पाहूच शकत नाही. त्यामुळे लैंगिकता विकृत स्वरूपात व्यक्त होत राहते. अशा वेळी या मुलांना लैंगिक शिक्षणाची गरज आहे, हे आपण ध्यानात घेत नाही. कारण तथाकथित संस्कृतिरक्षकांना अजूनही ते पटत नाही. आपल्या पुराणातल्या कथांत तर प्रत्यक्ष इंद्रदेवच अहिल्येला भोगण्यासाठी रूप पालटून जातो, तिला भोगतो आणि वर तिलाच शिळा होण्याची शिक्षा दिली जाते. अशा या संस्कृतीचा अभिमान असलेल्या आपल्या देशातील मुलं वाढतात ते ‘स्त्री ही एक मादी आहे, पुरुषानं भोगायची वस्तू आहे आणि ती भोगण्याचा आपला हक्क आहे’ असं पाहत- ऐकतच. मर्दपणाच्या चौकटीत वाढणाऱ्या या मुलांना प्रथम स्त्री ही एक आदर करावी अशी व्यक्ती आहे हे शिकवायला हवं. जोवर ते शिकवलं जात नाही तोवर या गोष्टी घडत राहातील. मेणबत्त्या संपून जातील, अश्रू सुकून जातील. मुलींना वाटू शकेल हळूहळू आपल्याला असू नये विश्व निर्मिणारी योनी किंवा गर्भाशयच..
‘गर्भाशय उखडून टाकणाऱ्या हातांचं भय
वाढत गेलं
मुलींच्या मनात
तर मुलीच संपवून टाकतील
निर्मितीच्या साऱ्या शक्यता.
मुलींना आता सांगाव्या लागतील गोष्टी
पुरुषांतही लपलेल्या अपार मायेविषयीच्या
स्त्री आणि पुरुषात उमलून येणाऱ्या अलवार
नात्याविषयीच्या, त्यांच्यातल्या संवादाच्या.’
या संवादाविषयी जोवर आपण बोलत नाही तोवर संस्कृतीविषयी बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही. संस्कार म्हणजे मंत्रोच्चार करायला शिकणं किंवा परवचा म्हणणं नाही आणि माणसाची उन्नती म्हणजे उच्चशिक्षित होऊन डॉलरमध्ये पसा कमावणं नाही. माणसावर; मग तो कोणत्याही धर्माचा, जातीचा वा लिंगाचा का असेना, त्या सर्वावर प्रेम करायला शिकणं, त्यांचा आदर करणं महत्त्वाचं असतं, हे आपण विसरून गेलो आहोत, असं सतत वाटत राहतं.
खरं तर ‘संस्कृती’ या शब्दाची व्यवस्थित मांडणी करण्याची वेळ आली आहे आता. संस्कृती ही धर्माव्यतिरिक्त त्या-त्या देशांतील कला, विज्ञान, भाषा, क्रीडा, शिक्षण, संशोधन, अभिव्यक्तीची पद्धती, नीतिनियम, कायदेपालन, मानवी मूल्य इत्यादी गोष्टींतूनही व्यक्त होत असते, हे आपण लक्षात घ्यायला विसरतो की काय, अशी शंका येण्याचे हे दिवस आहेत. आज ‘संस्कृती म्हणजे धर्म, परंपरा म्हणजे कर्मकांड’ असं काही तरी संकुचित रूप आपल्यासमोर येतं आहे. धर्म आणि कर्मकांड यात रमत चाललेली माणसं साहित्य आणि कलेपासून अनेक कोस दूर गेलेली दिसताहेत. व्यक्त होण्यासाठी ‘टिकटॉक’सारख्या अत्यंत सामान्य समाजमाध्यमाची मदत घेताहेत.
कोणासारखं तरी दिसणं, कोणासारखा तरी अभिनय करणं, असे एकूणच नकलून काढण्याचे प्रकार वाढीला लागले आहेत. आपण कोणाची तरी झेरॉक्स प्रत नसतो, तर आपली स्वतंत्र अशी एक ओळख असू शकते हे आपण विसरून चाललो आहेत. व्यक्त होण्याची अनेक साधनं समोर आहेत, पण ती आपल्याला दिसत नाहीत. एखाद्या घरातील पुस्तकांच्या संग्रहाकडे आश्चर्यानं पाहाणाऱ्या लोकांची संख्या वाढत जाण्याच्या काळात अभिव्यक्तीच्या शक्यता संपतील की काय, असं भय वाटायला लागलं आहे. खरं तर व्यक्त होणं ही अत्यंत महत्त्वाची आणि निकडीची गरज असते माणसाची. काळ किंवा अवकाश कोणताही असो, माणसांना व्यक्त होता आलं नाही तर दाबून ठेवलेल्या हुंकाराचा ज्वालामुखी व्हायला वेळ लागत नाही. वर्षांनुवर्षांचा इतिहास हेच तर सांगत आलाय आपल्याला. काही अपवाद सोडले तर विध्वंसापेक्षा माणसं निर्मितीच्या बाजूनंच उभी राहत असतात आणि ती राहावीत यासाठी कोणत्याही संवेदनशील माणसाला प्रयत्न करावा लागतो. कवी, लेखक लिहीतही असतील प्रेमाचं गाणं, जोजवत असतील फुलराणीला त्यांच्या अंगाखांद्यावर, पण तरीही कुठं तरी आत या फुलराणीच्या पायात सलणारा काटा त्यांच्या आणि कोणत्याही संवेदनशील माणसाच्याही मनात सलत राहतोच.
कुठं तरी जगाच्या दुसऱ्या टोकाला लागलेला वणवा जसा अस्वस्थ करत राहतो तसाच आपल्या देशातला राजकीय आणि सामाजिक वणवा पेटलेला पाहून आपल्यातला संवेदनशील माणूस अस्वस्थ होत असतोच. जगण्याच्या भरकटलेल्या दिशा आणि दशा पाहताना जे जे येत राहतं मनात आणि साठत जातं खोल आत ते बाहेर काढावंसं वाटतंच एका टोकावर पोचल्यावर. ..हे केवळ पुरुषालाच वाटतं असं नाही तर बाईलाही ते बाहेर काढावंसं वाटतं; पण तिला असा अवकाश मिळत नाही. पुरुष जसा सहज रमतो आपल्या मित्रांमध्ये, घरातल्या कोंदट वातावरणातून बाहेर येऊन उभा राहातो नाक्यावर किंवा बसतो गप्पा ठोकत पारावर, तशा बायका दिसतातच असं नाही. जवळजवळ पन्नास टक्के समाज व्यापून असलेल्या स्त्रिया या व्यवस्थेतलं राजकारण आणि समाजकारण याविषयी चर्चा करताना क्वचितच दिसतात. आज सामाजिक कामांत आणि संशोधनांत ज्या थोडय़ाबहुत स्त्रिया आहेत त्या स्त्रियांच्या प्रश्नांची नेटकी मांडणी करत असल्या तरी त्यांचं हे काम साऱ्या समाजापुढं आलं आहे, असं चित्र दिसत नाही.
विशेषत: राजकीय पटलावर तर त्या दिसतच नाहीत. अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढय़ा स्त्रिया राजकारणात असल्या तरी त्यांना दुसऱ्या स्थानावर लोटण्याचा प्रयत्न होतो. आज जर्मनी, न्यूझीलंड, फिनलंडसारख्या देशांत कार्यक्षम स्त्रिया सक्रिय राजकारण करतानाच देशाच्या विकासाचा विचार करताहेत. त्या आपापल्या देशातील लोकांनी जास्तीत जास्त संवेदनशील व्हावं आणि कागदावर किंवा जाहिरातींमध्ये नाही, तर प्रत्यक्ष जगण्यात विकास व्हावा यासाठी प्रयत्न करताहेत.
अशा काळात आपल्या देशात आरक्षण मिळूनही स्त्रियांना त्यांच्यातलं सामर्थ्य दाखवण्याची संधी आपल्या राजकीय वातावरणात विशेष मिळत नाही. सामाजिक क्षेत्रात ज्या धडाडीनं स्त्रिया काम करताहेत त्याच धडाडीनं राजकीय क्षेत्रात आल्या तर कदाचित आज राजकारण ज्या खालच्या पातळीवर आलं आहे, ते चित्र बदलवून टाकू शकतील. केवळ स्वत:ची भर करणं आणि आपले गंड जोपासणं म्हणजे राजकीय डावपेच खेळणं, असा एक जो समज झालेला आहे, तो बदलवण्यासाठी आपल्या चौकटीतून बाहेर पडून स्त्रियांनी दाखवून द्यायला हवं, की राजकारण म्हणजे सत्ताकारण नाही. राजकारण म्हणजे समाजकारण आणि समाजकारण म्हणजेच संविधानाच्या अन् नवनिर्माणाच्या बाजूनं उभं राहणं.
काळ कोणताही असो, निर्मिती आणि विध्वंस एकाच वेळी समांतरपणे चालूच असतात. मग तो निसर्गाचा असो की मानवी मूल्यांचा असो, विनाश होत असतोच; पण ज्याप्रमाणे निसर्गाचं चक्र पुढं जात असतं त्याचप्रमाणे विध्वंसानंतरही नवा सर्जनशील विचार, नवी मूल्यंही जन्माला येत राहतात. प्रत्येक शतकात विध्वंसाकडे घेऊन जाणारं नेतृत्व, तुमच्या अभिव्यक्तीला नख लावणारी आणि गळा दाबणारी बोटं जन्माला येत असतातच. मात्र त्याच काळात त्याविरोधात कधी क्षीण तर कधी प्रबळ आवाजही उमटत राहतो. त्या आवाजाबरोबर जाणं गरजेचं असतं आणि ते आपल्यासारख्यांनाच करावं लागतं.
कारण प्रत्येक शतकात बुद्ध जन्माला येत नाही. त्यासाठी खूप वाट पाहावी लागते. कधी एक तर कधी दोन-दोन सहस्रकं वाट पाहावी लागते. तेव्हा कुठं एखादे गौतम बुद्ध, एखादे येशू ख्रिस्त, एखादे महात्मा गांधी जन्मतात. त्यानं माणूस म्हणून केलेल्या चुका स्वीकारून आपल्याला सत्याच्या, अिहसेच्या, करुणेच्या मार्गावर घेऊन जातात ते. हेच तर आधार असतात आपला कोणत्याही परिस्थितीत. केवळ हेच नाही तर अनेक आधार असतात आपले, ज्यांना शोधावं लागतं.
तळ ढवळून काढणाऱ्या कला आणि साहित्याचं एक वेगळं स्थान असतं आयुष्यात. आज केवळ भौतिक आणि आभासी जगात जगणाऱ्या लोकांनी त्यांच्यापर्यंत पोचण्याची गरज आहे. या सदराच्या निमित्तानं पुन्हा एकदा जुन्या-नव्या कवींपर्यंत पोचता आलं. कधी भारतीय कधी पाश्चात्त्य साहित्यिकांच्या विश्वात डोकावता आलं. खूप चांगला प्रतिसाद मिळाला, त्यासाठी वाचकांचे आभार. आपापल्या मनात साठलेल्या अनेक गोष्टींचा उच्चार यानिमित्तानं त्यांनीही केला. चुकीच्या आणि कालबाह्य़ झालेल्या अनेक प्रथा-परंपरांविषयी मी लिहिलं, तेव्हा सहजच सगळे बोलते झाले. ‘त्यांच्या मनात असलेल्या प्रश्नावर मी लिहावं’ असे प्रेमळ आग्रहही झाले. प्रत्येकासाठी नाही लिहिता आलं, पण प्रयत्न केला.
निरोप घेताना शांता शेळके यांच्या ‘बारव’ कवितेचा दाखला देत एवढंच म्हणेन,
‘खोल खोल आहे भारी
माझ्या मनाची बारव
फसाल हो जाऊ नका
बघावया तिचा ठाव
नानापरीची चालते
अंतरंगी खळबळ
जरी माझ्या बारवेचे
वर संथ दिसे जळ
खोल-खोल आहे भारी
माझ्या मनाची बारव
फसाल हो, जाऊ नका
बघावया तळठाव!’
(सदर समाप्त)
neerajan90@yahoo.co.in
chaturang@expressindia.com