डॉ. राजन भोसले

‘पालकत्व’ हा खरं तर खूपच विस्तृत असा विषय आहे. पालकत्व व लैंगिकता यांचा सामना मुलांच्या किंवा पालकांच्या जीवनात जिथे कुठे होतो तिथे निर्माण होणारे तिढे, विवंचना, संभ्रम, समस्या व पेचप्रसंग, नेमके कसे सोडवले वा निस्तरले जाऊ शकतात, हे मी माझ्या या सदरात लिहिलेल्या लेखांमधून वाचकांच्या समोर आणलं. एरवी क्वचितच लिहिल्या-बोलल्या जाणाऱ्या अशा, अतिशय नाजूक व संवेदनशील विषयांवरच्या विवेचनाला समाजाच्या सर्व थरांतून आणि वयोगटांतून भरभरून प्रतिसाद मिळाला.

ayurvedic experts to hold seminar on garbhavigyan event at iit bombay
आयआयटी प्रांगणात ‘गर्भविज्ञान’ धडे; उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून विरोध
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Scientist Rahul Damale selected for Netaji Subhash ICAR International Fellowship
वडील तिसरी उत्तीर्ण तर आई निरक्षर, मुलगा शास्त्रज्ञ झाला, आता परदेशी शिक्षणासाठी निवड
loksatta chatura A mother taking custody of her child is not kidnapping telangana high court decision
आईने अपत्याचा ताबा घेणे अपहरण नव्हे
Babasaheb Ambedkar Marathwada University ,
नामविस्तारानंतर आंबेडकरी चळवळीची वाढ खुंटलेली कशी?
Pandit Vishnu Rajoria on 4 Children
Video: ‘चार मुलांना जन्म द्या, एक लाख रुपये मिळवा’, ब्राह्मण जोडप्यांसाठी परशुराम मंडळाच्या अध्यक्षांची ऑफर
Baby overcomes respiratory problems after 72 hours of continuous treatment
बाळ जन्मतः रडत नाही? सलग ७२ तास अनोखे उपचार आणि ट्याहां ट्याहां सुरू…
kids anger issues
तुमची मुलंही सतत रागावतात, चिडचिड करतात? मग ‘या’ सोप्या उपायांनी मिळवा नियंत्रण

‘आव्हान पालकत्वाचे’ हे सदर ‘लोकसत्ता’च्या ‘चतुरंग’ पुरवणीसाठी लिहिण्याचं निमंत्रण मला आलं, तेव्हा माझ्यासाठी खरं तर ते एक मोठं आव्हान होतं. एकदा ‘हो’ म्हटलं, तर पूर्ण एक वर्ष पालकत्वाशी निगडित अशा काही वेचक, वैविध्यपूर्ण विषयांवर अर्थपूर्ण व नियमित लिखाण करणं, हे एक जबाबदारीचं काम होतं.

लेखनाचा व्यासंग असला तरी व्यवसायाने मी लेखक नव्हे. त्यामुळेच लेखनाची ही जबाबदारी स्वीकारली, तर ती पार पाडण्यासाठी थोडी शिस्त, थोडं संशोधन, थोडी चिकाटी, थोडं सातत्य आणि बराच वेळ द्यावा लागणार होता. हे सर्व आपल्याला शक्य आहे का, आणि या सगळ्यासाठी आपली आज कितपत तयारी आहे, याचं आत्मपरीक्षण करणंसुद्धा माझ्या दृष्टीने गरजेचं होतं. शिवाय ‘लोकसत्ता’चा वाचक अत्यंत चोखंदळ व ‘चतुरंग’ पुरवणीची लोकप्रियता व्यापक, त्यामुळे हे आव्हान स्वीकारावं की नाही, असा विचार सुरुवातीला मनात आलाच. दुसऱ्या बाजूला व्यवसायाने समुपदेशक व डॉक्टर असल्याने गेली ३३ वर्षे रोज रुग्ण व पीडितांच्या विविध व्याधी, वेदना, विवंचना, मला खूप जवळून पाहायला मिळतात. अनेक समस्या केवळ वेळेवर आणि समर्पक मार्गदर्शन न मिळाल्यामुळे किती गंभीर स्वरूप धारण करू शकतात, याची अनेक उदाहरणं माझ्यासमोर येऊन गेलीत. त्यावर मी माझ्या या सदरात अनेकदा लिहिलंसुद्धा आहे.

पालकत्वाशी जुळलेल्या अनेक समस्या एक डॉक्टर व समुपदेशक म्हणून हाताळत असतानाच, अशा प्रकारच्या समस्यांसाठी समाजात चहूबाजूला उपलब्ध असलेली अधिकृत मदत किती थिटी, तुटपुंजी आणि कामचलाऊ आहे, हेसुद्धा मला वारंवार दिसत-जाणवत आलं आहे. दुर्दैवाने भारतात सायकिअ‍ॅट्रिस्ट, म्हणजेच मनोविकारतज्ज्ञांना वैद्यकीय महाविद्यालयामधून त्यांच्या प्रशिक्षणकाळात समुपदेशन व सायकोथेरपी यांचं प्रशिक्षण अजिबात दिलं जात नाही. अगदी प्रतिष्ठित अशा विद्यापीठांतून सायकिअ‍ॅट्रीमधली एम.डी.सारखी उच्च पदवी मिळवूनही अनेकदा त्यांच्याकडे समुपदेशन शास्त्र व संबंधित कौशल्याचा अभाव असतो. मानसिक आजारांचं निदान करून त्यावर औषधं लिहून देण्याचं काम त्यांना माहीत असतं, पण रुग्णाशी चिकित्सकीय संभाषण (थेरप्युटिक डायलॉग) साधून समुपदेशनाच्या मार्गाने त्यांच्या समस्यांचं निवारण करणं मनोविकारतज्ज्ञांना अजिबात अवगत नसतं.

मी स्वत: दहापेक्षा जास्त वर्षे मुंबईतल्या एका सर्वाधिक जुन्या व नामांकित मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून काम करत असल्याने ही परिस्थिती मला ठाऊक आहे. ज्यांच्याकडे सर्वाधिक अपेक्षेने पाहिलं जातं, असे मनोविकारतज्ज्ञच समुपदेशनाबाबत, असे अनभिज्ञ असतील तर रुग्ण व पीडितांनी मदतीसाठी कुणाकडे धाव घ्यायची, हा प्रश्न निर्माण होतो. समुपदेशन, ज्याला इंग्रजीत कॉन्सिलिंग आणि सायकोथेरपी म्हणतात, ही खूप विकसित अशी शास्त्रं आहेत. त्यांचे अभ्यासक्रम वेगळे आहेत. त्यात पुन्हा भिन्न-भिन्न तंत्र व पद्धती आहेत. ‘रॉबर्ट कारकॉफ समुपदेशन पद्धती’ (Robert Carkhuff model of counselling), ‘रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी’ (Rational Emotive Behaviour Therapy), ‘ट्रांझॅक्शनल अनॅलिसिस’ (Transactional Analysis), ‘जेस्टॉल्ट’ (Gestalt), ‘सायकोड्रामा’ (Psychodrama), ही समुपदेशनाच्या विभिन्न पद्धतींची काही नावं. यांचं प्रशिक्षण वेगळं घ्यावं लागतं. हे प्रशिक्षण अधिकृतरीत्या देण्याचं काम माझ्या समुपदेशन केंद्रात आम्ही गेली काही दशकं सातत्याने करत आलो आहोत. अनेक उच्चपदवीधर मनोविकारतज्ज्ञसुद्धा या प्रशिक्षणासाठी माझ्या केंद्रात नियमित येत असतात. पालकत्व व नात्यागोत्यातल्या समस्या, विवंचना व पेचप्रसंग यांचं निवारण समुपदेशनातून होऊ शकतं आणि केलं जातं. मात्र याबाबतची जागरूकता समाजात निर्माण होणं आत्यंतिक गरजेचं आहे, हे मला अनेक वर्षे दिसत-जाणवत आलं आहे. ही जागरूकता निर्माण करण्यासाठी यावर आपण लिहावं, ही कल्पना मला भावली.

बालक-पालक नातं हे आपल्या सर्वाच्या जीवनातलं पहिलं व अत्यंत महत्त्वाचं असं नातं असतं. या नात्याचा व्यापक विस्तार आपल्या सर्वाच्या जीवनातली अनेक महत्त्वाची वर्षें व्यापून टाकतो. आपली मुलं आणि आपल्यात असं बरंच काही घडत असतं, ज्यांचे परिणाम आपल्या व मुलांच्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रत्येक पलूवर खोलवर होत असतात. हे परिणाम जन्मभर आपली पाठ सोडत नाहीत. पालकत्वाशी जुळलेल्या काही समस्यांचे विपरीत असे पडसाद केवळ मुलं किंवा पालकांच्या जीवनांवरच नव्हे तर पूर्ण समाजावर कसे भेदकपणे उमटू शकतात, याची असंख्य उदाहरणंही एक डॉक्टर व समुपदेशक म्हणून मी जवळून पाहिली आहेत.

‘समस्या निर्माण होण्याआधीच त्यांचा प्रतिबंध करणं अनेक वेळा शक्य असतं,’ हा विचार या सदरातल्या माझ्या लेखांमध्ये मी वारंवार मांडला. एकदा समस्या निर्माण झाली, की मात्र तिचा ‘उगम’ मागे जाऊन शोधावा लागतो. तिथून परतीचा प्रवास मग किती क्लिष्ट व खडतर असू शकतो, यांची काही उदाहरणं मी माझ्या या सदरातल्या लेखांमध्ये हेतुपुरस्सर दिली. अनेकदा समस्यांच्या मुळाशी कधी अज्ञान, कधी पूर्वग्रह, कधी अविचार, कधी अपसमज, तर कधी दूरदृष्टीचा अभाव अशीच कारणं दिसून येतात. अशा कारणांचं परिमार्जन योग्य मार्गदर्शन व समुपदेशन यांतूनच होऊ शकतं. त्याला गोळ्या-औषधांची गरज नसते.

आपण आपल्या कामात कितीही सक्रिय, तत्पर आणि प्रामाणिक राहिलो, तरी बिकट समस्यांमध्ये गुरफटलेल्या व निरंतर वेदना सोसणाऱ्या असंख्य लोकांपर्यंत आपण तरीही पोहोचू शकत नाही, ही खंत मला अनेक वर्षे अस्वस्थ करत आली आहे. माझ्यापर्यंत पोहचू न शकणाऱ्या अनेक पालकांपर्यंत ‘लोकसत्ता’च्या माध्यमातून पालकत्वाच्या जबाबदारीशी संबंधित काही महत्त्वाच्या सूचना, संकेत व संदेश आपण सहजपणे पोहचवू शकू, हा विचार मला भावला. तेव्हा मी हे सदर लिहिण्याचं आव्हान आनंदाने स्वीकारलं.

‘पालकत्व’ हा खरं तर खूपच विस्तृत असा विषय आहे. त्यामधले लैंगिकतेशी निगडित असलेले काही वेचक विषय मी या सदरात लिहिण्यासाठी निवडले. एक लैंगिक विज्ञान तज्ज्ञ व समुपदेशक म्हणूनच प्रामुख्याने माझं प्रशिक्षण आणि अनुभव असल्याने, त्यावर आपण नक्कीच अधिकारवाणीने लिहू शकू, असा मला आत्मविश्वास होता. मी स्वत: हाताळलेल्या प्रकरणांची व्यवस्थित ठेवलेली रेकॉर्डस् माझ्याकडे आहेत. त्यातून प्रकरणे निवडताना विविध निकष लावून ती-ती प्रकरणे मी जाणीवपूर्वक निवडली, जेणेकरून वाचकांपर्यंत काही नवीन, महत्त्वाचे व गरजेचे विषय आपण मांडू शकू. गोपनीयतेच्या उद्देशाने संबंधितांची नावं आणि काही तपशील बदलून लिखाण करण्याचं भान मी आवर्जून ठेवलं. त्यातल्या काही जणांची संमती घेणं हे तत्त्वही मी कसोशीने पाळलं.

पालकांवर असलेल्या पालकत्वाच्या जबाबदारीचा सामना मुलांमधील लैंगिक जाणिवा, लैंगिक प्रवृत्ती, लैंगिक वर्तन, लैंगिक कुतूहल किंवा लैंगिक प्रेरणा यांच्याशी सतत होत असतो. असं जेव्हा कधी होतं तेव्हा-तेव्हा अनेक पालक कसे गोंधळून, चक्रावून जातात आणि कसे चुकतात, हे मी गेली ३३ वर्षे सतत पाहत आलो आहे. म्हणूनच लैंगिकता व पालकत्व यांची जिथे जिथे गुंफण होते अशा अनेक नाजूक विषयांबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, वेगळ्या प्रकारे विचार करणं कसं शक्य आहे याचं प्रात्यक्षिक देतां यावं, आपल्याला सुचले नसले तरी समस्येतून मार्ग काढण्याचे इतर पर्याय नक्कीच उपलब्ध असतात, हे दाखवून देता यावं यासाठी हे सदर मी चालवलं. या सदराच्या माध्यमातून पालकत्व व लैंगिकता यांचा सामना मुलांच्या किंवा पालकांच्या जीवनात जिथे कुठे होतो तिथे निर्माण होणारे तिढे, विवंचना, संभ्रम, समस्या आणि पेचप्रसंग, नेमके कसे सोडवले वा निस्तरले जाऊ शकतात, हे मी माझ्या या सदरात लिहिलेल्या वीसपेक्षा अधिक लेखांमधून वाचकांच्या समोर आणलं.

या लेखांमधील सर्व प्रकरणे मी स्वत: हाताळलेली असल्याने त्यातले बारकावे मला चांगले माहीत होते. प्रत्येक प्रकरण हे त्या-त्या वेळी माझ्यासाठी एक आव्हानच होतं. म्हणूनच अनुषंगाने त्यातले साधक-बाधक घटक माझ्या स्मरणात होते. त्या प्रत्येक प्रकरणामधून शिकता येतील आणि अनेक महत्त्वाचे धडे देता येतील, असे मौलिक संदेश मला मिळाले होते. तेच ‘चतुरंग’च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत घरपोच होत आहेत, याचं समाधान मी या वर्षांत भरपूर अनुभवलं. वाचकांचाही प्रोत्साहित करणारा आणि उदंड म्हणता येईल, असा प्रतिसाद सातत्याने मला मिळत राहिला. लोकसत्ता’साठी गेल्या ३० वर्षांत यापूर्वीही मी अनेकदा लिहिलंय, पण हे सदर खूपशा जबाबदाऱ्या अन् अपेक्षांनी भरलेलं असं होतं. विषयही माझ्या अगदी जिव्हाळ्याचा होता व म्हणूनच वर्षभर अखंडितपणे चाललेलं हे सदर माझ्यासाठी अतिविशेष ठरलं.

लैंगिकतेशी थेट संबंध असलेल्या आणि पालकांच्या अखत्यारीत येणाऱ्या अनेक नाजूक विषयांवर मराठीत फारच कमी लिहिलं गेलं आहे. उदाहरणार्थ, ट्रान्ससेक्शुअ‍ॅलिटी, बॉडी डिसमॉर्फिक डिसॉर्डर, पी.सी.ओ.एस., अ‍ॅनॅबोलिक स्टिरॉइड्स,  समलैंगिकता, गायनॅकोमॅस्टिया, सॅडिझम, अरोमॅंटिसिझम, सेस्क्युअल ऑबसेसिव्ह कंपल्सिव डिसॉर्डर, पॉर्नोग्राफी अ‍ॅडिक्शन या विषयांवर मी या सदरात विस्तृत लेख लिहिले. यातल्या बहुसंख्य समस्यांसाठी मराठीत प्रचलित असे पर्यायी शब्दसुद्धा नाहीत. यावरूनच याबद्दलची माहिती आणि जागरूकता मराठी भाषिकांत आणि समाजात किती कमी आहे, याचा अंदाज आपल्याला येतो. मात्र असे असले तरी या समस्या आज मोठय़ा संख्येने समोर येऊ लागल्यात. अनेकांचं मन:स्वास्थ्य आणि नाती उद्ध्वस्त करू शकतील अशा शक्यता बाळगणाऱ्या या समस्या आज घराघरांत दिसू लागल्यात. म्हणूनच या नाजूक पण गरजेच्या विषयावर लिहायचं, असं मी ठरवलं.

हे लेख प्रकाशित होत असताना मला वाचकांच्या असंख्य ईमेल्स आल्या. त्यामध्ये लिखाणाबद्दल आभार मानणाऱ्या ईमेल, पुढील लेखांसाठी विषय सुचवणाऱ्या, वैयक्तिक प्रश्न विचारणाऱ्या, कौतुक-प्रशंसा करणाऱ्या, पुढील मार्गदर्शनाची मागणी करणाऱ्या, तर कधी एखाद्या मुद्य्याचा खुलासा किंवा स्पष्टीकरण मागणाऱ्या, अशा सर्व प्रकारच्या ईमेल्स समाविष्ट होत्या. प्रत्येक ईमेलला स्वत: उत्तर देण्याचा परिपाठ मी वर्षभर कर्तव्यदक्षपणे आणि मनोभावे पाळला.

या सदरात प्रकाशित झालेल्या माझ्या काही लेखांमधील कथानकांवर आधारित लघुपट काढण्याचा प्रस्ताव घेऊन कुणी माझ्याकडे आलं, तर या लेखांचं संकलन पुस्तक रूपाने प्रकाशित करण्याचा मानस घेऊन कुणी माझ्याकडे आलं. या लेखांचा इंग्रजी अनुवाद करण्याचं कामही एका प्रकाशकाच्या पुढाकाराने एका बाजूला सुरू झालंय. जनसामान्यांपर्यंत हे विषय पोहोचवण्यासाठी अशी विविध माध्यमं आज उत्साहाने पुढे आलीत. ‘लोकसत्ता-चतुरंग’मुळे सुरू झालेलं हे कार्य अशा अनेक रूपांमध्ये जनसामान्यांपर्यंत पोहोचू पाहते आहे, याचा मला आनंद आहे. वाचकांनी त्यातून बोध घ्यावा. मी हे कार्य माझ्या परीनं गेली तीन दशकं करत आलो आहे. यापुढेही ते असंच अव्याहतपणे चालू ठेवण्याचा माझा मानस आहे. ‘चतुरंग’च्या रसिक-चोखंदळ वाचकांनी माझ्याशी थेट संपर्क साधायला हरकत नाही, असं आवाहन करतच सदराचा समारोप करतो.

(सदर समाप्त)

rajanbhonsle@gmail.com

chaturang@expressindia.com

Story img Loader