लग्नसंस्था धोक्यात आणणारं एक अश्लील नाटक अशी टीका करत ते बंद पाडण्याचा प्रयत्न झालेल्या ‘सखाराम बाइंडर’ या नाटकाला नुकतीच चाळीस वर्षे पूर्ण झाली. गेल्या चाळीस वर्षांत ‘बाइंडर’मधून ठसठशीतपणे मांडल्या गेलेल्या स्त्री व्यक्तिरेखा अनेक नाटकांतून दिसल्याच, पण त्याबरोबर अनेक नाटकांतून बदलत गेलेल्या स्त्री प्रतिमाही अधिक ठाशीवपणे समोर येत गेल्या. स्त्रीच्या आधुनिक मानसिकतेचा, तिच्या लैंगिकतेचाही थेटपणे विचार मांडला गेला. गेल्या चाळीस वर्षांतील मराठी रंगभूमीवर आलेल्या स्त्रीविषयक बदलत्या प्रतिमांचा विचार करणाऱ्या काही निवडक नाटकांवरील हा लेख.
‘नाटक’ हा वाङ्मय प्रकार समाजजीवनाचा आरसा असतो. नाटकामधून समाजात घडणाऱ्या घटना, उद्भवणारे प्रश्न, समस्या यांचे प्रतिबिंब पडलेले असते. मराठी नाटय़ वाङ्मयाचा इतिहास पाहिल्यास असे लक्षात येते की, समाजात वेळोवेळी ज्या समस्या निर्माण झाल्या, जे प्रश्न निर्माण झाले ते त्या त्या काळात नाटककारांनी मांडलेले दिसतात. त्यातून स्त्रियांचे कुटुंबातील आणि समाजातील स्थान, स्त्रियांकडे पाहाण्याचा दृष्टिकोन, स्त्री-शिक्षणामुळे बदलत जाणारी स्त्रीची प्रतिमा या सर्वावर प्रकाश पडतो.
बदलत्या काळाप्रमाणे नाटकांमधून स्त्रियांच्या प्रतिमाही बदलत गेल्या. शिक्षणामुळे स्त्रियांना आत्मभान आले. तिच्या जाणिवांच्या कक्षा रुंदावत गेल्या. कर्तृत्वाच्या नवीन दिशा मोकळ्या झाल्या असल्या तरी स्त्रीवर असलेला पारंपरिक विचारांचा पगडा पूर्णपणे गेला नाही. एकीकडे चूल-मूल-संसार आणि दुसरीकडे ‘करिअर’ अशी तिची तारेवरची कसरत चालूच असल्याचे लक्षात येते. या संघर्षांचे प्रतिबिंब नाटकांमधून पडल्याचे दिसते. त्या दृष्टीने ‘पंखांना ओढ पावलांची’ (वसंत कानेटकर), ‘सावित्री’ (जयवंत दळवी), ‘माझा खेळ मांडू दे’ (सई परांजपे) यांसारख्या नाटकांतील नायिका व्यक्तिमत्त्वाचा विकास, स्वकर्तृत्व घडविण्यासाठी धडपडताना दिसतात; परंतु फारसे यश त्यांच्या पदरात पडलेले दिसत नाही.
या पाश्र्वभूमीवर हळूहळू स्त्रिया बदलत गेल्या. नायिकांकडे पाहण्याचा नाटककारांचा दृष्टिकोनही बदलत गेला. त्या दृष्टीने पत्नी, सून, आई, सासू, वहिनी, आजी, डॉक्टर, परिचारिका अशा विविध प्रतिमा नाटकांमधून मांडलेल्या दिसतात; परंतु आजच्या काळातील बिनधास्त स्त्रियांच्या प्रतिमा व्यक्त होण्यामागे कोणती कारणे असावीत, याचा शोध घेता येतो. त्या दृष्टीने ‘सखाराम बाइंडर’ ते ‘ठष्ट’ या नाटकांमधील बदलत्या स्त्री-प्रतिमांचा प्रवास महत्त्वपूर्ण ठरतो.
 १९७२ च्या सुमारास विजय तेंडुलकर लिखित ‘सखाराम बाइंडर हे नाटक प्रचंड वादग्रस्त व वादळी ठरले. लालन सारंग यांनी ‘चंपा’ आणि निळू फुले यांनी ‘सखाराम’ या भूमिका केल्या होत्या. या नाटकाने इतिहास घडविला. या नाटकाविरुद्ध दिग्दर्शक कमलाकर सारंग यांना लढा द्यावा लागला. नाटकाविरुद्ध खटला भरला गेला. हे नाटक म्हणजे ‘विवाह संस्था’ संकटात सापडण्याचे भय आहे, असा आक्षेप घेण्यात आला होता. या संदर्भात लालन सारंग यांनी म्हटलंय, ‘‘सखाराम सुरू झालं आणि तेरा प्रयोगांतच नाटक अश्लील आहे, अशी बोंब उठली आणि ३३ कटसकट नाटक सेन्सॉर झालं. त्यानंतर त्यावर बंदी आली. आम्ही सेन्सॉर बोर्डाविरुद्ध कोर्टात गेलो. सहा महिने लढल्यावर नाटक एकही कट न करता हायकोर्टातून सुटलं आणि पुन्हा दिमाखानं प्रयोग सुरू झाले. पुन्हा तीन महिन्यांतच पुण्यातल्या ‘लिंग निर्मूलन समितीनं’ तेंडुलकरांच्या नाटकांवर बंदी म्हणून ‘घाशीराम कोतवाल’ व ‘सखाराम बाइंडर’ ही नाटके होऊ द्यायची नाहीत, असा फतवा काढला.. पुन्हा एकदा लढा देऊन त्यातूनही आम्ही बाहेर पडलो.. या सगळ्यांतून जाताना मी व सारंग कळत-नकळत धीट होत गेलो.’’ (संदर्भ:- लोकसत्ता, चतुरंग पुरवणी २६ जानेवारी २०१३) त्या म्हणतात, ‘‘स्वत:चं सॉफिस्टिकेटेड व्यक्तिमत्त्व पूर्ण बदलून एक गावरान, रांगडी, बिनधास्त चंपा उभी करताना खूप विचार करावा लागला होता.’’
‘सखाराम बाइंडर’च्या संदर्भात ज्येष्ठ नाटय़ समीक्षक
डॉ. वि.भा. देशपांडे एका मुलाखतीत मला म्हणाले, ‘‘एखाद्या नाटकाचे नाव चाळीस-पन्नास वर्षे टिकते त्याचा अर्थ त्यामध्ये कलात्मकता असली पाहिजे. नाटक टिकण्यासाठी मुळात त्या कलाकृतीत नाटय़गुण असले पाहिजेत. नाटकाची बांधणी, घटक, आकृतिबंध असावा लागतो. नाटक केवळ सनसनाटी असून चालत नाही. या कसोटय़ांवर ‘सखाराम बाइंडर’ उतरलेले आहे. विजय तेंडुलकरांनी मांडलेल्या विषयात आणि आशयात अभिजातता आहे, मानवी प्रवृत्तींचा शोध आहे. त्याचबरोबर ‘सखाराम बाइंडर’ हे जीवनाचा वेगळा अर्थ सांगणारे नाटक आहे.’’
 अशीच मानवी विकृतीबरोबरच मानवी प्रवृत्ती, मानवी मनांचे कंगोरे, माणसांच्या मानसिकतेचा वेध घेणारी नाटके ‘गाबरे’, ‘वासनाकांड’ (महेश एलकुंचवार), ‘अवध्य’ (चिं. त्र्यं. खानोलकर), ‘खोल खोल पाणी’ (रत्नाकर मतकरी) यांचा उल्लेख करता येतो. नाटककारांची मानवी प्रवृत्तींचा शोध घेताना अभिरुची बदलत गेली त्यातून ही नाटके आली, त्यातूनच पुढे मग ‘माझी बायको, माझी मेव्हणी’, ‘सखाराम ड्रायव्हर’, ‘वासना’ इत्यादी अश्लील नाटकेही निर्माण झाली. प्रेक्षकांचे मनोरंजन करून त्याला मानसिक-भावनिक आनंद देण्याऐवजी त्याला उत्तेजित करणे, त्याच्या वासना भडकाविणे, हा मुख्य हेतू होता. तो काही काळ यशस्वी झाला. आर्थिकदृष्टय़ा तो सफल झाला; परंतु यासंबंधीचे आकर्षण तात्पुरते ठरले. त्यामध्ये कलात्मकतेऐवजी ढोबळ स्वभावदर्शन होते. त्यामुळे ती लाट ओसरली.
या पाश्र्वभूमीवर त्यानंतर आलेली आणि आज जी नाटके आली आहेत, त्यामध्ये कलात्मकता किती आहे? नाटककार धीटपणे लैंगिकतेच्या संदर्भात चर्चा करताना दिसतात तेव्हा त्यामागचा त्यांचा हेतू कोणता आहे? नाटकांमधून आलेल्या स्त्री प्रतिमांकडे पाहण्याचा समाजाचा कोणता दृष्टिकोण आहे? या संदर्भात विचार करायला हवा.
 भारतीय समाजात कुटुंबव्यवस्थेची रूढ, मान्य परंपरा आहे. मान्य परंपरेपेक्षा वेगळी दिशा जेव्हा स्वीकारली जाते तेव्हा प्रश्न निर्माण होतात. प्रशांत दळवी लिखित ‘चारचौघी’ या नाटकामधील चौघी जणी चारचौघींसारख्या असूनही चारचौघींपेक्षा वेगळ्या आहेत, याचे कारण हेच आहे. या नाटकामधील प्रत्येकीच्या व्यथा, कथा आणि समस्या वेगवेगळ्या आहेत; पण प्रत्येकीच्या समस्येचे मूळ स्त्रीत्व हेच आहे. ‘चारचौघी’ नाटकामधील चौघी म्हणजे ‘आई’ आणि तिच्या ‘विद्या’, ‘वैजू’ आणि ‘विनी’ या तीन मुली. सर्वात मोठी मुलगी ‘विद्या’ ही समाजशास्त्रामध्ये डॉक्टरेट असून प्राध्यापिका आहे. एक मुलगी झाल्यावरदेखील आशीष (पती) दुसऱ्या स्त्रीत गुरफटल्याचे पाहून ती अस्वस्थ होते. आशीषची प्रेयसी त्याला सोडून गेल्यावर तो विद्याला परत घरी बोलावितो; पण विद्या त्याला नकार देते, घटस्फोट देण्याचे ठरविते. मुलीला सहा महिने पतीने व सहा महिने पत्नीने सांभाळावे यासाठी कोर्टात लढा देते. शेवटी विद्या कोर्टात हरली असली तरी ती जिंकली आहे. पुरुषप्रधान संस्कृतीतील पुरुषांनी बनविलेले कायदे आज ना उद्या बदलतील, ही आशा त्यामागे आहे.
‘वैजू’चे दु:ख वेगळे आहे. वैजूचा नवरा श्रीकांत. आपण वतनदार आहोत याचा अहंकार त्याच्या मनात असल्याने वास्तवतेचे भान त्याला नाही. वैजूला दिवस गेलेले असताना पिल्लाला जन्म देणाऱ्या कुत्री-मांजरीसारखी आज आपली अवस्था आहे असे तिला वाटते. मनाविरुद्ध तडजोड करीत आयुष्य जगणाऱ्या वैजूकडे पाहून आपणही अस्वस्थ होतो. या पाश्र्वभूमीवर कॉलेजमध्ये शिकणारी ‘विनी’ लग्नाच्या बाबतीत भांबावून जाते. प्रकाशची बुद्धिमत्ता आणि वीरेनची श्रीमंती या दोन्हींचा तिला मोह पडतो. ती या दोघांबरोबर एकत्र राहण्याचा विचार बोलून दाखविते. मात्र कुटुंबसंस्था, लग्नसंस्था यांच्या स्थैर्याच्या दृष्टीने विनीने घेतलेला सहजीवनाचा निर्णय व्यवहार्य उरत नाही. शेवटी, विनी स्वत:च अविवाहित राहण्याचा निर्णय घेताना दिसते.
‘नाटक’ हे समाजाचे चित्र, प्रतिबिंब असते हे जरी खरे असले तरी ‘नाटक’ या माध्यमाद्वारे काही प्रश्न, पर्याय नाटककाराने मांडले, सुचविले, तर त्या दृष्टिकोणातूनही समाज अंतर्मुख होऊन विचारप्रवृत्त होऊ शकतो. प्रशांत दळवी यांच्याच ‘चाहूल’ या नाटकाची नायिका माधवी या दृष्टीने विचारप्रवृत्त करणारी आहे. आज चैनीच्या, सुखसोयीच्या, नैतिकतेच्या संकल्पना बदलल्या आहेत. दर महिन्याला मिळणारा पगार आणि चैनीच्या, गरजेच्या वस्तूंची खरेदी यांचा ताळमेळ काही जमत नाही आणि मग सुरू होतात जास्त पैसा घरात येण्यासंबंधीचे वेगवेगळे मार्ग. या भौतिक सुखाची आपल्याला एवढी सवय, चटक लागलेली असते की, त्याचे पर्यवसान किती टोकाला जाऊ शकते, त्याचे प्रत्ययकारी चित्र ‘चाहूल’ या नाटकात पाहायला मिळते. माधवी-मकरंदच्या संसारात वादळ निर्माण होते ते मकरंदच्या बॉसने त्याला दिलेल्या ‘इनडिसेन्ट प्रपोजल’मुळे! लोणावळ्यात एका दिवसासाठी माधवीच्या शरीरसुखाची मागणी बॉस मकरंदजवळ करतो. या बदल्यात त्याच्या डोक्यावरची कर्जे माफ होणार असतात आणि कंपनीत अर्धी भागीदारीपण मिळणार असते. त्या वेळी मकरंद एक दिवसाची मुदत मागून घेतो. हे प्रपोजल घरी घेऊन आल्यावर दोघेही एकमेकांवर आग पाखडतात. बॉसने विचारल्याबरोबर तिथल्या तिथे नाही का म्हणाला नाहीस म्हणून माधवी भांडण करते; परंतु त्याच वेळी बॉसने सुचविलेली आमिषे एकीकडे मोहवीत असतात. यामध्ये आपले काही चुकत नाही अशी मनाची ती दोघेही समजूत घालतात. माधवी एक दिवसासाठी मकरंदच्या बॉसबरोबर लोणावळ्याला जायला तयार होते. ‘माधवी’ला बॉसबरोबर पाठविण्यात नाटककाराचा दृष्टिकोन बदलल्याचे जाणवते.
या संदर्भात मराठी रंगभूमीवरचे मैलाचा दगड असलेल्या ‘चारचौघी’, ‘चाहूल’ नाटकांचे नाटककार प्रशांत दळवी यांना बोलतं केलं. ते म्हणाले, ‘‘चारचौघी’ नाटकातल्या स्त्रिया आपल्या नशिबाला दोष देत नाहीत. त्या एकमेकींना प्रश्न विचारीत राहतात. त्यातून त्या जीवनाचा अर्थ शोधू पाहतात. अशा विचारप्रधान नाटकांचा प्रेक्षकवर्गही वेगळा असतो. त्यांची अभिरुचीही वेगळी असते. काळाच्या प्रवाहात काही लाटा क्षणिक असतात. त्या नाटकांचा उद्देश वेगळा असतो. कोणत्याही नाटकामध्ये एखादा विचार, प्रश्न, समस्या उत्कटपणे मांडले असतील, विनोददेखील गंभीरपणे मांडलेला असेल, केंद्रस्थानी आशयाला महत्त्व असेल, अशा नाटकांचे मूल्य टिकणारे असते.’’
‘चारचौघी’ नाटकातील स्त्रियांबरोबरच ‘ध्यानीमनी’ आणि ‘सेलिब्रेशन’ या प्रशांत दळवी यांच्याच नाटकांच्या नायिकाही आपल्या जीवनात प्रश्न निर्माण झाल्यावर ताठपणे उभ्या राहताना दिसतात. या स्त्रियांच्या प्रतिमा आपल्याला अंतर्मुख होऊन विचार करायला लावणाऱ्या आहेत.
 स्त्रीच्या जगण्याचा अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारं सध्या गाजत असलेल्या ‘कुमुद प्रभाकर आपटे’ या नाटकाचे लेखक वीरेन्द्र प्रधान म्हणतात, ‘‘स्त्री-पुरुष हा भेदभाव मला मान्य नाही. पूर्वीपासून जिजाबाई, रमाबाई रानडे यांसारख्या स्त्रियांनी चौकट मोडून काम केले आहे. वास्तवात बऱ्याच स्त्रिया घर-संसार आणि आपले करिअर सांभाळून यशस्वी झालेल्या दिसतात; परंतु नाटकांमधून त्यांच्या यशस्वितेचे चित्रण फारसे आलेले दिसत नाही. सामाजिक भान ठेवून व्यवसाय करता येत नाही. ‘उंच माझा झोका’ या रमाबाई रानडे यांच्यावरच्या मालिकेला टी.आर.पी. नव्हता; परंतु कोणतीही तडजोड न करता रमाबाई रानडे यांचे आयुष्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यात यश मिळाले.’’ प्रेक्षकांची अभिरुची बदलली आहे. ‘कुमुद प्रभाकर आपटे’ या नाटकामधून दोन स्त्रियांनी एकमेकींकडे पाहण्यापेक्षा माणूस म्हणून एकमेकींकडे बघणे महत्त्वाचे आहे, हे सांगण्याचा हेतू आहे. तो बऱ्याच अंशी सफल झाल्याचे ते सांगतात. जे चांगले आहे तेच टिकते, असे त्यांचे मत आहे.
 तरुण पिढीचे विचार धीटपणे मांडणारं, बदलत्या काळाचे प्रतिबिंब असणारं थेट नाटक म्हणजे तत्पूर्वी आलेलं मनस्विनी लता रवींद्र यांचं ‘सिगारेटस्’. या नाटकांमधील स्त्री प्रतिमा या आधुनिक काळाचं प्रतिनिधित्व करतात. हे नाटक आशीष-नेहा आणि नंदिती-मनीष या मित्रांच्या नातेसंबंधावर आधारित आहे. पुढे त्यांच्या नात्यांतील तुटलेपण आणि त्यातून आशीषचं नंदिनीबरोबर आणि नेहाचं गौतमबरोबर नवं नातं जोडलं जातं. त्यांच्या संबंधातील मोकळेपणाही व्यक्त होतो. नंदिनी आणि आशीषमध्ये कोणतेही भावनिक नाते नसताना, आपल्यात काही प्रॉब्लेम नाही ना? हे बघण्यासाठी जस्ट ट्रायल म्हणून शरीरानं एकमेकांच्या जवळ येतात. नंदिनी आशीषला म्हणते, ‘बघू  ट्राय आऊट करून! मलाही कळेल माझ्यात काही दोष नाही ना?’ लेखिकेने धीटपणाने हे तरुण पिढीचे विचार नाटकामधून पोहोचविले आहेत.
नेहा आणि गौतम यांचे विचार वेगळे आहेत. नेहा आपण गौतममध्ये गुंतल्याचे जेव्हा आशीषला सांगते, तेव्हा तो चिडतो, कारण ती दोघे लग्न करणार आहेत. तेव्हा नेहाच व्यभिचारिणी असल्याचे तो गौतमला सांगतो. त्या वेळी नेहा आपल्याला नंदिनीकडून सर्व समजल्याचे सांगते आणि नाते संपवून टाकते. येथे एक गोष्ट लक्षात येते की, नेहा आशीषबरोबर भांडण, वादविवाद करीत नाही, आक्रस्ताळेपणा करीत नाही. पुरुषी अहंकाराला नेहा कृतीतून योग्य उत्तर देताना दिसते. नंदिनी स्वत:हून आशीषबरोबरच्या शारीरिक जवळिकीबाबत बिनधास्तपणे सांगताना दिसते. प्रामाणिकपणाने ती हे कबूल करते. या दृष्टीने ‘सिगारेटस्’ या नाटकातील ‘नंदिनी’ आणि ‘नेहा’ ही दोन स्त्रीची विरोधी रूपे दिसतात. यावर बोलताना लेखिका मनस्विनी लता रवींद्र म्हणाल्या, ‘‘आठ वर्षांपूर्वी जेव्हा ते नाटक आलं तेव्हा संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. अगदी टोकाचा विरोध आणि टोकाचं कौतुकही; पण मला आपण काही तरी बोल्ड लिहिलंय असं कधीच वाटलं नाही, कारण जे आजूबाजूला घडत होतं तेच मी मांडलं. एक मात्र नक्की, स्त्री स्वातंत्र्याविषयी काहीही लिहिलं गेलं, तर आपल्याकडची माणसं आक्रमक होतात; पण आता बदल घडतो आहे. माध्यमातली व्यामिश्रता स्वीकारायची मानसिकता आली आहे. त्यामुळे आत्ता जर हे नाटक आलं, तर मला नाही वाटत तसा विरोध होईल.’’
अलीकडे आलेलं आणखी एक नाटक आताच्या स्त्रीच्या जगण्यावर असाच थेट प्रकाश टाकते. स्त्रीच्या आयुष्यात तिचे लग्न होणे म्हणजे जीवनाचे सार्थक झाल्यासारखे असते, हा समाजाचा मुलींकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे; पण मुलींचे ठरलेले लग्न जर मोडले तर त्या मुलींचे दुसरीकडे लग्न जमवण्यात आजही आडकाठी येऊ शकते, हे वास्तव प्रखरपणे संजय पवार लिखित ‘ठष्ट’ म्हणजे ‘ठरलेले लग्न मोडलेल्या मुलींची गोष्ट’ या नाटकात पाहायला मिळते. ‘ठष्ट’ या नाटकात लेखकाने लग्न मोडलेल्या, लग्नापासून जाणीवपूर्वक दूर राहिलेल्या मुलींच्या आयुष्याची कहाणी मांडली आहे.
एका वर्किंग विमेन्स हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या चार मुलींची गोष्ट आपल्यासमोर उलगडत जाते. रूममध्ये सुलभा पाटील, अनामिका, अक्षता या तिघी जणी राहत असतात. प्रीती ही मध्यमवर्गीय, सुखी संसाराची स्वप्न पाहणारी आहे. प्रीतीचे लग्न ठरलेले आहे. तिचा भावी नवरा मुंबईचा असल्याने त्याच्याशी भेटीगाठी घेता येतील या दृष्टीने ती मुंबईला येते आणि या होस्टेलमध्ये राहायला येते. ही रूम संपूर्ण होस्टेलमध्ये वेगळी असते. याचे कारण येथे राहणाऱ्या मुलींची लग्ने होत नाहीत किंवा ठरलेली लग्ने मोडतात, असा समज आहे.
सुलभा खेडय़ातून आलेली आहे. ती पारंपरिक विचारांची आहे. अनेक नकार घेऊन लग्नच नको या निष्कर्षांला पोहोचून ती इथे आलेली आहे. तिच्यावर भावंडांचीही जबाबदारी आहे. अक्षता आणि अनामिका या भिन्न जीवनशैली असलेल्या मुली आहेत. दोघीही लग्नाला ठरवून नकार देतात. दोघींनीही शरीरसुखाचा उपभोग घेतलेला आहे. त्यामध्ये जगावेगळे असे काही त्यांना वाटत नाही.
‘ठष्ट’ या नाटकातील चौघींच्याही कहाण्या वेगळ्या आहेत. पुरुषप्रधान संस्कृतीला आव्हानात्मक वाटाव्यात अशा या स्त्री प्रतिमा आहेत. बिनधास्त वागणाऱ्या आहेत. चालू काळाच्या दृष्टीने लग्न मोडणे हे रूढ आहे, किंबहुना दोन-तीन ठरलेली लग्ने मोडली तरी त्याचा बाऊ न करता, रडत न बसता, आपल्याला जे हवे आहे ते मिळवायचा प्रयत्न करायचा असा सुलभा सोडली तर इतरांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे. बदलत्या काळाप्रमाणे बदलत्या समाजातील स्त्रियांच्या या प्रतिमा वेगळ्या, मनावर ठसणाऱ्या आहेत.
 स्त्रीच्या लैंगिकतेच्या संदर्भात धीटपणाने आणि स्पष्टपणाने सर्वप्रथम विचार मांडणारे नाटक म्हणजे वंदना खरे अनुवादित ‘योनीच्या मनीच्या गुजगोष्टी’. ‘व्हजायना मोनोलॉग’ या इव्ह एन्सलर यांच्या नाटकाचे हे मराठी भाषांतर रूप आहे. योनी या शब्दाने सुरू झालेल्या या नाटकात आपण गुंतत जातो. एक मुलगी, बहीण, आई, सून, काकी, आजी या नात्यांपलीकडे जाऊन आपण आपल्या बाईपणाचा आनंद घेऊ लागतो. नव्याने अगदी वयात येणाऱ्या मुलीपासून ते उतारवयातील बायकांचे अनुभव आपल्याला आपलेच अनुभव आहेत अशी जाणीव या नाटकामधून व्यक्त होते. नाटकाची भाषा कधी न उच्चारलेली असली तरी ती खटकत नाही. स्त्रीच्या शरीराच्या संदर्भात अतिशय चांगल्या पद्धतीने, वैद्यकीय दृष्टिकोनातून, सकारात्मक दृष्टिने विषय हाताळलेला जाणवतो. प्रत्येक पती-पत्नीने पाहावे असे हे नाटक आहे. नाटक कोठेही अश्लील न करता एका बोल्ड विषयाचे अवधान सांभाळून, संथपणे हाताळून एक आव्हान पेलून लेखिकेने ते यशस्वी करून दाखविले आहे. यातच या नाटकाचे खरे यश सामावलेले आहे.
या संदर्भात वंदना खरे यांच्याशी संवाद साधल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘हे नाटक अश्लील होऊ नये ही काळजी घेतली आहे तरीही जे काही सांगायचे आहे ते थेट, स्पष्टपणे सांगितले आहे. यामध्ये द्वयर्थी वाक्ये नाहीत. स्त्रीवर होणारे अत्याचार, निषेध, अन्याय, बलात्कार नाहीत. यातील स्त्रिया आपल्या शरीराच्या संदर्भात सकारात्मक अनुभव बोलतात. शेवटी आजी नातीचा जन्म होताना पाहते त्या दिवशी ती योनीचं हृदयात रूपांतर होताना पाहते. हाच संदेश घेऊन प्रेक्षक घरी जातात. हा सकारात्मक परिणाम महत्त्वाचा आहे!’’ या नाटकावर बरीच उलटसुलट चर्चा झाली. या संदर्भात पुरुषांच्या प्रतिक्रिया बोलक्या आहेत. वंदना खरे सांगतात, ‘‘एकदा एका पुरुष प्रेक्षकाने या नाटकाचा एखादा प्रयोग फक्त पुरुषांसाठी ठेवावा असे सुचविले. त्याचं असं म्हणणं होतं की, हे नाटक पाहिल्यानंतर पुरुष बायकांच्या शरीराबद्दल जे वेडेवाकडे बोलतात त्याला आळा बसेल. ‘जेंडर’ या विषयावर प्रशिक्षण देणाऱ्या माझ्या एका मित्राने सांगितले की, त्याला या नाटकाने अगदी आतून हलवून टाकले आहे. आपण स्वत:च्या लैंगिकतेचादेखील किती वरवरचा विचार करीत होतो याची नाटक पाहताना जाणीव झाली, असे तो म्हणाला. हे नाटक पाहिल्यामुळे पुरुषांना स्वत:च्या लैंगिकतेकडे डोळसपणे पाहण्याची प्रेरणा मिळेल, असे आणखी एका मित्राचे मत आहे!’’
या संदर्भातील अशीच चर्चेत असलेली नाटके म्हणजे ‘गुपित योनीच्या गुप्तगोष्टी’ (सोनिया चौधरी), ‘त्या चार योनींची गोष्ट’ (नितीनकुमार) ही होत. वैद्यकीय दृष्टिकोनातून अभ्यासपूर्ण, संयत भाषेत व्यक्त झालेली ही नाटके लक्षणीय येत आहेत. हीदेखील भाषांतरित नाटके आहेत.
एकूणच, ‘सखाराम बाइंडर’ ते ‘ठष्ट’ असा ४० वर्षांचा नाटकांचा प्रवास पाहिला, तर असे लक्षात येते की, पूर्वीच्या मुळुमुळु रडण्याचा, पुरुषांच्या चुकांना माफ करणाऱ्या स्त्री प्रतिमांपेक्षा आजच्या स्त्री प्रतिमा बदलत गेल्याचे दिसते. त्याचे प्रतिबिंब विविध नाटकांमधून पडल्याचे दिसते. (जागेअभावी सगळ्या नाटकांचा समावेश करता आलेला नाही.) स्त्री नाटककारही आपले विचार नाटकांमधून बिनधास्तपणे मांडताना दिसतात. स्त्री ही उपभोग्य वस्तू नसून तीदेखील माणूस आहे, त्या दृष्टीने पुरुषांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. हा दृष्टिकोन त्यांनी आपल्या नाटकांमधून रुजविल्याचे दिसते. स्त्री शिक्षणामुळे आपले विचार नाटकांमधून धीटपणाने मांडण्याचे धाडस आल्याचे जाणवते. त्याचबरोबर काळाप्रमाणे नाटककारांची, प्रेक्षकांची मानसिकता, अभिरुचीही बदलत असल्याचे दिसते. हा बदल निश्चितच लक्षणीय आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा