आतापर्यंत आपण योगशास्त्रातील अनेक संकल्पना जाणून घेतल्या अगदी योग शब्दांच्या व्याख्येपासून यमनियम, आसने, प्राणायाम यासंबंधी थोडक्यात जाणून घेतले.
प्राणायाम साधना हा अंतरंग व बहिरंग यांना जोडणारा पूल आहे. हे आपण जाणले. प्राणायामानंतर टप्पा येतो तो प्रत्याहार, धारणा व ध्यान साधनेचा!
प्रत्याहार म्हणजेच प्रति + आहार!   इंद्रियांना नेहेमीचे बाह्य़विषय न पुरविता इंद्रियांना आत वळविणे म्हणजेच प्रत्याहार. हळूहळू मन बाह्य़ विषयावरून स्वतच्या अंतरंगात वळवण्यासाठी प्रथम श्वासावर लक्ष एकाग्र करायला शिकायचे. त्यासाठी अगदी साधे सुखासन, अर्ध पद्मासन अथवा ध्यानात्मक गटातील कुठलेही आसन उदा. वज्रासन किंवा सिद्धासन धारण करा. ‘समकायाशीरोग्रंव’ ही भगवद्गीतेतील सहाव्या अध्यायात वर्णन केलेली देहाची स्थिती असली पाहिजे. नजर नासाग्राकडे स्थिर झाल्यावर आता डोळे अलगद मिटून घ्या. आता श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श नाकपुडय़ांना जाणवेल. श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श नाकाच्याही पुढे ४ बोटे जाणवतो का, हे जाणिवेसह अनुभवण्याचा प्रयत्न करा. आता हळूहळू अनेक विषयांमध्ये रमलेल्या मनाला एका विषयाकडे घेऊन जा. हा निवडलेला विषय शक्यतो सात्त्विकच असावा. भावना प्रक्षुब्ध करणारा कुठलाही विषय नको. उदा-बर्फाच्छादित शिखर, फूल, आकाश, वाहाणारी नदी, ॐकार इत्यादी विषय धारणेसाठी आपण निवडू शकता. आता या विषयाशी संदर्भातच विचारांची दिशा आपण ठरवायची आहे. शक्यतोवर विचार भरकटू न देता विषयाशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करू या. यालाच म्हणतात इष्टविषय धारणा!
इष्टविषय धारणेतूनच सहज लागते ते ध्यान! ध्यान म्हणजे आंतरिक जाणिवेचा विस्तार! ध्यान शिकविता येत नाही. ध्यान करता येत नाही. कळीचे फुलात रूपांतरण होते त्याप्रमाणे आपोआप ध्यान लागते. नियमित ध्यानसाधना हा साधनेचा गाभा आहे.  योगातील नवनीत आहे. साधनेचा कळसाध्याय आहे. ध्यान ही ‘स्वबोधा’ ची यात्रा आहे. माहितीकडून ज्ञानापर्यंतचा हा प्रवास आहे. आपल्या अंतरंगाची साफसफाई करणारी ही साधना आहे. प्रपंचातच वरवर रमताना लाटांचा कल्लोळ असणारच. खरी परमार्थाची यात्रा अंतरंगाकडे आहे. अंतरंगात समुद्राच्या तळाशी फक्त शांतता आहे. अक्षय आनंद आहे.
आपणा सर्वाना या आनंदमयी यात्रेच्या मनापासून शुभेच्छा!    (सदर समाप्त)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा