रेश्मा भुजबळ
reshmavt@gmail.com
तुम्हाला आयुष्यात काही वेगळं करायचं असेल तर तसे निर्णय योग्य वेळी घ्यावे लागतात. गावातली एक सर्वसामान्य मुलगी ते पोलीस अधीक्षक असा तेजस्वी यांचा प्रवास त्याच निर्णयाचं फळ आहे. लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन आता सातारचे पोलीस अधीक्षकपद भूषविणाऱ्या तेजस्वी सातपुते यांनी पुरुषी आधिक्य असणाऱ्या क्षेत्रात स्वत:ला सिद्ध केले आहे .
मंजिल तो मिल ही जायेगी भटकतेही सही,
गुमराह तो वो है जो घरसे निकले ही नही..
आपल्या आतापर्यंतच्या प्रवासाचं वर्णन साताऱ्याच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते या शब्दांत करतात. वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण घेत काहीसे भटकतच शेवटी आपल्या लक्ष्यापर्यंत पोहचण्याचं स्वप्न पूर्ण केलेल्या तेजस्वी यांचा प्रवास खडतर असला तरी त्या त्याला संघर्ष म्हणत नाहीत. कारण त्यांच्या मते थोडाबहुत संघर्ष तर प्रत्येक जण करतच असतो.
अहमदनगर जिल्ह्य़ातल्या शेवगाव इथला त्यांचा जन्म. मुलींचे माध्यमिक शिक्षण होते ना होते तोच तिला लग्न करायचे आहे की नाही किंवा तिची पसंती न विचारताच लग्न लावून द्यायचे अशी भोवतालची विचारसरणी. त्यांची आई प्राथमिक शिक्षिका तर वडील शेतकरी आणि बरोबरीने जोड व्यवसाय करणारे. मोठं कुटुंब. परिस्थिती तशी बेताची. कुटुंबात जरी मुलींच्या शिक्षणाला फारसं महत्त्व नसलं तरी तेजस्वी यांच्या आई-वडिलांना मात्र मुलींनी शिक्षण घेऊन सुजाण नागरिक व्हावं, अशी इच्छा होती आणि त्यासाठी पडेल ते कष्ट करून मुलींना शिक्षण देण्याची तयारीही होती.
आपल्या लहानपणीच्या आठवणीबद्दल तेजस्वी सांगतात, ‘‘मी लहानपणी अजिबात हुशार नव्हते. अभ्यासाचं गांभीर्यही फारसं नव्हतं, काहीशी आळशीच होते मी. उशिरा येणाऱ्या, त्यासाठी शिक्षा सहन करणाऱ्यांमध्ये मी आघाडीवर असायचे. अभ्यासासाठी अनेकदा मी आईचाही मार खाल्ला आहे. आईला मात्र मी खूप अभ्यास करावा असं वाटायचं. त्यासाठी ती परवडत नसतानाही मला आणि माझ्या बहिणीला वेगवेगळी पुस्तकं, व्यवसायमाला आणायची. चौथीच्या दिवाळीतली गोष्ट. आईला घर आवरताना माझ्या कोऱ्या व्यवसायमाला सापडल्या. तिला त्या सोडवल्या नसल्याचा खूप राग आला आणि वाईटही वाटलं. ती म्हणाली, ‘नाहीतरी थंडीचे दिवस आहेत आपण त्याची शेकोटीच करू या.’ या एका वाक्याचा माझ्यावर खोल परिणाम झाला. हृदयात कुठेतरी आत रुतलं ते वाक्य आणि मी व माझ्या लहान बहिणीने तिच्याकडून आठ दिवसांची मुदत मागून घेतली. गंमत म्हणजे व्यवसायमाला सोडवताना नकळत अभ्यासाची गोडी लागली. इतकी की पुन्हा अभ्यास कर, असं सांगावं लागलं नाही. अभ्यासाची गोडी पुढे आवडीत अन् आव्हान स्वीकारण्यात रूपांतरीत झाली, हळूहळू जोपासली गेली. आत्मविश्वास तर वाढलाच, पण यशही मिळू लागलं. आमच्या शेवगावच्या शाळेमधून दहावीला बोर्डात येण्याचा मान मी मिळवला.’’ तेजस्वी अभिमानाने सांगतात.
प्रत्येक जण आपल्या भविष्याची स्वप्नं बघतो, त्याप्रमाणे तेजस्वी यांनीही वैमानिक होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. हवाई दलातील वीरमरण प्राप्त झालेले निर्मलजित सिंग हे त्यांचे आदर्श होते. सगळेच करतात तेच करियर म्हणून करायचं नाही असं त्यांना नेहमी वाटायचं. रुळलेल्या, मळलेल्या वाटेवरून त्यांना जायचं नव्हतं. त्यासाठी कितीही कष्ट पडले तरी ते करण्याची त्यांची तयारी होती आणि त्याप्रमाणेच त्या तयारी करत होत्या. मात्र अकरावीला असताना त्यांना चष्मा लागला आणि त्यांचं वैमानिक होण्याचं स्वप्न भंगलं. दिशाहीन झाल्यासारखं त्यांना वाटलं. त्यातच आजूबाजूला त्यांच्या नात्यातल्या त्यांच्या वयाच्या मुलींची लग्नं होत होती. एवढंच कशाला, मुलग्यांचीही लग्न २१-२२ व्या वर्षी होत होती. तेजस्वी यांच्या आई-वडिलांवरही कुटुंबीयांचा काहीसा दबाव येत होता. कारण तेजस्वी कुटुंबातील पहिलीच मुलगी होती, जी दहावी झाली होती, बारावी झाली होती आणि आता पुढील शिक्षणही घेणार होती. मात्र त्यांनी तो दबाव, ताण तेजस्वी किंवा त्यांच्या बहिणीला कधीही जाणवू दिला नाही.
बारावीनंतर काय हा प्रश्न आ वासून त्यांच्यासमोर होता. अशातच त्यांना जैव तंत्रज्ञान अभ्यासक्रमाविषयी समजलं आणि वेगळा अभ्यासक्रम असल्यानं त्यांनी तो करायचा निर्णय घेतला. त्यासाठी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या महाविद्यालयात प्रवेश घेतला. तो अभ्यासक्रम करत असतानाच बेंगळूरु इथल्या ‘जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर अॅडव्हान्स्ड सायंटिफिक रिसर्च’ (जेएनसीएएसआर) च्या ‘प्रोजेक्ट ओरिएंटेड बायलॉजी एज्युकेशन’ या कोर्ससाठी तेजस्वी यांची संपूर्ण महाराष्ट्रातून निवड झाली, तर देशभरातून दहाजणांची निवड करण्यात आली होती. तीन वर्षांच्या या कोर्समध्ये पदवी स्तरावरील मुलांना प्रशिक्षण देऊन संशोधक म्हणून घडविले जाते, असे म्हणण्यास हरकत नाही. या अभ्यासक्रमाविषयी तेजस्वी म्हणतात, ‘‘जेएनसीएएसआरमध्ये निवड झाल्यानंतर मला जाणवलं की, आपला प्रवास योग्य दिशेने सुरू आहे. पहिलं वर्ष अगदी उत्साहात पार पडलं. दुसऱ्या वर्षी मात्र मला वाटायला लागलं की हे सगळं खूप छान आहे, पण कदाचित हे आपल्यासाठी नाही आणि तिसऱ्या वर्षी तर मी पुढे एम.एस्सी. किंवा पीएच.डी. न करण्याचाच निर्णय घेतला. तो कोर्स उत्तमरीत्या पूर्ण करूनही मी पुढे वेगळा पर्याय निवडण्याचं ठरवलं. तो पर्याय ठरवण्यासाठी मात्र शिक्षणात खंड पडणं मला कोणत्याही स्थितीत परवडणारं नव्हतं. अखेर मी पुण्यात एलएलबी करण्याचा निर्णय घेतला. इथेही माझे पालक माझ्या पाठीशी होते. नाही तर वाया गेलेली सुशिक्षित बेकार मुलगी हा ठपका माझ्यावर लागला असता. एलएलबीचे पहिले वर्षही मी उत्तम गुणांनी पास झाले. दुसऱ्या वर्षांला असताना महाविद्यालयामधल्या ‘बॅकबेंचर्स’कडून मला स्पर्धा परीक्षेबद्दल समजलं. ते क्षेत्रही मला वेगळं वाटलं, मग आपणही करून पाहू या, असा विचार करून मी स्पर्धा परीक्षा देऊन पाहायचं ठरवलं. त्यासाठी अनेकांकडून माहिती घेतली. पुण्यातील स्पर्धा परीक्षांच्या क्लासेसमध्ये चौकशी केली आणि ठामपणे निर्णय घेतला, स्पर्धा परीक्षा देण्याचा. पण नेमकी लोकसेवा आयोगाची परीक्षा आणि एलएलबीची दुसऱ्या वर्षांची परीक्षा साधारणत: एकाच वेळी आली. मग मी एलएलबीची परीक्षा न देण्याचा निर्णय घेतला. आता माझ्यासमोर संकट होतं ते घरच्यांना समजावण्याचं. त्यांना कसंबसं समजावलं. आईला काळजी वाटत होती. मात्र वडिलांनी नेहमीप्रमाणे पाठिंबा दिला आणि मी माझा निर्णय अमलात आणला. यावेळी मात्र मी लोकांचा अजिबातच विचार केला नाही. कारण लोक दोन्ही बाजूंनी बोलणार हे मला माहीत होतं. अखेर परीक्षा दिली पण त्यात यश आलं नाही. काहीशी निराश झाले. पण कमी काळात, कमी अभ्यासात चांगले गुण मिळवले होते हा वास्तविक आणि सकारात्मक विचार समोर ठेऊन पुढचा प्रयत्न पूर्ण ताकद लावून करायचा हे निश्चित केले. त्याच दरम्यान ‘सीअॅक’च्या परीक्षेबद्दल कळलं. ही संस्था स्पर्धा परीक्षार्थीना मार्गदर्शन करते. त्यासाठी प्रवेश परीक्षा दिली. त्यात माझी निवड झाली. पुण्याहून मी मुंबईला आले. तिथे अभ्यास करून मी जून महिन्यात पूर्वपरीक्षा दिली. नोव्हेंबर महिन्यात मुख्य परीक्षा होती. मी दिवाळीला घरी न जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी आम्ही ज्या हॉस्टेलमध्ये राहात असू, त्या हॉस्टेलचा स्वयंपाकीसुद्धा सुट्टी घेऊन गावी गेला. त्या दिवाळीत बिस्कीट आणि पाणी पिऊन मी अभ्यास केला. प्रशिक्षण, परीक्षेच्या कालावधीमध्ये मी माझ्या घरी खूपच कमी वेळेला गेले. अनेकदा नातेवाईकांना तोंड द्यावे लागू नये म्हणून. मी काय करते, आणखी किती शिकणार, लग्न कधी करणार हे प्रश्न टाळण्यासाठी मी दिवसा मुंबईहून निघून संध्याकाळच्या वेळी घरी पोहोचत असे. आई-बाबांची भेट घेऊन सकाळच्या गाडीने पुन्हा मुंबईला परतत असे. या दरम्यान माझ्याहून लहान बहिणींची लग्नं झाली. त्यावेळी खूपदा वाटूनही त्यांच्यासाठी मी काही करू शकत नव्हते. या संपूर्ण प्रवासात माझे आईवडील माझ्या पाठीशी होते. त्यांनी नातेवाईकांचा दबाव कधीही माझ्यापर्यंत येऊ दिला नाही आणि कधी तो आलाच तर माझी समजूत काढून मला धीरच दिला. नातेवाईकांविषयी कटूता राहणार नाही हेही त्यांनी आवर्जून पाहिले.’’
तेजस्वी यांनी यूपीएससीची परीक्षा मराठीतून दिली आहे. त्याविषयी त्या म्हणाल्या, ‘‘माझं दहावीपर्यंतच शिक्षण मराठीतूनच झालं आहे. बारावी विज्ञान जरी केलं असलं तरी शिक्षकांशी संवादाचं माध्यम मराठीच होतं. त्यामुळे मराठी भाषा आपली मातृभाषा आहे, तिच्यावर आपलं प्रभुत्व आहे. तिचा वापर अगदी सहज करू शकतो. इंग्रजीपेक्षा मला मराठी कायम उजवी वाटते, म्हणून मी मराठीतून परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. मूळ मराठीत असणारी अभ्यासक्रमाची पुस्तकं लवकर वाचून होत. मराठीतून परीक्षा देण्याचा एकच तोटा असा होता की मी जे विषय घेतले होते त्यासाठी उपलब्ध असणारे ८० टक्के साहित्य इंग्रजीतून होते आणि केवळ २०-२५ टक्के साहित्य मराठीतून. त्यामुळे इंग्रजीतून अभ्यास करून मला मराठीतून पेपर द्यायचे होते. सगळ्याच विषयांचे मराठीतून साहित्य उपलब्ध झाले तर मुलांना ते आणखी सोपे होईल, असं मला आवर्जून सांगावंसं वाटतं.’’
नोव्हेंबरमध्ये मुख्य परीक्षा आणि मार्चमध्ये मुलाखत होऊन मे २०१२ मध्ये तेजस्वी लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर दोन वर्षे प्रशिक्षण घेऊन २०१४ पासून पोलीस खात्यात रुजू झाल्या. प्रथम परतूर येथे सहायक पोलीस अधीक्षक झाल्या. नंतर सीआयडीमध्ये, पुण्यात उपायुक्त (वाहतूक नियंत्रण) आणि आता सातारच्या पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
पुण्याच्या उपायुक्त (वाहतूक नियंत्रण) म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी त्या खात्याचा कार्यभारही अतिशय सकारात्मकतेने सांभाळला. ‘‘आपण वाहतूक नियंत्रण विभागातही उत्तम काम करू शकतो, असं मी त्यावेळी मला बजावलं. कारण वाहतुकीचा परिणाम हजारो लोकांवर होत असतो. माझ्या नियुक्तीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. त्यात काही स्त्री म्हणून विश्वास दाखवणाऱ्या होत्या, माझ्यासमोर कोणती आव्हानं असतील त्या सांगणाऱ्या होत्या, तशाच काही मिश्किलही होत्या. जसं की ‘आपण एरव्ही पुणे ट्रॅफिक, महिला चालकांवर विनोद करतो आता वाहतूक नियंत्रण करणारी महिलाच असल्याने आता काय होणार?’ वगैरेही. मी ते आव्हान म्हणून स्वीकारत पुण्याच्या वाहतुकीबाबत अनेक प्रयोग केले. आणि सांगायला आनंद वाटतो की मी केवळ सहा महिन्यांसाठीच हे पद सांभाळले तरीही पुण्याच्या वाहतुकीबाबतच्या निर्णयांबाबत ज्या काही उपायुक्तांना नावाजले जाते, त्यात माझेही नाव आवर्जून घेतले जाते. समाजात असे काही लोक आहेत की जे तुम्हाला समान समजत नाहीत, तुमच्या कर्तृत्वावर तुम्हाला आजमावण्याआधीच अविश्वास दाखवतात. मात्र त्याचबरोबरीने असेही लोक असतात जे तुमच्या मागे ठामपणे उभे राहतात. ते मला पुण्यात अनुभवायला मिळाले. त्यावेळी ‘सेलिब्रिटी’ असल्यासारखेच मला वाटायचे. यातून मला लक्षात आलं की कोणतीही संधी ही लहान नाही, आपण ठरवलं तर त्या संधीचेही आपण सोनं करू शकतो.’’
तेजस्वी आपल्या यशाबद्दल सांगतात, ‘‘माझ्या आईचे अकरावी झाल्यानंतर लग्न झाले. तिच्या शिक्षणाची आवड लक्षात घेऊन माझ्या वडिलांनी तिला पुढे शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. तिच्यानंतर तिच्याहून जास्त शिकणारी मी होते. माझ्या यशामुळे मला आमच्या संपूर्ण कुटुंबात मान मिळायला लागलाच, शिवाय माझे मतही लक्षात घेतले जाऊ लागले. सगळ्यांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. पण त्याहून सुखावणारी गोष्ट होती ती म्हणजे माझ्याहून लहान, पण ज्यांची लग्नं व्हायची होती त्यांना शिक्षणाची दारं उघडली गेली. मुलींनाच नव्हे तर अनेक मुलगे उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रेरित झाले. त्यामुळेच आज आमच्या कुटुंबातील मुलं-मुली उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर, इंजिनीअर, सीए झाले आहेत.’’
‘‘माझा प्रवास एक गावातली मुलगी ते पोलीस अधीक्षक असा आहे. मी अनेक अभ्यासक्रम करत मात्र एका अर्थाने भटकतच इथवर आले. यश मिळालं म्हणून जरी तो प्रवास सुखकर असला तरी यश मिळालं नसतं तरीही तो नक्कीच आणखी वेगळा झाला असता. अनेक गोष्टी शिकवूनच गेला असता. कारण तुमचे प्रत्येक निर्णय तुम्हाला काहीतरी शिकवत असतात. तुम्ही फक्त निर्णय घेण्याचं धाडस करायचं असतं.’’