ज्येष्ठांसाठींच्या वृद्धाश्रमांची माहिती देण्याऐवजी त्यांच्यासाठीच्या वेगवेगळय़ा प्रकल्पांची, संस्थांची, कायद्यांची, संरक्षणाची माहिती द्यावी आणि संस्थांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने सुरू झालेल्या या सदराला वाचकांतील दातृत्वाने चकित केले. लाखो रुपये गोळा झाले, प्रत्यक्ष जाऊन मदत केली गेली. मदतीचा हात खरोखरच भरभरून मिळाला..
स काळच्या प्रहरी ‘दिलासा केअर सेंटर’च्या सतीश जगतापचा फोन वाजतो. निनावी क्रमांकावरून अनोळखी व्यक्तीचा आवाज येतो.
‘‘पेपरमध्ये तुझ्या संस्थेबद्दल वाचलं. तुझं काम चांगलंय.’’
‘‘आपण कोण बोलता?’’ पलीकडे पूर्ण शांतता!
‘‘आपण कोण बोलता? आपलं नाव?’’
‘‘मला तुझ्या संस्थेला मदत करायची आहे.’’
‘‘आपलं नाव?’’
 ch16 ‘‘मला ओळख देता येत नाही. इतकंच सांगतो, मी नक्षलवादी चळवळीत आहे. आईवडिलांना सोडून आलोय, किती तरी वर्षांपूर्वी. त्यांचं पुढे काय झालं असेल ठाऊक नाही. त्यांच्या नावाने मला तुझ्या संस्थेला मदत करायची आहे. काय करू?’’
‘‘एकच कर भाऊ. काही दिवसांसाठी तरी शस्त्र हातात धरू नकोस?’’
‘‘ठीक आहे. तेवढं करीन. तुझ्यासाठी..’’
आणि फोन कट झाला.
‘मदतीचा हात’ या सदरातील माझ्या संस्थेवरील लेखामुळे मला माणसातला ‘माणूस’ भेटला आणखी काय हवं?’’ हे सांगताना सतीशजींचा गळा दाटून आला होता.
त्यांच्यावरचा ‘चमत्काराचा अर्थ’ (६ सप्टेंबर) लेख प्रसिद्ध झाल्यापासून आजवर त्यांना दोन हजारांवर दूरध्वनी आले. सुमारे सहाशे लोक प्रत्यक्ष भेटून गेले. इचलकरंजीचे इंगळे सर, गजानन कान्हेरेंसारखी माणसं संस्थेशी जोडली गेली. घरोघरी जाऊन त्यांनी ‘दिलासा’तील निराधार, अपंग वृद्धांसाठी पासष्ट हजार रुपयांवर देणग्या गोळा केल्या. मदतीची एकूण रक्कम सहा लाख रुपयांवर गेली आहे. हे सर्व घडलं केवळ एका लेखामुळे!
‘‘वय वाढलं की, वृद्धांची अडगळ वाटते; पण वृद्धांनाही आनंदाने जगण्याचा हक्क आहे. त्यासाठी त्यांना समाजाने सोयीसुविधा पुरवायला हव्यात. त्यांच्या अन्यायाला वाचा फोडली गेली पाहिजे, किंबहुना ज्येष्ठांनाही सन्मानाने ch17जगण्याचा हक्क आहे, हा सकारात्मक संदेश या लेखमालेने समाजात पोहोचवला म्हणूनच प्रत्येक लेखाला उत्तम प्रतिसाद मिळाला.’’ सिल्व्हर इनिंग्ज या संस्थेचे प्रमुख शैलेश मिश्रा यांनी सांगितले.
सुमारे वर्षभरापूर्वी हे सदर सुरू करताना हीच संकल्पना समोर होती. ज्येष्ठांसाठींच्या वृद्धाश्रमांची माहिती नको, तर ज्येष्ठांचं जीवन सुखकर करण्यासाठी कार्यरत असणाऱ्या वेगवेगळय़ा प्रकल्पांची, संस्थांची, कायद्यांची, संरक्षणाची माहिती या सदरातून द्यावी, हाच उद्देश होता. शोध घेता घेता असे अनेक प्रकल्प, संस्था मिळत गेल्या, किंबहुना खास ज्येष्ठांसाठी अनेक संस्था उदयाला येताना दिसल्या व या लेखमालेने त्यांच्या नेटवर्किंगला चालना मिळतेय असं सर्वच संस्थाचालकांचं मत पडलं!
‘लिव्ह इन रिलेशनशिप’ या धाडसी संकल्पनेवरील लेखाने ज्येष्ठांना उतारवयातील एकटेपणावर उपाय सापडला. माधव दामले म्हणाले, आजवर या विषयावर लिहिताना ‘आता आजीला नवे आजोबा मिळणार!’ यांसारखी सवंग शीर्षके दिल्याने समाजात चुकीचा संदेश पोहोचत होता. ‘मदतीचा हात’मधून हा नाजूक विषय संयमितपणे हाताळला गेला. त्यामुळे एकूण सभासद संख्या तर वाढलीच, पण ४० स्त्रिया नाव नोंदवण्यासाठी पुढे आल्या. इतकंच नव्हे तर एक सून, सासऱ्यांना घेऊन नाव नोंदवायला आली, तर एका आईला तिच्या मुलीने जोडीदार मिळवून दिला. बदलत्या काळानुसार नव्या संकल्पना स्वीकारण्यासाठी समाजमन तयार करायला ‘लोकसत्ता’सारखं सशक्त माध्यम पुढे आल्यानेच हे शक्य झालं!
ch15ज्येष्ठांना कायदा व पोलीस कशा प्रकारे मदत करतात ते सांगणाऱ्या दोन्ही लेखांना भरभरून प्रतिसाद लाभला. ‘फेसकॉम’चे विभागीय अध्यक्ष रमेश पानसे सांगतात, ‘‘सध्या वृद्ध पालक आपल्या मुलांविषयी पोलिसात तक्रार दाखल करत नाहीत; पण कायद्याच्या मदतीसंबंधी लेख वाचून          ८३ वर्षांच्या आजोबांनी हिंमत केली आणि आपल्याला छळणाऱ्या मुलांविरुद्ध केस दाखल केली. निकाल त्यांच्या बाजूने लागला. ज्या दिवशी मुलांची तुरुंगात रवानगी झाली त्याच्या दुसऱ्याच दिवशी ते आजोबा वारले, पण अत्यंत समाधानाने! त्यांना मृत्यूसमयी न्याय मिळाला होता, पण ही हिंमत त्यांना मिळाली ती केवळ या लेखाने!’’
अ‍ॅड. स्मिता संसारे यांनी सांगितलं, ‘‘मुळातच ज्येष्ठांना आपल्यासाठी कोणते कायदे आहेत ते ठाऊक नव्हतं. ‘कायद्याचं कवच’ या लेखामुळे ते माहीत झालं. त्यामुळे मालमत्ताविषयक समस्या, छळ व मारहाणीविषयक तक्रारींपासून ते वयाच्या साठाव्या वर्षी घटस्फोट हवा इथपर्यंत अनेक प्रकारच्या समस्यांवरील मार्गदर्शनासाठी मला फोन आले. बऱ्याच वेळा ज्येष्ठांना उपाय नको होता. त्यांना फक्त त्यांचं दु:ख व्यक्त करायचं होतं.’’
‘‘रस्त्यावरच्या बेघर, रोगग्रस्त वृद्धांना मदत करायला आजवर कोणीही पुढे येत नसतं; पण माझ्यावरील लेखामुळे लोकांना माझं काम कळलं.’’ संदीप परब सांगत होते. ते म्हणाले, ‘‘आज अनेक तरुण अशा निराधार वृद्धांना मदत करायला पुढे येतात. मला फोन करून माहिती देतात. वेळेवर मदत मिळाल्याने अनेक वृद्धांचे प्राण वाचलेत. त्यांना आश्रमात आसरा मिळालाय. आपणही अशा लोकांसाठी काम करू शकतो, हा सकारात्मक दृष्टिकोन या लेखाने तरुणांना दिला हा आनंद फार मोठा आहे! एकदा रेल्वेने दूरचा प्रवास करत असताना केवळ फोटोवरून मला ओळखून लोकांनी मला बसायला जागा दिली. वर माझ्या संस्थेला देणगीसुद्धा दिली!’’
 समाजात दातृत्वाची वानवा नाही, पण सत्पात्री दान व्हावं, ही प्रत्येकाची इच्छा असते. ‘लोकसत्ता’ची विश्वासार्हता इतकी की, संस्थेला भेट न देता केवळ या सदरातील लेखामुळे संदीप परब यांना साडेचार लाख रुपयांची मदत मिळाली. त्याशिवाय दात्यांनी दर महिन्याला या संस्थांना गहू, तांदूळ, तेल, कपडय़ाचा साबण अशा अनेक वस्तू पुरवण्यास सुरुवात केलीय. थंडीसाठी उबदार रजया, चादरी, उशा, पीठ मळण्याचे यंत्र अशा अनेक वस्तू लोकांनी देणगीदाखल दिल्या आहेत.
सतीश जगताप यांच्या ‘दिलासा’त लोकांसाठी दिवाळीत दोन हजार लाडू भेटीदाखल आले. ते भिकाऱ्यांना वाटत असताना एका भिकाऱ्याने सतीश जगताप यांच्याकडे त्यांच्या कामाची चौकशी केली आणि आपल्या फाटक्या पटकुरातून पंचवीस हजार रुपये काढून त्यांच्या हातात ठेवले, तर एका दात्याने नावही न सांगता, तसेच एका डॉक्टर स्त्रीनेही प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत दिली. अशा अर्थसाहाय्यामुळे या संस्था बंद होता होता वाचल्या आहेत. एवढंच नव्हे, तर निवृत्त पोलीस अधिकारी जोशीआजींनी त्यांची २४ गुंठे जमीन ‘दिलासा’ला दान करण्याचं ठरवलंय ज्यातून लवकरच ३०० खाटांचं एक निवारा केंद्र निराधार, अपंग वृद्धांसाठी नाशिकमध्ये उभं राहातं आहे! बालसिंगकाकांनी तर आपला संपूर्ण भविष्यनिर्वाह निधी रुपये पंधरा लाख या कार्याला देऊ केला, मात्र त्यांच्या भविष्याचा विचार करून जगतापांनी तो विनम्रपणे नाकारले, तर मुंबईचे दाभोळकरकाका दोन महिने ‘दिलासा’त राहून वृद्धांची सर्व प्रकारची सेवा करून समाधानाने मुंबईला परतले.
अनेक ज्येष्ठांना अशी समाजसेवेची आवड असते. त्यांना रीतसर प्रशिक्षण देणाऱ्या ‘निर्मला निकेतन’वरील लेखानंतर त्यांच्या ज्येष्ठ विद्यार्थ्यांमध्ये वाढ झाली आणि महाराष्ट्रातून निवासी प्रशिक्षणाची मागणी वाढली, असं या कोर्सची समन्वयक गौरी सांगते. ‘‘वृद्धांच्या संख्याबळाअभावी ओस पडलेल्या आमच्या केंद्रात आता वेटिंग लिस्ट लावावी लागतेय. याचं संपूर्ण श्रेय ‘चतुरंग’ला आहे,’’ असे डॉ. सुहेल लंबाते (CHF) कृतज्ञतेने सांगतात. ILC-I या संस्थेच्या अध्यक्षा अंजली राजे यांना लेखानंतर एकाच वेळी मदत देऊ इच्छिणारे आणि घेऊ इच्छिणारे असे दोन्ही प्रकारचे लोक भेटले. मुख्य म्हणजे झोपडपट्टीतील आजींसाठी असलेल्या ‘आजीबाईंचा बटवा’ या त्यांच्या योजनेसाठी अनेक दाते स्वेच्छेने पुढे आले!’’
‘लिव्हिंग वील’ ही अशीच एक नवी वेगळी संकल्पना! तिच्या प्रसिद्धीनंतर रोहिणी पटवर्धन यांच्यावर अक्षरश: प्रतिक्रियांचा पाऊस पडला. मुंबई, पुणे, नाशिक इथल्या ज्येष्ठ नागरिक संघांनी या संकल्पनेवर खास कार्यशाळा घेतल्या. लोकांनी या लेखाची कात्रणं जपून ठेवलीत व योग्य वेळी ते मदतीसाठी संबंधित संस्थांशी संपर्क साधतात, असं निरीक्षण त्या नोंदवतात. डोंबिवली इथल्या ‘दिलासा’ केंद्रावरील लेख वाचून तीन निराधार वृद्ध स्त्रिया ज्योती पाटकरांच्या केंद्रात आल्या आणि आम्हाला तुमच्या व्हरांडय़ात तरी जागा द्या, म्हणून हटून बसल्या. ज्योती पाटकरांना सुखद धक्का तेव्हा बसला जेव्हा त्यांना भारती मंगेशकरांचा कौतुकाचा आणि मदतीचं आश्वासन देणारा फोन आला.
एकूण सर्वच स्तरांतल्या वाचकांची प्रतिक्रिया बोलकी होती. ‘मदतीचा हात’ या लेखमालेने ज्येष्ठांच्या समस्यांचा ऊहापोह तर केलाच, परंतु त्यावर मार्गही सुचवले गेले. या लेखमालेने ज्येष्ठांकडे पाहाण्याचा सकारात्मक दृष्टिकोन  दिला आणि या क्षेत्रात घडणाऱ्या विधायक कार्याची नोंद घेतली याबद्दल काही ज्येष्ठांनीही ‘लोकसत्ता-चतुरंग’चे आभार मानले. मदत हवे असलेले खूप जण आहेत, पण मदत देणारेही खूप जण आहेत, हेच या सदराच्या निमित्ताने लक्षात आले. या सगळ्यांचे मनापासून आभार! (सदर समाप्त)
‘मदतीचा हात’ हे उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण सदर लिहिल्याबद्दल या सदराच्या लेखिका माधुरी ताम्हणे यांचे आयएलसी-आय या नामांकित सामाजिक संस्थेने ‘डॉ. शरदचंद्र गोखले पत्रकारिता पुरस्कार’ प्रदान करून कौतुक केले. त्यांचे अभिनंदन.