‘लोकसत्ता’तील तो लेख माझ्या आयुष्यात  टर्निग पॉइंट ठरला. लहानपणापासून मला लोकमान्यांबद्दल अतीव आदर होता व म्हणून मी लोकमान्यांचे चरित्र लिहावयाचे ठरविले.
अडतीस वर्षांची सचोटीने व जबाबदारीने सेवा बजावून मुंबई महानगरपालिकेच्या नोकरीतून १९८८ अखेर मी निवृत्त झालो. २५ फेब्रुवारी २००३चा दिवस. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या आवृत्तीत दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या प्राध्यापिका कल्पना साहनी यांनी असे लिहिले की, ‘आर्टिक होम इन द वेदाज’ या लोकमान्य टिळकांच्या ग्रंथातील निष्कर्ष हे वाङ्मयचौर्य आहे! या टीकेला अशोक जैन या ज्येष्ठ पत्रकाराने २० एप्रिल २००३ रोजी दैनिक ‘लोकसत्ता’च्या अंकात उत्तर दिले. हा लेख माझ्या आयुष्यात हा टर्निग पॉइंट ठरला. लहानपणापासून मला लोकमान्यांबद्दल अतीव आदर होता. पुण्याला खेप झाल्यास लोकमान्यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले नाही असे कधी घडले नाही. योगायोगाने तात्यासाहेब केळकरांनी लिहिलेले टिळकांचे त्रिखंडात्मक चरित्र माझ्या हाती आले व लोकमान्यांचे चरित्र लिहावयाचे ठरविले. एवढेच नव्हे तर १ ऑगस्ट २००४ रोजी पुस्तकाचे प्रकाशन करावयाचे निश्चित केले.
‘शोध बाळ-गोपाळांचा’ हे डॉ. य. दि. फडके यांचे पुस्तक माझ्यापाशी होतेच. प्रा. न. र. फाटक यांचे ‘लोकमान्य’ पुस्तक विकत घेतले व त्याचे सखोल वाचन केले. जानेवारी ते नोव्हेंबर या काळात प्रा. गं. प्र. प्रधान, श्री. गोविंद तळवळकर धरून जवळजवळ तीस पुस्तकांचे काही वरवर, तर काही सखोल वाचन केले, नोंदी घेतल्या व लिखाणाची पूर्वतयारी केली.
श्री. आप्पाजी विष्णू कुलकर्णी लोकमान्यांचे लेखनिक यांचे १९०९ सालचे ‘लोकमान्य टिळक यांची गेली आठ वर्षे’ हे जीर्ण झालेले ४४४ पृष्ठांचे पुस्तक वाचल्यावर कल्पना साहानी यांचा दावा किती गैर आहे याची खात्री पटवली.
माझ्या जन्मदिनी १४ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष लिखाणाला प्रारंभ केला व मे २००४ अखेर पूर्ण केले. ‘लोकोत्तर लोकमान्य टिळक’ हे पुस्तकाचे नाव आधीच निश्चित केले होते. पृष्ठसंख्या २००च्या आत व किंमतही जास्तीत जास्त रु. १५० हेही ठरवले होते. प्रस्तावना व प्रकरणांची शीर्षके लिखाणाला प्रारंभ करण्यापूर्वीच योजली होती. माझ्या परिचयाच्या माजी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांनी आनंदाने पुस्तकाला प्रस्तावना दिली. मधल्या काळात सतरा-आठरा ठिकाणी सभांतून पुस्तकात काय मांडणी करणार आहे यावर लोकांचा कौल घेतला. ‘कुटुंबवत्सल’ या प्रकरणाचे हस्तलिखित एका जाणकाराला वाचण्यासाठी दिले व त्याचा अनुकूल अभिप्राय मिळाल्यावर माझा उत्साह वाढला.
पुस्तकाचा प्रकाशन समारंभ १ ऑगस्टला ठाणे येथे सणासारखा भव्य प्रमाणात केला. वयोवृद्ध समाजवादी  दत्ताजी ताम्हणे अध्यक्षस्थानी होते. त्या दिवशी ८९ प्रतींची विक्री झाली. दैनिक वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके यांनी पुस्तकावर उत्तम अभिप्राय दिला. मला अर्थातच कृतार्थ झाल्यासारखे झाले! सत्तर पृष्ठांची भर घालून ‘अनघा प्रकाशन’ ठाणे यांनी फ्रेब्रुवारी २००७ मध्ये दुसरी आवृत्ती काढली. माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. पुस्तकाला ठाण्याच्या मराठी ग्रंथसंग्रहालयाने कै. वा. अ. रेगे पुरस्कार प्रदान केला.
नंतरच्या काळात सप्टेंबर २००८ मध्ये नोकरीतील अनुभवावर आधारित ‘पाऊले चालती वाट’ हे आत्मकथन पुस्तकरूपाने प्रकाशित केले. पुस्तकाला उत्तम प्रतिसाद मिळाला. ‘इन्स्पायरिंग’ असा अभिप्राय अनेकांकडून मिळाला. सामाजिक भान असलेल्या पतिपत्नी कसे आयुष्य व्यतीत करतात याचे वर्णन करणारी दीर्घकथा ‘मनासारखे’ पुस्तकरूपाने प्रकाशित केली. फेब्रुवारी २०१० मध्ये याही पुस्तकाला वाचकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. लोकमान्यांच्या स्मृतीला आदरांजली!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा