डॉ. अंजली जोशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जाडी, मोटी, गोलू, प्लस साइज.. ‘वजनदार’ मुलींना सतत वेगवेगळय़ा नावांनी टोमणे मारले जातात. अगदी त्यांच्या आईवडिलांकडूनही. त्यांना तर चिंता असते लेकीचं लग्न होईल की नाही याचीच! ‘त्या’ कुणा अनोळखी व्यक्तीसाठी मग अनेक जण तिला जाडेपणाचा ‘गिल्ट’ देतात. इतका, की तिला ना धड खाऊ देत, ना मनासारखे कपडे घालू देत. आपलं यश, कर्तृत्व आपल्या वजनापुढे कुणाला दिसतही नाही, हे कटू सत्य त्यांना मग विनोदाच्या मुखवटय़ाआड दडवावं लागतं..

‘‘श्रेया, ऊठ लवकर. जिममध्ये जायचंय ना?’’ आईची मोठय़ा आवाजातली हाक ऐकू आली.
माझे डोळे काही केल्या उघडेनात. गेला महिनाभर ऑफिसमध्ये वर्षांअखेरीच्या कामांची धावपळ होती. रोज यायला उशीर होत होता. आज इतक्या दिवसानंतर पहिली सुट्टी मिळाली होती, पण तिचाही उपभोग घेता येत नव्हता. आरामदायी गादीवरून उठणं जिवावर आलं होतं. माझे डोळे परत मिटले गेले.

‘‘श्रेया, किती वेळा उठवायचं?’’ आईनं पंखा बंद करत अंगावरचं पांघरूण ओढून काढलं. मी नाइलाजानं उठले. नको असतानाही समोरच्या आरशात स्वत:चं वाढलेलं वजन दिसलं. ऑफिसमध्ये दिवसभर बैठं काम. व्यायामाला वेळच मिळत नाही.
‘निदान सुट्टीच्या दिवशी तरी जिममध्ये जात जा!’ आईची भुणभुण चालू असते. आठवडय़ातून एकदा-दोनदा जाऊन खरंच कमी होईल का वजन? कॉलेजमध्ये असेपर्यंत नियमित व्यायाम करत होते. आतापर्यंत अनेक डॉक्टरांचे सल्ले झाले, डाएट्स झाली. एकदा तर उपासमारीनं चक्कर येऊन पडलेही होते! पण वजनाचा काटा कायम वाकुल्याच दाखवत राहतो! इतकं थोडं वजन कमी होतं, की ते कमी झालेलं कुणाच्या लक्षातही येत नाही. मग व्यायाम, डाएट सगळं सोडून द्यावंसं वाटतं! इतकं मन मारायचं आणि त्याचं चिमणीएवढं फळ!

जिममध्ये जात असताना वाटलं, की लहानपणापासूनच मी बाळसेदारच आहे. जाडेपणा म्हणजे काय तेही नक्की माहीत नव्हतं तेव्हा! पण रस्त्यावरून जाताना ‘जाडी’, ‘मोटी’, ‘टुणटुण’, अशा हाका दगड मारल्यासारख्या डोक्यावर आदळायच्या. आलेलं रडू आतल्या आत जिरवायला मी तेव्हापासूनच शिकले. ‘‘आताच एवढं वजन, तर पुढे काय होणार? मुलगा कसा पसंत करेल? लग्न झाल्यावर वजन वाढलं तर वेगळी गोष्ट आहे.’’ असे उद्गार नातेवाईकांकडे गेलं की नित्यनेमानं कानांवर पडायचे. ‘जरा कमी खात जा!’ हा तर हमखास दिला जाणारा सल्ला! जरा कुठे तळलेला पदार्थ उचलला, की मग प्रवचनांचा डोस चालू! मग त्यांच्याकडे काही खाण्याची इच्छाच मरून जायची. अजूनही इतरांबरोबर एकत्र खाणं मी शक्यतोवर टाळते. समोर चमचमीत पदार्थ असले की कॅलरीजच्या चर्चाना अगदी ऊत येतो. घरी आईबाबांचे तोफगोळे चालूच असतात- ‘चीज खाऊ नकोस, तेलकट खाऊ नकोस, हेल्दी फूड (थोडक्यात बेचव अन्न!) खा, तुझा पुरेसा व्यायाम होत नाही, तू इतक्या कॅलरीज् बर्न केल्या नाहीस..’ मी जेवणाचा किती ‘पोर्शन’ घेतला आहे, यावर आईची ‘काकदृष्टी’असते.

जिममध्ये पोहोचले. माझ्यासमोरच एक सडपातळ मुलगी व्यायाम करत होती. या बारकुडय़ांचं बरं आहे! व्यायाम किंवा डाएट केलं की फटाफट वजन कमी होतं! मीच कसलं पाप केलंय की लहानपणापासून गोलमटोल. यांना कसे कुठलेही कपडे घालता येतात.. नाहीतर मला! बहुतेक रेडीमेड कपडे तर होतच नाहीत, पण शिवून आणले, तरी डिझाईन सांगताना दहादा विचार करावा लागतो. नाहीतर ‘शोभत नसताना फॅशन करते,’ म्हणून वजनाबरोबर अधिकचे टोमणे बसतात! मला काय शोभेल हे इतर का ठरवणार? माझ्या आनंदासाठी मी फॅशनेबल कपडे घालू शकत नाही? तुम्हाला मला बघणं जड जात असेल तर डोळे मिटून घ्या. तसं झालं, तर माझी फार दिवसांची एक सुप्त इच्छाही पूर्ण करता येईल! मिनी स्कर्ट घालण्याची! या इच्छेचा दिवा मनात तेवत आहे. पण त्याची ज्योत दिवसेंदिवस क्षीण होत आहे. व्यायामामुळे आलेला घाम मी पुसला आणि कपडे बदलले. खूप घाम आला की वजन कमी होतं म्हणतात. मग मी का याला अपवाद कोण जाणे! माझं तर श्वासातून हवा घेतली तरी वजन वाढत असावं!

घरी आले तर आई स्वयंपाक करत होती. मी सकाळपासून काही खाल्लं नव्हतं. लगेच जेवायला बसले. पांढराशुभ्र आंबेमोहोर भात. त्याचा सुगंध घरभर दरवळत होता. माझी भूक खवळून उठली.‘‘श्रेया, कितीदा सांगितलंय की भात खाणं बंद कर म्हणून.. भात खातेस आणि वजन वाढत राहतं.’’ आईचे उद्गार तीक्ष्ण भात्यासारखे मनात घुसले. माझी प्रदीप्त झालेली भूक त्याक्षणी विझून गेली.
‘‘भातच कशाला, सगळं जेवणच बंद करते!’’ मी पानावरून उठले आणि बेडरूममध्ये जाऊन स्वत:ला गादीवर झोकून दिलं. सगळय़ा मनावर काळोखी पसरून आली होती. वजन.. वजन.. वजन.. मला दुसरी ओळखच नाही. श्रेया म्हणजे लठ्ठ, जाडी, प्लस साइज! सगळय़ांना टोमणे मारायला आयतं मिळालेलं एक सॉफ्ट टार्गेट. यापेक्षा माझ्यात दुसरं काहीच नाही? मी नृत्य चांगलं करू शकते, फोटो चांगले काढू शकते, माझं गणित चांगलं आहे, ऑफिसमधलं काम कार्यक्षमतेनं करते. पण या गुणांना काहीच किंमत नाही? माझ्या वजनापुढे ते फिके पडतात ना!
खोल दडलेली शाळेतली एक आठवण मनाच्या पृष्ठभागावर तरंगत आली. वार्षिक स्नेहसंमेलनाच्या एका नृत्यात मला भाग घ्यायचा होता. शिक्षकांनी माझी निवड केली खरी, पण रवानगी केली सर्वात शेवटच्या ओळीत. मी हिरमुसले. ‘मला पुढच्या ओळीत यायचंय..’ असं मला सांगायचं होतं, पण ते ओठांबाहेर आलंच नाही. कारण तेवढय़ात मी कुणालातरी बोलताना ऐकलं, ‘‘श्रेयाला पहिल्या ओळीत घेतलं तर ते किती विनोदी होईल ना! म्हणजे प्रेक्षक टाळय़ा वाजवण्याऐवजी खो-खो हसत सुटतील.’’
‘‘तू नाटकात का नाही जात? विनोदी भूमिका तू छान करशील!’’ माझा पडलेला चेहरा बघून बहुधा शिक्षिका म्हणाल्या असाव्यात. पण त्यामुळे मी जास्तच दुखावली गेले. लठ्ठ माणसं म्हणजे फक्त विनोदी भूमिका करणारी, मूर्खपणा करणारी, फजिती होणारी, आळशी, मंद, बेशिस्त असतात हे कुणी ठरवलं?
परवा घडलेला ट्रेनमधला प्रसंग- दोन बायका आपसात गप्पा मारत होत्या. मी दृष्टीस पडले आणि मग माझ्याकडे कटाक्ष टाकत त्यातली एक दुसरीला म्हणाली, ‘‘हल्ली बघ ना, तरुण वयातच मुली किती लठ्ठ असतात!’’

‘‘लहानपणापासून फास्ट फूड खाल्ल्यावर काय होणार?’’ दुसरी तिला दुजोरा देत होती. अस्सा राग आला! ‘लठ्ठपणा म्हणजे फास्ट फूड’ हे समीकरण लोकांच्या डोक्यात किती घट्ट बसलंय. जणू काही मी जन्माला आल्यानंतर आईच्या दुधाऐवजी फास्ट फूडच खात होते! पण किती जणांना थांबवणार? अनोळखी माणसांनाही आपल्यातलं इतर काही न दिसता फक्त वजन दिसतं, यापेक्षा वेदनादायी काय असू शकेल?
दुपारी चहा घेताना आई म्हणाली, ‘‘श्रेया, आम्ही वजनावरून मागे लागतो, ते तुला आवडत नाही. पण बीपी, थायरॉइड, सांधेदुखी, असले आजार लवकर, या वयात मागे लागू नयेत म्हणून सांगतो आम्ही. आमची काळजी लक्षात घे.’’
मी काहीच बोलले नाही. उठून वॉकला निघाले. मी जवळच्याच पार्कमध्ये चालायला जाते. तिथे मोठा वॉकिंग ट्रॅक आहे.
मला माहितीय, आईबाबांना खरी काळजी आहे ती लग्नासाठी मला कुणी मुलगा पसंत करणार नाही याची. ते असे बोलतात, की जणू मला वजनाची फिकीरच नाही! मला किती भोगावं लागतं हे त्यांना कळणारच नाही. लग्न तर सोडूनच द्या, पण डेटिंग करायलाही कुणी मुलं पुढे येत नाहीत. ते तुमचे जिवलग मित्र होतील, पण प्रियकर नाही होत. आपली प्रेयसी लठ्ठ आहे हे इतरांना सांगणं त्यांना जड जातं ना! आपण प्रेमाला उगाचंच उदात्त रूप देऊन ठेवलंय. म्हणे मनाच्या तारा जुळल्या की प्रेम होतं. खरं असं आहे, की प्रेम गुणांच्या वजनावर नव्हे तर शरीराच्या वजनावर तोललं जातं. कुठल्याही मुलाला माझा स्वभाव, माझे गुण यांच्याशी देणंघेणं नाहीये. देणंघेणं आहे ते फक्त वजनाशी!

पार्कमधल्या फेऱ्या संपल्या आणि मी बाहेर पडले. एका खमंग, चमचमीत, परिचित वासानं माझी घ्राणेंद्रियं फुलून आली. नकळत पावलं त्या दिशेनं वळली. कोपऱ्यावरच्या बटाटेवडेवाल्याकडे गरमागरम वडे खाण्यासाठी गर्दी उसळली होती. कितीतरी महिन्यांत मी वडा खाल्ला नव्हता. हे सगळे लोक किती मनसोक्त हादडताहेत! पण यांना नाही कुणी वजनात तोलत. मी काय घोडं मारलंय? मी का सतत खाताना ‘गिल्ट’ बाळगायचा? कायम पालापाचोळा खात राहायचं? कोण कुठला अनोळखी मुलगा, तो म्हणे मला पसंत करणार नाही, म्हणून मन मारून जीवन जगायचं? तो मुलगा प्रत्यक्षात अस्तित्वात आहे का नाही हेही माहीत नसताना? होऊ दे काय व्हायचा तो आजार! झालाच तर निदान खाण्याची इच्छा पूर्ण झाल्याचं तरी समाधान मिळेल! मी वडे विकत घेतले. अहाहा! त्याचा तुकडा जिभेवर ठेवल्याक्षणी ब्रह्मानंदी टाळी लागली.
‘‘हाय गोलू! काय म्हणतेस?’’ संजूच्या परिचित आवाजानं माझी तंद्री भंग पावली. संजू माझ्या कॉलेजच्या ग्रुपमधला. माझं खरं नाव सगळे विसरूनच गेले आहेत.

‘‘हे तुझं आवडतं बुवा आपल्याला! वजनाची फिकीर न बाळगता बिनधास्त खात असतेस.’’ तो म्हणाला.
‘‘अरे, तुला माझं ब्रीदवाक्य माहीत नाही? जगण्यासाठी खायचं नसतं, खाण्यासाठी जगायचं!’’ मी म्हटलं. यावर तो खो-खो हसला.
माझं मन आतमध्ये आक्रंदत होतं. मला नोकरी लागलीय, ती कशी चाललीय, यातल्या कशाचीही दखल घ्यावीशी संजूला वाटली नाही. त्यालाही माझं फक्त वजनच दिसलं होतं. त्याचा निरोप घेऊन निघाले, तेव्हा तोंडातली वडय़ांची चव कडू झाली होती. आता मला कळलं, की लठ्ठ माणसं विनोदी का होतात ते! बाहेरच्या जगातली माणसं त्यांना इतकं टोचतात, की ती जखम विसरण्यासाठी ती विनोदाचा मुखवटा पांघरतात आणि प्रत्येक टोचीनं उडालेल्या आत्मविश्वासाच्या चिंधडय़ा त्यामागे लपवतात.

घरी आले, तर बाबा उत्साहानं सांगू लागले, ‘‘श्रेया, एका नवीन डॉक्टरची माहिती कळलीय. एका महिन्यात दहा किलो वजन खात्रीनं कमी होतं.’’ ‘‘..आणि तसं झालं नाही तर फी परतही देतात.’’ आई म्हणाली.
‘‘नीट चौकशी केलीत ना? नाहीतर झपाटय़ानं कमी होईल- वजन नव्हे, पैसे!’’ माझ्या बोलण्यावर आईबाबा हसले.
मी मनातल्या मनात हसरा मुखवटा काढून ठेवला आणि स्वत:शी म्हटलं, ‘‘माझ्या या अवाढव्य देहामागे एक माणूस आहे. या माणसाला एक मन आहे. ते कुणाला दिसण्याची आणि ते जाणून घेण्याचा कुणी प्रयत्न करेल का, याची मी वाट बघतेय!’’