‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ अर्थात ‘आर्टिफिशल इन्टेलिजन्स’ हे मानवी बुद्धिमत्तेला पर्याय नसून मानवी निर्णय सक्षम करण्याचे एक साधन आहे. आज कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात पुरुषांचे वर्चस्व आहे. भारतात या क्षेत्रात केवळ २२ टक्के स्त्रिया कार्यरत आहेत. भविष्यकाळात स्त्रियांचा कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात सहभाग वाढला तर या क्षेत्रातील नवीन शोध आणि विकास केवळ या क्षेत्रावरच नाही तर संपूर्ण समाजावर सकारात्मक परिणाम करेल. म्हणूनच स्त्रियांनीही मोठ्या प्रमाणावर या क्षेत्रात येणे ही काळाची गरज आहे. ‘रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठा’च्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांचा खास लेख.
गणक माणसांसारखा विचार करू शकेल का? सात दशकांपूर्वी सुरू झालेल्या या संशोधनातून ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (Artificial Intelligence-एआय) ही संकल्पना जगासमोर आली. मानवी बुद्धीला पूरक कार्य करण्यास व निर्णयक्षमता वाढविण्यास याची मदत होऊ लागली. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ हे आता केवळ तांत्रिक साधन नसून त्याने व्यावसायिक जगात एक क्रांती घडवून आणली आहे आणि म्हणूनच आज ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ व्यवसायात स्त्रियांनीही मोठ्या प्रमाणात सहभागी होणे ही काळाची गरज आहे.
१९९०च्या दशकात ‘वर्ल्ड वाइड वेब’, संगणकीय मायाजालाने जागतिक स्तरावर तंत्रज्ञानाला सर्वांपर्यंत पोहोचवले, तर एकविसाच्या शतकाच्या सुरुवातीस ‘स्मार्टफोन’द्वारे माहिती व तंत्रज्ञान तळहातावर आले. या शतकातील पहिल्या दशकात ‘क्लाऊड कॉम्प्युटिंग’मुळे ‘डेटा प्रोसेसिंग’ व ‘स्टोरेज’ अगदी कधीही आणि कोठूनही सहज शक्य झाले. मानवी बुद्धीच्या पलीकडे जात अगदी सखोल संशोधन करीत ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’ने डेटा (Data) मधील सूक्ष्मतम ‘पॅटर्न रेकग्निशन’ करून प्रभावीरीत्या निष्कर्ष काढण्याच्या क्षमतेने हे साध्य केले आहे. ‘डेटा’आधारे निष्कर्षाचं महत्त्व वाढण्याचे कारण म्हणजे २००३पर्यंत जेवढा ‘डेटा’निर्माण झाला होता, तेवढा ‘डेटा’ तर आज दोन दिवसांतच तयार होतो. २०२२ मध्ये नव्याने आलेल्या ‘जनरेटिव्ह एआय’चा पहिल्या पाच दिवसांतच १० लक्ष लोकांनी ‘चॅटजीपीटी’ (ChatGPT) सारख्या साधनांचा उपयोग केला. आता याचा समावेश दैनंदिन जीवनात झालेला दिसत आहे.
‘कृत्रिम बुद्धिमत्ते’तील दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे ‘प्रेडिक्टिव्ह एआय’. अनेक रेडियोलॉजिस्ट याचा वापर करून ‘एक्सरे’ व ‘एमआरआय’ आधारित निदानासाठी मानवी बुद्धीसोबतच ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’च्या उपयोगाने अचूक निर्णय घेतात. हे मानवी निर्णय सक्षम करण्याचे एक साधन आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेची उपयोगिता अर्थव्यवस्थेतसुद्धा दिसून येते. शेअर बाजारात ‘ट्रेडिंग’ करताना याच्या वापराने ५८ टक्के चुका कमी झाल्याचे दिसून आले असून ४०० टक्क्यांनी गती वाढल्याचे दिसून येत आहे. शिक्षण क्षेत्रातसुद्धा ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’ने आपला ठसा उमटवलेला आहे. विद्यार्थ्यांच्या क्षमतेवर व प्राप्त कौशल्यावर आधारित, त्याच्या बुद्धीला झेपणारे शैक्षणिक धडे देण्याची अभूतपूर्व क्षमता यात आहे व त्याचा उपयोग करून शिक्षक आपली शिकविण्याची पद्धत व गती ठरवू शकतो. स्मार्ट उत्पादनामध्ये (Manufacturing) एखादे मशीन बंद पडण्याच्या आधीच सांख्यिकीय माहिती व अंदाज करून दुरुस्ती करता येऊ शकते, हा ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’चा मोठा उपयोग आहे.
स्त्रियांनी अधिकाधिक संख्येने पुढे येऊन आपला ठसा या क्षेत्रातदेखील उमटवायला हवा आहे. आज ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’च्या क्षेत्रात असलेले संशोधक, तंत्रज्ञ व वापरकर्त्यांमध्ये पुरुष-स्त्री यांच्या प्रमाणात मोठी तफावत दिसत आहे. या क्षेत्रामधील संधींविषयी स्त्रियांना योग्य मार्गदर्शन करून शिक्षण, प्रशिक्षण उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. जेणे करून ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’च्या क्षेत्रातील पुरुष-स्त्री दरी हळूहळू कमी होऊ शकेल.
‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या २०२४च्या अहवालानुसार, जागतिक स्तरावर ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ आणि ‘बिग डेटा’ व्यवसायात केवळ ३० टक्के स्त्रिया आहेत, तर भारतात हा आकडा केवळ २२ टक्के आहे. तसेच, STEM (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित) क्षेत्रांमध्ये स्त्रियांची हिस्सेदारी २०१५ मध्ये २४.४ टक्के होती, जी २०२४मध्ये २७ टक्क्यांवर पोहोचली आहे. तरीही, या क्षेत्रातील स्त्रियांचा सहभाग वाढवण्याची नितांत गरज आहे. भविष्यात स्त्रियांचा कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात वाढता सहभाग, या क्षेत्राच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलणार आहे, यात शंका नाही. मात्र त्याच वेळी काही प्रश्नही उपस्थित होत आहेत. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ ही स्त्रियांसारखे कार्य करू शकेल का? या प्रणालीने स्त्रियांच्या विचार करण्याच्या आणि निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनाविषयी पुरेसे ज्ञान अवगत केले आहे का? आपण, ही प्रणाली निष्पक्ष आणि वस्तुनिष्ठ राहील आणि समाजातील स्त्रियांविषयी असलेले पूर्वग्रह वाढवणार नाहीत, अशी अपेक्षा करू शकतो का?
आजच्या ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ प्रणाली या मुख्यत: पुरुषप्रधान क्षेत्राच्या प्रभावाखाली आहेत. ‘अल्गोरिदम डिझाइन’ (Algorithm design) आणि ‘मॉडेल प्रशिक्षणा’च्या सर्व स्तरांवर स्त्रियांचा अधिक सहभाग तसेच प्रणालींच्या निरीक्षण, मूल्यमापन आणि अभिप्राय प्रक्रियेत सक्रिय सहभाग हेच हा समतोल निश्चित करण्याचे प्रभावी उपाय आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, मानवी भावना व विचार करण्याच्या पद्धतीचे अनुकरण करण्याचे मार्ग शोधण्याचा प्रयत्न करते आहे. आरोग्य, सेवा, वित्त, शिक्षण आणि मनोरंजन यांसारख्या विविध क्षेत्रांवर प्रभाव टाकत आहे. त्यामुळे या प्रभावाचा स्त्रियांवर होणारा संभाव्य परिणाम तपासणे आवश्यक आहे.
‘कृत्रिम बुद्धिमत्ते’च्या आधुनिक पिढीतील मॉडेल्सची ताकद त्यांच्या प्रचंड ‘डिजिटल डेटा’मधील विश्लेषण क्षमतेत आहे. याच बरोबर, या प्रणालींची निर्माण क्षमता ही खरी उत्सुकता निर्माण करणारी आहे. कृत्रिमरीत्या तयार केलेले व्हिडीओ, साहित्य आणि चित्रे पाहिल्यानंतर आपण आता अशा युगात आलो आहोत, जिथे आपण केवळ आदेश देऊन जटिल कार्ये विनासायास पार पाडण्याची अपेक्षा करू शकतो आणि हे ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ वापरणारे त्याची अंमलबजावणीही करू शकतात. तंत्रज्ञानाच्या वापरकर्त्यावरच त्याचा योग्य किंवा अनिष्ट परिणाम अवलंबून असतो. यातच स्त्रियांनी याचे प्रशिक्षण घेणे का आवश्यक आहे? व त्यांच्या या क्षेत्रातील सहभागाने काय साध्य होणार आहे?, याची अंशत: उत्तरे दडलेली आहेत.
आज या क्षेत्रात पुरुषांचे वर्चस्व आहे. ज्या अल्गोरिदमच्या आधारे ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’वर आधारित उत्पादने व सेवा तयार होत आहेत. त्यात पुरुषप्रधान भावनांचा प्रभाव दिसत आहे. भविष्यातील या प्रणालींमध्ये संवेदनशीलता कायम राहावी यासाठी समावेशक डिझाइनवर भर द्यायला हवा. त्यामुळे या प्रणालींमधून निर्माण होणाऱ्या निर्णयांमध्ये आणि शिफारसींमध्ये भेदाभेद नसलेली संवेदनशीलता प्रतिबिंबित होईल.
‘कृत्रिम बुद्धिमत्ते’त समाजातील सर्व स्तरांतील स्त्रियांचा समावेश करण्यासाठी आणि विविध निर्णय प्रक्रियांमधील सहभाग अधोरेखित करण्याची नितांत गरज आहे. हे फक्त तेव्हाच शक्य होईल जेव्हा अधिक स्त्रियांचा समावेश हा क्षेत्राच्या सर्व टप्प्यातील डिझाइन, विकास, अंमलबजावणी आणि संशोधनात होईल.
‘कृत्रिम बुद्धिमत्ते’तील कौशल्यांमध्ये स्त्रियांच्या प्रवेशाबाबत, ‘स्टॅनफोर्ड कृत्रिम बुद्धिमत्ता इंडेक्स’ २०२४नुसार, भारत (१.७) प्रवेश दरासह आघाडीवर आहे. त्यानंतर अमेरिका (१.२) आणि इस्रायल (०.९) यांचा क्रमांक लागतो. ‘नॅसकॉम’च्या (National Association of Software and Service Companies) अहवालानुसार, भारतीय स्त्रियांमध्ये ‘जनरेटिव्ह कृत्रिम बुद्धिमत्ता’ उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा आहे. मात्र प्रत्यक्ष कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये स्त्रियांचा सहभाग तुलनेने कमी आहे. हा सहभाग वाढवण्याच्या ठोस प्रयत्नांतून आरोग्य, सेवा, कृषी आणि शिक्षणासाठी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ सक्षम उपाय तयार करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना चालना मिळून ते शाश्वत आणि ‘स्मार्ट’ जीवनशैलीसाठी सहायक ठरतील. या उद्दिष्टासाठी अधिकाधिक स्त्रियांनी तंत्रज्ञान क्षेत्राच्या आघाडीवर राहणे, नेतृत्व करणे आणि निर्णय प्रक्रियेचा भाग होणे आवश्यक आहे.
‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ मॉडेल्सनी खास करून गोपनीयता, पारदर्शकता आणि जबाबदारीच्या बाबतीत अनेक नैतिक प्रश्न उपस्थित केले आहेत. मोठ्या प्रमाणावर ‘डेटा’ गोळा करून ही प्रणाली विकसित करताना ‘कॉपीराइट’ केलेल्या सामग्रीचा वापर हा सर्वाधिक चर्चेचा मुद्दा राहिला आहे. नुकत्याच एक ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’वर आधारित ‘रिक्रुटमेंट बॉट’ हे लिंगनिरपेक्ष नसल्याचे आढळल्याने थांबवण्यात आले. इतिहासाचे अवलोकन केल्यास, नैतिकता आणि मानवाधिकार क्षेत्रात स्त्रियांचे मोठे योगदान दिसून येते. त्यांचे दृष्टिकोन या क्षेत्रात महत्त्वाचे ठरू शकतात. स्त्री संशोधक आणि धोरणकर्त्यांनी याच्या नियमनासाठी पुढाकार घेतला पाहिजे, जेणेकरून स्त्री-पुरुषात ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’वरील प्रभावाचा भेदभाव टळेल व ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ नैतिकतेच्या चौकटीत विकसित करता येईल. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ प्रणाली ‘डेटा’वर आधारित निर्णय घेतात आणि जर तो ‘डेटा’ पूर्वग्रहयुक्त असेल, तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. जगाला स्त्रियांच्या कौशल्ये, कल्पनाशक्ती आणि सकारात्मक दृष्टिकोनांची आवश्यकता आहे.
स्त्रिया त्यांच्या सहानुभूती, उत्कृष्ट संवाद कौशल्ये आणि सखोल विचार करण्याच्या मूलभूत क्षमतेमुळे ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ प्रणाली डिझाइन आणि विकास प्रक्रियेत वेगळा दृष्टिकोन आणू शकतात. ‘डेलॉईट’च्या ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ आणि ‘मशीन लर्निंग’ क्षेत्रात कार्यरत स्त्रियांवरील सर्वेक्षणानुसार, ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ क्षेत्रात अधिक स्त्रियांचा सहभाग असणे, म्हणजे प्रणालींच्या डिझाइन आणि कार्यक्षमतेत सुधारणा होणे आणि अधिक विविधतापूर्ण कार्यसंस्कृती असणे ही आजच्या काळाची गरज आहे.
जागतिक स्तरावर स्त्री-पुरुष समानता साध्य होण्यासाठी अजूनही काही कालावधी लागू शकतो. जगभरात पुरुष- स्त्रियांमधील विभाजनाची दरी कमी करण्याच्या दृष्टिकोनातून अनेक उपक्रम योजिले जात आहेत. रोजगाराचा महिला सक्षमीकरणाशी अतूट संबंध आहे. त्यांच्यासाठी अधिक संधी निर्माण करणे आवश्यक आहे, जिथे त्या एकमेकींशी संवाद करू शकतील, शिकू शकतील आणि विकसित होऊ शकतील. त्यांना हेही समजणे गरजेचे आहे की, ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ क्षेत्रात प्रवेश करणे तितकेसे कठीण नाही जितके ते समजले जाते. स्त्रियांना ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ क्षेत्रामध्ये अधिक सक्रिय सहभाग घ्यावा लागेल.
भारताचे २०४७ पर्यंत ३० ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेसह विकसित राष्ट्र बनण्याचे ध्येय आहे. ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’तील कौशल्य हे भारतात सर्वाधिक आहे. कोणत्याही देशाचा आर्थिक विकास हा तिथल्या लोकांवर अवलंबून असतो, आणि भारताची ४९ टक्के लोकसंख्या ही स्त्रियांची आहे. त्यामुळे स्त्रियांना आर्थिक विकासाच्या एक समान भागीदार बनविण्यासाठी जास्तीत जास्त स्त्रियांनी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ तंत्रज्ञान आत्मसात करण्याची, यासाठी शासन व शैक्षणिक संस्था, उद्याोग क्षेत्र करत असलेल्या प्रयत्नांमध्ये सक्रिय सहभाग व नेतृत्व करणे हीच काळाची गरज आहे.
apoorva.palkar@gmail.com