प्रशांत कुलकर्णी

‘‘देशाटनात निसर्गमैत्री आणि विविध संग्रहालयं बघणं मला फार महत्त्वाचं वाटतं. नेपाळच्या चितवन जंगलात गेंडय़ाशी समोरासमोर झालेली भेट भीतीनं गठाळून टाकते, व्हॅन गॉगची चित्रं पाहताना त्याच्याशी प्रत्यक्ष बोलण्याचा अनुभव घेता येतो आणि शेकडो वर्षांपूर्वीची व्यंगचित्रं, कॅरिकेचर्स पाहताना नवं काही तरी सुचतं. हे सर्व अनुभव आगळेवेगळे..’’

Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Nikki Giovanni
व्यक्तिवेध : निक्की जियोव्हानी
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
Maharashtrachi Hasyajatra fame prasad khandekar Namrata sambherao shivali parab onkar raut new drama thet tumchya gharatun coming soon
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांचं नवं नाटक लवकरच रंगभूमीवर; नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकरसह दिसतील ‘हे’ कलाकार
Loksatta natyrang  Personality Suryacha Pille Three act play Directed
नाट्यरंग: सूर्याची पिल्ले; वटवृक्षावरील बांडगुळांची अर्कचित्रात्मक शोकांतिका
scooter caught fire man urinated on it crazy video viral on social media
त्याने पॅंटची चेन उघडली अन्…, स्कूटरने पेट घेताच तरुणांनी काय केलं पाहा, VIDEO पाहून कपाळावर माराल हात
pushpa in Kolhapur
कोल्हापुरच्या रस्त्यावर फिरतोय पुष्पा! चिमुकले घाबरले तर मोठ्यांनी काढली सेल्फी, पाहा VIRAL VIDEO

परदेशातल्या पर्यटनाचा तो पहिलाच आठवडा होता. देश ऑस्ट्रेलिया. एके दिवशी चिरंजीवाने जाहीर केलं, ‘‘बाबा, उद्या तुझी एक इच्छा पूर्ण होणार आहे!’’ त्यानं लॅपटॉपवर कसलं तरी बुकिंग करून झाल्यावर आळस देत उद्घोषणा केली. त्याच्या बाबाने यथाशक्ती मुलांच्या इच्छा पूर्ण केल्यावर आता परतफेड करण्याची जबाबदारी आपली आहे, असं समजून त्यानं ती घोषणा केली असणार. माझ्या मनातल्या या इच्छेची मलाच काही कल्पना नसल्यामुळे दुसऱ्या दिवशी दुपारी ४ वाजता आम्ही दोघं निमूटपणे आणि असीम, आदिती ही दोन्ही मुलं अखंड बडबडत असे सुसाट वेगानं कुठे तरी निघालो. अर्ध्या तासाच्या अंतरानं एका मैदानाजवळच्या ऑफिसपाशी पोहोचलो. केव्हा तरी एकदा, एखाद्या सिनेमाच्या प्रेमात पडून मी अजाणतेपणे एक इच्छा पुटपुटत व्यक्त केली होती. तो सिनेमा होता ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ आणि ते पुटपुटणं होतं ‘मलाही एक दिवस स्काय डायिव्हग करायला आवडेल!’ त्या मैदानाजवळचं ऑफिस होतं स्काय डायिव्हगची नोंदणी करणारं. बाहेर त्याचा बोर्ड वाचल्यावर माझ्या पोटात एकदम गोळाच आला. मी आणि बायको वर्षां दोघांनी कसंनुसं हसत त्या अनुभवाला सामोरं जायचं ठरवलं. तिथे बऱ्यापैकी गर्दी होती. स्काय डायिव्हग करण्यासाठी चक्क एका भिशीतल्या दहा-पंधरा मध्यमवयीन ऑस्ट्रेलियन बायकाही आल्या होत्या, हे कळल्यावर आमची भीती हळूहळू कमी झाली. दर अर्ध्या तासानं बारा लोकांना घेऊन एक बस निघायची. वेळ आल्यावर आम्हीही बसमध्ये बसलो आणि अज्ञाताच्या प्रवासाकडे वाटचाल सुरू झालीय असं वाटू लागलं!

अर्ध्या तासानं एका छोटय़ा विमानतळावर उतरलो. अनेक स्टीलचे हूक असलेलं जॅकेट आम्ही घातलेलं होतं. प्रत्येकाबरोबर उडी मारणारा एक निष्णात ‘डायव्हर’ दिला होता. विमानात बसल्यावर त्याच्या आणि माझ्या जॅकेटच्या कडय़ा त्यानं एकमेकांत अडकवल्या आणि काही जुजबी सूचना दिल्या. विमान बऱ्यापैकी उंचावर पोहोचलं. दरवाजा उघडला आणि अति थंड हवेचा झोत आतमध्ये आला. अर्थात आम्ही भीतीनं आधीच गोठून गेलो होतो! डायव्हर सूचनेनुसार मी दरवाजापाशी पोहोचलो आणि डायव्हरनं अक्षरश: मला बाहेर ढकलून दिलं. प्रचंड उलथापालथ झाली आणि वजनविरहित अवस्था म्हणजे नेमकं काय हे त्या वेळी कळलं. पांढरेशुभ्र ढग आजूबाजूला होते. त्यातून कोलांटउडय़ा खात माझा अधोगतीनं प्रवास सुरू होता! काहीच कळत नव्हतं. अशी अनेक युगं लोटली असावीत. अचानक एक हिसका बसला आणि कळलं की डायव्हरचं पॅरॅशूट उघडलं. खाली जाणाऱ्या गतीला थोडा अटकाव बसला. स्थैर्य आलं. (आयुष्यात स्थैर्याला महत्त्व का आहे हे तेव्हा कळलं!) आम्ही हळूहळू खाली येत होतो. निळा समुद्र, हिरवे डोंगर, राखाडी रस्ते आणि पांढरी घरं असं विहंगम, अभूतपूर्व दृश्य हळूहळू दिसू लागलं. चार-पाच मिनिटांच्या गोल गोल गिरक्यांनंतर अखेरीस पाय जमिनीला टेकले आणि पाय जमिनीला लागलेत याचा आनंद गगनात मावेना!

असाच एक प्रसंग नेपाळमधला. ‘अन्नपूर्णा बेस कॅम्प’च्या ट्रेकला आम्ही गेलो होतो. परतीचा प्रवास होता. दुपारच्या वेळेस एका डोंगराच्या माथ्यावर जेवणासाठी थांबलो. अचानक गडगडाटाला सुरुवात झाली आणि विजा चमकू लागल्या. त्याचं प्रमाण हळूहळू इतकं वाढलं, की सगळेच भीतीनं गठाळून गेले. आमच्यातला संवाद पूर्णपणे थांबला. केव्हाही आमच्यावरच वीज कोसळेल अशी अवस्था होती. वाकडातिकडा पाऊस, ढगांचा गडगडाट आणि विजांचा चमचमाट असं चित्र. अचानक प्रचंड कानठळय़ा बसवणारा आवाज आला आणि समोर पन्नास फुटांवर एका झाडावर वीज कोसळली. त्या पावसातही झाड जळायला लागलं. सुदैवानं त्यानंतर पंधरा-वीस मिनिटांत सारं एकदम शांत झालं. आम्ही सगळे त्या अनुभवानं सुन्न झालो होतो. प्रचंड आवाज करत आमच्यासमोर ती वीज कोसळणं हे निसर्गाच्या रौद्ररूपाचं अनोखं दर्शन होतं.

  काही देशांत अतिप्रचंड अशा वैभवाचं दर्शन झालं. रशियात सेंट पीटर्सबर्गपासच्या पुष्किनजवळ एक अवाढव्य राजवाडा पाहायला गेलो. त्या राजवाडय़ातल्या एका मेजवानीच्या हॉलमध्ये बहुतेक भिंती सोन्यानं मढवलेल्या होत्या. कित्येक टन सोनं त्यासाठी वापरलं गेलं होतं. विशेष म्हणजे हा राजवाडा दुसऱ्या महायुद्धात जर्मनीच्या विमानांनी बॉम्बफेक करून उद्ध्वस्त केला होता आणि त्यानंतर त्या सैनिकांनी तो लुटला होता. तत्कालीन वृत्तपत्रांची तशी कात्रणं आणि छायाचित्रं राजवाडय़ाच्या तळमजल्यावर लावली आहेत. महायुद्ध संपल्यावर रशिया महासत्ता झाली. त्यांनी शेकडो कोटी रुपये खर्च करून या राजवाडय़ाचं संपूर्ण नूतनीकरण केलं. तो जसाच्या तसा पुन्हा उभा केला. चोरीला गेलेल्या अनेक किमती वस्तू अनेक देशांतून परत मिळवल्या. हे काम कित्येक वर्ष सुरू होतं आणि अजूनही थोडं फार सुरू आहे. वैभवाचं दर्शन, पुन्हा सगळं पूर्वीसारखं उभं करण्याची जिद्द आणि आपला वारसा कटाक्षानं जपून ठेवण्याची तीव्र इच्छा याचं दर्शन तिथे झालं.

  तसाच वेगळय़ा प्रकारचा वैभवी अनुभव लंडनमधला. लिओनार्दो द िवची या अजरामर चित्रकाराच्या पाचशेव्या पुण्यतिथीनिमित्त राणीच्या संग्रहालयात असलेल्या त्याच्या निवडक मूळ चित्रांचं प्रदर्शन पाहण्याचा भाग्ययोग आम्हाला तिथे आला. पाचशे वर्षांपूर्वीची जगातल्या एका महान कलावंताची ती मूळ स्केचेस पाहणं हेही एक वैभवच आणि ते तसंच कटाक्षानं जपून ठेवलेलं. कुठल्याही कलाप्रेमी माणसासाठी तो प्रसंग रोमांचकारी म्हणावा लागेल. प्रदर्शनातलं एक चित्र मोठं विलक्षण वाटलं. कारण ते एका व्यक्तीचं ‘कॅरिकेचर’ म्हणजे अर्कचित्र होतं. याचा अर्थ इतकाच, की पाचशे वर्षांपूर्वीही एखाद्या व्यक्तीचं विनोदी स्वरूपातलं रेखाचित्र काढण्याची पद्धत होती. व्यंगचित्रकला अशी अधूनमधून अवचितपणे भेटत असते.

    फुटबॉल विश्वचषक पाहण्यासाठी मॉस्कोमध्ये गेलो होतो. सामना पाहून झाल्यावर तिथल्या क्रेमलिनजवळच्या ‘रेड स्क्वेअर’मध्ये भल्यामोठय़ा मोकळय़ा जागेत निवांत बसलो होतो. अक्षरश: हजारो पर्यटक तिथे निवांतपणे फिरत होते, गप्पा मारत बसले होते. अचानक कुठून तरी एक फुटबॉल आला आणि पाठोपाठ एक किशोरवयीन मुलगा. त्यानं आजूबाजूला ‘फुटबॉल खेळणार का?’ असं मोडक्या- तोडक्या इंग्रजीत विचारलं. त्याच्याच वयाची दहा-बारा मुलं जमा झाली. त्यांपैकी कुणीच कुणाला ओळखत नव्हतं. एकमेकांची भाषा येत नव्हती, देश माहीत नव्हता. एकच भाषा माहिती होती, ती म्हणजे फुटबॉलची! क्षणात दोन्ही बाजूला बॅग्ज ठेवल्या गेल्या आणि ‘गोलपोस्ट’ तयार झाले. चार-पाच मुलांचे दोन संघ तासभर मनसोक्त खेळू लागले. खेळाची वैश्विक ताकद तिथे दिसली. खेळ हा प्रामुख्यानं दोन संघांमध्ये, प्रदेशांमध्ये किंवा देशांमध्ये सौहार्दाचं वातावरण तयार करण्यासाठी असतो याची प्रचीती आली. विश्वचषकाचं अनौपचारिक लघुरूपच जणू!  तो अद्भुत अनुभव अविस्मरणीय!

   नेपाळमधल्या चितवन जंगलात आमची पदभ्रमंती होती, तेव्हाची आठवण- बरोबर दोन गाईड होते. गेंडे, हत्ती वगैरे या जंगलात फिरत असतात; पण आपण अर्थातच त्यांच्यापासून आणि ते आपल्यापासून दूर राहणार याची खात्री त्यांनी दिली होती. हळूहळू गेंडय़ांच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा गाईडनं दाखवायला सुरुवात केली. आम्ही बऱ्यापैकी घनदाट जंगलात शिरलो होतो. एका बाजूला वळून त्यांनी आम्हाला सावकाश पुढे यायला सांगितलं. काहीही न बोलता दबकत दबकत पुढे आलो. एका मोठय़ा खड्डय़ात, थोडय़ाशा पाणथळ जागी एक छोटा गेंडा खेळत होता. आम्ही कुतूहलानं त्याच्याकडे पाहात होतो. कुणी पाऊलही वाजवू नका, असं बजावल्यामुळे सगळय़ांनी श्वास रोखून धरले होते. पाचोळय़ावर खसखस आवाज झाला म्हणून आम्ही त्रासिकपणे मागे पाहिलं, तर २५ फुटांवर एक गेंडा आमच्याकडेच पाहात होता. (ती अर्थातच गेंडामाता होती. अनाहूत पाहुण्यांमुळे गोंधळून गेली असावी.) गाईडच्या ते लक्षात आलं आणि आमची भीतीनं गाळण उडायच्या आत त्यानं आम्हाला विजेच्या वेगानं बाहेर काढलं.  बाहेर आल्यावरच आम्हाला घाबरायला सांगितलं! अन्यथा पुत्रप्रेमापोटी त्या मातेनं आमचा क्षणात चेंदामेंदा केला असता.    

  व्यंगचित्र हा तर माझा अत्यंत जिव्हाळय़ाचा विषय. कुठेही गेलो की त्या दृष्टीनं नजर भिरभिरत असतेच. ‘टिनटिन’ ही कॉमिक्समधली माझी एक आवडती व्यक्तिरेखा. त्याचे चित्रपटही अत्यंत मजेदार आणि अनेकदा बघावेसे वाटतात. बेल्जियममधल्या ब्रसेल्स शहरात असलेलं कॉमिक्स संग्रहालय नावाप्रमाणे फक्त कॉमिक्स या विषयाला वाहिलेलं आहे. अर्थातच या संग्रहालयाचा केंद्रबिंदू ‘टिनटिन’ आहे. त्यामुळे त्याच्या चित्रातल्या व्यक्तिरेखा आणि प्रसंग काही ठिकाणी उभे केलेले आहेत. जगभरातली अनेक कॉमिक कॅरेक्टर्स आणि त्यांची माहिती इथे खूप आकर्षक रीतीनं मांडली आहे. संग्रहालय कसं असावं याचा एक प्रकारे वस्तुपाठच युरोपमधली संग्रहालयं देत असतात. तीन-चार तास अशा म्युझियममध्ये भटकणं आणि त्यांची कलेक्शन्स पाहणं हा एक दमवणारा, पण आनंददायक अनुभव असतो.

याच शहरात एक संगीत संग्रहालय आहे. चांगलं चार-पाच मजली उंच असलेल्या या संग्रहालयामध्ये जगभरातली हजारो वाद्यं मोठय़ा कल्पकतेनं माहितीसह मांडून ठेवली आहेत. ती कशी वाजतात, हे आपण अर्थातच हेडफोन्सवर ऐकू शकतो. इथे भारतातली तंबोरा, सतार, तबला अशी काही मोजकीच वाद्यं दिसली. व्यंगचित्रकला ही युरोपनं जगाला दिलेली एक जबरदस्त प्रभावी कला आहे. साहजिकच व्यंगचित्र संग्रहालय बघणं ही माझी युरोपमधली एक महत्त्वाची ठरलेली अ‍ॅक्टिव्हिटी असते. स्वित्र्झलडमध्ये एक बऱ्यापैकी जुनं व्यंगचित्र संग्रहालय आहे बाजेल या गावात, तीन मजली. प्रत्येक मजल्यावर प्रशस्त जागा. एका मजल्यावर वाचनालय आहे. तिथे जगभरातली, म्हणजे प्रामुख्यानं अमेरिका, युरोपमधली शेकडो नवीजुनी पुस्तकं होती. सगळी व्यंगचित्रांची. तिथे तीन महिने तरी मुक्काम करावा असं वाटत होतं, पण तीन-चार तासांतच निघालो! सेंपे या ज्येष्ठ फ्रेंच व्यंगचित्रकाराचं त्याच्या आदल्या दिवशीच निधन झालं होतं. या संग्रहालयाच्या प्रवेशद्वाराजवळच सेंपे यांची सगळी पुस्तकं त्यांनी मांडून ठेवली होती. त्यात त्यांच्या मुखपृष्ठांविषयीच्या मुलाखतींचं एक नवं पुस्तक मिळालं. स्विर्झलडला जाऊन तिथे फक्त व्यंगचित्रांचं संग्रहालय बघून परत येणारा तू जगातला एकमेव पर्यटक असशील, असा कौतुकमिश्रित टोमणा माझ्या मुलीनं, आदितीनं मला मारलाच!

 जर्मनीत फ्रँकफर्टमध्येही व्यंगचित्रांचं एक भलं मोठं म्युझियम आहे. तीन मजली आणि संपूर्ण लाकडी बांधकामाचं अप्रतिम आर्किटेक्चर असणारं. एका मजल्यावर अनेक जुनी व्यंगचित्रं त्यांनी मोठय़ा आकर्षकपणे मांडून ठेवली आहेत. त्याशिवाय दोन मजल्यांवर त्या वेळी एका जर्मन राजकीय व्यंगचित्रकाराचं स्वतंत्र प्रदर्शन सुरू होतं. त्यातलं एक व्यंगचित्र अजून लक्षात आहे. एक जण दुसऱ्याला विचारतोय, ‘मला आत्महत्या करायची आहे, कशी करू? विष पिऊन, गळफास लावून घेऊन की उंच इमारतीवरून उडी मारून? समोरची व्यक्ती सल्ला देते, ‘इतकं कशाला? त्यापेक्षा तू एखाद्या धार्मिक विषयावर व्यंगचित्र का काढत नाहीस?’      

मला सर्वात मजा आली ती फ्रँकफर्टमधल्या विद्यापीठाच्या वाचनालयात. सुप्रसिद्ध जर्मन साहित्यिक गटे यांच्या नावानं हे भलंमोठं संदर्भ वाचनालय आहे. प्रवेश मोफत. तिथे मला व्यंगचित्रांची शेकडो पुस्तकं पाहायला मिळाली. मुख्य म्हणजे जगभरात व्यंगचित्रकला कसकशी आकाराला येत होती हे कळलं. प्रत्येक व्यंगचित्रकारावर, चित्रकारावर अनेक भाषांतली पुस्तकं तिथे पाहायला मिळाली. व्यंगचित्रांच्या अभ्यासकाला यापेक्षा अधिक काय हवं! तिथेच एका संग्रहात अंदाजे दोनशे वर्षांपूर्वीचं व्यंगचित्र पाहायला मिळालं. थॉमस रोवॉल्डसन या ब्रिटिश व्यंगचित्रकाराचं हे व्यंगचित्र आहे. त्या काळी (ही) व्यंगचित्रकार घरी कशा पद्धतीनं काम करत होते याचं मजेदार चित्रण यात दिसतं. ‘जीनियस अ‍ॅट वर्क’ असं या चित्राखाली म्हटलं आहे. (व्यंगचित्रकाराला ‘जीनियस’ अशी उपाधी त्यानं दिली आहे यातच सारं काही आलं!).

असो, पर्यटन माझ्यासाठी अनेकविध अनुभव घेऊन येतं. त्यामुळेच 

‘केल्याने देशाटन निसर्गमैत्री, संग्रहालयात संचार 

लोकजीवन निरीक्षण आनंद देत असे अपार’

असा यथोचित श्लोक मी माझ्यापुरता तयार केला आहे!

व्हॅन गॉगची आणि माझी फारशी ओळख नव्हती. लेखिका माधुरी पुरंदरे यांनी आमच्या दोघांची खूप पूर्वी एकदा भेट घालून दिली. तेव्हापासून त्याचं आणि माझं मैत्र जुळलं. त्याचा सारखा आग्रह असतो, केव्हा येताय भेटायला? वगैरे, वगैरे. म्हटलं, येऊ कधी तरी! शेवटी आम्ही ठरवलं, जायचं त्याला भेटायला. त्यापूर्वी पॅरिसमध्ये लुमिएर थिएटरमध्ये त्याचा ३६० अंशांतून फिरणारा कलाचित्रपट पाहिला. छतावर, जमिनीवर, आजूबाजूला भिंतींवर, सगळीकडे त्याची पेंटिंग्स त्या लांबलचक, अवाढव्य स्टुडिओमध्ये प्रोजेक्टरद्वारे, संगीताच्या साथीनं फिरत होती. तासभर कुठे बघू कुठे नको असं झालं होतं. कार्यक्रम संपल्यावर बाहेरच्या लख्ख प्रकाशात  यायला सव्वाशे वर्षांचा प्रवास करावा लागला! सहज शर्ट झटकला तर दोन-तीन सूर्यफुलांच्या पाकळय़ा पडल्यासारखं वाटलं. हा अनुभव व्हॅन गॉगला सांगायचाच होता. तिथून सरळ अ‍ॅम्स्टरडॅमला गेलो. त्याच्या म्युझियमपाशी. तर तिथे प्रचंड गर्दी आणि भलीमोठी रांग. ती होती ज्यांनी ‘अ‍ॅडव्हान्स बुकिंग’ केलंय त्यांची. रोजची आयत्या वेळी येणाऱ्यांसाठीची तिकिटं केव्हाच संपली होती. (मुळात म्युझियममध्ये प्रवेश करण्यासाठी दोन, तीन महिने आधीच अ‍ॅडव्हान्स बुकिंग करावं लागतं हेच आम्हाला माहिती नव्हतं!) कुठूनही प्रवेशच मिळेना. तासभर तसेच धडपडत इकडतिकडे फिरत होतो. पण प्रवेश बंद! एक खिन्नता मनात घेऊन रेंगाळलो, कारण दुसऱ्या दिवशी निघायचं होतं. शेवटी व्हॅन गॉगलाच फोन केला! तो लांब कुठे तरी गव्हाच्या शेतात काही तरी रंगवत बसला होता. मी म्हटलं, ‘‘अरे मित्रा, तू बोलावलंस म्हणून आलोय, तर दरवाजा तरी उघड!’’ तो अपराधीपणे म्हणाला, ‘‘सॉरी, सॉरी, मी बघतो!’’

     क्षणात तिथली एक म्युझियम असिस्टंट आम्हाला शोधत आली. म्हणाली, ‘‘आताच काही तिकिटं पुन्हा उपलब्ध झाली आहेत.’’ आत गेलो. संपूर्ण संग्रहालयात अनेक वेळा अनेक चित्रांपुढे रेंगाळलो. निघताना त्याला मिठी मारली. त्यालाही बरं वाटलं असावं. त्यानं भेट म्हणून त्याचं चित्र असलेला एक पेन्सिल बॉक्स दिला!

Story img Loader