वसंत आबाजी डहाके

 ‘‘कलकत्त्यानं (आताचं कोलकाता!) खूप सोसलं आहे. एखाद्या अजस्र दु:खी जनावरासारखं वाटलं होतं मला हे शहर. कथा, कवितांमधल्या खुणा त्याची साक्ष देतात. राजकीय, सामाजिक, साहित्यिक चळवळींचं हे शहर. मी १९६५ पासून आतापर्यंत इथे चार वेळा जाऊन आलो; पण मागच्या तीन वेळांपेक्षा आताचं, वेगवेडय़ा जगाशी नातं जोडलेलं कोलकाता फार वेगळं आहे. निरुद्देश भटकताना, नवीन ठिकाणं पाहताना मी टिपलेल्या कोलकात्यापेक्षा फारच वेगळं, तरीही आपलंसं वाटणारं!..’’

art market Best Visual Arts Art exhibitions
कलाकारण : आपल्या काळाकडे प्रयत्नपूर्वक पाहणं…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
The profile of the city Book American journalism New journalism
शहराची सखोल दखल
zee marathi lakshmi niwas serial new promo
‘लक्ष्मी निवास’मध्ये दमदार कलाकारांची मांदियाळी! ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याचं पुनरागमन, नव्या प्रोमोत झळकले सगळे कलाकार…
Navi Mumbai Foreign Birds , Uran , Panvel Bay Shore,
नवी मुंबई : पाणथळींना विदेशी पाहुण्यांचा साज, उद्योगपती, बिल्डरांचा डोळा असलेल्या पाणथळींवर पक्ष्यांचा बहर
Asen Me Nasen Me Review
असेन मी नसेन मी!
Maharashtrachi Hasyajatra Fame shivali parab share special post of mangala movie
“…आणि हे घडलं”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली, “प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं…”
Scary experiences in three houses
‘भय’भूती : कुणी तरी आहे तिथं!

हावडा स्टेशनवर उतरलो. डबा बराच मागे थांबला होता. दूपर्यंत प्लॅटफॉर्मवरून चालत जायचं होतं. सज्जन सहप्रवाशानं दोन शोल्डर बॅग्ज स्वत:कडे घेतल्यामुळे आमचं ओझं हलकं झालं, चालणं शक्य झालं. सहप्रवासी उच्चविद्याविभूषित होता. गाय हा त्याचा सध्याचा आस्थाविषय होता. एका विशिष्ट विभागात गायींना चारा, पाणी, औषधं याविषयी देखभाल करणं आणि तशी व्यवस्था करणं हे त्याचं सध्याचं कार्य होतं. एरवी गोरक्षक आणि त्यांचं कार्य याविषयी एक प्रतिकूल प्रतिमा उमटली होती, ती या तरुणाच्या बाबतीत पुसली गेली. टॅक्सीत बसवून आमचा निरोप घेईपर्यंत तो थांबला होता.

प्लॅटफॉर्मच्या टोकाशी आलो तेव्हा कम्युनिस्ट पक्षाचा लाल झेंडा घेऊन एक माणूस उभा होता. पक्षाचे कुणी नेते, कार्यकर्ते याच ट्रेननं आले असतील. तो झेंडा पाहून पश्चिम बंगालमधल्या जुन्या राजवटीची आठवण झाली. अर्थात फार जुन्या म्हणता येणार नाही. १९७७ पासून २०११ पर्यंतच्या दीर्घकाळात ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया’ (मार्क्‍सिस्ट) या पक्षाचं इथे सरकार होतं. ज्योती बसू या अत्यंत आदरणीय नेत्यानं इथे मुख्यमंत्रीपद भूषवलं होतं. त्यांच्या निधनानंतर शुभप्रसन्न या चित्रकारानं काढलेलं चित्र मला आठवलं. मध्यभागी लाल कापडात गुंडाळलेलं ज्योती बसूंचं पार्थिव आणि भोवती खाली मान घातलेले, स्तब्ध बसलेले पक्षाचे नेते, असं ते चित्र आहे. ज्योती बसूंच्या निधनानं पश्चिम बंगालमधलं महत्त्वाचं पर्व समाप्त झालं यात शंका नाही. त्यानंतर एक धडाडीचं कुणालाही न घाबरणारं, तेजस्वी व्यक्तिमत्त्व मुख्यमंत्रीरूपानं लाभलेलं आहे. ‘सीपीआय’ (एम) ही राजवट संपून तृणमूल काँग्रेसची राजवट सुरू झाली आहे.

मी १९६४-६५ च्या डिसेंबर-जानेवारीत कोलकात्याला पहिल्यांदा गेलो होतो. त्या वेळी काँग्रेसचं सरकार होतं. १९६२ ते १९६८ हा कोलकातामधला आणि पश्चिम बंगालमधला उलथापालथीचा काळ होता. तेथील साहित्यिकांची ‘हंग्री जनरेशन’ (बंगाली भाषेतील साहित्यिक चळवळ- शक्ति चट्टोपाध्याय, मलय रायचौधुरी, देवी राय, सुबिमल बसाक इत्यादी.) आणि नंतरचं नक्षलबाडी आंदोलन (चारु मुझुमदार, कनु सान्याल, जंगल संथाल इत्यादी.) या याच काळातल्या घटना होत्या. स्वतंत्र देशातली तरुण पिढी क्षुब्ध झाली होती. तिच्या संतापाचे उद्रेक ठिकठिकाणी दिसत होते. १९६५ मध्ये कोलकात्यात ‘हंग्री जनरेशन’चा जाहीरनामा प्रसिद्ध झाला होता. १९६६ मध्ये नक्षलबाडी नावाच्या खेडय़ात सशस्त्र उठाव झाला. पुढची सहा वर्ष, नक्षलवादी आंदोलनाचे प्रमुख नेते चारू मुझुमदार यांचा पोलीस कोठडीत मृत्यू होईपर्यंत नक्षलवादी क्रांतिपंथानं पश्चिम बंगालमधली तरुण पिढी झपाटलेली होती. साठच्या दशकातच नवारुण भट्टाचार्य (बिजोन भट्टाचार्य आणि महाश्वेता देवी यांचा मुलगा व साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त (१९९३) कादंबरीकार, या कवीनं लिहिलं होतं,

  ‘ही मृत्यूची दरी म्हणजे माझा देश नव्हे

  हे फासावर चढवणाऱ्यांचं आनंदनिधान  

  म्हणजे माझा देश नव्हे

  हे विस्तीर्ण स्मशान म्हणजे माझा देश नव्हे

  हा रक्तलांछित कत्तलखाना

  म्हणजे माझा देश नव्हे’

 या काळातील दैनिक वर्तमानपत्रांचे मथळे कुणाला आठवत असतील, तर या ओळींच्या मागची वेदना समजू शकेल. याच कवितेत कवीनं म्हटलं होतं, ‘कविता लिहिण्याची हीच वेळ आहे.. आपलं रक्त, अश्रू आणि हाडांनी, कोलाज पद्धतीनं!’

कोलकाता म्हटलं, की मागचं हे सगळं मनात उगवत राहतं. १७ डिसेंबर १९६४ रोजी मी कोलकाताला आलो होतो तेव्हा ते कलकत्ता म्हणून ओळखलं जात होतं. नंतर त्याचं नाव बदललं. १ जानेवारी १९६५ रोजी कोलकात्यात होतो आणि ७ जानेवारीला कोलकात्यातून निघालो. त्या वेळची एक नोंद आहे. पायी, ट्राममध्ये, बसमध्ये बसून उगीच भटकलो. चित्रांची प्रदर्शनं, लायब्रऱ्या.. ते उगीच भटकणं त्या वेळी खूपच गरजेचं होतं. नंतरही त्याचं मोल जाणवत राहिलं. जरी मी पुन:पुन्हा त्या शहरात गेलो नसलो, तरी ते मनात कायमच होतं, आहे आणि तिथे मी अद्याप उगीचच भटकतही असतो.  १९६४ च्या डिसेंबरात मी कोलकातामध्ये माझ्या भावाकडे आलो होतो. चंद्रपुरात घरी बसून कंटाळलो, इकडे आलो. तो त्याच्या कामाला गेला, की मी निघायचो. तो हाजरा रोडवर, कालिघाट फायर स्टेशनजवळ एका छोटय़ा घरात राहायचा. थोडं पुढे आलं की बहुधा, ‘हरीश मुखर्जी रोड’ होता. त्यावरून ट्राम जायची. भाडं खूपच स्वस्त असायचं. एक तिकीट काढलं की कुठेही जा, असा काही तरी प्रकार त्या वेळी होता. त्यामुळे मी कुठेही जायचो. भाषेची काही अडचण आली नाही. लहान गावातून महानगरात आल्यानंतर एक भीती मनात असते. म्हणजे आपण आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचू की नाही! ती इथे नव्हती. मी चंद्रपूर-नागपूरपलीकडे कोणत्याही महानगरात गेलेलो नव्हतो; पण इकडे हिंडताना भय वाटलं नाही. आपलं जणू काही ओळखीचंच गाव आहे असं काही तरी वाटत असावं. (हा त्या काळाचा गुण होता की त्या शहराचा?) त्यामुळे बंगाली भाषा अवगत नसतानाही लोअर चितपूर रोडवरील जोडासांको, चौरंगी, म्युझियम, जादवपूर युनिव्हर्सिटी, बेलूर मठ अशा दूरदूरच्या ठिकाणांपर्यंत मी जाऊन आलो.

एकदा तर भाऊ जिथे काम करत होता तिथे पोहोचून त्याला आश्चर्यचकित केलं! हे शहर, हेच नव्हे, कोणतंही शहर, महानगर, जे आपला हात धरून सुखरूप घरी पोहोचवतं, जिथे कुठे जायचं असतं, तिथे नीट घेऊन जातं, आता कुठे आहे? (आहे, जफर पनाहीच्या ‘मिरर’ या चित्रपटात आहे! त्यातली एक लहान मुलगी त्या अफाट शहरात एकटी आपल्या घरापर्यंत पोहोचू शकते!)  मी स्टेशनजवळून पुढे आलो आणि हावडा ब्रिजवरून (आता ‘रवींद्र सेतू’) टॅक्सी निघाली. हुगळी नदीवरचा अवाढव्य पोलादी पूल. १९४२-४३ पासून हा पूल आहे आणि एक प्रकारे कोलकात्याचा प्रवेशमार्ग आहे. अधांतरी असलेला हा पूल स्थापत्यशास्त्रातला एक चमत्कार आहे. अनेक चित्रपटांतून तो भारतीयांच्या परिचयाचा झाला आहे. ‘हावरा ब्रिज’ नावाचा एक हिंदी सिनेमाही होता. ब्रिजवरून कोलकाता महानगरात प्रवेश केल्यानंतर रस्त्यावरची वाहनांची गर्दी, आजूबाजूची दुकानं, जुन्या-नव्या छोटय़ामोठय़ा मलूल इमारती दिसायला लागतात आणि माणसांची गजबज जाणवते. स्टेशनपासून चौरंगीपर्यंत विशेष काही बदल झाला आहे असं वाटलं नाही. कोलकाताच्या पहिल्या भेटीत मी चौरंगी भागात एखाद्या ठिकाणी उभा राहून बराच वेळ माणसांची वर्दळ पाहात असे ते आठवलं. ट्राममधून, बसमधून, रस्त्यावरून जाणारी शेकडो, हजारो माणसं. ती पाहात असताना माझं मन निवांत होत असे. इतक्या माणसांच्या हालचालींतून या महानगराच्या हृदयाचं स्पंदन जाणवत असे. या शहराचं रक्त थांबलेलं नाही किंवा साकळलेलं नाही, ते निरंतर वाहतं आहे, या जाणिवेनं मला छान वाटत असे.

१९६५ नंतर १९८८ मध्ये इथे आलो होतो. कविता उत्सव होता. शक्ति चट्टोपाध्याय, सुनील गंगोपाध्याय, केदारनाथ सिंह, पद्मा सचदेव इत्यादी कवी-लेखकांचा त्या उत्सवात सहभाग होता. वेगवेगळय़ा ठिकाणी कार्यक्रम झाले. त्याच्या तीनच वर्षांपूर्वी, १९८५ मध्ये सत्यजित राय यांनी उद्घाटन केलं त्या नंदन थिएटरमध्ये एक कार्यक्रम होता. तिथे बाहेरच्या फळय़ावर या आठवडय़ातल्या व्याख्यात्यांच्या नावात ‘अरुण खोपकर’ हे नाव पाहून खूप छान वाटलं होतं! आता या वेळी आम्ही शेक्सपिअर सरणी भागातल्या हॉटेलमध्ये उतरलो होतो. तिथून ते जवळच होतं; पण या वेळी तिकडे जाणं झालं नाही. उत्सवाच्या कार्यक्रमांत शांतिनिकेतनही होतं. बोलपूर स्टेशनवर उतरल्यानंतर शांतिनिकेतनसाठी वाहनं शोधत असताना एका स्थानिकानं मला विचारलं होतं, ‘‘.. ते शक्ति चट्टोपाध्याय आहेत का?’’ एका कवीविषयी एक सामान्य गावकरी काही विचारतो आहे हे पाहून धन्यच वाटलं. शक्ति ही तत्कालीन पिढीतली एक आख्यायिकाच होती. (सुनील आणि शक्ति यांनी ‘क्रित्तीबास’ हे प्रभावी नियतकालिक सुरू केलं होतं). शांतिनिकेतनमध्ये गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर शेवटच्या पर्वात, विख्यात चित्रकार नंदलाल बोस यांनी साकारलेल्या ज्या ‘श्यामली’ या मातीच्या घरात राहात असत, त्या परिसरात आमचा एक कार्यक्रम झाला होता. शांतिनिकेतनमध्ये विख्यात शिल्पकार रामकिंकर बैज यांच्या शिल्पकृती आहेत, त्याही पाहता आल्या होत्या.  तिसऱ्यांदा मी १९९६ मध्ये ‘भारतीय भाषा परिषदे’च्या एका कार्यक्रमासाठी आलो होतो. आ. ना. पेडणेकर पती-पत्नी, अनंत देशमुख सोबत होते. भाषा परिषदेच्या निवासगृहात आम्ही उतरलो होतो. त्या वेळी प्रभाकर श्रोत्रिय हे परिषदेचं आणि ‘वागर्थ’ या नियतकालिकाचं काम बघत असत. ही परिषद शेक्सपिअर सरणीवरच आहे. आम्ही या वेळी ज्या हॉटेलमध्ये होतो, तिथून ‘भाषा परिषद’ पायी चालत दहा मिनिटांवर आहे; पण या वेळी तिकडेही जाणं झालं नाही. मागच्या वेळी माझी मुलं राही आणि ऋत्विक यांना बोलावलं होतं. मग त्यांच्यासह, त्यांनी पाहावं म्हणून शांतिनिकेतनला गेलो होतो. परतताना मुलांना भूक लागली म्हणून खेडय़ातल्या, रस्त्याकडेच्या एका खोपटात त्यांना जेवायला नेलं. तिथल्या मासळीची अजून, इतक्या वर्षांनंतरही त्यांना आठवण आहे! रस्त्याकाठचं लहानसं खोपट, पलीकडची धान्याची शेतं, लहान लहान तळी असं दृश्य आज आठवतं.

कोलकात्याविषयी माझ्या तोंडून प्रभानं (पत्नी प्रभा गणोरकर) खूप ऐकलं होतं; पण ते महानगर पाहिलं नव्हतं. ती या वेळी सोबत होती. राही आणि तिचा मुलगा बिल्व हेही आले होते. आम्ही पोहोचलो त्याच दिवशी आम्ही दक्षिणेश्वरला गेलो. तिकडे कालीमाता आहे आणि तिच्याशी चंद्रपूरच्या कालीमातेच्या माध्यमातून माझं, तथाकथित नातं आहे. मी तिथे मागच्याही वेळी गेलो होतो. त्यापूर्वी १९६५ मध्येही गेलो होतो. आता खूपच बदल झाला आहे. भव्यदिव्य असं स्थापत्य आहे. ‘फूड मॉल’ आहे. सिक्युरिटी (!) आहे; पण ‘काली’ तीच आहे. सर्जनाची, नवनिर्मितीची देवता. दक्षिणेश्वरची काली कोलकात्याची अधिष्ठात्री देवता आहे. ताणलेल्या धनुष्याकृती भुवया आणि तुमच्यावर रोखलेले डोळे. ‘कुठे पळशील?’ असंच जणू काही ती विचारत असते. माझ्यापुरतं मी वेगळं घेतो. ‘माझी नजर आहे तुझ्यावर,’ असं ती मला सांगत असावी. (पहारा नव्हे, काळजी!).

  या वेळी बिल्व बरोबर असल्यामुळे त्याच्यासाठी काही गोष्टी करायच्या होत्या. त्यातल्या एका गोष्टीविषयी मलाही कुतूहल होतं. ‘व्हिक्टोरिया मेमोरिअल’मध्ये जाऊन वॉरन हेस्टिंग्सचं पेंटिंग पाहायचं. उदय प्रकाश यांच्या ‘वॉरन हेस्टिंग्स का साँड’ या कथेत त्या पेंटिंगचा उल्लेख आहे; परंतु त्या पेंटिंगसह अनेक पेंटिंग्ज हलवली होती आणि कुठे तरी ठेवून दिली होती. त्यातल्या त्यात जॉन झोपानी यांचं ‘क्लॉड मार्टिन अँड हिज फ्रेंड्स’ हे पेंटिंग आम्हाला पाहायला मिळालं. (क्लॉड मार्टिन हे मूळ फ्रेंच, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या बेंगाल आर्मीचे मेजर जनरल, स्थापत्यतज्ञ, कलासंग्राहक, शिक्षणतज्ज्ञ इत्यादी). याशिवाय ‘जयपूर प्रोसेशन’ हे जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं विशाल पेंटिंग पाहायला मिळालं. ते १८७६ मध्ये वासिली वेरेशागिन या रशियन चित्रकारानं केलं होतं. आणखी एक अद्भुत गोष्ट इथे पाहिली. ‘अभ्युदय’ या तत्कालीन प्रमुख हिंदी साप्ताहिक विचारपत्राच्या (१९ नोव्हेंबर १९४३) पहिल्या पानावर छापलेलं ‘आझाद हिंदू फौजे’चं राष्ट्रीय गान. (ते रवींद्रनाथ ठाकुरांच्या ‘भारत भाग्य बिधाता’ या बंगाली कवितेवर आधारित होतं). त्याच्या काही ओळी- ‘जन मन गन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता

 एभ सुख चैन की बरसा बरसे भारत भाग हे जागा

पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंगा

चंचल सागर विंध्य हिमालय नीला जमुना गंगा तेरे नित गुन गायें

तुझ से जीवन पायें

ऋब तन पावे आशा

सूरज बनकर जगपर चमके

भारत नाम सुभागा

जय हो, जय हो, जय हो,

जय, जय, जय, जय हो..’

 कोलकाताच्या याही मुक्कामात मी जुन्या खुणा शोधत होतो. पार्क स्ट्रीटवरच्या ज्या खुल्या वाचनालयात जाऊन चित्रकलाविषयक नियतकालिकं, पुस्तकं पाहत बसत असे, ते वाचनालय आता नव्हतं. त्या कोपऱ्यावर एक दुकान झालेलं होतं. आता सर्वच महानगरांत असतात त्या नव्या गोष्टी इकडेही असणं क्रमप्राप्तच होतं. मागच्या वेळी मला हे शहर एखाद्या अजस्र दु:खी जनावरासारखं वाटलं होतं. कलकत्त्यानं खूप सोसलेलं आहे आणि त्याच्या खुणा कवितेत, कथेत, कादंबरीत आढळतात.

या वेळी एका गोष्टीचा अभाव सतत जाणवत होता. आम्ही ज्या भागात हिंडलो त्या भागात ती आढळली नाही. १९९६ मध्ये मुलं बरोबर आली होती तेव्हा त्यांनी ती अनुभवली होती. ती म्हणजे कलकत्त्याची वाहिनी- ट्राम! ती जणू काही नाहीशीच झालेली आहे. आता ती फक्त दोन मार्गावरून धावते असं समजलं. आता आपली सगळीच शहरं वेगवेडी झालेली असल्यामुळे फ्लायओव्हर आणि मेट्रो आलेल्या आहेत. अशा स्थितीत ती मंदमंथर गतीनं चालणारी ट्राम नकोशी झाली असणार. ती नुसतीच कोलकात्याची ओळख नव्हती, तर लहानथोरांना सामावून घेणारी जीवनवाहिनी होती.  निघण्याच्या आदल्या रात्री ‘ओ कलकत्ता’ नामक रेस्तरांमध्ये जाऊन मोहरीतला हिलसा आणि गोंधोराज (गंधराज) या अप्रतिम स्वादाच्या लिंबाच्या रसाचं पेय यांचा आस्वाद घेऊन कोलकाताला शुभेच्छा दिल्या. अजूनही ते आपलंसं वाटतं. १९६५ च्या दीर्घ वास्तव्यात कलकत्त्याविषयी प्रेम निर्माण झालं होतं, ते अद्यापही मनात आहे. 

Story img Loader