वीणा देव
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘कधी घाबरवणारं गंगेचं रोरावतं पात्र, कधी प्रसन्न करणारा शांत प्रवाह.. कधी वेरूळच्या लेण्यांमधलं मोहक शिल्पसौंदर्य.. तर कधी ज्ञानेश्वरी जिथे प्रसवली त्या पैसाच्या खांबाजवळ बसून केलेला ज्ञानेश्वरांचा आठव..
कधी परदेशातला नयनरम्य वसंत.. कधी ज्येष्ठ लेखक शरदचंद्र चट्टोपाध्यायांचं पाहिलेलं सुबक-नीटनेटकं घर.. तर कधी गुजरातमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची अचानक घडलेली भेट. यातले काही प्रवास ठरवून केलेले, काही न ठरवता घडलेले.. पण प्रत्येक अनुभव मनावर ठसा उमटवून गेला.’
मला आठवतं, की आयुष्यात प्रत्यक्ष प्रवासाला सुरुवात होण्यापूर्वी मनातून थोडा थोडा प्रवास सुरू झाला होता. आमच्या घरी अगदी सकाळी ६ वाजल्यापासून ‘आकाशवाणी’चा स्वर कानी पडायचा. अभंग, भक्तिगीतं. त्यात एक हिंदी गीत लागायचं.
‘चलो मन.. गंगा जमुना तीर,
गंगा जमुना निर्मल पानी।
पावन होत समीर, चलो मन..’
कोणाचं पद आहे, कोण गातं आहे, काही माहिती नव्हतं; पण ते इतकं मनाला भिडायचं, की वाटायचं हे ‘गंगातीर’ पाहायला मिळायला हवं. लहानपणीच कवी वाल्मीकीरचित ‘गंगाष्टक’ शिकवलं होतं मला. त्यातल्या ‘जिचा जलप्रवाह म्हणजे पृथ्वीचा सुंदर हार आहे.. मला तुझ्या किनाऱ्यावर राहायला मिळो, तुझं पवित्र पाणी प्यायला मिळो, तुझ्या लाटांमध्ये स्नान करायला मिळो.’ अशा गंगावर्णनाचा मनावर संस्कार होता. तिचं प्रत्यक्ष दर्शन खूपच उशिरा घडलं आणि घडलं तेव्हा गंगेची जी रूपं वाचनातून अनुभवली होती त्यापेक्षा ती अगदी निराळी दिसली.
तीर्थक्षेत्राची सगळी लक्षणं पाहात घाटावर गेलो, तर तिथे पंडय़ांचीच गर्दी. धार्मिक कार्य करायला येणाऱ्या असंख्य लोकांमागे ते लागलेले.. अनेक जण त्यांना चुकवून पुढे जाणाऱ्यांकडे पाहून नाराज होणारे. त्यांच्या त्रासातनं बाहेर पडलो आणि पायऱ्या उतरलो तर गंगा दिसली. फुसांडत वाहणारी. नुकताच पाऊस झाल्यानं लाल पाण्यानं तुडुंब भरलेलं पात्र. तिच्या त्या सुसाट वेगानं वाहणाऱ्या पाण्याची खरोखर भीती वाटली मला. त्या जबरदस्त ध्वनीनं मन घाबरलं. देवांना(पती विजय देव) जाणवलं आणि ते मला म्हणाले, ‘‘वीणा, आपण गंगेची पूजा करू आणि मग तू सगळय़ांसाठी ‘गंगाष्टक’ म्हण.’’ तसंच केलं, नंतर मग हळूहळू मन शांत झालं. तिची महत्ता आठवत घाटावर बसून राहिले. पुढे काही वर्षांनी मात्र तिचं अगदी निर्मळ, झुळझुळणारं पाणी बघितलं, तेव्हा मात्र तिच्या सोबतीचा दिलासा वाटला.
लहानपणी प्रवास सुरू झाला, तो ‘एस.टी.’चा. आईबरोबर आजोळी चिपळूणला जाण्यासाठी. स्वारगेटहून निघणारी गाडी त्या वेळी महाबळेश्वरातून जायची. तोवर मी आईच्या मांडीवर पेंगुळलेलीच असायची, पण महाबळेश्वर आलं, की ती मला उठवायची. कारण तिथे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेले गावठी गुलाबाचे वेल. काही वेळा एस.टी. त्याला घासून जायची. काटय़ांचा चरचर आवाज यायचा, पण बहरलेल्या गुलाबांकडे डोळे लागलेले असल्यानं ते फार त्रासदायक वाटायचं नाही. गावठी गुलाबाचा गंधही नाकाला जाणवे.
त्या प्रवासातला आणखी एक अनुभव. वरंध घाटात सह्याद्रीचे प्रचंड कडे, दऱ्या, वृक्षराजी यांनी दृष्टी चकित व्हायची. त्या घाटात एक वळण होतं. वाघजाईच्या देवळासमोर गाडी क्षणभर थांबायची. तिथून नमस्कार करून, नारळ फोडून चालक गाडी पुढे काढायचा अन् पुढे एक जबरदस्त वळण लागायचं. त्या वळणावरून एस.टी. सहज वळायचीच नाही. तिला मागे-पुढे करावी लागायची. ‘हेअरपिन बेंड..’ सगळे कुजबुजायचे. ते पार करताना पुढल्या सीटला घट्ट धरून बसायचे, श्वास रोधून. वळण ओलांडलं की सगळे ‘हुश्श’ म्हणायचे. ते क्षण मला फार रोमहर्षक वाटायचे. दर वेळी आजीकडे जाताना त्या वळणाची मी वाट पाहायची. आजही ते वळण आहेच. नंतरही खूप वळणं अनुभवली; पण श्वास रोखून खिडकीतून बाहेर पाहात आईचा हात गच्च धरून ठेवण्याचे प्रवासातले ते क्षण मनात रुतून बसले आहेत.
कालांतरानं वडिलांचा (आप्पा- लेखक गो.नी. दाण्डेकर) आणि आईचा (नीरा दाण्डेकर) हात कायमचा सुटला. घरी जीव लागेना म्हटल्यावर आमच्या मित्रमैत्रिणींसह प्रवासाला जायचं ठरलं. पाच जोडपी, सारख्यावारख्या आवडींची; पण अगदी वेगळय़ा व्यवसायांतली. सगळय़ांनाच प्रापंचिक कर्तव्यांमुळे एवढी वर्ष मोठय़ा सहलीला जायला सवड नव्हती झालेली. उत्तराखंडमधल्या बद्रिनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्रींकडे निघालो. आपण ‘चारधाम’ यात्रा करायचीय, असं कुणाच्याच मनात नव्हतं. वेगळा प्रदेश पाहायचा हा सगळय़ांचा समान हेतू. केदारनाथला पोहोचलो तेव्हा अचाट थंडी होती. सकाळी लवकर दर्शन घेतलंत तर गर्दी थोडी कमी असेल, अशा सूचनांमुळे नाइलाजानं उठलो. आवरून खोलीबाहेर आलो, तर खरोखर अद्भुत दृश्य दिसलं. डोळय़ांसमोर साक्षात सोन्याचा झळाळ असलेली हिमशिखरं. ‘सुवर्णमय आभा’ म्हणजे काय, याचा साक्षात प्रत्यय होता तो. त्यासमोरून हलणं शक्यच नव्हतं. ‘स्वर्गीय’ हेच त्याचं वर्णन. अशी अनुभूती सोडून देवळात जाणं अवघड होतं. उशीर झाला, गर्दी झाली, तरी या सुखासाठी ती सहन करू, म्हणून थांबलोच, परिणामही भोगला; पण तसं दृश्य पुन्हा प्रत्यक्ष पाहिलं नाही हे खरंच.
यानिमित्तानं एक आठवण झाली. पुणे विद्यापीठात अमेरिकेतल्या प्राध्यापकांची एक टीम आली होती. देवांना त्यांना अजिंठा-वेरूळ दाखवायचं होतं. माझाही नंबर लागला. वेरूळ लेण्यांपाशी गेलो आणि ते सगळे आपापले कॅमेरे घेऊन सरसावले. खरं तर काळय़ा पाषाणातलं ते शिवपार्वतीचं देखणं शिल्प पाहताना आपण चकित होतो. एकूणच लेण्यातल्या छोटय़ा-मोठय़ा प्रमाणबद्ध, बोलक्या, सुंदर मूर्ती पाहताना आनंदून जातो, तृप्त होतो; पण हे सगळं नजरेनं नीट अनुभवण्याऐवजी फटाफट फोटो काढत ते पुढे निघू लागले. सगळीकडे नुसता फ्लॅशचा लखलखाट! हे फोटो घरी गेल्यावर पाहताना त्यांना नजरेचा संस्कार आठवेल का, असंच सारखं माझ्या मनात! अखेरीला ते सगळे फोटो काढून बाहेर पडले, की मग मी सावकाश शिल्पसौंदर्य निरखायची. माझी ती पुनर्भेट होती, त्यामुळे माझ्या डोळय़ांत, मनात अनेक मूर्ती स्थिरावलेल्या होत्या. त्यांना पुन्हा एकदा न्याहाळत मी लेणंभर हिंडले. हाच माझा त्या वेरूळभेटीतला लाभ!
भुवनेश्वरला जायचं ठरवलं. त्या वेळी मनात माहीत असलेली दोन ठिकाणं- सूर्यमंदिर आणि नंदनकानन अरण्य, असा प्राधान्यक्रम होता. तिथल्या निळय़ाभोर, स्वच्छ किनारा असलेल्या समुद्राचंही आकर्षण होतंच. आम्ही रेल्वेनं निघालो, पण गाडी अठरा तास उशिरा धावत होती. त्यामुळे एरवी ज्या प्रदेशातून आम्ही रात्री गेलो असतो, तो आम्ही दिवसा पाहात होतो. विलंबानं मरगळ आली होती, उत्साह कमी झाला होता, डोळे पेंगुळलेले. पहाटे ४ वाजता भुवनेश्वर आलं. उसन्या उत्साहानं स्टेशनबाहेर पडलो, तर डोळय़ांना ताजेपण देणारी निसर्गाची बहार दिसली. मोठमोठय़ा टपोऱ्या कमळांच्या ताज्या कळय़ांनी भरलेल्या अनेक टोपल्या. पांढऱ्या कळय़ा उमलायची वाट पाहात असलेल्या. कमललोचन, कमलदल, कमलवदन, कमलहस्त.. किती तरी शब्द एका क्षणात आठवले.. मनात ती सगळी कमळं फुलू लागली. असं घवघवीत दृश्य पूर्वी कधीच पाहिलं नव्हतं. फार तर एखाद्या तळय़ाकाठच्या देवळाजवळ बादलीत ठेवलेल्या पाच-दोन कमळकळय़ा. पुढे गाडीच्या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी छोटय़ा तळय़ांमध्येच काय, डबक्यांमध्येही रंगीबेरंगी कमळंच. बाजूच्या सर्व हिरव्याकंच परिसरात अधिक सुंदर वाटणारी. चारी बाजूंनी हिरवीगार शेती. मखमलीची, पाचूंची रानं जणू. त्यांना सीमारेषा म्हणून लावलेले डौलदार माड. स्वत:च्या पानांचा गडद रंग मिरवत असलेले. त्या रंगांनी डोळय़ांवर जादू केलेली. परम नेत्रसुख. पुढे कोणार्क मंदिर पाहण्यासाठी डोळे अगदी ताजेतवाने झाले.
आमच्या आप्पांच्या कादंबऱ्यांच्या अभिवाचनांच्या नियमित कार्यक्रमानिमित्तानं तर कित्येक प्रवास झाले. छोटय़ामोठय़ा गावांमध्ये अगदी शे-दोनशे श्रोते बसतील एवढय़ा मंदिराच्या मंडपापासून मैदानावर हजार-दोन हजार श्रोत्यांसमोर कार्यक्रम झाले. त्या काळात ‘मोगरा फुलला’ ही आप्पांची कादंबरी आम्ही वाचायचो. त्यानंतर त्यांच्याच आणखी आठ कादंबऱ्यांची अभिवाचनंही करू लागलो. साधारण तीसेक वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. नेवासे- नगर जिल्ह्यातल्या प्रवरा नदीच्या काठी असलेल्या महादेवाच्या प्राचीन मंदिरात- जिथे पैसाच्या खांबाशी बसून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली बाराव्या शतकामध्ये, तिथे आम्ही ‘मोगरा फुलला’ ही चरित्रात्मक कादंबरी वाचावी, असा प्रस्ताव आला. विजय, धाकटी लेक मधुरा आणि मी तिघंही या कल्पनेनंच थरारलो. जिथे ज्ञानेश्वरीचा, त्या अलौकिक ग्रंथाचा, जन्म झाला, त्याच जागी आम्ही ज्ञानेश्वरांवरची कादंबरी वाचणार होतो. त्यानिमित्तानं जणू त्या काळाला स्पर्श करणार होतो. जिथल्या हवेमध्ये त्यांचे स्वर निनादले होते, तिथे आम्ही त्यांची कहाणी पुन्हा जिवंत करायचा प्रयत्न करणार होतो. श्रोतेही तीच श्रद्धा मनात ठेवून आले असणार. खरंच आम्ही भारावलो होतो. मन एकाग्र झालं होतं. पैसाच्या पवित्र खांबाला आम्ही हलकेच स्पर्श केला. त्यासमोर नम्र झालो अन् वाचनाला सुरुवात केली. नि:शब्द झालेल्या श्रोत्यांनी ती कथा अनुभवली. खरोखर आमच्या दृष्टीनं तो अलौकिक अनुभव होता. अनेकदा ‘मोगरा’ वाचली, पण नेवाशातल्या त्या अनुभवाचा आनंद अवर्णनीय होता. ते रोमांच कधीच विसरता येणार नाहीत.
केवळ प्रदेश पाहणं, भाषणं, अभिवाचनं यानिमित्तांनी आजवर देशविदेशी प्रवास झाले. प्रवासात निरनिराळी माणसं भेटली. त्यांच्याशी कमीअधिक संवाद झाले. पुढचे टप्पे गाठायची कधी घाई असायची. एकदा ठरलेल्या कार्यक्रमांपेक्षा काही वेगळंच घडलं. आम्ही ‘रंगीला गुजरात’ बघायला गेलो होतो. सरदार सरोवर पाहून परतत असताना विजयना एक फोन आला. त्यांचे वडीलधारे स्नेही मोहन धारिया बोलत होते. त्यांनी विचारलं,
‘‘कुठे आहात?’’
‘‘बडोद्याला’’- विजय.
‘‘अरे, मग शक्य असेल तर नरेंद्रभाईंना भेटा ना!’’ मोदी त्या वेळी मुख्यमंत्री होते.
‘‘अशी अचानक कशी भेट होणार? आम्ही इथे दोनच दिवस आहोत.’’
‘‘मी करतो ती व्यवस्था.’’ धारिया म्हणाले.
खरोखरच त्यांनी मोदींच्या ऑफिसमध्ये फोन करून बोलणं केलं आणि आम्हाला तिकडून फोन आला. झटपट सगळी व्यवस्था झाली. आम्ही सहा जण त्यांना भेटायला गेलो. मनावर नाही म्हटलं तरी थोडं दडपण होतं; पण विजय राज्यशास्त्राचे प्राध्यापक. जागरूकतेनं राजकारणात काय घडतंय ते अभ्यासत असलेले. त्यांच्या हाती सूत्रं दिली. एका साध्या, पण प्रशस्त दालनात धीरगंभीर मोदींची भेट झाली. नव्या सुधारणा जोमानं होत असलेल्या गुजरातबद्दल ते बोलत होते. ऐकून कुणीही देशप्रेमी संतुष्ट होईल असंच त्यांचं बोलणं होतं. त्यात प्रौढी नव्हती, पण आनंद होता. खरं तर ती विजयनं घेतलेली छोटीशी मुलाखतच. आम्हाला भेटीची वेळ मिळाली होती वीस मिनिटं. त्याची चाळीस मिनिटं कधी झाली कळलंच नाही. सगळेच सुखावलो. गुजरातचा तो प्रवास त्यामुळे अधिक संस्मरणीय झाला.
एकदा कोलकात्याला जायचं होतं, पण दोन-अडीच दिवसांत काय बघून होणार, असा प्रश्न माझ्या आणि लेक मृणालच्या (अभिनेत्री मृणाल कुलकर्णी) मनात होता. अनेक गाळण्या लावून आम्ही दोघींनी ठरवलं, की कोणत्याही परिस्थितीत शरदचंद्र चट्टोपाध्याय या थोर लेखकाचं घर बघायचं. दोन तासांच्या अंतरावर होतो आम्ही. आप्पा शरदचंद्रांचे चाहते. मीही त्या मान्यवर बंगाली साहित्यिकाचं मामा वरेरकरांनी अनुवाद केलेलं साहित्य आवडीनं वाचलेलं. मृणालनं तर त्यांच्या ‘श्रीकांत’मधली अभया पडद्यावर साकारलेली. ते घर आहे डेउल्टीला. एकमजली घर. डौलदार, प्रशस्त, कौलारू छपराचं. दर्शन छान. स्मृतिस्थळ असूनही गर्दी नव्हती त्या वेळी. रखवालदार आम्हाला बघून आला आणि घर उघडलं. इतकं नीटनेटकं होतं ते, की आम्हाला वाटलं, आजही ते राहाण्याजोगं आहे. त्यांची लेखनासाठीची टेबल-खुर्ची, लेखण्या, आरामखुर्ची, पलंग, पुस्तकांची कपाटं, इतकंच काय, पानाचा डबाही निगुतीनं ठेवलेला. बंगल्याभोवती छान बाग. त्यात त्यांचा बैठा पुतळा, घरासमोर रस्त्यापलीकडे त्यांच्या कुटुंबाच्या मालकीचं तळं. तिथेही थोडय़ा स्थिरावलो. भारतातल्या एका महान लेखकाच्या घराचं हे प्रसन्न दर्शन.. आणि परदेशातल्यासारखं पैसे मोजावे न लागता कुण्याही वाचकाला होणारं!
निसर्गाचं मी कधीच न पाहिलेलं एक वेगवान रूप दिसलं होतं युनायटेड किंग्डममधल्या स्वान्सी शहरामध्ये. आमच्या मधुराकडे गेले होते. मे महिना. तिथला वसंत ऋतू. मधुरानं फुलवेडय़ा मला तिथल्या सगळय़ा बागांमध्ये मनसोक्त हिंडवलं. झाड अन् झाड फुललेलं. पान म्हणून दिसत नव्हतं. सगळय़ा शहरात हेच. जमिनीवर हिरव्यागार गवतावर उगवलेल्या गवतफुलांचे दाट गालिचे. सौंदर्याला जणू उधाण आलेलं. मी ते नयनसुख अनुभवत स्वान्सीभर हिंडत होते; पण पंधरा-वीस दिवसांनी हे सुख संपलं. निपटून काढावीत तशी सगळी फुलं गळून पडली. बहर संपला, पण एक खूण मागे ठेवून. फुलांच्या गळलेल्या पाकळय़ांचा लोट उतरत्या रस्त्याच्या कडेनं धावू लागला. तो रंगीबेरंगी प्रवाह अनोखा होता. त्याला आवाज नव्हता. वारा थांबला की तोही थांबे. कुठे जात होत्या त्या पाकळय़ा? त्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या टप्प्याची ती वाट. उताराकडे निघालेली. क्षणाक्षणाला नवं रूप धारण करणाऱ्या सृष्टीचा जन्ममरणाचा सोहळा त्या प्रवासात अनुभवला!
आणखी एक आठवण. आमचे आप्पा नुकतेच गेले होते. त्यांच्या अस्थिविसर्जनासाठी आम्ही, त्यांचे जिवलग त्यांच्या प्रिय अशा रायगडावर पोहोचलो होतो. वाटभर त्यांच्या आठवणी जाग्या होत होत्या. एकीकडे डोळे झरत असलेले. तिथले त्यांचे गडमित्र भेटले की नवा उमाळा. संध्याकाळ होती. किल्ल्यावर पोहोचलो आणि अंधारलं. मी आई आणि विजयना म्हटलं, ‘‘आता मी होळीच्या माळापासून बाजारपेठेतून जगदीश्वरापर्यंत जाऊन येते एकटीच.’’ त्यांना ‘एकटीच’ हे पटत नव्हतं; पण मी विनवण्या केल्या. रायगडला मी अनेकदा गेले होते. तिथे महिना- महिना मुक्काम केला. तेव्हा रोज त्या वाटेनं चालले होते. त्या दिवशीही निघाले. अप्पांच्या अनंत स्मरणांनी डोळे वाहात होतेच. प्रत्येक पावलाला जुनी आठवण. तो निवांत, प्रशस्त रस्ता. चांदणं नुकतंच उगवू लागलेलं. थंडसा वारा. मी माझ्या गावातून चालले आहे, अशी सहज भावना. अर्धी बाजारपेठ ओलांडली आणि थोडी ऊब जाणवू लागली. मनातल्या मनात मी अप्पांशी बोलू लागले होतेच अन् वाटलं, त्या रायगडाशी, तिथल्या मातीच्या कणाकणाशी एकरूप झालेले अप्पा माझ्याबरोबर आहेत. आम्ही दोघं भारलेल्या मनाच्या अवस्थेत नि:शब्द चालतो आहोत. जाणवलं, माझ्यापासून ते दूर गेलेलेच नाहीत. यापुढच्या जीवनाच्या पुढल्या सर्व प्रवासात मला त्यांची सोबत आहे.आहेच.. म्हणूनच तर ते आताही माझ्याबरोबर आहेत. त्यांच्या वियोगाच्या दु:खानं तोवर थोडी जडावलेली माझी पावलं हळूहळू हलकी झाली. मनाचं मळभ दूर होऊ लागलं. त्यांच्या ‘असण्याची’ मर्मस्पर्शी जाणीव खूप सुखकर होती.जगदीश्वराच्या मंदिरापासून आमच्या मुक्कामापर्यंत केलेला तो प्रवास सुंदर होता!