आत्तापर्यंतच्या प्रवासानं जागृत आणि सुप्त मनावरती काही छापे मारून ठेवलेले आहेत, त्यातूनच जाणिवांचा पैस विस्तारत गेला. कुठलाच प्रवास हा निरर्थक नसतो हेही जाणवलं आणि त्या त्या वेळी भेटलेली माणसं, त्या वेळचे अनुभव हे सगळं आज कुठे तरी लिखाणाची शिदोरी म्हणून कामाला येतं. किती तरी प्रतिमा, पदचिन्हं यांचा आढळ पुढे कुठे तरी लेखनात नकळत प्रकटून जातो, कारण तो नकळतपणे तुमच्या चिंतनावरही एक गहिरा परिणाम करून गेलेला असतो.’’ सांगताहेत नाटककार अभिराम भडकमकर.

दीड वर्षांपूर्वी पुतण्यानं आम्हा सगळय़ांना भेट म्हणून काश्मीर ट्रिपला नेलं. तेव्हा विमानातून बाहेर बघत असताना, एक विचार मनात आला, की गेल्या कित्येक वर्षांत केवळ पर्यटनासाठी म्हणून मी कधी कुठे गेलेलोच नाही. कधी सेमिनार, कधी शूटिंग, व्याख्यान, कार्यशाळा किंवा मग मीटिंग्ज. केवळ फिरण्यासाठी, कामाशिवायचा प्रवास अलीकडे झालेलाच नाही. अगदी लहानपणी प्रवास व्हायचा तो घरच्या लोकांबरोबर, शाळेतल्या सहलींवेळी किंवा मित्रमंडळींबरोबरची भटकंती यामुळे. अर्थात या प्रवासातही एक जाणवायचं, की प्रवास म्हणजे आपल्या नेहमीच्या चौकटीतून बाहेर पडून एक वेगळं जग आणि जगणं अनुभवायला मिळणं. आज असं लक्षात येतं, की त्याही प्रवासानं जागृत आणि सुप्त मनावरती काही छापे मारून ठेवलेले आहेत आणि त्यातूनच जाणिवांचा पैस विस्तारत गेला. कुठलाच प्रवास निरर्थक नसतो. त्या वेळेला पाहिलेली माणसं, त्या वेळचे अनुभव हे सगळं केव्हा ना केव्हा लिखाणाची शिदोरी म्हणून कामाला येतं. अबोध वयामध्ये पाहिलेली लेणी कुठेतरी ‘देहभान’ नाटकामध्ये उमटतात. गाणगापूरला अनुभवलेला भूत काढायचा विधी ‘झाड’ एकांकिकेमध्ये नकळतच उतरलेला दिसतो.  किंवा ‘इन्शाअल्लाह’ कादंबरीमधल्या जुल्फीची ताजमहालाकडे पाहण्याची नजर ही मी ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मध्ये असताना ‘ताज’ पाहायला गेलो होतो त्या वेळच्या अनुभवाशी समांतर असते. हे झालं प्रत्यक्ष उदाहरण देता येण्यासारखं. परंतु कितीतरी प्रतिमा, पदचिन्हं यांचा आढळ पुढे कुठेतरी नकळत लिखाणात प्रकटून जातो, कारण तो नकळतपणे तुमच्या चिंतनावरही एक गहिरा परिणाम करून गेलेला असतो.

little girl lavni dance in nauvari saree on marathi song Mala Pirtichya Jhulyat Jhulwa video goes viral
“मला पिरतीच्या झुल्यात झुलवा अन् इश्काचा गुलकंद खिलवा” गाण्यावर चिमुकलीची जबरदस्त लावणी; काय ती ‘कातील अदा’ VIDEO एकदा पाहाच
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Boy set fire to Akash Kandil
VIDEO: “ही कार्टी काय करतील त्याचा नेम नाही” खेळता खेळता चक्क कंदिल पेटवला; पुढे जे घडलं ते पाहून पोट धरुन हसाल
Siddharth Chandekar
“असं कसं तुटेल?”, सिद्धार्थ चांदेकरने सादर केली नात्यांवर आधारित कविता; म्हणाला, “आठवणींची जागा अहंकारानं…”
Zebra vs Crocodile fight video zebra escaped from crocodiles jaws netizens were shocked video goes viral
“नशीब नाही प्रयत्नांचा खेळ” मगरीच्या जबड्यातून असा निसटला झेब्रा; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
Paaru
Video: “देवीआईंनासुद्धा कळायला पाहिजे…”, पारू अनुष्काचे सत्य अहिल्यादेवीसमोर आणणार? मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
regenrative tourism
नवीन वर्षापासून तरुणांमध्ये का वाढतोय ‘Regenerative Tourism’चा ट्रेंड?
Young man draws beautiful picture of conductor on ticket video goes viral
“कधीतरी दुसऱ्याच्या आनंदाचे कारण बना”, तरुणाने तिकिटावर रेखाटले कंडक्टरचे सुंदर चित्र, Viral Video पाहून चेहऱ्यावर येईल हसू

 महाविद्यालयीन काळात अवघ्या महाराष्ट्राचा प्रवास झाला, तो वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्तानं. या प्रवासात कोल्हापूरच्या पलीकडला महाराष्ट्र तर समजलाच, पण महाराष्ट्रातल्या विविध गावच्या मित्रमंडळींचा झालेला परिचय समृद्ध करून गेला. कोकण, विदर्भ, मराठवाडा असा वेगवेगळा महाराष्ट्र नजरेखालून गेला. विविध बोली, लहेजा, चालीरीती आणि एकूणच विचार करण्याची पद्धत या सगळय़ांतून महाराष्ट्र उमगत गेला. लाल डब्यातून केलेला हा प्रवास निश्चितच आनंददायी तर होताच, परंतु एक वेगळं भान देणाराही होता, स्वत:च्याच  सांस्कृतिक आणि सामाजिक परिसराबद्दल.  पुढे  कुठल्या ना कुठल्या तरी निमित्तानं देशात, परदेशामध्ये फिरायची संधी मिळत गेली. त्यानिमित्तानं वेगवेगळी प्रेक्षणीय स्थळं पाहणं आलंच. जीएंच्या कुठल्यातरी एका कथेमध्ये एक वाक्य आहे, ते शब्दश: आठवत नसलं तरी त्याचा साधारण अर्थ असा आहे, ‘तू काही शेकडो मैलांचा रस्ता गिळत पर्यटनस्थळांना जाऊन केवळ अंग आदळून येणाऱ्यातला नव्हेस..’ यात केवळ अमुक एक देश अमुक एक पर्यटनस्थळ आपण पाहिलं, असं म्हणून टिकमार्क करण्याची प्रवृत्ती खूप छान अधोरेखित केली आहे. हा फरक जाणवला जेव्हा ‘एनएसडी’त असताना आम्ही अजिंठा पाहायला गेलो. शाळेच्या सहलीत अजिंठा पाहिला होता, त्याचा इतिहास सरांनी सांगितला होता आणि आम्ही त्या सहलीत खूप मजाही केली होती. पण ‘एनएसडी’च्या आमच्या ‘सौंदर्यशास्त्र’ या विषयाच्या शिक्षिका विदुषी

 निभा जोशी यांनी ज्या पद्धतीनं आम्हाला सौंदर्यशास्त्राच्या अंगानं अजिंठा समजावून सांगितला.. एकेका गुहेमध्ये तासंतास उभं करून त्या जेव्हा ती वस्त्रप्रावरणं, त्यांचे रंग, चेहऱ्यावरच्या भावमुद्रा, देहबोली या सगळय़ाबद्दल बोलत होत्या, तेव्हा लक्षात आलं, कुठलंही पर्यटनस्थळ समजून घेणं म्हणजे त्या पाठीमागचा विचार समजून घेणंच असतं. बोधिसत्वाच्या मिटलेल्या पापण्यांच्या आतले भाव समजून घेणं किती महत्त्वाचं आहे हे तेव्हा कळलं. अजिंठाच्या कलावंतांचा त्यामागचा विचार आणि तत्त्वज्ञान कळलं. आणि मग पुढे कुठलाही प्रवास करत असताना, कुठलंही स्थळ पाहात असताना त्याच्या ऐतिहासिक माहितीबरोबरच त्या पाठीमागचा विचार, त्यामागचं तत्त्वज्ञान समजावून घेण्याचा नकळत छंदच जडला. विदेशात फिरताना जाणवू लागलं, की आपण आपल्या देशातल्या पर्यटनस्थळांचा आदरच केलेला नाही. त्यांचा विकासही केला नाही. त्यामध्ये असलेला विचार आणि तत्त्वज्ञान ही आपल्या भारतीय संस्कृतीची ओळख ठरू शकते हे आपल्याला कधी फारसं जाणवलंच नाही. मग परदेशामध्ये अत्यंत थातूरमातूर घटना घडलेल्या स्थळांनाही ज्या पद्धतीनं पर्यटनस्थळ बनवून ते ‘विकण्याची’ प्रवृत्ती दिसते, ती पाहता किमान आपली पर्यटनस्थळं विकसित करून जगाला त्यामागे असलेला आपला विचार तरी आपल्याला मांडता आला असता, अशी खंत नेहमी वाटते.

जॉन एफ. केनेडी यांची हत्या ज्या ठिकाणी झाली, ते स्थळ त्यांनी आकर्षणाचं केंद्र करून टाकलं आहे. ते पाहायला मिळालं. अगदी त्या मजल्यावर जाईपर्यंत विविध छायाचित्रं, ध्वनिचित्रफिती यातून अमेरिकेचा सगळा इतिहास तुम्हाला दाखवला जातो. जिथे हत्या झाली, तो काळ रीक्रीएट म्हणजे पुनर्निर्मित केलेला असतो. त्याच पद्धतीचे पुठ्ठय़ाचे बॉक्सेस, त्याच पद्धतीचं पिस्तूल आणि अक्षरश: तिथून आपल्याला खाली पार्क केलेली गाडी पाहायला मिळते. कुठनं गोळी मारली गेली, कुठे गोळी मारली गेली, हे सगळं त्यांनी पुन्हा निर्माण केलेलं असतं. आणि उतरून खाली जाताना अर्थातच मिळतात ते त्यासंदर्भातले टी-शर्ट,  मग्ज, की-चेन्स आणि अन्य भेटवस्तू! पर्यटनाच्या पाठीमागचा व्यापार त्यांना निश्चित कळला आहे आणि आपल्याला आपल्या पर्यटनस्थळांमागचा विचारही निश्चित कळलेला नाही, हे पाहून निश्चितच दु:ख होतं. असं असलं, तरी प्रवासातली खरी गंमत असते तुम्हाला भेटलेल्या माणसांची. ते तुमचा दृष्टिकोनच बदलून टाकू शकतात. उदाहरणार्थ, ऑस्ट्रेलियात एकदा ट्रेननं जात असताना एक प्रौढ बाई माझ्यासमोर बसल्या होत्या. त्यांच्याशी गप्पा मारताना एकूण भारतातलं नाटक वगैरे याविषयी सांगत होतो. त्या वेळी त्यांनी विचारलं, ‘‘तू नाटकं लिहितोस ती सादर झाली आहेत का?’’ म्हटलं,‘‘हो सादर झाली आहेत. त्यांची पुस्तक प्रकाशित झाली आहेत.’’  तर त्या चकितच झाल्या. म्हणाल्या, ‘‘तुझी पुस्तकं प्रकाशित झाली आहेत?’’ आणि मग माझ्याकडे कौतुकाने पाहत म्हणाल्या, ‘‘तू जेव्हा माझ्या वयाचा होशील तेव्हा तर प्रोफेसरच झाला असशील.’’ मी मनातल्या मनात म्हटलं, ‘अहो बाई, प्रोफेसर होशील हा आशीर्वाद आमच्या देशामध्ये फारसा उत्साहवर्धक नाही!’ पण त्या देशांमध्ये लेखक, विचारवंत, शिक्षक यांचा किती आदर केला जातो हे त्या एका उदाहरणातून कळलं.

तुमच्या जुन्या समजुती प्रवासात पुसून जातात, हा आणखी एक प्रवासातला साक्षात्कार. ऑस्ट्रेलियातच मी तिथलं ‘नाइट लाइफ’ही पाहायला गेलो होतो. ‘स्ट्रिप्टीज’ म्हणजे एकामागोमाग एक कपडे उतरवणाऱ्या मुलींचा शो, पब्ज, वगैरे सगळय़ा गोष्टी पाहून झाल्यानंतर मी जेव्हा परतत होतो तेव्हा मला ट्रेनमध्ये एक मुलगी दिसली, जी काही वेळापूर्वी ‘त्या’ शोमध्ये काम करत होती. मी मनाचा हिय्या करून तिच्याकडे गेलो. ट्रेनमध्ये तुरळकच लोक होते. मी तिला माझी ओळख करून दिली. माझ्या लक्षात आलं होतं, की ‘मी लेखक आहे,’ असं म्हटलं, की समोरच्या माणसाची (परदेशात तरी किमान) तुमच्याकडे पाहण्याची नजर बदलते. आम्ही गप्पा मारू लागलो. बोलताना त्या ‘शो’चा विषय निघाला.  ती म्हणाली, ‘‘हो, मी वैद्यकशास्त्राची विद्यार्थिनी आहे. माझी फी आणि बाकी आवश्यक गोष्टींसाठी मी हे काम करते आणि मी देहविक्रय करत नाही.’’ मी म्हटलं, ‘‘पण कुटुंब, समाज?’’ ती म्हणाली, ‘‘त्यात काय? आमच्या अनेकांचे बॉयफ्रेंड किंवा कधी कधी तर नवरेसुद्धा त्यांना सोडायला, घ्यायला येतात.’’ अंगप्रदर्शनाकडे इतक्या वेगळय़ा नजरेनं पाहणं हे माझ्या तरी धारणा आणि समजुती यांना धक्का देणारं होतं. असे सांस्कृतिक धक्के आपल्याला बसत जातात आणि प्रवासात एक वेगळी संस्कृती आणि जगण्याकडे पाहण्याचा एक वेगळा विचार तुम्हाला मिळतो. आणि तो तुम्हाला निश्चितच वेगळय़ा प्रकारे समृद्ध करत असतो. आपल्या काही समजुतीही स्वच्छ होत जातात प्रवासात. एकदा इराणमधला एक विद्यार्थी भेटला आणि मी भारतीय आहे, असं म्हटल्यानंतर त्यानं माझा हात हातात घेत घट्ट दाबत म्हटलं, ‘‘अरे आपण जुने मित्र, सख्खे शेजारी आहोत.’’ आणि त्यानंतर का कुणास ठाऊक इराणकडे पाहण्याची माझी दृष्टीच बदलून गेली. कदाचित मी असं म्हणेन, की स्वच्छ झाली, नितळ झाली. 

सहा महिने काम करायचं, पैसे मिळवायचे आणि ते साठवून न ठेवता प्रवासाला बाहेर पडायचं अशी फिरस्ती परदेशी युवक मंडळी मला भेटत. तेव्हा वाटायचं, की त्यांच्या आणि आपल्या जगण्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनातच फरक आहे. कदाचित त्यांच्या सरकारनं त्यांचं वृद्धत्व सुरक्षित करून ठेवल्यामुळेही असेल, परंतु साठवण्यापेक्षा उपभोग घेण्याची त्यांची प्रवृत्ती अधिक आहे हे जाणवत गेलं. जीएंच्या भाषेतलं ‘अंग आदळून’ येण्यापेक्षा माणूस आणि संस्कृती, माणूस आणि त्याचं जगणं समजावून घेणारे प्रवास मला खूप महत्त्वाचे वाटतात. तेच अधिक मौजेचे असतात. सुदैवानं त्या त्या ठिकाणची अनेक माणसं मला अशी भेटत गेली, की ज्यांनी पर्यटनस्थळाच्या पलीकडचं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न केला. याबाबतीत मी खरोखरच सुदैवीच!  ऑस्ट्रेलियामध्ये प्रचंड मोठय़ा बजेटचा ऑपेरा पाहिल्यानंतर छोटय़ा छोटय़ा शंभर दीडशे प्रेक्षक संख्या असलेल्या नाटय़गृहांमधली नाटकं  पहायला घेऊन जाणारा मित्र भेटला. अलीकडच्या अयोध्येच्या प्रवासात आग्रहानं गुमनामी बाबांची समाधी पाहायला घेऊन जाणारा रिक्षावाला भेटला. काश्मीरच्या आताच्या मोकळ्या वातावरणात गुलजार भेटला. त्याने बेरोजगारीमुळे मध्यंतरीच्या काळ्या पर्वात बंदुका घेऊन  सहभागी तरुणांनी उर्वरित जनसामान्यांना कसे वेठीस धरले होते त्याबद्दल सांगितले.

जशी दुबईत सहयोगी संस्थेची प्रचिती भेटली. एक-दीड दिवसांमध्ये बुर्ज खलिफा,  डेजर्ट सफारी वगैरे या सगळय़ा दुबईची ओळख असलेल्या गोष्टी करून घ्या, असं सांगून तिनं मला वेगळय़ाच दुबई दर्शनाला नेलं. मोहम्मद-बिन-रशीद या माणसानं स्वत:च्या वैयक्तिक रकमेतून उभं केलेलं अनेक मजली ग्रंथालय तिनं मला दाखवलं. अत्याधुनिक!  इथे मोठय़ा हॉलपासून ते चार- पाच, आठ- दहा लोकांच्या गटचर्चेसाठी या ग्रंथालयात दालनं होती. सगळय़ात महत्त्वाचं म्हणजे ज्या ज्या  भाषेतली पुस्तकंआहेत त्या प्रत्येक भाषेत बाहेरच्या उद्यानातल्या खांबांवर सुविचार आहेत! इथे मराठी आणि हिंदीचा खांब सापडला तेव्हा अनाकलनीय आनंद झाला. अस्मिता नव्हे, तर ही आपली ओळख असल्याचं वाटत राहिलं. नंतर केवळ दुबईतील स्त्रियांविषयीचं एक संग्रहालय पाहायला मिळालं. इथे वाळवंटात स्त्रियांनी वापरलेल्या वस्तू, वापरलेले कपडे, इथपासून ते आता दुबईमध्ये पहिली महिला अंतराळवीर तयार होते आहे तिच्यापर्यंतचा प्रवास मांडला होता. तिचा पहिला अबाया, बुरखा, सुई-दोरा, स्वयंपाकाची भांडी, शिवणयंत्र, याबरोबरच मध्यंतरीच्या  सुधारणापर्वामध्ये स्त्रियांनी अकाउंटंट म्हणून केलेली कामं,  त्यांच्या हस्ताक्षरातल्या हिशेबाच्या वह्या, या सगळय़ा गोष्टी त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या होत्या. दुबईतल्या स्त्रीची वाळवंट ते अंतराळ या आतापर्यंतच्या प्रवासाची ही ओळखच मला त्या संग्रहालयानं दिली. हा दुबईचा वेगळाच चेहरा.

जगाच्या पाठीवर माणूस जरी एकच असला तरी आजूबाजूचा निसर्ग, पर्यावरण, सामाजिक, राजकीय परिस्थिती यातून त्यानं आपलं जगणं कसं समृद्ध केलं, विकसित केलं किंवा बरबाद केलं, या सगळय़ाचा धांडोळा प्रवासातून मिळत जातो. आणि मग ज्या निमित्तानं प्रवास झाला त्यापलीकडेही काहीतरी मिळत जातं, सापडत जातं, जे माणूस आणि त्याचं जगणं यासंबंधीचं तुमचं आकलन वाढवत जातं. मात्र मला कधीच प्रवास वर्णन लिहावंसं वाटत नाही.  पु.ल. देशपांडेंनी विनोदाच्या आवरणाखाली खरंतर अत्यंत गंभीरपणे ते जिथे जिथे गेले तिकडचा माणूस चितारलेला आहे. मला मात्र हे सगळं पुन्हा सांगण्यापेक्षा मनात साठवून ठेवणं अधिक आवडतं. प्रवासही मला एकटय़ानं करायला जास्त आवडतो. शेकडो मैलांचा रस्ता गिळत, अंग आदळत जरी तो झाला, तरी परत येताना मी काही ना काही तरी घेऊनच आलो आहे. एक शिदोरी आयुष्याच्या पुढील प्रवासासाठी! ऑस्कर वाईल्डला न्यू यॉर्कमध्ये विमानतळावर विचारलं गेलं होतं, ‘एनीथिंग टू डिक्लेअर?’ तो म्हणाला होता, ‘निथग अदर दॅन माय जिनियस!’ प्रवासाहून परत येताना मलाही इतकंच म्हणावंसं वाटतं. अनुभव, आकलनात झालेली वाढ, जगण्याचं आलेलं भान, आणि आपल्या मर्यादा, खुजेपणाची होणारी जाणीव, याव्यतिरिक्त मी काय डिक्लेअर करू शकतो?

Story img Loader