गजेंद्र अहिरे
माझा ठरवून कुठलाच प्रवास झाला नाही; पण सिनेमाच्या पाठीवर बसून अर्ध जग फिरलो. अनेक अनुभव घेतले. वेगवेगळय़ा देशांतल्या त्या त्या जागेला एक गंध असतो. तो ओळखीचा होऊ लागतो आणि नकळत मनातला पावसाळी कोकणातला गंध त्यात मिसळू लागतो, अनुभवाला वेगळा कंगोरा मिळतो! माझा कॅमेरा नेहमीच ठिकठिकाणच्या विशिष्ट चौकटी टिपतोच; पण मनाला एक वाइड लेन्स आहे आणि त्याची अमर्याद फूटेज साठवण्याची क्षमता! जिथे जाईन तिथली चित्रं भरभर उमटत जातात मनात.. अखंडपणे !
नशिबात भटकंती असणं आणि त्यातच भटकायची भयंकर आवड असणं, या दोन्ही गोष्टी जुळून आल्यावर काय होतं याचा अनुभव मी सतत घेत आलोय. माझ्या येत्या सिनेमात मी लिहिलं, ‘चल भटकू! थोडे थोडे! तू तुझ्या काठाने, मी माझ्या काठाने!’ आणि ध्यानीमनी नसताना हे शूट झालं चिंचीस्टरच्या (इंग्लंड) ‘बार्ज इन’मध्ये, हे ‘बार्ज इन’ म्हणजे १८१८ मध्ये एका कॅनॉलवर बांधलेला टोल नाका. सुंदर ब्रिटिश दगडी इमारत. शेजारून गावभर, देशभर फिरून आलेला कॅनॉल आणि त्यात लांबडय़ा होडय़ा. होडय़ा कुठल्या.. घरंच ती! ते लोक त्या होडय़ांमध्येच राहतात आणि भटकतात. टाळेबंदीच्या वेळी त्यांना इथे ‘बार्ज इन’ला थांबवून ठेवलेलं होतं सहा महिने. कंटाळलेले होते लोक. ‘बार्ज इन’च्या मागे विस्तीर्ण मैदानावर, ‘वीकेंड’ला कॅम्पिंगसाठी येतात लोकं. तेही बंद होतं टाळेबंदी असल्यानं.
पण नंतर माझं युनिट शूटला गेलं तिथं आणि सगळय़ा होडकऱ्यांमध्ये उत्साह संचारला. ते आमच्यात सामील झाले आणि चार दिवस उत्स्फूर्तपणे मोठा कॅम्प झाला तिकडे. हे लोक होडय़ा घेऊन युरोपभर भटकत असतात. त्यातल्या एका होडीत अख्खी लायब्ररी होती आणि वाचनाचं वेड असलेला नावाडी. एका होडीत जगभरात जमवलेल्या कुठकुठल्या वस्तू होत्या. रेकॉर्ड्स, मूर्ती, कप, किल्ल्या, माळा, वाट्टेल ते! एकात एकटा माणूस आणि त्याची मांजर. एकसे एक अवलिये भेटले. त्यांच्याबरोबर राहिलो, बोललो, पाटर्य़ा केल्या. एक जिव्हाळा, स्नेह निर्माण झाला. या माणसांना आपण या जन्मात पुन्हा कधीही भेटणार नाही आहोत, याची पूर्ण जाणीव होती. हे पूर्ण वर्तमानातलं जगणं होतं. त्या तेवढय़ा दिवसांपुरतं! पण तरी जिव्हाळा होता. ती माणसं खूप नाचली, गायली, शूट एन्जॉय केलं. सहभागी झाली आणि कायमची स्मृतींमध्ये वस्तीला आली. एक ‘कॉन्सन्ट्रेटेड’ अनुभव! त्यात त्या कॅनॉलमध्ये बागडणारी हंसाची जोडीसुद्धा आहे. सांगताना खोटं वाटावं असं आहे ते. ‘शूटिंगला या,’ असं ओरडल्यावर हंस आला. ‘जा, बायकोला घेऊन ये,’ असं म्हटल्यावर परत गेला आणि हंसीणही आली. ‘रिटेकला परत ये,’ असं म्हटल्यावर परतही आले. हे सारं काही ‘मेकिंग ऑफ सिनेमा’ करणाऱ्यानं रेकॉर्ड केलंय पूर्ण. संपूर्ण यूनिटनं प्रत्यक्ष पाहिलंय! यावरून पूर्वीची एक गोष्ट आठवली- एकदा गगनबावडय़ाला शूट करत होतो. धुकं दाटलेलं, ढग आलेले, पावसाला म्हटलं, ‘ये, आता शॉट आहे; ये,’ आणि तो आला! ‘आता जा,’ म्हटलं तर गेला. हेही संपूर्ण युनिटनं पाहिलं होतं! मग मी माझ्या सिनेमाला म्हटलं, ‘आता गर्दी ओढ!’ फेस्टिव्हलचे शो सोडून; ते त्यानं कधीच ऐकलं नाही! तिकीट काढून गर्दी काही जमली नाही. हे असंच होतं! असो.
खरं तर माझा ठरवून कुठलाच प्रवास झाला नाही, पण सिनेमाच्या पाठीवर बसून र्अध जग फिरलो. अनेक ठिकाणं आठवताहेत आणि त्याबरोबरीने घेतलेले अनुभवही. जर्मनीत ‘बव्हेरिया फिल्म्स’मध्ये होतो. सकाळी उठून स्टुडिओत जायचो. त्यांनी मला विचारलं, ‘‘काय बघायचं आहे?’’ मी म्हणालो, ‘‘इथली खेडी बघायची आहेत.’’ त्या वेळी ते शक्य झालं नाही, पण एकदा ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’ संपल्यावर मी, वृंदा (बायको) आणि दीपक (निर्माता दीपक कुमार) आम्ही साडेतीन हजार किलोमीटरचा प्रवास केला. युरोपातली खेडी पाहिली तेव्हा जवळून. खेडय़ात राहिलो तेव्हा कोकणातल्या गावांची आठवण येतच राहिली..स्वीडनच्या ‘उपसाला’मध्ये एका खेडय़ात राहिलो होतो ‘डिअर मॉली’ चित्रपटाच्या वेळी. तेव्हाही असंच झालं. कोकणातल्या गावांना एक गंध आहे, जो तिकडे जाणवला.
एकदा लोकार्नोला राहिलो होतो. गाडी पार्क करायची होती. मी नॅव्हिगेटरची जबाबदारी घेतली होती. एक वळण अलीकडचं सांगितलं चुकून. समोर आमची इमारत दिसते आहे, पण वळावंच लागलं. चुकल्यामुळे तो रस्ता सरळ एका बोगद्यात शिरला आणि मग संपेचना! साधारण बारा-पंधरा मिनिटं वेगानं जातच राहिलो. बाहेर आलो तेव्हा आम्ही दुसऱ्या शहरात पोहोचलो होतो! आता रस्ता चुकणं हे काही नवीन नाही आणि अचानक नवी वाट सापडणं तर त्याहून नेहमीचं झालेलं.
गेले दीड वर्ष खूप भटकंती झाली. एका ‘ट्रायलॉजी’वर काम करतोय. ही गोष्ट मालवण, उझबेकिस्तान, स्पेन, लंडन आणि मग स्कॉटलँडपर्यंत पोहोचते. असा त्या कथेचा प्रवास. त्याची लोकेशन्स बघायला आधी यू.के.ला गेलो. तिथून रस्त्यानं बर्मिगहॅमला गेलो आणि मग ऑस्लो गाठलं. मनासारखं काही मिळेना. यू.के.मध्ये एक बरंय, जागोजागी, भारतीय रेस्टॉरंट मिळतात, उत्तम जेवण मिळतं. तिथून एडनबर्ग आणि मग खूप दूर एविमोरला (स्कॉटलँड) गेलो. परफेक्ट जागा मिळाल्या. एविमोरच्या टेकडय़ा सुंदर आहेत. एविमोरवरून आठवलं, एकदा माझे वडील म्हणाले होते, ‘‘इतका कुठे कुठे भटकत असतोस तू सतत, मी जाईन तेव्हा येशील ना परत.’’ मी त्यावेळी एविमोरहून बर्मिगहॅमला परत आलो होतो आणि सकाळी बातमी मिळाली की ते गेले!
इथून पुढे आता एक वेगळा प्रवास..
तर,स्कॉटलंडच्या एविमोरमध्ये आम्ही लोकेशन शोधत होतो. मी म्हणालो, ‘‘बर्फात हे फार ग्रेट दिसेल. आपण बर्फ पडेपर्यंत थांबू आणि परत येऊ.’’ आम्ही शूटिंग लांबवलं, पण नंतर तिकडे जाताच येईना. वेगवेगळय़ा अडचणी येऊ लागल्या आणि त्या सोडवताना भलतंच काही हाती लागलं. रशिया साबेरियातून, खांती मानसीस्क प्रांतातून बोलावणं आलं. तयारी झाली आणि पोहोचलो. मॉस्कोपासून तीन तासांची फ्लाइट उत्तरेकडे. मार्च संपला होता. तरी फूटभर पाय आत जातील एवढा बर्फ. हे असं असतं! आपल्या हाती काही नसतं. जे जिथे शूट व्हायचं असतं ते तिथेच होतं. तो सिनेमाच मला तिकडे घेऊन जातो. कित्येकदा आलेला तोच अनुभव पुन्हा आला. खांती मानसीस्क छोटंसं शहर आहे. ऑिलपिकचे स्पर्धक तयार करण्यासाठी शाळा आहेत तिथे. स्पोर्ट सिटी म्हणू शकतो. शहरं इतकी लहान, की पंधरा-वीस मिनिटं गाडीनं चक्कर मारली की शहर संपे. त्यामुळे थोडेसेच लोक, थोडाशाच गाडय़ा. तिथल्या गव्हर्नरांनी आमंत्रण दिलं. गेलो. ते चित्रपटाचे ऑफिशियल पार्टनर झाले. तिथे उणे चौदा अंशात आम्ही उतरलो होतो. आमची थंडीची तयारी विमानतळाबाहेर आल्या आल्या गळून पडली. अतिशय नम्र, प्रेमळ माणसं. कमी गर्दी असली की माणसं अशी होत असतील का? त्यांनी आधी जॅकेट्स दिली आम्हाला आणि बूट. मग बाकी सगळं. खांती, मानसीस्क दोन मूळ आदिवासी जमाती. त्या नावानंच शहर वसलेलं. त्यांची मूळ घरं म्हणजे उंच बांबूचे एकमेकांना आधार आणि त्यावर रेनडियरचं कातडं पांघरलेलं. आतमध्ये शेगडी. ती ‘ओरिजनल’ घरं, हस्की कुत्रे, कुत्र्यांच्या गाडय़ा आणि मुख्य म्हणजे त्यांची मूळ भाषा. हे सगळं अजूनही त्यांनी तिथे जपलंय. शाळेत त्या भाषेतून शिक्षण देण्याची सोय आहे. जर्मनीच्या एका शाळेत मला यासोबतच वेगळा अनुभव आला. तिथे व्रात्य मुलांचा वेगळा वर्ग होता. जसा आमचा वेगळा ‘ड’ वर्ग असायचा. त्या शाळेत त्या मुलांचा सिलॅबस वेगळा होता. मी विचारलं, ‘‘असं का?’’ शिक्षक म्हणाले, ‘‘आम्हाला फक्त इंटेलेकच्युअल्स नाही, तर त्याबरोबरीनं स्पोर्ट्समन, फायरमन, पोलीस आणि सैनिकही तयार करायचे असतात.’’ मला हे फार आवडलं होतं. लहानपणी आपणही अशा व्रात्य मुलांच्या गटात होतो. आनंदच वाटला!
तर, खांती मानसीस्कमध्ये आम्हाला दिला गेलेला टीम लीडर इंग्लिश बोलू शकत होता, बाकी सगळे जण रशियन भाषेत बोलत होते आणि आम्ही आमच्या भाषेत. आणि तरीही फार अडचण आली नाही. लेन्स बदलायचीय, ट्रॅक लावायचेत, जे काही असेल ते सांगण्या-समजण्याची आमची आमची एक स्वतंत्र भाषा निर्माण झाली. वर म्हटलंय तसं, त्या त्या जागेला एक गंध असतो. तो ओळखीचा होऊ लागतो आणि नकळत पावसाळी कोकणातला गंध त्यात मिसळू लागतो मग कोकणाची ओढ लागते.. इथेही तसंच झालं. खांती मानसीस्कच्या बर्फातून एप्रिलला निघालो तो पोहोचलो थेट कुडाळमध्ये. एप्रिलच्या दुसऱ्या आठवडय़ातल्या घामाच्या धारा, पण समोर समुद्री लाटा. सिनेमा जेव्हा एडिटिंगच्या वेळी बघत होतो, तेव्हा तिथे होती, सौंदर्याची जुगलबंदी.. शुभ्र काही जीवघेणे आणि हिरवे हिरवे गार गालिचे!
खांती मानसीस्क-रशियाच्या बर्फात जाण्याआधी तिसऱ्याच एका सिनेमासाठी चंबळच्या खोऱ्यात होतो. राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या बॉर्डरवरचा हा प्रदेश. आग्र्याला उतरून गेलो. मातीच्या टेकडय़ा आणि भयानक ऊन. एक वेगळाच तपकिरी रंग. त्याचाच पुढचा भाग म्हणून जोधपूर ते जैसलमेर प्रवास केला. वाळूच्या टेकडय़ा हा मुख्य भाग होता. घसरत्या वाळूत अनवाणी चालत होतो. डोळय़ासमोर पटकथा सरकत होती. एका टेकडीवर दूर एकच झाड होतं. विसावण्याला उंट जमले होते. चंबळची नदी, वाळूच्या टेकडय़ा, जोधपूरचा बाजार.. तिथून पुन्हा कोकणातून आलो आणि नंतर एका पुढे होऊ घातलेल्या सिनेमासाठी पुन्हा पहलगामला जावं लागलं. श्रीनगरला उतरून थेट पहलगाम गाठलं. अखंड प्रवास!
रात्र झाली होती. पुढे पांढरीशुभ्र नदी खळखळ वाहताना पहिली. जंगलात एक घर शोधायचं होतं. चालत निघालो. उंचच उंच देवदार. पुढे मोठे डोंगर आणि भुरभुरता पाऊस. पायाखाली चिखल आणि तीच, तशीच कफ्तान घातलेली प्रेमळ माणसं सोबत. एका गावात एका सरपंचाच्या घरी त्यानं खूप मायेनं बोलावलं; पण मनात धाकधूक. (असा संशय कुणी घातला असेल आपल्या मनात?) पण तिथे भटकताना मात्र नॉर्मल वाटलं सगळं. त्यानं मीठ घातलेला नमकीन चहा आणि रोटी-नान दिली खायला. दोन दिवसांत हवी ती लोकेशन्स मिळाली. काश्मीरचा मागचा अनुभव मात्र भयंकर होता. अगदी जिवावर बेतलेला! अख्खं युनिट घेऊन सोनमार्गला अडकलो होतो. या वेळचा अनुभव मात्र अगदी उलट. मग श्रीनगर, दल लेक, लाल चौक, मस्त बिर्याणी आणि शूटिंगची तयारी.
सुरुवात झाली मिरजच्या सिद्धे वाडीचा माळ येथे. खूप शूटींग झालं. तिथून पुढे लेह- लडाखचे खारदुंगला पास, ते पॅनगॉग लेक, असं केवढं काय काय बघून झालं. कॅमेऱ्यानं विशिष्ट चौकटी टिपल्या. मनाला एक वाइड लेन्स आहे आणि त्याची अमर्याद फूटेज साठवण्याची क्षमता! एकदा क्रुजवरून चीनच्या एका गावात उतरलो होतो. सगळय़ा दुकानांत दुकान चालवणाऱ्या मुलीच होत्या. मी एकीला विचारलं, ‘‘इथे कुठेच पुरुष नाहीत का दुकानावर?’’ ती म्हणाली, ‘‘पुरुष सैन्यात आहेत किंवा कारखान्यात.’’ हा एक प्रसंग मला शॉर्ट फिल्मचा विषय देऊन गेला.
स्नोफॉल, भुरभुरता बर्फ आणि गुडघ्यापर्यंत बर्फात रुतलेले पाय. गोठलेल्या नद्या, त्यावर चालत जाणं. मेणासारखी मनातून वितळलेली माणसं, मायेनं पाझरणारी माणसं. गोठलेल्या नदीत रुतलेली होडी, ती ओढताना त्याच नदीत रुतलेली मॅटेडोअर गाडी आणि तिला सोडवणारी माणसं. उंचच उंच सूचीपर्णीचं जंगल. निळाशार समुद्र, आमराया, माडाची झाडं, हंबरणाऱ्या म्हशी. गारठलेल्या मांजरी. उन्हात लोळणारे कुत्रे. असंख्य रंगीत मण्यांमधून दोरा जावा, तसं झालं मला! त्या सहा-आठ महिन्यांत मनात, जिवात, डोक्यात, डोळय़ांत सिनेमा असला, की हे सगळं आहे त्यापेक्षा वेगळं दिसू लागतं.
आमची छोटी अभिनेत्री मनवा बर्फात पाणी ओघळून तयार झालेल्या आईस स्टिक्स गोळा करत होती. म्हणाली, ‘‘माझ्या तलवारी आहेत या!’’ ‘‘अगं, पण त्या वितळून जातील.’’ म्हटल्यावर त्यावर तिनं उपाय शोधून ठेवला होता. ती म्हणाली, ‘‘मी या इथेच बर्फात गाडून ठेवणार आहे. म्हणजे मी पुन्हा आले, की माझ्यासाठी असतील त्या इथे.’’ किती करेक्ट उमगलंय तिला! जिथलं तिथे सोडून यावं.
.. एक साधू वेगात चालत होता. मागून तुफान वारा येत होता. त्याचे केस सतत मागून पुढे तोंडावर येत होते. त्यानं विचार केला, हा काय त्रास? आपल्याला कुठे पोहोचायचं आहे. आपण उलटय़ा दिशेनं चालू. निदान केस तरी मागच्या मागे उडतील! आणि तो उलट; म्हणजे आता सुलट दिशेनं चालू लागला..