मुग्धा गोडबोले
मला एकटीनं प्रवास करायला आवडतो. असा प्रवास मला दर वेळी काही क्षण का होईना, एक लय, गती, एकतानता मिळवून देतो.. पण मला अंतर्मुख करणारा एक प्रवास म्हणजे ‘रॉयल एन्फिल्ड ३५० सी. सी.’ बुलेट चालवत लेह-लडाख फिरले तो. सात दिवसांचा तो प्रवास माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर प्रवास. त्या प्रवासात, बाइकचा आवाज आणि कधी सुंदर, कधी भीतीदायक, कधी अचंबित करणारा, कधी हरखून टाकणारा निसर्ग, एवढंच माझ्याबरोबर होतं. जमिनीपासून सतरा हजार फुटांवर बर्फानं आच्छादलेल्या त्या डोंगरांतून संथ लयीत बाइक चालवताना कुमार गंधर्वाचं ‘शून्य गाढ शहर’ मनात आपोआप घोळायला लागलं आणि अक्षरश: काही क्षण काळ थांबल्यासारखं वाटलं.. मला ओढ असते ती अशा ‘विसंवाद’ नसलेल्या प्रवासाची.. त्या शांततेची, त्या तृप्तीची.
शाळेत असताना, आठवी का नववीत असताना ते आता आठवत नाही; पण मराठीच्या पुस्तकात ना. सी. फडके यांचा एक धडा होता. त्यात एक वाक्य होतं की, ‘चालणं आणि बोलणं, यांचा स्वभावत:च विसंवाद असतो’. त्या वयात ते वाक्य माझ्या मनात इतकं का खोलवर रुजलं मला माहीत नाही; पण ते इतकं पटलं, भिडलं, की त्यानंतर असंख्य वेळा मी स्वत:च्या मनाशी ते वाक्य बोलले आहे. आज ३५-३७ वर्षांनंतरसुद्धा माझ्या ते लक्षात आहे. चालणं आणि बोलणं, यांचा स्वभावत:च ‘विसंवाद’ असतो!
चालताना फक्त चालावं! एक तर लहानपणी माझं एकूणच चालणं खूप व्हायचं. शाळेत असताना मी तरी खूप ठिकाणी चालत जायचे. म्हणजे तेव्हा तीच पद्धत होती. लांब जायचं असलं तर सायकलवरून; पण दिवसभरात अनेक गोष्टी पायी चालत जाऊनच व्हायच्या. तेव्हाही मला चालतानाचा तो एकटेपणा आवडायचा. म्हणून कदाचित मला ते वाक्य इतकं आवडलं असावं. चालताना शांतपणे आपल्याच नादात चालावं. चालताना आपली पावलं एकापाठोपाठ एक, आपण कुठलीही सूचना न देता एका विशिष्ट गतीनं पुढे जात असतात. आपण आपल्याच नादात असतो. आजूबाजूच्या छोटय़ा छोटय़ा गोष्टी बघत असतो. यात वेगळी व्यक्ती आली, बोलणं आलं, की चालण्याची एकतानता जाते, लय जाते. आपण बोलायला लागलो, की पावलांची गती बदलते. तो तो क्षण असतो. त्या क्षणाची काही तरी एक मागणी असते. चालताना आपल्या पायांना, मनाला, बुद्धीला फक्त शांतपणे आपल्या मार्गानं चालू द्यावं.
असंच, मला प्रवासाबद्दल वाटतं. प्रवासाचे हेतू शेकडो, प्रकार असंख्य, गरजा वेगळय़ा, पद्धती खूप असतात. त्या त्या वेळी आपण ते करतही असतो; पण मनातून मला एकटीला प्रवास करायला आवडतं. प्रवासात आपण शंभर टक्के खरे असतो. एकटीनं केलेला प्रत्येक प्रवास मला दर वेळी काही क्षण का होईना, ती लय, गती, एकतानता मिळवून देतो. माझ्या नकळत माझं आजूबाजूच्या माणसांचं निरीक्षण सुरू होतं. हा माणूस कुठला असेल? ही बाई का हा प्रवास करत असेल? हा कोण असेल? ही काय वाचते आहे? कोण फोनवर मोठय़ानं बोलतंय? कोण शेजारी बसलेल्याशी कसं वागतंय? काय मजेत वेळ जातो हे सगळं बघण्यात! मी माझ्या व्यावसायिक आयुष्यात सुरुवातीला पुणे-मुंबईदरम्यान खूप प्रवास करत असे; बस, ट्रेन, मिळेल त्या वाहनानं. तेव्हा मी हा मानसिक खेळ खूप खेळायचे.
मुळात एक गोष्ट प्रामाणिकपणे मान्य करते. मी काही फार प्रवासवेडी वगैरे नाही. कामातून सुट्टी घ्यावी आणि खूप प्रवास करावा, असं काही मला सारखं वाटत नाही. एक ट्रिप संपली की पुढची मी लगेच ठरवायला घेत नाही. दर महिन्यात एकदा कुठे तरी गेलंच पाहिजे, अशी काही माझी स्वत:कडून अपेक्षा नाहीये. सुट्टी मिळाली तर आराम करावा, मित्रमैत्रिणींना भेटावं, उत्तम नाटकं-सिनेमे पाहावेत, गाण्याच्या कार्यक्रमांना जावं, पुस्तकं वाचावीत किंवा यातलं काहीही न करता निवांत पडून राहावं, हेही मला तितकंच आवडतं. तरीही प्रवास घडत असतातच. मुंबईत राहात असल्यामुळे जमिनीवरच्या सर्व प्रकारच्या वाहनांचा वापर करून रोजचा प्रवास चालूच असतो. काही तरी गाठायचं असतं. बहुतेक वेळा ट्रॅफिकमुळे उशीर झालेला असतो; पण मला ड्रायिव्हग अत्यंत मनापासून आवडतं. अगदी मुंबईच्या गर्दीतसुद्धा! शूटिंग संपवून किंवा मीटिंगनंतर घरी जाण्याचा जो पाऊण एक तासाचा गाडीतला एकांत असतो, तो मला अत्यंत आवडतो. कारण शूटिंग किंवा मीटिंगच्या निमित्तानं भेटलेली ती चार-आठ-पंधरा-वीस-पन्नास माणसं, ते जग, तो आवाज, हे सगळं मागे टाकून मी माझं घर, त्यातली माणसं, ते विषय या जगात शिरणार असते. त्याच्या मधली ही काही मिनिटांची माझी शांतता मला खूप सुखावते. त्या वेळी मला ना आजूबाजूचं ट्रॅफिक दिसतं, ना त्याचा त्रास होतो. अनेकदा मी गाणीसुद्धा लावत नाही. माझ्याबरोबर कुणी येणार असेल आणि गाडीत बसून ते जोरजोरात फोनवर बोलायला लागले, तर मला राग येतो म्हणून मी ते चक्क टाळते. शांतपणे, संथ लयीत गाडी चालवत जाते. अनेकांच्या दृष्टीनं त्रासदायक असा तो प्रवास माझ्यासाठी मजेचा असतो. हल्लीच्या भाषेत तो मला माझा ‘मी टाइम’ वाटतो.
आयुष्याला कलाटणी वगैरे देणारा माझा प्रवास म्हणजे अर्थातच पुण्याहून मुंबईत स्थायिक होण्यासाठी केलेला. अभिनय, दूरचित्रवाणी, नाटक अशी काही स्वप्नं उराशी बाळगत १९९९ मध्ये मी मुंबईत आले. तो माझा पहिल्या एक-दोन दिवसांचा शहरातल्या शहरात केलेला प्रवास मला लख्ख आठवतो. मुंबई शहराला एक विशिष्ट वास आहे. सतत पाण्याजवळ असल्यामुळे असेल कदाचित! मी जेव्हा पहिल्यांदा मुंबईत ‘काम करायला’ म्हणून आले, तेव्हा नाक, डोळे, कान, मेंदू सगळं इतकं तीक्ष्ण होतं, की तो वास जो जाणवला, तो कायमचा माझ्या मनात राहिला. मी पहिल्यांदा मुंबईत आले त्या दिवशी, सकाळच्या ‘प्रगती एक्स्प्रेस’नं येऊन दादरला उतरून दुसऱ्या ट्रेननं अंधेरीला जायचं, असं ठरलं होतं. त्याप्रमाणे बरंचसं जमलंही, फक्त त्या दिवशी एकूणच गर्दी कमी होती, कारण कुठल्या तरी राजकीय पक्षानं अचानक ‘मुंबई बंद’ केली होती. खरोखरच कडकडीत बंद पाळला गेला होता. पुण्यात ट्रेनमध्ये बसेपर्यंत मला याची कल्पना नव्हती. मला असं सांगण्यात आलं होतं की, ‘तू पाल्र्याला उतर आणि रिक्षा करून अंधेरीला ये. कारण अंधेरी स्टेशनहून कधी कधी रिक्षावाले इतक्या कमी अंतरावर येत नाहीत.’ त्याप्रमाणे मी पाल्र्याला उतरले, पण मला एकही रिक्षा मिळेना. जवळ दोन बॅग्स आणि नजरेला एकही रिक्षा नाही. अशा एका दुपारी पाऊण-एकच्या उन्हात, भूक लागलेली असताना पाल्र्याहून अंधेरीपर्यंत जायचं? काही वेळ थांबून मी चालत निघाले, कारण पर्यायच नव्हता. तोच दोन हवालदारांनी मला बघितलं, चौकशी केली. त्यांनी एका रिक्षावाल्याला बोलावून घेतलं, मला अंधेरीला सोडायला सांगितलं आणि त्या भाऊंनी मला अंधेरीला विजयनगर सोसायटीच्या अगदी दारात सोडलं.
दुसऱ्याच दिवशी एका शॉर्ट फिल्मच्या शूटिंगसाठी अंधेरीहून मुलुंडला जायला निघाले. मुंबईची माहिती नाही, लोकल ट्रेनमध्ये कधी बसलेले नाही; पण चौकशी करत गेले. दादरहून मुलुंडची ट्रेन पकडली. घाटकोपरला डब्यात माझ्या शेजारी बसलेली बाई बकाबका बेगॉन ओकायला लागली. आजूबाजूच्या बायका म्हणायला लागल्या, ‘तिनं आत्महत्येचा प्रयत्न केलाय.’ कुणी तरी साखळी खेचली. ट्रेन थांबली. लोक आले, तिला घेऊन गेले. तिचं पुढे काय झालं मला माहीत नाही; पण मी मुळापासून हादरले होते. मी जिथे माझी स्वप्नं घेऊन माझं आयुष्य घडवायला आले होते, तिथल्या कुणाला तरी या शहरात काय, या जगातच राहायचं नव्हतं, हे मला फार धक्कादायक वाटलं होतं. या दोन दिवसांमधल्या प्रवासानं मला एक वेगळं जग दाखवलं होतं. इतक्या कमी वेळात एवढं अंतर मी त्याआधी कधीच कापलं नव्हतं.
मग मी सरावले; त्या प्रवासाला आणि सगळय़ालाच. हळूहळू कामानिमित्त प्रवास होऊ लागला, नाटकांचे दौरे होऊ लागले. मग पुढे लग्न, मूल, मग सहकुटुंब सहली, ही सगळी स्टेशनं वैयक्तिक आयुष्यात येत गेली. नवीन जागा बघणं, तिथल्या माणसांशी बोलणं, निसर्गरम्य ठिकाणं पाहणं, युरोपात स्वत: गाडी चालवत फिरणं, हे सगळं केलं; पण ते ‘स्वभावत:च विसंवाद’ हे वाक्य मात्र डोक्यात घोळत राहायचं. आणि मग तशी एक संधी माझ्याकडे चालून आली.
हल्ली ‘सोलो ट्रिप’ हा एक फार छान प्रकार सुरू झालाय. अर्थातच सुरक्षिततेच्या सगळय़ा फूटपट्टय़ा लावूनच; पण अशी एखादी ‘सोलो ट्रिप’ करावी, असं बराच काळ माझ्या मनात होतं. २०१९ मध्ये अगदी ‘सोलो’ नाही; पण एका मैत्रिणीबरोबर मी ‘रॉयल एनफिल्ड ३५० सी. सी.’ बुलेट चालवत लेह-लडाख फिरले. तो सात दिवसांचा प्रवास माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर प्रवास होता असं मला वाटतं. त्या सगळय़ा प्रवासात, तो बाइकचा आवाज आणि तो कधी सुंदर, कधी भीतीदायक, कधी अचंबित करणारा, कधी हरखून टाकणारा निसर्ग, एवढंच माझ्याबरोबर होतं. जमिनीपासून सतरा हजार फुटांवर बर्फानं आच्छादलेल्या त्या डोंगरातून संथ लयीत बाइक चालवताना कुमार गंधर्वाचं ‘शून्य गाढ शहर’ मनात आपोआप घोळायला लागलं आणि अक्षरश: काही क्षण काळ थांबल्यासारखं वाटलं. काही वर्षांपूर्वी मला मुंबईनं आल्या आल्या ‘विश्वरूपदर्शन’ घडवलं होतं, लडाखनं मला स्वत:मध्ये डोकावून बघायला भाग पाडलं; कमालीचं अंतर्मुख केलं. इथे येऊन अनेक साधू-संत मोक्षप्राप्तीसाठी ध्यानधारणा का करत असतील, याचा अंदाज आला, कारण तो निसर्ग तुम्हाला तुमच्या सूक्ष्मपणाची इतकी उघडीवाघडी जाणीव करून देतो, की मनावरची सगळी बाह्य आवरणं गळूनच पडतात. याचा अर्थ आपण रातोरात प्रचंड आध्यात्मिक उंची गाठतो असं अजिबात नाही. ज्या क्षणी तिथून परत येतो, त्या क्षणी आपलं नेहमीचं, गडबडीचं आयुष्य सुरू होतं आणि आपल्याही नकळत आपल्याला गिळून टाकतं; पण मी जो विसंवाद नसलेला प्रवास शोधत होते, तो हा निश्चित होता. माझ्या मनाला, मेंदूला कुठल्याही बाहेरच्या गोष्टीचा स्पर्श झालेला नव्हता. मी, माझी गती, माझी लय, माझे विचार आणि आजूबाजूची शांतता. हे असं आयुष्यभर जगायला सांगितलं, तर जमेल का? माहीत नाही. कदाचित नाही जमणार; पण हा अनुभव इतका तृप्त करणारा होता, की आता तो पुन:पुन्हा घ्यावासा वाटतोय हे मात्र खरं. कधी तरी स्वत:ला फक्त स्वत:ची कंपनी देणं किती गरजेचं आहे, हे मला त्या प्रवासात फार प्रकर्षांनं जाणवलं.
प्रवासातल्या अशा अनेक जागा असतात, अशी अनेक दृश्यं असतात, जी कायमची मनावर ठसतात. काही मोठी असतात, अद्भुत असतात. काही खूप छोटी, नगण्य असतात; पण एखाद्या फोटोसारखा तो क्षण, तो प्रकाश आणि त्यात असलीच तर माणसं कायमची मनावर कोरली जातात. नाटकाच्या दौऱ्याच्या वेळी कुठल्या तरी आडगावाला ट्रेन थांबलेली असताना कुल्हडमधून चहा विकायला आलेला हसरा लहान मुलगा, हैदराबादला जाताना ट्रेनच्या दारात विनातिकीट प्रवास करणाऱ्या मायलेकी, विमानात पहिल्यांदा वरून ढग दिसले तो क्षण, विंडसर कॅसलच्या मागच्या तलावातली बदकं, काश्मीरच्या दाल लेकवरचं धुकं, सिंहगडावरची दही विकणारी बाई, कोलकाताच्या बेल्लूर मठाच्या बाहेर गाणं म्हणत मूरी (चुरमुरे-भेळ) विकणारा माणूस, काबिनी अभयारण्यात एका कुटुंबासारखे चालणारे हत्ती, सॅन फ्रान्सिस्कोच्या डिस्नीलँडमधला सातमजली सरकता जिना, आसूदमधला (रत्नागिरी) देवळाकडे जाणारा अप्रतिम सुंदर छोटा जुना पूल, रत्नागिरीजवळच्या वायंगणीतला देवीच्या मंदिराकडे जाणारा उतारावरचा रस्ता, दिल्लीच्या रस्त्यावर संध्याकाळी साडेसात वाजताही जाणवलेला शुकशुकाट.. आठवायला लागलं, तर असे आतापर्यंत किती क्षण टिपले गेले आहेत.
मला गंमत या गोष्टीची वाटते, की मला ते क्षण महत्त्वाचे, लक्षात राहण्यासारखे वाटले, म्हणजे माझ्या बरोबरच्या माणसाला ते तसे वाटलेच असतील असं अजिबात नाही. त्याला दुसरे कुठले तरी क्षण साठवणीत ठेवावेसे वाटले असतील. त्या त्या क्षणाचा तो अनुभव इतका वैयक्तिक असतो, की आपण दुसऱ्या कुणाशीच वाटून घेऊ शकत नाही. म्हणजेच, प्रवास आपण कुणाहीबरोबर केला, तरी शेवटी आपण एकटेच तो करत असतो! असे अजून खूप प्रवास होतील. काही स्वखुशीनं, काही पर्याय नाही म्हणून! पण ओढ राहील, ती त्या ‘विसंवाद’ नसलेल्या प्रवासाची, त्या शांततेची, त्या तृप्तीची. लवकरच बाइकवरून आसाम-मेघालयला जाण्याचा विचार आहे. बघू या!