संजय मोने

‘‘पर्यटन कशाला म्हणावं, मोठाच प्रश्न आहे! ‘जन्माला येऊनही अमुक पाहिलं नाही’ म्हणत भटकणं, त्याचे किस्से रंगवून सागणं हे पर्यटन? आखीव सहलींमध्ये प्रेक्षणीय स्थळांचे भोज्जे शिवणं हे पर्यटन? बाहेरगावी जाऊन अजिबात न फिरता खोलीत तंगडय़ा पसरून सुस्तावणं हे पर्यटन? की लहानपणी आजोळी केलेली सुट्टीतली मजा म्हणजे पर्यटन? मला या व्याख्यांचा विचार करावासा वाटत नाही. पण त्या त्या ठिकाणचा आनंद असा असावा, की स्वत:ला विचारावं, त्या ठिकाणी परत परत जावंसं वाटतं का?..’’  

पर्यटन म्हणा, सहल म्हणा किंवा आजच्या तरुणाईचा शब्द म्हणजे ४३्रल्लॠ म्हणा.. (मुळात ‘तरुणाई’ हा शब्द किंवा ‘हिरवाई’ हा शब्द ज्यांनी आपल्या भाषेत घुसवला असेल त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे! आता जाता जाता विषय निघालाच आहे म्हणून केवळ, ‘माध्यम’ असा एक शब्द हल्ली फार वापरला जातो. ‘श्री. अमुक तमुक यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून तमुक तमुक कार्य केले आहे.’ कशाला? श्री. अमुक अमुक किंवा श्री. तमुक तमुक यांनी हे कार्य केले आहे, असं सरळ नाही का सांगता येत? असो. मुद्दा वेगळा आहे. शिवाय माध्यम म्हणजे जे मृतात्म्यांशी संवाद साधू शकतात ते, असाही एक अर्थ आहे ना?) तर, पर्यटन किंवा सफर बाबतीत मी जरा कच्चा आहे. वेगळी सफर काढायला लागत नाही. कारण मला माझ्या नाटकांच्या प्रयोगांमुळे अनेक वर्ष ठिकठिकाणी जावं लागतं. अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत (हा पुन्हा शासकीय शब्द झाला. जे हा वाक्प्रचार वापरतात त्यांनी हा प्रवास केला आहे की नाही? बहुदा नाहीच. कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची राज्यपद्धती यावर भाषण देताना ती त्यांची पद्धती पाळणारे सध्या तरी कुणीच दिसत नाहीत. महाराजांनी वतनं दिली नाहीत, पण आजकाल वतनांचा कारभार चालताना दिसतो.) प्रवास करून झाला आहे. त्यामुळे पर्यटन म्हटलं की त्यात हे सगळे प्रवास येतात.

आमच्या व्यवसायात असे अनेक कलाकार आहेत, स्त्री-पुरुष हा भेद नाही, जे भारंभार हिंडतात. प्रयोगासाठी वणवण करतात. पण त्यांच्या प्रवासाच्या अनुभवात कायम असे उल्लेख येतात- मी प्रयोगाला गेलो किंवा चित्रपटाच्या चित्रीकरणाला गेलो आणि रात्र झाली; किंवा कधी मध्यरात्र झाली. चित्रीकरण संपलं आणि आता जेवायचं काय हा प्रश्न उभा राहिला. आम्ही चालत निघालो (हा माझा अनुभव नाही. ऐकीव आहे.) एक मिणमिणता दिवा दिसला, आम्ही तिथे चालत पोहोचलो. एक माई (लिहिताना ‘अक्का’ किंवा ‘ताई’, अगदीच ‘पोचलेला’ कलाकार असेल तर ‘आई’ असा शब्दप्रयोग वापरला जातो.) भाकऱ्या भाजत होती. (उशिरा चित्रीकरण संपलं म्हणजे सुमारे अकरानंतर. अशा वेळेला कुठल्या कुलदीपकासाठी किंवा नवऱ्यासाठी गावातली अक्का, ताई किंवा आई भाकऱ्या भाजत बसेल?) तर आत गेलो. एक छोटीशी झोपडी. दारिद्रयाच्या सगळय़ा खुणा खोलीभर रेंगाळत होत्या. (हे असं लिहू शकणाऱ्यांना कुठल्या कलमाखाली फाशीची शिक्षा होऊ शकते? असो! मुद्दा पुढे रेटू या.) तिला सांगितलं, ‘भूक लागल्ये खायला देणार का?’ तिनं पटापट पानं घेतली. कांदा ठेचून पुढे ठेवला.(रेस्टॉरंटमध्ये हेच कलाकार जेवायला जातात तेव्हा विनेगरमधला लाल कांदा मिळाला नाही म्हणून आवाज उठवतात.) भाकऱ्या आणि कसली तरी भाजी वाढली. (लेखात ‘कसली तरी’ असं लिहिलेलं असतं. जिच्या घरी तुकडे तोडता ती माऊली भाजी कुठली वाढते, हेही विचारायची सभ्यता नाही?) तुडुंब जेवलो. घराची आठवण आली. (कुठली आठवण? घरी नेहमी रात्री पोचल्यावर, बाहेरून काही तरी मागवून बरोबर कोल्ड्रिंक पिता ना?) आजतागायत ती चव विसरलो नाही.. (अहो! त्या कोण आई किंवा अक्काच्या घरचे लोक जेवायला येणार होते, त्यांच्या तोंडातला घास तुम्ही काढून घेतलात ना?) हे असलं सगळं पर्यटन वगैरे मला फारसं जमत नाही आणि गेलो तर जाताना आता यावर परत आल्यानंतर एखादा लेख लिहू, असा बेतही जमवता येत नाही.  

साधारण १९८०-८२ पासून आजतागायत एकत्र असणारे आम्ही मित्र वर्षांतून एकदा गोव्याला जातो आणि तिथे जाऊन दर वेळी तीन-चार वेगवेगळय़ा ठिकाणी सकाळचं खाणं आणि दोन्ही वेळची जेवणं उरकून तिसऱ्या दिवशी परत येतो. एका नव्या पैशाची खरेदीबिरेदी करण्याच्या भानगडीत कुणीही पडत नाही. आमच्या सगळय़ांच्या बायका ‘कुठे जायचं नाही, तर त्याच त्याच रिसोर्टमध्ये का राहता? तेही बदलत नाही, मग जाताच का?’ असं विचारतात. त्यांच्या या प्रश्नाला आम्हा कुणाकडेही उत्तर नाही आणि हळूहळू त्यांच्या प्रश्न विचारण्यामागचा जोरही ओसरत चाललेला आम्हाला जाणवतो.

आम्ही सगळे मिळून जायला लागलो आता आता. त्याच्या आधी अनेक वर्ष मी एकटा बाहेर जात असे. सोबत कपडय़ांची एक बॅग, त्यात कपडे, तेही लज्जारक्षणापुरते आणि बरीच पुस्तकं व एक अख्खा म्हातारा भिख्खू (याचा अर्थ ज्यांना कळेल त्यांना कळेल.) दादरला गाडीत बसायचं. मनात येईल तिथे उतरायचं. जवळपास पटकन जेवायला मिळेल अशा ठिकाणी राहायचं. पुस्तकं वाचायची. वाटलंच तर जरा फिरून यायचं. पुस्तकं संपली वाचून की परतीची गाडी पकडायची, झालं पर्यटन. बराच फिरलो. बरीच वर्ष. पण कुठेही, काहीही बघायला गेलो नाही. विचित्र वाटेल सगळय़ांना, पण समजा ताजमहाल बघायला गेलो, तर ‘एकदा बघितला, पुढे काय?’ पण तरीही सगळय़ात मला आवडलेली सफर म्हणजे महेश मांजरेकर यांनी लागोपाठ ३-४ वर्ष एक मराठी नाटय़-चित्रपट पुरस्कार सोहळा परदेशात वेगवेगळय़ा ठिकाणी सादर केला होता, ती. सगळे सहव्यवसायी कलाकार एकगठ्ठा भेटायचे. दिवसभर कानात वारं भरून घेऊन हिंडायचं. त्यात जिथे गेलो तिथल्या लोकांशी किंवा आपसात एक क्रिकेटचा सामना खेळायचा. नंतर दुपारपासून रात्रीपर्यंत मनोरंजनाचे कार्यक्रम आणि पुरस्कार प्रदान केले जायचे. एकेका पुरस्कारासाठी कधी तीन, कधी पाच संभाव्य विजेते असायचे. बरं, मनोरंजनाचे कार्यक्रम बहारदार असायचे. उगाच कुणाच्या तरी, नाकावर सूत धरलेल्या आवाजात ‘घन बरसले आणि तू आठवलीस ओलेती’ अशा कविता वगैरे सादर केल्या जात नव्हत्या. (कवी दुष्काळी भागातून आलेला असला तरी हाताला न गवसलेल्या माजी-भावी प्रेयसीला ‘ओलेती’ रूपात बघण्याचा सोस दांडगा!) एकदा दोनदा, विमानात अर्ध्यावर उतरून जाता येत नाही, या गैरसोयीचा फायदा घेऊन आपापल्या वह्या काढून वाचन (किंवा गायन) करायचं कटू कारस्थान करायचा बेत कवींनी आखला होता. पण तरुण नामांकित पिढीतल्या पुंड मुलं-मुली कलाकारांनी तो हाणून पाडला. बरंच झालं! अहो आनंदात जायचं-यायचं. तिथे थोडय़ाफार महत्त्वाच्या इमारती, स्मारकं बघायची (म्हणजे दोन किंवा फार फार तर तीन!) आणि स्थानिक पदार्थ चाखायचे. चांगला आराम करायचा आणि नवी हवा भरून घेऊन परतायचं, हे सगळय़ात उत्तम आहे की नाही?                                                       

  मला सगळय़ात फारसा न आवडणारा प्रकार म्हणजे आयोजित सफरी. सात दिवसांत पूर्वेची सफर, आठ दिवसांत युरोप, असल्या. विमानतळावर यायचं. बऱ्याचदा फार अडनिडय़ा वेळेला तुम्ही तिथे पोचता. अर्धवट जागे किंवा झोपलेले. तिथे तुम्हाला खाण्याच्या प्रकारांचं एक पाकीट हातात कोंबतात. मग साधारण बावळट किंवा मूर्ख अथवा अडाणी लोकांना आपण सफरीवर घेऊन जात आहोत अशा आविर्भावात आणि सुरात तुमचं बौद्धिक घेतलं जातं. एकदा एका ज्येष्ठ नागरिकांच्या समूहाला- ‘तुम्हाला त्या देशात बंदूक घेऊन जाता येणार नाही’ अशीही सूचना केली गेली! आता ते ज्येष्ठ नागरिक फिरायला जाणार होते की हत्या करायला? बरेचसे बिचारे आपण रक्तदाब, मधुमेह आणि इतर व्याधींवरची आपापली औषधं घेतली आहेत की विसरलो, या चिंतेत मग्न होते. त्यात तिथे एकानं ‘‘घराची किल्ली वेंधळय़ासारखी विसरून आलीस ना?’’ अशी एका बाईंची हजेरी सर्वासमक्ष घेतली. थोडी वादावादी आणि धुसफुस झाल्यानंतर ती किल्ली त्या माणसाच्याच खांद्यावर लटकवलेल्या बॅगेत सापडली! मग बायकोचा आवाज अचानक तिसऱ्या सप्तकात कडाडला. ‘आमच्या घराण्यात अशी वेंधळी माणसं..’ वगैरे शब्द वापरले गेले. मग मात्र नवरा उडायच्या तयारीत टकटक आवाज करत जाणाऱ्या हवाईसुंदऱ्यांत मन रमवू लागला.

 या अशा सफरीत तुम्ही ईप्सित स्थळी पोचताच तुम्हाला का कुणास ठाऊक, पण पुरीभाजी, बटाटे किंवा कांदेपोहे खायला घातले जातात, न्याहारी म्हणून. का? जिथे जातोय तिथलं काही तरी नावीन्यपूर्ण खाऊ घाला ना! पण नाही. तेच तेच खायला लागतं. शिवाय तिथे उपाहारगृहात सक्काळी सक्काळी न्याहारी एका टेबलावर लावली जाते. सुमारे ७ च्या सुमारास. फळं असतात, त्यांचे रस असतात. कच्ची कडधान्यं असतात. थोडाबहुत मांसाहारी पदार्थाचा एक वेगळा भाग असतो. मग आपले सगळे प्रवासी आधी कापलेली फळं खातात, रसही ‘ज्यूस’ म्हणून पितात. मग कडधान्यं खातात. त्यानंतर पोहे किंवा उपमा खातात. सुकामेवा असाच येताजाता तोंडात टाकतात आणि चहा समोर असला तरी कॉफी पितात. काही लोक केवळ वसुली करायची म्हणून ऑम्लेटच्या दिशेनं हल्ला करतात. अचानक त्यांना आपली तब्येत आणि पोटात ढकलले जाणारे उष्मांक, यांची जाणीव होते. मग ते अंडय़ाच्या पांढऱ्या भागाचं ऑम्लेट मागतात. मात्र त्याच्याबरोबर भरपूर आणि फुकट मिळणारं चीज आणि लोणी लावलेला पाव खायला विसरत नाहीत. बऱ्याचदा माझ्या मनात विचार येतो, हे जे फळांचा ढीग चेपत असतात किंवा कॉर्नफ्लेक्स खात असतात, त्यातले किती लोक हे सगळं रोज घरी खात असतील? असो! ‘फुकट ते पौष्टिक’ हेच खरं. हे होतं ना होतं, तोच सफरवाल्या माणसांचा पुकारा होतो. बसमध्ये बसून आपली औषधं पोटात ढकलून ते सगळे बिचारे दिवसाच्या प्रवासाला निघतात. एकामागोमाग एक अशी स्थळं बघायला. रटारटा त्यांना मेंढरासारखं ओढून त्या सगळय़ा गोष्टी ‘दिसल्या न दिसल्या’ अशा वेगात दाखवल्या जातात. समजा फ्रान्सची सहल असेल तर आयफेल मनोरा दाखवला जातोच. तो डोळय़ांना दिसतो न दिसतो, तोपर्यंत पुढच्या स्थळाचा नंबर लागतो. पण यांपैकी किती लोक त्या आयफेल मनोऱ्याचा इतिहास विचारत असतील? कुणी बांधला? कधी बांधला? एक छायाचित्र त्या मनोऱ्यासमोर उभं राहून काढलं की बस्स! शेवटी ती सफर संपली की थकूनभागून परत यायचं आणि पुढचा आठवडा वेळीअवेळी आणि अवांतर खाण्यानं वाढलेल्या वजनाची किंवा बिघडलेल्या तब्येतीची दुरुस्ती करायची, हेच चालू राहतं.

    लहानपणी आम्ही आमच्या गावाला जायचो. मुंबई-रत्नागिरी असा तब्बल अकरा-बारा तासांचा प्रवास एस.टी.नं करायचा. मग तिथून गावाकडची पुढची गाडी पकडायची. उन्हाळय़ाच्या सुट्टीतला ‘सालाबादप्रमाणे यंदाही’ यशस्वी होणारा आमचा हा कार्यक्रम असायचा. परीक्षा संपल्या की दोन-चार दिवसांत निघायचं. सकाळ-संध्याकाळ भरपूर मऊसूत गरमागरम भात ओरपायचा, बरोबर मेतकूट असायचं. मग घरातून निघायचं ते गावभर उंडारत राहायचं, पार भूक लागेपर्यंत. मग येऊन विहिरीवर आंघोळी करायच्या. तिथे लाकडांच्या चुलीवर पाणी तापत ठेवलेलं असायचं. ते तापेपर्यंत आजोबांकडून काजूच्या बिया घ्यायच्या आणि चुलीत एका काडीनं सरकवायच्या. खरपूस भाजल्या की त्याचा वास आसमंतात पसरायचा. (तेव्हा ‘आसमंत’ वगैरे पचायला जड शब्दांची ओळख झाली नव्हती. ती झाली त्यानंतर मग गावाकडची सफर कमीकमी होत गेली.) बिया भाजून, फोडून त्या ताज्या ताज्या खायच्या आणि आंघोळ उरकायची. त्या सुमारास गावी इतर सगळे चुलतभाऊ-बहिणी आलेल्या असायच्या. साधारण पंचवीस-तीस लोक असायचे. त्यामुळे काकू, आजी यांनी स्वत: बनवलेल्या सुबक पत्रावळीत जेवायचं आणि परत पोबारा करायचा तो दिवेलागणीपर्यंत. पुन्हा रात्री आमटी-भात आणि ताक (घरच्या दुधाचं विरजण लावून केलेलं ताक!) प्यायचं. अहो, बघता बघता झोप लागायची. आंबे खायचे. तेही हवे तेव्हा आणि हवे तितके. हा दिनक्रम सुमारे महिनाभर असायचा. पण कधी कंटाळा आला नाही, की कधी तब्येत बिघडली नाही. जन्माला येऊन आपण जग पाहिलं नाही, त्याबद्दल माहिती मिळवली नाही, वगैरे भानगड नव्हती! माझं गाव हेच माझं जग होतं. वाडीत फिरताना कधी ज्येष्ठ-कनिष्ठ, जात-पात याचा संबंधच आला नाही. आमच्या घरी तसलं काही पाळत नसत. परीक्षेचा निकाल लागला (तो मात्र नेहमी ‘निकाल’ असायचा. ‘निक्काल’ लागलेला नसायचा!) की वडील तो घेऊन आम्हाला न्यायला यायचे. निकालाचा कागद पाहिला की मनात हुरहुर लागायची. (‘हुरहुर’ वगैरे आता लिहिताना लिहितोय, तेव्हा सगळय़ांना ‘आता परत जायला लागणार’ म्हणून रडायला यायचं. आजी-आजोबा, काका-काकू, भावंडं कानकोंडी व्हायची.) शेवटी जायची तारीख यायची. परतीची गाडी सकाळी असायची, त्यामुळे आदल्या रात्री माफक अश्रुपात व्हायचा. आजी प्रत्येकाच्या हातावर सकाळी निघायच्या आधी दही द्यायची आणि ‘पुढल्या वर्षी यायचं’ म्हणायची. त्या दह्यात इतकी ताकद होती, की आम्ही पुढच्या वर्षी परत जायचोच!

 आयोजित सफरीवर जाणाऱ्या किती जणांच्या हातावर दही ठेवलं जात असेल? आणि किती जण त्याच स्थळी परत परत जात असतील?.. माझ्या या अनुभवांना पर्यटन म्हणायचं की नाही माहीत नाही. निर्णय तुमच्या हाती!