सुप्रिया सुळे

 ‘‘दगडांचा आणि फुलांचाही देश असणाऱ्या महाराष्ट्र देशाचं वैभव संपन्न आहे, या वैभवाला जवळून जाणून घेणं म्हणजे काहीतरी शिकत राहाणं. मला मोह घालणाऱ्या अनेक स्थळांपैकी एक ताडोबाचं जंगल आणि दुसरं अजिंठा-वेरुळ लेणी.  ताडोबानं मला जंगलची भाषा शिकवली. तासन्तास एकाच ठिकाणी शांत राहून, कुणाशी अवाक्षरही न बोलता, चौफेर नजर ठेवून संयम कसा बाळगायचा, हे जंगल जितकं चांगल्या पद्धतीनं शिकवतं तितकं इतर कुणी शिकवेल, असं वाटत नाही. तर दुसरीकडे शेकडो वर्षांपूर्वीच्या संस्कृतीशी वार्तालाप करण्याचं उत्तम साधन म्हणजे लेण्या. वेरुळमध्ये ऐकलेली बुद्धवंदना मनाला विलक्षण शांतता देणारी, तर मूर्तीमधले भाव त्या शिल्पांच्या अधिकच जवळ नेणारे. एकीकडे निसर्गाचे विविध विभ्रम तर दुसरीकडे मनाला एकाग्र करणारी शांतता. सगळंच मोहात पाडणारं.’’

pune metropolis have lack of basic facilities and infrastructure
बकालीकरणाकडे…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Priyanka Gandhi statement regarding those who show BJP flags during road shows
रोड-शो दरम्यान भाजपचे झेंडे दाखवणाऱ्यांना प्रियंका गांधी म्हणाल्या, तुम्हाला शुभेच्छा मात्र…
Engravings on the wheels
चित्रास कारण की: जमिनीवरची मेंदी
Marathi drama Gosht Sanyukt Manapmanachi plays review
नाट्यरंग : गोष्ट संयुक्त मानापमानाची ; सम समा संयोग की जाहला…
Kartik Ekadashi celebration celebrated in traditional spirit at Sri Kshetra Pandharpur Branch with Shri Gajanan Maharaj Sansthan
‘कार्तिकी’निमित्त शेगावात भाविकांची मांदियाळी; पालखी परिक्रमा लक्षवेधी
Chitra Wagh accuses MVA of making a deal with Maharashtra
मविआवर महाराष्ट्राचा सौदा केल्याचा चित्रा वाघ यांचा आरोप

माझं गाव बारामती. बारामतीची ओळख पूर्वीपासून आजपर्यंत विविध कारणांनी तयार झाली आहे. कविवर्य मोरोपंत आमच्या बारामतीचे. ‘केल्याने देशाटन.. पंडित मैत्री, सभेत संचार..’ ही मोरोपंतांची उक्ती सुप्रसिद्ध आहे. देशाटनाची जी महत्ता मोरोपंतांनी सांगितली, ती आम्हा सर्वानीच अगदी मनावर घेऊन पार पाडली आहे! माझ्या बारामती मतदारसंघातली पर्यटनदृष्टय़ा, ऐतिहासिक-धार्मिकदृष्टय़ा अनेक समृद्ध स्थळं माझ्या डोळय़ांसमोर आहेत. उजनी जलाशयाच्या काठावर भिगवण परिसरात येणारे फ्लेमिंगो पक्षी, ते थेट भोरमधून उतरणारा वरंधा घाट, अशा विस्तीर्ण प्रदेशात आवर्जून भेट द्यावी अशी अनेक स्थळं आहेत. या लेखाच्या सुरुवातीलाच मी आपणा सर्वाना या स्थळांना भेट देण्यासाठी मनापासून निमंत्रित करते!

लहानपणापासून बाबांबरोबर (शरद पवार) अनेक ठिकाणी जाण्याचा योग आला. महाबळेश्वर, गोवा, अगदी काश्मीरसुद्धा. हिरवाई, जंगल, समुद्र आणि हिमशिखरं याचं माझ्या मनावर जे गारूड तयार झालं, ते आजही कायम आहे. त्यामुळे आताच्या व्यग्र दिनक्रमातून जेव्हा जेव्हा संधी मिळते, तेव्हा मी अशा ठिकाणांना आवर्जून भेटी देत असते. निसर्गाबरोबरच लोकजीवन, संस्कृती, स्थापत्य आणि माणसं, यांना अभ्यासपूर्वक अनुभवणं म्हणजे खऱ्या अर्थानं पर्यटन असं मला वाटतं. महाराष्ट्रात मी आवर्जून ताडोबा अभयारण्य, सिंदखेडराजा, अजंठा-वेरूळ, मेळघाट, विविध दुर्ग, कृष्णा-कोयनेचा प्रीतिसंगम आणि वर्धा-पवनार इथला आश्रम अशा ठिकाणी नेहमी जात असते. या सगळय़ाविषयी इथे लिहिणं शक्य नाही, मात्र काही मोजक्या गोष्टींविषयी सविस्तर लिहिणार आहे.

निसर्गानं भरभरून दिलेला विदर्भ. वनसंपदेचा समृद्ध शेजार लाभलेल्या या भागानं राज्यातच नाही, तर संपूर्ण देशातच आपलं एक वेगळेपण जपलं आहे. विस्तीर्ण पसरलेला मेळघाट असो, की पेंच, निसर्गप्रेमींच्या सर्वात आकर्षणाचं केंद्र ठरलेल्या ‘जय’ वाघाच्या अधिवासामुळे नावाजलं गेलेलं उमरेड- कऱ्हांडलाचं अभयारण्य असो, की ताडोबा अंधारी व्याघ्र अभयारण्य असो.. विदर्भातल्या प्रत्येक अभयारण्याला स्वतंत्र ओळख आहे. आजवर जेव्हा जेव्हा मी ताडोबामध्ये आले, त्या प्रत्येक वेळी वेगळा अनुभव येत गेला. सुरुवातीच्या काळात ‘वाघोबा म्हणजेच ताडोबा’ असा माझादेखील इतरांसारखा समज होता! पण हळूहळू जसजसा माझा या अभयारण्यात येण्या-जाण्याचा प्रवास वाढत गेला, तसा जंगलाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलत गेला. वाघ हा ताडोबाच्या आकर्षणाचं केंद्र नक्कीच आहे, पण वाघोबा आहे म्हणून ताडोबा आहे, असं होत नाही, याची मला गेल्या काही वर्षांत ताडोबानंच जाणीव करून दिली आहे. वाघ हा ज्या जंगलाचा एक भाग आहे, त्या जंगलात इतर वन्यजीवसंपदा, वनसंपत्ती देखील तितकीच महत्त्वाची आहे, हे मला जाणवलं. ही संपदा जपण्यात वन विभागाचं जितकं योगदान आहे, तितकंच या समृद्धतेचा शेजार लाभलेल्या स्थानिक लोकांचंदेखील आहे. इथल्या प्रत्येक व्यक्तीत हा निसर्ग डोकावतो. त्यांच्या वागण्याबोलण्यात कुठलीही कृत्रिमता नाही. उपलब्ध असलेल्या साधनसुविधांमध्ये हा माणूस स्वत:चा आनंद शोधत असतो आणि तोच आनंद इतरांनाही देण्याचा प्रयत्न करीत असतो. इथलं आदरातिथ्य, खानपान, जंगलाविषयी असलेली माहिती, या भागातला प्रत्येकजण इतरांना देण्याचा प्रयत्न करत असतो. हातचं राखून इतरांशी वागायचं, असा इथल्या लोकांचा स्वभाव नाही.

    अनेकदा चार-चारदा केलेल्या सफारीनंतरही वाघ दिसायचा नाही. पण या सफारीच्या काळात मला अस्वल, तरस, शेकडो प्रजातींचे पक्षी, वाइल्ड स्पायडर (जंगली कीटक), जंगली कुत्रे, बारसिंगा (सांबर), नीलगाय, गवे, बिबटय़ा, कोल्हा, मगरी जवळून पाहता आले. इथल्या नैसर्गिक संपदेची माहिती मिळत गेली. त्यामुळे प्रत्येक वेळी माझा जंगलाचा अनुभव अधिकाधिक समृद्ध होत गेला. विशेषकरून जंगल सफारीत अत्यंत कमी आवाजात, हातवारे करून एकमेकांना कशी विचारणा करायची याची माहिती मला झाली. ज्या परिसरात वाघाचा अधिवास असतो, त्या भागात पशूपक्ष्यांचा, माकडांचा, हरणांचा, निलगायींचा ‘कॉल’ कसा ओळखायचा, वन्य प्राण्यांच्या पावलांचे ठसे कसे शोधायचे, ओळखायचे याची माहिती होत गेली. सफारीदरम्यान गाइडनं नुसतं इशाऱ्यानं ओठांवर बोट दाखवून शांत राहण्यास सांगितलं, तर तासन्तास ‘जिप्सी’त एका ठिकाणी कसं थांबावं, हा अनुभव घेतला. ‘इकडून कॉलिंग होत आहे’ याचा अर्थ या दिशेनं वाघाची हालचाल आहे आणि तिकडे ‘साईटिंग’ होईल, ही जंगलाची भाषा शिकता आली. बराच वेळ एकाच ठिकाणी शांत राहून, शेजारी उभ्या असलेल्याशी अवाक्षरी न बोलता, चौफेर नजर ठेवून संयम कसा बाळगायचा, हे जंगल जितकं चांगल्या पद्धतीनं शिकवतं तितकं इतर कुणी शिकवेल, असं मला वाटत नाही. वाघोबाचं दर्शन झालं नाही, तर इतर गोष्टींचा आनंद घेत पुढच्या सफारीची मानसिकता तयार करायला पाहिजे, हेदेखील जंगल शिकवतं.

करोनाचा दोन वर्षांचा खंड वगळला, तर दरवर्षी किमान एकदा तरी ताडोबात येण्याची संधी मी सोडत नाही. मार्च ते जून या कालावधीत ताडोबाला भेट देण्यास माझं आणि कुटुंबीयांचं प्राधान्य असतं. गेली अनेक वर्ष आम्ही ही जंगल सफारी करण्याचा प्रयत्न करतोच. माझी मुलं- रेवती आणि विजय यांनाही या जंगलाविषयी ओढ वाटू लागली आहे. ‘दगडांचा देश’ शोधायला निघालो तरी आपल्याला सापडतो तो महाराष्ट्र. देशात एकूण १२०० कोरलेल्या लेण्या आहेत. यातल्या ९०० लेण्या एकटय़ा महाराष्ट्र राज्यात आहेत. शेकडो वर्षांपूर्वीच्या संस्कृतीशी आपल्याला वार्तालाप करावासा वाटला, तर लेण्या हे उत्तम साधन आहे. या लेण्यांचे दोन मुकुटमणी आपल्या महाराष्ट्राला लाभलेत- जागतिक वारसास्थळं असलेले अजिंठा आणि वेरूळ. मध्यंतरी या लेण्या आणि त्याबरोबर अभेद्य, अजिंक्य किल्ल्यांपैकी एक असलेल्या देवगिरी (दौलताबाद) किल्ल्याला भेट देण्यासाठी मी खास दोन दिवस राखून छत्रपती संभाजीनगरला गेले होते. माझ्या प्रवासात मी अगोदर देवगिरी किल्ला आणि त्यापाठोपाठ वेरूळच्या लेण्या बघितल्या आणि दुसऱ्या दिवशी संपूर्ण वेळ अजिंठा लेणी बघत घालवला.

मिश्रदुर्गाचा उत्तम नमुना असलेल्या देवगिरी किल्ल्यातले बारकावे अभ्यासले, की सुमारे हजार वर्षांपूर्वी इथे राहणाऱ्या माणसांची बुद्धिमत्ता किती अचाट होती याचा प्रत्यय येतो. देवगिरी- अर्थात दौलताबाद किल्ल्याला मोहम्मद तुघलकानं आपली राजधानी केलं होतं. दिल्ली रिकामी करून सगळा लवाजमा इथे का आणला असेल, याची प्रचीतीही या किल्ल्याची अभेद्यता पाहिल्यावर येते. चाँदमिनार, सरस्वती विहीर सुंदर आहेतच, मात्र या किल्ल्याला चहुबाजूनं असलेला मानवनिर्मित खंदकाचा घेर अधिक मोहून टाकणारा आहे. हा घेर साधा नाही. साधारण ५० मीटर उंचीचा हा खोदलेला खंदक झटपट खोदला गेला नसणार. उन्हाळय़ात यातलं पाणी कमी होत असलं, तरी त्याची विशालता पाहून मनात धडकी भरते. या खंदकावर छिन्नी-हातोडय़ाचे घाव आपल्याला दिसतात, तशीच एका ठिकाणी मानवी आकृतीदेखील काढलेली दिसते. ती अधिक स्पष्ट पाहायची असेल, तर पुरातत्त्व विभागानं नव्यानं खुल्या केलेल्या लेण्यांच्या मागच्या बाजूस जायला हवं. खंदक खोदताना अशी आकृती काढण्याचा मोह कोणाला, का झाला असेल, असा सवाल मला इथे पडला होता! एक उत्तम काम भारतीय पुरातत्त्व विभागानं इथे केलंय, ते म्हणजे किल्ल्याच्या परिसरातलं तोफांचं संग्रहालय. या अजस्त्र तोफांचं वजन पाहता, हे काम सोपं नव्हतं, हे दिसतं. साधारण १००० वर्षांच्या कालखंडातल्या देशी-विदेशी तोफा एकत्रित पाहायला मिळणं, ही अभ्यासकांसाठी नक्कीच पर्वणी आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट या किल्ल्यावर आपल्याला दिसते, ती म्हणजे मेंढा तोफ! साधारण १४ टन वजनी असलेल्या या तोफेच्या मागच्या बाजूला असलेलं मेंढय़ाचं डोकं या तोफेचं वैशिष्टय़. देशातल्या सर्वात मोठय़ा तोफांपैकी एक असलेली ही तोफ या किल्ल्यातली एक ठेवच आहे. राजस्थानात जयगड किल्ल्यावर जगातल्या सर्वात मोठय़ा तोफांपैकी एक ‘जयवान तोफ’ अतिशय लोकप्रिय आहे. तशी लोकप्रियता या तोफेलाही मिळू शकते.

   किल्ल्यात भटकंती करताना आणखी एक गोष्ट जाणवली, ती ही, की वृद्ध आणि चालायला अडचण असलेल्या पर्यटकांना किल्ल्याच्या शिखरावर जाण्यासाठी कष्ट पडतात. इथे रोप-वे तयार करण्याची चर्चा माझ्या भेटीदरम्यान सुरू होती. मात्र इथे डोली सुरू झाल्यास लोकांना रोजगार मिळेल आणि संपूर्ण किल्ला फिरण्यासाठी सुविधा तयार होईल, असं माझं मत आहे. वेरूळ हे पर्यटकांना, अभ्यासकांना भुरळ पाडणारं आणखी एक ठिकाण. जगानं जिथे पहिल्यांदा समृद्ध अशा भारतीय वारशाची नोंद घेतली, ती ही जागा. दोन किलोमीटर लांब अशा खडकात कोरलेल्या अनेक लेण्या असलेल्या या समूहाला १९८३ मध्ये ‘जागतिक वारसा स्थळ’ म्हणून ‘युनेस्को’नं (संयुक्त राष्ट्रांनी) घोषित केलं. तिथे लेणी क्रमांक १० मध्ये स्थानिक मार्गदर्शकांकडून ऐकलेली बुद्धवंदना आणि त्याचा घुमलेला आवाज अंगावर रोमांच आणणारा होता. या काही मिनिटांच्या प्रार्थनेनं मनाला विलक्षण शांतता प्राप्त झाली होती. भगवान बुद्धांच्या विविध मुद्रा आणि त्यांचं केलेलं सुंदर कोरीवकाम बुद्धाच्या आयुष्यावर नव्यानं प्रकाश टाकायला भाग पाडतात.

त्यानंतर मी गेले ‘कैलास’, अर्थात लेणी क्रमांक १६ मध्ये. प्रवेशालाच असलेले गजलक्ष्मी आणि गणपती इतके सुंदर आहेत, की आतली शिल्पं किती सुंदर असावीत याचा अंदाज प्रवेशद्वारावरच येतो. प्रवेश घेऊन आत डाव्या बाजूला वळले, तोच गाईडनं दाखवलं रती-मदनाचं शिल्प. या शिल्पाच्या मधोमध कोरलेला ऊस आणि त्यावरची पेरं आजही स्पष्ट दिसतात. (जणू ‘प्रेम उसाएवढंच गोड’ असं हे शिल्प सांगत असावं! राज्याच्या साखर उद्योगाला दिशा देणाऱ्या ‘वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूट’चं हे बोधचिन्ह ठरू शकतं असंही मी गमतीनं म्हटलं होतं!) कैलास लेणी जगातल्या सर्वात मोठय़ा एकाच दगडापासून घडवलेल्या वास्तूंपैकी एक. एकही कोपरा मोकळा ठेवलेला नाही. सर्वत्र कोरलेली शिल्पं. ज्यांना या शिल्पांमधला भाव कळला, ते या शिल्पांच्या आणखी जवळ जातात. ही शिल्पं लोकांच्या मनात कायमचं घर करतात. मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या आयुष्यातला महत्त्वाचा प्रसंग असलेल्या सीताहरणाचं एकच स्वतंत्र असं शिल्प या लेणीत आहे आणि ते अप्रतिम आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकाच खडकावर कोरण्यात आलेलं रामायण आणि महाभारताचं शिल्प. आपल्याकडे लहान मुलांना रामायण आणि महाभारत सांगण्याची परंपरा आहे. या कथा अनेकांनी आजी-आजोबांकडून किंवा आईवडिलांकडून ऐकल्या असतील. मात्र रामायण आणि महाभारतातले प्रसंग एकत्रितपणे आणि एकाच नजरेत पाहायचे असतील, तर वेरूळमधल्या शिल्पांना दुसरा पर्याय नाही. रावणाच्या दरबारात शेपटीचं वेटोळं करून त्यावर बसलेल्या हनुमंताचं छोटं, पण सुंदर शिल्प इथे आहे. शेवटी जैन लेण्यांचा समूह पाहून मी वेरूळ लेण्यांमधली भटकंती संपवली. यातली सर्वात सुंदर लेणी माझ्या नजरेस पडली ती दुमजली इंद्रसभा. ३५ क्रमांकाच्या लेणी म्हणजे जैन लेण्यांचे समूह. त्यातली इंद्रसभा ही सर्वात मोठी आणि प्रसिद्ध लेणी. मधोमध असलेले तीर्थस्तंभ आणि त्याभोवती कोरलेले जैन र्तीथकर अप्रतिम असेच. मातृदेवता अंबिका आणि तिच्या मांडीवर बसलेलं बाळ हे शिल्प निरखून पाहण्यातही मी बराच वेळ घालवला. आश्चर्य याचं आहे, की अनेक शतकं हे लेणी निर्मितीचं कोरीव काम सुरू होतं. मात्र जैन, बौद्ध आणि हिंदू या तीन वेगवेगळय़ा धर्माच्या लेण्या एकत्रित कोरल्या गेल्या. हे कार्य अविरतपणे सुरू ठेवून ते पूर्णत्वास नेताना कोण्या एका धर्माच्या सर्व लेण्या इथे नाहीत, तर विविध धर्माच्या लेण्यांचा समूह आहे.

     अजिंठा लेण्यांचा चमू म्हणजे तर लेण्यांचा मुकुटमणी. ज्या लेण्यांच्या पायथ्याहून गोलाकार वाहत जाणारी वाघूर नदी आणि त्याच्यावर काही अंतरावर कोरलेल्या लेण्या- अर्थात अजिंठा. सकाळीच छत्रपती संभाजीनगर सोडल्यानं साधारण सकाळी ९.३० च्या सुमारास मी तिथे पोहोचले होते. गर्दीच्या वेळेपूर्वी गेल्यामुळे लेण्या पाहताना थोडा निवांतपणा होता. सुरुवात झाली वाकाटक राजा हरिसेनाच्या सहाय्यातून उभ्या राहिलेल्या लेणी क्रमांक एकमधून. काय वर्णावी ही लेणी! चहुबाजूला केवळ भगवान गौतम बुद्धांच्या आयुष्यावरील चित्रं. शिकार, युद्धापासून भगवान गौतम बुद्धाच्या आयुष्यातल्या अनेक प्रसंगांची चित्रं इथे पाहायला मिळतात. आज ज्या तंत्रज्ञानाला आपण ‘थ्री-डी’ संबोधतो, अशी साधारण दोन हजार वर्षांपूर्वीची थ्री-डी चित्रं इथे पाहायला मिळाली. यावरून तत्कालीन मनुष्य किती प्रगत होता याचा प्रत्यय येतो.  लेणी क्रमांक १७ मधली आयुष्याचा मार्ग शिकवणाऱ्या भगवान बुद्धांची मूर्ती नजरा खिळवून ठेवते. या मूर्तीच्या बाजूला उभी असलेली शिल्पं लेण्यांची भव्यता सांगतात. मुळात व्यापारी मार्गावर स्थित असल्यानं या लेण्या कोरण्यात अनेकांचं सहकार्य लाभत गेलं, हीसुद्धा वेगळीच, पण रंजक कहाणी आहे. ‘महापरिनिर्वाण’ हा एक महत्त्वाचा प्रसंग अजिंठा लेणीसमूहात सापडतो. भगवान बुद्धाच्या पायाशी बसून राहिलेले, त्यांच्या मार्गावर चालणारे लोक आणि महापरिनिर्वाणाच्या प्रसंगात त्यांच्या असलेल्या भावना या शिल्पांमधून दिसतात. शिल्प एवढं बारकाईनं कोरलं आहे, की भगवान बुद्धांच्या पायाची नखं, त्याभोवती असलेली त्वचा अगदी एखाद्या जिवंत माणसाप्रमाणे भासावी अशी कोरली आहे.

वाघूर नदी ओलांडून अजिंठा व्ह्यू पॉइंटवर पोचल्यावर मला घोडय़ाच्या नालीच्या आकारात मांडलेली अजिंठा लेणी नजरेत साठवता आली. लेण्यांचा समूह मुद्दामहून पाण्यापासून एका विशिष्ट सुरक्षित उंचीवर कोरला आहे. पाण्याच्या झिरपण्यानं जो ऱ्हास नदीकाठच्या लेण्यांचा झाला, तो टाळण्यासाठीच कदाचित अजिंठा लेणी अशी एका उंचीवर कोरली असावी असा अंदाज अभ्यासक बांधतात. तो खराच असावा असं लांबून लेणी पाहताना वाटलं.   आपल्या या वैभवशाली संपन्नतेने नटलेल्या महाराष्ट्रात पर्यटनाची फार मोठी संधी आहे. राज्य सरकारने  प्राधान्याने आणि गांभीर्याने या विषयात लक्ष घातले पाहिजे किंबहुना माझा तसा आग्रह आहे.