कुठे तरी व्यक्तिचित्रणाच्या प्रात्यक्षिकानंतर प्रेक्षकांशी संवाद साधताना एकाने प्रश्न विचारला की, ‘तुम्हाला चित्रकार व्हावे असे का वाटले?’ असा प्रश्न विचारणे अगदी सोपे. कारण समोर जो कुणी असेल त्याला त्याच्या प्रोफेशनचा शब्द घालून प्रश्न केला की झाले. उदा. तुम्हाला कवी का व्हावेसे वाटले? लेखक का व्हावेसे वाटले.. डॉक्टर, वकील, इंजिनीअर आणि अशा कुठल्याही स्पेशलायझेशनचा उल्लेख करायचा. परंतु याचे उत्तर द्यायला मात्र फार मोठा ‘पॉज’ घ्यावा लागतो. वरच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी विचार करू लागलो तसे माझ्या लक्षात आले की, मी ठरवून चित्रकार झालोच नव्हतो. अगदी लहानपणापासून चित्र हीच माझ्या अभिव्यक्तीची पहिली भाषा होती. पाटीवर मुळाक्षरे गिरवण्याअगोदर घरातल्या भिंतींवर आणि दारासमोरच्या ओटय़ावर खडूच्या तुकडय़ांनी उभ्या-आडव्या रेषा काढून आगगाडी आणि मोटारींची चित्रे मी काढीत असे. त्या वयात रडल्यावर गोळी-चॉकलेटचे आमिष दाखविण्यापेक्षा एक खडूचा तुकडा दिला की माझे रडणे शांत होई, असे माझी आजी-आई सांगायची. कलेने मनाला शांती आणि समाधान मिळते, या विधानाला दुजोरा देणारी ती प्राथमिक अवस्था मला बालपणापासून प्राप्त झाली होती.
यतो हस्ता स्ततो दृष्टि: यतो दृष्टि स्ततो मन:।
यतो मन स्ततो भावा: यतो भावा स्ततो रस:।।
नृत्यशास्त्राशी निगडित असलेल्या वरील श्लोकात ‘हस्ता:’च्या जागी कृती किंवा कलानिर्मिती या अर्थाने पाहिले तरी शेवटी रसनिष्पत्तीकडे आपण पोहोचू. कलाकृती निर्माण होत असताना फक्त कलाकार त्या प्रक्रियेशी जोडला जातो आणि ती पूर्ण झाली की, त्या कलाकृतीचा प्रेक्षकाशी किंवा आस्वादकाशी संबंध येतो. कलाकृतीवर त्याचे लक्ष जाते, त्याच्या नजरेला त्याचे मन अनुसरते, मनामध्ये भावनिर्मिती आणि भावनेतून रसास्वाद घेतला जातो. पुढे एका जागी अभिनव गुप्ताच्या रस सिद्धांतात ‘..तदानंद विपृ मात्रावभासो हि रसास्वाद:।’ असा निश्चय मांडला आहे. रसास्वाद हीदेखील ब्रह्मानंदाची बिंदुमात्र अनुभूती आहे, असे तो म्हणतो.
ही अवस्था सदासर्वकाळ सर्व चित्रांतून प्राप्त होईलच असे नाही; परंतु कलानिर्मितीचे कार्य सातत्याने चालू ठेवावे लागते. कलेच्या क्षेत्रात सातत्यशील अभ्यास आणि सराव (रियाझ) तितकाच महत्त्वाचा आहे, कारण कलानिर्मितीसाठी वापरात येणारे साधन हे माध्यम आहे. त्याची यथायोग्य हाताळणी करणारे आपले हात आणि संपूर्ण शरीर हेदेखील माध्यम आहे आणि पुढे जाऊन असे म्हणू की, या शरीराशी संलग्न आपले मन-चित्त हेसुद्धा माध्यमच आहे. या मनाला आणि शरीराला एकाग्रतेचा सराव द्यावा लागतो. अशा सिद्धतेने तयार झालेल्या कलाकृतीमधून मनाला होणारी समाधानाची जाणीव करून घेणारा आपल्यामध्ये कुणी वेगळाच असावा असे वाटते. बहुतेक याच अनुभूतीला ज्ञानेश्वर ‘नेणीव’ असे म्हणतात. अशा अर्थाने आपण करीत असलेल्या कलानिर्मितीत ‘आध्यात्मिक’ अनुभूतीचा अंश आहे, असे समजणे गैर नाही.
बालपणी घरून चित्रकलेला प्रोत्साहन होते, तसेच चांगल्या कलाशिक्षकांचे मार्गदर्शनही मिळाले. याबरोबरच अंधश्रद्धेचा स्पर्श होऊ न देता घरातून भक्तिमार्गाची धार्मिक बसकण होती. पुढे योगायोगाने भगवान बुद्धांनी शिकविलेली ‘विपश्यना’ विद्येची शिबिरे केल्याने आपल्या प्रत्येक कृतीशी आणि विचारांशी स्थितप्रज्ञ होऊन जागरूकतेने पाहण्याची कला आत्मसात करता आली. भगवान बुद्ध ‘प्रज्ञा’ विषयाचे तीन टप्प्यांत वर्गीकरण करतात. श्रुतमयी प्रज्ञा, चिंतनमयी प्रज्ञा आणि भावनामयी प्रज्ञा. जे जे आपण पाहतो, वाचतो, ऐकतो, इंद्रियांनी अनुभवतो ते श्रुत ज्ञान. याला आपण निरीक्षण (Observation) म्हणू. ही ज्ञानाची पहिली पायरी. त्यानंतर येते ते निरीक्षणासंदर्भातले चिंतन. (Thoughtful Process) या ठिकाणी आपण अनुभवलेल्या गोष्टींचे मूल्यांकन, योग्य-अयोग्य निवड करतो आणि तिसरी पायरी ‘भावनामयी प्रज्ञा’ची. याचा प्राचीन अर्थ प्रत्यक्ष कृतीमधून अनुभूती. या तीनही पायऱ्या अभिजात कलेच्या सर्जनप्रक्रियेत अंतर्भूत असतात. यातली एक जरी पायरी वगळली तर ती कलाकृती कमजोर ठरेल. निरीक्षणामुळे त्या निर्मितीला सत्याचा आधार असतो. चिंतनामुळे निरीक्षणाला योजकता आणि रचना कुशलता (creativity) प्राप्त होते. ती कलाकृती केवळ अनुकरण ठरत नाही आणि शेवटी प्रत्यक्ष कृती ही कलाकृतीला साकार रूप देत असते. प्रा. कोलते सरांचे एक चांगले वाक्य आहे. ते एका ठिकाणी म्हणतात की, ‘मी पाहून चित्र काढत नाही, तर काढून चित्र पाहतो.’ सरांचे हे विधान त्यांच्या कलानिर्मितीचे मूलाधार आहे; अनेक कला विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे आहे. माझ्या ‘बोध’ चित्रांमध्येदेखील मी जे काही दाखवतो ते नुसते पाहून काढलेले नसते तर माझ्या विचारांचे मूर्त स्वरूप असते. ‘विचार’ हा माझ्या चित्रांचा विषय असतो आणि पूर्ण चित्रांतून तो अभिव्यक्त करण्याचा माझा प्रयत्न असतो.
एखाद्या व्यक्तीचे पोट्रेट करताना किंवा निसर्गदृश्य रंगविताना समोरील दृश्याचे वस्तुनिष्ठ साधम्र्य काही अंशी स्वीकारावे लागते; परंतु ‘बोध’चित्रे ही पूर्णपणे माझ्या आंतरिक विचारांची प्रस्तुती असल्याने त्यात आलेल्या वस्तुनिष्ठ गोष्टी केवळ साधनमात्र असतात. ज्या वेळी आपण बाहेरचे जग अनुभवतो त्याच वेळी आपल्या मनात साठलेल्या अनुभवांचे आणि परिणामाचे विश्व फार मोठे आहे असे लक्षात येईल. ती आंतरदृष्टी आपल्याकडे असावी लागते. मला आठवते, माझी आजी ज्या वेळी डोळे मिटून ध्यान करायची, त्या वेळी मी तिला गमतीने विचारी की, ‘डोळे बंद करून काय पाहतेस?’ त्यावर तिचे उत्तर असायचे, ‘मी आतलं विश्व पाहते!’ त्या वेळी माझ्यासाठी तो थट्टेचा विषय असे; परंतु स्वत:ला स्टुडिओमध्ये बंदिस्त करून कोऱ्या कॅनव्हासवर किंवा कागदावर एकटक पाहू लागलो की, ते आंतरिक विश्व एकेक पापुद्रे उघडत व्यक्त होऊ लागते तेव्हा त्या विश्वाची प्रचंड खोलवर आणि दूरवर पसरलेली अतिवास्तवता जाणवू लागते आणि हाच ‘बोध’ एकेका विषयाच्या मालिकेने माझ्या चित्रांतून साकार करू लागलो. ही बोधचित्रे प्रसंगचित्रे नव्हती. त्यात विचारांचे निवेदन होते. काही चित्रांमधले निवेदनही गौण झाले म्हणजे अन्य चित्रांपेक्षा वेगळी अशी आध्यात्मिक अनुभूती देऊन जायचे. ही अवस्था विलक्षण असते; त्या वेळचा आनंद किंवा मिळणारे समाधान इंद्रियातीत असते. ‘प्रतीक्षा’, ‘गुरू-शिष्य’, ‘बालपण’, ‘आपले सहजीव’, ‘कबीर’, ‘कृष्ण’, ‘बुद्ध (इतिपिसो भगवा..)’, ‘गजराज’, ‘मोगरा फुलला’ आणि नुकतेच ‘कालिदासानुरूपम्’ असे अनेक विषय घेऊन त्या त्या विषयांचा अभ्यास, चिंतन आणि आपल्याला तत्सम येणारे अनुभव यांची सांगड घालीत मी चित्रमालिका रंगवल्या. ही बोधचित्रे रंगविताना मालिका पूर्ण केल्याचे आणि प्रत्येक विषयाचा सर्वागांनी अभ्यास झाल्याचे समाधान मिळत आले. यातच काही चित्रांची निर्मिती झाली. त्यात सर्जनशीलतेचा केवळ वैचारिक खेळ नव्हता. त्या चित्राची निर्मिती ही मनाची आस धरून राहिली होती.
१९९२ साली ज्या चित्राने ‘प्रतीक्षा’ या मालिकेची सुरुवात झाली त्याची कल्पना फार पूर्वीपासून मनात घोळत होती. पाश्चात्त्य चित्रे आणि शिल्पांमध्ये क्रॉसवर सर्व वेदना सहन करणाऱ्या येशू ख्रिस्ताकडे पाहिल्यावर नेहमी वाटे की, कोणत्याही महात्म्याचे मोठेपण केवळ त्याच्या जीवनप्रसंगांवरून किंवा त्यांच्या संदेशावरूनच ठरत नाही, तर जीवनाच्या अंतिम घडीला त्यांच्या निश्चयाची दृढता आणि मनाची स्थितप्रज्ञ अवस्था पाहून आपण त्यांना देवत्व बहाल करतो. यादव कुळाचा सर्वनाश होण्याचा शाप मिळाल्यावर भगवान कृष्णानेदेखील आपला अंत त्या शापाच्या परिणामात स्वीकारला होता. प्रारब्धाने येणारी अंतघडी जाणून कदंबवृक्षाच्या सावलीत पहुडलेल्या कृष्णाच्या तळपायाला व्याधाचा अनावधानाने सोडलेला विषारी बाण लागतो आणि कृष्ण त्या भयभीत व्याधाला ‘अभय’ देऊन क्षमापूर्वक देह सोडतात. हे चित्र रंगविण्याची इच्छा होती, परंतु ते ‘प्रसंगचित्र’ होऊ नये असेही वाटत होते. एखाद्या व्यक्तीला तशी पोझ देऊन जर चित्र काढले तर ती नाटय़मय स्थिती चित्रातून प्रकट होईल, पण मला कृष्णाचे मोठेपण दाखवायचे होते. वास्तवाला कल्पनेची जोड मिळाली म्हणजे अतिवास्तवता साकार होते. ही रचना कुशलता (creativity) आपल्या मन:शक्तीत असते. अनंत क्षितिजापर्यंत कर्मभूमीवर पहुडलेला पीतवसनी कृष्ण, त्यांच्या पायाला टोचलेला विषारी बाण आणि त्या जखमेतून ठिबकणारे रक्त असे स्केच काढले. या स्केचला रंगवताच पूर्ण चित्राची कल्पना नजरेसमोर साकार होऊ लागली. अवकाशात कृष्णाचा चिरंतन गीता संदेश देणारा पांचजन्य शंख आणि अध्र्वतूल अध:शाखा असलेला ‘जीव’ अश्वत्थाची डहाळी असे ते पूर्ण पुरुषाचे चित्र होते. ते चित्र रंगविताना आणि पूर्ण झाल्यावर माझ्या शरीराला एक अनाहूत कंपन आणि मनाला समाधान देऊन गेलं. ते चित्र आज माझ्या संग्रही नसले तरी मनातल्या भिंतीवर कायमचे विराजमान आहे.
पुढे कृष्णजीवनावर आधारित चित्रे रंगविताना कृष्णाचे विश्वरूप दर्शन दाखविताना माझी अर्जुनासारखी दिङ्मूढ अवस्था झाली होती. विषय सुचला की चित्र काढणे हे प्रस्थापित चित्रकाराला तसे कठीण नसते. प्रसंगी वाचन, चिंतन आणि संदर्भचित्रांचा आधार घेऊन तो चित्र काढू शकतो.
श्रीमद्भगवद्गीतेतील दहाव्या आणि अकराव्या अध्यायातले कृष्णाने अर्जुनाला दाखविलेल्या विश्वरूपाचे वर्णन वाचल्यावर त्याचा विस्तार आपल्या इझलवरच्या कॅनव्हासच्या चौकटीत कसा बंदिस्त करायचा हे नक्की ठरत नव्हते. कथित वर्णनाची कल्पना करून चित्र तयार होईल, पण तो विश्वरूपाचा साक्षात्कार नव्हे हे माझे मन ठासून सांगत होते. किती तरी दिवस माझ्या स्टुडियोतल्या भिंतीवर ५ फूट ७ १० फु टांचा कोरा कॅनव्हास माझी असाहाय्य स्थिती पाहात होता. ते विश्वरूप पाहाण्याची क्षमता असलेली दृष्टी कृष्णाने अर्जुनाला दिली होती आणि हे सर्व प्रासादात बसून बघण्याची दृष्टी व्यासकृपेने मंत्री संजयला प्राप्त झाली होती. या दोघांव्यतिरिक्त अन्य कुणीही न पाहिलेलं दर्शन मी चित्रात मांडणं म्हणजे ते कमीपणाचं लक्षण होईल ही भीती होती.. आणि एक दिवस नेमकं हेच सत्य स्वीकारून माझी विनम्रता मी कॅनव्हासवर एकटवून कृष्णाची दोन मोठी पाऊले काढली. त्याच्या पायाशी अज्ञानाचे कवच फोडून बाहेर येणारा नतमस्तक अर्जुन दाखविला. कुरुक्षेत्रावर क्षितिजदूर पसरलेले सैन्य आणि अथांग आकाश. चित्र सुचले तेव्हा ‘युरेका, युरेका’ म्हणून नाचावंसं वाटले. जे विश्वरूप मी पाहिलंच नाही ते सारे माझ्या कॅनव्हासच्या चौकटीबाहेर. जो संपूर्ण विश्व व्यापून ‘दशांगुळे राहिला’, तो ज्याने त्याने दिव्य दृष्टी प्राप्त करूनच अनुभवावा. माझ्याजवळ ती दृष्टी नाही हे स्वीकारणं हाच माझ्या चित्रातला आध्यात्मिक अनुभव होता. विनम्रतेचे कैवल्य मला या चित्राने दिले. ‘नष्टोऽर्मोह: स्मृतिर्लब्धा’ हे या चित्राचे शीर्षक होते. एखादा विषय सुचल्यावर त्याला चित्ररूप देताना विचाराची पातळी अशा उंचीवर येऊन ठेपते, की तो विषय नुसताच illustrate करण्याइतपत राहात नाही. आपल्या विचारांना जशी एक भाषा असते तसेच चलत् चित्रासारखे दृश्यदेखील असते. विषयाचे गांभीर्य काही वेळा मन:पटलावर उमटलेले दृश्य क्षणात पुसून वेगवेगळी रूपे दाखवू लागते. बीजातून अंकुरलेल्या रोपाला फलपुष्पांनी बहर यावा तसा तो विषय फुलत जातो.
‘गजराज’ या मालिकेत हत्तीच्या संदर्भातले विषय चितारले होते. त्यातली ‘गजलक्ष्मी’ सांकेतिक असली तरी चित्राचं अवतरण अमर्याद होतं. प्रचंड शक्ती एकवटलेली हत्तीण आणि वैभवसंपन्नता दर्शविणारी लक्ष्मी यांचे पारंपरिक रूप तसे सर्वपरिचित होते. देवतासदृश लक्ष्मीची मूर्ती आणि दोहो बाजूंना पुष्पमाला धरून उभे असलेले दोन हत्ती असा प्रतीकात्मक अर्थबोध पूर्वसूरींनी आपल्या चित्रातून दाखवला होता. तेव्हा माझ्या चित्रातून ‘गजलक्ष्मी’ कशी व्यक्त करावी यासाठी मी विचार करीत होतो. घरात येणाऱ्या नववधूला लक्ष्मीचा मान देण्याची आपली परंपरा आहे. ती उंबरठय़ावरचे माप ओलांडून (पायाने ढकलून) येताना सर्व कल्याणाचे वैभव घेऊन प्रवेश करते अशी यामागची कल्पना. तसेच आजही दक्षिणेकडे हत्ती दारात आला तर लक्ष्मी आली म्हणून नारळ वाहतात. या दोन्ही कल्पना एकत्र करून नवयौवना ‘गजलक्ष्मी’ कमळ पुष्पांच्या मुंडावळ्या बांधून उंबरठय़ावरील माप ओलांडून प्रवेश करणारी चित्रात दाखवली. तिच्या भाळी असलेला कुंकुमतिलक संपूर्ण चित्राला सौभाग्याचे लेणे देऊन गेला.
सर ज. जी. कला महाविद्यालयात शिकत असताना आमचे डीन शंकर पळशीकरसर आमच्या वर्गावर आले होते. आम्हा विद्यार्थ्यांची चित्रे पाहाता पाहाता ते म्हणाले, ‘‘या जगात एकमेव सत्य आहे तो म्हणजे ‘प्रकाश’.’’.. आता पुढे सर काय म्हणतात म्हणून आम्ही उत्सुकतेने त्यांच्याकडे पाहू लागलो. त्यावर ते एकच शब्द म्हणाले, ‘‘रंगवा!’’ आणि तडक त्यांच्या केबिनकडे निघून गेले. या विधानाची अर्थगर्भिता किती व्यापक असू शकते ते प्रत्यक्ष रंगविल्याशिवाय कळणार नव्हती. जपानमधील त्सुबोसाका डेरा मंदिरासाठी मी रंगवलेली बुद्ध चरित्र चित्रे आणि बोरिवलीच्या विपश्यना पॅगोडासाठी रंगविलेली बुद्ध चित्रावली ही प्रसंगचित्रे आहेत; परंतु ‘इतिपिसो भगवा..’ (ऐसे बुद्धाचे भगवंतपण..) या बुद्ध चित्रमालिकेत मला केवळ कथाचित्रे दाखवायची नव्हती. त्यातले भगवान बुद्धांचे बोधिप्राप्त साक्षात्काराचे चित्र रंगविताना पळशीकरसरांचे विधान आठवले. ‘प्रकाश रंगवा!’ भगवंतांचा निर्वाण साक्षात्कार ज्ञानप्रकाशाचा होता. अध्यात्माच्या क्षेत्रात अशा ज्ञानप्रकाशाचा आणि ज्योतीचा उल्लेख अनेक जागी येतो. आपण स्वयंप्रकाशित होणे हे पूर्ण सत्याच्या साक्षात्काराचे द्योतक आहे. या चित्रातली भगवान बुद्धांची प्रतिमा पौर्णिमेच्या पूर्ण चंद्रासारखी प्रकाशमय दाखवली. बुद्धांच्या चेहऱ्यावरचा सर्वात उजळ रंग आणि आकाशातल्या पूर्ण चंद्राचा रंग एकाच तीव्रतेचा असूनही चित्रातील चंद्र हा परप्रकाशित असल्याने त्याची उजळता भगवंताच्या तेजापुढे फिकी वाटेल, अशी रंगयोजना चित्रातून अवतरली. हे चित्र पाहता असताना अंतर्मुख घेऊन आपल्यामधला मित्र-मित्रता प्रकाश पाहण्याची प्रेरणा मला मिळत असते.
संत कबिरांच्या काही दोह्य़ांवर आधारित मी चित्रे रंगविली त्या वेळी त्यांच्या एका दोह्य़ाने अत्यंत प्रभावी झालो.
कबीरा मन निर्मल भया जैसे गंगा नीर।
पीछे पीछे हरि चले कहत कबीर कबीर।।
हरी जाणून घेण्यासाठी हरीचा नामजप करीत भजन करणाऱ्या कबिराचे मन गंगाजलासारखे निर्मल झाले, त्यात आता कुठलीच आसक्ती राहिली नाही. अगदी हरीच्या साक्षात्काराचीदेखील आसक्ती उरली नाही. त्यामुळे ज्याचा नामजप करायचा तो हरीदेखील कबिराच्या मागे राहिला. आत्मज्ञानाचा साक्षात्कार झालेला कबीर आपल्या मस्तीत चालला आहे आणि त्याच्या मागून हरी कबिराच्या नामाची माळा जपत अनुसरण करतोय असे हे चित्र. या चित्रात भगवंताचा चेहरा दाखविलेला नाही. जणू तो आपला ‘नेति नेति’ असा परिचय घेऊन चालला आहे.
जेव्हा हे चित्र तयार झाले तेव्हा सर्व संतांच्या ओळींचा साक्षात्कार त्या त्या संतांना कसा झाला असावा याचा विचार करून ‘मोगरा फुलला..’ हे चित्रमालिका रंगविण्याचे ठरविले. या चित्रमालिकेने मला खूप काही दिले. विचारांना आणि चित्रांना आध्यात्मिक रंग कसा चढतो याची अनुभूती मला आली. आकाशगुंफेच्या उंबरठय़ावर बसलेले ज्ञानेश्वर, ताटी उघडा म्हणून साद घालणारी मुक्ताई, मंदिराच्या बंद दरवाजाबाहेर विठू रूप घेऊन नाचणारा चोखामेळा, ‘इथं का उभा तू श्रीरामा’ म्हणून विठ्ठलाला जागविणारे रामदासस्वामी, ‘ठुमक चलत रामचंद्र’ म्हणणारे संत तुलसीदास आणि असे एकेक करीत नास्तिकालाही आस्तिकतेचे भान आणणारे अगदी अलीकडचे संत विनोबापर्यंत अनेक संतचित्रांनी माझ्या मनावर खोलवर संस्कार केले. प्रदर्शनात साश्रुनयनांनी चित्रातल्या भावार्थाशी तादात्म्य पावणारा रसिक प्रेक्षक पाहिला. तो अपूर्व सोहळा होता.
हा प्रवास संपलेला नाही. जन्माला आल्यावर डोळे उघडून या चराचर विश्वात आपण अवतरलो तेव्हा सारं काही अपूर्वाईचे वाटत असावं. हळूहळू त्या दृष्टीने सशक्त झालेला मन आंतरदृष्टी घेऊन पाहू लागताच कल्पनासृष्टी दृग्गोचर होऊ लागते. या कल्पनेला अनुभूतीच्या सत्याचा आधार असतो आणि हेच कलाकाराच्या कलाकृतीत वास्तव रूप धारण करून प्रकट होते. या सर्व कलाकृतींच्या खाली उमटवलेली स्वाक्षरी चित्राच्या मालकी हक्काची सूचकता नसते. जशी संतांनी आपापल्या अभंगांच्या रचनेशेवटी म्हणे म्हणून आपला परिचय देत परमात्म्याला घातलेली साद असते तशी माझी स्वाक्षरी त्याचे लक्ष वेधून घेण्यासाठी नमूद केलेली माझी ओळख आहे असे मी समजतो. कलाकाराचे सर्जन ही त्याची साधना असते. या विचारांनी माझी कलाकृती केवळ मनोरंजन करणारी न राहता माझे स्वत:चे आणि रसिकांचे मनपरिवर्तन करणारी ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ ठरावी इतकेच पसायदान मागतो.
vasudeokamath@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा