प्रतिमा कुलकर्णी
माझ्यासाठी प्रवास, पर्यटन म्हणजे.. सुकून.. ती मला मिळते, निसर्गात-डोंगरदऱ्यांत, जंगलात, नाही तर समुद्रकिनारी. दादर चौपाटी असो, गोव्याचा मीरामार बीच किंवा जपानमधला फुजी पर्वत.. ती मनभर शांतता मला तिथे मिळते.. कधी दोस्तमंडळींबरोबर, तर कधी एकटय़ानंच केलेला हा प्रवास. अशाच काही प्रवासातली ही शब्दचित्रं..
टेकडीपेक्षा किंचित उंच असा डोंगर.. भरपूर झाडी.. त्या झाडीतून तयार झालेली ओल्या मातीची अरुंद अशी वर-वर जाणारी पाऊलवाट.. सगळीकडे पसरून राहिलेला एक ओलसर गंध.. त्या पाऊलवाटेवरून शांतपणे, सावकाश चालणारे आपण आणि वर चढत-चढत गेल्यावर अचानक लागलेलं पठार.. त्या पठारावरून दूपर्यंत दिसणाऱ्या पर्वतांच्या रांगा, दऱ्या आणि मनभर पसरून राहिलेली शांती, सुकून.. किंवा समुद्राचा निर्जन किनारा, वाळूवरून अनवाणी चालत जाणारे आपण, नि:शब्द.. निसर्गाशी नातं सांधत त्याच्याशीच मनातल्या मनात संवाद साधत.. भरतीच्या वेळेस समुद्रावर अनवाणी चालायला फार मजा येते. उसळलेली लाट जेव्हा परत जाते, तेव्हा जाताना आपल्या पायाखालची थोडी वाळू घेऊन जाते. त्यावेळी तळपायाला त्या सरकत जाणाऱ्या वाळूचा स्पर्श अद्भुत वाटतो. जसा झोपाळय़ावर कितीही झोके घेतले तरी कंटाळा येत नाही, तसाच या लाटांमध्ये कितीही वेळ घालवला तरी कंटाळा येत नाही.. प्रवासाची माझी कल्पना ही अशी.. इतकी साधी. निसर्गात, नाही तर समुद्रावर. मग तो कुठलाही असो. घराबाहेर पडले की तो माझ्यासाठी प्रवास. पर्यटन!
एरवी प्रवासाबद्दल माझ्या मनात फारसा उत्साह नसतो. कामानिमित्त घराबाहेर, मुंबईबाहेर पडणं होतं, तेवढाच प्रवास मला झेपतो. एखाद्या ठिकाणी जाऊन आलं, की जे पाहिलं ते परत आठवायचं म्हटलं, तर आठवतही नाही. त्या बाबतीत माझी स्मरणशक्ती फार कच्ची आहे. पण कधी तरी एखाद्या प्रवासातले काही क्षण असे असतात, की ते मनावर कोरले जातात. मुद्दाम लक्षात ठेवले नाहीत तरी कधी तरी अचानक एखादी आठवण जागी होते आणि मनाला शांत करून जाते.. त्यातल्याच या काही आठवणी.. माझ्या प्रवासातल्या..
त्यातलं सर्वात आवडतं चित्र आहे नुकत्याच ‘कालवश’ झालेल्या, बोर घाटातल्या (ज्याला खंडाळा घाट म्हणायची पद्धत आहे.) अमृतांजन पॉइंटचं. मी साधारण ७-८ वर्षांची असेन. माझे वडील आणि त्यांचे काही मित्र गाडीतून मुंबईहून पुण्याला जात होते. त्यांच्याबरोबर मीसुद्धा होते. त्या वेळी एक्स्प्रेस वे नव्हताच आणि आजच्यासारख्या असंख्य, मजबूत किंवा हट्टय़ा-कट्टय़ा गाडय़ाही नव्हत्या. घाट चढला, की गाडी गरम व्हायची, मग तिला थोडी विश्रांती देण्यासाठी तिथेच थांबावं लागायचं. असेच एकदा आम्ही अमृतांजन पॉइंटपाशी थांबलो आणि समोर डोंगरावरून जाणारी एक आगगाडी दिसली. डोंगराच्या वरून असं जरी म्हटलं तरी ती डोंगरमाथ्यावर नव्हती. डोंगराच्या कडेवरून जात होती. आसपास गच्च हिरवी झाडी, खाली दरी, वर डोंगर, पलीकडे शतक-सहस्र वर्ष उभं राहिलेलं सरळ, अजस्र डय़ूकचं नाकाड! ते दृश्य इतकं लोभसवाणं होतं, की मी डोळे विस्फारून त्या गाडीकडे पाहातच राहिले. त्यानंतर अगणित वेळा त्या वाटेनं गेले-आले तरी अजूनही मी प्रत्येक खेपेस त्या डोंगराकडे पाहते, तशीच गाडी परत दिसेल का म्हणत- पण ते दृश्य मला परत कधीच दिसलं नाही. दिसलं नाही हे एका अर्थी बरंच झालं, कारण दिसलं असतं, तर कदाचित माझ्या मनात साठलेल्या त्या दृश्याचं मोल कमी झालं असतं बहुधा! आज ते कदाचित तितकं सुंदर वाटणारही नाही.
डोंगर, दऱ्या, झाडं, हिरवळ, माती, नदी, तलाव, झरे, फुलं, पानं, या सगळय़ामध्ये किती आनंद भरून राहिलेला असतो! माणसाला शांत, समृद्ध करण्याची जबरदस्त ताकद निसर्गात असते. शहरामध्येसुद्धा ज्याला इंग्रजीमध्ये ॲव्हेन्यू- दुतर्फा झाडं असलेला रस्ता म्हणतात, तसा एखादा रस्ता चुकून लागला तर दिलाला सुकून देऊन जातो. (चुकून अशासाठी, की रस्ता चुकण्यात माझा हातखंडा आहे. त्यामुळे अचानक कधी काय समोर येईल काही सांगता येत नाही!) यात सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे शांतता. नि:स्तब्धता. बरोबर कुणी असलं तरी न बोलता चालत राहाणं. न बोलता त्या अनुभवात बुडून राहणं. अगदी ‘‘किती सुंदर आहे नाही!’’ वगैरे शब्दसुद्धा त्या शांततेचा भंग करणारे. नकोच ते. ती सुंदरता मनात साठवण्यामध्ये बाधा येईल असं काहीच नको. फोटोबिटो तर नकोच नको!
माझं लहानपण गेलं मुंबईत, दादरला. मैत्रिणींबरोबर जमेल तेव्हा समुद्रावर जाणं हा आवडीचा छंद होता. त्या वेळी दादर चौपाटीवर आजच्यासारखी गजबज नसायची. त्यातही आम्हाला काही शांत कोपरे माहीत होते. तरीही जेव्हा पहिल्यांदा चेन्नईचा मरीना बीच पाहिला तेव्हा फारच अप्रूप वाटलं होतं. स्वच्छ, पांढरी रेशमासारखी मऊ वाळू, विस्तीर्ण किनारा! पन्नासपेक्षा जास्त वर्ष उलटली तरी काल पाहिल्यासारखा आजही डोळय़ासमोर आहे. आजही माझा बहुतेक प्रवास हा या मैत्रिणींची सोबत मिळावी म्हणून असतो. माझा हा मैत्रिणींचा ग्रुप प्राथमिक शाळेपासूनचा आहे. मैत्री हा शब्दाच्याही पलीकडची आमची मैत्री आहे. आम्ही दर दोन-तीन महिन्यांनी एखाद्दोन दिवस मुंबईच्या आसपास आणि मग वर्षांतून एकदा कुठे तरी लांब- अनेकदा परदेशी फिरायला जातो. अशा वेळेला आपण कुठे जातोय याकडे माझं लक्ष नसतं. मला फक्त मैत्रिणी भेटणार याचाच आनंद असतो. मग दिवसरात्र गप्पा, सुखदु:ख वाटून घेणं, वेडय़ासारखं हसणं, खाणं-पिणं आणि मग ताजंतवानं होऊन परत येणं. माझ्यासाठी इतकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्या म्हणतील आणि नेतील त्या ठिकाणी मी त्यांच्या मागून जाते. माझ्यासाठी त्यांचा सहवास म्हणजे सुकून..
आणखी एक सुकून देणारा अनुभव म्हणजे, ‘एनसीपीए’च्या टाटा थिएटरला जशा समोरच्या बाजूनं वर जायला पायऱ्या आहेत, तशाच मागच्या बाजूलाही आहेत. विजयाबाई मेहतांच्या ‘शाकुंतल’ नाटकाच्या तालमी आम्ही टाटा थिएटरमध्ये केल्या. त्या वेळी मला तो जिना सापडला आणि तिथे कुणाची वर्दळ नसते हेही लक्षात आलं. जरा संधी मिळाली, की मी तिथे जाऊन बसायला लागले. दुपारच्या वेळी त्या जिन्याच्या मधल्या एखाद्या पायरीवर भिंतीला टेकायचं आणि नरिमन पॉइंटवरून येणारी समुद्राची गाज ऐकत बसायचं.. सुकून!
सध्या मी जी दूरचित्रवाणीवर मालिका करतेय त्याचं शूटिंग मढ आयलंडमध्ये होतंय. सकाळी लवकर त्या मढच्या रस्त्यानं जाताना फार बरं वाटतं. खरं म्हणजे तो रस्ता अत्यंत खडबडीत आहे. गेलं वर्षभर कुठे न कुठे तरी खोदून ठेवलेलं आहेच, पण समुद्राच्या जवळून जाणाऱ्या कुठल्याही रस्त्यात काही तरी जादूच असते. त्या रस्त्यावरून कामाला जाताना कधीच त्रास वाटत नाही आणि मनात हुरूप घेऊनच मी कामाला जाते. शहरी वस्तीतून हळूहळू आत-आत जाणारा रस्ता, त्यात लागणारी खारफुटीची तिवरं, नारळाची झाडं, मग सगळं मागे टाकून किनाऱ्यावरून जाणारा रस्ता. यात कुठेही समुद्राचं थेंबभरसुद्धा दर्शन होत नाही, पण वातावरणात मात्र एक जादू असते.. आणि तीच मला मोहवते.
गोव्यातलं वास्तव्यही असंच मोहवणारं. गोव्यात पणजी आणि श्रीलंकेत कोलंबो यांच्या सरकारी इमारती असलेल्या रस्त्यात कमालीचं साम्य आहे. तसाच वळणा-वळणानं गेलेला रस्ता, एका बाजूला पाणी, दुसऱ्या बाजूला निळय़ा-पिवळय़ा इमारती- आणि त्यातली ती संथ शांतता. गोव्यात मी बरंच काम केलं. तीन सिनेमे लिहिले. त्या वेळी वरचेवर गोव्याला जाणं होत असे. मी पणजीत मिरामारला राहत असे. दिवसभर भरपूर काम करून संध्याकाळी एकटीनं समुद्रावर भटकायचं, मग रात्री दोस्तमंडळींबरोबर गप्पा, जेवण, बरंच काही. ही अशी सुट्टी मला आवडते. काहीही न करता नुसताच आराम करायला पर्यटनाला जाणं मला जमत नाही. आराम करण्याची माझी सगळय़ात आवडती जागा म्हणजे माझं घर!
प्रवासातली बाकी काही नाही तर एक गोष्ट मात्र माझ्या चांगलीच लक्षात राहते. ती म्हणजे कुठे काय खाल्लं ते! जपानमधल्या दोन जागा माझ्या अत्यंत आवडीच्या आहेत. एक आहे फुजी पर्वताच्या मध्यावर. वेगवेगळय़ा मोसमांत मी जपानला जाते, पण त्यातही ऑटम आणि विंटर जास्त. कुठच्याही मोसमात गेलं, तरी फुजीच्या पायथ्याशीही आणि मध्याशीही थंडी असतेच, शिवाय थंड, बोचरे वारेही वाहात असतात. अशा वेळेला बसमधून खाली उतरून बाहेर पडण्याची इच्छा होत नाही, पण त्या थंडीमध्ये तिथे मिळणारी उकडलेली मक्याची कणसं फार बहारदार लागतात. उंच लाकडी खांबांवर बांधलेली लाकडाचीच इमारत. समोर पर्वतावर पसरलेला बर्फ, वाजणारे दात. धावतच आत जायचं! तिथे एका मोठय़ा चुलीवर खूप मोठं लाकडी भांडं, त्यात उकळणारं पाणी, त्या पाण्याच्या बाहेर येणाऱ्या वाफांमुळे त्या संपूर्ण जागेत तयार झालेला एक स्वप्नवत माहौल. ते कणीस खायला जास्त आवडतं, की त्या वातावरणात राहायला, हे समजत नाही; पण फुजी पर्वत समोर दिसतोय. शांत.. गंभीर.. सर्रीअल.. म्हणता येईल असा. कुडकुडत, मोडेपर्यंत मान मागे टाकून त्याच्याकडे बघितलं, की तो बोलतोच आपल्याशी.
दुसरी जागा त्याच्या वेगळय़ा दिशेला. मी नेहमी ज्या शहरात जाते- ताकायामा- तिथून परतीच्या प्रवासाला निघालं, की जो पहिला स्टॉप लागतो, तिकडचं हॉट चॉकलेट मला फार आवडतं. बरेच वेळा तिथेही बर्फच पडत असतो, पण तरीही त्या बर्फातून वाट काढत, त्या विशिष्ट दुकानात जाऊन हॉट चॉकोलेट प्यायलं नाही, तर मला तो प्रवास पूर्ण झाल्यासारखं वाटतच नाही..
२ नोव्हेंबरच्या दिवशी जर मी ताकायामा शहरामध्ये असले, तर एक गोष्ट हमखास करते. मी इतर काहीही कार्यक्रम सोडू शकते, पण हा नाही. ताकायामा शहराच्या मधोमध ‘साकुरायामा-जि’ हे एक शिंतो धर्माचं मंदिर आहे. २ नोव्हेंबरला त्या मंदिराच्या प्रांगणात साधारण १० ते ३० वर्ष वयाची २५-३० मुलं जपानी पारंपरिक ड्रम्स वाजवतात. फार तर २० मिनिटं चालणारा हा रोमांचकारी कार्यक्रम पुढचे किती तरी दिवस मनात रेंगाळत राहातो.
स्वत:बरोबरच्या, मैत्रिणींबरोबरच्या प्रवासाबरोबरच मला निखळ आनंद ज्या एका प्रवासानं दिला, तो एक प्रवास मात्र माझ्या आठवणींतून कधीच पुसला जाणार नाही. तो म्हणजे आमच्या ‘हर्बेरियम ग्रुप’चा लंडन प्रवास. ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी- अभिनेता सुनील बर्वे याने २०१० मध्ये पाच जुन्या नाटकांचं पाच दिग्दर्शकांसह नव्यानं सादरीकरण केलं होतं. ते आम्ही, विजय-मंगल केंकरे, सुनील-अपर्णा बर्वे, केदार-बेला शिंदे, मंगेश कदम-लीना भागवत, चंद्रकांत कुलकर्णी आणि मी, असा दहा जणांचा ग्रुप होता. मुख्य उद्देश- नाटकं बघणं. काही नाटकांची तिकिटं इथूनच काढली होती आणि काही आयत्या वेळेला बघायची असं ठरलं होतं. नाटकं आम्ही बघत होतोच, त्यात आनंद होताच. एरवी नाटक-सिनेमा वेगवेगळं बघून मग त्यावर बोलत होतोच. कधी कौतुक असेल, कधी आगपाखड असेल; पण एकत्र बघण्यामध्ये एक विशेष मजा होती. त्याहीपेक्षा आनंद होता गप्पा मारण्यात. रोज सकाळी चहाला भेटायचं, मग सिग्रेट ओढणारी मंडळी हॉटेलच्या मागे असणाऱ्या एका खोपटय़ात जायची. ती खास स्मोकर्स केबिन होती, पण गप्पांमध्ये खंड नको म्हणून आम्ही नॉन-स्मोकर्सही त्या खोपटय़ात जाऊन बसायचो. सिग्रेटी संपल्या तरी गप्पा संपायच्या नाहीत. त्यातच या सगळय़ांकडे गोष्टींचा खजिनाच, नाटकांच्या म्हणू नका, नाटकवाल्यांच्या म्हणू नका, ऐकलेल्या गोष्टीसुद्धा परत ऐकायला आवडायच्या. अगदी फर्माइशीसुद्धा व्हायच्या. असा तो दहा दिवस, सहा नाटकं, दोन थिएटर टूर्स असा भरगच्च दौरा २०१४ लाच संपला; पण आम्हा प्रत्येकाच्या मनात तो अजूनही जागा आहे. आम्ही जमलो, की प्रत्येक वेळी म्हणतो, जाऊ या रे परत कुठे तरी! अजून योग आलेला नाही; पण कधी तरी येणार हे मात्र नक्की !
प्रवासाचं वेड नसलं तरी एक इच्छा मात्र मनात खोलवर दडलेली आहे. मला अशी एक बारीक शंका आहे, की बोटीवरच्या कादंबऱ्या वाचून आणि सिनेमे बघून मला तसं वाटत असावं.. ते काहीही असो, पण मला बोटीनं कुठे तरी जायचंय. दूरवर. सुकून देणारा प्रवास करायचाय.. समुद्राच्या साक्षीनं..संगतीनं..
pamakulkarni@gmail.com