वर्ष १९९४. मी पुण्याच्या फग्र्युसन कॉलेजमध्ये बी. ए. पॉलिटिकल सायन्सच्या दुसऱ्या वर्षांला होते. गिरीश कर्नाड यांनी दिग्दर्शित केलेला ‘चेलुवी’ हा माझा पहिला हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्या सिनेमाच्या ‘इफ्फी’मधल्या खेळासाठी मला आयुष्यात पहिल्यांदा आपल्या राजधानीत, दिल्लीत जायला मिळालं. मी आणि भाऊ संदेश पुण्याहून निजामुद्दीन एक्सप्रेसनं दिल्लीला पोहोचलो.

आमच्या संपूर्ण ट्रिपचे व्यवस्थापक होते स्वत: गिरीश अंकल! अशोका हॉटेलच्या खोलीचं कुलूप कसं उघडायचं, गरम पाणी कसं येतं, ‘टेबल एथिक्स’- सुरी तोंडात घालायची नाही! इथपासून ते लेखन म्हणजे काय, पुनर्लेखनाची शिस्त, अशा असंख्य विषयांवर ते आमच्याशी बोलले. ‘चेलुवी’मुळे मला जगाचा नकाशा कळला! माझी ऑडिशन पुण्यात झाली होती, चित्रीकरण केरळला, डिबग बंगळूरुला आणि चित्रपट प्रदर्शित झाला थेट कान्स फेस्टिव्हलला. तिथे मी गेले नव्हते, पण सिनेमा मला जगभर घेऊन गेला!

Marathi Actress Vishakha Subhedar wrote a special post for son abhinay subhedar birthday
अभिनेत्री विशाखा सुभेदारने लेकाच्या वाढदिवसानिमित्ताने लिहिली खास पोस्ट, म्हणाली, “जे शिकायला परदेशी गेलायस…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
adventure tourism in india
सफरनामा : साहसी पर्यटन!
Kartik Ekadashi celebration celebrated in traditional spirit at Sri Kshetra Pandharpur Branch with Shri Gajanan Maharaj Sansthan
‘कार्तिकी’निमित्त शेगावात भाविकांची मांदियाळी; पालखी परिक्रमा लक्षवेधी
viral video a boy standing at moving train and falling from local train video
“काय वाटलं असले त्या मित्राला” डोळ्यासमोर मित्र ट्रेनखाली चिरडत होता पण तो काहीच करु शकला नाही; थरारक VIDEO
success story of utham gowda started his own startup owner of captain fresh company
जास्त पगाराची नोकरी सोडली अन् घेतली ‘ही’ जोखीम, आता आहेत कोटींचे मालक; वाचा उथम गौडा यांचा प्रेरणादायी प्रवास
Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका
Director Nikhil Advani believes that artistic films will never disappear
‘कलात्मक चित्रपट कधीच लोप पावणार नाहीत…’; दिग्दर्शक निखिल अडवाणी

त्या फेस्टिव्हलला इटलीचे निर्माते सर्जिओ स्कॅपॅनिनी आणि दिग्दर्शक लंबेर्तो लंबेर्तिनी आले होते. त्यांनी ‘चेलुवी’ पाहिला आणि ते मला शोधत भारतात आले. मोहन आगाशे हे ‘जगत मुशाफिर’ त्यांचा निरोप घेऊन आमच्याकडे आले. ऑडिशन झाली आणि माझी ‘वृंदावन फिल्म स्टुडिओज्’ या चित्रपटासाठी निवड झाली. चित्रीकरण कुठे, तर माझ्या मनातल्या स्वप्नातल्या गावात- शांतीनिकेतनला! रवींद्रनाथ टागोरांचं शांतीनिकेतन.. इंदिरा गांधींचं.. मला विलक्षण कुतूहल होतं. सुरुवात कलकत्त्यापासून होती. टोपी घातलेला माझा दिग्दर्शक शूटिंग सुरू होण्यापूर्वीच दमून गेल्यासारखा दिसत होता! पुढचे ८०-९० दिवस त्यानं कुठून ऊर्जा मिळवली मला अजूनही समजत नाही. कदाचित भारतावरचं प्रेम हीच त्याची आंतरिक ओढ त्याला पुढे नेत होती. त्याच्याबरोबर आमचा निर्माता सर्जिओची तर जास्तच. सर्जिओचं आडनाव सेन, शर्मा, जोशी, कदम, शहा हे जास्त उचित वाटेल, इतका तो मनानं भारतीय आहे. गेली अनेक दशकं भारतात येतोय. त्याचं घर रोमला. बायको ग्लोरिया पुरातत्त्व खात्यातली वास्तुशास्त्रज्ञ. त्यांना एकूण तीन मुली. मला धरून चार!

आणखी वाचा-कलावंतांचे आनंद पर्यटन: निसर्गाचा रससशीत अनुभव!

तर आता आपण आहोत कलकत्त्यात. मी आयुष्यात पहिल्यांदा आले आहे इथे आणि माझ्या आजूबाजूला बंगाली कमी आणि इटालियन माणसंच जास्त आहेत. कुणालाच हिंदी-इंग्लिश नीट येत नाही. पूर्ण वेळ माणसांचे वैतागून हसत कपाळावर हात मारून घेण्याचे आविर्भाव! कपडे, मेकअप, लँग्वेज कोच, सहकलाकार ही मांदियाळी घोळात सामील झाली होती. ती दुपार मला लख्ख आठवते.. एक अत्यंत आनंदी माणूस माझ्याशी बोलायला आला. त्याला बोलायला किती आवडतं याचे अनंत किस्से आता माझ्याकडे आहेत, पण १९९५ च्या फेब्रुवारी महिन्यात कलकत्त्याला पोहोचल्यावर चित्रीकरण सुरू व्हायला एक दिवस बाकी असताना मी आणि सर्जिओ स्कॅपॅनिनी पैशांची बोलणी करत होतो. त्यांना माझे जवळजवळ ५० दिवस हवे होते आणि त्या बदल्यात ते मला अतिशय किरकोळ रक्कम देऊ करत होते! परदेशी निर्माते असल्यामुळे माझ्या ‘स्ट्रगलर’ मनाला जरा मोठी स्वप्नं पाहावीशी वाटली असतील तर नवल ते काय! पण सर्जिओ माझ्यासारख्या त्याला ‘फॉरेनर’ समजणाऱ्या भारतीयांना कोळून प्यायला होता. आमच्या वाटाघाटी तीन-चार तास चालल्या होत्या. मला पैशांची बोलणी पूर्ण करायला साधारण पाच मिनिटं लागतात. पण अठ्ठावीस वर्षांपूर्वी पैशांच्या निमित्तानं आम्ही जे बोललो, त्यातला शब्दन् शब्द आजही माझ्या लक्षात आहे.. सर्जिओनं पैसे वाढवले. पण किती? माझा ‘इगो’ सुखावेल इतकेच! पण त्यानं मला वचन दिलं, की या फुटकळ पैशांच्या शंभरपट श्रीमंत असा प्रवास तो मला देऊ करेल. बोलताना त्याच्या डोळय़ांतून घळाघळा पाणी वाहायला लागलं. माझ्या वडिलांएवढय़ा माणसाला असं रडताना पाहून तसंच माझ्यासाठी कुणीतरी स्वत:चा इतका वेळ आणि भावना द्याव्या, हे मला बेचैन करत होतं. त्याचा निर्मळ खरेपणा मला स्पर्श करून जात होता. स्वत:च्या घरटय़ाबाहेर नुकतंच पाऊल टाकलेल्या एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला तो जगभर कल्पनेची भरारी घ्यायला सांगत होता.. वचन देत होता, की ‘पैशांत मोजता न येणारा आनंद मी तुझ्या आयुष्यात आणेन. माझ्या मुलींच्या इतकीच तुझीही काळजी घेईन. तुला प्रवास घडवीन. माणसं भेटवीन.’ मला एका क्षणी तो ‘रेनमेकर’सारखा भासायला लागला. माझे हक्क आणि गरज हे दोन्ही बुरुज ढासळायला लागले. ‘आयुष्य सुंदर आहे’ या सत्याला मी शरण गेले. डोळे पुसून, कलणाऱ्या सूर्यप्रकाशात मी त्या सिनेमात प्रामाणिकपणे काम करण्याचा निग्रह केला, तेव्हा पुढच्या आयुष्यात काय ‘सफरनामा’ सर्जिओनं मांडून ठेवला होता, याचा यित्कचित गंध माझ्या मनाला नव्हता.

सुरुवात कलकत्ता दर्शनानं झाली. एकीकडे गौतम घोषचं बंगाली मंडळ आणि दुसरीकडे इटालियन युनिटचा सावळा गोंधळ, यात एक माझी वर्णी लागली होती. आम्ही टपरीवरच्या कुल्हडच्या चहापासून ते ‘सेव्हन स्टार’ हॉटेलांच्या जेवणानंतरच्या चहाची चव घेतली. अरविंदाश्रम, गोरियाहाट, कालीमाता मंदिर, मदर तेरेसांची भेट, प्लॅनेटोरिअम, गंगेत होडीतून केलेला प्रवास.. कित्ती काय काय पाहिलं आम्ही. तेही सराव शिबिरं आणि शूटिंग करत असताना. आम्हाला रविवारी सुट्टी असायची. माझ्या गँगमध्ये असायचे अॅबन्तोनिओ, त्याची गर्लफ्रेंड, गायतानो, अॅयन्सो, अलेस्सांद्रा, सावित्री, मोहन कोडा, तुल्यो, आदिती, कुकूदीदी, लोरेदाना, पिनो, आन्ना, मिथु सेन आणि कितीतरी माणसं.. लहान मुलं, भटकी कुत्री, मांजरं, झाडं.. काय सांगू!

आणखी वाचा-कलावंतांचे आनंद पर्यटन: ‘संस्कृतीशोधा’चा प्रवास!

टॉलीगंज क्लबमध्ये रिहर्सलला भेटावं आणि परत येताना रस्त्याच्या मध्यभागातून जाणारी ट्राम पकडावी. गंगेचा सुंदर प्रवाह, तिथला सूर्यास्त पाहात हावडा ब्रिजवरून परत यावं. कलकत्त्यात पाहिलेला विरोधाभास, बकालपणा, गरिबी, घाम, आरोग्याबद्दलची अनास्था पाहून मी घाबरले. हा आपला देश?.. काली घाट परिसरात ‘फॉरेनर’ना प्रवेश निषिद्ध आहे असा ठणाणा करणारे पंडे पैसे मिळाल्यावर कुणालाही गाभाऱ्यापर्यंत घेऊन जात होते. हा दुटप्पीपणा मला चीड आणत होता. वाद घालून, ओरडून मी दमून जात होते. डोक्यात विचार, मतं, विरोधाभास थैमान घालत होते.. आणि प्रत्येक वेळी सर्जिओच्या चेहऱ्यावरचं प्रेमळ स्मितहास्य, एखाद्या भिकाऱ्याच्या खांद्यावर ठेवलेला हात पाहून मनात कालवाकालव होत होती. मग एक महिन्यानं ‘इंद्रपूर सिनमॅटोग्राफिका’ या सर्जिओच्या कंपनीचं शांतीनिकेतनला शिफ्टिंग होणार होतं. दरम्यान, मी माझ्या दादाच्या लग्नाला विमानानं पुण्याला जाऊन आले. कुणीही न पाहिलेल्या माझ्या दादा-वहिनीला झाडून सगळय़ा इटालियन माणसांनी शुभेच्छा दिल्या! सगळय़ांना लग्नाच्या कहाण्या, विधी, कपडे, मेनू याची माहिती हवी होती. मला इतकं नवल वाटलं! आहेर म्हणून सर्जिओनं विमानाच्या तिकिटाचे पैसे स्वत: दिले. ते मी नाकारण्याचा प्रयत्न केला, पण त्यानं ऐकायची तसदीसुद्धा घेतली नाही. मी परत आले आणि आम्ही सगळे रेल्वेनं बोलपूरला निघालो. मला आठवतंय, माझ्याकडे असलेले सगळे कपडे, कानातले डुल, चपला मी त्या अडीच महिन्यांसाठी घेऊन आले होते आणि गंमत म्हणजे एका मध्यम आकाराच्या बॅगमध्ये माझा सगळा संसार आरामात मावला होता. पण काही इटालियन मित्रमैत्रिणींच्या सामानाचं लटांबर पाहून एखाद्याला वाटलं असतं, की अख्ख्या रेल्वेभर यांचंच सामान आहे की काय! त्यात आमच्या सिनेमाचे कॉस्च्युम्स, सेट, वस्तूंच्या पेटय़ा.. खरेदीची हौस! ही सर्कस सर्जिओनं कशी काय आखली होती त्याचं तोच जाणे.

बोलपूरला उतरून आमच्या ‘छुट्टी’ नावाच्या हॉटेलला गेलो. बोलपूरहून शांतीनिकेतन अर्ध्या तासावर. जायला सायकल रिक्षा. चढ आला की लोरेदानाची आई सोडून आम्ही सगळे रिक्षातून उतरून चालायला लागायचो. प्रत्येक सायकल रिक्षावाला थेट कास्टिंग करून आणल्यासारखा. दाढीची खुंटं, रापलेलं अंग, पांढरे केस, फाटकी लुंगी, मळका गमछा आणि घामाच्या धारा, इत्यादी.. ठरलेले पैसे घेताना हात जोडत कृतकृत्य झालेला चेहरा! बोलपूरला जागोजागी तळी होती. त्या तळय़ात विहरणारी बदकं, कधी हंस.. जगातली कितीतरी विशाल झाडं मी तिथे पाहिली. एक वृक्ष तर बराच नावाजलेला आहे. त्याचा बुंधा विक्रमी रुंदीचा आहे. तिथे भस्म लावलेले, दाढी-जटा वाढवलेले अनेक संन्यासी फिरत होते. त्या वातावरणात काहीतरी प्रचंड गूढ आणि भीती दाखवणारं बळ होतं. जरा अंधार पडायला लागला की तिथून पळच काढावा असं वाटणारं! सगळी इटलीची ती माणसं त्या साधूंना भक्तिभावानं नमस्कार करायची. उग्र भाव दाखवत, डोळे फिरवत, अंगारे-धुपारे फिरवत तेही साग्रसंगीत आशीर्वाद द्यायचे. शूटिंगदरम्यान आमच्यातली काही माणसं तिथे ध्यान करायलाही जाऊन बसायची.

शूटिंगचे दिवस रम्य होते. गर्द झाडी, तळय़ांमुळे आलेला ओलसर थंडावा, शांत चित्तानं राहणारी माणसं. लहानशी वस्ती. हसरी मुलं आणि सगळय़ांत महत्त्वाचं म्हणजे त्या गावातल्या पाऊलवाटा. लोकेशन चेंज असेल तर आम्ही चालतच इकडून तिकडे जायचो. गावात नीरव शांतता असायची आणि वर्दळ तर नाहीच जवळजवळ. खूप मैत्रिणी झाल्या तिथे. मी त्यांच्या वेण्या घातल्या, नेल पॉलिश लावून दिलं. लांबून त्यांना आवडत असलेल्या मुलांना बघितलं. त्या मुलांनी आमच्या दिशेला पाहिलं तर खिदळत लपायला पळालो! प्रीतानं सर्जिओचं शर्टाचं तुटलेलं बटण शिवून दिलं. ती ते शिवेपर्यंत तो डोळय़ांतनं पाणी गाळत, चेहऱ्यावर हसू ठेवायचा प्रयत्न करत, तिच्या काम करणाऱ्या हातांकडे बघत बसला होता. जशी कलकत्त्यात मदर तेरेसांचा हात हातात असताना माझी अवस्था झाली होती! भारतातल्या एका लहान खेडेगावात माझ्या मनाचा इतका मोठा प्रवास होणार आहे याची मी कधी कल्पनाच केली नव्हती.

अख्ख्या युनिटबरोबर माझी मैत्री झाली. मी नंतर मोहनदांची तेलुगू फिल्म केली. किती जणांच्या ‘सत्यजीत राय फिल्म इन्स्टिटय़ूट’च्या डिप्लोमा फिल्म्स केल्या. लंबेर्तोची पुढची इटालियन फिल्म केली. ‘वृंदावन’साठी सर्जिओमुळे मला व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलला जायला मिळालं. इटालियन शिकायला मिळालं. मी त्यांच्या रोमच्या घरी कितीतरी दिवस राहिले. बेसिलची रोपं तरारून वाढल्यावर ताज्या कढीलिंबासारखी त्याची पानं स्वयंपाकाला आणून दिली. कित्ती वेळा व्हॅटिकन सिटीला गेले. सर्जिओ आणि ग्लोरिया यांच्या आयांकडे नेपल्सला गेले. नेपल्सहून आम्ही सगळे काप्री आयलंडजवळच्या त्यांच्या प्रोशिदाच्या घरी गेलो. स्टेला, मी, अॅपन्तोनिओ रेल्वेनं फ्लोरेन्सला भटकून आलो. बरं, हे सगळं एकदाच नाही. अनेकदा. सतत, वारंवार.

सर्जिओ काहीतरी घाट घालत राहतो आणि मी मान हलवत त्याला शरण जात राहते. माझ्या आयुष्याचं प्रतिबिंब स्टेला, सरेना, सोफियाच्या आयुष्यात पडतं, हा त्यांचा ठाम विश्वास आहे. मी सरेनाच्या लग्नात पाठवलेलं मंगळसूत्र ती अजून घालते. सोफियाच्यासाठी तर मी करवली होते. सर्जिओ माझ्या मुलीला ‘नेचर लव्हर कावेरी’ म्हणतो आणि बाबांना (त्याच्या इटालियन उच्चारांत) ‘इंजिनीअर कुरकारनी’! माझा नवरा- नचिकेतवर त्याचं माझ्यापेक्षा जास्त प्रेम आहे! ‘पोरगी चांगल्या घरात पडली’ याचं प्रत्येक वेळी त्याला हायसं वाटतं. सारखा कोणासाठी तरी शब्द टाकतो, कशाची तरी भरभरून माहिती सांगतो, मुंबईच्या चोरबाजारात तासन्तास रमतो. ३० वर्ष होत आली आम्ही एकमेकांच्या आयुष्याचा भाग होऊन. अजूनही चक्रवाढ व्याज लावलेली मुद्दल तो फेडतोच आहे! ‘नचिकेत आणि कावेरीला कधीतरी कन्झानोच्या बर्फाच्या घरी नेऊ या,’ असा आग्रह गेल्या दोन तीन वर्षांत सुरू आहे. त्याआधी त्यानं लिहिलेल्या ‘स्टोरी ऑफ लाला’ या पुस्तकाचं मराठी भाषांतर मला करायचं आहे. माझ्या भाचरांना, सर्जिओच्या सगळय़ा नातवंडांना भारतात आणायचं आहे.. खूप काम आहे.. खूप प्रवास आहे..
chaturang@expressindia.com