जयराज साळगावकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 ‘‘काही पर्यटनस्थळं पाहायचं आपण अनेक दिवस ठरवत असतो, त्याची वेळोवेळी आखणीही करत असतो. पण प्रत्यक्षात तिथे जायला मिळतं अगदी अनपेक्षितरीत्या. जणू त्या स्थळाचाच आपल्याला ‘बुलावा’ आलेला असतो. माझी ल्हासा भेट अशीच अनपेक्षित. या पर्यटनानं मला केवळ आत्मिक सुख दिलं नाही, तर अशा प्रवासांत येऊ शकणारी विचित्र संकटं आणि त्यातसुद्धा अचानक मिळणारे तोडगे यांची झलकच मी पाहिली.’’

आमच्या नायगावच्या घरात एक बसलेल्या हसऱ्या बुद्धाची पितळी मूर्ती होती. अनेक वर्ष ही मूर्ती मी न्याहाळत आलो आहे. परिणामी, बौद्ध धर्माबद्दल जाणून घ्यावं, अशी उत्सुकता मनात दाटून येऊ लागली.

तेव्हा पुरातत्त्व विभागातले माझे मित्र भालचंद्र कुलकर्णी यांनी कोकणातल्या पन्हाळेकाजी इथल्या वज्रयान बौद्ध लेण्यांचा शोध, संशोधनात्मक अभ्यास केलेल्या आणि त्यावर पुस्तक लिहिलेल्या डॉ. एम. एन. देशपांडे यांची भेट घेण्यास सुचवलं. डॉ. देशपांडे पुरातत्त्व विभागाचे माजी संचालक होते. त्यांच्याकडून मला बौद्ध लेणी आणि बौद्ध धर्माविषयी बरीच माहिती मिळाली. डॉ. देशपांडे यांनी त्यांचं पुस्तकही स्वाक्षरी करून मला भेट दिलं. विदुषी साहित्यिका दुर्गाबाई भागवत याही बौद्ध धर्माच्या गाढय़ा अभ्यासक. त्यांच्या झालेल्या भेटीत या धर्माबद्दलच्या अनेक लोककथा, या धर्माचं तत्त्वज्ञान मला समजलं. ‘धर्मयुग’ या हिंदी साप्ताहिकाचे तेव्हाचे संपादक डॉ. धर्मवीर भारती यांच्याकडूनही बौद्ध धर्माबद्दल बरंच काही जाणून घेता आलं. त्यांनी सिद्ध साहित्यावर डॉक्टरेट प्राप्त केली होती. दिवसपरत्वे या विषयातला रस वाढतच होता. बौद्ध धर्माचं संशोधन करत असताना ल्हासा, तिबेट इथलं बौद्ध धर्माचं आद्यपीठ, पोतोला महाल (पॅलेस) बघण्याची इच्छा मनात कायम निर्माण होत होती. तसंच लॉर्ड कर्झननं आखलेल्या आणि फ्रान्सिस यंगहजबंड या लष्करी अधिकाऱ्यानं पार पाडलेल्या मोहिमेवरील (१९०३) ‘यंगहजबंड- द लास्ट ग्रेट एम्पेरियल अ‍ॅडव्हेचर’ हे पॅट्रिक फ्रेंचयांनी लिहिलेलं पुस्तक वाचून तिबेटबद्दलचं औत्सुक्य वाढलं होतं. पण तिकडे कसं जायचं, असा प्रश्न होता. त्या काळी (१९९७) तिबेटचा व्हिसा (तिबेट ट्रॅव्हल परमिट) मिळणं खूप कठीण होतं. जवळपास अशक्यच. भारतीय पर्यटकांना चिनी व्हिसा मिळायचा, तो फक्त कैलास मानसरोवर यात्रेसाठी किंवा व्यापारसंबंधित कामासाठी.

 बौद्ध धर्माचा अभ्यास हा जसा माझा एक आवडीचा विषय होता, तसाच आणखी एक छंद म्हणजे सह्याद्री-हिमालयात भटकंती. या आवडीमुळेच मी गिर्यारोहणाकडे वळलो. नेपाळ, सिक्कीम, लडाख, तिबेट इथली बौद्ध धर्माची लेणी, धर्मस्थळं, मंदिरं आणि धर्मशाळा पाहताना या प्रवासाच्या छंदाची मला मदत झाली. दार्जिलिंगच्या हिमालय माउंटनिअिरगच्या  इन्स्टिटय़ूट’मधून मी गिर्यारोहणाचं प्राथमिक प्रशिक्षण घेतलं आहे. यूथ हॉस्टेलचे काही हिमालयीन ट्रेक्सही केले आहेत. याच काळात काही गिर्यारोहक मित्रांनी एव्हरेस्ट चढाईची मोहीम आखली होती. गिर्यारोहणाचा पूर्वानुभव असल्यानं या ग्रुपसाठी प्रसिद्ध व महत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटीगाठी घालून देण्यात मी मदत करत होतो. अशाच एका शनिवारी संध्याकाळी चार्टर्ड अकाउंटंट असणारा माझा मित्र राजेंद्र फडके भेटायला आला. तो एक नावाजलेला गिर्यारोहक असून एव्हरेस्ट मोहिमेत खजिनदार म्हणून जबाबदारी पाहात होता. त्याच्याबरोबर मोहिमेतला आणखी एक सदस्य रत्नेश झवेरीसुद्धा होता. एक अडचण घेऊन ते माझ्याकडे आले होते. त्यांच्या गटातली जी मुलगी या मोहिमेसाठी प्रसिद्धीमाध्यमांशी संपर्क करत होती (पी.आर.) तिनं आपल्या घरगुती अडचणीमुळे मोहिमेतून माघार घेतली होती. त्यामुळे त्यांच्या गटात एक जागा मोकळी झाली होती. पण नेमकं त्याच काळात माझ्या घरात दुरुस्तीचं काम चालू होतं. मी जरा बिचकतच पत्नीला- भारतीला विचारलं, की ‘मी या मोहिमेत सामील होऊ का?’ तिनं चक्क होकार दिला. तर, अशा प्रकारे मला विचारणा शनिवारी झाली होती आणि सोमवारी सकाळी आम्ही काठमांडूला निघालो. एव्हरेस्ट बेस कॅम्पकडे माझा प्रवास सुरू झाला.

सोमवारीच काठमांडूला पोहोचलो. तिबेटच्या बाजूनं चढाई करून अंतिम शिखर सर करणारी आमची मोहीम ही या तऱ्हेची पहिली मोहीम होती. बेस कॅम्पला पोहोचण्यासाठी आम्ही घाई केली. पाच दिवसांऐवजी तीन दिवसांतच आम्ही तिथे पोहोचलो. चीनच्या चमूनं शिखर सर केल्याची बातमी आली होती. कसंही करून आम्हाला लवकरात लवकर शिखर गाठायचं होतं, आम्हीही उत्साहात होतो. पण पौर्णिमेच्या आधी आमचा गट शिखर गाठू शकणार नाही, असं मला अंत:प्रेरणेनं जाणवलं. आमचा गटनेता राजेंद्र फडकेजवळ मी तसं बोललोसुद्धा, पण त्याला काही ते पटलं नाही. गिर्यारोहणाच्या एकंदरीत प्रमाणित अंदाजांशी माझं हे भाकीत कुठल्याही तऱ्हेनं जुळत नव्हतं. शिवाय गिर्यारोहणाच्या शिस्तीमध्ये नेता- रोप लीडर सांगेल ते ऐकायचं असतं. त्यामुळे आम्ही तडक बेस कॅम्प गाठण्याचं ठरवलं. एव्हरेस्ट बेस कॅम्पवर इतर देशांचे तंबू, साधनसामग्री अद्ययावत होती, तर आम्ही वापरत असलेले जुनाट तंबू रात्री सोसाटय़ाच्या वाऱ्यानं छत्रीसारखे उलटे होत. भन्नाट वारे आत घुसत. खाताना, बोलताना तोंड उघडल्यावर झंझावती वाऱ्यानं त्याचं पॅरॅशूट होत असे! रात्री झोपताना तर तंबूमध्ये खड्डा करून त्यात पोटावर झोपून पाठीवर जड सामान किंवा सॅक टाकून झोपावं लागत असे, तरी झोप येत नसे. उलटय़ा होत असत. उंच ठिकाणी हवा विरळ होते, प्राणवायू कमी होतो. त्या वातावरणाला सरावण्यासाठी आमच्या शरीराला पुरेसा वेळ मिळाला नाही. आम्ही केलेल्या घाईमुळे आम्ही चौघंही रक्त ओकू लागलो. भूक लागेना, झोप अजिबात लागेना. परिणामी आम्ही सगळे गंभीर आजारी पडलो. बेस कॅम्पवरच्या अधिकृत चिनी डॉक्टरनं आम्हाला तपासलं आणि आम्ही ताबडतोब खाली सखल जागी उतरावं, असं सुचवलं. झपाझप उंची गाठल्यानं आम्ही ‘अक्लमटाईज’ झालो नव्हतो. आम्हाला ‘माउंटन सिकनेस’ झाला होता. म्हणून खाली कमी उंचीच्या ठिकाणी जाणं गरजेचं होतं. कमी उंचीच्या ठिकाणी उतरण्यासाठी आम्ही ताबडतोब काठमांडू गाठायचं ठरवलं. पण त्या डॉक्टरनं आम्हाला थांबवलं. तो म्हणाला, ‘‘तुम्ही आता चिनी लष्कराच्या हद्दीत आणि अधिकारात आहात. त्यांच्या नियमानुसार तुम्ही कुठल्या ठिकाणी खाली उतरायचं ते आम्ही ठरवू. तुम्हाला तिबेटमध्ये ल्हासाला जावं लागेल.’’ हे ऐकून एव्हरेस्ट पर्वताच्या त्या भयानक थंडीत आणि गतिमान बोचऱ्या थंड वाऱ्यातही मी मनातल्या मनात आनंदानं नाचू लागलो. ल्हासाकडे आमचा प्रवास सुरू झाला..

वाटेत सिंगात्से मठ लागला. तो बघून आम्ही बुद्ध पौर्णिमेच्या पवित्र दिवशी सिंगात्सेत पोहोचलो. सिंगात्सेमध्ये या दिवसाचं महत्त्व असल्याचं जाणवलं नाही. खरं तर ही पंचेन लामाची मॉनेस्ट्री आहे. पंचेन लामांचं स्थान दलाई लामांनंतर दुसरं आहे. १९६२ मध्ये चिनी लष्करानी त्यांना अटक केली, तेव्हा ते चार वर्षांचे होते. अलीकडेच त्यांचं पुनरुत्थान दलाई लामांनी केलं, पण एका लहान मुलाला ते पद देऊन. अटक झालेले पंचेन लामा सध्या चीनच्या ताब्यात असावेत. इथल्या उभ्या बुद्धाच्या मूर्तीचा फक्त तळपाय शंभर फूट लांबीचा आहे. त्या दिवशी उत्सव करावा या गोष्टीला चिनी सरकारनंही फारसा पाठिंबा दिला नव्हता. मला असं जाणवलं, की नीट ठरवूनसुद्धा बुद्ध पौर्णिमेला सिंगात्सेला भेट देणं जवळजवळ अशक्य होतं. नंतर आम्ही ल्हासाला पोहोचलो आणि तिथल्या मॉनेस्ट्रीज (बौद्ध सन्याशांची निवासाची जागा/ आश्रम) मनसोक्त पाहिल्या.

माझ्या मित्रांनी त्यानंतर बेस कॅम्पला परतायचं ठरवलं. मी मात्र ल्हासातच राहायचं ठरवलं. पुढच्या काही दिवसांत मी अनेक महत्त्वाची पवित्र स्थानं, मठ यांना भेटी देऊन तिथल्या लामांशी, साधूंशी, भिख्खूंशी बोललो. खूप आनंदात तिथला वेळ व्यतीत केला आणि मग परतायची वेळ झाली. ल्हासामध्ये राहणं आमच्या मोहिमेचा भाग नव्हतं. मला ल्हासा ते काठमांडू विमानाचं तिकीट काढणं भाग होतं. पैशांच्या बाबतीत मी कफल्लक झालो होतो आणि तिबेटचे चिनी अधिकारी क्रेडिट कार्ड स्वीकारत नव्हते. मी अगदी एकटा पडलो होतो. माझ्या गाईडला मी आधीच विचारलं होतं, ‘‘मला एअरपोर्टवर काही फी किंवा टॅक्स द्यावा लागेल का?’’ वैतागलेल्या गाईडनं म्हटलं, ‘‘नाही. काही द्यावं लागत नाही.’’ आता मागे बघितल्यावर लक्षात येतं, की गाईड माझ्यावर खूप चिडला असावा! कारण माझ्यासारख्या कफल्लक भारतीय प्रवाशाकडून त्याला टीप म्हणून छदामही मिळण्याची शक्यता नव्हती. कारण त्याला देण्यासाठी माझ्याकडे पैसेच नव्हते.

एअरपोर्टवर इमिग्रेशन काउंटरला चिनी अधिकाऱ्यानं माझा पासपोर्ट घेतला, तो तपासला, व्हिसा तपासला आणि म्हटलं, ‘‘एअरपोर्ट टॅक्स १०० डॉलर्स!’’ त्या वेळी माझ्याकडे जेमतेम ५०० रुपये होते. हे समजताच त्या अधिकाऱ्यानं माझा पासपोर्ट हिसकावून घेतला आणि एका सुरक्षारक्षकाला फर्मावलं, ‘‘याला भिंतीकडे तोंड करून उभा कर.’’ त्या वेळी मी प्रचंड घाबरलो. चिनी तुरुंगात अपराधी लोकांचा भयानक छळ होतो, त्यांना मारून, त्यांच्या शरीरातले अवयव काढून घेतले जातात अशा हकिकती वृत्तपत्रांमध्ये आणि इतरत्रही मी वाचल्या होत्या, त्या आठवू लागल्या. तितक्यात कुठूनतरी अचानक खाकी कपडय़ांमध्ये एक माणूस तिथे आला. त्याच्या खांद्याला पोस्टमनसारखी झोळीवजा पिशवी होती. त्यानं मला विचारलं, ‘‘काय झालं? काय अडचण आहे?’’ मी त्याला मोडक्यातोडक्या नेपाळी भाषेत माझी चित्तरकथा ऐकवली. (दार्जिलिंगला गिर्यारोहण प्रशिक्षणादरम्यान ही भाषा थोडीबहुत जाणून घेतली होती.) त्यानंतर जे काही घडलं, ते अविश्वसनीय वाटावं असंच आहे! माझ्याजवळचे पाचशे रुपये त्यानं घेतले आणि माझा शंभर डॉलर्सचा सर्व टॅक्स भरला. त्यामुळे माझा पासपोर्ट परत मिळून विमानात चढण्याची परवानगी मला मिळाली. विमानात बसल्यावर एक ग्लास थंड कोक मिळाला. माझ्या आठवणीत राहिलेलं ते सर्वोत्तम असं पेय आहे! आजही त्याची चव जिभेवर आहे. तो माणूस कोण होता ते मात्र गूढच राहिलं. 

ल्हासातून बाहेर पडल्यावर वाटलं, की माझ्यावरच्या अडचणी टळल्या. पण तसं होणार नव्हतं. नेपाळमध्ये काठमांडू विमानतळावर आल्यावर एका स्त्री इमिग्रेशन अधिकाऱ्यानं माझी तपासणी केली. मी म्हटलं, की माझ्याकडे नेपाळचा व्हिसा नाही. एकाच ठिकाणाहून निघण्यासाठी आम्हा चौघांचा एकच ग्रुप व्हिसा होता. तिनं सांगितलं, की मी ल्हासाहून नेपाळला आलो होतो, त्यामुळे ल्हासाहून इथला व्हिसा घ्यायला हवा. म्हणून ल्हासाला जाऊन तिथून व्हिसा घेऊन पुन्हा आल्यामार्गे नेपाळला परत यावे. नेपाळहून ल्हासाला जाणारं विमान संध्याकाळी निघेल, अशी माहितीही तिनं मला दिली. हा सर्व फार गुंतागुंतीचा मामला झाला होता. मी मोडक्यातोडक्या नेपाळीत माझी कथा तिला सांगितली. यात तीन-चार तास गेले. त्यानंतर मी तिला बॉलीवूडच्या हकिकती सांगितल्या. मुंबईत आल्यावर सिनेअभिनेत्यांची भेट घालून देण्याचं आमिष दाखवलं. अखेर तिचं अंत:करण विरघळलं. त्यानंतर अध्र्या तासातच इमिग्रेशनमधून बाहेर पडलो आणि एकदाचं मुंबईला जाणारं विमान पकडलं. या अशा तऱ्हेच्या गोष्टी निव्वळ योगायोगानं घडत नसाव्यात. आपली समज आणि जाणीव यांच्या पलीकडे एखादी शक्ती कार्यरत असावी आणि योग्य वेळी दैवाचीही साथ तुम्हाला मिळत असावी. वेगवेगळय़ा वेळी असे अनुभव मला आले आहेत. 

  भारतात किंवा परदेशात फिरायला गेलो, की मी त्या परिसरातल्या धर्मस्थळांना आवर्जून भेट देतो. मी बहुतेक सर्व धर्माची प्रार्थनास्थळं पाहिली आहेत. आपण जिथे जातो तिथल्या स्थानिकांशी गप्पा मारल्या की आसपासच्या नागरीकरणाची माहिती सहजपणे मिळते, हा अनुभव अनेक ठिकाणी आला आहे. आपल्याकडे फिरण्यासाठी किती दिवस आहेत, त्याचा अंदाज घेऊन काय पाहायचं, कुठे भेटी द्यायच्या, हे आधीच ठरवतो. आता अशी माहिती मिळवणं पूर्वीइतकं कठीण राहिलेलं नाही. पुस्तकं, इंटरनेट यांच्या माध्यमातून कोणत्याही स्थळांची अशी माहिती लगेच मिळते. पोटापुरती नेपाळी भाषा येत असल्यामुळे नेपाळ-तिबेटमध्ये फिरताना मला फारशी अडचण आली नाही. त्या भागातल्या मंडळींना हिंदी चित्रपटांमुळे हिंदी भाषा थोडीफार समजते. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधणं आपल्याला तसं सोपं जातं. भारताबाहेर आपल्या मदतीला इंग्रजी असतेच.

धर्मस्थळांच्या भेटींबद्दल माझं एक मत झालं आहे, की आपल्या मनात कितीही असलं तरी जोपर्यंत योग येत नाही, ‘बुलावा’ येत नाही, तोपर्यंत आपण त्या तीर्थस्थानी पोहोचू शकत नाही. पण इच्छा प्रबळ असेल, तर कधी आपल्या ध्यानीमनी नसतानाही असं काहीतरी घडतं आणि आपणाला जिथे जावंसं वाटतं, ज्याचा आपण ध्यास घेतलेला असतो, तिथे आपण अद्भुतरीत्या पोहोचतो!   अनेक अडचणी, अडथळे पार करून ल्हासाचा ‘पोतोला पॅलेस’ पाहायला मिळाला, याचा आनंद शब्दांपलीकडचा होता. शेवटी एकच खरं.. बुलावा आला म्हणूनच ल्हासा बघून झालं!

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Artists tourism lhasa by tourism spiritual happiness buddha idol chaturang article ysh