अरुणा अंतरकर
हिंदी चित्रपटांमध्ये प्रेमाला थेट पडद्यावर आणण्यासाठी बरीच वर्ष घालवावी लागली. पन्नास, साठच्या दशकांतलं नायक-नायिकांमधील प्रेम तर ‘हस्तस्पर्शविरहित’ या भावुक प्रकारातलंच होतं! ते हळूहळू बदलत गेलं आणि गाणीसुद्धा खोडकर, खटय़ाळ, तर कधी एकदम शृंगारिक होत गेली.. कारण ‘आशा भोसले’ या पंचाक्षरांचा परीसस्पर्श त्या गाण्यांना झाला. ‘छोड दो आँचल’ सारखं गाणं असो, किंवा नायकाला उद्देशून प्रथमच गायलं गेलेलं, ‘उडें जब जब जुल्फें तेरी, कवारीयोंका दिल मचले’ किंवा मग थेट मराठीतलं ‘मलमली तारुण्य माझे’ वा ‘तरुण आहे रात्र अजुनि’.. हिंदी-मराठी गाण्यांतले हे विविधरंगी भाव आपल्या गळय़ांतून साकारणाऱ्या आशा भोसले यांचा ८ सप्टेंबर हा ९० वा वाढदिवस. त्यानिमित्तानं त्यांच्या गाण्यांविषयी..
जाऊ पाहणारी रात्र आणि येऊ बघणारा दिवस यांच्या मधोमध लटकलेली ती विचित्र घटिका. आसमंतात दुधी झिरो बल्बसारखा प्रकाश अंग चोरून उभा. आणि त्याच्याचसारखी मी ‘दूरदर्शन’च्या गेटसमोर उभी. सकाळच्या बातमीपत्राच्या कामासाठी आत जाण्याची निकड, पण पापण्यांमध्ये झोप हटून बसलेली. तिला हटवण्यासाठी समोरच्या चहा-टपरीला शरण जाणं भाग होतं. तिथे झोपेचा नॉन-अल्कोहोलिक हँगओव्हर पळवण्यासाठी अर्धा डझन समदु:खी पेंगत होते. त्यांचे डोळे उघडावे म्हणून की काय चहावाल्यानं ‘म्युझिक प्लेयर’ लावला अन् काय आश्चर्य, क्षणार्धात जादू घडली!
कोंडलेल्या वाफेने झाकण उंच उडावे तसे झाले. अर्धमिटले डोळे खडबडून जागे झाले. आळसावले कान तत्परतेने कामाला लागले. गाण्याचे शब्द तसे कामचलाऊ होते, ‘ तू रुठा तो मैं रो दुंगी सनम, आजा मेरी बाहो में आ’ इतकी ही मामुली गीतरचना; पण ही कसर आशाबाईंचा अफलातून लागलेला आवाज आणि आर.डीं.ची भन्नाट वाद्यं भरून काढत होती. वाद्यांचा तांत्रिक तपशील सांगणं अवघड आहे, पण काहीतरी विलक्षण ऐकत असल्याचा प्रत्यय ती देत होती. त्याच्यातले पियानोचे सुंदर तुकडे आणि टाळय़ांसारखा एक वेगळा रिदम अख्ख्या गाण्याला वेढून बसला होता, तो बेटा थांबायलाच तयार नव्हता. मध्येच कुठेतरी एखाद्या छोटय़ा फुलपाखरासारखी गिटार भिरभिरत होती. तिच्या पाठोपाठ सतारही डोकावून जात होती. आशाबाईंना जणू गाऊ द्यायचं नाही असा जणू कटच केला होता त्यांनी. परंतु आशाबाई काय कमी वस्ताद? त्यांनीदेखील असे सतराशे साठ दुष्मन पाळलेच होतेच की! आताही त्या गळचेपीचा हा डाव परतवून लावायला सज्ज झाल्या.. त्यांनीही गळय़ातली लढाईची सगळी आयुधं बाहेर काढली. कधी वाद्यांपेक्षा आवाजाचा झोका उंचावून, तर कधी ‘आजा..’ची ओळ संपताच आलाप घेऊन. तर कधी ‘रो दुंगी’पाशी खटय़ाळ हसून वाद्यांवर स्वार होत सगळी सूत्रं स्वत:कडे खेचून घेत. हे खायचं काम नाही; गायचं आहे. पण गाणं तरी कुठे सरळ आहे? चित्रपटातलं गाणं तसं नसतंच. ते गळय़ानं गाणं पुरेसं नसतं. तिथे गायकाला आधी गाण्यातल्या भाव-भावना मनात उतरून घ्याव्या लागतात. त्यानंतर ज्याच्यासाठी गायचं, त्या कलाकाराचा गळा आपल्या गळय़ात घ्यायचा असतो आणि मग गाण्यासाठी तोंड उघडायचं असतं. वृत्तपत्रात केवळ एक फोटो शेकडो शब्दांचं काम करून जातो. चित्रपटातलं तीन मिनिटांचं गाणं तीच कामगिरी करीत असतं. जिथे भल्याभल्या लेखकांचे शब्द उणे पडतात, तिथे एक गाणं बाजी मारून जातं. चित्रपटाचा लेखक आणि दिग्दर्शक यांच्या मनात गाण्याबद्दल जे असतं ते सगळं काही ते एक गाणं सांगून जातं. त्या पहाटे मला आशाबाईंच्या त्या गाण्यानं त्यांच्या गाण्यांची स्वैर सफर करवून आणली..
लता- आशा या मंगेशकर भगिनींनी तर नायिकांच्या किमान पाच पिढय़ांना आवाज देण्याचा विक्रम करून आपल्या नावाचा झेंडा रोवला. उदंड गुण असूनही हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये माणसं यश टिकवू शकतील याचा भरवसा नसतो. गुणवत्तेला कणखर व्यक्तिमत्त्वाची जोड असेल तरच इथे निभाव लागतो. या दोघींचं वैशिष्टय़ म्हणजे या पडद्यावरील नायिकांच्या बरोबरीनं ‘सुपरस्टार’ बनल्या. आशा अन् लता यांनी स्वत:चे नियम व अटी लागू करून साठ वर्षांहून अधिक काळ इथे अधिराज्य केलं. आशाबाई तर सिनेसृष्टीत पाऊल ठेवल्यापासून लोकांची झोप उडवत होत्या. कधी ‘इना मीना डीका’, तर कधी ‘मिस्टर जॉन’ यांसारखी धमाल गाणी गाऊन. ‘कधी दम मारो दम’ असा बिनधास्त पुकारा करून, तर कधी आपल्यापेक्षा २० वर्षांनी लहान असलेल्या आर. डी. बर्मनशी विवाह करून. मात्र यातल्या कोणत्याही गोष्टीमागे खळबळ उडवून प्रसिद्धी मिळवण्याचा उद्देश नव्हता. ‘अंदर की बात’ अशी, की आशा यांच्या घराला मागचं दार नाही आणि खिडक्यांना पडदे लावायला त्यांना आवडत नाही. खुलासे आणि स्पष्टीकरण यांच्यावर त्यांचा विश्वास नाही. मनात जे येईल ते लगेच करायला त्यांना आवडतं. परिणामांचा विचार करण्याची त्यांना सवय नाही आणि फिकीरही नाही.
त्यातच त्यांनी पाऊल ठेवण्याआधी कलासृष्टीचं सुरांगण झगमगत्या नक्षत्रांनी फुलून गेलं होतं. लता-गीता-शमशाद आणि बऱ्याच कुणी. त्या असताना प्रसिद्ध नायिकांची गाणी या नव्या गायिकेला कुठून मिळणार होती? समोर येईल ते गाणं घेण्याची परवड आशाबाई सहन करत होत्या. याच गाण्यातून स्तिमित करणारी विविधता आणि प्रगल्भता त्यांच्या गायनात येत चालली होती. कधी त्या परकरी मुलीच्या आवाजात बाहुलीच्या लग्नात गात होत्या, ‘गोरे गोरे हाथोंमें मेहंदी लगाके’ (परिणीता) तर कधी दहाबारा वर्षांचा शहाणा मुलगा बनून दु:खीकष्टी आईला समजावत होत्या, ‘चलो चले माँ, काटोंसे दूर, कही फुलोंकी छाव में।’ (बूट पॉलिश) तर दुसऱ्या दिवशी, ते निरागस बाल्य मागे टाकून मादक गाण्यातून बार डान्सर बनून आमंत्रण देत होत्या, ‘जिने दो और जिओ, चढती जवानी के दिन है. मरना तो सब को है जीके भी देख ले, चाहत का एक जाम पिके भी देखले।’ (टॅक्सी ड्रायव्हर) त्या वेळी साहिर लुधियानवींची काव्यप्रतिभा त्यांच्या वयाइतकीच तरुण आणि जोमदार होती. त्यांच्या कलंदर शब्दांची आशाबाईंच्या स्वरांनी धार वाढवली. सगळं ठीक चालू होतं खरं, यात संसाराला आवश्यक आर्थिक गरज भागत होती, पण कलाकार म्हणून जे समाधान मिळवायचं, ते अजून खूप दूर होतं. याचं मुख्य कारण म्हणजे त्यांच्यात काही वेगळेपण आहे, असं लक्षात आणून देणारं गाणं त्यांना मिळत नव्हतं किंवा गायनातूनही काही करामत करता येत नव्हती. ही कुचंबणा त्यांच्या एकटीच्याच वाटय़ाला आली नव्हती, कारण थोडाफार फरक वगळता सगळय़ाच चित्रपटांमधल्या नायिकांचं व्यक्तिचित्रण एकसारखंच, खरं म्हणजे एकसुरी होतं.
देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष लोटली होती, पण त्या स्वातंत्र्याचा स्त्रीच्या कौटुंबिक आणि सामाजिक दर्जावर परिणाम झालेला दिसत नव्हता. स्त्री शिक्षण घेऊ लागली होती, तरी विवाहानंतर अशिक्षित स्त्रीप्रमाणे तिलाही बहुतांशी घराच्या चार दिवारीतच स्थान होतं. नोकरी करण्याची मुभा नव्हती. इतकंच काय, ज्याच्याशी समाजसंमत विवाह झाला आहे, अशा साताजन्माच्या जोडीदाराचं नाव घेण्याचीही परवानगी नव्हती, की त्याच्याशी मोकळेपणानं बोलायलाही जवळपास मनाईच होती. सुखवस्तू, सुशिक्षित घरांमधल्या अविवाहित मुली कॉलेजमध्ये शिक्षण घेत होत्या, पण स्त्री-पुरुष समानता, या शब्दांची गंधवार्ताही कुणाला नव्हती. मुंबईच्या चाळी आणि पुण्याचे वाडे यांच्यात कुणी ना कुणी काका किंवा नाना अविवाहित तरुण स्त्री-पुरुषांवर कडक संस्कृतीरक्षक पाळत ठेवून असत. (साहजिक सहाव्या दशकाच्या त्या काळात सीसीटीव्हीची गरजच नव्हती!) प्रेमाच्या दुष्काळाची ही परिस्थिती अखेर चित्रपटानं संपवली. स्वातंत्र्योत्तर काळात निदान पडद्यावरचे स्त्री-पुरुष प्रेम बोलून दाखवायला लागले होते. मात्र हे प्रेमदेखील हस्तस्पर्शविरहित या भावुक प्रकारातलंच होतं. अशा वेळी अचानक एक सुखद, सुरेल सूर कानी पडले.. ‘छोड दो आँचल जमाना क्या कहेगा’ या ‘ती’च्या काहीशा सलज्ज, पण सुखावलेल्या प्रश्नाला ‘त्या’चं मस्त, बेफिकीर उत्तर होतं, ‘इन अदाओंका जमाना भी हैं दिवाना, दिवाना क्या कहेगा।’ प्रेमाच्या खेळकर शब्दांनी सजलेल्या या गाण्याला देवानंद आणि नूतन यांच्या मनमोकळय़ा प्रेमभावानं खुमारी आणली होती. या गाण्यात लागलेला आशा यांचा फुललेला सूर, ही हिंदी चित्रपटात सुरू होऊ पाहणाऱ्या प्रेमपर्वाची नांदी होती. तो सूर आतापर्यंतच्या त्यांच्या सगळय़ा गाण्यांहून वेगळा होता. तारुण्याची चाहूल लागलेल्या प्रणयिनीचा तो सूर होताच, पण त्यातला खटय़ाळपणा बरोबरीची जाणीव दाखवत होता. ती सलज्जपणेच त्याच्यासमोर उभी होती, ‘ये बहारें ये फुहारें ये बरसता मौसम, तन-मन कापे हैं थरथर, मोरी बैंया धर लो साजन’ अशी मागणी करायला बुजत नव्हती. हिंदी चित्रपटातल्या स्त्रीच्या हातातल्या अदृश्य बेडय़ा जणू या प्रेमगीतानं काढून घेतल्या आणि तिला खुल्या वातावरणात आणलं.
गाण्याच्या प्रारंभीच आशाबाई ‘आ:’ असा जो चीत्कार करतात, त्यातला गोडवा वर्णन करायला शब्द नाहीत. या एका गाण्यातून त्यांनी सर्वाचं लक्ष वेधून घेतलं. दुसरीकडे मात्र संस्कृतीरक्षकांनी त्याबद्दल नापसंती दर्शवली, वृत्तपत्रांतून त्याच्या चर्चा झाल्या, इतकंच काय, तर एका मराठी हास्यपटामध्येही त्याचा उल्लेख झाला. या गाण्याच्या लोकप्रियतेनं मग हलक्याफुलक्या प्रेमगीतांचं नवं दालन रुपेरी पडद्यावर उघडलं. चित्रपटांमध्ये काही तरी वेगळं करू पाहाणारे देवानंद आणि गुरुदत्त यांच्यासारखे नट आणि निर्माते आता सिनेमाची चाकोरी बदलू पाहात होते. देवानंदच्या नायकाला त्याच्यामागून चालणारी खालमानेची प्रेयसी किंवा पत्नी नको होती. त्याच्या हातांत हात घालून त्याच्याशी मोकळेपणानं बोलणारी बरोबरीची जोडीदार हवी होती. त्याच्या या इच्छेची सुरेल आणि प्रेक्षणीय प्रात्यक्षिकं ‘आजा पंछी अकेला हैं’, ‘आँखों में क्या जी’ (नौ दो ग्यारह), ‘अच्छा जी मैं हारी चलो’ (काला पानी), ‘दिवाना, मस्ताना हुआँ दिल’ (बंबई का बाबू) या गाण्यांमध्ये पाहायला मिळाली. हळूहळू इतर चित्रपटांमधूनही अशी रंगतदार प्रेमगीतं दिसू लागली. ‘चलती का नाम गाडी’ या चित्रपटानं प्रेमगीतांचा हा वेलू गगनावेरी नेला. ‘हाल कैसा हैं जनाब का?’ आणि ‘पाँच रुपय्या बाराह आना’ या गाण्यांनी रसिकांना वेड लावलं आणि आशाबाईंना स्टार बनवलं. नकळत अशा गाण्यांसाठी त्यांची मक्तेदारी निर्माण झाली.
या गाण्यांमध्ये लोकांना त्यांना हवी होती तशी नव्या काळातली स्त्री भेटली. आधी उल्लेखलेल्या काही गाण्यांमधून आशाबाईंनी नायकाला चक्क वेडावून दाखवलं होतं आणि ‘चलती का नाम गाडी’मधल्या गाण्यांमध्ये तर त्या किशोर कुमारच्या ‘अरे’ला ‘का रे’ करत होत्या. हा खेळ असा रंगला, असा रंगला, की पुढे आठव्या, नवव्या दशकापर्यंत चालू राहिला. आशा आणि किशोर हा ‘कॉम्बो’ धमाल गाजला. आता कितीही गोड वाटत असला, तरी अशा सांगीतिक अतिपरिचयाची कधीतरी अवज्ञा होणं ओघानं आलंच. तेव्हा प्रेमाच्या गाण्यातही दमदाटी करणाऱ्या किशोरकुमारना आशाबाईंनी अक्षरश: गुडघ्यांवर बसायला लावलं. कधी नव्हे ते जरासे गंभीर होऊन एकदा किशोरनी कळवळून म्हटलंदेखील, ‘अच्छी नहीं दिल्लगी दिले बेकरार से..’ या वेळी आशाबाईंनी अनेक वेळच्या शाब्दिक चकमकीत घ्याव्या लागलेल्या माघारीची सव्याज परतफेड केली. त्यांनी थेटच सवाल केला, ‘क्यूँ रो रहें हो, छेडा था हम ने तो तुमको प्यार से’. तेव्हा तात्पुरती शरणागती पत्करलेल्या किशोर कुमारनी नंतर पंजा काढलाच.. ‘सी.ए.टी. कॅट, कॅट माने बिल्ली दिल हैं तेरे पंजे में तो क्या हुआँ’! तिथेही कुरघोडी करत आशांनी प्रतिसवाल केला, ‘एम.ए.डी. मॅड, मॅड माने पागल, बी.ओ.वाय. बॉय. बॉय माने लडका, मतलब इसका तुम कहो तो क्या हुआँ’. आता हे काय गाण्याचे शब्द असू शकतात? तर, हो! किशोर कुमार आणि आशा भोसले गायला असतील, तर कोणत्याही भाषेतल्या शब्दकोशांची गाणी होऊ शकतात. तसंही आशांच्या अशा सगळय़ाच गाण्यांना गीतकारांनीही ते नटखट, खटय़ाळ शब्द दिलेच, यानंतर याला दुजोरा दिला ओ. पी. नय्यर या खऱ्या अर्थी वेगळय़ा वाटेवरच्या संगीतकारानं. त्यांनी तर आशांचा ‘मेकओव्हर’ केला. पडद्यावरची स्त्रीची प्रतिमा बदलण्याची जी ‘प्रेमळ’ मोहीम चालू झाली होती, तिचं नेतृत्व ओ.पी., किशोर कुमार आणि आशा यांच्याकडे होतं. त्या काळाच्या मानानं चांगलीच धिटाई दाखवत ओ.पीं.नी आशांकडून एक बहारदार गाणं गाऊन घेतलं – ‘उडें जब जब जुल्फें तेरी’. तोवरच्या हिंदी चित्रपटाच्या आचारसंहितेनुसार फक्त नायकच स्त्रीच्या सौंदर्याची स्तुती करायचा. नायिकेनं अशा शब्दांनी चारचौघांत नायकाला ओवाळायचा ‘नया दौर’ जणू इथून सुरू झाला. आशा भोसले या नावाला इथून ओळख मिळाली, मान्यता आधीच मिळाली होती. आता त्यांच्या कलाकौशल्याचा सत्कार सुरू झाला होता.
स्त्रीची प्रतिमा बदलण्याची आशा यांची ही क्रांती तरुण स्त्रियांपुरती मर्यादित नव्हती. त्यापुढे पाऊल टाकत त्यांनी मध्यमवयीन गृहिणींचीदेखील माजघरातून आणि स्वयंपाकघरातून सुटका केली. प्रेमाच्या खेळात पत्नीलादेखील शरीरसुखाची मागणी करण्याचा हक्क आहे, याची चाहूल आशांच्याच गाण्यांमधून लागली. पतीची वाट बघत एकाकीपणा झेलणाऱ्या स्त्रीची व्यथा अतिशय सूक्ष्म आणि नेमक्या शब्दांत त्यांच्या तोंडून ‘जागते रहो’मध्ये ऐकायला मिळाली- ‘ठंडी ठंडी सावन की फुहार, पिया आज खिडकी खुली मत छोडो.. आवे झोंके से पगली बयार.. पिया आज बाती जली मत छोडो’. भाषेची आणि संकोचाची सीमा ओलांडून हीच मागणी मराठीत ‘मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे’ या गाण्यात प्रतिनॉर्मंडीबबित झाली. ‘तरुण आहे रात्र अजुनि’ या गाण्यातही प्रथमदर्शनी या हुरहुरत्या सवालाचीच पुनरावृत्ती झाली. आणि त्याही पुढे जाऊन ‘मुंबईचा जावई’ची नायिका रुसलेल्या आणि पाठ फिरवून बसलेल्या पतीला सवाल करते, ‘का रे दुरावा.. का रे अबोला.. अपराध माझा असा काय झाला’. मनधरणी करत थेट इच्छाच बोलून दाखवते, ‘रात्र जागवावी असे आज वाटे.. तृप्त झोप यावी पहाटे पहाटे’. इतक्या उघडपणे शृंगाराची भावना व्यक्त करतानाही ती गाणी आणि त्यांची नायिका सवंग वाटत नाहीत, उत्कट वाटतात, याचं गीतकार, संगीतकारांबरोबर किंबहुना थोडं जास्तच श्रेय आशाबाईंचं. या गीतांमधल्या भावनांना साकार करण्यासाठी त्यांनी अतिशय कोमल, हळुवार आणि अलवार असा स्वर लावला आहे. त्या मखमली कंठाची तलम शाल त्या भावनांवर अशी अंथरली गेली आहे, की त्या गाण्यातली अमर्यादाशीलता केव्हाच ‘डीफ्यूज’ होऊन जाते. उघडीवाघडी न होता ही गाणी सूचक, उत्कट आणि प्रगल्भ प्रेमाची निशाणी वाटतात.
एकदा लोकमान्यतेची मोहोर उमटली, की कलावंत थोडा गाफील होतो. शैलीच्या नावाखाली त्याच त्या क्लृप्तय़ांमध्ये अडकतो. त्यामुळे त्याच्या कलेचं तेज कमी होतं. आशाबाई या खोडय़ात कधीच अडकल्या नाहीत. उलट दर चार-पाच वर्षांनी त्यांच्या गायनात नवनवे बदल दिसले. सर्वसूरसमभाव मानणारा त्यांचा सप्तरंगी गळा म्हणजे काही तरी वेगळं करू पाहणाऱ्या संगीतकारांची प्रयोगशाळा बनला. आशाबाईंच्या गायनात सातत्यानं नावीन्य कानी पडत राहिलं. गाताना हसणं आणि हसताना गाणं, ही तर त्याची खास कृती. ‘जानू जानू रे काहे खनके हैं तोरा कंगना’ (इन्सान जाग उठा) या प्रफुल्ल गाण्यात आपल्या प्रियकराविषयी बोलताना नायिकेच्या मनातलं सारं प्रेम त्या गाण्यातल्या आशाबाईंच्या एका लाडिक हास्यानं उमलून आलं आहे. त्यांच्या चैतन्यशील, सदाबहार गायनानं दिग्दर्शकांना नवनव्या कल्पना पुरवल्या. ‘बैल तुझे हरणावाणी गाडीवान दादा’ या रसरशीत गाण्याचंच उदाहरण घ्या ना! एरवी बहुतेकदा नऊवारी साडीत दिसणारी तरुण सीमा (देव) या गाण्यात मर्दानी पोशाख करून गाडी हाकताना दिसते. गाण्याशी ती अगदी समरस झाली आहे, फुलून गेली आहे. गाण्यातला शब्दन् शब्द तिच्या चेहऱ्यातून, तिच्या प्रसन्न मुद्रेतून आणि देहबोलीतून जिवंत झाला आहे. गाण्याच्या मध्ये मध्ये ती बैलांना हाक मारते आणि खळाळून हसते. आणि गाण्याच्या शेवटी तर ती बैलांना त्यांच्या भाषेत ‘हुर्र्र’ करते. या गाण्यात आशाबाई पार्श्वगायिका राहात नाहीत. सीमाबरोबर त्याही त्या दृश्याच्या नायिका बनतात. प्रशंसा करायला शब्द अपुरे पडावेत असं हे गाणं आहे, अशी त्याची गायकी आहे. त्या-त्या गायिकेच्या आवाजात गाणं हे आशाबाईंचं ठळक वैशिष्टय़. सीमा आणि नूतन यांना त्या हुबेहूब आवाज द्यायच्या. असं वाटायचं, की कधी या दोघींना वेळ नसेल, तर आशाबाईंनी खुशाल त्यांच्यासाठी डिबग करावं!
अशी आशाबाईंची बहारदार गाणी आठवत राहिलं, तर ही पुरवणी पुरणार नाही! आशाबाईंना सर्वस्वी वेगळेपण आणि श्रेष्ठत्त्व देणारी परिपक्व प्रेमाची ही नि:संकोच गाणी स्त्रीला देहानं नाही, तर मनानं ओळखतात. तीसुद्धा माणूस आहे, याचं भान ठेवतात. ही गाणी एका पुरुषानं लिहिली असली, तरी ती उपरी वाटत नाहीत. स्त्रीनं अशी मागणी करणं हा तिचा अधिकारच आहे, याची समज तिथे दिसते. अशी मागणी हा स्त्रीस्वातंत्र्याचाच एक जन्मजात, वैध आणि पूर्णत: न्याय्य भाग आहे, असा नैतिक पानॉर्मंडीठबाच त्यामधून व्यक्त होतो. आणि म्हणूनच ती गाणी, तो कवी, संगीतकार आणि ती गायिका यांनी स्त्री-पुरुष नात्याला एक क्रांतिकारी वळण दिलं, बदलत्या काळाची आणि बदलू पाहणाऱ्या नीतिमूल्यांची चाहूल त्यात लागली. गळय़ानं गाणं म्हणणारे अनेक कलाकार आहेत, गळय़ातून गाणं जगणारे मात्र आशाबाईंसारखे कलाकार मोजकेच आहेत. या गळय़ाला वयाचं आणि वार्धक्याचं भय नाही. तरुण आहे स्वर अजुनि!